डिजिटल अर्काईव्ह (2013-2020)

संगीत-क्षेत्रातल्या भल्या-भल्यांची नजर तिच्याकडे वळली, ती पम्मा बखलपुरीया यांनी लिहिलेल्या ‘फॅन बाबासाहेब दी’ या गीताने. तिच्या पॉप अंदाजातील या गाण्याला तरुणांनी चांगलेच डोक्यावर घेतले. अवघ्या 16 व्या वर्षी गायिलेल्या या गीताने तिला ओळख मिळवून दिली. तिच्या दहा वर्षांच्या सांगीतिक कारर्किदीतली ही सर्वांत मोठी घटना होती. लोक या छोट्या मुलीकडे जबाबदार गायिका म्हणून पाहू लागले. 

मैं धीह हां बाबासाहिब दी,

जिन्हा लिखिया सी संविधान...

ऐसा बब्बर शेर सिंग जिने

कलम बनायी तीरं

जो हक दे सच ले लढिया,

साड्डी बदलती तकदीरं

वो बने मसिहा कौमलै...

...मैं फॅन हुं ऐसे सोच दी,

मै फॅन हुं बाबासाहेब दी.

‘फॅन बाबासाहेब दी’ युट्यूबच्या प्ले-लिस्टमध्ये हे गाणं रिपीट मोडवर होतं. पंजाबी अवगत नसल्याने सुरुवातीला न कळलेले शब्द वारंवार ऐकताना हळूहळू आकळू लागले. भाषेचा अडसर दूर होऊन अर्थही उमगू लागला. डॉ.बाबासाहेबांना ‘बब्बर शेर’ अशी प्रेमळ साद घालणाऱ्या गाण्यात व ते गाणाऱ्या ‘पंजाबी कुडी’त एक स्वैग होता. अवघ्या 16-17 वर्षांच्या या गायिकेचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. तिचे एक्स्प्रेसिव्ह डोळे आणि बोलका चेहरा नुसतंच गाणं नव्हे, तर विचार घेऊन येत असल्याचं उघडपणे जाणवत होतं. मग युट्यूबच्या महासागरात पुन्हा डुबकी मारली, तर तिच्या आजवरच्या सर्वच गाण्यांमध्ये समान धागा दिसत होता. तो म्हणजे विचारांचा, मूल्यांचा आणि वास्तवांच्या जाणिवांचा.

गिन्नी माही! बाबासाहेबांची लेक म्हणवून घेणारी ही पंजाब दी शान! पंजाबात उदयास येऊ लागलेल्या ‘चमार पॉप’ संगीतातील आजच्या घडीचा एक खणखणीत आवाज! वय अवघे 20 वर्षे. पण तिच्या आवाजाची, तिच्या गायिकीची भुरळ पंजाबपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. भारताच्या संगीतक्षेत्रात विद्रोही गीतांना नव्या सूरसाजासह ‘ट्रेडिंग’ करण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. पंजाबी लोकगीत असो, पॉप असो, रॅप असो- आपल्या गायिकीने वेड लावत संविधानातील समतेचा विचार ती ‘बुलंद’ करत निघाली आहे. आणि म्हणूनच नुसत्या पंजाबच्याच नव्हे, तर देश-विदेशांतल्या तरुणांसाठी गिन्नी माही आयकॉन ठरत आहे.

तिचं वय पाहता, या वयातील तरुण-तरुणींचा एक तर प्रेम-विरह गीते किंवा उडत्या चालीची, अर्थहीन शब्दांची पेरणी असलेल्या गीतांमध्ये रमण्याकडे कल असतो. गिन्नी मात्र त्याच वयात अर्थपूर्ण गीतांना आपल्या आवाजाचा साज चढवून पेश करत आहे. ही गिन्नी पंजाबच्या दोआब पट्‌ट्यातील जालंधर शहरातील. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी पंजाब हे अनुसूचित जातींतील सर्वाधिक लोकसंख्या असणारे (32 टक्के) राज्य आहे. आणि त्यातही दोआबमधली लोकसंख्या पंजाबच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 45 टक्के. त्याच पट्‌ट्यात जालंधर हे शहर येतं. आधुनिकेनं नटलेल्या चकचकीत, सुटसुटीत शहरी रुपड्याच्या जालंधरला लागून प्रचंड दाटीवाटीचं अबदपुरा नावाचं उपनगर आहे. नागमोडी वळणांचा, गर्दीनं गजबलेला हा भाग प्रामुख्यानं रविदासी समुदायाच्या लोकवस्तीचा म्हणून ओळखला जातो. याच अबदपुरामध्ये गिन्नी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे.

ती राहत असलेल्या वस्तीपासून दीड किलोमीटरच्या अंतरावर पूर्वापार चालत आलेल्या सात स्मशानभूमी आहेत. भारतात भूप्रदेश कुठलाही असो, जातिभेदांचं वास्तव सगळीकडे सारखंच आहे. आजवर ते आमोरासमोर होतं, पण अलीकडच्या काळात हे वास्तव सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अधिकच गहिरं होत चाललं आहे. या माध्यमावर सामाजिक संकेत धुडकावून उघड-उघड द्वेष करणे, जातींचा उल्लेख व शिवीगाळ हे प्रकार तर ‘नॉर्मलाईज’ होत चालले आहे. तिथं याच प्लॅटफॉमवरून समता व मानवतावादी विचार रुजवणारी गिन्नी वेगळी ठरत आहे.

गिन्नी! खरं तर गुरकँवल भारती. तिचं मूळ नाव गुरकँवल, पण तिला घरात लाडाने गिन्नी म्हणतात. तिचा जन्म 26 नोव्हेंबर 1999 रोजी राकेशचंद्र आणि परमजितकौर यांच्या घरी झाला. तिचे वडील तिचा जन्मदिवस खास मानतात, कारण 26 नोव्हेंबर हा भारताचा संविधान दिवस आहे. तिच्या पाठी दोन भाऊ आहेत. तिचं संयुक्त कुटुंब आहे. त्यामुळे घरात आजी, काका-काकू आणि चुलत बहीण-भावंडंही आहेत.

तिच्या वडिलांना आणि मोठ्या काकांना संत रविदास आणि डॉ.बाबासाहेबांविषयी प्रचंड आस्था. त्यामुळेच त्या दोघांशी निगडित कार्यक्रम असल्यास वडील व काका जात, त्या वेळी ते गिन्नीलाही घेऊन जात. घरात कायमच संत रविदास आणि आंबेडकरांशी निगडित पुस्तके-मासिके येत, त्यामुळे या दोन्ही महापुरुषांविषयी ऐकतच ती मोठी होत होती. आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावरच होता आणि त्याचा कळत-नकळत प्रभाव तिच्यावरही होऊ लागला होता. त्याचदरम्यान एक साधी घटना घडली. गिन्नी सात वर्षांची असेल- ती टीव्हीवर एक मालिका पाहत होती. त्या मालिकेला संगीताची पार्श्वभूमी होती. त्यामुळे मालिकेत सहा-सात गाण्यांचासुद्धा समावेश होता. त्यातलंच एक गाणं ती गुणगुणायला लागली होती.

तिच्या वडिलांनी- राकेश भारती यांनी तिची सुरेल गुणगुण ऐकली. गिन्नी सुरात गात आहे, तिचा आवाजही चांगला भासतोय, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी  आपल्या कुटुंबीयांनाही तिचं गाणं ऐकवलं आणि खात्री करून घेतली की, आपण केवळ मुलीच्या प्रेमापोटी आनंदून गेलोय, की खरंच ती चांगलं गात आहे. पण सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं. आपली लेक गात्या गळ्याची आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी तिला गायनासाठी प्रोत्साहन द्यायचं ठरवलं. तिथूनच तिचा संगीताचा प्रवास सुरू झाला. तिची संगीतातील रुची वाढावी म्हणून वडिलांनी जालंधरमधील लाला जगत नारायण स्कूलमध्ये प्रवेश घेऊन दिला.

