डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

प्रिंट आणि डिजिटल : परस्परांना पूरकच!

आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती आणि तरीही किंमत कमी ही या यशाची त्रिसूत्री राहिली आहे. पण सर्व स्तरांतील व विविध क्षेत्रांतील व्यक्ती-संस्था-संघटना यांच्या सक्रिय सहभागामुळेच ही मोहीम यशस्वी होत आली आहे. या वर्षी मात्र या मोहिमेला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. आधीचा दुष्काळ, नंतर काही ठिकाणी अभूतपूर्व पूरग्रस्तता, आर्थिक मंदीचे सावट आणि त्यातच भर म्हणजे राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण, ही सर्व कारणे त्यामागे आहेत.

15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केलेले साधना साप्ताहिक मागील 71 वर्षे अखंड प्रकाशित होत आहे. आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, वसंत बापट, ग. प्र. प्रधान, डॉ. नरेंद्र दाभोलकर असे दिग्गज या साप्ताहिकाला संपादक म्हणून लाभले आहेत. वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशी साधनाची ओळख आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन प्रामुख्याने साधनातून प्रसिद्ध केले जाते.

भारतीय संविधानाला अपेक्षित असलेल्या मूल्यविचारांचा प्रचार-प्रसार त्यातून केला जातो. मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याला प्राधान्य दिले जाते. परिणामी वाचकांच्या कक्षा रूंदावणे व सामाजिक जाणिवा विकसित होणे, या प्रक्रियेत हातभार लावता येतो. आणि म्हणूनच ‘मास’साठी काम करणाऱ्या ‘क्लास’चे साप्ताहिक असे साधनाबाबत म्हणता येते. अशा या साधनाला क्लासचा मजकूर मासपर्यंत पोचवण्यात सर्वाधिक यश लाभले, असा उपक्रम म्हणजे बालकुमार व युवा दिवाळी अंक. या वर्षी निघालेला बालकुमार दिवाळी अंक बारावा आहे, तर युवा दिवाळी अंक सहावा आहे. बालकुमार अंकाच्या सरासरी अडीच लाख प्रती आणि युवा अंकाच्या सरासरी चाळीस हजार प्रती असे प्रमाण आतापर्यंत राहिले आहे.

आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती आणि तरीही किंमत कमी ही या यशाची त्रिसूत्री राहिली आहे. पण सर्व स्तरांतील व विविध क्षेत्रांतील व्यक्ती-संस्था-संघटना यांच्या सक्रिय सहभागामुळेच ही मोहीम यशस्वी होत आली आहे. या वर्षी मात्र या मोहिमेला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. आधीचा दुष्काळ, नंतर काही ठिकाणी अभूतपूर्व पूरग्रस्तता, आर्थिक मंदीचे सावट आणि त्यातच भर म्हणजे राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण, ही सर्व कारणे त्यामागे आहेत. शिवाय, साधनाने हाती घेतलेले नवे डिजिटल उपक्रम यामुळेही या मोहिमेला पुरेसा वेळ आम्ही देऊ शकलो नाही. झपाट्याने होत असलेल्या सर्वस्तरीय बदलांमुळे पाच-सहा वर्षांची एक पिढी, असे आता मानले जाते. त्या निकषांवर विचार केला तर बालकुमार अंकाने मराठी वाचकांच्या दोन उमलत्या पिढ्यांवर तर युवा अंकाने उमललेल्या एका पिढीवर, काही अंशी तरी प्रभाव टाकला असावा असे म्हणायला वाव आहे.

अर्थातच, याबाबत नेमकेपणाने विधान करण्यासाठी आणखी काही वर्षे जाऊ द्यावी लागतील. ते काहीही असो. उदयाला येणाऱ्या पिढ्यांच्या दृष्टिकोनाला नवे आयाम मिळावेत आणि उद्याच्या भारताचे नागरिक अधिक सुजाण व सक्षम असावेत, या प्रकियेत समिधा टाकण्याचे काम साधना यथाशक्ती करीत आहे.

मागील तीन वर्षे बालकुमार व युवा या दोन्ही अंकांमध्ये क्रमाक्रमाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आशय-विषय मध्यवर्ती येत गेले आहेत. याचे एक कारण तंत्रज्ञानात झालेल्या कमालीच्या वेगवान बदलांमुळे निर्माण झालेली अनुकूलता हे आहे. पण दुसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे, ते म्हणजे आपला सभोवताल समजून घेण्यासाठी व त्यात बदल घडवून आणण्यासाठी बदलते जग समजले पाहिजे. या संपूर्ण गुंतागुंतीच्या व व्यामिश्र प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञान मध्यवर्ती भूमिकेत आले आहे. आणि म्हणून डिजिटल साधना हा स्वतंत्र विभाग चांगलाच आकाराला येत आहे. पुढील तीन वर्षांत त्याला फोफावलेल्या झाडाचे रूप आलेले असेल. अर्थातच, तुकड्या-तुकड्यांतच विचार केला तर प्रिंट व डिजिटल ही दोन माध्यमे परस्परांचा प्रभाव कमी करणारी भासतील. समग्र विचार केला तर ही दोन्ही माध्यमे परस्परांना पूरक भूमिका बजावत आहेत अशी आमची धारणा आहे, असा आमचा अनुभव आहे!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या