डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

हेमचंद्र गवाणकर : गांधीविचारांचा पाईक

कामगारांसाठी करीत असलेल्या गवाणकरांच्या कामात ‘ह्यूमन टच’ होता, जो त्यांच्यावर असलेल्या गांधी विचारसणीचा प्रभाव होता. ते कामगारांत प्रिय होते. ‘आपली कंपनी हे आपले मंदिर आहे, त्याचे पावित्र्य आपणच राखले पाहिजे. कामात अप्रामाणिकपणा करता हे जर सिद्ध झाले तर परत युनियनची पायरी चढायची नाही. हक्क हवेत तर निष्ठापूर्वक काम हवे’ अशी त्यांची कामगारांना शिकवण होती. जे योग्य तेच मागायचे, चर्चा करून प्रश्न सुटतात आणि मार्ग सत्याचा व अहिंसेचा असेल न्याय मिळवता येतो अशी त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती, तिच्यावर गांधीजींच्या विचारसरणीचा प्रभाव होता. निवृत्तीनंतरही त्यांनी युनियनचे काम करावे ही कामगारांची विनंती त्यांनी अमान्य केली आणि कामगारांना सांगितले, ‘ही तुमची युनियन आहे, ती तुम्हीच आता चालवली पाहिजे. मी आता बाहेरचा माणूस आहे. गरज असेल तेव्हा तुम्ही मला सल्ला विचारू शकता, पण तो मान्य करणे हे तुमच्यावर बंधनकारक असणार नाही.

हेमचंद्र गवाणकर यांचे 12 जानेवारीला वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. शालेय जीवनात गांधीविचाराने प्रभावित झालेले गवाणकर आयुष्यभर त्याच विचारसरणीचा आधार घेऊन कार्यरत राहिले. दि.28 जानेवारी 1927 रोजी मुंबईजवळील वसई येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रंगनाथ हे मुंबई विद्यापीठाच्या एम.बी.बी.एस.च्या पहिल्या तुकडीतून डॉक्टर झाले होते. तर काकांनी मुळशीच्या सत्याग्रहात भाग घेतला होता आणि त्यासाठी दोन वर्षे सक्तमजुरीचा तुरुंगवासही सोसला होता. हेमचंद्र शाळेत असताना घरात कार्यकर्त्यांमध्ये, स्वातंत्र्यसैनिकांचे सतत येणे-जाणे असायचे. या सर्वांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण काही तरी करायला पाहिजे, ही भावना लहानपणीच त्यांच्या मनात जागृत झाली. ते ज्या वसईच्या शाळेत होते, तिथे रोज सकाळी शाळा भरताना ‘विद्या मंदिर सुंदर राहो प्रगतिपथावर...’ अशी शाळेतील एका शिक्षकाने केलेली प्रार्थना म्हटली जायची. 
तो 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा काळ होता. गवाणकरांच्या मनात विचार आला- ‘देशात स्वातंत्र्य चळवळ चालू असताना आपण रोज ही प्रार्थना का म्हणायची?’ त्यांनी ठरवलं की, आपण देशाची प्रार्थना म्हणायची. बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगून त्यांनी त्या दिवशी ‘वंदे मातरम्‌’ हे राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली आणि शाळेच्या गच्चीत काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकवला. 
शाळेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे त्यांनी केलेले बंड होते. शाळेची ग्रँट बंद होईल, शाळेवर बंदी येईल, अशी भीती वाटल्याने व्यवस्थापकांनी त्यांच्या वडिलांना शाळेतील त्यांचे नियमबाह्य वर्तन कळवले आणि हेमचंद्र गवाणकरांना शाळेत यायला बंदी घातली. त्यांच्या वडिलांनी शाळेला उत्तर पाठविले की, ‘माझ्या मुलाने जे केले ते देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी केले आहे आणि मला नाही वाटत की, त्याने काही चुकीचे केले आहे; पण तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे त्याच्यावर कारवाई करू शकता.’ 
हेमचंद्र गवाणकरांना तीन महिने कारावासाची शिक्षा झाली आणि ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगातून सुटून आल्यावर मिरवणुकीचे नेतृत्व केले म्हणून गवाणकरांना परत एकदा आणखी तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली. त्यामुळे गवाणकरांचे जरी मॅट्रिकचे वर्ष वाया गेले, तरी आपण देशासाठी काही तरी करू शकलो याचा त्यांना आनंद अधिक होता. गवाणकर शाळेत असताना लोकसेना नावाच्या स्वयंसेवी संघटनेत होते. या सेनेची कम्युनिस्ट विचासरणी होती, पण गवाणकर यांचा कल काँग्रेसकडे होता. 
राष्ट्र सेवादल 1940 पासून सुरू झाल्यावर गवाणकरांनी त्यात जायला सुरुवात केली. 1942 च्या लढ्याच्या वेळेस गवाणकर सेवादल आणि स्टुडंट युनियनमध्ये सक्रिय होते. दिनकर साक्रीकर, प्रभाकर कुंटे, गोदावरी परुळेकर हे युनियनचे नेतृत्व करीत होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अशा पहिल्या फळीतील नेत्यांना आंदोलन सुरू होताच ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले. एस.एम.जोशी, अरुणा असफअली, अच्युतराव पटवर्धन असे दुसऱ्या फळीतील नेते भूमिगत झाले होते. 
हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी या भूमिगत नेत्यांचा एकमेकांशी संपर्क होणे, त्यांचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. त्यावेळेस गवाणकरांसारखे अनेक तरुण या भूमिगत नेत्यांच्या संपर्कात होते. त्या नेत्यांचे एकमेकांना निरोप पोहोचवणे, पत्रके तयार करणे, वाटणे, भूमिगतांना योग्य स्थळी पोहोचविणे अशी कामे हेमचंद्र रात्रंदिवस परिणामांची तमा न करता करीत होते. फाळणीच्या वेळी गांधी व जीना यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. कधी त्या जीनांच्या बंगल्यात व्हायच्या तर कधी गांधींच्या निवासस्थानी, पेटिट मॅन्शन येथे व्हायच्या. तेव्हा गांधीजींच्या दैनंदिन कार्यक्रमाची व त्या दोघांमधील बैठकीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी राष्ट्र सेवादलावर होती, आणि राष्ट्र सेवादलाने त्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवकामध्ये गवाणकर प्रमुख होते. 
गवाणकर तेव्हा कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला होते. त्या महिनाभराच्या कालखंडात गांधीजींचा लाभलेला सहवास हे गवाणकर यांच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठे भाग्य होते. त्या वेळच्या आठवणी सांगताना गवाणकर म्हणत की, ‘त्या काळात मी गांधीजींचा कार्यकर्त्यांबरोबर असणारा सुसंवाद पाहिला होता. महात्माजींचे गोड हसणे बघितले होते, तसाच गंभीर प्रसंगातला त्यांचा निश्चयी चेहराही पाहिला होता. मला अजून आठवतंय, फाळणीची चर्चा सुरू होती, पण त्यांची भाषा मृदु होती आणि चेहऱ्यावर सात्विक शांततेचा भाव होता. येणारे स्वातंत्र्य कुठल्या मार्गाने यावे आणि आलेले स्वातंत्र्य कसे असावे यांवर काँग्रेस पक्षात मतभेद होते, पण गांधीजींना अहिंसेच्या मार्गानेच स्वातंत्र्य हवे होते.’ 
स्वतंत्र भारतात हेमचंद्र गवाणकर आयुष्यभर गांधी विचारसरणीशी प्रामाणिक राहून जगले. अर्थशास्त्रसमाजशास्त्र यांतील एम.ए.ची पदवी संपादन केल्यानंतर ते एका छोट्या खासगी विमान कंपनीत नोकरीला लागले.  तेव्हा अशा सात छोट्या विमान कंपन्या होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेव्हाचे पंतप्रधान नेहरू यांनी गवाणकर नोकरी करीत असलेल्या व अन्य छोट्या खासगी कंपन्यांचे विलीनीकरण करून इंडियन एअरलाइन्स ही कंपनी स्थापन केली- भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सुरुवातीच्या काळात हैदराबाद संस्थान विलीनीकरणासारख्या महत्त्वाच्या घटनांत भारतीय सैन्याला या कंपनीने मदत केली होती. तेव्हा नेहरू म्हणाले होते की, इंडियन एअरलाइन्स ही आपल्या भारत सरकारची ‘सेकंड लाईन ऑफ डिफेन्स’ आहे. 1974 मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये कामगारांच्या संपामुळे व्यवस्थापनाकडून जवळजवळ दोन महिने टाळेबंदी घोषित करण्यात आली. टाळेबंदी उठल्यावर गवाणकर युनियनच्या कामात अधिक सक्रिय झाले आणि कामगारांची संघटना मजबूत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
व्यवस्थापनाने देऊ केलेली ऑफिसरची बढती  त्यांनी युनियनचे काम करता यावे म्हणून नाकारली. युनियनच्या मागण्यांसाठी 1984 मध्ये पुन्हा एकदा संप करावा लागला तेव्हा गवाणकरांनी हा संप अहिंसक मार्गाने यशस्वी केला. एकही अनुचित प्रकार न घडलेल्या या संपाचे मुंबईच्या पोलीस खात्यानेही कौतुक केले. इंडियन एअरलाइन्सच्या रिजनल डायरेक्टरने गवाणकर यांचा इंडियन एअरलाइन्सचे गांधीजी म्हणून उल्लेख केला. त्यानंतर युनियनमधील कोणतेही पद न घेतलेल्या या गवाणकरांशी चर्चा केल्याशिवाय व्यवस्थापनाकडून कामगारांविषयीचा कोणताही निर्णय घेतला जात नसे.
इंडियन एअरलाइन्स व एअर इंडिया या दोहोंसाठी लेबर रिलेशन कमिटीची स्थापना जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. ही समिती अखिल भारतीय होती. त्यात व्यवस्थापनाचे दहा आणि कामगार युनियनचे दहा असे वीस प्रतिनिधी असायचे. देशभरातील युनियनच्या शाखा आपले प्रतिनिधी निवडणुकीने निवडीत. ही निवड दर दोन वर्षांनी होत असे. गवाणकर या समितीत आठ वर्षे प्रतिनिधित्व करीत होते. या समितीत कामगार व कंपनीतील हिताच्या बाबी, नियम यावर चर्चा होऊन निर्णय होई. गवाणकरांनी आपले वक्तृत्व आणि युक्तिवाद यांच्या साह्याने या समितीमार्फत खूप चांगल्या व विधायक गोष्टी घडवून आणल्या. ऑफिसच्या सर्व कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म आणि धोबीखर्च त्यांनी मिळवून दिला. औषधोपचाराचा खर्च हा कामगार तसेच अधिकारी वर्ग यांनाही निवृत्तीनंतर सुरू राहावा, यासाठी यशस्वी पाठपुरावा केला. चतुर्थ श्रेणीतील कामगारांना गवाणकरांनी स्वत:च्या हक्काच्या घरासाठी व्यवस्थापना- कडून 80 टक्के कर्ज मिळण्याची सोय करून दिली आणि स्वत:च्या देखरेखीखाली विरारला लोडर्सचा 15 इमारतींचा गृहप्रकल्प उभा केला.
व्यसनाधीन कामगारांचा पगार त्यांच्या कुटुंबीयांना मिळावा म्हणून गवाणकरांनी अशा कामगारांच्या पत्नीच्या हातात पगार देण्याची पद्धत सुरू केली. त्याचप्रमाणे नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी किंवा मोठ्या अपत्याला शैक्षणिक पात्रता नसली तरी शिपायाची, मदतनीसाची अशा नोकऱ्या अनुकंपा तत्त्वावर मिळवून दिल्या. कामगारांसाठी करीत असलेल्या गवाणकरांच्या कामात ‘ह्यूमन टच’ होता, जो त्यांच्यावर असलेल्या गांधी विचारसरणीचा प्रभाव होता. ते कामगारांत प्रिय होते. ‘आपली कंपनी हे आपले मंदिर आहे, त्याचे पावित्र्य आपणच राखले पाहिजे. कामात अप्रामाणिकपणा करता हे जर सिद्ध झाले, तर परत युनियनची पायरी चढायची नाही. हक्क हवेत तर निष्ठापूर्वक काम हवे’ अशी त्यांची कामगारांना शिकवण होती. जे योग्य, तेच मागायचे, चर्चा करून प्रश्न सुटतात आणि मार्ग सत्याचा व अहिंसेचा असेल न्याय मिळवता येतो अशी त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती, तिच्यावर गांधीजींच्या विचारसरणीचा प्रभाव होता. 
गवाणकर स्वत: जरी विचाराने समाजवादी होते, तरी ते नोकरीत असेपर्यंत युनियनला पक्षविरहित ठेवण्यात यशस्वी झाले. निवृत्तीनंतरही त्यांनी युनियनचे काम करावे, ही कामगारांची विनंती त्यांनी अमान्य केली आणि कामगारांना सांगितले- ‘ही तुमची युनियन आहे, ती तुम्हीच आता चालवली पाहिजे. मी आता बाहेरचा माणूस आहे. गरज असेल तेव्हा तुम्ही मला सल्ला विचारू शकता, पण तो मान्य करणे हे तुमच्यावर बंधनकारक असणार नाही. एक लक्षात ठेवा- युनियन यशस्वी होण्यासाठी ती तत्त्वावर चालली पाहिजे, भावनांच्या उद्रेकावर नाही.’ 
‘चले जाव’ लढ्याच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची गेल्या वर्षीच्या- 2018 च्या ऑगस्ट महिन्यात मुलाखत घेण्यात आली होती. त्यात त्यांना विचारले होते की, आजच्या तरुण पिढीला या दिवसाच्या निमित्ताने काय संदेश द्याल? तेव्हा ते म्हणाले, ‘आमच्यासारखे स्वातंत्र्यसैनिक ज्या स्वातंत्र्यासाठी लढले ते स्वातंत्र्य कसे असावे, कोणासाठी असावे, हे आपण आपल्या घटनेत- लिहिले आहे. आजच्या तरुण पिढीने ही घटना समजून घेतली, आचरणात आली तर आपला देश मजबूत होईल. आजच्या तरुण पिढीला आपली घटना किती चांगली आहे हे कळावे, म्हणून आपल्या शिक्षणातच घटनेचा अभ्यास असावा. सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली घटना जनमानसात आणि विशेष करून विद्यार्थ्यांत पोहोचवण्यासाठी काम केले पाहिजे, तसे झाले तर गांधीजींच्या आणि पर्यायाने आम्हा स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सैनिकांच्या स्वप्नातला स्वतंत्र भारत आपण प्रत्यक्षात निर्माण करू शकू.’

 

Tags: obituary hemchandra gavankar हेमचंद्र गवाणकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या