डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

मागे वळून पाहायचे म्हणजे आपण कुठून आलो, प्रवासात किती चढ-उतार आले, आतापर्यंत काय कमावले व गमावले, याचा सारासार विचार करायचा आणि आजूबाजूला पाहायचे म्हणजे  सभोवताली घडत असलेल्या चांगल्या व वाईट या दोन्ही प्रक्रिया तसेच आशादायक व निराशाजनक हे दोन्ही प्रकार सजगपणे पाहायचे. यातून काय घडते, तर वास्तवाच्या जवळ जाता येते. म्हणजे ‘कोणत्याही काळात सर्व काही आलबेल नव्हते, कोणताही काळ सुजलाम्‌-सुफलाम्‌ नव्हता, कोणताही काळ केवळ देवमाणसांचा नव्हता’ हे साधेच सत्य मनावर प्रकर्षाने ठसते

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिला टप्पा 11 एप्रिल आणि शेवटचा टप्पा 23 मे रोजी होणार आहे. म्हणजे पुढील संपूर्ण दीड महिना ‘मतदान’ या विषयाभोवती चर्चा रंगणार आहेत. मतदान किती टक्के झाले, कोणत्या पक्षाला किती झाले, कोणी कोणाची मते खाल्ली किंवा कमी केली, त्यामुळे कोण जिंकला वा पराभूत झाला ही चर्चेची एक दिशा राहणार आहे. खरोखर समजून-उमजून मतदान किती लोकांनी केले, पैसे घेऊन किंवा काही लाभ पदरात पाडून मतदान करणारे किती आहेत; दबाव टाकून किंवा मतपेट्या/यंत्रे पळवून, त्यात फेरफार करून कुठे मतदान झाले का, ही चर्चेची दुसरी दिशा असणार आहे.

जे लोक निवडून येणार नाहीत त्यांनी उमेदवार व्हावेच का, अपक्ष उमेदवारांना परवानगी असावी का, जे निवडून येतात त्यांना किमान 51 टक्के मते तरी असायला नकोत का, ही चर्चेची तिसरी दिशा असू शकते. निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही त्यांना मतदान करणे म्हणजे मत वाया घालवण्यासारखेच नाही का, लोकसभेवर उमेदवारी करण्यासाठी काही पूर्वअटी का नसाव्यात ही चर्चेची चौथी दिशा असू शकते. आणि इतक्या सर्व गदारोळात मतदान करण्याला काही अर्थ आहे का, निवडून देण्यालायक उमेदवार कुठे आहेत, सर्वच पक्ष सारखे आहेत, अशी चर्चेची पाचवी दिशा असू शकते. 

या चर्चेचा समारोप किंवा निष्कर्ष प्रचलित निवडणूक पद्धती आणि एकूणच लोकशाही राज्यपद्धती यांच्याशी जोडला जातो. आणि मग निराशा, हतबलता, उद्विग्नता व्यक्त करणारे उद्गार बाहेर पडतात. चांगुलपणावरचा विश्वास उडतोय असे वाटू लागते, मतलबी घटकांनी उच्छाद मांडलाय अशी जाणीव होऊ लागते, काही वेळा सर्व चर्चेचा उबग येऊ लागतो. अशी स्थिती राजकीय जीवनाविषयी जागरूक व संवेदनशील असलेल्या सर्वांची कमी-अधिक फरकाने होत असते. अर्थात, प्रत्येक पक्षाचे असे काही भक्त, पाठीराखे, चाहते, पुरस्कर्ते असतात, त्यांची परिस्थिती वेगळी असते. त्यांना जिंकण्यासाठी किंवा कोणाला तरी पराभूत करण्यासाठी लढाई करायची असते, त्यातून आलेला कैफ त्यांच्यावर स्वार झालेला असतो. शिवाय, काही पक्ष वा विचारधारा यांना कडवा विरोध असलेले काही लोक असतात, त्यांच्या मनात ‘अन्य कोणीही चालेल पण हे नको’ अशी स्थिती आकाराला आलेली असते. 

