डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

गांधी तेव्हा तरुण होते. सोंजा जरा बेधडकच वागत होती, पण कामाला  पक्की होती. ती नेहमी पारंपरिक वेषात वावरे. नेकटाय नि क्वचित हॅट वापरे. ती ठेंगणी व स्थूल चणीची होती. केस नेटके कापलेले असत. मुळात अस्ताव्यस्त असलेले गांधींचे ऑफिस अगोदर तिने नीटनेटके लावले. त्यांच्या फायलींचे ढिगारे आवरले. तिला सहा पौंड पगार ठरला होता, नंतर तो दहा केला गेला. त्यानंतर तो अधिक द्यायचा असे ठरले, तर  सोंजाने ते नाकारले. म्हणाली, ‘मला एवढे पैसे पुरेत.’ दरम्यान तिला या माणसाच्या इतर सामाजिक, राजकीय विचारांची कल्पना आली होती. आरंभीच तिने एक आगळीक केली. ऑफिसच्या टेबलावर बसून, हातात सिगारेट पेटवून पाय हलवत  बसली होती. हे पाहून गांधींनी तिच्या थोबाडीत मारली आणि असं पुन्हा नकरण्याचा इशारा दिला.

‘तुम्हाला तुमच्या फर्ममध्ये काम करायला इंग्रजीचे, टायपिंगचे उत्तम ज्ञान असणाऱ्या मदतनीसाची गरज आहे म्हणून एकीचं नाव सुचवत आहे. ती रशियातून आलेली आहे. तिच्या जन्मानंतर चार-पाच वर्षांनी हे ज्यू कुटुंब मॉस्कोहून द.आफ्रिकेत कामाच्या निमित्ताने आलं आहे. तिने केप ऑफ गुडहोप विद्यापीठातून शॉर्टहँडचा डिप्लोमा घेतला होता. ही सोळा वर्षांची मुलगी सोंजा (सोनिया) श्लेशिंग ही बुद्धीने तल्लख आहे, हसतमुख आहे, कामात चटपटीत आहे, स्पष्टवक्ती अन्‌ फटकळ आहे. तुम्हाला पाहा तिला निभवता आलं तर!’ -इति कॅलिनबाख.

या मित्राने गांधींना त्यांच्या जोहान्सबर्गमध्ये सुरू केलेल्या फर्मसाठी सुचवले. इंग्लंडहून 1983 मध्ये परतल्यावर मोहनदास करमचंद गांधींचा हिंदुस्थानात वकिलीचा जम बसेना. याच वेळी सेठ अब्दुल्ला या द.आफ्रिकेतील धनाढ्य व्यापाऱ्याने आपल्या खटल्यांसाठी 105 पौंडांच्या करारावर आपल्या कज्ज्यांची वकिली करायला या तरुणाला बोलावून घेतले. या लाजऱ्या-बुजऱ्या तरुणाने दर्बनच्या मातीवर पाय टाकला, तेव्हाच तिथल्या हवेतील भेदभावाची चुणूक लागली. अब्दुल्ला सेठनी त्याला गोऱ्यांच्या अन्याय्य वागणुकीचा अंदाज दिला होताच, पण त्याचा प्रत्यय लगेचच येईल असे वाटले नव्हते. इंग्लंडमधील वास्तव्यात त्याने ब्रिटिश संस्कृतीचा भला अनुभव घेतला होता. कायद्याची बूज राखणाऱ्या, सत्त्वशील जीवन जगू पाहणाऱ्या तरुणांच्या, त्यांनी चालवलेल्या नैतिक आणि आध्यात्मिक प्रयोगांचा तो साक्षीदार नि अनुयायी झाला होता. त्याला स्वत:लाही असे सत्त्वशीलच जीवन पसंत होते. नेटल, जोहान्सबर्ग, ट्रान्सवाल, ऑरेंज फ्री स्टेट येथील ब्रिटिश वसाहतीत भारतीयांना मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीची माहिती मिळाली होतीच; रेल्वेप्रवासातला अपमानजनक तसेच कोर्टात डोक्यावरची भारतीय पगडी काढून टाकण्याबाबतचा अनुभव लगेच आला.

