डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

प्रश्नांची लढाई आणि रचनात्मक दिशा

कार्यकर्ता पुरस्कार (असंघटित कष्टकरी) । निशा शिवूरकर
वयाच्या विशीत त्यांनी पहिल्या राजकीय तुरुंगवासाचा अनुभव घेतला. दलित युवक आघाडी या संघटनेच्या वतीने १९८० मध्ये गायरान जमीन अतिक्रमणाच्या प्रश्नावरील मराठवाड्यातील लढ्यात त्यांचा सहभाग होता. निशातार्इंचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे, ते परित्यक्तांच्या प्रश्नावरचे. सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड व वकिली व्यवसायाचा अनुभव यातून त्यांनी परित्यक्तांच्या प्रश्नावर अभ्यास व काम सुरू केले. अशा प्रकारचे देशातले हे पहिलेच काम. १९८८ साली त्यांच्या पुढाकाराने देशातली पहिली परित्यक्ता परिषद संगमनेर येथे झाली. या परिषदेमुळे समाज व शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले.
 

महात्मा गांधी आणि बुद्धाचा वारसा घेऊन पुढे जाणारी लढाऊ कार्यकर्ती...! आणीबाणीच्या कालखंडापासून कार्यकर्तेपणाचा वसा घेतलेली आणि गेली चार दशके विविध आंदोलनांत लक्षणीय सहभाग घेणारी कार्यकर्ती...! राष्ट्र सेवा दल, दलित युवक आघाडी, समता आंदोलन, समाजवादी जनपरिषद या संघटनांमध्ये काम करत असताना, विद्यापीठ नामांतर आंदोलन, एन्रॉनविरोधी आंदोलन, दुष्काळविरोधी परिषद या कामांमध्ये सहभागी असताना निशातार्इंना परित्यक्त्यांचा प्रश्न सामोरा आला आणि त्यांनी त्यावर अथक काम करून राजकीय-सामाजिक पटलावर या प्रश्नाची दखल घ्यायला लावली. संगमनेरला पहिली परित्यक्ता हक्क परिषद, पुढे परित्यक्ता-मुक्ती यात्रा, औरंगाबादला ५५००० महिलांच्या उपस्थितीत परित्यक्तांच्या प्रश्नांची मांडणी करणारी परिषद आणि आता त्या प्रश्नाचे, चळवळीचे, त्यामागच्या जटिल व्यवस्थेचे जाळे शोधणारे बहुचर्चित पुस्तक ‘लढा टाकलेल्या स्त्रियांचा’.

वंचित, कष्टकरी, असंघटित घटक, अंगणवाडी कर्मचारी, विस्थापित समूहांसाठी मोर्चे, लढे, परिषदा हे सर्व काम करत असताना निशातार्इंनी परित्यक्तांच्या संदर्भात रचनात्मक कामाचीही आखणी केली. सामाजिक प्रश्नांवर काम चालू असतानाच, व्यवस्था-परिवर्तन, राजकीय बदलांचा प्रयत्न आणि त्यासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभाग व नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता, तयारी या गोष्टींचीही नोंद निशातार्इंच्या संदर्भात करावी लागेल. विषमतेच्या आणि भेदांच्या सामाजिक- राजकीय प्रश्नांचे वैश्विक भान असणाऱ्या, प्रत्यक्ष तळागाळातल्या समाजघटकांबरोबर काम करणाऱ्या निशातार्इंनी संवाद, संघटन, संघर्ष व रचना या सूत्राची आणि लोकशाही समाजवादाची बांधिलकी कायम ठेवली आहे.

प्रश्न - निशाताई, सुरुवातीच्या जडणघडणीविषयी, प्रभावाविषयी?

- माझ्या वडिलांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता. तो लढा सशस्त्र होता, पण ते महात्मा गांधींच्या विचारांना अनुसरणारे होते. त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर गांधींचा प्रभाव होता. घरात गांधींचा फोटो होता. वडील लोहियांचे भक्त होते. एकीकडे ते न्यायाधीश म्हणून काम करत होते. आई शिक्षिका होती. राष्ट्र सेवादलाच्या उपक्रमात जात होती. शाखा चालवण्यात भाग घेत होती. माझ्या सुरुवातीच्या जडणघडणीत या सर्व गोष्टींचा वाटा आहे. साधी राहणी, दागिने न वापरणे हे तर होतेच शिवाय अविवेकी कर्मकांडं, उपवास या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या नाहीत. माझ्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला सोळाव्या वर्षी. आणीबाणी लादली गेली. मराठवाडा दैनिकाचे अनंतराव भालेराव आणि बापू काळदातेंना अटक झाली. त्यांच्याविषयी घरात चर्चा चालायच्या. त्या वेळी फॅसिझमच्या विरोधात मानसिकता तयार झाली असावी. जयप्रकाशजींचं संपूर्ण क्रांती आंदोलन, आणीबाणीविरोधात जनमत तयार करणं यात भाग घेण्यासाठी माझी मानसिकता तयार झाली होती. दुर्गा भागवत, एस. एम. जोशी यांची आणीबाणीविरोधातली भाषणं, हुकूमशाहीविरोधी मांडणी समजून घेण्याचा प्रयत्न चालू होता. १९७८ मध्ये जनता पार्टीचं सरकार आल्यावर पार्टीचा प्रचार केला. कार्यकर्तेपणाची सुरुवात झाली. महाराष्ट्रात पुलोद सरकार आलं, परंतु तेव्हा नामांतरवादी आणि नामांतरविरोधी दोन गट झाले. अर्थातच नामांतरवादी गटात मी ॲक्टिव्ह झाले. त्यांच्या मीटिंगा, कार्यक्रम, रस्त्यावरचे मोर्चे वगैरे चालू होते. घरी वातावरण जरी पुरोगामी असलं तरी मध्यमवर्गीय चौकटी होत्याच. कार्यकर्ता म्हणून घडायला लागल्यावर चौकटी तुटायला लागल्या. माझ्या घडणीमध्ये- कार्यकर्ता म्हणून घडणीमध्ये मित्रांचा, चळवळींचा मोठा वाटा आहे.

प्रश्न - मध्यमवर्गीय चौकटी मोडून कार्यकर्ती होण्याचा हा प्रवास कसा?

- एकीकडे मोठ्या करिअरमुळे स्वातंत्र्य मिळेल, या कल्पनेने मी एम.बी.ए.सुद्धा केलं. त्या वेळी तिकडे एम.बी.ए. झालेले मोजकेच होते. मोठ्या पगाराची नोकरी घेता आली असती; पण त्यात रमता येणार नाही याची जाणीव होती. याच काळात जातिव्यवस्थेसंदर्भात वाचन, चिंतन चालू होतं. स्वातंत्र्याची ओढ निर्माण झाली होती. आंतरजातीय लग्नाची जाणीव पक्की होत होती. मध्यमवर्गीय चौकटी तोडण्यासाठी एक राजमार्ग म्हणजे- आंतरजातीय लग्न. चारचौघींसारखं आयुष्य जगायला आवडत नव्हतं. जयप्रकाशजींचे सप्तक्रांतीचे स्वप्न त्यातील जाती तोडणे आणि पारंपरिक स्त्री-पुरुष संबंधांत बदल करणे या गोष्टी अमलात आणायची ओढ निर्माण झाली. मध्यमवर्गीय घरातलं स्वातंत्र्य फक्त पेल्यातल्या पाण्यात पोहण्याचं होतं. नामांतर आंदोलनात प्रत्यक्ष लढाईत सहभागी झाल्यावर पूर्वीच्या चौकटी तुटून पडल्या. राष्ट्र सेवादलात शिवाजी गायकवाड याच्याशी ओळख झाली. मी मध्यमवर्गीय घरातली, तर शिवाजी शेतकरी कुटुंबातून आलेला. शिवाजी आणि मी लग्न केल्यानंतर, आम्ही माझी मध्यमवर्गीय चौकट आणि त्याच्या शेतीव्यवस्थेच्या चौकटीतून निर्माण होणाऱ्या स्त्री-पुरुष संबंधांच्या टाइप्समध्ये अडकलो नाही. आम्ही एक समतावादी कुटुंब निर्माण करायचा प्रयत्न केला. स्त्रीपुरुष समतेकडे दोघांचा एकत्रित प्रवास झाला. कार्यकर्ती म्हणून मी खूप काळ देऊ शकले, कारण घरातील जबाबदाऱ्या आणि मुलगा नदीमचे संगोपन हे शिवाजीने केले. आमचे कुटुंब स्त्रीवादी राहिले आणि माझ्या सार्वजनिक कार्यासाठी बळ देणारे ठरले. मुलगा नदीम हादेखील स्त्री-पुरुष समतेचा सहभागी बनला. त्याच्या स्वतंत्र कुटुंबात तो आता समतेचा वाहक ठरतो आहे.

प्रश्न - कार्यकर्त्यांची वैचारिक घडण महत्त्वाची असते का? तुमची वाटचाल कशी?

- संघटना, चळवळी, शिबिरं यांचा मोठा वाटा आहे आम्हा कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये. विनायकराव कुलकर्णींची शिबिरं ऐकली. त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात आम्ही घोळका करून जायचो. त्यांची मांडणी तासन्‌तास ऐकायचो. त्यांच्यामुळे ज्ञानी असण्याचं, तर्कशुद्ध विवेचनाचं आकर्षण निर्माण झालं. एखादी गोष्ट समजली नाही तरी शोधत राहिली पाहिजे याची जाणीव झाली. स्वत:ची ओळख आणि समाजाला समजून घेणे, हा समांतर प्रवास एकाच वेळी होत होता.

‘सत्याचे प्रयोग’ अनेकदा वाचले. एखाद्या प्रसंगी आता काय करायचे, असा प्रश्न पडला की वाचते. उत्तर सापडते म्हणून नाही, तर उत्तर शोधायला मदत होते. जातीय दंगलींच्या काळात कसोटीच्या अनेक वेळा आल्या. अल्पसंख्यांक समाजाबरोबर उभे आहोत म्हणून आरएसएस इ.नी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. माझ्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा गुण मला जाणवतो, तो म्हणजे निर्भयता. कोणत्याही परिस्थितीत कशालाही मी घाबरत नाही. अशी परिस्थिती येते, तेव्हा आतल्या सर्व यंत्रणा कार्यान्वित होतात. ही १००टक्के गांधीजींची देणगी; गांधींना अनुसरणं. ‘सत्याचे प्रयोग’ वाचताना प्रश्नांची उकल करण्याचा मार्गही सापडत जातो. आता परित्यक्तांच्या जीवनात वैवाहिक नात्याचे गुंतागुंतीचे प्रश्न दिसतात. त्या वेळी जाणवतं की महात्मा गांधी आणि कस्तुरबांचं समंजस नातं कसं तयार होत गेलं. दोघांनीही त्या नात्याचा कसा स्वीकार केला...

प्रश्न - जनतेच्या प्रश्नांशी जोडून घेण्याची कृतीशीलता, संवेदनशीलता वैयक्तिक-सामाजिक पातळीवर कशी प्रत्यक्षात आली?

- जातिव्यवस्थेने, जातिभेदाने ग्रासलेल्या समाजात वावरताना दोन उद्दिष्टं ठेवली होती. आंतरजातीय लग्न आणि ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचे सगळे संस्कार नाकारणं. डी-कास्ट होण्याचा प्रवासही त्यातून सुरू झाला.

नामांतर प्रश्नातील, चळवळीतील सहभागाच्या मुद्द्यावरून मी व अरुण ठाकूर सेवादलातून तुटून बाहेर पडलो. ‘दलित युवक आघाडी’त काम चालू केले. त्या कामाने मला शहाणे बनवले. उन्हातान्हात, कसेही, कधी मिळेल त्या वाहनाने खूप फिरायचो. मैलोन्‌मैल चालणं व्हायचं. मिळेल तिथे जेवायचं, राहायचं. बीडमध्ये गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा संघर्ष किंवा मांगवडगाव भागात सामूहिक शेतीचा प्रयोग. बीडला, औरंगाबादला मोर्चे निघायचे. चळवळीला यश यायचं.

रंभापुरा झोपडवस्तीत एक खोली घेऊन अरुण ठाकूर, प्रकाश शिरसाठ तर अधून-मधून भीमराव जाधव कम्यूनसारखे राहायचे. त्या कम्यूनमध्ये मी दाखल झाले. आम्ही एकत्र स्वयंपाक, व्यवस्थापन करायचो. जे असेल ते सर्वांनी वाटून खायचं. एखाद्याकडे पैसे नसले तरी त्याला सामावून घ्यायचं. त्याच काळात पथनाट्यात, वैचारिक नाटकात काम करत होते. ‘थांबा, रामराज्य येतंय’ याचे बरेच प्रयोग व्हायचे. प्रयोगानंतर मीटिंगा, चर्चा... दिवस एकदम जोशात जायचे.

रंभापुरा परिसरात प्रश्नांचं जवळून दर्शन घडलं. जळालेली बाई पहिल्यांदा पाहिली. नवरा दारूबाज. ती काही वाचली नाही. तेव्हा कुठे तरी स्त्रियांची परिस्थिती, प्रश्न याची धग जाणवायला सुरुवात झाली. आम्ही संगमनेरला आलो. त्यानंतर सेवादलातून बाहेर पडलेल्या मंडळींनी- महमंद खडस, गजानन खातू, संजीव साने, संजय मं. गो., अरुण ठाकूर, शंकर शिंदे, मनोहर कदम, आम्ही दोघं- या सर्वांनी १९८३-८४ मध्ये ‘समता आंदोलन संघटना’ स्थापन केली. ही संघटना उत्साही कार्यकर्त्यांचं मोहोळ होतं. एकजिनसीपणा होता, सामूहिक नेतृत्व होतं, निर्णयही सामूहिक व्हायचे. ठाण्याला सफाई कामगारांचे प्रश्न, नाशिकला शिक्षणाची लढाई, संगमनेरला दुष्काळ, शेती असंघटित कष्टकरी, विद्यार्थी, धार्मिक तेढ आदी प्रश्नांवर काम चालायचं. दिशा मात्र एकच- लोकशाही समाजवादाची होती. संगमनेरला आल्यावर पहिलं आंदोलन बलात्कार झालेल्या एका कामगार स्त्रीसाठी झालं. तिच्याबरोबर राहिलो. मोर्चे, निदर्शनं, नगरला सेशन कोर्टात जाणं. त्या वेळी लक्षात आलं की, या प्रश्नांसाठी आपण नेतृत्व केलं पाहिजे. त्यासाठी वेळ देणं, तयारी करणं हे आलंच. जातीय दंगली व्हायच्या. तेव्हा काम करताना दोघांना अनेकदा धमक्या मिळायच्या, रस्त्यात अडवलं जायचं. पण दोन्ही समाजांतली सामान्य माणसं बरोबर असायची. मुस्लिम समाजाचा मोठा सपोर्ट असायचा. शांततेसाठी प्रयत्नांना यश मिळत गेलं. कर्फ्यूमध्येही आम्ही शांतता फेरी काढली. नंतर म्हणजे, १९८४-८५ नंतर संगमनेरात दंगल झाली नाही. दंगलमुक्त संगमनेर म्हणता येईल.

प्रश्न - महिलांचे प्रश्न, कष्टकरी, असंघटित आणि नंतर परित्यक्तांचे प्रश्न कसे सामोरे आले? त्यांचे संघटन,संघर्ष कसा?

- संगमनरेच्या आसपासच्या गावांमधले महिलांचे प्रश्न समोर येत गेले. असंघटित क्षेत्रातल्या महिलांचे प्रश्न मोठे आहेत. अत्यंत कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी स्त्रियांच्या समस्या जाणवल्या. १९८५ च्या आसपास साथी बा.न.राजहंस आणि मी ‘अंगणवाडी सभा’ या संघटनेची सुरुवात केली; तेव्हा त्यांच्यासाठी ही महाराष्ट्रातली पहिलीच संघटना असावी. केंद्र आणि राज्य सरकार दोघेही या कर्मचारी महिलांची जबाबदारी झटकत होते. ती जबाबदारी त्यांनी घेण्यासाठी आम्ही आंदोलने केली. मानधनधारकांना नंतर निवृत्तिवेतन मिळावे यासाठीचे आंदोलन यशस्वी झाले. त्यांना कामात सुरक्षितता मिळाली. आता तर महाराष्ट्रात लढाऊ महिला म्हणून त्यांची ओळख आहे. अन्यायाच्या विरोधात जे समाजघटक लढत आहेत, तेवढ्याच तडफेने या महिलाही लढत आहेत. आंदोलनांमुळे या कर्मचारी महिला लढाऊ, व्यापकरीत्या संघटित होण्यासाठी मदत झाली. त्या वेळी दुष्काळ हा भयंकर मोठा प्रश्न होता. दुष्काळाच्या कामावर फिरताना पहिल्यांदा परित्यक्तांचा प्रश्न समोर येऊ लागला. रोजगार हमी कामावर आई- वडील, मुली यायच्या. वकील झाल्यावर न्यायालयात जायला लागले, तेव्हा नवऱ्याने टाकलेल्या मुली आवारात खाली मान घालून बसलेल्या दिसायच्या. आपल्या समाजात परित्यक्तांची संख्या मोठी आहे. त्यांचे प्रश्न जटिल आहेत. आपल्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक व आर्थिक व्यवस्थेत या प्रश्नांची मुळं आहेत. परित्यक्तांचा प्रश्न समाज व सरकारपर्यंत पोचवण्याचा निर्णय घेऊन काम सुरू केलं. पाहणीमध्ये वेगवेगळ्या जाती, धर्म व वर्गातील स्त्रियांच्या वाट्याला आलेलं नाकारलेपण स्पष्ट दिसू लागलं. दि. २० मार्च १९८८ रोजी संगमनेरला देशातील पहिली ‘परित्यक्ता परिषद’ समता आंदोलनाने घेतली.

या परिषदेत ‘अर्धांगिनीला अर्धा वाटा मिळालाच पाहिजे’ आणि ‘जिथे जळते बाई तिथे संस्कृती नाही’ या घोषणा दिल्या गेल्या. पुढे मोर्चे, सभा या टप्प्यांवरून आंदोलन चालू राहिले. दि. १० मार्च १९९१ नंतर महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांमधून, जिल्ह्यांमधून ‘परित्यक्ता मुक्तियात्रा’ काढली. यात्रेचा समारोप करताना आझाद मैदानावरून विधानसभेवर मोर्चा नेला. ‘टाकलेल्या बायकांचा मोर्चा’ ही परिवर्तनाच्या चळवळीतील महत्त्वाची घटना ठरली. दि. ३० जानेवारी १९९४ रोजी औरंगाबादला राज्यव्यापी परित्यक्ता हक्क परिषद घेतली. ३० जिल्ह्यांतून ५५,००० महिला आणि पुरुष परिषदेसाठी आले. या अथक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचं दि. २२ जून १९९४ ला पहिलं महिला धोरण जाहीर झालं.

प्रश्न - रचनात्मक कामाची दिशा...?

- परित्यक्तांच्या प्रश्नांची लढाई लढताना- मोर्चे, संघर्ष चालू असताना स्त्रियांच्या जगण्यासाठी, स्वतंत्र जीवन जगण्यासाठी रचनात्मक कामाची दिशा महत्त्वाची आहे. पर्याय आपण निर्माण करत राहायला हवेत. या विचारातून परित्यक्ता आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ‘समता महिला पतसंस्था’ संगमनेरला मार्च १९९३ मध्ये स्थापन झाली. ४३८ सभासद आणि ४६३५० रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेल्या या संस्थेच्या ठेवी १४-१५ च्या आर्थिक वर्षात १ कोटी ५७ लाख रुपयांवर पोहोचल्या होत्या. कोणतंही बाह्य कर्ज न घेता सभासद महिलांच्या पैशांवर ही संस्था उभी राहिली. शिलाई मशिन, भाजी विक्री, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, घरात गॅस घेणे, आरोग्याचा खर्च इ.साठी कर्ज देण्यात आलं आहे. यातून अनेक महिलांनी मुला-मुलींचं शिक्षण पूर्ण केलं. वाहन-जमीन खरेदी केली, हक्काचं घर घेतलं. सभासद महिला स्वावलंबी होऊ शकल्या.

प्रश्न - ‘लढा टाकलेल्या स्त्रियांचा’ हे पुस्तक म्हणजे परित्यक्तांच्या प्रश्नांचा व्यापक वेध घेणारा दस्तावेज ठरला आहे. त्या मांडणीची गरज का जाणवली?

- कोणताही प्रश्न सुटा नसतो. प्रश्न, समस्या, त्यांची उगमस्थाने सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्थेत असतात. चळवळी स्थानिक पातळीवर उभ्या राहिल्या तरी त्यामागचं व्यवस्थेविषयीचं व्यापक भान सुटता कामा नये. लोकशाही समाजवादी विचारांची बांधिलकी महत्त्वाची आहे. या बांधिलकीमुळे आजूबाजूच्या घटनांकडे पाहण्याची दृष्टी मिळते. म्हणून पुस्तकमांडणी करताना लढ्याचं दस्तावेजीकरण, संघर्षाची नोंद याचबरोबर हे प्रश्न ज्या पितृसत्तेतून-पुरुषसत्तेतून तयार होतात, त्या सत्तेचा शोध घेणंसुद्धा एक प्रयत्न आहे. आणि स्त्री-पुरुष संबंध, सहजीवन, समता यांचा विचार मांडण्याची धडपड आहे.

‘महात्मा फुले-सावित्रीबाई’, ‘महात्मा गांधी- कस्तुरबा’ या व्यक्ती पारंपरिक व्यवस्थेतून येऊनही त्यांनी विषमतेच्या मर्यादा ओलांडल्या. आपल्याकडे व्यक्तिपूजा मोठी असते, पण व्यक्तींचे आदर्श मात्र स्वीकारले जात नाहीत. कुटुंबसंस्था, विवाहसंस्था यांची गरज आहेच, पण या प्रक्रियेत लग्नानंतर कसे जगायचे याची काहीच पायाभरणी नाही. परित्यक्तांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या लैंगिक प्रश्नांची मांडणीही गरजेची आहे. लैंगिक सुखापासून परित्यक्ता वंचित राहतात. कामजीवनातले मौन आणि ढोंग यांचे वाईट परिणाम होतात. आमच्या चळवळीचं वैशिष्ट्य म्हणजे या लढाईत पुरुषांचा मोठा सहभाग राहिला आणि ही चळवळ धर्मनिरपेक्ष राहिली. सर्व जाती-धर्मांतल्या स्त्रियांचा सहभाग, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले.

‘लढा टाकलेल्या स्त्रियांचा’ या पुस्तकात परित्यक्ता आंदोलनाचा वेध आणि स्त्री-पुरुष समतेचा शोध हे दोन्ही महत्त्वाने मांडण्याचा प्रयत्न आहे. चळवळीमुळे सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्थेला या प्रश्नाची दखल घ्यावी लागली. पुस्तकाचीही दखल सर्व स्तरांवर घेतली गेली. पुस्तकाला विविध पुरस्कार मिळाले. केसरी-मराठा संस्थेचा न. चिं. केळकर ग्रंथोत्तेजक पुरस्कार, सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कार, राज्य शासनाचा डॉ. आंबेडकर पुरस्कार इत्यादी.

प्रश्न - तिहेरी तलाकसंदर्भात सत्ताधारी पक्षाने जे विधेयक मांडले आहे, त्याबद्दल काय सांगता येईल?

- जुबानी तलाक बंद झाला पाहिजे. दि. २२ ऑगस्ट २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जुबानी तलाक बंद करण्याचा निर्णय दिलेला आहे. हिंदू व्होट बॅक समोर ठेवून तो कायदा केला जात आहे. मुस्लिम स्त्रियांना संरक्षण देण्याच्या नावाने मुस्लिम पुरुषांना लक्ष्य करण्यात येत आहे. भारतातले वैवाहिक कायदे हे दिवाणी स्वरूपाचे, पण हा कायदा मात्र फौजदारी स्वरूपाचा केला जातोय. जुबानी तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे. एका बाजूने देशभरामध्ये हिंदू समाजातील लक्षावधी परित्यक्तांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, त्यासंबंधी बोलायला शासन तयार नाही. बायको टाकणारा हिंदू पुरुष देशात पंतप्रधान होतो आणि दुसरीकडे बायको टाकली म्हणून मुस्लिम पुरुषांना मात्र तुरुंगात टाकले जाते, हा प्रचंड विरोधाभास.

प्रश्न - शबरीमाला मंदिरातील महिलांचा प्रवेश हा वाद सध्या चर्चिला जातोय. त्याविषयी काय वाटतं?

- भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्था याची एक रचना देशामध्ये आहे आणि तिला नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनानंतर देशात सामंजस्याचं आणि प्रगतिशील वातावरण तयार झालं होतं, ते वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध रीतीने होतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला प्रकरणात ‘सर्व वयोगटांतील स्त्रियांना मुक्त प्रवेश’ असा निर्णय दिल्यानंतर, त्याच्या विरोधात भाष्य करून सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष न्यायालयाला व्यवहारी पद्धतीने निकाल देण्याचे जाहीरपणे सांगतात. एकीकडे मंदिरप्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानायचा नाही आणि दुसरीकडे मुस्लिम स्त्रीला तलाकपासून वाचवण्याची भूमिका घ्यायची, हे एक षडयंत्र आहे.

प्रश्न - आर्थिक आव्हानांशी सामना कसा...?

- १९९० नंतर आलेल्या जागतिकीकरण धोरणामुळे विषमता वाढत गेली आहे. विकासाची जी मॉडेल्स उभी केली, त्यामुळे पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले. विकासासाठी विस्थापन आणि विस्थापनाचे बळी आदिवासी-शेतकरी व बहुजनवर्ग. राजकीय पटलावर विस्थापितांसाठी काहीही धोरणे, प्रयत्न नाहीत. दारिद्र्य प्रचंड वाढत चाललंय. गरिबी-श्रीमंती यातलं अंतर खूप वाढलंय. समतेशिवायची समृद्धी ही विनाशाकडेच नेणारी असते. चंगळवाद, व्यक्तिकेंद्रितता वाढते आहे आणि गरिबांविषयी कळवळा, करुणा संपत चालली आहे. उथळ, बेगडी उत्तरांमुळे काहीही बदल घडत नाहीत. प्रश्नांच्या मुळांपर्यंत जाऊन ते समजून घेणं, शोषण लक्षात घेणं, आपणही शोषक असतो हे लक्षात घेतलं जात नाही. बहुजन समाजात वाढलेली बेरोजगारी, वाढता भणंगपणा याची उत्तरंसुद्धा आर्थिक आरक्षणासारख्या भ्रामकतेत शोधली जातात. आजच्या काळात असंघटितांचे वर्ग वाढायला लागलेत. त्यांच्या प्रश्नांसाठी चळवळी तीव्र कराव्या लागतील. शिकलेल्या समाजात बधिरपणा वाढीस लागलाय. आज मोठं संकट आहे, ते धर्मांध राजकारणाचं. द्वेषाचं वातावरण फैलावलं जातंय. सर्व समूहांमधला परस्परसंवाद कसा वाढेल, यावर काम करावे लागेल.

प्रश्न - आजघडीला कोणती आव्हानं दिसतात?

- आजच्या माझ्या विचारप्रक्रियेचा मोठा भाग महात्मा गांधी आणि तथागत गौतम बुद्ध यांनी व्यापला आहे. हिंसेला प्रतिष्ठा मिळणे, हिंसेने प्रश्न सोडवणे, हिंसा हा राजकारणाचा-समाजकारणाचा भाग बनणे याचं उत्तर महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध देऊ शकतात. कारण त्या दोघांनीही माणूस घडवण्याचा प्रयत्न केला. या देशाने आणि जगाने त्यांना ज्या पद्धतीने स्वीकारलं, ते महत्त्वाचं आहे. गांधी आणि बुद्ध दोघांनी मध्यममार्ग स्वीकारला. आजच्या परिस्थितीत हा मध्यममार्ग काय असेल, तो शोधावा लागेल. आता मी केवळ समाजवादी असणं पुरेसं नाही; त्याचबरोबर या देशातली जी उदारमतवादी, सहिष्णू अशी मिश्र संस्कृती आहे, त्या परंपरेतील मी कार्यकर्ती आहे. ही परंपरा बुद्ध, कबीर, गुरू नानक, सुफी संत, बसवेश्वर आणि देशभरातली संतपरंपरा आहे. त्या प्रवाहाचा वारसा पुढे नेणं हेच या प्रश्नाचं उत्तर असावं.

(संवादक : मीनल सोहोनी)

Tags: ladha takalelya striyancha interview mulakhat parityaktya chalaval minal sohoni nisha shivurkar neesha shivurkar asanghatit kashtakari karyakarta purskar Maharashtra foundation awards 2018 Maharashtra foundation purskar 2018 लढा टाकलेल्या स्त्रियांचा परित्यक्त्या चळवळ मिनल सोहोनी मुलाखत निशा शिवूरकर कार्यकर्ता पुरस्कार (असंघटित कष्टकरी) महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार २०१८ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

निशा शिवूरकर
advnishashiurkar@gmail.com

राजकीय, सामाजिक कार्यकर्त्या आणि लोकशाही समाजवाद पक्षाच्या ॲडव्होकेट


प्रतिक्रिया द्या