गिन्नी सांगते, ‘‘घरात संगीतांची कुठलीच पार्श्वभूमी नाही. माझ्या घरातून मी पहिली गाणारी व्यक्ती. पप्पांमुळे मला संगीतात मुशाफिरी करण्याची संधी मिळाली. ते कायमच माझ्या पाठीशी राहिले आहेत. गाणं म्हणजे एक तऱ्हेचं एक्स्प्रेशनच. ते हळूहळू माझं पॅशन झालं. आपल्याला गायक व्हायचंय, हे मनाशी पक्कं होत गेलं. शौक पैदा हुवा तो सबकुछ अच्छा ही लगने लगा.’’

गिन्नीला त्या लहानपणातला दिनक्रम आठवत नाही, पण तिचे वडील राकेश भारती सांगतात, ‘‘गिन्नीचं संगीत आणि शालेय शिक्षण असं दुहेरी ट्रेनिंग सुरू झालं होतं. त्यामुळे तिचा दिनक्रम खूप जास्त व्यस्त झाला होता. पहाटे साडेपाचला उठून दोन तास रियाज, मग शाळेसाठी निघणं, शाळा झाल्यावर संगीतशिक्षण आणि पुन्हा घरी आल्यावर दोन तासांचा रियाज. संगीतात रुची निर्माण झाल्यामुळे ती खूश होती.’’

घरात आई व आजीच्या मुखात लोकगीतं असत, त्यामुळे सुरुवातीला गिन्नीदेखील भक्तिगीते-भजने अशाच प्रकारचं गायन करत होती. तिचा रियाज जोरदार सुरू होता. त्यानंतर दोन वर्षांनी वयाच्या नवव्या वर्षी तिला जालंधरजवळच्या जंडियाला या गावच्या जत्रेत गायची संधी मिळाली. तिचा तो पहिलाच ‘लाइव्ह परफॉर्मन्स’ होता. त्या जत्रेत गिन्नी गाणार म्हणून आई-वडील, आजी, काका सगळेच गेले होते. स्टेजवरून जनसमुदाय पाहून गिन्नी घाबरेल किंवा तिने जर गायलाच नकार दिला तर...? अशी कुटुंबीयांनाच भीती वाटू लागली. पण तसं काहीही घडलं नाही. गिन्नीने ‘सुमरिन बिन गोता खाओगे’ हे भजन म्हटलं. तिच्या आवाजाला उपस्थितांकडून भरपूर दाद, प्रेम मिळाले. गिन्नीकडे नुसताच गळा नव्हता, तर गीत सादरीकरणाचा विश्वासही होता. त्यानंतर तिने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.

तिच्या गाण्याचा प्रारंभ शास्त्रीय व भक्तिगीतांनी झाला. संत रविदासांना आळवणारी गीते ती सादर करू लागली. ‘‘अपने गुरुजनोंको याद करना है, अपने परिवार के लिए आशिष पाना है और फिर अपना विचार रखना है, बस यहीं सोच थी!’’ असं ती तिच्या या प्रारंभाविषयी  सांगते. शालेय-आंतरशालेय स्पर्धांमध्ये ती सहभाग घेऊ लागली. तिला आसपासच्या परिसरातून भक्तिगीते व भजनासाठी निमंत्रणे येऊ लागली. अल्पावधीतच जालंधरच्या परिसरात गिन्नी माही हे नाव लोकप्रिय झालं होतं. हळूहळू ती रविदासी गाण्यांबरोबरच डॉ.बाबासाहेबांचा विचारही गाण्यांतून मांडू लागली होती. तरी ते सारं एका मर्यादित अर्थाने स्टेज शोजपुरतेच मर्यादित होते.

अमर ऑडिओ या जालंधरस्थित म्युझिक कंपनीपर्यंत तिची ‘खनक’ पोहोचली होती. त्यांनी तिला बोलावून घेतले आणि अल्बममध्ये गाणं गायची संधी दिली. मग वयाच्या 15 व्या वर्षी गिन्नीचा ‘गुरां दी दिवानी’ हा पहिला अल्बम आला. त्यानंतर 2016 मध्ये ‘गुरूपुरबा है कांशीवाले दा’ हाही अल्बम आला, हे दोन्ही अल्बम हिट झाले. या दोन्ही अल्बममध्ये संतांची आराधनाच होती. तिच्या वडिलांना मात्र वाटू लागलं की, तिच्या गाण्यांमधून संदेश पोहोचायला हवा. वास्तवाचं भान आणि प्रेरणा तिच्या गीतांतून मिळायला हवी, केवळ शब्दबंबाळपणा असून उपयोग नाही. कुठल्याही व्यक्तीला त्यातून काही तरी घेता यायला हवं. त्यातून दलित समाजाची स्थितीही मांडता यायला हवी. त्यामुळे राकेश भारती यांनी आपल्या मुलीचा एक म्युझिकल ग्रुप तयार करू; असा चंग बांधला.

त्यासाठी सर्वप्रथम उत्तम गीतकार सोबतीला हवेत, हे त्यांनी ताडलं. पंजाबमध्ये दलित चळवळींबाबत लेखन करणारे, दलित लोकसंगीतासाठी लेखन करणारे पाच-सहा गीतकार त्यांनी शोधले आणि गीतकारांचं एक पॅनलच उभं केलं. गाणी लिहून आल्यानंतरही कुटुंबीय मिळून तिच्यासाठी गाण्याची निवड करायचे. तिचं गाणं आहे तर चांगलंच असेल, एवढीच काळजी घ्यायचं सूत्र त्यांनी ठरवलं होतं आणि वडिलांच्या या प्रयत्नांना यशही मिळालं.

संगीतक्षेत्रातल्या भल्या-भल्यांची नजर तिच्याकडे वळली, ती  पम्मा बखलपुरीया यांनी लिहिलेल्या ‘फॅन बाबासाहेब दी’ या गीताने. तिच्या पॉप अंदाजातील या गाण्याला तरुणांनी चांगलेच डोक्यावर घेतले. अवघ्या 16 व्या वर्षी गायिलेल्या या गीताने तिला ओळख मिळवून दिली. तिच्या दहा वर्षांच्या सांगीतिक कारर्किदीतली ही सर्वांत मोठी घटना होती. लोक या छोट्या मुलीकडे जबाबदार गायिका म्हणून पाहू लागले.

‘फॅन दी बाबासाहेब’ या गाण्याबरोबरच राजा बाबासाहिब दा, हक्का देना लढना बाबासाब सिखा गया... 1932-हक, ना चक्को तलवाराँ... संत रविदास या शीर्षकांची गीते तिची ओळख अधिकाधिक घट्ट करू लागली होती. तसेच ‘की होया जे मैं धी हाँ’ हे स्त्रीभ्रूणहत्येवर प्रकाश टाकणारं गीत प्रसिद्ध आहे. आणखी एका गाण्याने तिच्या शिरपेचात तुरा खोवला. ते म्हणजे डेंजर चमार!

हे 2016 मध्ये आलेलं गाणं तुफान गाजलं. आजवर या गाण्याला 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चमार म्हणजेच चांभार जातीचा उल्लेख असणाऱ्या या गाण्याच्या निर्मितीमागे एक घटना दडली आहे. गिन्नी कॉलेजमध्ये असताना जेवणाच्या सुट्टीत तिची मैत्रीण तिच्याजवळ आली आणि तिने थेट तिची जात विचारली. ती तो प्रसंग सांगते.

‘‘मैत्रिणीने येऊन थेट ‘तुझी जात कोणती?’ असं विचारल्यावर मी जरा गडबडलेच.

‘काय झालं? काही घडलंय का?’ मी आधी तिला असंच विचारलं.

त्यावर ती म्हणाली, ‘नाही, मी तुझे व्हिडिओ पाहिलेत. मला तुझी गाणी आवडतात. पण त्यामुळेच तुझ्याबाबत उत्सुकता आहे.’

असं थेट येऊन कुणी जात विचारल्याने मी किंचित अस्वस्थ झाले. मला ते बिलकुल आवडलं नव्हतं. मी तिला ‘भारतीय आहे’ असं उत्तर दिलं. पण तिला जात जाणून घेण्यात फारच रस होता. मग म्हटलं, ‘शेड्युल कास्ट.’ पण ती काही बधेचना.

ती पुन्हा म्हणाली, ‘शेड्युल कास्टमध्येसुद्धा खूप वर्गवारी आहे, तर तुझी नेमकी जात कोणती त्यातली?’

यावर वैतागून मी सांगून टाकलं, ‘चमार.’

तर ती एकदम रिॲरक्ट झाली, ‘चमार! चमार तो डेंजर होन्दे!’

आता यावर काय बोलावं, हे मला सुचलं नाही. मी स्मित केलं. पण मनातून थोडी खट्टू झालेच होते.’’

गिन्नीने हा संपूर्ण किस्सा आपल्या वडिलांना ऐकवला. आपल्याविषयीची अशी एक इमेज लोकांनी मनात घर करून ठेवली आहे, तर यावर काही तरी आपण केलं पाहिजे, असा विचार करून त्यांनी गीतकारांना ‘यावर काही करता येईल का?’ असं विचारलं आणि त्यातूनच जन्माला आलं- डेंजर चमार..

बेखौफ रहन्देने रखं दे

फिकर ना फाका सद्गगुरू रविदास है

जी साड्डा राखा कुर्बानी देनू

ना डर दे रहंदे हैगे तय्यार हैगे

असले नलो वाद डेंजर चमार...

डेंजर चमार...

या गीतातील ओळींचा साधारण अर्थ- ‘आम्ही निभर्यतेने राहतो, आम्हाला कोणाची भीती नाही. आम्ही  कुठल्याही संघर्षात त्याग करायला, शहीद व्हायला कायमच तयार आहोत. कारण आमचे रक्षणकर्ता सदगुरू रविदास आहेत. आम्ही दारूगोळ्यापेक्षाही डेंजर आहोत. आमच्यावर अन्याय झाला, तर आम्ही डेंजर आहोत.’

तिच्या या गाण्याने यु-ट्यूबवर धुमाकूळ घातला. पंजाबच नव्हे, तर या गाण्याने तिला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. ती संत रविदास यांचा दोहा सांगून चमारचा एक वेगळाच अर्थही इथं सांगू पाहते,

‘‘हाड, मांस और रक्त का बना आकाल,

आँख पसार के देख लो सारा जगत चमार’

...च से चमडी, मा से मांस और र से रक्त. त्यामुळे हे तिन्ही घटक आपल्या प्रत्येकाकडेच आहेत. मग भेदाभेद कशाला?’’

गिन्नीचा मुद्दा योग्य होता. तिला दोहे, गीते मुखद्गोत तर आहेतच; पण आपण ज्या परिसरातून, समूहातून आणि कौटुंबिक परिस्थितीतून येतो, त्या सगळ्याचा कळत-नकळत परिणाम आपल्यावर होत असतो. तीसुद्धा त्याला अपवाद नव्हती. ती म्हणते, ‘‘लहानपणापासूनच घरात आंबडेकरवादी विचार होते. त्यानुसार चर्चाही व्हायच्या. आजी, काका, वडील यांच्याकडून दलितांची आधी कशी स्थिती होती, काय-काय त्यांनी भोगलं, हे कळत होतं.

डॉ.बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे आज दलित समाजातही घुसळण होत आहे. शिक्षणाचा प्रचार-प्रसार होत आहे आणि आज जी काय सुस्थिती दिसत आहे, ती संविधानाने हक्क दिल्यानेच. मला कुठल्याही प्रकारची अवहेलना प्रत्यक्ष वाट्याला आली नाही. अर्थात, हीसुद्धा बाबासाहेबांचीच देन. पण अजूनही जातिभेदाच्या भिंती आहेतच. एकीकडे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, तर दुसरीकडे अत्याचारही होत आहेत. त्या सगळ्यांवर प्रकाश टाकण्याचं काम संगीतातून करत आहे. आपल्या व्यवस्थेतील सर्वच प्रकारच्या असमानेतला प्रश्न करण्यासाठी गाते.

