डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

ही चळवळ उभी राहिली ती मासिहच्या एका छोट्याशा फेसबुक पोस्टमुळे. इराणमधून हुसकावून लावण्यात आलेली मासिह लंडनमध्ये आली, तेव्हा तिनं तिच्यावर लादल्या गेलेल्या हिजाबशी फारकत घेतली. तिला आता स्वातंत्र्य चोरण्याची जरुरी नव्हती. ती लंडनमधील तिचे काही फोटो पाहत होती, त्या वेळी एक जुना फोटो तिच्या हाती आला. लंडनमध्ये चेरी फुलांनी लगडलेल्या रस्त्यावरून ती धावत आहे, असा तिच्या पतीने- कांबिझने क्लिक केलेला फोटो होता. त्या फोटोत तिने केशरी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. तिचे दोन्ही हात जगाला कवेत घेण्यासाठी फैलावले होते आणि वाहते वारे तिच्या केसांशी लगट करत होते.

वयाच्या सातव्या वर्षी तिच्या केसांमध्ये शिरणारी उन्हाची किरणं, हवेचा झोत आणि पावसाचे थेंब... सारं काही थांबलं. अंगभर ढगळे कपडे आणि डोकं झाकणारा स्कार्फ- हिजाब आला, तोही सक्तीनं. एकाच वेळी असंख्य प्रकारची बंधनं अधोरेखित करत होता हा हिजाब, तर दुसरीकडं ती ज्या भूभागात राहत होती तिथं शिक्षण-नोकरी मिळवायला त्याचीच मदत घ्यावी लागत होती. तिच्या देशातल्या प्रत्येकीच्याच भाळी जणू ते जन्मत:च कोरून येतं. सक्तीनं. जबरदस्तीनं.

प्रत्येक स्त्रीनं हिजाब घालायलाच हवा, असं तिच्या राष्ट्राचा कायदा सांगतो. मासिह अलिन्जाद या मुक्त पत्रकार तरुणीला मात्र नको होती ही सक्ती, ही जबरदस्ती. तिने सक्तीचा हिजाब नाकारला. बंड केलं. तिने तिच्या कुरळ्या मोकळ्या केसांत वाहतं वारं अनुभवून पाहिलं आणि जगभरातल्या स्त्रियांना विचारलं, ‘‘हिजाब सक्तीने घालण्यावर जिचा विश्वास नसेल, ती किमान ‘स्वातंत्र्याची चोरी’ तर करूच शकते!’’

...आणि बघता-बघता उभी राहिली एक चळवळ, पडद्याआड लपवलेल्या स्वातंत्र्याची... गुप्तपणे जगलेल्या स्वातंत्र्याची.. ‘माय स्टेल्दी फ्रीडम’ची!

मासिह अलिन्जाद ही बेचाळीस वर्षांची निर्भीड मुक्त पत्रकार आहे. ‘द विंड इन माय हेअर: माय फाईट फॉर फ्रीडम इन मॉडर्न इराण’ हे मासिहचे आत्मचरित्र ऑगस्ट २०१८ मध्ये प्रसिद्ध झालं आणि हे पुस्तक तिने ‘माय स्टेल्दी फ्रीडम’ व ‘व्हाईट वेनस्डे कॅम्पेन’च्या धाडसी महिलांना अर्पण केले आहे. या पुस्तकामुळे पुन्हा एकदा तिची ‘स्वातंत्र्याची चोरी’ ही चळवळ प्रकाशात आली.

मासिह मूळची इराणची. तिची निर्भिड पत्रकारिता पाहता, ती देशासाठी फारच घातक आहे, असं वाटून वयाच्या तेहतिसाव्या वर्षी तिला इराणमधून हुसकावून लावण्यात आले. पण यामुळे मासिहची पत्रकारिता सुटली नाही, की संवेदनशीलता घटली नाही. ती सध्या न्यूयॉर्कमधील ‘ब्रुकलिन’ या भागात राहत आहे. विशेष म्हणजे इराणमधून बाहेर पडावं लागलं तरी ती मनानं कधीच बाहेर पडली नाही. देशाबाहेरूनही तिची पत्रकारिता इराणमधील महिलांचा आवाज, अन्याय- अत्याचाराच्या कथा आणि भ्रष्टाचारासारखे जटिल प्रश्न समोर आणत आहे. ‘आय हॅव गॉट टू मच हेअर, टू मच व्हॉईस ॲन्ड आय ॲम टूमच ऑफ वुमन फॉर देम.’ एका मुलाखतीत तिने स्वत:साठी वापरलेलं हे वाक्य तिला अगदीच चपखल बसतं.

तिच्या कुरळ्या केसांना हिजाबखाली आवरणं अवघड आहे, तिचा आवाज दाबणं कठीण आणि केस व आवाजाच्या माध्यमातून तिच्या स्त्रीत्वाला दडपण्याचे जे काही प्रयत्न झाले त्यांना ती खमकेपणाने पुरून उरली. म्हणूनच तिच्यासारख्या अनेकींच्या स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार सांगणाऱ्या ‘माय स्टेल्दी फ्रीडम’ या सक्तीच्या हिजाबविरोधी चळवळीतील असंख्य अदृश्य बायकांचा ती खणखणीत दृश्य आवाज बनली आहे. ही चळवळ उभी राहिली ती मासिहच्या एका छोट्याशा फेसबुक पोस्टमुळे.

इराणमधून हुसकावून लावण्यात आलेली मासिह लंडनमध्ये आली, तेव्हा तिनं तिच्यावर लादल्या गेलेल्या हिजाबशी फारकत घेतली. तिला आता स्वातंत्र्य चोरण्याची जरुरी नव्हती. ती लंडनमधील तिचे काही फोटो पाहत होती, त्या वेळी एक जुना फोटो तिच्या हाती आला. लंडनमध्ये चेरी फुलांनी लगडलेल्या रस्त्यावरून ती धावत आहे, असा तिच्या पतीने- कांबिझने क्लिक केलेला फोटो होता. (तिने दुसरे लग्न ब्रिटिश व्यक्तीशी केले आहे.) त्या फोटोत तिने केशरी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. तिने दोन्ही हात जगाला कवेत घेण्यासाठी फैलावले होते आणि वाहते वारे तिच्या केसांशी लगट करत होते.

हा फोटो फेसबुकवर शेअर करत तिने खाली असा मजकूर लिहिला, ‘मी जेव्हा केव्हा अशी मुक्तपणे धावते आणि माझे केस वाऱ्यासोबत डोलू लागतात, तेव्हा- तेव्हा मला आठवतं की- मी अशा एका देशातून आले आहे जिथं तीसएक वर्षं माझे केस शासनदरबारी बंदिवान होते. इराणच्या इस्लामिक रिपब्लिकमध्ये सत्तेवर असणाऱ्यांनी केसांच्या माध्यमातून बंदी घातली. इराणमधील रस्ते माझी आठवण काढत असतील. त्या रस्त्यांना माझे आनंदी अस्तित्व, माझं भरभर चालणं, माझं नाचणं, माझं हसणं... हे सारं काही आठवून चुकल्या-चुकल्यासारखं वाटत असेल. त्यांना माझी आठवण येत असेल याची मला खात्री आहे.’

मासिहचा हा फोटो आणि या फोटोखालील मजकूर काही क्षणांत व्हायरल झाला. मासिहने केसांसंदर्भात  ‘बंदी’ ही संज्ञा जाणीवपूर्वक वापरली होती. इराणी स्त्रियांना ही संज्ञा नेमकी कळली, कारण त्यांना असा मुक्त वावर नव्हता. या फोटोचा परिणाम काय होईल याची तिला अजिबातच कल्पना नव्हती, मात्र दिवसभरात मजकुरासह हा फोटो ७४१ वेळा शेअर झाला. १४ हजार लाइक्स मिळाले आणि ५०० जणांनी त्यावर कॉमेंट केल्या होत्या. काहींनी मासिहचा हेवा केला होता, तर काहींनी हे स्वातंत्र्य इराणमध्ये नाही म्हणून दु:ख व्यक्त केले होते.

मासिह या प्रतिसादाने उत्तेजित झाली, आनंदून गेली. हिजाबच्या सक्तीबाबत इतकी खदखद आहे, हे तिच्या लक्षात आलं. तिच्या फोटोबाबत तक्रार करणाऱ्यांचा सूरही तिला कळत होता. मासिहने त्या तक्रारीला उत्तर म्हणून तिचा तेहरान ते गोमिकाला या प्रवासातील गाडी चालवत असतानाचा फोटो टाकला. या फोटोतही तिने हिजाब घातलेला नव्हता. चोरलेल्या स्वातंत्र्यक्षणाचा फोटो शेअर करून तिने इराणी स्त्रियांना विचारले की, अशा रितीने तुम्ही कधी गुपचूपपणे स्वातंत्र्य अनुभवलं आहे?

मासिहला या गोष्टीची निश्चितच कल्पना होती की, इथल्या स्त्रियांनी त्यांच्या-त्यांच्यापरीने लहान-मोठं स्वातंत्र्य मिळवलंच असणार. तिच्यासारख्या असंख्य इराणी स्त्रियांना हिजाबची सक्ती नको असणार आणि त्यांनी केव्हा तरी पोलिसांच्या अनुपस्थितीत, गाडी चालवताना, निर्जन रस्त्यावर, वाळवंटात, जंगलात किंवा कुठल्या तरी समुद्रकिनारी अलवारपणे हिजाब काढून मोकळा श्वास घेतला असणार. त्यांच्या केसांना मुक्त वाऱ्याच्या हवाली सोपवलं असणार आणि त्याची आठवण म्हणून फोटोही काढला असणार.

बहुतांश इराणी स्त्रियांकडं अशी मुक्ततेची, चोरलेल्या स्वातंत्र्याची कहाणी आणि फोटो होताच. मासिहच्या इराणमधील फोटोनंतर तर तिला तिच्या अपेक्षेपेक्षाही प्रचंड प्रतिसाद लाभला. भराभर फोटो येऊ लागले. काहींनी आपले नाव गुपित ठेवले. काहींनी पाठमोरे फोटो पाठवले.

एप्रिल २०१४ मध्ये मासिहच्या या दोन पोस्टने चांगलीच खळबळ उडवली. शेवटी मासिहच्या एका वाचकाने तिच्यासाठी एक फेसबुक पेज बनवले, ‘आझादी यावाशकी’ या नावाने! चोरलेल्या स्वातंत्र्याला पर्शियन भाषेत आझादी यावाशकी म्हणतात. त्या पेजनिर्मातीने तिला ॲडमिन केले. दि.३ मे २०१४ रोजी हे पेज जगापुढे आले.

मासिहच्या मेलबॉक्समध्ये अनेक इराणी महिलांचे फोटो येऊ लागले होते. हिजाब न घातलेले, स्कार्फ न घातलेले. इराणी स्त्रियांचा तो उत्साह आणि त्यांची निर्भयता पाहून मासिहला उचंबळून येत असे. हे सारं पर्शियन भाषेपुरतं मर्यादित राहू नये म्हणून मासिहने या पेजचं स्वरूप इंग्रजी व पर्शियन असं दोन्ही भाषांत केलं आणि पेजचं नवं नाव पुढे आलं- ‘माय स्टेल्दी फ्रीडम’.

या पेजवर प्रसिद्ध होणाऱ्या फोटोंवरून हिजाबचा कायदा मोडला म्हणून इराणी स्त्रियांना अटक होण्याची शक्यता होती. पण या बायकांना त्याची फिकीर वाटत नव्हती. त्यांना त्यांच्या या स्वातंत्र्याच्या क्षणाचा आनंद घ्यायचाय, हे दिसत होतं. मुख्य म्हणजे त्या प्रत्येकीच्या मनोगतातला समान धागा हा होता की, ‘हिजाब ही माझी निवड नाही आणि मला निवडीचे स्वातंत्र्य हवे.’

पाहतापाहता या पेजवरचे ट्रॅफिक वाढले. दर दिवसाला हजारो जण हे फेसबकु पेज जॉईन करू लागले. तीन दिवसांत सत्तावीस हजार फॅन्स/फॉलोअर्स तयार झाले. ही छोटी गोष्ट नव्हती. ७ मे २०१४ ला एका रेडिओ पत्रकाराने या पेजची बातमी केली आणि अन्य पाश्चिमात्य संस्था, संघटना या चळवळीच्या पाठीशी उभ्या राहिल्या.

पण हे इतकं शांतपणे सुरू नव्हतं. त्याचे पडसाद उमटू लागले होते. इराणी स्त्रियांना त्याची किंमत मोजावी लागत होती. त्यांना भर रस्त्यात दगडाने मारण्याची शिक्षा होऊ लागली. काहींना तुरुंगवास. इतकंच नव्हे, तर इराणमधील सर्वांत प्रसिद्ध असलेले पर्यटनस्थळ इसफाहन इथल्या स्त्रियांवर तर ॲसिड ॲटॅक झाले. या ॲटॅकमध्ये एकीचा जीव गेला, एकीचा डोळा गेला. या सर्व बातम्या दाबल्या गेल्या, मात्र सोशल माध्यमातून त्या पसरत राहिल्या.

या घटनेनंतर मासिहचा अर्थातच गोंधळ उडाला. इराणमधल्या स्त्रिया जोखीम घेत आहेत, हे ठाऊक असताना त्यांनी कुठल्याही संकटात सापडावं अशी तिची इच्छा नव्हती. आपण काही चुकत तर नाही ना, असं तिला वाटू लागलं. यापुढे फेसबुक पेजचे काय करायचे, असा विचार डोक्यात सुरू असतानाच तिने तिचा इनबॉक्स पाहिला; तर ॲसिड ॲटॅक झाले त्या दिवशी व त्यानंतर आठवडाभर आलेल्या फोटोंत सर्वाधिक फोटो इसफाहन याच शहरांतून होते. ‘ॲसिड इज नॉट आवर राईट, वुई डोन्ट डिझर्व्ह इट’ म्हणत बायकांनी ‘ॲसिड ॲटॅक झाले तरी आपण गप्प राहणार नाही, आपण माघार घ्यायची नाही’ असे सांगणारे असंख्य मेल तिला लिहिले  होते.

या इराणी धैर्यवान स्त्रियाच मासिहची ताकद बनल्या. मासिहची ‘माय स्टेल्दी फ्रीडम’ ही सोशल मीडियावरील ऑनलाईन चळवळ असल्याने एक आभासी नोंद म्हणून तुम्ही या चळवळीकडे पाठ फिरवू शकत नाही अशी ग्वाहीच जणू या स्त्रिया देत होत्या. हे माध्यम जरी आभासी असले तरी या माध्यमावर नोंद करणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं घेतलेली जोखीम जीवावर बेतण्याइतपत धोकादायक होती... आहे. थेट शासनाच्याच डोळ्यांत धूळ फेकून ही स्वातंत्र्यचोरी किती महागात पडणारी असेल याची कल्पना न केलेलीच बरी!

इतकी बंदिस्त आणि हुकूमशाही परिस्थिती असतानाही  आपल्या चोरीची अशी जगजाहीर वाच्यता करत मासिहसारख्या असंख्य निर्भीड इराणी स्त्रियांनी तिथल्या दमनशाहीविरुद्ध बंड पुकारले. इतर बायकांचा जीव धोक्यात घालणारी मासिह ही लंडन-न्यूयॉर्कमध्ये राहणारी कुणी उच्च, श्रीमंत घरातली, आरामात वाढलेली स्त्री आहे असा समज करून घेणार असाल, तर तिची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी.

मासिहचा जन्म ११ सप्टेंबर १९७६ रोजी, आगाजान आणि जरीन या दांपत्याच्या घरी सहाव्या अपत्याच्या रूपानं झाला. नकाशावरही इराणमधील गोमिकाला या खेड्याचा बिंदू दिसत नाही इतक्या चिमुकल्या खेड्यात तिचा जन्म झाला. मीना, अली, मोहसीन, हमीद, मेहरी ही तिची पाच भावंडं. तिचे वडील छोटे विक्रेते होते, तर आई अशिक्षित. दोन खोल्यांचं घर. प्रचंड गरिबी आणि तितकीच पारंपरिक धाटणी. घरात गरिबी होती तरी प्रेम आणि आनंद होता. वडील शिस्तीचे असले तरी प्रेमळ होते आणि म्हणूनच आपले लहानपण खूपच मजेत गेल्याचं मासिह सांगते.

मासिहचा जन्म झाला त्याच्यानंतर दोन वर्षांतच इराणच्या राजकारणात उलथापालथ झाली आणि इस्लामिक क्रांती सुरु झाली. इराणवर हुकूमशाही मार्गाने आधुनिकीकरण लादू पाहणारे पर्शियन राजे ‘शाह मोहम्मद रझा पेहलवी’ यांना देशातून हुसकावून लावण्यात आले आणि इस्लामिक रिपब्लिकची स्थापना झाली.

या क्रांतीतून तत्कालीन जनमानसाच्या खूप अपेक्षा होत्या. देशात ‘अच्छे दिन’ येणार अशी त्यांना खात्री होती. गरिबांच्या हाताला काम मिळेल, मुलांना उत्तम शिक्षण मिळेल, जीवनमान उंचावेल अशी अपेक्षा होती. त्यामुळे या क्रांतीला इराणच्या नागरिकांनी पाठिंबा दिला. मात्र प्रत्यक्षात घडलं उलटच.

संपूर्ण इराणचे इस्लामीकरण करण्याची सुरुवात झाली. शरिया कायदा आणण्यात आला. मानवाधिकारांचे हनन सुरू झाले. मुख्यत्वेकरून स्त्रिया या क्रांतीच्या बळी ठरल्या. त्यापूर्वी त्यांना समान वागणूक होती. हिजाबची सक्ती नव्हती. त्या मुक्तपणे वावरत होत्या, उच्चपदस्थ होत्या, न्यायाधीश पदावर होत्या. त्यांना संगीत-गाण्याची मुभा होती. हसण्या- खेळण्यावर बंधन नव्हते. स्टेडियममध्ये खेळ पाहण्यावर बंदी नव्हती. मात्र त्यांच्या हसण्यावर, आनंद घेण्यावर हळूहळू बंदी येत गेली.

एकएक करून त्यांना कोशात ढकलण्यास सुरुवात झाली आणि १९८३ मध्ये हिजाबचा पेहराव सक्तीचा करणारा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याने मुलगी सात वर्षांची झाली की, तिने हिजाब घालणे बंधनकारक ठरले. हिजाब व्यवस्थित घेतला नाही किंवा डोक्यावरचे- अगदी कपाळाजवळचे केस जरी दिसले तरी त्यासाठी कायद्याने कठोर शिक्षाही ठरविण्यात आली. हिजाब घालणाऱ्या स्त्रियांनाच शिक्षण, नोकरी करण्याची मुभा कायद्याने दिली.

हिजाब हा काही मीटर कापडाचा तुकडा न उरता त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवण्यात आला. शरीराचाच एक भाग. मासिहचे वडील पारंपरिक विचारांचे होते. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलींनाही हिजाब सक्तीचा केला. मासिहसुद्धा लहान वयातच हिजाब घालू लागली. पण त्याच वेळी ती पाहत होती की, तिच्या सख्ख्या मोठ्या भावावर मात्र कुठलीच बंधनं नव्हती. तो मुक्तपणे रस्त्यांवरून धावू शकत असे, फिरू शकत असे, उन्हाळ्यात पोहू शकत असे, गाडी चालवू शकत असे. ही  असमानता तिला डाचत होती, ती त्याविरुद्ध बोलत होती.

मासिह पहिल्यापासूनच चुकीच्या, अन्याय्य बाबींच्या विरोधात उभी राहत होती. शासनाच्या चुकीच्या बाबींवर बोट ठेवत होती. शाळेतल्या तिच्या ग्रुपमध्ये कम्युनिस्ट विचारसरणीची पुस्तके सापडल्याने वयाच्या अठराव्या वर्षी तिला अटक झाली. ज्या दिवशी तिचं लग्न होतं, त्या दिवशी ती व तिचा होणारा नवरा दोघांना अटक झाली. पाच वर्षांची शिक्षा सुनावली गेली. कालांतराने तिच्याविरुद्ध पुरेसे पुरावे न मिळाल्याने कोर्टाने तिची सुटका केली. त्यानंतर नजीकच्या काळात तिच्या वैयक्तिक आयुष्यातही उलथापालथ झाली होती. तिच्या पतीने तिला तलाक दिला आणि त्यांच्या लहानग्या मुलाचा ताबा त्याला मिळाला होता.

तिथून पुढे मुलाचा ताबा मिळवण्यासाठी तिचा संघर्ष सुरू झाला.

दरम्यान तिने पत्रकारितेत प्रवेश करून राजकीय पत्रकार म्हणून ओळख निर्माण केली होती. स्वतंत्र व्यक्ती बनली होती. इराणच्या ‘मजलिस’ या संसद भवनात जाऊन रिपोर्टिंग करणे, हा तिच्या जगण्याचा भाग झाला. तिने अनेक शासनकर्त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न केले. मुलाखती घेतल्या. काही वर्षांतच तिच्या निर्भिड पत्रकारितेमुळे तिला मजलिसमध्ये येण्यास बंदी करण्यात आली.

तिच्या मुक्त वृत्तीची किंमत तिला मोजावी लागणार होतीच. २००९ च्या इराणच्या निवडणुकीचा काळ जवळ आला होता. तेव्हा पुन्हा तुरुंगात डांबण्यात येणार असल्याची कुणकुण तिला लागली. ३३ वर्षे ज्या देशात ती राहत होती तिथून बाहेर पडली नाही, तर या वेळेस तिच्याबाबत फार मोठा घातपात होणार असं दिसत होतं म्हणून तिला नाइलाजास्तव देश सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

एका अर्थी देशानेच तिला हुसकावून लावले. तिथून ती इंग्लंडमध्ये गेली. इराणमध्ये तुरुंगवास झाल्याने पदवी शिक्षण घेऊ न शकणाऱ्या तिला इंग्लंडमध्ये ती संधी मिळाली. (मासिहने मागील नऊ वर्षांपासून तिच्या कुटुंबीयांना पाहिले नाही.)

सुरुवातीची पाच वर्षे लंडनमध्ये राहिल्यानंतर २०१४ पासून ती न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे. पत्रकारितेबरोबरच २०१० पासून तिने तिच्या कामाचे लक्ष्य मानवाधिकार प्रश्नांकडे वळवायचे ठरवले. मग ‘माय स्टेल्दी फ्रीडम’सारखी एक कॅम्पेन उभी राहिली. जिथं इराणीच नव्हे, तर ज्या कुठल्या देशांत स्त्रियांवर दमनशाही अवलंबली होती, त्या सगळ्यांना हक्काचं एक व्यासपीठच मिळालं.

मासिहचा विरोध हिजाबला नाही, मात्र त्याच्या सक्तीला जरूर आहे. इराण या तिच्या मायदेशात प्रत्येक स्त्रीला स्वत:साठी हिजाब निवडण्याचा अगर नाकारण्याचा अधिकार असायला हवा. ‘इराणच्या शेजारील इतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये, उदाहरणार्थ- तुर्की, पाकिस्तान, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान, इराक, लेबनन, सिरिया या देशांत धर्माचा प्रभाव असूनही हिजाबची अशी सक्ती नाही; मग आपल्या देशात का?’ म्हणत मासिहने हा लढा उभा केला.

मासिह म्हणते, ‘‘मी स्वत: तिसेक वर्षे हिजाब वापरला आहे. इतक्या वर्षांनंतर हिजाब आपल्या शरीराचाच भाग बनून गेलेला असतो. माझ्यासाठीसुद्धा हिजाब न घालणे अवघड होते. पण माझ्यावर सक्तीनं लादलेल्या त्या हिजाबमधून मला बाहेरही पडायचं होतं. माझ्या कुटुंबात माझी आई नखशिखांत हिजाबमध्येच असते. बहिणीही पूर्णवेळ- अगदी झोपतानाही हिजाब घालतात.

माझा विरोध हिजाबला नसून हिजाबच्या सक्तीला आहे. हिजाब घालणाऱ्या व न घालणाऱ्या दोन्ही व्यक्तींना एकत्र राहता आले पाहिजे. केवळ हिजाब वापरण्यास तयार नसणाऱ्याच मैत्रिणी यावर व्यक्त होत होत्या तर असं नव्हे. काही जणींनी स्वत: हिजाबचा स्वीकार केला आहे, मात्र तरीही त्यांना इतरांबाबत सक्ती नको होती.

मासिहने तिच्या पुस्तकात ‘द विंड इन माय हेअर’मध्ये म्हटले आहे की- तिची सर्वांत आवडती पोस्ट कोणती आहे, तर एका महिलेने नखशिखांत हिजाब घातला आहे आणि चेहऱ्यापुढे एक पाटी धरली आहे. त्यामुळे त्यात फक्त तिचे डोळे दिसत आहेत. त्या पाटीवर लिहिले आहे, ‘आय ॲम ॲन इराणीयन वुमन, ॲन्ड आय बिलिव्ह इन हिजाब ॲन्ड ॲट द सेम टाइम आय अभोर कंपलसरी हिजाब’ (मी इराणीयन स्त्री आहे आणि माझा हिजाब पेहरावावर विश्वास आहे, मात्र त्याच वेळी हिजाबच्या सक्तीची निंदा करते. तिरस्कार करते.)

मासिहला हेच तर अपेक्षित होते की, हिजाबची निवड जिची-तिची असावी  आणि जबरदस्तीचा कायदा नसावा. मासिह म्हणते, ‘‘इराणी स्त्रिया मुळातच निर्भीड असतात. इराणी स्त्रियांसारखं भयमुक्त होता आले पाहिजे. जिथं तुमच्यावर सतत पहारा आणि सतत दडपशाही असते, तिथल्या स्त्रियांना निर्भय होण्याशिवाय पर्यायच नसतो.’’

या फेसबुक पेजने महिनाभरातच पन्नास लाख लोकांचा पाठिंबा मिळवला होता. इराणी स्त्रिया या माध्यमातून उघडपणे सांगत होत्या की, त्यांना जर हिजाब निवडण्याचा अधिकार असता तर त्यांनी नक्कीच नाकारला असता. या कॅम्पेनमधून जाणारा हा मेसेज इराणमधल्या धार्मिक नेतृत्वासाठी धोक्याचा होता. या कॅम्पेनमध्ये स्त्रियांनी तर सहभाग घेतलाच, परंतु पुरुषही स्त्रियांच्या सोबतीने उभे राहिले. अल्पावधीत एक कोटी नागरिक या चळवळीचे पाठीराखे बनले.

मात्र तिला विविध प्रकारच्या धमक्या येऊ लागल्या. कुणी तरी पैसा पुरवत असेल इथपासून ते तिला इस्रायलची फूस आहे इथपर्यंत अनेक कहाण्यांत तिला गोवण्यात आले. आरोपांच्या फैरी उडवण्यात आल्या. इतकं करूनही ती डगमगली नाही, तेव्हा एक विचित्र प्रकार घडला.

इराणच्या स्टेट न्यूज चॅनेलवर लंडनमध्ये मासिहवर बलात्कार झाल्याची बातमी प्रदर्शित झाली. ‘मासिहच्या मुलासमोरच तीन जणांनी तिच्यावर बलात्कार केला’ अशा आशयाची फेकन्यूज होती. मासिहने हिजाब न घातल्याने तिच्यावर हे संकट कोसळलं, अशी भीती निर्माण करण्याचा शासनाचा कट होता.

बलात्काराची घटना म्हणजे स्त्रीनेच पुरुषांना चेतवले, असा अर्थ इराणमध्ये काढला जातो. त्यामुळे मासिहच्या कुटुंबीयांना त्यांच्या छोट्या गावात नाचक्की सहन करावी लागली. या घटनेद्वारे मासिहचे मनोबल ढासळवण्याचेही प्रयत्न झाले. मात्र ती मागे हटली नाही.

इराणमधल्या स्त्रियांचा सशक्त पाठिंबा आणि वेळप्रसंगी तुरुंगातही जाण्याची तयारी या दोन्ही गोष्टींनी मासिहचा विश्वास खरं तर वाढतच गेला.  इराणमध्ये पायाभूत सुविधांचे इतके महत्त्वाचे प्रश्न असताना मासिहने हिजाबचा हा छोटा मुद्दा इतका का उचलून धरला आहे, असाही सवाल तिला डाव्या विचारसरणींच्या लोकांनी केला. पण मासिहला हा हिजाबचा मुद्दा लहान वाटत नाही. दमनशाहीचे ते एक दृश्य स्वरूप वाटते आणि वयाच्या सातव्या वर्षीच जे स्त्रियांवर लादले जाते, ती गोष्ट लहान कशी असेल?

पायाभूत सुविधांचे प्रश्न आहेतच, त्या मिळायलाच हव्यात, पण महिलांच्या सामाजिक स्वातंत्र्याची किंमत चुकवून नव्हे. महिलांचे व्यक्तिस्वातंत्र्य कुठल्याच राज्यकर्त्याच्या अजेंड्यावर का नाही, असा प्रतिप्रश्न करून ती सक्तीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित करते. या कॅम्पेनमुळे हिजाबची सक्ती करणारा कायदा तातडीने बदलेल, अशी भाबडी अपेक्षा तिला नव्हतीच.

पण यातून तिला सांस्कृतिक उलथापालथ अपेक्षित होती. नकर देण्याच्या, पुढे येण्याच्या अनेकानेक संधी महिलांपुढे आहेत याची जाणीव त्यांना करून द्यायची होती आणि त्याला सुरुवात नक्कीच झाली होती. पुढे आलेल्या या स्त्रियांना स्त्रीवाद कळत नाही, त्यांना राजकारणाशीही देणं-घेणं नाही, त्या कार्यकर्त्या नाहीत, पुरोगामित्व कशाशी खातात त्यांना ठाऊक नाही. या सगळ्या सर्वसामान्य स्त्रिया. ज्यांनी हिजाबची सक्ती व त्याबरोबर येणाऱ्या इतर बंधनांचा अनुभव घेतला, त्या सर्वसामान्य स्त्रिया पुढे आल्या.

इतकंच नव्हे तर, या इराणी स्त्रिया आपल्या कथा-कहाण्या-फोटो माध्यमांवर टाकण्याची जोखीम घेऊन रस्त्यावर मार खायला किंवा तुरुंगातही जायला तयार झाल्या. कित्येकींना तर हा क्रूर अनुभव आलाच, पण त्यांनी माघार घेतली नाही. सध्याच्या काळात इराणमध्ये हिजाबच्या मुद्यावरून रण पेटले आहे. शासनाने बजेटमध्ये हिजाबच्या संरक्षणासाठी/ सक्तीसाठी १७० कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम मंजूर केली आहे, जिथं पर्यावरणाच्या संरक्षणासाठी केवळ पाच कोटी अमेरिकन डॉलर मंजूर केले आहेत.

याउलट मासिह म्हणते, ‘‘आमच्याकडे केवळ कॉम्प्युटर, मोबाईल आणि सोशल माध्यमे- टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर- अशी काही मोजकीच आयुधं आहेत. आणि युद्ध तर सुरू झाले आहे.’’ उदाहरण घ्यायचं तर मागच्याच वर्षीची घटना. दि. २७ डिसेंबर २०१७ रोजी ३१ वर्षीय मोवहेद नावाची महिला तेहरानमधील रिव्होल्यूशन स्ट्रीट या चौकातील ५ फूट उंच युटिलिटी बॉक्सवर चढली आणि तिने डोक्याचा स्कार्फ काढून तो सर्वांना दिसेल अशा रीतीने खांबाला बांधला. हिजाबच्या सक्तीविरुद्ध तिने केलेल्या या निषेधापायी तिला अटक झाली.

दुसऱ्या दिवशी अशाच रीतीने माशाद या शहरात निषेध झाला. तो व्हिडिओदेखील व्हायरल झाला. पोलिसांनी अटकमोहीम सुरू केली. २५ जणांचा मृत्यू आणि निषेधकर्त्या ३७०० जणांना अटक झाली. मोवहेदला गायब करण्यात आले. मासिहने ही घटना उचलून धरली. आंतरराष्ट्रीय दबावानंतर मोवहेदची सुटका झाली. महिला डोक्यावरचा स्कार्फ काढून सक्तीच्या हिजाबचा निषेध जागोजागी करत आहेत. हिजाबविरोधी असणाऱ्या तीस कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.

मात्र आज तिथल्या स्त्रिया ओरडून सांगत आहेत, ‘माझ्या शरीराचं काय करायचं हे सांगणाऱ्या शासनाला मी वैतागले आहे.’ तर कुणी म्हणत आहे, ‘आज जर तुम्ही मला अटक कराल तर लक्षात घ्या, माझ्यासारख्या अनेक जणी निषेधासाठी रस्त्यावर येतील.’

इतकी उलथापालथ घडत असतानाही काहींनी ‘स्वातंत्र्याची चोरी’ या शब्दालाच विरोध केला. जे चोरून मिळवावं लागतं ते स्वातंत्र्य कसं म्हणता, अशी हेटाळणी करण्यात आली. पण मासिह म्हणते, ‘‘गुपचूप, चोरून मिळवलेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नाहीच; आणि जेव्हा इराणी स्त्रिया त्यांच्या या चोरीची सोशल माध्यमावर जाहीर मांडणी करतात, तेव्हा तिथं गुपित असं काहीच उरत नाही, उलट ते स्वातंत्र्याच्या मागणीचं जाहीर व्यासपीठ बनून जाते. आणि जोवर आम्हा सगळ्या जणींच्या केसांशी वाऱ्याची झुळूक हितगुज करत नाही, आम्ही आमच्या केसांत वारा अनुभवत नाही, तोवर हा संघर्ष सुरूच राहील! उघडपणे स्वातंत्र्याची चोरी होतच राहील...!’’

Tags: महिला माय स्टेल्दी फ्रीडम मासिह अलिन्जाद हिनाकौसर खान २०१८ युवा साधना दिवाळी अंक इराणी हिजाब इराण व्हाईट वेन्सडे फेसबुक पेज स्वातंत्र्याची चोरी द विंड इन माय हेअर: माय फाईट फॉर फ्रीडम इन मॉडर्न इराण’ माय स्टेल्दी फ्रीडम’ masih alinjade The wind in my hair- my fight for freedom in modern iran swatantyrachi chori white wedenesday hijab iran facebook page my stealthy freedom heenakausar khan yuwa sadhana Diwali ank 2018 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हिनाकौसर खान-पिंजार,  पुणे, महाराष्ट्र
greenheena@gmail.com

पत्रकार, लेखक 


प्रतिक्रिया द्या