डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

एका थरारनाट्याचा उत्तरार्ध

या प्रकरणाचा दोष मोदींच्या पाठोपाठ शरद पवार यांच्याकडे जातो, हे म्हणणे अनेकांना पटणार नाही, पण सम्यक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले असता आम्हाला तरी असेच दिसते! पवारांनी आताच्या निवडणूक प्रचारात एकहाती किल्ला लढवला आणि राष्ट्रवादीला खोल गर्तेत जाण्यापासून वाचवले, एवढेच नाही तर बुडणाऱ्या काँग्रेसलाही काडीचा आधार दिला. आणि मग मुत्सद्देगिरीची कमाल दाखवून सेना व दोन काँग्रेस यांची अशक्यप्राय वाटणारी आघाडी घडवून आणली.

मागील अंकात एका थरारनाट्याचा पूर्वार्ध हा संपादकीय लेख लिहिला होता. त्यात 25 नोव्हेंबरच्या आधीच्या महिनाभरातील राजकीय नाट्यावर ओझरता दृष्टिक्षेप टाकला होता. त्यानंतरच्या सात दिवसांत त्या नाट्याचा उत्तरार्ध संपला आहे, त्यावर ओझरता दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न आता करायला हवा.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन राजकीय पक्षांची आघाडी झाल्याची घोषणा ज्या दिवशी संध्याकाळी झाली आणि उद्धव ठाकरे यांची निवड आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून केली, ती संपूर्ण रात्र भाजपच्या राज्यातील व केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी जागून काढली. किती उलाढाली केल्या त्यांनी त्या रात्री! अजित पवारांना फितूर केले, राष्ट्रवादीच्या आठ-दहा आमदारांना पळवले, तिघांना रातोरात दिल्ली जवळील गुरगाव येथील हॉटेलात डांबून ठेवले. ऐन मध्यरात्री पंतप्रधानांना व राष्ट्रपतींना कामाला लावून महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवली आणि सकाळ होता क्षणी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून गुपचूप उरकून टाकला. म्हणजे रात्री नऊ वाजता अजित पवार आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडले आणि सकाळी नऊ वाजता भाजपसोबत शपथविधी उरकून राजभवनातून बाहेर पडले. बारा तासांचा खेळ. अर्वाचीन इतिहासात असे व इतके थरारक राजकीय नाट्य क्वचितच घडले असावे, मध्ययुगीन इतिहासात मात्र अशी उदाहरणे चिक्कार दाखवता येतील. असो.

तर इथे थरार नाट्याचा पूर्वार्ध संपला होता. त्यानंतरचे तीन दिवस वातावरणात विलक्षण ताण होता. त्या कठीण प्रसंगी शरद पवार यांनी ‘हा माझा डाव नाही’ हे जनमानसावर ठसवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले, अजित पवारांबरोबर गेलेल्या व लपलेल्या किंवा लपवलेल्या आमदारांना एकेक करून परत आणले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व स्वतःचे नातेगोते यांना कामाला लावून अजित दादांना परत आणण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले, तर दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाई चालू ठेवली. तरीही तीन दिवस अजितदादांना पटवण्यात यश आले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर मात्र दोन तासांत दादांनी माघार घेतली, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला. आणि मग आघाडीला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतरच्या चार दिवसांत, घोळ न घालता तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले, आणि विधानसभेत बहुमत सिद्धही केले. इथे एका थरारनाट्याची समाप्ती झाली... आणि उभ्या महाराष्ट्राने आठवडाभर कोंडलेला श्वास एकदाचा सोडला.

या राजकीय नाट्यात कमी-अधिक दोष सर्वच घटकांवर येतो, मात्र सर्वाधिक दोष दोघांकडे जातो. पहिले नरेंद्र मोदी, कारण ज्या प्रकारे त्यांनी ही फितुरी घडवून आणली वा त्यासाठी संमती दिली ही गोष्ट देशाच्या पंतप्रधानपदाला लाज आणणारी आहे. भाजपने ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे बिरूद मिरवणे कधीच सोडून दिले, पण आपली पार्टी इतक्या खालच्या थराला जाईल याची कल्पना निष्ठावंत व भक्तगण यांनाही नव्हती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधानांनी याबाबत ब्र उच्चारलेला नाही, पण शपथविधीनंतर अजित पवारांना टि्वट करून शुभेच्छा देणे आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावरील चौकशीची फाईल बंद होण्याचा निर्णय येणे, यातून हे उघड आहे की, मोदींच्याच आशीर्वादाने ही कपटनिती राबवली गेली. मोदी व शाह यांना जनाची नाही पण मनाची वाटत असेल तर, ते दोघेही उर्वरित आयुष्यात अजित पवारांची फितुरी या प्रकरणावर तोंड वर करून बोलू शकणार नाहीत.

या प्रकरणाचा दोष मोदींच्या पाठोपाठ शरद पवार यांच्याकडे जातो, हे म्हणणे अनेकांना पटणार नाही, पण सम्यक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले असता आम्हाला तरी असेच दिसते! पवारांनी आताच्या निवडणूक प्रचारात एकहाती   किल्ला लढवला आणि राष्ट्रवादीला खोल गर्तेत जाण्यापासून वाचवले, एवढेच नाही तर बुडणाऱ्या काँग्रेसलाही काडीचा आधार दिला. आणि मग मुत्सद्देगिरीची कमाल दाखवून सेना व दोन काँग्रेस यांची अशक्यप्राय वाटणारी आघाडी घडवून आणली. हे सर्व मोठेच काम, पण इथे शरद पवारांचे मूल्यांकन करण्यात मोठीच गफलत भल्याभल्यांकडून होते आहे. दिवसातील 16 तास याप्रमाणे मागील 55 वर्षे पवारसाहेब सत्तेचे राजकारण करीत आहेत आणि दिल्लीच्या राजकारणात जाऊनही त्यांना तीन दशके झाली आहेत. विकासाबाबत व्हिजन असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही. पण कुरघोडी व कटकारस्थानाचे राजकारण करण्यात ते वाकबगार आहेत. आवश्यक त्या सर्व ठिकाणी उपद्रवमूल्य दाखवण्यात व वसूल करण्यात ते कुठेही कमी पडत नाहीत.

अशा शरद पवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वपक्षाचे 54 आमदार निवडून आणले ही आनंदाची बाब होऊ शकते, पण त्यामुळे भारावून जाणे आणि त्यांच्या शक्तीचा नव्याने साक्षात्कार होणे याला फारसा अर्थ नाही. कारण पंतप्रधानपद मिळवण्याची आकांक्षा बाळगणारा आणि तशा क्षमता बऱ्यापैकी असणारा हा नेता असेल तर आताच्या त्यांच्या टेकडीएवढ्या कर्तबगारीला डोंगर नाही, तर पर्वत समजण्यासारखे आहे. किंबहुना आता त्यांना जीव तोडून लढावे लागले यातच त्यांचे पराभव दिसून येतात. 288 सदस्य असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत मागील वीस वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसला 79 पेक्षा अधिक जागा मिळालेल्या नाहीत आणि 48 लोकसभेच्या जागांपैकी नऊपेक्षा अधिक खासदार निवडून आणता आलेले नाहीत. अर्थातच हे आकडे फार कमी नाहीत, पण भारावून जावे इतके निश्चितच नाहीत. विशेषतः ममता बॅनर्जी, जयललिता, मुलायमसिंग, मायावती, नवीन पटनायक, चंद्राबाबू नायडू एवढेच काय कालपरवापर्यंत पोरगा मानला जाणारे जगनमोहन रेड्डी या सर्व प्रादेशिक नेत्यांनी आपापल्या राज्याची पूर्ण सत्ता स्वबळावर एकदा दोनदा मिळवलेली आहे. त्या तुलनेत शरद पवारांचे यश किती आहे?

राहिला प्रश्न अजित पवारांची फितुरी परतावून लावण्याचा (बंड हा शब्द येथे जाणीवपूर्वक वापरलेला नाही) आणि तीन पक्षांची आघाडी निर्माण करण्याचा. तर अजित पवार यांची आताची कृती ही शरद पवारांना स्वतःच्या राजकीय आयुष्यातील सर्वांत मोठा पराभव वाटत असणार. अजित दादांच्या अनेक उचापती शरद पवारांनी आतापर्यंत खूप पचवल्या असणार, पण आताची फितुरी त्या सर्वांवर कडी करणारी होती. बरे, आताही दादा फार सहजासहजी परत आलेत किंवा चूक कबूल करून राहिलेत असेही नाही. त्यामुळे, दादा पुढे काय करणार आणि त्यांना कसे सांभाळायचे हाच शरद पवार यांच्यापुढचा यापुढील आयुष्यात सर्वांत मोठा प्रश्न असणार. विरोधकांशी लढण्यासाठी सर्व आयुधे वापरता येतात, पण स्वकियांशी लढताना ती सर्व आयुधे बोथट ठरतात. त्यातही अजित दादांसारखा आप्त म्हणजे अस्तनीतला निखारा हाताळण्यासारखे आहे. आणि म्हणूनच दादांची पक्षातून हकालपट्टी करता येणे तर दूर, त्यांना मंत्रिमंडळात आज ना उद्या मोठे स्थान देण्याची नामुष्की पवारांना सहन करावी लागणार. तसे न करून काय करणार? पक्ष एक वेळ सोबत ठेवता येईल, पण अनेक संस्था संघटना आणि घरचा मतदारसंघ या सर्व ठिकाणी अजित पवार या ना त्या नात्याने अडचणी आणत राहणार. शिवाय, भाजपसारखा विरोधी पक्ष त्यांचा गैरवापर करायचा तेवढा करून घेणार. ही परिस्थिती शरद पवार यांच्यावर अचानक ओढवलेली नाही, मागील पंचवीस वर्षांपासून क्रमाक्रमाने बिकट होत गेली आहे. मग या परिस्थितीचा सर्वाधिक दोष पवारांकडेच नाही जाणार तर कोणाकडे?

अशा या निराश मानसिक अवस्थेत, भाजपला खडे चारल्याचा आनंद शरद पवार उभोगत असणार. पण ही आघाडी किती काळ चालणार याबाबत ते निश्चिंत व निःशंक नसणार! कारण मुळात शिवसेना आपल्या मूळ प्रवृत्तीला मुरड तरी किती जास्त व किती काळ घालणार! काँग्रेस व राष्ट्रवादीमधील नेते म्हणजे स्वायत्त सुभेदार किंवा जहागीरदार असतात, त्यांचे हितसंबंध अडचणीत येतात तेव्हा किंवा मतलब साधला जात नाही तेव्हा, आपला पक्ष व राज्य यांचा विचार त्यांच्या खिजगणतीतही नसतो. आणि साम-दाम-दंड-भेद ही कुटिल निती अक्षरशः अंगात मुरलेल्या भाजपचे नेते स्वस्थ थोडेच बसणार आहेत? अशा पार्श्वभूमीवर, सर्वांचा समान शत्रू भाजप आहे, म्हणून जन्माला आलेली अनैसर्गिक आघाडी वर्ष-दोन वर्षे टिकली तरी बरेच सामुदायिक शहाणपण यांनी दाखवले असे म्हणता येईल. तसे घडावे व आमचे भाकीत खोटे ठरावे यासाठी आघाडीला आणि अजितदादांच्या जाचातून सुटका व्हावी यासाठी शरद पवारांना शुभेच्छा!  

Tags: अजित पवार देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे अमित शाह नरेंद्र मोदी शरद पवार मुख्यमंत्री शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी निवडणूक २०१९ विधानसभा महाराष्ट्र एका थरारनाट्याचा उत्तरार्ध संपादकीय Ajit Pawar Devendra Fadanvis Amit Shah Narendra Modi Sharad Pawar Shivsena Congress Rashtrwadi NCP Bhartiy Janata Party BJP Election 2019 Vidhansabha Maharashtra Sampadakiy weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा