डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

कार्यकर्ता पुरस्कार (सामाजिक प्रश्न)। मतीन भोसले

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मतीन भोसले यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय ‘प्रश्नचिन्हं’ नावाची आदिवासी आश्रमशाळा सुरू केली. तुराट्याच्या भिंती उभ्या करून शाळा सुरू केली. आर्थिक दैनावस्था, गरिबी, दारिद्य्रात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीत खितपत पडलेल्या कुटुंबातील भटक्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं विधायक कार्य या शाळेच्या माध्यमातून भोसले करत आहेत. या शाळेत मुलांच्या राहण्या-खाण्याची सोयही करण्यात आली आहे. केवळ आपण आणि आपल्या कुटुंबातच अडकलेल्या प्रत्येकाच्या जगण्यावर प्रश्नचिन्हं निर्माण करणारी ही शाळा जगणार आणि वाढणार कशी? हाच एक प्रश्न आहे!

एकदा कार्यशाळेध्ये मतिन भोसले याच्याविषयी ऐकलं. पारधी समाजाच्या मुलांसाठी तो शाळा चालवतो. मुलं शाळेत यावीत आणि टिकावीत, यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतो. शाळेच्या परिसरात शिकारीचं वातावरण केलं आहे. प्रसंगी मुलांना खर्रा, दारू दिली जाते, इत्यादी. मतिनला भेटण्याची व शाळा बघण्याची मला ओढ लागली होती. आम्ही एक-दोन मुलांना सांभाळताना दमून जातो. मतिन साडेचारशे मुलांचा बाप झालाय, हे मी शाळेला भेट दिल्यावर दिसलं.

ही कुठनं कुठनं गोळा केलेली मुलं उघड्या माळावरची, जंगलात भटकणारी, उघडी-नागडी. कोणाला आई नाही, तर कोणाला बाप नाही. कोणाला दोघंही नाहीत. कोणाचे आई-बाप जन्मठेप भोगत आहेत. भीक मागणारी, भटकणारी ही मुलं एका ठिकाणी थांबवणं, हेच मोठ दिव्य होतं. महात्मा फुले यांनी स्त्रिया आणि मागास समाजातील मुला-मुलींसाठी शाळा सुरू केल्या, परंतु आजही माणूस असून माणसांत नसणारा समाज आहे. या समाजाला माणसांत आणायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे मतिन भोसलेंनी ओळखलं.

घरच्यांचा विरोध, समाजाचा विरोध. अंग टेकण्यापुरती जागा सोडली, तर दुसरा आधार नाही आधार होता नोकरीचा. प्राथमिक शिक्षकाची नोकरी. सुखाची नोकरी. हे सुख नाकारण्याचं, प्रश्नांच्या वणव्यात झोकून देण्याचं धाडस मतिन भोसले यांनी दाखवलं. शाळेचं नावही ‘प्रश्नचिन्ह आश्रमशाळा. हातात प्रश्नचिन्ह घेऊन मतिन भोसलेंना व्यवस्थेशी झगडावं लागलं. मुलांच्या शिक्षणासाठी ‘भीक मांगो’आंदोलन करावं लागलं. आजही अनंत प्रश्न आहेत. आजही झगडणं सुरू आहे. किती काळ झगडावं लागणार आहे, माहीत नाही. मदतीचे हात पुढे येत आहेत. स्वत:ची ऊर्जा आणि डॉ. प्रकाश आमटे, अनिल किंगरे यांची साथ, मदतीचे हात या जोरावर हातात प्रश्नचिन्ह घेऊन मतिन भोसले यांचा प्रवास सुरू आहे.

प्रश्न - तुमचा जन्म पारधी कुटुंबात झाला. शिकून तुम्ही शिक्षक झालात, तुमचं बालपण आणि शाळेतला प्रवेश याबद्दल काय सांगाल?

- बालपण शिकार शोधण्यात, जंगलात हिंडण्यात गेलं. जंगलात राहायचो, शिकार करायचो. शिकार सापडली नाही की उपाशी राहायचं. एकदा उपाशी होतो म्हणून जंगलात पडलेली सडलेली बेलफळं खाल्ली. उपासमार कायमच व्हायची. आम्ही उपाशी होतो. पोरं जगली पाहिजेत, म्हणून वडिलांनी ज्वारीची चार कणसं चोरली. कणसं चोरल्याची शेतकऱ्यानं फिर्याद दिली. बंदुका घेऊन पोलीस आले. वडिलांना पकडलं. तीन महिन्यांची सजा झाली. वडील तुरुंगात होते. त्यांच्याबरोबर पारधी समाजाचे आणि इतर कैदी होते. तिथल्या कैद्यांनी सांगितलं की, पोरांना शिकवा. मी सात वर्षांचा असताना मला पहिल्या वर्गात दाखल केलं. माझ्याबरोबर आणखी तिघांना दाखल केलं होतं. नऊ मुलांना परत घालवलं. कारण ‘ही पारध्यांची मुलं आमच्या मुलांना मारतील, चोऱ्या करतील.’ माझ्याबरोबरीची इतर मुलं शिकली नाहीत. आम्हाला शाळा म्हणजे जेल वाटायचं. एकदा शाळेतून बाहेर बघितलं, तर लावा दिसला. लावा पकडायला शाळेतून पळून गेलो. घोडी शोधली. तिचे केस उपटून फांदा तयार केला. लाव्याची शिकार केली. लावा भाजून खाल्ला.

प्रश्न - शाळेला दररोज जात होता काय?

- नाही. कधी तरी जायचो. जंगलात पळून जायचो. वडील मारून परत शाळेत घालवायचे. चौथ्या वर्गापर्यंत कधी तरीच शाळेत जायचो. ढक्कल पास होऊन तिसरीपर्यंत शिकलो. चौथीत नापास. मी शिक्षकांना तितर, बटेर, मध द्यायचो. शिक्षकांनी ‘तुमचा मुलगा शाळेत येऊन नाय ऱ्हायला’ असं म्हणून वडिलांजवळ ओरडलं नाय पाह्यजे, पटावर हजेरी लावली पाह्यजे, पास केलं पाह्यजे असं वाटायचं. शाळेत गाणी शिकवलेलं तेवढं आठवतं. झिंबड पावसात गारांची बरसात... गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे...

पाचव्या वर्गापासून कनिष्ठ महाविद्यालय- मंगरूळ चव्हाला इथं शिकायला गेलो. सहाव्या वर्गात असताना खिशात घोडीचे केस होते. बेंचच्या डेस्कमध्ये हात घालून लावा पकडायचा फांदा करत होतो. सर गणित शिकवत होते. त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, ‘सातचा पाडा बोल रे पारध्या.’ त्यांच्या हातात दांडू होता. मला मारझोड केली. फांदा त्यांच्या कानात अडकला. रक्त आलं. कानाची शिकार झाली. तक्रार वडिलांपर्यंत गेली. ‘तुच्या मुलानं कानाची शिकार केली.’ वडील सरांच्या पाया पडले. मला मारलं. ‘याला कितीबी मारा’ म्हणाले. ‘फकस्त हात-पाय तुटला नाय पाह्यजे. आंधळा झाला नाय पाह्यजे.’ त्यांनी शिक्षकांना मुरुडाच्या शेंगा दिल्या. औषधी पाला दिला. त्यांना औषधी वनस्पतींचं ज्ञान होतं. ‘माझ्या मुलाला सांभाळून घ्या’ म्हणाले. नंतर तीन महिने शाळेत गेलो नाही. लिंगवानच्या जंगलात मामाचं बिऱ्हाड होतं, तिकडे गेलो. झाडाखाली पाल ठोकलं होतं. पळसाच्या पानाचं छप्पर. मामाबरोबर तिथं राहिलो. पंधरा ऑगस्टला झेंडावंदनलाही गेलो नाही. तीन महिन्यांनी शाळेला जाऊ लागलो. शेजे सर, वरघट सर, नांदेडकर मॅडम शिकवायला होत्या. शिक्षकांच्या मुलांबरोबर दोस्ताना केला. शिक्षक त्यांना भजन शिकवायचे. तबला शिकवायचे. नांदेडकर मॅडम कृतियुक्त गाणी शिकवायच्या- बलसागर भारत होवो...विश्वात शोभूनी राहो।.... फुलपाखरू छान किती दिसते,फुलपाखरू। या वेलीवर त्या वेलीवर...

(गाण्यांचा उल्लेख आला की मतिन विद्यार्थ्यांच्या उत्साहाने गात होते.)

प्रश्न – तुमचे त्यावेळचे शिक्षक तुम्हाला भेटतात का? त्यांना तुमच्याबद्दल आता काय वाटतं?

- हो, भेटतात. माझ्या शिक्षकांना माझा अभिमान वाटतो. मी ज्या वरघट सरांच्या कानाची शिकार केली, त्यांनाही आनंद होतो. ‘आम्ही सारे कार्यकर्ता’ हा पुरस्कार स्वीकारताना माझे शिक्षक आणि नांदेडकरबाई होत्या. माझी कहाणी ऐकून ते रडत होते.

प्रश्न - इतर मुलं आणि तुम्ही- काय फरक जाणवायचा?

- इतर मुलं एकोप्याने राहायची, आपण का राहू शकत नाही? शेजेसरांच्या मुलांबरोबर असायचो, ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ भजन म्हणायचो. अर्धं पारधी, अर्धं मराठी. ‘अनेक आमच्या भाषा, अनेक आमचे वेश। ही एकच आमची भारतमाता, एकच आमचा देश हो।’ आमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र नव्हतं. आमचा राहण्याचा ठावठिकाणा नाही. एक गाव नाही. जन्माच्या, जातीच्या नोंदी नाहीत. त्यामुळं जातीचे दाखले नव्हते. योजना असूनही लाभ घेता येत नव्हता. एस.टी.च्या मुलांना शाळेत तांदूळ मिळायचा, पण दाखला नसल्यानं पारध्यांच्या मुलांना तांदूळ मिळत नव्हता. म्हणून नवव्या वर्गात असताना मी रस्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर आर.आर. पाटलांनी निर्णय घेतला, मग जातीच्या प्रमाणपत्राशिवाय तांदूळ मिळू लागला.

प्रश्न - नववीच्या वर्गात असताना आंदोलन करणं कसं जमलं?

- दिव्य सदन सोशल सेंटर- वडारी या ख्रिश्चन संस्थेत मी जात होतो. तिथं प्रशिक्षण असायचं. दर शनिवारी रविवारी जायचो. तिथं साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकले. अन्यायाविरुद्ध लढाई करायची, हे शिकलो. दहावी पास झालो. सीआरपीएफ चाचणी २००१ मध्ये दिली. भालाफेक, गोळाफेक- सगळ्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला. निवड झाली. ट्रेनिंगमध्ये बंदूक चालवताना खांद्याला धक्का बसला. जोरात लागलं. पळून आलो. सीआरपीएफचे पोलीस शोधत गावाकडे आले. मी वडिलांबरोबर रानात काम करत होतो. वडील म्हणाले, ‘सोन्याचं नाणं दिलं तरी मुलाला पाठवणार नाही.’ वडिलांचं बयान लिहून घेतलं, नोकरी नको.

प्रश्न - मग पुढे काय केलं?

- जिल्हा परिषदेकडे अनट्रेंड शिक्षक भरती निघाली. मी बारावी पास झालो होतो. ६२ टक्के गुण मिळाले होते. शिक्षकाची नोकरी मिळाली. मेळघाटमध्ये लवादा येथे शिक्षक म्हणून काम केलं. नोकरी करत सेवांतर्गत डी. एड्‌. पूर्ण केलं. दोन वर्षांनंतर मंगरूळ चव्हाळा इथं बदलीनं आलो. समाजाच्या कामासाठी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वेळ देऊ लागलो. नवव्या वर्गात आंदोलनाचं बाळकडू मिळालं होतं. निवेदन देणे, जामीन मिळवणे, अडचणीत असणाऱ्यांना मदत करणे सुरू होतं. लोक जोडले जात होते. पारधी समाजाचा मेळावा घेतला. विदर्भातील नऊशे-हजार लोक मेळाव्याला आले. कृष्णप्रकाशसाहेब एस.पी. होते. त्यांना बोलावलं होतं. परपुरुषानं मारलं म्हणून परसंता पवार नावाच्या महिलेला पंचांनी २०१० मध्ये समाजातून बहिष्कृत केलं. पंधरा दिवस वस्तीबाहेर पिंपळाच्या झाडाखाली ती बसली होती. तेव्हा मी पत्रकार बोलावले, मानवी हक्काची भीती दाखवली. मलाही महिनाभर बहिष्कृत केलं. त्या वेळी माझे भाऊ, कार्यकर्ते माझ्या पाठीशी राहिले. (त्या संपूर्ण प्रकरणाची हकीगत साधनात अशोक पवार यांनी एका लेखात सांगितली आहे.)

लातूरमध्ये पोलिसांनी पारधी महिलांना कस्टडीत ठार मारलं. ‘लुगड्यानं फाशी घेऊन मरण पावले’ असं सांगितलं. पारधी कधी आत्महत्या करत नाहीत, लोकांना मारतात. आम्ही अगोदरच मेलोय, जिवंत असून मेलोय.

बुलढाणा रूटवर दरोडा पडला होता. पोलिसांना खरे दरोडेखोर सापडले नाहीत. रामोशी टोम्प्या चव्हाण आणि त्याची बायको पहाटे शिकारीला चालले होते. पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या गाडीतून पोलीस चालले होते. त्यांनी शिकारीचं साहित्य, पकडलेले तित्तर यासह दोघांना अटक केली. त्यांना लाईफ सजा झाली. एक आठ आणि एक दहा वर्षांचा मुलगा होता. त्यांच्या काकांनी त्यांची जबाबदारी घेतली. ते वडाळा जंगलात राहत होते. खेकडे, मासळ्या पकडण्यासाठी तिघे नाल्यामध्ये शिरले. अचानक पाण्याचा लोंढा आला. तिघेच्या तिघे वाहून गेले. एका शेतकऱ्याच्या लक्षात आलं. बाभळाची फांदी हाताला लागल्याने काका वाचला होता. बेशुद्ध पडला होता. मुलं मातीखाली गाडली गेली होती. महिन्यानंतर प्रेतं सापडली. दफन केली. मला सहन झालं नाही. लगेच १ ऑगस्ट २०१० पासून तीन महिन्यांची बिनपगारी रजा टाकली. घरच्यांना कोणाला माहिती दिली नाही. मग बेडे शोधले, तांडे शोधले. रेल्वेस्टेशन शोधले. भंगार गोळा करणारी मुलं, सिग्नलवर भीक मागणारी मुलं, नागपूरचं यशवंत स्टेडियम, मुंबईचे दादर रेल्वे स्टेशन, चेन्नई, झारखंड इथं मुलं शोधली. त्यात १८८ मुलं सापडली. मुलांसोबत गप्पागोष्टी करू लागलो. मुलं म्हणायची, ‘वडील मरण पावलेत, आई लाईफ सजेध्ये आहे’. कोणाकोणाचे आई-वडील दोन्ही लाईफ सजेध्ये, कोणाचे वडील सर्पाच्या दंशाने मरण पावलेत. दि. १ नोव्हेंबरला शाळेत रुजू झालो. मुलं वाहून मरण पावल्याची घटना बेचैन करायची मला.

विष्णू भोसले व त्याची पत्नी यवतमाळ जिल्ह्यातील झोडी गावचे. त्यांना सात वर्षांची सजा झाली. २००९ मध्ये सुटून आले. भीक मागायला मुंबईला गेले. विष्णू भोसले दादरच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागत होता. दुसऱ्या स्टेशनवर लोकलच्या गर्दीत मुलं खाली कोसळली. चिरडून मरण पावली. मला फोन आला, ‘अशी-अशी घटना घडली आहे. तुम्ही आलात तर बरं होईल.’ मी बोललो, ‘फासेपारधी समाजाच्या कपाळावर लिहिलं आहे, मरणं आणि जिणं. तुम्ही दफन करून घ्या.’ मुलांची आई म्हणाली, ‘आम्ही तिथं गेलो, तर पोलीस आम्हाला पकडणार.’ या धाकानं ते लाशांजवळ गेले नाहीत. मी ‘अजिबात येणार नाही’ म्हणालो. मुलांच्या वडिलांचा परत फोन आला. म्हणे, ‘आम्ही दोघं नवरा-बायको आत्महत्या करणार आहे. जगण्यावर विश्वास नाही तर जगू शकत नाही. माझ्या मागे-पुढे कोणी नाही.’ तो शब्द माझ्या मनावर रुतला. विदर्भ एक्स्प्रेसने दादर ठिय्यावर गेलो. बयान झाली. लाशेचे तुकडे जमा केले. मला आत्महत्या करावीशी वाटू लागली. आपला समाज मरत आहे, मुलं मरत आहेत; जगून काय उपयोग? दफनविधी केला. तिथंच बाजूला गेलो आणि राजीनामा तयार केला. अमरावतीला आल्यावर सी.ई.ओ.च्या दालनामध्ये राजीनामा टाकून दिला. शाळा सुरू करायचं ठरवलं.

प्रश्न - आत्महत्या करण्यापेक्षा मुलांना शिकवावं, शाळा सुरू करावी असं वाटलं; तरी नोकरी सोडल्यानंतर आणखी उघड्यावर पडणार, असं वाटलं नाही का?

- मला माझं बालपण आठवलं. आता आपलं वय २७/२८ आहे. या वयामध्ये चळवळीत मरून जाऊ, या पोरांसाठी मेलं तरी हरकत नाही, असं मनात ठरवलं. कणसांच्या चोरीच्या वेळी बाबाला पकडलेलं आठवलं. बाबाला चार कणसांसाठी अटक झाली. मला लाईफसजा झाली किंवा मरण पावलो, तरी हरकत नाही, हे मनामध्ये ठाम पकडलं.

प्रश्न - मग लगेच शाळा सुरू केली काय?

- मुलं गोळा करायला सुरुवात केली. माझ्याजवळ सात-आठ हजार रुपये होते. काही बकऱ्या होत्या. मुलांना सोबत घेऊन ‘भीक मांगो’ आंदोलनाला सुरुवात केली. लोक मला चोर म्हणायचे, आतंकवादी म्हणायचे, नक्षलाईट विचाराचा म्हणायचे.

दि. १४ ऑगस्ट २०१३ ला कलेक्टरकडे भीक मागायला गेलो. कटोरे घेऊन गेलो. म्हणालो, ‘सर, एक रुपयाची भीक देणं आवश्यक आहे. तुच्यासारख्या कलेक्टरांचा पाठिंबा या चळवळीला असू द्या.’ ते म्हणाले, ‘अजिबात नाही. चुतिया बनवू नका. माझ्या व्यवस्थेला कलंक लावण्यासाठी हे आंदोलन उभं केलं काय? गेट आऊट!’. चार-पाच कॉन्स्टेबलनी मला पकडलं आणि कलेक्टर ऑफिसच्या बाहेर काढलं. मग एस.पीं.च्याकडे गेलो. म्हणालो, ‘१८८ मुलांचं पालनपोषण करायचं आहे. यांचे आईवडील कोणी लाईफसजेध्ये आहेत, कोणी जेलमध्ये मरून गेले आहेत. गुन्हेगारीमुक्तीचे काम शाळा करू शकते,

त्यासाठी तुमची एक रुपयाची भीक द्या.’... ‘गेट आऊट’ म्हणे. ‘तू इथं का आला? तुला अटक करणं महत्त्वाचं आहे.’ म्हणे. भयानक दाटलं मला. म्हटलं, ‘सर, काही विषय नाही. गरम व्हा, नरम व्हा. माझ्यावर सोट बसवा (पट्‌ट्याने मारा); काही विषय नाही.’ हाणा म्हणे याला. एस.पींनी आवाराच्या बाहेर काढून दिलं मला. मग पोलीस आयुक्तांकडे गेलो. कलेक्टर, एस.पीं.नी हाकलून दिल्याचं त्यांना सांगितलं. ‘एक रुपयाची भीक द्या’ म्हणालो. ‘गेट आऊट’ म्हणे, पारधी म्हणे, कोपऱ्याला लाग म्हणे. ‘कोणाच्या परवानगीने आला, या मुलांना भीक मागायला शिकवत आहे. भीक मागायला प्रवृत्त करत आहे, याखाली अटक करणं महत्त्वाचं आहे’ म्हणे. ‘धन्यवाद’ म्हटलं. ‘सर, तुमचं स्वागत. जेल तर आमचं आई-वडील आहे. जेलमध्येच आमचं मरण, जेलमध्येच आमचा जल्म होतो. म्हणून आमचं नावसुद्धा असं आहे, जेल्या कैद्या भोसले.’

दुपारी दोन वाजता आदेश काढला. रात्री दोन वाजता जेलमध्ये हलवलं. आम्ही दीडेकशे कार्यकर्ते होतो. भीक मांगो आंदोलनात लोक जोडले होते. काही पोटाच्या आशेनं जोडले होते. आम्ही जेलमध्ये होतो. बाहेर ध्वजारोहणाची तयारी सुरू होती. ‘देह मंदिर, चित्त मंदिर, एक येथे प्रार्थना’ या प्रार्थनेने आम्ही जेलमध्ये शाळेची सुरुवात केली. ध्वजारोहण सुरू झालं. ‘ये आझादी झूटी है, देश के फासेपारधी, आदिवासी भूखे है’ या नाऱ्याखाली एकशे पन्नास कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाची चिठ्ठी दिली. खतरनाक कैद्यांनी धमकी दिली. नंतर जिथं नक्षलवादी ठेवतात, त्या अंडासेलमध्ये मला ठेवलं. जेलरनी गोपनीय अहवाल पाठवला. गृहमंत्री आर.आर. पाटील, यांनी त्याची दखल घेतली. ‘हे लोक तुच्याकडे चोऱ्या करण्याचं, दारू काढण्याचं लायसन्स मागत होते काय? समाजाला सुशिक्षित करण्याची मोहीम होती. तुम्ही त्यांना समजावून सांगायला हवं होतं.’ त्यांनी सुटका करण्याचे आदेश दिले. उपोषणामुळे बीपी लो झालं होतं. शुद्ध गेली होती. बायको सात महिन्यांची गरोदर होती. तिनं आंदोलन केलं होतं. जागा नसल्यानं महिलांना नागपूर जेलमध्ये हलवलं होतं.

सुटका झाल्यावर कटोरे, दानपेट्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि जेलच्या गेटपासून शिपायापासून ‘भीक मांगो’ आंदोलन सुरू केलं.

दि. २२ सप्टेंबर २०१३ रोजी रिकामं गोडाऊन ताब्यात घेतलं. त्यात शाळा सुरू केली. कोणी म्हणालं, शाळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. कोणी म्हणालं, महात्मा फुले यांचं नाव द्या. कोणी म्हणालं, भोसलेचं नाव द्या; तो आपलाच आहे. मी ‘अजिबात नाही’ म्हटलं. भीक मागता-मागता अनेक प्रश्न आले. मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक कसे आणायचे? निवारा कसा उभा करायचा? अन्नधान्य शिजवण्यासाठी भांडी कशी आणायची? पांघरायला बिस्तरे कसे जमा करायचे? असे अनेक प्रश्न माझ्या नजरेसमोर होते. मग शाळेचं नावसुद्धा ‘प्रश्नचिन्ह’ का ठेवू नये? सर्व जण ‘ठीक आहे’ म्हणाले. शाळा सुरू केली तेव्हा शनिवार, रविवार भीक मागून मुलांचं पालनपोषण केलं.

प्रश्न - फक्त भीक मागून मुलं कशी जगवायची, असा प्रश्न आला नाही का?

- भयानक प्रश्न आले. भीक मागताना लोक भीक द्यायचे नाहीत. पारध्याला एवढेच धंदे हाय म्हणे. भीक मागण्याचं सोंग करत आहेत. आपल्या आजूबाजूच्या दिवसा वस्तू हेरणार आणि रात्री चोरी करणार. यांना आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात येऊ द्यायचं नाही. कधीमधी मुलांना साखरपाणी, आंबीलवर जगवावं लागलं.

प्रश्न - आणखी काय अडचणी आल्या?

- मुलांना व्यसन होतं. मुलं दारू मागायची. खर्रा मागायची. ‘मतन्या, जर्मलच्या तारेनं तुझा खून करणार आणि आम्ही पळून जाणार’ असं म्हणायची. मुलं पळून जायची. मुलांना शोधण्यासाठी स्टेशनवर घुमायचो. आखरीचा प्लान आखला. रेल्वे स्टेशन, पान ठेले, पोलीस स्टेशन, गावात माझा फोन नंबर दिला. लोकांनी मदत केली. आता थोड्या सोई-सुविधा झाल्या, हसतखेळत शिक्षण मिळतं. सुरुवातीला आमदार विरोधात गेले. लोक मला लाकूड तस्कर म्हणायचे. नागपूरला आमच्या सहा मुलींचा सौदा झाला. देहविक्रयासाठी मुलींना विकलं होतं. राजस्थानला पाठवलं जाणार होतं. माझा कार्यकर्ता नागपुरात मणेरीचा धंदा (कंगवा, फणी, मणी, कानातील डूल विकणे) करायचा. त्यानं सांगितलं, १२ ते १४ वर्षे वयाच्या पोरींना प्रत्येकी सोळा हजार रुपयांना विकलं होतं. कार्यकर्ता म्हणाला, त्यांनी मारलंगिरलं तर मी सांभाळतो. आम्ही ते प्रकरण थांबवलं. पण मुलींच्या नातेवाइकांनी मुली विकण्याच्या केसेस आमच्यावर लावल्या, त्या वेळी खचलो. नंतर लोकअदालतमध्ये समझोता झाला.

प्रश्न - शाळेनं चांगलं रूप धारण करायला कोणाची मदत झाली?

- ‘समर्पण’ ग्रुपच्या मानकरदादांनी माझी मुलाखत ठेवली होती. कार्यक्रम पत्रिका काढल्यावर कार्यक्रम रद्द करण्यासाठी त्यांना धमकीचे फोन आले. त्यांचे कार्यकर्ते म्हणाले, ‘या चोराला स्टेजवर घेतलं, तर आम्ही येणार नाही.’ अमोलदादा मानकर म्हणाले, ‘तुम्ही नाही आलात तर मी आणि मतिनदादा दोघेच कार्यक्रम करणार.’ मुलाखत सुरू झाली. काही लोक हसले. हे स्टेजवर बोलणार तरी काय? याचे कपडे, याची चाल वेगळी आहे. पण मी बोलल्यावर तेच लोक रडले. या कार्यक्रमाला अजयभाऊ किंगरे होते. त्या वेळी त्यांचा मैत्रमांदियाळी हा ग्रुप नव्हता. त्यांनी नंतर भेट दिली. गोडाऊनमधील अवस्था बघितली, तेव्हा ते काही बोलले नाहीत. तीन क्विंटल तांदूळ, चार क्विंटल गहू पाठवून दिले. दि. २६ जानेवारी २०१४ रोजी त्यांनी कबुली दिली. आता ‘भीक मांगो’ बंद करा, म्हणाले. मूठभर धान्य, एक वही, एक पेन असा उपक्रम राबवला. प्रतिसाद मिळाला. दैनिक लोकसत्तामध्ये बातमी आली, ‘मागितलं मूठभर, दिलं ट्रकभर!’ अजयभाऊ आणि मैत्रमांदियाळीमुळे अडचणी सुटत गेल्या. अजयभाऊंनी २०१६ मध्ये औरंगाबादला माझी आणि प्रकाशकाका आमटे यांची मुलाखत ठेवली. त्या वेळी प्रकाशकाका आमटे कोण आहेत, ते मला कळलं. परत जात असताना प्रकाशकाका आणि मंदाकाकूंनी ‘प्रश्नचिन्ह’ला अचानक भेट दिली. फक्त तुरकाट्याचं झोपडं होतं. दुसरा निवारा नव्हता; वीज नव्हती, ते पाहून दोघे रडले. भारावले. मंदाकाकूंनी मुलींना संडासला बाहेर जाताना पाहिलं. नागपुरात उतरल्यावर प्रकाशकाकांनी अजयभाऊंजवळ पन्नास हजार रुपये दिले. ‘माझ्या मुलींसाठी संडास बांधा’ म्हणाले. हळूहळू तीन लाखांची मदत दिली. आठ दिवस स्वत:ची गाडी दिली. ‘प्रश्नचिन्ह’ला काकांचा कार्यक्रम झाला. मग ‘प्रश्नचिन्ह’ पोहोचलं. काका आता ‘प्रश्नचिन्ह’ला फार मोठी मदत करायची आहे, असं लोकांना आवाहन करतात.

(संवादक : नामदेव माळी.)

Tags: interview namdev mali prashchinh samajik karya matin bhosale karyakarta purskar Maharashtra foundation awards 2018 Maharashtra foundation purskar 2018 प्रश्नचिन्ह नामदेव माळी मुलाखत मतीन भोसले कार्यकर्ता पुरस्कार (सामाजिक कार्य) महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार २०१८ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मतीन भोसले,  अमरावती, महाराष्ट्र

समाजसेवक, संस्थापक- प्रश्नचिन्ह शाळा, अमरावती 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा