डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

‘अनमेकिंग ऑफ इंडिया’ची अस्वस्थ करणारी कादंबरी

या कादंबरीला तथाकथित कलात्मकतेचे निकष लावण्यात फारसा मतलब नाही. त्या चष्म्यातून पाहिलं तर, प्रभाकर व सर्जी ही पात्रं केवळ साक्षीदार स्वरूपात कादंबरीत वावरत असतात. कादंबरीला सुसूत्र असं कथानक नाही, प्रामुख्याने चर्चा व वृत्तपत्रीय संदर्भांतून काळं- करडं वास्तव मांडलं जातं... हे कादंबरीवर घेता येणारे आक्षेप तसे चुकीचे नाहीत. पण नयनतारा सहगल यांनी जी रिपोर्ताज शैली कादंबरीत वापरली आहे आणि त्याला जे प्रवाही, चपखल भाषेच्या माध्यमातून कलात्मक ललित रूप दिलं आहे, ते अनुभवताना वाचक सुन्न होतो... हेच कादंबरीचं यश आहे. सौंदर्यवाद्यांचा समाचार घेताना 1930 च्या दशकात प्रेमचंदांनी म्हटलं होतं की, ‘आम्हाला सौंदर्याची परिभाषा बदलायची आहे.’ त्याच धर्तीवर नयनतारा सहगल यांच्या या कादंबरीचं समीक्षण करताना कलात्मकतेच्या मोजपट्ट्या बाजूस ठेवून लेखकाला जाणवणारं सत्य हीच कलात्मकता, या दृष्टीने विचार केला पाहिजे.

‘द फेट ऑफ बटरफ्लाईज्‌’ ही अलीकडेच प्रकाशित झालेली नयनतारा सहगल यांची लघुकादंबरी (नॉव्हेला) अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण कलाकृती आहे. त्याचं पहिलं कारण आहे- त्यांनी कलावंत म्हणून घेतलेली ठाम भूमिका. 2016 मध्ये दाभोलकर, पानसरे प्रभृती विचारवंतांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ त्यांनी आपला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला होता; त्या वेळी त्यांनी जी कारणं दिली होती आणि देशातल्या विखारी वातावणाबद्दल चिंता व्यक्त केली होती, त्याचं स्पष्ट प्रतिबिंब ही कादंबरी वाचताना पानोपानी जाणवतं. दुसरं कारण म्हणजे- त्यांनी या कादंबरीच्या प्रकाशनानिमित्त ज्या विविध मुलाखती दिल्या, त्या वेळी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं : ‘ We are at urgent moment, cross road & our's is a world where cruelty has become casual.’ त्या अनुषंगानं आज देशाचा प्रवास हा ‘अनमेकिंग ऑफ इंडिया’चा उलट्या दिशेने, मागील काही वर्षांत ‘यू टर्न’ घेत चालला आहे, तो चित्रित करणारी ही कादंबरी आहे.

नयनतारा सहगल यांनी वास्तव-कल्पित आणि भूत-वर्तमान व संभाव्य भविष्याची सरमिसळ कलात्मकतेनं करीत एक जोरकस विधान- स्टेटमेंट केलं आहे. तसं भूमिकायुक्त लिखाण भारतीय साहित्यात अभावानंच वाचायला मिळतं, त्यामुळेही ही कादंबरी 2019 ची महत्त्वाची साहित्यकृती ठरते. नयनतारा सहगल गेली पन्नास वर्षे कादंबऱ्या व ललितेतर साहित्य लिहीत आहेत. त्यांनी एक फार मोठा कालखंड पाहिला आहे. दुसरे महायुद्ध, भारताचे स्वातंत्र्य, लोकशाहीचा घातला गेलेला पाया, संविधानाची निर्मिती, विविध संस्थांद्वारे ‘मेकिंग ऑफ इंडिया’चा सुरू झालेला प्रवास, मग सुरू झालेली मूल्यांची घसरण, वाढता भ्रष्टाचार आणि सेक्युलॅरिझमला फासला जाणारा हरताळ, इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी, 1992 नंतर बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर मुस्लिमांची झालेली घुसमट व कोंडी आणि नरेंद्र मोदींच्या कालखंडात ठळकपणे दृढ झालेलं विद्वेषावर आधारित धार्मिक राजकारण आणि सांविधानिक संस्था व मूल्यांचा ऱ्हास...

या साऱ्या भारताच्या वाटचालीच्या नयनतारा सहगल या डोळस निरीक्षक आहेत आणि प्रतिभेच्या बळावर त्याचं कादंबरीत रूपांतर करणाऱ्या समर्थ लेखिका पण आहेत. त्यांच्या पन्नास ते सत्तरच्या दशकातील ‘ए टाइम टुबी हॅपी’, ‘धिस टाइम ऑफ मॉर्निंग’ आणि ‘स्टॉमर्स इन चंदिगड’मधून सांविधानिक तत्त्वज्ञानाप्रमाणे सुरू असलेला ‘मेकिंग ऑफ इंडिया’चा प्रवास त्यांनी रेखाटला आहे. या कादंबऱ्यांतील पात्रे लोकशाहीवादी व उच्च नैतिक मूल्ये मानणारी आहेत. त्यानंतर आलेली त्यांची ‘रिच लाईक अस’ ही साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरची आणि एका अर्थाने ‘अनमेकिंग ऑफ इंडिया’चा सुरू झालेल्या प्रवासाची कहाणी कथन करणारी आहे.

अलीकडे दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली त्यांची कादंबरी ‘व्हेन मून शाईन बाय डे’- जी मुस्लिम समाजाची (स्पष्ट उल्लेख नसला तरी गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवरची) झालेली कोंडी आणि पूर्ण समाजाला परिघाबाहेर करण्याची भूमिका स्पष्ट करणारी आहे. ती व प्रस्तुतची ‘द फेट ऑफ बटरफ्लाईज्‌’ या दोन कादंबऱ्या एकत्रित वाचल्या तर ‘अनमेकिंग ऑफ इंडिया’चा चिंता वाटणारा वेगवान प्रवास त्यातून प्रकट झाला आहे. कटू आणि मानवतेला उद्‌ध्वस्त करणाऱ्या प्रश्नांना कलावंतांनी साहित्यातून निर्दयी प्रामाणिकतेनं भिडलं पाहिजे, अशी जी अपेक्षा व्यक्त केली जाते- त्या कसोटीला ही ताजी कादंबरी शंभर टक्के उतरते, हे नि:संशय!

या कादंबरीचं कथानक काहीसं गुंतागुंतीचं व विस्कळीत आहे. त्यात एक सलग व स्पष्ट असं संघटित कथानक नाही, तर आजच्या अस्वस्थ वर्तमानाच्या साक्षी ठरणाऱ्या व प्रतिक्रिया देणाऱ्या पात्रांचं चरित्रचित्रण- असं कादंबरीचं स्वरूप आहे. किंबहुना, असं म्हणता येईल की- नयनतारा सहगल यांना जे म्हणायचं आहे, सांगायचं आहे, ते सांगण्यासाठी काहीशा सैल बांधणीचा फॉर्म त्यांनी स्वीकारला असून त्यांच्या विचारांचे वाहक असणारे प्रभाकर व सर्जी या दोन पात्रांच्या नजरेतून सध्या देशात जे काही घडत आहे, त्याचे साक्षीदार दाखवत सहगल यांनी ललित अंगाने ‘स्लाईस ऑफ लाईफ’- वास्तवाचा एक तुकडा लालित्याची जोड देत मांडला आहे. म्हणून वाचताना वाचकांना ही कांदबरी देशातील अलीकडच्या अनेक दु:खद व निर्घृण घटनांची आठवण करून देते!

