डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

गोपाळरावांचे आनंदीबार्इंस पत्र

आपले मन जितके शांत व स्वस्थ ठेवता येईल तितके ठेवून, अमेरिका ही आपली स्व-भूीच आहे व तेथील लोक आपली बहीण-भावंडे आहेत, असे समजावे. आम्हा सर्वांस विसरून जाऊन हिंदुस्तानची गोष्ट मुळीच मनात आणू नये. कारण, आम्ही वास्तविक फारच वाईट लोक आहोत. तुम्ही मराठीत तपशीलवार हकीकत लिहून पाठवीत जावी. तुमचे पत्र एडन किंवा सुएझ येथून आल्याखेरीज माझ्या मनाला चैन पडणार नाही. तुमची आठवण मला वारंवार होते. तुम्ही माझ्या दृष्टीस कधी पडाल, असे मला झाले आहे. घटकोघटकी तुमच्या पत्राची मी वाट पाहत आहे. तुम्ही निघून गेल्यानंतर तुमच्याविषयी मला स्वप्न पडले. मला जे काही दु:ख होत आहे, ते पुसू नये. खरोखर माझी स्थिती विधुराप्रमाणे झाली आहे. उदईक मी संगमनेर येथे जाण्याचा बेत केला आहे. मी आपल्याबरोबर तुरुंगाची हकीकत व पाच चित्रे पाठवीन. विष्णुशास्त्री यांची तसबीर मी पत्रासोबत पाठविली आहे. अधिकाधिक पदार्थ मी तुम्हाला पाठवीत जाईन.  

नासिक, ता. 15 एप्रिल 1883 आगबोट सोडून घरी येईपर्यंत मी आपले धैर्य व उमेद खचू दिली नाही. कारण, तोपर्यंत माझे मनोविकार अगदी बाहेर पडण्याच्या बेतात होते; परंतु ते आवरून धरिले. गेल्या शुक्रवारी जेव्हा, डॉ.थोर्बन यांचे पत्र मला पावले, व ‘तुमची तयारी असू द्या’, असा त्यांतील मजकूर वाचला, तेव्हा माझे मन गोधळल्यासारखे झाले. परंतु ती वेळ धैर्य सोडून देण्याचा व उदासीन होण्याचा नव्हती. कारण मी जर तसे केले असते, तर तुमच्या मनाची स्थिती काय झाली असती? त्या दिवशीच दुपारी मी डॉ.थोबर्न यांचे घरी गेलो व त्यांच्या दिवाणखान्यांत एकटचा बसलो असता, आपल्या वियोगाचा काल समीप आला आहे, असे माझ्या मनात येऊन, माझ्या डोळ्यांतून एकसारख्या अश्रुधारा वाहू लागल्या! 
आपल्या वियोगामुळे मला जे दु:ख होत आहे, त्याचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. ते एका ईश्वरास मात्र ठाऊक! मला माझ्या कर्तव्याच्याच कल्पनेने शेवटपर्यंत धीर दिला होता. हाय! हाय! मला वाटते की, मी आपणांस फारच निष्ठुरपणाने वागवले व अगदी शेवटपर्यंत आपला संतोष ठेवण्याविषयी मुळीच यत्न केला नाही! या पृथ्वीवर परमेश्वराने माझ्याहून अधिक निर्दय मनाचा प्राणी निर्माण केला नसेल! त्या दिवशी आपण पोटभर अन्नही खाल्ले नाही, हे मला माहीत आहे. आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याचा मी यत्न केला नाही, हेही मी जाणतो. ‘मी कोठे निजू?’ असे जेव्हा आपण मला विचारले, तेव्हा मी आपल्याकरिता काही फळफळावळ विकत आणावी, म्हणून निघून गेलो व आपणास कठोरपणाने उत्तर दिले! खरोखर, त्या वेळेस माझा निरुपाय झाला होता. 
दुसऱ्या दिवशी सकाळी आपणास जाण्याकरता भाड्याची गाडी आणावयाची होती व आपल्याकरता काही खाण्याचे पदार्थही आणावयाचे होते. मी असा विचार केला की, आपल्याबरोबर जर मी गोष्टी सांगत बसलो असतो, तर सगळी रात्रभर आपल्याला झोप आली नसती व सकाळी आपली प्रकृती बिघडली असती. त्या रात्री आपल्याला झोप चांगली आली किंवा नाही, हे मला माहीत नाही. मी बाजारातून आल्यावर पाहू लागलो तो, तुम्हास झोप लागली आहे, असे मला वाटले; एवढ्याकरिता मी तुची झोप मोडली नाही. मला तर त्या रात्री मुळीच झोप आली नाही. मी, एक-दोन-तीन... असे ऐकले. साडेतीन वाजल्याबरोबर मी गोविंदराव यास उठविले व गाडी आणण्याकरिता पाठविले. मग तुम्हास उठवून ‘प्रातर्विधी आटोपावयाचा असल्यास आटोपा, व कपडालत्ता करा.’ असे मी सांगितले. 
खरोखर, मी आपणास फाशी देण्याच्या तयारीत आहे, असे मला घटकोघटकी वाटे. तुम्ही मला काय पाहिजे ते म्हणा; एवढी गोष्ट खरी की, त्या वेळेस मी फारच निर्दयतेने वागलो. आपण मला क्षमा कराल, अशी मला खात्री आहे. आपले धैर्य व आपला दृढनिश्चय पाहून खरोखरच मला नवल वाटले! तुम्ही इतक्या शांत व स्वस्थ होता व तुमचा नशिबावर इतका भरवसा होता, की आम्हा सर्वांस फारच आश्चर्य वाटले! जास्त काय सांगावे? तुम्ही आपल्या सर्व कुटुंबावर व सर्व हिंदुस्तानवर प्रकाश पाडला, असे आम्हास वाटले. आपल्याविषयी आम्हा सर्वांस फारच अभिमान वाटतो. ज्या दिवशी मी आगबोटीवर गेलो, त्या वेळेस मिसेस जॉन्सन हिला तुम्हास ममतेने वागण्यविषयी व प्रत्यक्ष आईप्रमाणे तुम्हांवर प्रेम करण्याविषयी तिच्याशी बोलावे, अशी माझी इच्छा होती. परंतु ती तुम्हाविषयी अतिशय उदासीन व बेपर्वा आहे असे पाहून मला फारच वाईट वाटले. तिचा नवरा माझ्याजवळ आला आणि तुच्या खर्चाकरिता मी किती पैसे दिले आहेत, त्याबद्दल विचारू लागला. मी त्याला सांगितले की, तुमच्याजवळ देण्याकरिता, डॉ.थोबर्न यांच्याजवळ मी 43।। पौंड दिले आहेत. पण ती रक्कम मिळाली नाही, असे जेव्हा त्याने स्पष्ट सांगितले, तेव्हा मी म्हटले, डॉ.थोबर्न आता येतील. त्या वेळेस तुम्हाला प्रवासांत ममतेने वागण्याविषयी आपल्या बायकोस सांगण्याकरता मी त्याला विनंती केली. मी त्याला आणखी असेही सांगितले की, मी गरीब मनुष्य आहे. याकरता माझ्या बायकोला जितक्या थोड्या खर्चात तुम्हाला नेता येईल तितके बरे. पण तो म्हणाला, ‘तुझी बायको माझ्या बायकोच्या बरोबर असावी, असे तुझ्या मनात असेल तर, मिसेस जॉन्सन ही जितका खर्च करील, तितका तुला केला पाहिजे.’ हे त्यांचे उत्तर ऐकून माझ्या मनाला फारच दु:ख झाले! 
मला असे वाटले की, मी खरोखरच तुम्हाला पाण्यांत बुडवून टाकीत आहे. पण मी तरी काय करू? ‘त्यांच्याबरोबर तुम्ही जाऊं नका’ असे जर तुम्हास सांगितले असते, तर आपली दशा काय झाली असती? आपण जो खर्च केला होता, तो आपणास परत मिळण्यास मार्ग होता काय? जे पदार्थ त्यांच्यावर विश्वास ठेवून मी त्यांच्या स्वाधीन केले होते, ते पुन्हा आपल्याला परत मिळण्याचा काही संभव होता काय? अशा अडचणीमध्ये माझ्या मनाची जी स्थिती झाली असेल, त्याची कल्पना तुम्हीच करावी, हे बरे. तुम्हाला मी ‘नका जाऊ’ असे जर म्हटले असते तर मी कोवळ्या मनाचा व सहृदय अंत:करणाचा नवरा आहे, एवढी गोष्ट नि:शंक सिद्ध झाली असती. पण तुम्हाला पाठविण्याविषयी जर त्या वेळेस मी मागे-पुढे केले असते, तर त्या वेळी ते तुम्हाला आवडले असते काय? त्या माणसांवर विशेष अवलंबून न राहण्याविषयी मी सांगितल्याचे कदाचित्‌ तुम्हाला स्मरत असेल. आणि याच कारणाकरता ते आपापल्याच कामांमध्ये निमग्न राहिले व तुमची काळजी कोणीच घेतली नाही. अशी गोष्ट असता तुम्ही फारच चांगल्या रीतीने वागला व  बायको माणूस असता, तुमचे वर्तन फारच शौर्याचे व धीराचे असे होते; हे पाहून मला फारच आनंद होत आहे. 
आपला दृढ निश्चय व आपल्या मनाची शक्ती पाहून मला वाटते, मी आपल्यापुढे क:पदार्थ आहे! ईश्वर आपणास व आपल्या माहेरच्या माणसांस सुखी ठेवो! हे मी खरोखर गंभीरपणाने लिहीत आहे! अशी स्त्री खचितच दहा लाखांमध्ये एखादी आढळेल किंवा नाही, याचा मला संशयच वाटतो! ईश्वराची तुम्हांवर पूर्ण कृपा आहे. तोच तुचा मार्गदर्शक व संरक्षक असून, सर्वस्वी त्याच्याच हातामध्ये तुम्ही आहात. मी निर्दय, निष्ठुर आहे, तथापि माझे प्रेम तुम्हांवर नाही असे मला वाटत नाही. प्रत्येक क्षण मला एका शतकासारखा भासत आहे. मी आपल्या सन्निध्यात असावे व आपल्या सेवेत तत्पर असावे, असे वाटत असल्यास मी उद्याच निघण्यास तयार होईन. डॉ.थोबर्न व मी बरोबरच आगबोट सोडून निघालो. कारण की आमच्याने तेथे अधिक वेळ राहवेना. तात्या बळदेव व रामभाऊ यांच्या डोळ्यांत तर खरोखर अश्रू आले! 

तात्या मला म्हणाला, ‘तू तिला समुद्रात एकटीला लोटून दिलीस! यामुळे तुझ्यावर एक घाव घालून तुला जमीनदोस्त करावे असे मला वाटते.’ त्या वेळी माझे डोळे भरून आले. पुन्हा मी तुम्हाकडे पाहिले नाही. हात वर करण्याची किंवा दुसरी काही खूण करण्याची माझ्यात शक्ती राहिली नाही. आम्ही घरी परत आल्यावर, आपल्या अंत:करणांतील मनोविकार दाबून ठेवण्याविषयी जरी मी यत्न करीत होतो, तथापि तसे माझ्याने फार वेळ करवले नाही. तुम्ही हिंदुस्तान सोडून एकदम चालत्या झालात, याविषयी कृष्णराव व उडियाकाका अनेक तर्क करू लागले. बोलता बोलता त्यांनी असे उद्‌गार काढले, ‘तुमचे एकमेकांचे बनेना; तुझ्या बायकोची वागणूक चांगली नव्हती; एवढ्याकरिता तुझे तिजवर मुळीच प्रेम नव्हते.’ ही त्यांची वाक्यशल्ये माझ्या हृदयाला इतकी झोंबली की, मला एकदम रडूच कोसळले! मी त्यास पुष्कळ शिव्या दिल्या. मी त्यास सांगितले की, निरपराध प्राण्यावर तू नाही ते अपराध लादीत आहेस, त्या अर्थी तुझ्यासारखा दुष्ट प्राणी जगात नसेल! तेव्हा, तात्या, आजीबाई, राजाभाऊ, यांनी व इतर माणसांनी त्यांच्या त्या मूर्खपणाच्या बोलण्याबद्दल पुष्कळ निंदा केली. तेव्हा कृष्णराव याने, ‘मी जे बोललो, त्याबद्दल तुम्ही क्षमा करा’ असे म्हटले. त्या घटकेपासून माझ्या डोळ्यांचे पाणी खळले नाही, मी आपल्या डोळ्यांतून टिपे गाळली नाहीत, असा एक दिवस गेला नाही!

मी जेकस याला पत्र लिहिले व ते लिहितानाही पुष्कळ रडलो. थोबर्न याला पत्र लिहिले तेव्हाही माझ्या डोळ्यांतून अश्रूचा लोट चालला होता! मी शनिवारी कलकत्त्यास होतो. आदित्यवारी सकाळी दहा वाजता कलकत्ता सोडिला. तात्या बलदेव व गोविंदराव हे स्टेशनावर मला पोहोचवण्याकरता आले होते. तुम्ही गेल्यापासून गोविंदराव फारच दु:खी व कष्टी आहे. मी कार्पेंटर यांना एक पत्र पाठविले आहे; ते तुम्हास पाहण्यास सापडेल, असे मला वाटते. मी काशीस न जाता परस्पर जबलपुरास गेलो. तेथे गंगाधरपंत यांच्याच घरी उतरलो होतो. तुमचे व्याख्यान वाचून त्यास फारच संतोष झाला. येथे मी काल रोजी आलो. व मंगळवारी संगमनेरास जाण्याकरता निघणार आहे. त्या ठिकाणी कदाचित्‌ मी एक-दोन दिवस राहीन. कारण मला तेथे अधिक राहता येणार नाही. 

तुमचे पत्र मला काल रोजी पावले. ते वाचत असता माझ्या नेत्रांतून अश्रुपात होत होता. हाय! हाय! मी काय करू? रामचंद्रांनी ज्याप्रमाणे जानकीचा त्याग केला, त्याप्रमाणे मी तुमचाही त्याग केला! रामचंद्रांनी सीतेला हिंदुस्तानांतच सोडले होते, त्यापुढे तिची व ऋषीची गाठ पडली; परंतु मी तुम्हास अशा ठिकाणी सोडून दिले की, ज्या ठिकाणी हिंदुस्तानांतील मनुष्याचे तोड कधीही दृष्टीस पडणार नाही! ईश्वरावर हवाला ठेवा. तोच तुम्हाला उत्तम मार्ग दाखवील. माझी पदर पसरून तुम्हास एवढीच विनंती आहे की, ‘तुम्ही आपल्या जीवाला जपा.’ तुम्ही जर दीर्घायू झाला आणि तुमच्या देशाचा व तुमचा स्वत:चा लौकिक वाढला, तर तुम्हास कशाचीही उणीव पडणार नाही. उदईक मी आबाडले यांच्या घरी भोजनाकरिता जाणार आहे. तुम्ही अमेरिकेस गेलात म्हणून मी त्यास सांगितले. ती माणसे मला म्हणाली, ‘तुम्ही तिला इतक्या दूर पाठवावयाचे नव्हते. कारण, ती या ठिकाणी असती, तर तुमच्या उपयोगी पडली असती.’ हे जग किती स्वार्थपरायण आहे ते पहा! 

मी जी  काळजी व दु:ख करीत आहे, ते तुमच्याकरता करतो. मी आपल्या स्वत:करता करीत नाही, कारण माझ्या गरजा फारच थोड्या आहेत. माझ्या हिताकरता दुसऱ्यांनी सर्वकाळ झटावे, अशी माझी इच्छा नाही. बापूसाहेब काहीच बोलले नाहीत. काल रात्री माझे त्यांचे बरेच बोलणे झाले. त्यांचे विचार माझ्या विचारांशी बहुतेक जुळले. यास पुरुष म्हणावे की स्त्री म्हणावे? आज सकाळी मी त्यांच्याबरोबर प्रार्थना-समाजात गेलो होतो. त्या ठिकाणी आम्ही दोघे व पखवाज्याखेरीज दुसरे कोणीच सभासद नव्हते! किती शोचनीय स्थिती आहे! तरी बिचारा बापूसाहेब प्रत्येक शनिवारी तेथे जातो. तो आपली मुले बरोबर घेऊन जात नाही. मला वाटते, तो आपली मुले बरोबर घेऊन जाता, तर बरे होते. आज रामनवमी असल्यामुळे, पंचवटीतील रामाच्या देवळात गेलो होतो. त्या ठिकाणी लोकांची पुष्कळ गर्दी होती. त्यांपैकी अर्ध्याहून अधिक स्त्रिया होत्या. जगातील सर्व भागांत स्त्रिया किती भक्तिमती असतात, हे तुमच्या लक्षात येईल. 

मी नासिकास जात असता, हर्दा येथे एक दिवस मुक्काम केला. त्या ठिकाणी, माझा स्नेही आनंदराव याने माझा चांगला सत्कार केला. मी त्याला भेटलो, यामुळे त्याला फारच आनंद झाला. तो दिवस मी मोठ्या सुखात घालविला. तुम्ही अमेरिकेस गेलात, हे ऐकून त्याला फारच आनंद वाटला. त्याने तुमचा पत्ता लिहून घेतला आहे. तो तुम्हास मधून-मधून पत्र पाठवीत जाईल. 

बापूसाहेब यांनी मला सांगितले की, तुमच्या आईकडून मला एक पत्र आले आहे. तिने नासिक येथील ब्राह्मण पुन्हा आपल्यात तुम्हास घेतील किंवा नाही, याविषयी तुम्हाला विचारले आहे. बापूंनी तुमच्या मातुश्रीस लिहिले की, या खटपटीत तुम्ही सध्या पडण्याचे कारण नाही. तेवढ्याने तिचे समाधान न होता, बापूचा भाऊ जगन्नाथ याला तिने एक पत्र लिहिले. आम्ही माणसे किती वेडी होऊन जातो, हे यावरून तुमच्या लक्षात येईल. ती अजून कल्याणासच आहे, असे मी ऐकतो. माझी व तिची भेट होईल, असे मला वाटत नाही, कारण मला कल्याणास उतरता येत नाही. 

माधवराव नामजोशी यांनी तुम्हास ‘केसरी’ व ‘मराठा’ पाठविण्याचे कबूल केले आहे. ती पत्रे तुम्हास नियमाने मिळतील, अशी मला आशा आहे. मी तुम्हास ‘वैधव्य’ या विषयावर एक पुस्तक पाठविले आहे. हिंदुस्तानातील विधवांच्या संबंधाने जर तुम्ही व्याख्यान दिलेत, तर त्या वेळी त्या पुस्तकाचा कदाचित तुम्हाला उपयोग होईल. या महिन्याच्या ‘थियासफिस्ट’ या मासिक-पुस्तकाचाही अंक पाठविला आहे. त्या अंकात कर्नल आल्काट यांनी श्रीरामपूर येथील तुमच्या व्याख्यानाच्या संबंधाची हकिकत दिली आहे. हिंदुस्तानातील बहुतेक पत्रांनी तुमच्या व्याख्यानाचे उतारे घेतले आहेत. हे सर्व ठीक आहे. आपले मन जितके शांत व स्वस्थ ठेवता येईल तितके ठेवून, अमेरिका ही आपली स्व-भूमीच आहे व तेथील  लोक आपली बहीण-भावंडे आहेत, असे समजावे. 

आम्हा सर्वांस विसरून जाऊन हिंदुस्तानची गोष्ट मुळीच मनात आणू नये. कारण, आम्ही वास्तविक फारच वाईट लोक आहोत. तुम्ही मराठीत तपशीलवार हकीकत लिहून पाठवीत जावी. तुमचे पत्र एडन किंवा सुएझ येथून आल्याखेरीज माझ्या मनाला चैन पडणार नाही. तुमची आठवण मला वारंवार होते. तुम्ही माझ्या दृष्टीस कधी पडाल, असे मला झाले आहे. घटकोघटकी तुमच्या पत्राची मी वाट पाहत आहे. तुम्ही निघून गेल्यानंतर तुमच्याविषयी मला स्वप्न पडले. मला जे काही दु:ख होत आहे, ते पुसू नये. खरोखर माझी स्थिती विधुराप्रमाणे झाली आहे. 

उदईक मी संगमनेर येथे जाण्याचा बेत केला आहे. मी आपल्याबरोबर तुरुंगाची हकीकत व पाच चित्रे पाठवीन. विष्णुशास्त्री यांची तसबीर मी पत्रासोबत पाठविली आहे. अधिकाधिक पदार्थ मी तुम्हाला पाठवीत जाईन. अमेरिकेतल्या लोकास वाचून दाखविण्यास योग्य, असे जे जे मला आढळेल, ते ते मी पाठवीत जाईन एकाच ठिकाणी एक किंवा दोन दिवसांपेक्षा अधिक माझ्याने राहवत नाही. मी फिरणाऱ्या पक्ष्याप्रमाणे झालो आहे. 

डायमंडहार्बर येथून तुमचे जे पत्र आले ते वाचनीय होते. ते वाचीत असता माझ्या नेत्रातून अश्रू आले. परंतु मलाही जे पत्र लिहिता आले नसते, असे पत्र आपण लिहिले, हे पाहून फारच आनंद झाला. तुमचे अधिकाधिक आभार मानल्याखेरीज माझ्याने राहवत नाही. माझ्या आत्म्यास मुक्ती मिळावी म्हणून, ईश्वर तुम्हास दीर्घायू करो व सुखी ठेवो! 

तुम्ही अमेरिकेतील लोकांस प्रिय होण्याचा यत्न करावा. अमेरिकन लोक तुम्हास फारच चाहतात, असे ऐकण्याविषयी मी फार उत्सुक आहे. ज्या-ज्यो ठिकाणी तुम्ही जाल, त्या-त्या ठिकाणी स्नेह संपादन कराल, अशी माझी पक्की खात्री आहे. समुद्रातील प्रवास तुम्हास कितपत सुखावह झाला, हे कृपा करून मला कळवा. सविस्तर पत्र लिहून तुमच्या आगबोटीत जे इतर उतारू होते, त्यांनी तुम्हास ममतेने वागविले किंवा नाही, याविषयीही लिहा. ज्या आगबोटीमधून तुम्ही गेलात, त्या आगबोटीत एक बाबू होता, त्याने तुमचा परिचय करून घेण्याचा यत्न केला काय? वाटेने तुम्ही आपला हिंदू पेहराव कायम ठेवला व त्यात बदल करण्याची काही आवश्यकता वाटली नाही, असे समजण्यास मी फार उत्सुक आहे. 

आगबोटीवर मी तुम्हास एकटे सोडले; यावरून मी किती निर्दय आहे, असे मनात येऊन मला वारंवार खेद होतो. परंतु माझ्या निर्दयी अंत:करणापासून तुमचे हित होवो व तुम्ही दीर्घायू व्हावे, असे मी इच्छितो. ईश्वर तुम्हास आशीर्वाद देवो. माझी प्रकृती बरी आहे. माझ्याविषयी विचार करू नये. माझी प्रकृती लहानपणापासून अशीच आहे व माझा आयुष्यक्रम असाच आहे, हे तुम्हास माहीतच आहे. तुम्ही सुरक्षित असावे व तुम्हास सुख व्हावे, एवढ्याविषयीच मला काळजी आहे. माझी इच्छा व माझी पुढची काय ती सर्व आशा मिळून एवढीच आहे. पत्र-विस्तार बराच झाला, म्हणून मी आता आटोपते घेतो. त्या देशांतील स्त्रिया व मुली यांच्याशी तुम्ही सामना करावा. हिंदुस्तानांतील माणसात किती पाणी आहे, हे त्यास दाखवा. मी तुच्यामागून लवकरच येईन. तुम्हाकडून वारंवार पत्रे येत जावी, एवढीच माझी इच्छा आहे. 

सुंदरी माझ्या हस्तगत होण्याचा मी यत्न करीन. ती जर माझ्या हस्तगत झाली, तर तिच्या आईजवळ न ठेवता मी तिला बंगालमध्ये घेऊन जाईन. तिला शिक्षण देऊन तुमच्याकडे पाठवीन. परंतु हाय! हाय! मला असे वाटते की, हे माझे सर्व स्वप्न आहे. ती माझ्या ताब्यात नाही व कोणत्याही मार्गाने तिजवर मला हक्क चालविता येणार नाही. असो. जे काही आहे ते ठीकच आहे! कारण मी तरी काय करू? 

मी तुम्हाकडे येईन तेव्हा बरोबर कोणाला तरी घेऊन येईन. ज्या कार्याकरता तुम्ही गेला, त्या कार्यात तुम्हास यश यावे, एवढीच माझी इच्छा आहे, हे मी आपणास खात्रीपूर्वक सांगतो. तुम्हास यश आले म्हणजे त्यांतच मी सुख मानीन. मी एकसारखे लिहीत असावे, असे मला वाटते; परंतु असे केल्यास तुम्हास कंटाळा येईल, म्हणून तुमच्या परवानगीने हे पत्र मी संपवितो.
आपला, गोपाळ. 

(आनंदीबाई अमेरिकेस गेल्यानंतर गोपाळरावांनी लिहिलेले हे पहिले पत्र, काशिबाई कानिटकर लिखित ‘डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र’ या पुस्तकातून घेतले आहे.) 
 

Tags: गोपाळराव जोशी आनंदी गोपाळ anandi gopal letter to anandibai joshi gopalrao joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोपाळराव जोशी

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा