डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

साहित्य महामंडळाने ठाम राहावे!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या आतापर्यंतच्या अध्यक्षांच्या नावावर नजर टाकली तर, प्रकर्षाने हे जाणवेल की चार दोन अपवाद वगळता त्या निवडी चुकीच्या होत्या असे म्हणता येणार नाही. हो, यांच्यापेक्षा अधिक चांगली नावे त्या वर्षी होती की, असे काहींच्याबाबत जरूर म्हणता येईल, पण त्यांचे साहित्यात काहीच योगदान नसताना ते निवडले गेले असे म्हणता येणार नाही.

उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. ही निवड अखिल भारतीय साहित्य महामंडळाने एकमताने केली असे जाहीर झाले आहे. अन्य काही नावे चर्चेत होती, परंतु फादर दिब्रिटो यांच्या नावावर सहमती झाली हे दोन कारणांनी विशेष महत्त्वाचे आहे. एक म्हणजे दिब्रिटो यांचे साहित्यात पुरेसे योगदान आहे, याबाबत महामंडळ सदस्यांच्या मनात शंका नाही. दुसरे म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), विदर्भ साहित्य संघ (नागपूर), मुंबई मराठी साहित्य संघ (मुंबई) या चार प्रमुख घटकसंस्था आणि त्यांच्या उपघटकसंस्था यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन एखाद्या नावावर सहमती दाखवणे असे योग दुर्मिळ राहिले आहेत. दहा-वीस वर्षांनी असे योग येत राहिले आहेत. अर्थातच त्यात ती व्यक्ती तेवढी स्पृहणीय व आदरणीय असणे आवश्यक असते, हा एक भाग झाला तरी, साहित्यिक म्हणून काही एक निश्चित योगदान अपेक्षित असतेच.

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणूकप्रक्रिया राबवून निवडला जावा, ही काही दशकांची परंपरा मोडीत काढून गेल्या वर्षीपासून, संमेलन अध्यक्षाची निवड महामंडळाच्या सदस्यांनीच करावी अशी दुरुस्ती करण्यात आली. ही नवी प्रक्रिया किती योग्य  व किती अयोग्य यावर मतमतांतरे आहेत. पण दोन्ही पर्यायांमध्ये काही चांगले व काही वाईट भाग आहेत, यावर सर्वसाधारण एकमत आहे. त्यामुळेच नवी पद्धत अधिक योग्य आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी महामंडळाची म्हणजेच त्यांच्या घटक व उपघटक संस्थांची आहे. ते सिद्ध करण्याचा पहिला मार्ग म्हणजे सर्वार्थाने योग्य व्यक्तीची निवड करणे. दुसरा मार्ग ती निवड एकमताने झालेली असो वा बहुमताने, त्या अध्यक्षाचा सन्मान राखला जाईल याची काळजी घेणे. म्हणजे अध्यक्षाच्या मागे ठामपणे उभे राहणे. कारण आपण लोकशाही पद्धतीने मराठी साहित्याचा दूत म्हणून त्या वर्षीसाठी ती निवड केलेली असते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या आतापर्यंतच्या अध्यक्षांच्या नावावर नजर टाकली तर, प्रकर्षाने हे जाणवेल की चार दोन अपवाद वगळता त्या निवडी चुकीच्या होत्या असे म्हणता येणार नाही. हो, यांच्यापेक्षा अधिक चांगली नावे त्या वर्षी होती की, असे काहींच्याबाबत जरूर म्हणता येईल, पण त्यांचे साहित्यात काहीच योगदान नसताना ते निवडले गेले असे म्हणता येणार नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, कितीही टीका होत असली तरी, अ.भा. म.सा. संमेलन हे मोठ्या आकर्षणाचे केंद्र अद्यापही आहे. किंबहुना तसे ते आहे म्हणूनच त्या निमित्ताने वादसंवाद दरवर्षी झडत असतात.

साहित्य महामंडळाने आपले हे बलस्थान लक्षात घेऊन ते अधिक बळकट करायला हवे. नव्या प्रक्रियेनुसार गेल्या वर्षी अरुणा ढेरे आणि या वर्षी फादर दिब्रिटो यांची निवड करून साहित्य महामंडळाने चांगले काम केले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या संमेलनाच्या उद्‌घाटक नयनतारा सहगल यांचे आमंत्रण मागे घेतले होते, तेव्हा साहित्य महामंडळाने कच खाल्ली होती. महामंडळाच्या अध्यक्षांनी जरा उशीरा का होईना राजीनामा दिला होता, पण तरीही महामंडळाने त्या चुकीची दुरुस्ती केली नव्हती. या वर्षी फादर दिब्रिटो यांच्या निवडीमुळे काही मूठभर लोक विक्षेप आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे लक्षात घेता महामंडळाने दिब्रिटोंच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे!  

Tags: editorial vinod shirsath Father Francis D-britto sahitya mahamandal विनोद शिरसाठ संपादकीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य महामंडळ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या