अशा या अस्वस्थ व भांबावलेल्या काळात, कोणत्याही टोकावर नसलेल्यांची स्थिती केविलवाणी होऊन जाते. कारण एका बाजूला सारे काही भव्यदिव्य घडत आहे असे म्हणणारे, तर दुसऱ्या बाजूला सर्व काही लयाला गेले आहे असे सांगणारे असतात. अशा वेळी टोकावर नसलेल्यांनी स्वत:च्या मनाला शांती देण्याचा एकच उपाय असतो : मागे वळून पाहण्याचा, आजूबाजूला पाहण्याचा. 

मागे वळून पाहायचे म्हणजे आपण कुठून आलो, प्रवासात किती चढ-उतार आले, आतापर्यंत काय कमावले व गमावले, याचा सारासार विचार करायचा आणि आजूबाजूला पाहायचे म्हणजे  सभोवताली घडत असलेल्या चांगल्या व वाईट या दोन्ही प्रक्रिया तसेच आशादायक व निराशाजनक हे दोन्ही प्रकार सजगपणे पाहायचे. यातून काय घडते, तर वास्तवाच्या जवळ जाता येते. म्हणजे ‘कोणत्याही काळात सर्व काही आलबेल नव्हते, कोणताही काळ सुजलाम्‌-सुफलाम्‌ नव्हता, कोणताही काळ केवळ देवमाणसांचा नव्हता’ हे साधेच सत्य मनावर प्रकर्षाने ठसते. 

आपला समाज आणि आपला देश अनेक संकटांचा सामना करत इथपर्यंत आलेला आहे, आणि आपल्या समाजाने व देशाने अनेक वेळा चांगल्या अवस्थांमधून अधोगतीचा मार्गही अनुसरलेला आहे, हेही ठळकपणे पुढे येते. आदर्श अशी राज्यपद्धती कधीही नव्हती, कोणतीही नसते आणि कोणतीही व्यवस्था अंतिमत: व्यक्तींनी मिळून बनवलेली/बनलेली असते. त्यामुळे अनेक गुणदोषांचा अंतर्भाव प्रत्येक व्यवस्थेत असतोच असतो. त्यामुळे कोणतीही व्यवस्था चांगले व वाईट यांचे मिश्रण असते. चांगल्याचे प्रमाण जास्त असते तेव्हा ती व्यवस्था सुसह्य असते आणि वाईटाचे प्रमाण जास्त असते तेव्हा ती व्यवस्था असह्य बनून जाते. सुसह्य वाटत असते तेव्हा सामान्य स्थिती आहे असे आपण म्हणत असतो आणि असह्य वाटते तेव्हा ती असामान्य स्थिती समजली जाते. म्हणजेच सामान्य व असामान्य वा सुसह्य व असह्य स्थिती यांच्यात काही पावलांचेच अंतर असते. थोडीच म्हणजे काही टक्के माणसे जरी इकडची तिकडे वा तिकडची इकडे झाली तर सुसह्यचे असह्य आणि असह्यचे सुसह्य असे रूपांतर होत असते. 

अर्थात, प्रत्येक कालखंड काही लोकांना सुसह्य तर काही लोकांना असह्य वाटत असतो. पण सीमारेषेवरच्या लोकांना काय वाटते आणि ते कोणत्या बाजूला झुकतात, त्याप्रमाणे सुसह्य वा असह्य किंवा सामान्य वा असामान्य परिस्थिती अंतिमत: ठरत असते. कारण या किंवा त्या बाजूइतकीच आणि काही वेळा तर अधिकची गर्दी सीमारेषेवर असते. तर अशा या सीमारेषेवरच्या लोकांना मतदान करताना काय निकष लावावेत असा प्रश्न सतावत असतो. त्यासाठी एक पंचसूत्री (किंवा पंचशील) लक्षात घेतली तर डोक्यावरचा ताण हलका होतो, कोंडीतून वाट सापडल्याचा आनंद मिळतो, योग्य निर्णयाप्रत पोहोचल्याची आश्वस्तता येते आणि कर्तव्यपूर्ती करण्यात आपण कमी पडलो नाही याचे समाधानही मिळते. 

तर काय आहे अशा मतदारांसाठी पंचशील? आजची परिस्थिती सर्वसाधारण आहे असे वाटत असेल तर त्यासाठी तीन निकष लावायचे- 
1. आपल्या मतदारसंघातील जास्तीत जास्त चांगल्या उमेदवाराला मतदान करायचे. एकही चांगला उमेदवार नाही असे वाटत असेल, तर त्यातल्या त्यात कमी वाईट उमेदवाराला मतदान करायचे (यात बिचकून जाण्याचे किंवा कमीपणा मानण्याचे काहीच कारण नाही. कारण आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाचे निर्णय घेताना हेच निकष लावत असतो.
2. आपल्या मतदारसंघातील उमेदवार भ्रष्टाचारी, अकार्यक्षम वा गुंड प्रवृत्तीचा आहे, पण त्याचा पक्ष चांगला आहे अशी स्थिती असेल तर काय करायचे? तर त्या उमेदवाराला मत द्यायचे नाही. कारण त्यातून त्या पक्षाला संदेश द्यायचा असतो की, असे उमेदवार आमच्यावर लादू नका. 
3. आपल्या मतदारसंघात एखादा उमेदवार चांगला आहे, पण त्याचा पक्ष वाईट आहे, अशावेळी काय करावे? त्या उमेदवाराला मत द्यावे. हो, तो उमेदवार वाईट पक्षाच्या बरोबर आहे, पण आपला तो प्रतिनिधी त्याच्या पक्षाचे वाईटपण कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहील, ही आशा/अपेक्षा त्यातून आपण ध्वनित करीत असतो. अर्थातच, चांगला व वाईट पक्ष असे म्हणताना पूर्णत: (absolute) चांगला वा वाईट असे काही प्रत्यक्षात नसते, प्रमाणानुसार ती लेबलं आपण लावत आहोत, याचे भान असणे आवश्यक आहे. 
आता प्रश्न येतो असामान्य परिस्थिती आहे असे ज्यांना वाटते त्यांचा! त्यांनी मतदान करण्यासाठी दोन निकषांचा विचार करावा. 
1. आपल्या मतदारसंघातील उमेदवार खूप वाईट, भ्रष्टाचारी वा गुंड प्रवृत्तीचा आहे आणि तो निवडून नाहीच आला पाहिजे अशी स्थिती असेल तर? तर त्याच्या विरोधात तर मतदान केले पाहिजेच, पण त्याला पराभूत करण्याची शक्यता वा क्षमता असलेल्या उमेदवाराला आपले मत दिले पाहिजे. भले मग आपण मत देणार आहोत तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो. 
2. आपल्या मतदारसंघात असामान्य परिस्थिती नाही, पण आपल्या राज्यात किंवा देशात तशी परिस्थिती आहे, म्हणजे एखादा पक्ष सत्तेवरून हटवणे आवश्यक आहे किंवा त्याला सत्तेवर येण्यापासून रोखायला हवे, असे वाटत असेल तर? तर त्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी मतदान करा; भले मग तो उमेदवार कितीही चांगला असो! 

तर असे हे पंचशील; सामान्य परिस्थिती आहे असे वाटणाऱ्यांनी तीन निकषांचा विचार करून, तर असामान्य परिस्थिती आहे असे वाटणाऱ्यांनी दोन निकषांचा विचार करून मतदान करावे. अर्थात, आपल्या मतदारसंघात वा देशात परिस्थिती सामान्य आहे की असामान्य, हे मात्र ज्याचे त्याने ठरवावे! वरवर विचार करणाऱ्यांना हे पंचशील ‘अराजकीय’ (अपोलिटिकल) वाटेल, किंवा ‘बिगरराजकीय’ (नॉन पोलिटिकल) वाटेल, पण यात राजकीय भूमिका आहेच आहे आणि ती लोकशाहीला सर्वाधिक बळकटी देणारी आहे. हा दावा जरा अतिशयोक्ती करणारा आहे का? अजिबात नाही! 

याला पुरावा पाहिजे असेल तर ‘ॲनिमल फार्म’ आणि ‘1984’ या दोन अभिजात राजकीय कादंबऱ्यांचा लेखक जॉर्ज ऑरवेल त्याच्या ‘व्हाय आय राईट’ या निबंधात काय म्हणतोय ते पहा... तो म्हणतोय, ‘जो जास्तीत जास्त बॅलन्स (तोल) साधायचा प्रयत्न करत असतो, तो सर्वाधिक राजकीय वागत असतो.’        
 

Tags: निवडणूक मतदानाची पंचशील मतदार मतदान voting guidelines voter voting election weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या