मोहनदास करमचंद गांधी या माणसाचे जीवन म्हणजे माणसांच्या गोतावळ्याचे मोहोळ होते. जिथे हा माणूस गेला, तेथील माणसांशी त्याने नाते जोडले. नाते नुसते ‘हाय हॅलो, चहाला या’ एवढ्यापुरते नव्हते; तर अगदी जिवाभावाचे, जीवनावर प्रभाव टाकून आयुष्याची दिशाच बदलून टाकणारे होते. या माणसांच्या मोहोळात विचार- आचारांच्या मधाने ते पोळे भरून वाहत असे. हा मध गोळा करणाऱ्यांत कडकडून चावणाऱ्या मधुमाश्याही डसत असत. पण तो दाह सहन करून मधसंचयाचे काम सुरूच राहिले. यात या सामान्य अशा दिसणाऱ्या माणसाची कुशलता होती. म्हणून दीडशे वर्षांनंतरही आज त्याच्या विचारांची गरज वाटू लागली आहे. या मधमाश्यांत भारतीय हिंदू, मुस्लिम, पारशी स्त्रिया होत्या; तसेच युरोपियन देशातील सामान्य तसेच सुशिक्षित, सधन घरातल्या, ऐषारामात जीवन घालवू शकणाऱ्या स्त्रियाही होत्या. त्यात ज्यू, ख्रिश्चन- त्यात कॅथॉलिक, प्रॉटेस्टंट व इतर पंथांच्या स्त्रियाही होत्या. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील, सामाजिक-धार्मिक परिवर्तनातील त्यांचे काम प्रेरक होते नि आहे.

गांधींनी वकिली फर्म सुरू केली. काम खूप आहे याची कल्पना येऊ लागली. साहजिकच मदतनीसांची गरज होती. द.आफ्रिकेतील कुणी गोरी व्यक्ती काळ्या माणसाच्या फर्ममध्ये काम करायला तयार होईल, हे शक्य नव्हते. गांधींना इंग्रजी पत्रलेखन उत्तम असलेली इंग्लिशची जाणकार युरोपियन व्यक्तीच हवी होती, ज्यात सोंजा तरबेज होती. गांधी तेव्हा तरुण होते. सोंजा जरा बेधडकच वागत होती, पण कामाला पक्की होती. ती नेहमी पारंपरिक वेषात वावरे. नेकटाय नि क्वचित हॅट वापरे. ती ठेंगणी व स्थूल चणीची होती. केस नेटके कापलेले असत. मुळात अस्ताव्यस्त असलेले गांधींचे ऑफिस अगोदर तिने नीटनेटके लावले. त्यांच्या फायलींचे ढिगारे आवरले. तिला सहा पौंड पगार ठरला होता, नंतर तो दहा केला गेला. त्यानंतर तो अधिक द्यायचा असे ठरले, तर सोंजाने ते नाकारले. म्हणाली, ‘मला एवढे पैसे पुरेत.’

दरम्यान तिला या माणसाच्या इतर सामाजिक, राजकीय विचारांची कल्पना आली होती. त्या विचारांशी ती सहमत होती, म्हणून ‘अधिक पैसे मला नकोत’ असे तिने सांगितले. आरंभीच तिने एक आगळीक केली. ऑफिसच्या टेबलावर बसून, हातात सिगारेट पेटवून पाय हलवत बसली होती. हे पाहून गांधींनी तिच्या थोबाडीत मारली नि असं पुन्हा न करण्याचा इशारा दिला (म्हणजे पुढे अहिंसक चळवळीचे द्योतक ठरलेले गांधी चिडतही असत तर!) ही सवय सोडविण्यात तिला त्रास झाला, पण तिला निग्रहाचे महत्त्व कळले. तिने गांधींचे जोहान्सबर्गचे ऑफिस एकदम चकाचक करून टाकले. कामाच्या बाबतीत ती खूप झपाटलेली होती. घड्याळाकडे न पाहता तिने स्वत:ला कामात झोकून दिले होते. नुसतेच लॉ फर्मचेच नव्हे, तर गांधींनी सुरू केलेल्या चळवळीचे कामदेखील ती उत्साहाने करीत होती. निवेदनं- पत्रं लिहिणं यात तिचा हात कुणी धरू शकत नव्हतं. गांधींचे क्लाएन्ट आणि सत्याग्रही या दोन्ही लोकांत ती प्रिय झालेली होती. याचे कारण ती अडचणीत पडलेल्यांना मदत करायला सदैव तत्पर असे.

दक्षिण आफ्रिकेत गांधींनी वर्णभेदाविरुद्ध सुरू केलेल्या चळवळीला नैतिक अधिष्ठान होते, याचे तिला महत्त्व वाटत होते. यामुळेच ती कसोशीने त्यातील चुकाही काढत होती. त्या काळात तिथे 65 हजार भारतीय लोक होते. त्यांना अत्यंत कुत्सिततेची वागणूक मिळत असे. त्यांच्याशी गोरे सत्ताधीश क्रूरपणे वागत. त्यांना आपली ओळखपत्रं सतत जवळ बाळगावी लागत. स्त्री-पुरुषांची पोलीस केव्हाही झडती घेत. काही कमी वाटले तर तुरुंगात टाकत, मारहाण करीत. या काळ्या कायद्याविरुद्ध निदर्शनं करायचा निर्णय झाला, त्यात सोंजा हिरीरीने पुढे होती. तिनेच सभागृह निश्चित केले, पत्रकं तयार केली. लोकांशी संपर्क साधला.

त्या वेळी गांधीजी कस्तुरबांच्या आजारपणामुळे फिनिक्स फार्मला होते. पण जेव्हा ट्रान्सवाल येथेही काळ्यांवरील अत्याचाराच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा त्यांना तिथे जावेच लागले. त्यांच्यावर अन्यायी टॅक्स लावला होता. तिथे प्रतिष्ठित श्रीमंत मुस्लिम, पारशी, हिंदू व्यापारी व कारकून होते. गोरेच नव्हे, तर इतर भारतीयदेखील कामाला जुंपलेल्या गरीब कामगारांना हुडुत्‌- हुडुत्‌ करीत असत. गोरे सर्वांनाच कुत्सितपणे (स्वामीचा अपभ्रंश) ‘सामी’ वा ‘कुली’ म्हणत. व्यापारी वर्ग अपमान सहन करून फक्त पैसे मिळवण्यावर लक्ष देई. गांधी बराच काळ ब्रिटनमध्ये राहिल्याने मुळात त्यांचा ब्रिटिश कायदा नि न्यायावर विेशास होता.

इकडे सोंजाने मोर्चा उत्तम संभाळला होता. सरकारविरुद्ध लोकमत तापलेले होते. लोकांनी कुठलेही अनुचित पाऊल उचलायचे नाही, हा सभेचा दंडक होता. त्यांना जोहान्सबर्गमध्ये सभागृह मिळत नव्हते. सोंजाने ज्यूंच्या मालकीच्या एका सभागृहात सभेचे आयोजन केले. 1906 च्या सप्टेंबरमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच सामान्य मजुरांनी- ज्यात अस्पृश्य कामगार, ब्राह्मण शिक्षक, व्यावसायिक साऱ्यांनी एका क्रांतीच्या आशेने या सभेला गर्दी केली होती. एखाद्या धार्मिक व्रताच्या शपथेसारख्या शपथा घेतल्या गेल्या. ठरवलेल्या विचारांचे पालन करायचा निश्चय झाला. कायदा पाळायचा नाही ठरले.’ याचा परिणाम देहांताची शिक्षा असाही होऊ शकला असता. पण लोकांचे धैर्य असीम होते. सोंजा तर झपाटल्यासारखी दिवसरात्र काम करत होती. गावातला कुठलाही प्रदेश असो, ती एकटी जायला किंचितही घाबरत नसे. ‘कुणी बरोबर येऊ दे’ असं म्हटलं, तरी ती चिडत असे. काम, अधिक काम हेच तिच्या अविरत ऊर्जेचे रहस्य होते.

गांधींना साहजिकच तिच्याबद्दल आस्था नि आपुलकी होती. त्यांच्याबरोबर काम करताना तिने गुजराती भाषा आत्मसात केली होती. शाकाहार स्वीकारला होता. त्यांच्या तुरुंगवासाच्या काळात तीच सारे संभाळत होती. तिचे टायपिंग, पत्रव्यवहार सतत सुरू असे. गांधींनी तिला वकिलीची पदवी घ्यायला उद्युक्त केले. कायद्याच्या फर्ममधील आर्टिकल क्लार्कचा दर्जा दिला. तिने कायद्याची पदवी घ्यावी, असे त्यांना वाटत होते. पण स्त्री असल्याने तिला विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही. तिने गांधींच्या फिनिक्स फार्म आणि टॉलस्टॉय फार्मचे हिशेब काटेकोरपण ठेवले होते. तिथे ती राहत नसली तरी ज्या उदात्त विचारांनी हे आश्रम स्थापन केले होते, त्याने ती भारावली होती. टॉलस्टॉय यांच्या लेखनाची ती वाचक होती. एक वयोवृद्ध रशियन आणि दुसरा तरुण भारतीय यांमधील या आध्यात्मिक बंधाचा तिला विलक्षण आदर वाटत होता. फिनिक्स आश्रमामध्ये खूप भारतीय साधेपणाने, अहिंसक विचाराने प्रेरित होऊन राहत होते. इतर धर्म आणि हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानाने येथील लोकांचे आध्यात्मिक पोषण होतेय, याचे तिला आकर्षण होते. दोन्हींकडील आर्थिक तंगीची तिला कल्पना होती. तेथील व्यवहार तिने रुळावर आणले. (गांधी हिंदुस्तानात परत गेल्यावरदेखील ती या फार्मची काळजी वाहत असे. ती अविवाहित राहिली अन्‌ आपले शिक्षण पुरे करून मिश्रवंशाच्या विद्यार्थ्यांच्या शाळेत तिने नोकरी केली.)

याच वेळी ट्रान्सवालमधील स्थिती चिघळत होती. गांधी इंग्लंडला जाऊन तिथेही या अन्यायाबाबत लोकांशी बोलून आले होते, पण फारसा उपयोग झाला नाही. काळे कायदे सुरूच राहिले. सोंजाने ट्रान्सवाल वुमेन्स असोसिएशनचे सेक्रेटरीपद स्वीकारून कामात प्रत्यक्ष सहभाग आरंभला. तेथील तमिळ स्त्री-पुरुष- घरातील सारेच लहानथोर अन्यायाविरुद्ध लढायला सिद्ध झाले. अनेकांनी हौताम्य पत्करले. मुदलियार, नागास्वामी अशा अनेक प्रतिष्ठित, संपन्न परिवारांनी भाग घेतला. ट्रान्सवाल येथील हाडे  गोठवणाऱ्या थंडीत तरुणांना, वयस्कांना घरातून खेचून काढून कामावर धाडले जाई. अंगावर धड कपडे नाहीत, डोक्यावर टोपी नाही, पायांत बूटही नाहीत- अशा अवस्थेत लोक थंडीने गारठूनच जात होते. काम करणं शक्य नव्हतं, म्हणून मारही बसत होता. पण अद्‌भुत मनोधैर्याने लोक वागत होते. एका 16 वर्षांच्या वलियम्माने सश्रम कारावासानंतर आलेले हौताम्य हसत-हसत स्वीकारले होते. वातावरण स्वकीयांच्या प्रेमाने भारले होते, बलिदान करायला लोक सज्ज होते. गांधी म्हणाले, ‘‘मी यांना प्रेरित केलं, हे म्हणणं ठीक नाही; त्यांनीच मला प्रेरित केलंय.’’

सोंजाला या लढ्यातले आध्यात्मिक बळ महत्त्वाचे वाटत होते. गांधी तुरुंगात असले की, रोज एक पत्र त्यांनी लिहिलेच पाहिजे, असा तिचा हट्ट असे. गांधी तो पुरा करीत. रोज एक पत्र मिळे. तिने लिहिलं, ‘मला आजवर अशी आनंदकारक पत्रे कधी आली नव्हती. वर्णनं तर इतकी नेमकी नि सविस्तर आहेत की, चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. पत्रं वाचून खूप छान वाटलं. असेच लिहीत राहा. परत तुमच्या निष्काळजी आणि अव्यस्थितपणात जाऊ नका.’ गांधी केपटाऊनला राजकीय भेटीगाठींसाठी गेले तरी त्यांचा सोंजाशी पत्रव्यवहार सुरू असे. तिच्या गोऱ्या असण्यामुळे तिने सरकारातील लोकांना काळ्या मंडळींचे मानवी हक्क समाजावून सांगायची संधी साधली होती. गांधींच्या कामाबद्दल प्रचंड आपुलकी असल्याने ते काम हेच तिचे जीवन होत गेले. गांधींचा तिच्या कामाविषयीच्या विेशासाला तिने कधीही तडा जाऊ दिला नाही. तिला पुढील शिक्षणासाठी 40 पौंड आगाऊ हवे होते. गांधींनी तिला ते भेट म्हणून देऊ केले, तर ही भडकलीच. ‘‘नाही, मला हे कर्जाऊच हवे आहेत.’’ तर अशा या चक्रम (?) लेकीचे म्हणा, बहिणीचे म्हणा- काय करायचे?

तिच्या ऋणातच राहणे त्यांनी कबूल केले. ती सतत आपण घेतलेल्या कर्जाऊ रकमेविषयी बोलत असे. जमेल तेव्हा परत करण्याचे आश्वासनही देत असे. त्या रकमेचे तिला नैतिक दडपण येत असे. तिला समजावण्यात काही अर्थ नव्हता. तसे ते तिने परत केले, त्याची रीतसर पावती वारंवार त्यांच्याकडून मागितली. गांधी म्हणत, ‘‘या स्त्रीची नैतिकता स्फटिकागत नितळ आहे नि धैर्य एखाद्या योध्यासारखं आहे.’’ जेव्हा नामदार गोपाळ कृष्ण गोखले गांधींना भेटायला द.आफ्रिकेत आले होते, तेव्हा सोंजाचे काम पाहून म्हणाले, ‘‘कर्तव्यासमोर तिला दुसरे काही महत्त्वाचे वाटत नाही. एवढी नि अशी समर्पितता क्वचितच पाहायला मिळते. तिने ज्या प्रकारे सर्वस्व ओतून भारतीयांच्या हक्कासाठी काहीही अपेक्षा न ठेवता स्वत:ला जुंपले आहे, ते अद्वितीय आहे. तिची कार्यशक्ती आणि जोम तुमच्या चळवळीला एक फार मोठी देणगी आहे. तिला तुम्ही स्नेहपूर्वक जपले पाहिजे.’’

गांधींसमोर एकामागून एक कार्ये उभी राहत होती. गांधी भारतात परत गेल्यावर सोंजा त्यांचेच काम करीत राहिली. तिचा त्यांच्याशी पत्रव्यवहारही सुरू होताच. मिली पोलाकने एका पत्रात लिहिलंय की, ‘मी अधून-मधून सोंजाला भेटते, पण ती स्वत:तच गुरफटलेली राहते. उदास असते. तिला त्यातून बाहेर काढणे अवघड झालेले आहे.’ गांधींनी आपले आत्मकथा हे पुस्तक तिला पाठवले. वाचून ती भडकली होती. त्यातील तिचे कौतुक तिला मान्य नव्हते. ‘तुमची आठवण कच्ची आहे. मी काही एवढे काम केलेले नाही...’ वगैरे. तिने चुकांची यादीच पाठवली होती. गांधींनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला नि ‘तुझ्या दुरुस्त्या पाठव, मी बदल करतो’ असेदेखील कळवले. तिने उत्तर दिले की, ‘तुम्ही तुरुंगात गेलेल्या अनेकींचा उल्लेख केला नाही. मी शिक्षिका असताना मुख्याध्यापिका लिहिले’... वगैरे. पुढच्या आवृत्तीत तशा सुधारणाही केल्या.

गांधींची खूप इच्छा होती की, तिने साबरमती आश्रमात यावे. तसे त्यांनी वारंवार लिहिले. तिने त्यांना ‘एका सेमिनारला तुम्ही अमेरिकेला जाणार आहात, तेव्हा मी युरोपमधून तुमच्याबरोबर पुढे येईन,’ असे कळवले होते. पण ते घडलेच नाही. तिची ‘प्रिय बापू’ या मायन्याची पत्रं ही बहुधा त्यांच्या वागण्याबद्दलची, पत्रं वेळेवर न मिळाल्याची नाराजी व्यक्त करणारी असत. आश्रमातील कडक नियमांविरुद्ध, बेचव अन्नाबाबत तिने तीव्र नाराजी व्यक्त करून, अशा नियमांचा मुलांवर विपरीत परिणाम होतो, हेही नोंदवले. तिचे भांडण रागाने नव्हते, तर त्यांच्यावरील कामाच्या निष्ठेने होते. त्यांच्याविषयी अतीव प्रेम तिच्या मनात होते. ती त्यांच्या आयुष्यात आलेली पहिली विदेशी कार्यकर्ती स्त्री अनुयायांची एक सुंदर प्रतिमा आदर्श बनली होती. त्या दोघांमधला पत्रव्यवहार मुळातून वाचायला हवा. ही हट्टी मुलगी दीर्घायुषी होती. आपले काम एकाकीपणे करीत राहिली. अखेरपर्यंत दोघांची भेट झाली नाही.

Tags: टॉलस्टॉय फार्म फिनिक्स फार्म वर्णभेद स्वातंत्र्यलढा ऑरेंज फ्री स्टेट ट्रान्सवाल जोहान्सबर्ग नेटल सेठ अब्दुल्ला मोहनदास करमचंद गांधी इंग्लंड दक्षिण आफ्रिका संजीवनी खेर सोंजा श्लेशिंग गांधींचे गारूड Varnbhed Freedom Orange Free State Transwal Johansberg Netal Seth Abdulla Mohandas Karamchand Gandhi England South Africa Sanjivani Kher Gandhiche garud weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजीवनी खेर,  मुंबई 400014.
sanjeevanikher@gmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा