डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

डॉ. श्रीराम लागू व दीपा लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानच्या वतीने 2004 पासून दरवर्षी तन्वीर सन्मान एका ज्येष्ठ नाट्यधर्मीला प्रदान केला जातो. पहिला सन्मान इब्राहिम अल्काझी यांना दिला गेला होता, त्यावेळी त्यांचे विद्यार्थी नसिरुद्दीन शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. या वर्षीचा पुरस्कार नसिरुद्दीन शाह यांना दिला जाणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ 9 डिसेंबर 2019 रोजी, पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या समारंभात प्रदान केला जाणार आहे. त्यानिमित्ताने नसीर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारी ज्योती सुभाष यांची ही मुलाखत.


नसिरुद्दीन शाह एक सिनेकलाकार म्हणून आपल्याला माहिती आहेत. त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि आपल्या पात्रात समरस होऊन अभिनय करण्याची त्यांची ताकद आपण सिनेमा व नाटक अशा दोन्हीही माध्यमांतून अनुभवली आहे. पण हेच नसिरुद्दीन शाह एक माणूस म्हणून कसे आहेत? ते आज जे काही आहेत त्यामागची कहाणी काय आहे? याची उत्सुकता बहुतेकांना असेलच. याच निमित्ताने, नसिरुद्दीन शाह यांना 1970 सालापासून ओळखत असलेल्या मराठी अभिनेत्री आणि रंगकर्मी ज्योती सुभाष यांची ही मुलाखत...

 प्रश्न - तुम्ही आणि नसिरुद्दीन शाह एकमेकांना जवळ- जवळ पन्नास वर्षांपासून ओळखत आहात. या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगायला आवडेल आणि पहिल्यांदा तुमची भेट कुठे झाली?

- नसीर... मी त्याला अगदी आदराने एकेरी नावाने संबोधणार आहे. प्रत्येक माणसात कमी-अधिक प्रमाणात गुणधर्म असतातच परंतु, बऱ्याच चांगल्या गुणधर्मांचा समुच्चय एकाच माणसात पाहायला मिळणं हे फार क्वचित घडतं. नसीरला पहिल्यांदा भेटले तेव्हापासून आतापर्यंत त्याच्यातल्या एक एक गुणधर्माची ओळख मला होत गेली. मला अगदी सुरुवातीपासूनच असं वाटत होतं की, हा मुलगा काय-काय घेऊन जन्माला आलेला आहे! त्याच्यातली संवेदनशीलता, बुद्धिमत्ता, मनाची कोमलता, त्याचा एकंदर समज, त्याचबरोबर बौद्धिक आणि भावनिक आवाका... अशा अनेक गोष्टी! मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा लगेच मला काही माहीत नव्हतं की, हा कलाकार म्हणून एवढा प्रगल्भ असेल किंवा हा माणूस म्हणून कसा आहे. 1970 साली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच एनएसडी मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो.

 प्रश्न - एनएसडीमध्ये तुम्ही बॅचमेट होते. एनएसडी- मधल्या तुमच्या आठवणी काय आहेत?

 - त्या काळात आपापल्या परीने आपापल्या गावात, शहरात, देशात नाटकाचे विविध प्रयोग सुरू असायचे आणि त्यांची अगदी जुजबी माहिती मिळायची. उदाहरणार्थ बंगालमध्ये अमुक-अमुक नाटकाचा प्रयोग सुरू आहे किंवा महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे वगैरे. एके दिवशी मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये इब्राहिम अल्काझी यांच्याबद्दल एक मोठा लेख वाचला. जागतिक रंगभूमीची माहिती आणि अभ्यास असलेला त्या काळातला हा माणूस म्हणून त्या लेखात त्यांचा उल्लेख केला होता. दिल्लीमध्ये आपल्या सरकारने संचालित केलेली यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नावाची संस्था आहे हे मला कळालं. नाटकाचं बॅकग्राऊंड असलेल्या लोकांना एनएसडीमध्ये प्राधान्य दिलं जायचं. आमच्या वर्गात मी, नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, बी.जयश्री आणि इतर असे आठ ते दहा विद्यार्थी होते. लिमिटेड विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्यावर अल्काझींचा कटाक्ष होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप भरणा नसायचा.

इब्राहिम अल्काझी यांच्या कल्पना खूप इनोवेटिव्ह असायच्या. ज्या काळात वर्गामध्ये मुला-मुलींना एकत्र एका बेंचवर बसायचीसुद्धा परवानगी नव्हती त्या काळामध्ये त्यांनी एनएसडीमध्ये मुला-मुलींसाठी को-होस्टेलची स्थापना केली! खरं तर एकमेकांना माणूस म्हणून समजून घेण्याची ही एक महत्त्वाची संधी होती. त्याचबरोबर जो विषय आम्ही तिथे शिकायला आलो होतो तो ही जास्त खोलवर समजून घेण्याची ही संधी होती. ‘नाटक’ म्हणजे तरी काय आहे? शेवटी माणसांचाच अभ्यास म्हणजे नाटक. हे सगळं लक्षात घेऊन अल्कझींनी ही अभिनव कल्पना अमलात आणली. त्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्यांचा अल्काझींवर खूप विेशास होता. त्यामुळे त्यांनी अल्काझींना, ‘तुम्हाला जे अभिनव प्रयोग करावेसे वाटतात ते तुम्ही मुक्तपणे करा’, असं एक फ्रीडम दिलेलं होतं. जे अल्काझींनी खूप जबाबदारीने वापरलं असं मला वाटतं.

आम्हाला अभिनयासोबतच संगीत, नाटक, नृत्य, गायन असेही विषय होते. वर्गामध्ये आम्हाला इम्प्रोवायझेशन करावं लागायचं. एक प्रसंग दिला जायचा आणि ते तुम्ही करून दाखवा अशा अँक्टिंगच्या वेगवेगळ्या अँक्टिव्हिटीज असायच्या. सुरुवातीपासूनच माझ्या लक्षात यायला लागलं की, इतर सगळे जण जे काही करतात त्यापेक्षा हा मुलगा, म्हणजे नसीर, काही तरी वेगळ्या पद्धतीने विचार करतो. एक तर तो इंग्रजी माध्यमातून आलेला होता त्यामुळे त्याचं इंग्रजी उत्तम होतं. शेक्सपियर वगैरे लेखक त्याला चांगले माहीत  होते. त्यानी स्वतः इंग्रजी नाटकांचे सादरीकरण केलेले होतं. अशा अर्थाने तो इतरांपेक्षा पुढे होता. परीक्षेत त्याला किती मार्क पडतात याबद्दल तो कधीच चिंतित नसायचा. मात्र तरीही जे सुरू आहे त्याची आपल्याला योग्य आणि पुरेपूर माहिती आहे ना? याची तो जबाबदारी घ्यायचा.

वर्गामध्ये होत असलेल्या अँक्टिविटीजमध्ये एकत्र भाग घेऊन आमची मैत्री वाढत गेली आणि को-होस्टेलमध्ये आम्ही एकत्र राहत होतो, त्यामुळे नसीरच्या बऱ्याच क्वालिटी जवळून अनुभवण्याची संधी मला मिळाली. मला कळालं होतं की नसीर अतिशय तीव्र बुद्धिमत्ता असलेला एक विनोदी माणूस आहे. तो स्वतःमध्येच गुंग असायचा. त्याच्या मनामध्ये काहीतरी किंवा कसले तरी शोध बहुतेक चालू असायचे. हा शोध किंवा अभ्यास तो स्वतःपुरताच करतो असं जाणवायचं नाही. इतरांचं काय चाललंय याच्याकडेसुद्धा त्याचं लक्ष असायचं. मला आठवतंय, एकदा जेव्हा आमचं अजून एकमेकांशी हाय-हॅलोसुद्धा झालेलं नव्हतं त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की, म्युझिक हा तुमच्या अभ्यासक्रमातला एक विषय आहे. तुम्ही सगळेजण म्युझिकच्या क्लासमध्ये जाऊन बसा. तिथे प्रत्येकाला एक गाणं म्हणायला सांगितलं होतं. त्यावेळी मी फिल्म म्युझिकने इतकी भारलेले होते की मी ‘अदालत’ या सिनेमातलं ‘युं हसरतों के दाग मोहब्बत में धों लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए’ हे गाणं गायलं. माझ्या पलीकडे नसीर बसला होता आणि खाली जमिनीकडे बघून तो गाणं ऐकत होता. माझं गाणं झाल्यानंतर तो म्हणाला, ‘अच्छा गाती हो’ म्हणजे यात कुठलीही भावुकता न आणता जणू काही हा अभ्यासाचाच विषय आहे, असं तो प्लेन आवाजात बोलला आणि मी म्हणाले ‘ओके’. हे आमचं पहिलं संभाषण आणि तिथून पुढे माझ्यासाठी तो ‘इन द प्रेझेंट मोमेंट’मध्ये राहणाऱ्या माणसाचं एक उत्तम उदाहरण म्हणून कायम लक्षात राहिला.

हळूहळू आम्हाला नसीरच्या अनेक छटा दिसायला लागल्या! आमच्या लक्षात यायला लागलं की, नसिरला वर्गातल्या कुणाहीबद्दल कितीही फाटकं बोलायला काहीही वाटायचं नाही! आपण फार सेन्सेशनल काहीतरी बोलतोय असंही त्याला वाटायचं नाही. अत्यंत बेधडकपणा हा त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आधीपासूनच होता. नसीरच्या आतमध्ये कुठेतरी सतत एक आस असायची की आपल्या आजूबाजूला जे कोणी प्रोमिसिंग लोक आहेत त्यांचंही पुढे काहीतरी चांगलं व्हावं आणि त्यासाठी तो सगळ्यांशी खूप ब्लंटली बोलायचा. यामुळेच मात्र काहींना तो उद्धटही वाटायचा. खरं तर या सगळ्यामागे त्याची प्रामाणिक तळमळ असायची. तो कधीच स्वतःपुरता राहिला नाही. त्याला माणसं हवी असायची. महत्त्वाचं म्हणजे माणसांकडे एक अभ्यासाचा विषय म्हणून बघण्याची त्यांची वृत्ती आहे हे मला पुढच्याही आयुष्यात खूप जाणवत गेलेलं आहे.

 प्रश्न - तुम्ही दोघेही सुरुवातीपासूनच नाटक/रंगभूमी याबद्दल अत्यंत पॅशनेट आहात. हा अत्यंत आवडीचा विषय एनएसडीमध्ये एकत्र शिकत असतानाचे तुमचे काही अनुभव सांगाल का?

- एनएसडीमध्ये असताना नाटकाच्या तालीम सतत चालू असायच्या. शिकत असतानाच आम्ही काही प्रायोगिक नाटकाचे प्रयोगदेखील करत असू. त्यात आम्ही जगभरातील नाटकंसुद्धा करायचो. उदा- ‘थ्री पेनी ऑपेरा’ नावाचं एक नाटक आम्ही हिंदीमध्ये केलं होतं. पुढे ते ‘तीन पैशांचा तमाशा’या नावाने मराठीत आलं. जगभरातील नाटकं करण्यासाठी जगभरातले दिग्दर्शकसुद्धा होते आणि हा एक मोठा अनुभव आमच्यासाठी होता. आपल्याला निसर्गाने काही क्वालिटी किंवा क्षमता दिलेल्या असतात त्यात अनेक नाजूक गोष्टी असू शकतात. त्यां क्षमतांना पॉलिश करणं आणि ते आपल्या कामात उतरवणं याचं नसीर एक उत्तम उदाहरण आहे.

आम्ही अजून एक एकांकिका करायचो. त्या एकांकिकेचं नाव होतं ‘द लेसन’. ही मूळची फ्रेंच एकांकिका आहे. युजीन आयनेस्को यांनी ती लिहिलेली आहे. याचा विषय थोडक्यात असा की- आपली शिक्षणपद्धती ही एक धोपटशाही प्रकारची आहे आणि लहान मुलांवर आपण काय थोपतो आहोत आणि ते कशा प्रकारे लादतो आहोत याचं आपल्यालाच भान राहिलेलं नाही. त्यात एक साधारण चाळीस वर्षांचा प्रोफेसर, त्याच्याकडे शिकायला आलेली एक शाळकरी मुलगी आणि त्याची मोलकरीण असे तीन पात्र होते. अर्थातच प्रोफेसरचा रोल नसीर करत होता आणि लहान मुलीचा रोल मी करत होते. आता ही एकांकिका नाटकातल्या अँब्सर्ड या जानरमध्ये मोडते. या प्रकारातली एकूणच नाटकं ही सादर करायला अधिक चॅलेंजिंग असतात कारण त्यात तुम्ही अभिनय कसा करता आणि संवादातले शब्द किती योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता याला फार  महत्त्व असतं.

खरंतर ही एकांकिका आमचं क्लासरूम प्रोडक्शन होतं. मात्र केवळ नसीर एक उत्तम नट आहे म्हणून या नाटकाचे प्रयोग बाहेरही खूप चांगले व्हायला लागले. त्या काळात दिल्लीमध्ये बऱ्याच मोठ्या वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली होती, ज्यात आमच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. हे सांगण्याचं कारण असं की- नसीर त्यावेळी माझ्याच वयाचा होता पण तरीसुद्धा त्या प्रोफेसरच्या रोलसाठी लागणारा एक प्रगल्भपणा, शेवटाकडे त्यात उतरणारा क्रूरपणा, हे सगळं त्याने त्याच्या अभिनयात आणलं होतं. हे तो करू शकला, कारण माणसांमध्ये किती प्रकारचे व्यक्तिमत्त्व किंवा छटा दडलेल्या असू शकतात याबद्दल नसीरचा अभ्यास होता. अशाच कामांमधून नसीरची एक नट म्हणून असलेली ताकद सुरुवातीपासूनच मला अनुभवायला मिळाली. पुढे एनएसडीमधून पासआऊट झाल्यानंतर तो लगेच एफटीआयआयमध्ये जॉईन झाला.

प्रश्न - तुम्ही आणि नसिरुद्दीन शाह यांनी आधीच्या काळात रंगभूमीवर एकत्र काम केलेलं आहे हे तुम्ही सांगितलं. त्यांच्या आजच्या अभिनयाच्या प्रवासाकडे एक मैत्रीण म्हणून तुम्ही कसं पाहता?

 - आज त्याच्या अभिनयाबद्दल बोलायचं तर, एक- दोनच कामं सोडता मला त्याची इतर सगळी कामं आवडतात. कधीकधी कुठल्यातरी हिंदी सिनेमांमध्ये मला तो मिसफिट वाटला पण हे माझं वैयक्तिक मत आहे, कारण मला तो माणूस म्हणून माहिती असल्यामुळे मला तसं वाटत असावं. मॉटले प्रोडक्शन या त्याच्या संस्थेमार्फत नसीर आणि त्यांची पार्टनर रत्ना पाठक गेली चाळीस वर्षे नाटकाच्या क्षेत्रात आत्मीयतेने काम करत आहेत. मॉटलेची कामं बघण्यासारखी आहेत कारण त्यात फार वैविध्य आहे. वेटिंग फॉर गोदो, आईनस्टाईन, द लेसन, झू स्टोरी, जुलियस सीझर, डियर लायर, द प्रोफेट, फादर, इस्मत आपा के नाम इत्यादी हि त्यापैकी प्रमुख नाटकं आहेत. चाळीस वर्षांत एकूण बेचाळीस विविध नाटकं त्यांनी रंगभूमीवर आणली आहेत. भाषेवर त्याचं प्रेम आणि कमांड असल्याने इंग्रजी, हिंदी आणि उर्दू अशा विविध भाषांमध्ये तो नाटक सादर करतो. ‘आइस्टाइन’मधला त्याचा अभिनय मला प्रचंड आवडतो. ते नाटक तर तुम्ही काहीही करून बघा. त्याचबरोबर ‘फादर’ नावाच्या नाटकातला त्याचा अभिनयसुद्धा मला आवडतो. त्यात तो एक अल्झायमर झालेल्या माणसाचा रोल करतो. ‘मॉटले’ या शब्दाचा अर्थच वैविध्य असा आहे जो नासिरच्या आजच्या कामाला अगदीच शोभतो!

प्रश्न - एक मित्र म्हणून नसिरुद्दीन कसे आहेत असं तुम्हाला वाटतं?

- खरं सांगायचं तर आम्ही अनेक वर्ष भेटतसुद्धा नाही तरी एकमेकांबद्दल आम्हाला माहिती असते. मधल्या काळात मी घर आणि मुलं यांच्याकडे लक्ष देत असताना बराच काळ वेगळं काही काम करत नव्हते. एकदा माहीम भागातून आम्ही एनएसडीचे काही मित्र एकत्र प्रवास करत होतो. एका घरासमोरून जाताना मला नसीर रागाने म्हणाला, ‘मालूम हैं यहा कौन रहता हैं? मराठी की बहुत बडी एक्ट्रेस रहती हैं - सुलभा देशपांडे! और तुम क्या कर रही हो?’ मी याबद्दल बोलताना आता खूप भावूक झाले आहे खरं तर...

नसीर माझा मित्र आहे याबद्दल मला मनापसून कृतज्ञता वाटते त्याचं कारण असं की- कोणत्याही पोटॅन्शिअल असलेल्या माणसाने काहीच करू नये हे त्याला मान्य नाही. त्यामुळे घरातलं माणूस रागवावं अगदी तसा तो मला रागवायचा. नंतर मात्र जेव्हा मी काही ना काही करू लागले किंवा अमृता आता जे काही करते याबद्दल त्याला प्रचंड कौतुक आहे. नसीर आणि माझं बॉन्डिंग खरं तर त्या को-होस्टेलमुळे झालं आणि त्यानंतर नाटक हा आम्हाला जोडून ठेवणारा एक महत्त्वाचा विषय आहे. दोस्ती क्या चीज होती हैं... हे मला नसीर ने शिकवलं आहे.

प्रश्न - नसिरुद्दीन शाह यांना एक माणूस म्हणून आपण तुमच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्यांच्या एनएसडीमधल्या बेधडकपणाबद्दल सांगितलं आणि आजही ते समाजातील आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल तितकंच बेधडकपणे आणि जबाबदारीने वागताना आणि बोलताना दिसतात. याबद्दल तुम्ही काय सांगाल?

 - नसीरमध्ये एक व्यासंगीपणा आहे. त्याला कधीही असं वाटत नाही की मला सगळं कळलं आहे. जरी तो इतका वाचतो, स्वतः इतकं सुंदर लिहितो तरीसुद्धा अधिकाधिक संपन्न जगण्यासाठीची एक आस असणं ही नसीरमधली एक एक्स्ट्रॉ-ऑर्डिनरी क्वालिटी आहे. त्यासाठीच त्याचं आत्मचरित्र आपण नक्की वाचावं असं मी सांगेन. जसं मी आधीच सांगितलं की नसीर हा बेधडक होता... अजूनही आहे. पण... तो तितकाच दिलदारही होता. म्हणजे- नंतर त्याचं त्याला कळाल्यावर तो अगदी तळमळीने येऊन सांगायचं की- ‘अरे यार! मैंने उसको ऐसा  बोल दिया. ऐसा नहीं करना चाहिये था’ समोरच्या माणसाला किती त्रास झाला असावा याकडे तो अगदी समानुभूतीने बघतो. मग आता नसिरुद्दीन शाह या माणसामध्ये एकही दोष नाही का? तर असं कधी होत नाही. प्रत्येकामध्ये गुणदोष हे असतातच. मात्र नसीर स्वतःच्या दोषांवरदेखील अगदी डोळसपणे काम करतो. आपल्या गुण आणि दोष या दोन्ही गोष्टींबद्दल जाणीव ठेवणारा आणि त्यानुसार स्वतःच्या वागण्यात आणि विचारांत सतत बदल करून आपलं जगणं अधिकाधिक समृद्ध आणि उपयोगी करण्याचा प्रयत्न करणारा माणूस म्हणजे - नसिरुद्दीन शाह!

 प्रश्न - अभिनेता किंवा नट म्हणून आपण एका पदावर पोहोचलेलो असतो आणि नावलौकिक मिळवलेलं असतं. हे सगळं असतानासुद्धा आपल्या सभोवताली सुरू असलेल्या गोष्टींबद्दल स्वतःला इतकं संवेदनशील तसंच जाणीवपूर्वक समंजस ठेवणं आणि त्यातून वागणं या बाबतीत नसिरुद्दीन शाह यांच्याबद्दल एक मैत्रीण म्हणून तुम्ही काय सांगाल?

 - तुम्ही जर नसीरच्या आयुष्याचा ग्राफ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, हे ‘सेलिब्रिटी असणं’ किंवा त्यातली रोशनाई ही कधीच त्यानी स्वतःच्या अंगाला लाऊन घेतलेली नाहीये... इतर काही कलाकार मंडळी जशी स्वतःला प्रमोट करतात, कुठे-कुठे दिसतात, वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसतात, तसं नसीरचं नाही. याला तुम्ही कधीही बघा, त्याच्या ठरलेल्या ठराविक साध्या कपड्यांमध्ये तुम्हाला तो दिसतो आणि कधी तरी कुठे बोललाच तर काही तरी सेन्सिबल बोलताना दिसतो. खरं तर, नाटक आणि सिनेमा या क्षेत्राची व्याप्ती इतकी मोठी आहे की, त्यामध्ये स्वतःला नेमकं काय काम करायचं आहे? कुठेपर्यंत करायचं आहे? कशा पद्धतीने काम करायचं आहे? आणि काय कधीच करायचं नाहीये? याबद्दलची क्लॅरिटी असणं फार गरजेचं आहे. केवळ करमणूक करणे, यापेक्षाही माणूस घडवणे अशा अर्थाने या माध्यमांच्या कक्षा फार मोठ्या आहेत हे ध्यानात ठेवून नसीरसारखी काही माणसं या क्षेत्रात काम करतात.

सिनेमा आणि नाटक या दोन्ही क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करणं आणि तेही भारतासारख्या मोठ्या देशात हेच मुळात अतुलनीय आहे. जशा नसीरला बऱ्याच भाषा येतात तशा काही भाषा त्याला फक्त समजतात उदा- मराठी. मराठी भाषा त्याला फार बोलता येत नसली तरी कळते आणि असं असलं तरी मराठी नाटकात काय-काय प्रयोग सुरू आहेत, याबद्दल त्याला परिपूर्ण माहिती आहे. त्याचबरोबर मराठीत महत्त्वाचे लेखक कोण? याकडेही त्याचं लक्ष असतं. दिलीप चित्रे हे नसिरुद्दीनचे चांगले मित्र होते. हमीद दलवाई यांच्यावर ‘हमीद दलवाई - द अनसंग ह्यूमॅनिस्ट’ असा डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट करायचं जेव्हा मी ठरवलं तेव्हा मी नसीरला फोन केला. हमीद दलवाई यांनी लिहिलेली ‘इंधन’ ही ‘फ्युएल’ या नावाने दिलीप चित्रे यांनी इंग्रजीत अनुवादित केलेली कादंबरी आम्ही त्याला वाचायला दिली. काही वेळातच त्याने ती चाळली असावी आणि त्याचा मला फोन आला की, त्याला यात सहभागी व्हायला आवडेल.

इथे एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की, भारतासारख्या देशांमध्ये पुष्कळ नटमंडळी आहेत. उत्तम अभिनय करत असतात, उत्तम पैसे मिळवत असतात, उत्तम स्थानांवर असतात. त्यांना मोठ्या पदव्या मिळतात पद्मविभूषण वगैरे. ज्या नसीरलासुद्धा मिळालेल्या आहेत... आणि मिळायलाही हव्या! तर ही मंडळी आपल्या आसपासच्या समाजाशी कुठेतरी नातं तोडून त्यांच्या स्वतःच्या जगात रममाण असतात. नसीरचं मला हे वैशिष्ट्य वाटतं की, तो सारखा माणसांशी जोडलेला असतो. अगदी तळागाळातल्या माणसांपासून ते प्रस्थापित लोकांपर्यंत तो जोडलेला आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्याशी एक आपला सांधा असतो याबद्दलचं त्याचं भान फार तीव्र आहे. म्हणून तर त्याला हे पटलं की हमीद दलवाई या विषयावरच्या कामात आपणही सहभागी व्हायला हवं.

अशा काही प्रोजेक्टचासुद्धा भाग होणं आणि ते तुम्हाला महत्त्वाचं वाटणं यासाठी माणूस म्हणून खूप जागरूक असावं लागतं. ते जागरूकपण आणि खोलवर रूजलेला कृतज्ञताभाव नसीरमध्ये आहे. एनएसडी असो किंवा एफटीआयआय, तो गेली अनेक वर्षे नव्या पिढीसाठी नाटकाचे, अभिनयाचे वर्कशॉप घेतो. नवीन काहीतरी करू पाहणाऱ्या मुला-मुलींना या क्षेत्रातील चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी चाललेली त्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. तो हे त्याचे कर्तव्य म्हणून करतो. माझ्यासाठी नसीर हा असा आहे...एकदम ‘माणूसपणाने’ भरलेला!

मुलाखत आणि शब्दांकन :

दिपाली अवकाळे, पुणे

deepaliawkale.25@gmail.com
 

Tags: अभिनय सुलभ देशपांडे दिलीप चित्रे इंधन हमीद दलवाई - द अनसंग ह्यूमॅनिस्ट मॉटले प्रोडक्शन एफटीआय द लेसन तीन पैशांचा तमाशा बी.जयश्री ओम पुरी एनएसडी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नसिरुद्दीन शाह इब्राहिम अल्काझी तन्वीर सन्मान रूपवेध प्रतिष्ठान दीपा लागू डॉ. श्रीराम लागू ज्योती सुभाष माणूसपणाने भरलेला नट मुलाखत Motley Production The Fuel Hamid Dalwai FTII stage acting the lesson Dilip Chitre Sulabha Deshpande B Jayashree Om Puri National School of Drama NSD ebrahim alkazi Tanveer Award Rupvedh Deepa Lagu Dr. Shriram Lagu Jyoti Subhash naseeruddin shah interview weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ज्योती सुभाष

मराठी अभिनेत्री आणि रंगकर्मी


प्रतिक्रिया द्या