ही कादंबरी प्रामुख्याने ज्याच्या नजरेतून उलगडली जाते, तो प्रभाकर हा राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि आज देशात जे हिंसेचं वातावरण आहे, त्याचा तो साक्षीदार आहे व काही प्रमाणात बळी पण. अल्पसंख्याकांप्रति बदलत जाणाऱ्या एकतर्फी सामाजिक नियमाने प्रभाकर अस्वस्थ होतो. जिच्यावर तो आकृष्ट झाला आहे, त्या कटरिनाच्या माध्यमातून निर्घृण धार्मिक दंगलीला बळी पडणाऱ्या आणि सामूहिक बलात्कार सोसाव्या लागणाऱ्या मुस्लिम स्त्रीच्या झालेल्या कोंडीचा तो सहवेदनेनं अनुभव घेतो.

‘ते’ आणि ‘आम्ही’ असा अधिकाधिक ठळक होत जाणारा भेद त्याच्यातला राज्यशास्त्राचा प्राध्यापक बारकाईनं टिपत जातो. त्याच्या सान्निध्यात आलेल्या एका बड्या रेस्टॉरंटचा मालक प्रल्हाद आणि त्याचा पार्टनर फ्रान्सिस- ज्यांनी उघडपणे समलिंगी विवाह केला आहे- त्यांचं हॉटेल संस्कृतिपूजक उद्‌ध्वस्त करतात व त्यांना मारहाण करतात. त्यापूर्वी पार्टीत नृत्य करताना आपलं प्रेम सापडलेला, प्रल्हादचे काहीसे तत्त्वज्ञानपर उद्‌गार ’‘Love knows no safe haven in time like these, we are told but the times are grim, the times are unbearably tragic, and so, my friends- let us dance!!’  आठवून, प्रभाकर कमालीचा उद्विग्न होतो. पण काही करू शकत नाही.

प्रभाकरचा कबाब आणि रुमाली रोटीसाठी आवडता एक ढाबा असतो. त्याचा कुक रफिक हा एक दिवस अचानक  नाहीसा होतो. लोपेज हा त्याचा मित्र प्रभाकरला म्हणतो, ‘‘जोवर गाईचं नाही हे स्पष्ट होत नाही, तोवर मी मटण खाणार नाही. ‘काऊ कमिशनर’ (कादंबरीतला शब्दप्रयोग आहे) सर्व हिंडून तपासणी करीत आहेत, म्हणून मी आता शाकाहारी व्हायचं ठरवलं आहे. कारण मला भीती वाटते की, कुणी तरी घरात येऊन माझा फ्रीज तपासून साठवलेले मटण हे मटण नाही तर बीफ आहे, असं जाहीर करेल. आणि नको, त्यापेक्षा मटण सोडलेलं बरं.’’ आणि तो प्रभाकरसोबत त्या ढाब्यावर कबाबऐवजी लिम्का पिऊन उठतो... हा प्रसंग ज्या तटस्थपणे कोरड्या भाषेत सहगल यांनी वर्णिला आहे, त्यामागची तप्त धग वाचकांना जाणवल्याखेरीज राहत नाही.

प्रभाकर विद्यापीठातून एकदा घरी जाताना रस्त्यावर स्कल कॅप असलेला पूर्ण नग्नावस्थेतील मरून पडलेला एक माणूस पाहतो व त्याच्या शेजारी असलेली रक्ताळलेली कुऱ्हाड नजरेस पडते... या दोन वाक्यांत शब्दबद्ध केलेल्या घटनेची छाया पूर्ण कादंबरीवर पडलेली वाचकांना पानोपानी जाणवत राहते. कादंबरीचं मुखपृष्ठही हाच प्रसंग सूचित करणारं आहे.

शस्त्रास्त्रांचा वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्या रशियन सर्जीच्या माध्यमातून व त्याच्या प्रभाकरशी होणाऱ्या चर्चेतून नयनतारा सहगल नाझी जर्मनीच्या द्वितीय महायुद्धाचे संदर्भ चपखलपणे देत, देशात आज त्याच पद्धतीचा फॅसिझम फोफावत आहे, हे सूचित करतात. आणि मग पुढील- माझ्या मते, महत्त्वाचं स्टेटमेंट करणारं लोपेज व प्रभाकरचं- संभाषण येतं, ते असं आहे : ‘‘बहुसंख्य माणसं ही साधी छोटी माणसं असतात. जे घडतं त्यात ते प्रवाहपतिताप्रमाणे वाहत जातात. कारण त्यांना आपला जीव व काम गमवायचा नसतो.’’ या लोपेजच्या नाझी जर्मनीच्या संदर्भातील विधानाला दुजोरा देत प्रभाकर म्हणतो, ‘‘सर्वत्रच बहुसंख्य माणसं- युरोपातली किंवा अन्य कोणत्याही देशातील घ्या- आम्हाला केवळ शांततेत जगू देण्यासाठी मोकळं सोडा, एवढंच म्हणतात. आणि ते असं म्हणून फार काही मागत नाहीत.’’

पण साधं शांततामय जगणंही धार्मिक उन्माद आणि कंठाळी राष्ट्रवादाच्या काळात जगात कुठेही सामान्य माणसाच्या वाट्याला येत नाही, हे दरदरून घाम फोडणारं आणि थंडगार विषाप्रमाणे दंश करीत झोंबणारं सत्य नयनतारा सहगल यांनी तेवढ्याच थंड पण परिणामकारकपणे मांडलं आहे. या कादंबरीला तथाकथित कलात्मकतेचे निकष लावण्यात फारसा मतलब नाही. त्या चष्म्यातून पाहिलं तर, प्रभाकर व सर्जी ही पात्रं केवळ साक्षीदार स्वरूपात कादंबरीत वावरत असतात. कादंबरीला सुसूत्र असं कथानक नाही, प्रामुख्याने चर्चा व वृत्तपत्रीय संदर्भांतून काळं-करडं वास्तव मांडलं जातं... हे कादंबरीवर घेता येणारे आक्षेप तसे चुकीचे नाहीत. पण नयनतारा सहगल यांनी जी रिपोर्ताज शैली कादंबरीत वापरली आहे आणि त्याला जे प्रवाही, चपखल भाषेच्या माध्यमातून कलात्मक ललित रूप दिलं आहे, ते अनुभवताना वाचक सुन्न होतो... हेच कादंबरीचं यश आहे.

सौंदर्यवाद्यांचा समाचार घेताना 1930 च्या दशकात प्रेमचंदांनी म्हटलं होतं की, ‘आम्हाला सौंदर्याची परिभाषा बदलायची आहे.’ त्याच धर्तीवर नयनतारा सहगल यांच्या या कादंबरीचं समीक्षण करताना कलात्मकतेच्या मोजपट्ट्या बाजूस ठेवून लेखकाला जाणवणारं सत्य हीच कलात्मकता, या दृष्टीने विचार केला पाहिजे. मला तसं करताना असं वाटलं की, टोनी मोरिसननं म्हटल्याप्रमाणे- जे कलावंत अराजकतेच्या कालखंडात शब्द वा कलेला अर्थ प्रदान करतात, त्यांना जपले पाहिजे-ऐकले पाहिजे. नयनतारा सहगल यांची ही कादंबरी म्हणूनच आवडली नाही, पटली नाही तरी वाचली पाहिजे... कारण वर्तमान सत्याकडे व काळजी वाटणाऱ्या भविष्याकडे पाठ फिरवू नये, म्हणून! 

THE FATE OF BUTTERFLIES

By - Nayantara Sahgal

Speaking Tiger Publisher Pvt. Ltd.

New Dehli.

Pages – 144, Price – Rs. 450/-

Tags: परिचय पुस्तक नवे पुस्तक लक्ष्मीकांत देशमुख book review lakshmikant deshmukh the fate of butterflies weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

 भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


प्रतिक्रिया द्या