इथं मला कुठल्याही जातिव्यवस्थेवर बोट ठेवायचं नाहीये, कुणाच्याही भावना दुखावयाच्या नाहीत. मुळात विशिष्ट जातीचं गीत म्हणत नाही, तर मी मानवेतला आवाहन करण्यासाठी गाते. संविधानाने दिलेल्या समतेचा विचार रुजविण्यासाठी प्रयत्न करते. मुळातच मी स्वत:ला कार्यकर्ती समजत नाही. मला गाण्यांव्यतिरिक्त काही जमतही नाही. मी फक्त माझ्या गाण्यांतून सामाजिक विषयांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते. सामाजिक मूल्यं, समानतेचा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. तसंही मला वाटतं, गायकाला कुठलीही जात नसते. मी स्वत:ला भारतीय समजते, माणूस समजते.’’

स्वत:ची ओळख केवळ भारतीयच समजायची, ही शिकवण तिला कुटुंबातूनच मिळाली. आडनावावरून जाती ओळखणाऱ्या आपल्या समाजातून डिकास्ट व्हायचं असेल तर आडनाव सोडणं आवश्यक आहे, असा विचार तिच्या वडिलांनी केला. सुरुवात स्वत:पासून करावी, म्हणून त्यांनी आडनाव बदलून घेतले. त्यांचं मूळ आडनाव माही होते, ते त्यांनी बदलून भारती करून घेतले. अशा वातावरणात राहणाऱ्या तिच्या व्यक्तिमत्त्वावर असे बारीक-सारीक संस्कार कायम होत राहिले. ते संस्कार, ते विचार आपल्यापुरते मर्यादित राहू नयेत, म्हणून ती अनेक स्टेज शोजदेखील करते. डॉ.बाबासाहेब आंबडेकरांचा विचार पोहोचवण्याबरोबरच पंजाबमध्ये असलेली स्त्रीभ्रूणहत्या किंवा ड्रग्जसारख्या समस्यांवरही ती बोट ठेवते. जागरण, डेरा आणि कॉन्सर्ट असे ऑफलाईन कार्यक्रमही भरपूर करते.

प्रामुख्याने पंजाब आणि हरियानामध्ये आजवर तिचे एक हजाराहून अधिक स्टेज शो झाले आहेत. याशिवाय दिल्ली, अहमदाबाद, महाराष्ट्र या ठिकाणी; तर कॅनडा, ग्रीस, इटली, युरोप, जर्मनी अशा परदेशांत तिचे लाइव्ह परफॉर्मन्स झाले आहेत. जर्मनीमध्ये तर ग्लोबल मीडिया फोरमवर तिला पाचारण करण्यात आले होते. ‘यंग व्हॉईस इन इक्वॅलिटी ॲन्ड फ्रीडम’ अशी तिची ओळख करून दिली गेली. ‘‘स्टेजवर, खूप मोठ्या लोकांसमोर गाताना कधीही भीती वाटलीच नाही. कार्यक्रमाच्या आधी थोडा नर्व्हसनेस असायचा, पण गुरुजनांचं नाव घेऊन परफॉर्मन्स सुरू झाला की, मग भीती पळून जाते,’’ असं ती सांगते.

आजवर तिने 50-55 एकलगाणी म्हटली आहेत. पंजाबी लोकसंगीतात सजलेली आंबेडकरविचारांची गीते ही पंजाबपुरती मर्यादित राहतात. त्यामुळे अलीकडे ती काही गीते हिंदीतूनही सादर करत आहे. जसे की-

‘हर किसी की हम गुलामी करते ही रहते,

जुल्मों को सहेलेते थे मगर कुछ भी ना कहते

सर उठाकर हम कहीं भी आते जाते ना  

अगर भीमजी इस दुनिया में आते ना..

बाबासाहिब इस दुनिया में आते ना’

किंवा

‘चारो और अंधेरा जब था, इस संसार में छाया

रोशनी की तब एक किरनने दुनिया को रोशनाया

पाप जुल्म का आपने ऐसा नाश किया

जडसे जातिवाद वृक्ष उखाड दिया

मानवता पर तुमने उपकार किये

पुरे दुनिये का कर्म निहार दिये

बाबासाहेबजी तुझको है प्रणाम मेरा...’

अलीकडेच ‘फोक फ्युजन’ नावाचा तिचा अल्बम रिलीज झाला. या अल्बममधील एक गीत ‘गोल्डन गर्ल’ ठरलेल्या हिमा दासवर आहे.

‘ना थकी, ना हारी,

उसपे थी जिम्मेदारी

पूरे देश की

ना टूटी उसकी आस,

किया उसने परयास..

दुनिया में देखो गुँज

रहा नाम है उसका खास

... हिमा दास’

हे गाणं 27 ऑगस्ट 2019 रोजी युट्यूबवरून प्रसारित झाल्यावर पुढील काही दिवसांत त्याचे एक लाखाहून अधिक व्ह्यूज झाले. तिच्या फेसबुकपेजवर सव्वापाच लाख चाहते आहेत. तिची लोकप्रियता यावरून उघड होते. तिचे व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, लोकसंगीतापासून हिपहॉप, रॅप अशा विविध संगीतप्रकारांत ती वावरताना दिसते. इतकंच नव्हे, तर बऱ्याचदा रविदासी किंवा आंबडेकरवादी गीते असली तरीही त्यांचं संगीत आणि सादरीकरण दोन्हीही आधुनिक असतं. आजच्या तरुणवर्गाला थेट भिडणारं असतं.

गिन्नी यावर म्हणते, ‘‘ट्रेंड के हिसाबसे रख्खा है वरना युथ सुनेगी कहाँ...! तुम्हाला जर लोकांपर्यंत तुमचा विचार पोहोचवायचा आहे, तर तो त्यांना त्यांच्या भाषेत सांगायला हवा. तुम्ही ‘प्रबोधन’ करायला आलात असं  जर कुणाला वाटलं, तर ते तुमच्याकडे फिरकणारच नाहीत. त्यामुळे लोकांना कशा स्वरूपात सादर केल्यावर आवडेल याचा विचार संगीत आणि सादरीकरण दोन्हींत ठेवायला हवा. तुमचे संगीत, गीत आवडू लागले, त्यातून त्यांचं मन थोडं रिझायला लागलं की, त्यांच्यासमोर तुमचा विचार मांडणंही सोप्पं जातं. त्यामुळे आम्ही कायमच ट्रेंडच्या हिशोबाने चालतो.’’ 

गिन्नी सध्या जालंधरच्या हंसराज महिला महाविद्यालयात ‘व्होकल म्युझिक’मध्ये मास्टर्स करत आहे. तिचा दिवस पूर्णत: भरगच्च असतो. सकाळी रियाज, मग 9 ते 3 कॉलेज, संध्याकाळी पुन्हा रियाज असा तिचा दिनक्रम आहे. तिला पुढे जाऊन संगीतात पीएच.डी. मिळवायची आहे. लोकांनी आपल्याला डॉ.गिन्नी माही म्हणून ओळखायला हवं, असं ती हसतहसत सांगते. आज स्त्रिया घराबाहेर पडू शकत आहेत. अजून जेंडर इक्वॅलिटी यायला वेळ लागेलच; पण ज्यांची शिक्षणाची सोय होऊ शकत आहे, तिथे तर मुलींनीदेखील मागे राहायला नको. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा बाबासाहेबांचा विचार अमलात आणायचा असेल, तर आपल्या आवडीच्या विषयात खोलपर्यंत जायला हवं, असं तिला वाटतं.

तिचं आणखी एक स्वप्न आहे. ती आज आंबेडकरवादी गीतं आणि पंजाबी भाषेतच गात असली तरी तिला केवळ याच साच्यात अडकून पडायचे नाही. बॉलीवुड-हॉलीवुडमध्ये जाऊन नामवंत पार्श्वगायक होण्याचं स्वप्नदेखील ती पाहते. ‘आंबेडकरांचा समानतेचा विचार, जातिभेद संपवण्याचा विचार तर मी कायमच सांगत राहणार आहे. तो माझ्या जगण्याचाच भाग आहे. पण तुम्ही एकच गोष्ट करत राहिलात की, तिथंच अडकता. विविध संगीतप्रकार हाताळायचे आहेत. व्हर्सटाईल प्लेबॅक सिंगर ऐसी पहचान मुझे बनानी है. मी खरं तर अजून लहान मुलगीच आहे. मलाही अजून फार लांबचा पल्ला गाठायचा आहे.’’

तिच्या या प्रवासात तिच्या कुटुंबीयांचा विशेष वाटा आहे. आपल्या मुलीतील हुनर ओळखून तिची त्या क्षेत्रात हरतऱ्हेनं जडण-घडण करण्यात तिच्या वडिलांचा वाटा मोलाचा आहे. गिन्नीने जेव्हा गाण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, तेव्हा अनेक नातेवाइकांनी नाके मुरडली. ‘आपल्या घरच्या मुलींनी गाणं-बजावणं करावं- ही गोष्ट शोभते का?’ अशी टिपण्णीही केली. काहींनी वयात आल्याबरोबर लग्न लावून देण्यासाठी निंदा-नालस्ती केली. मात्र, तिचे पालक तिच्यासोबत उभे राहिले. आता तिची लोकप्रियता पाहून अनेकांच्या भुवया वर उंचावल्या. अगदी दूरदूरचे नातेवाईक आता ‘गिन्नी तो हमारी बेटी है..’ असं म्हणू लागले आहेत. तिच्या याच लोकप्रियतेमुळे राकेश भारती यांनी नोकरी सोडली. कारण तिला कॉलेजमध्ये ने-आण करणे, संगीताच्या क्लासला नेणे, रियाज करवून घेणे, राज्यातील व राज्याबाहेरील कॉन्सर्ट्‌समध्ये सोबत करणे- हे कामच लागले.

तिचे आई-वडील दोघेही तिच्या प्रत्येक कार्यक्रमात तिच्यासोबत राहतात. अनेकदा तिच्या गाण्याचा वापर राजकीय स्टेजवरूनही केला जातो किंवा तिला तिथंही गाण्यासाठी बोलावणी येतात; मात्र वडिलांनी राजकीय पक्षांच्या स्टेजपासून काटेकोरपणे लांबच राहण्याचं ठरवलं आहे. शेवटी गिन्नी म्हणते- विशेष करून तरुणांना,

‘‘गुरुनानकजी ने कहा है :

अव्वल अल्ला नूर उपाया,

कुदरत के सब बंदे,

एक नूर ते सब जग उपज्या,

कौन भले कौन मन्दे...

थोडक्यात सर्वांच्या रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त जर सारखंच आहे, तर भांडण्याला काय अर्थ आहे? जात-पात मिटवणं इतकं सोप्पं नाहीये, पण ते मिटविण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाचं हत्यार दिलं आहे, त्याचा वापर आपण प्रत्येकाने करायला हवा. मुख्य म्हणजे शिक्षण घ्यायला हवं. विशेष करून मुलींच्या शिक्षणाबाबतची उदासीनता आता तरी सोडायला हवी. संविधानाने जर स्त्री-पुरुष दोघांनाही समान संधी, समान शिक्षणाचा अधिकार दिला आहे, तर तो कुणीही तिच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना त्यांची उडान घेऊ दिली तर त्या स्वत:चं, कुटुंबाचं आणि देशाचं नाव उजागर करतील, यात शंकाच नाही!’’

Tags: हिनाकौसर खान Heenakausar Khan Ginni Mahi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा