डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

या डॉक्युमेंटरीमध्ये सिरियाची झैना आहे तशीच फिलिपिन्सची इंदे व्हेरॉनाही आहे. ती म्हणते, ‘पत्रकारिता म्हणजे सत्य सांगणं. आपल्या आजूबाजूला अन्याय होत असताना आपण कोणत्याच बाजूचे नाही असा आव आणणं मला अनैसर्गिक वाटतं.’ तिथल्या भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात काम करताना आपल्याला किती त्रास सहन करावा लागला, किती धोका पत्करावा लागला याचं वर्णन तिने केलंय. इथे कॅमरूनमधली रेडिओ जर्नलिस्ट मौसा मरादाता आपल्याला भेटते आणि आदिवासींचा आवाज बनलेली पण पोलीस आणि नक्षलवादी अशा दोन्ही बाजूंचा राग ओढवून घेतलेली, आपल्या कामामुळे अखेरीला बस्तरमधून बाहेर पडावं लागलेली मालिनी सुब्रमण्यमही भेटते. बांगला देशात इस्लामी कट्टरवाद्यांकडून ज्याची हत्या करण्यात आली त्या अविजित रॉयची पत्नी रफिदा बोनया अहमदही तिची कहाणी सांगते. (या हल्ल्यात बोनयाची दोन बोटंही कापली गेली होती.)      

23 ते 30 मे या दरम्यान तुर्कस्तानात, अंकारा इथे 22 वा फ्लाईंग ब्रूम इंटरनॅशनल वीमेन्स फिल्म फेस्टिव्हल पार पडला. ज्युरी म्हणून सहभागी झाल्यामुळे पहायला मिळालेल्या महोत्सवातल्या तीन महत्त्वाच्या डॉक्युमेंटरीज विषयी...

पडद्यावर दिसते ती एका फोटोग्राफरसमोर उभी असलेली मानिया अकबरी. पूर्णपणे उघडी. अंगावर शहारा आणणारं तिचं शरीर. आणि तिचा शांत चेहरा. स्तनांचा कॅन्सर झाल्यामुळे तिचा एक स्तन पूर्णपणे काढून टाकण्यात आलाय आणि दुसऱ्या स्तनाच्या खालून पाठीपर्यंत शस्त्रक्रियेच्या खुणा दिसताहेत. मानिया फोटो काढून घेतेय तो ब्रेस्ट एनहान्समेंट (कृत्रिमरीत्या स्तन मोठे करणाऱ्या) सर्जरीच्या उद्देशानेच. ‘अ मून फॉर माय फादर’ ही डॉक्युमेंटरी बनवलीये मानिया अकबरी आणि तिचा नवरा डग्लस व्हाईट यांनी.

या सर्जरीच्या निमित्ताने 2013 पासून सुरू झालेला मानियाचा पुढच्या चार वर्षांचा प्रवास यात या दोघांनी चित्रित केलाय. पण फक्त हा प्रवास म्हणजे ही डॉक्युमेंटरी नाही, तर त्या निमित्ताने या दोघांनी एकमेकांशी केलेल्या संवादामधून आपल्यासमोर अनेक गोष्टी उलगडत जातात. मानियाचं इराणमध्ये गेलेलं बालपण, इराणइराक युद्धाचा तिच्यावर झालेला परिणाम, शहाच्या काळात इराणमध्ये असलेला आणि खोमेनीच्या आगमनानंतर हरवून गेलेला मोकळेपणा अशा अनेक घटनांमधून ती आपल्या शरीराविषयी बोलते. इराणमधल्या बायकांचं बुरख्यातलं कोंडलेपण आणि मानियाने स्वीकारलेलं स्वत:चं शरीर, ते शरीर लोकांसमोर उघडं करण्याचं तिचं धैर्य आणि शरीराबरोबरच मनाची गुलामगिरी झिडकारण्याचं धाडस पाहून आपण थक्क होऊन जातो. त्याबरोबरच बंडखोरी केल्यामुळे आज आपण आपल्या देशात परतू शकत नाही याची एक बारीकशी खंतही डोकावते.

दुसऱ्या बाजूला डग्लसही आपल्या अनुभवांविषयी बोलतोय. व्यवसायाने शिल्पकार असल्याने अनेकदा आपल्या कामात त्याने प्लॅस्टिकचा उपयोग केलाय. निरुपयोगी हवा गेलेल्या टायर्सच्या प्लॅस्टिकविषयी सांगताना मध्येच तो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा दाखला देत म्हणतो, ‘त्यावेळी मला एक वटवाघूळ दिसलं होतं आणि त्याच्या पंखांकडे पाहताना माझ्या कामात मी वापरत असलेल्या रबराची आठवण मला झाली होती.’ मानियाचे स्तन मोठे करण्यासाठीही सिलिकॉनसारख्या रबरी घटकाचाच तर वापर होतोय. मानिया आणि डग्लस आपापल्या अनुभवांचं रबराशी असलेलं नातं या संवादातून उलगडून सांगतात.

पडद्यावर दिसणाऱ्या चित्रांमधून ते नातं आपल्यापर्यंत पोचवतात. आणखीही पदर आहेत या डॉक्युमेंटरीला. मानियाच्या बालपणीच्या इराणचे धार्मिक, राजकीय, सामाजिक पदर. खोमेनीच्या आधीच्या तेहरानमधल्या ग्राफिटी मानिया आपल्याला दाखवते. आणि मग हळूहळू या ग्राफिटीमधून बायका कशा नष्ट होत गेल्या ते सांगते. आपल्या आयुष्यातला हा बदल सांगता सांगता त्याचं नातं ती थेट सध्या तेहरानमध्ये बुरखा फेकून देणाऱ्या बायकांशी लावते. विजेच्या खांबावर चढून आपल्या डोक्यावरचा बुरखा हवेत भिरकावून देणाऱ्या बायकांची एक चळवळच मधल्या काळात तेहरानमध्ये सुरू झाली होती. यातल्या अनेक बायकांना अटकही झाली पण म्हणून बायका थांबायचं नाव घ्यायला तयार नव्हत्या. शेवटी प्रशासनाने या विजेच्या खांबावर उभं राहता येणार नाही, असे धातूचे ब्लॉक्स बसवले. पण बायका त्याहून हुशार, त्यांनी वर लाकडी फळ्या टाकल्या आणि आपला निषेध चालूच ठेवला. ही घटना पडद्यावर पाहताना मानिया डग्लसला आणि पर्यायाने आपल्याला सांगते, ‘मला ते सरकार आणि लोकांनी एकत्र येऊन बनवलेलं हे शिल्पच वाटतंय.’

मानिया आणि डग्लस यांनी या डॉक्युमेंटरीच्या सादरीकरणातही प्रयोग केलेले आहेत. यात अर्थातच मानियाची गोष्ट अधिक प्रभावी आहे यात शंकाच नाही. तिच्या प्रवासाला, तिच्या वेदनेला, तिच्या अस्तित्त्वाला खूप जास्त कंगोरेही आहेत. म्हणूनच तिचं धाडस अधिक भावणारं आहे. लंडनमध्ये केलेल्या ब्रेस्ट इम्प्लान्टेशननंतर तिथल्या डॉक्टरांनी मानियाला मूल होऊ देण्याचा सल्ला दिला. नव्याने कॅन्सरच्या पेशी निर्माण न होण्यासाठी त्यामुळे तिच्या शरीराला अधिक बळ मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं. आधीच्या शस्त्रक्रियेसाठी शारीरिक वेदना सहन केलेली मानिया या नवीन आव्हानासाठी तयार झाली. पण कॅन्सरमुळे तिच्या शरीरातल्या ओव्हरीज काढून टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन)शिवाय पर्याय नव्हता. बाळाच्या जन्मानंतर त्याला पाजताना मानिया म्हणते, ‘सर्जरी केलेल्या माझ्या स्तनांमधून दूध यायला लागलं आणि मला तो चमत्कारच वाटला.’

आज मानिया आणि डग्लसचा मुलगा अठरा महिन्यांचा आहे. या डॉक्युमेंटरीचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, मानिया किंवा डग्लस आपल्या दु:खाचं, वेदनेचं, आपल्या भोवती वावरणाऱ्या मृत्यूचं किंचितही अवडंबर माजवत नाहीत. त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये कोणताही मेलोड्रामा नाही. भावनांचा अतिरेक नाही. हा एक प्रवास आहे, अत्यंत खाजगी, वैयक्तिक अनुभवांचा आणि तरीही सामाजिक स्तर असलेला प्रवास. राजकीय पदर असलेला प्रवास. पडद्यावर दिसणारी प्रत्येक फ्रेम त्या प्रवासाशी सुसंगत आहे. त्या भावनांना पुढे नेणारी आहे.

फिप्रेसी या चित्रपट समीक्षकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची सभासद म्हणून फ्लाईंग ब्रूम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मी ज्युरी म्हणून गेले होते. माझ्याबरोबर नॉर्वेची क्रिस्टिन आणि बेल्जियमची सारा होती. मानिया अकबरीची ही डॉक्युमेंटरी बघितल्यानंतर सर्वोत्कृष्ट सिनेमाचं पारितोषिक कोणाला द्यायचं यासाठी आम्हाला फारसं झगडावं लागलं नाही. तिघींनीही एकमताने ‘अ मून फॉर माय फादर’ला आपली पसंती दिलेली होती. मात्र, स्पर्धेतल्या आणखी एका डॉक्युमेंटरीने आमचं लक्ष वेधून घेतलं.

‘फिमेल प्लेजर’ ही बार्बरा मिलरची फिल्म पाच देशांमधल्या अतिशय वेगवेगळ्या संस्कृतींमधल्या पाच बायकांची गोष्ट सांगते. स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलते. त्याची कशी मुस्कटदाबी होते हे त्या त्या बायकांच्या अनुभवांमधून सांगते. सरधोपट पद्धतीने. यात फारसे चढ-उतार नाहीत, प्रयोग नाहीत. पण मुळात या बायकांच्या कहाण्याच इतक्या ताकदवान आहेत की अंगावर काटा यावा. डेबरा फेल्डमन, लायला हुसेन, रोकुदे- नाशिको, डॉरीस वाग्नर आणि विथिका यादव या त्या पाच बायका. प्रत्येकीला आपापल्या देशातल्या परंपरावाद्यांचा कधी ना कधी सामना करावा लागला आहे. या पाचही जणी ॲक्टिव्हिस्ट आहेत, किंबहुना परिस्थितीने त्यांना तसं बनवलंय. डेबरा फेल्डमनचं सतराव्या वर्षी तिच्याच ज्यू समाजातल्या हॅसिडिझम पाळणाऱ्या धार्मिक घरातल्या मुलाशी लग्न झालं आणि एकोणीस वर्षांची असताना ती आईही बनली. पण न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या या मुलीला घरातलं पराकोटीचं धार्मिक वातावरण, त्यापायी मुलींवर घातलेली बंधनं, तिच्याकडून असलेल्या अपेक्षा यात होणारी घुसमट सहन झाली नाही. आर्थिक पाठबळ नसतानाही तिने घर सोडलं, छोटीमोठी कामं केली, कालांतराने ती बर्लिनला स्थायिक झाली. तिने लिहिलेलं आत्मचरित्र, ‘अनऑर्थोडॉक्स : द स्कॅन्डलस रिजेक्शन ऑफ माय हॅसिडिक रूट्‌स’ खूप गाजलं. लेखक म्हणून आज तिने चांगलं नाव कमावलंय.

लायला हुसेन ही सोमालियामध्ये जन्माला आलेली ब्रिटिश मानसोपचारतज्ज्ञ आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये ती फिमेल जेनायटल म्युटिलेशन (एफजीएम) म्हणजेच लहान वयात मुलींचं बाह्य जननेंद्रिय काढून टाकणं याबाबत बोलते. मुसलमानांमध्ये पुरुषांची सुन्ता करतात, तशीच त्यांच्यातल्या काही जमातींमध्ये ती लहान मुलींचीही करतात. आठ-नऊ वर्षांच्या मुलीसाठी ही अत्यंत वेदनादायी प्रक्रिया असते. स्वत: लायलाने ती भोगलेली आहे. आणि अशा अमानवी प्रथेबाबत जागरूकता निर्माण व्हावी असा तिचा प्रयत्न आहे. त्यासाठी तिने एक संस्थाही स्थापन केली आहे. मुलींबरोबरच मुलग्यांना हे समजावं असं तिला वाटतं. या डॉक्युमेंटरीमध्ये तसा एक प्रसंगही आहे. चिकणमातीने बनवलेलं स्त्रीचं जननेंद्रिय आपल्याला दिसतं. आणि काही तरुण मुलग्यांना लायला आपल्या हातातल्या कात्रीने ते कसं कापलं जातं हे सांगते. सुरुवातीला बाईच्या शरीराचा हा भाग बघताना लाजणाऱ्या मुलांचा चेहरा कात्रीने तो कापताना पाहून भीतीने कावराबावरा होतो. आपल्या बहिणीवर आपण ही वेळ कधीच येऊ देणार नाही, असं त्यातला एकजण उघडपणे बोलतोही. एफजीएम असं म्हटलं की त्यात एक  कोरडेपणा येतो, पण प्रत्यक्ष तो काय प्रकार आहे हे समोर दिसल्यावर त्यातली भयानकता जाणवते. बायकांप्रमाणेच ती पुरुषांनाही जाणवायला हवी असा लायलाचं प्रयत्न असतो.

रोकुदे-नाशिको (तिचं खरं नाव आहे इगाराशी मेगुमी) ही जपानमधली तरुण मुलगी. शिल्पकार आहे, मांगा आर्टिस्ट आहे. स्त्रीच्या योनीभोवती असलेलं गूढ, त्याविषयी मोकळेपणाने न बोलणं याच्या विरोधात आपण काहीतरी करायला हवं असं तिला वाटलं आणि तिथे आपल्या योनीचा साचा बनवून त्याभोवती ती आपली कला रचते. ही कला संस्कृतीविरोधी आहे म्हणून तिला अनेक वेळा अटक होते. पण पुरुषाच्या लिंगाचं शिल्प होऊ शकतं तर स्त्रीच्या का नाही? असा प्रश्न करून ती न्यायालयात लढते. आणि निर्दोष सुटतेही. आजही तिचं हे काम चालूच आहे.

डॉरीस वाग्नर जर्मन आहे. धार्मिक स्वभावाची असल्यामुळे ती नन्‌ झाली. चर्चमधल्या प्रिस्टने तिच्यावर बलात्कार केला. त्याविषयी चर्चकडे दाद मागितल्यावर सगळ्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. शेवटी ती चर्चमधून बाहेर पडली. त्यानंतर तिने आपलं आत्मचरित्र लिहिलं. रोमन कॅथलिक चर्चमध्ये लैंगिक शोषण कसं चालतं यावर भाष्य केलं. अर्थात, बलात्कारासारख्या भयंकर अनुभवातून बाहेर पडून पुन्हा नॉर्मल आयुष्य जगण्यापर्यंतचा प्रवास अतिशय कठीण होता. आज तिने लग्न केलंय. तिला एक मुलगाही आहे.

विथिका यादव दिल्लीची आहे. मानवी अधिकार, स्त्री पुरुष समानता, मानवी तस्करी, लैंगिक आणि प्रजोत्पादनाचं आरोग्य आणि अधिकार हे तिचं कामाचं क्षेत्र. द्वेष नको, प्रेम करा हे तिचं तत्त्व. ‘लव्ह मॅटर्स इंडिया’ या संस्थेची ती प्रमुख आहे. प्रेम, सेक्स, नातेसंबंध याबाबत ही संस्था समुपदेशन करते. पण वरवर वाटतं तेवढं हे काम सोपं नाही. अनेक प्रकारच्या ट्रोल्सना तिला सामोरं जावं लागतं. धमक्या येतात. या डॉक्युमेंटरीमध्ये समलिंगी संबंध हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहेत असं म्हणणाऱ्या एका हिंदुत्ववादी संघटनेच्या पुरुषाशी होणारा तिचा वाद आपण बघतो. आणि अतिशय शांतपणे आपला मुद्दा समजावून सांगणाऱ्या विथिकाविषयी मनात आदर निर्माण होतो.

जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधल्या, निरनिराळ्या संस्कृतींमधून येणाऱ्या बायकांना कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागतंय, त्यांच्या लैंगिकतेविषयी जागरुकता निर्माण होण्याची गरज कशी आहे आणि पुरुषांनी त्याकडे अधिक सजग होऊन पाहणं किती गरजेचं आहे हे समर्थपणे ही डॉक्युमेंटरी आपल्यासमोर मांडते.

ज्या तिसऱ्या डॉक्युमेंटरीविषयी मला लिहायचंय ती आहे भारतातल्या नुपूर बासूची. ‘वेल्वेट रेव्हॉल्यूशन’ स्पर्धेत नव्हती. पण जगभरातल्या महिला पत्रकारांना ज्या धोक्यांशी, संकटांशी सामना करावा लागतोय त्याचा वेध या डॉक्युमेंटरीमध्ये घेतलेला आहे आणि म्हणून ती मला महत्त्वाची वाटली. बातमी पोचवणारेच जेव्हा दहशतीमुळे बातमी बनतात तेव्हा परिस्थिती किती विदारक बनली आहे याचं ते द्योतक असतं. चार देशांमधल्या इलान्ग इलान्ग क्विआनो, दिपिका शर्मा, पोची ताम्बा सोह, सिदोनी पाँगमोनी आणि इव्हा ब्राऊनस्टेन या महिला दिग्दर्शकांबरोबर नुपूरने काम केलं आणि वेगवेगळ्या देशांमधल्या महिला पत्रकारांच्या कामावर प्रकाशझोत टाकला. फिलिपिन्स, भारत, कॅमरून, बांगला देश, सिरिया, अफगाणिस्तान, युके आणि पनामा पेपर्सच्या संशोधनावर काम करणाऱ्या पत्रकार. काही स्थानिक राज्यकर्त्यांशी पंगा घेणाऱ्या तर काही आपल्या भोवतालची युद्धसदृश परिस्थिती कव्हर करणाऱ्या पत्रकार.

आज दक्षिण तुर्कस्तानात राहणारी सिरियाची पत्रकार झैना एरहॅम म्हणते, ‘मला काही युद्धाचं रिपोर्टिंग करणारी पत्रकार व्हायचं नव्हतं. पण युद्ध माझ्या दाराशीच आल्यावर माझ्यासमोर पर्यायही उरला नाही.’ ती काम करत असताना तिचा नवरा तिच्यासाठी बॉडीगार्ड म्हणून बाजूला उभा असलेला आपल्याला दिसतो. या डॉक्युमेंटरीमध्ये सिरियाची झैना आहे तशीच फिलिपिन्सची इंदे व्हेरॉनाही आहे. ती म्हणते, ‘पत्रकारिता म्हणजे सत्य सांगणं. आपल्या आजूबाजूला अन्याय होत असताना आपण कोणत्याच बाजूचे नाही असा आव आणणं मला अनैसर्गिक वाटतं.’ तिथल्या भ्रष्ट प्रशासनाच्या विरोधात काम करताना आपल्याला किती त्रास सहन करावा लागला, किती धोका पत्करावा लागला याचं वर्णन तिने केलंय. इथे कॅमरूनमधली रेडिओ जर्नलिस्ट मौसा मरादाता आपल्याला भेटते आणि आदिवासींचा आवाज बनलेली पण पोलीस आणि नक्षलवादी अशा दोन्ही बाजूंचा राग ओढवून घेतलेली, आपल्या कामामुळे अखेरीला बस्तरमधून बाहेर पडावं लागलेली मालिनी सुब्रमण्यमही भेटते. बांगला देशात इस्लामी कट्टरवाद्यांकडून ज्याची हत्या करण्यात आली त्या अविजित रॉयची पत्नी रफिदा बोनया अहमदही तिची कहाणी सांगते. (या हल्ल्यात बोनयाची दोन बोटंही कापली गेली होती.)

सर्व प्रकारच्या बंधनांवर मात करून अफगाणिस्तानसारख्या देशात आपलं काम चालू ठेवणारी नजीबा अयुबी तिच्यासमोरची आव्हानं सांगते. या बायका केवळ बायका म्हणून बोलत नाहीत, बाई म्हणून अर्थातच त्यांच्यासमोरचा मार्ग अधिक खडतर असतोच, पण एकूणच पत्रकारितेविषयी त्या बोलतात. लोकांपर्यंत बातमी पोचवण्यासाठी आपण जिवावर उदार व्हायला का तयार आहोत हे सांगतात. नवऱ्याच्या हत्येनंतर अनामिक ठिकाणी आपलं वास्तव्य हलवलेली बोनया अहमद अजूनही आपला ब्लॉग लिहिते. आपल्या देशातल्या अतिरेक्यांच्या विरोधात भूमिका घेते. आणि म्हणते, ‘लढाईमध्ये मी माझ्या सहकाऱ्यांना असं एकटं नाही ना सोडून देऊ शकत!’ सरकारच्या विरोधात, कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर मात करून निश्चयाने आणि निर्धाराने काम करणाऱ्या या बायका पाहून मनाला धीर मिळतो. आजुबाजूला हिंसा, धर्माची अफू, जातीय तेढ वाढत असताना त्यांच्याकडे पाहून वाटतं, सगळंच काही संपलेलं नाही, जोपर्यंत यांच्यासारख्या पत्रकार आहेत तोपर्यंत सगळं संपणारही नाही!

Tags: फिमेल प्लेजर मानिया अकबरी अ मून फॉर माय फादर बार्बरा मिलर मीना कर्णिक Barbara Miller Maniya Akbari #Female Pleasure A moon for my father Meena Karnik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मीना कर्णिक,  मुंबई
meenakarnik@gmail.com


प्रतिक्रिया द्या