डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

गांधी हे जगण्यातील समस्यांना मुळापासून उचकटून टाकण्याचा प्रयत्न करणारे जहाल क्रांतिकारीच आहेत. शब्दांमधून व स्वतःच्या कृतीचा दाखला घालून देऊन करोडो लोकांचं जीवन उन्नत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ते करतात. अस्पृश्यांना सहन करावं लागणारं क्रौर्य नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून ते रोजच्या जगण्यात स्वतःला अस्पृश्य मानतात. हिंदू व मुस्लिम यांच्यातील ज्वालामुखी भडकतो, तेव्हा ते स्वतःचा तंबू तप्त शिलारसाच्या काठावर नेऊन उभा करतात. सदासर्वकाळ ते शेतकऱ्यांच्या निकट राहतात, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे. 

मोहनदास करमचंद गांधी हे ‘हरिजन’ नावाचं एक लहानसं साप्ताहिक चालवतात. त्यात ते स्वतःच्या सहीने लेख लिहितात आणि प्रश्नोत्तर स्वरूपाचं एक सदरही चालवतात. मजूर पक्षाच्या ब्रिटिश सरकारने मार्च 1946 मध्ये तीन ज्येष्ठ मंत्र्यांचं कॅबिनेट मिशन स्वातंत्र्यासंदर्भात वाटाघाटी करण्यासाठी भारतात पाठवलं. गांधी, जवाहरलाल नेहरू व काँग्रेस पक्षाचे बाकीचे नेते, मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद अली जीना व इतर अनेकांच्या भेटीगाठी या ब्रिटिश मंत्र्यांनी घेतल्या. अखेरीस, 16 मे रोजी कॅबिनेट मिशनने भारतामध्ये राष्ट्रीय सरकार स्थापनेची व राज्यघटनानिर्मितीची योजना मांडली. ही योजना भारतीय लोक स्वीकारतील का, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालं नव्हतं. शिवाय, महात्मा गांधी या योजनेचा स्वीकार करतील का, हा प्रश्न त्याहून महत्त्वाचा होता. कारण भारतामध्ये गांधीजी हे सर्वांत मोठी ताकद आहेत.

गांधींनी ‘चार दिवस सखोल परीक्षण’ केलं आणि मग सव्वा पानाचा एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी कॅबिनेट मिशनच्या योजनेची प्रशंसा केली. ‘ब्रिटिश सरकारने तयार केलेला हा दस्तावेज सद्य:स्थितीत सर्वोत्तम ठरणारा आहे’, असं त्यांनी जाहीर केलं. ‘ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणण्याचा सर्वांत सोपा आणि सर्वांत जलद गतीने अमलात आणता येईल, असा मार्ग कॅबिनेट सदस्यांनी शोधला आहे’, असं मत गांधींनी व्यक्त केलं. ‘हरिजन’मधला गांधींचा हा लेख भारतातील प्रत्येक वर्तमानपत्राने पुनर्प्रकाशित केला. वॉशिंग्टनमधील उच्चपदस्थांना व राजनैतिक अधिकाऱ्यांना वाचता यावा म्हणून हा मजकूर तारेने तिकडे पाठवण्यात आला. शिवाय, ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही हा लेख संपूर्ण छापला. भारताच्या स्वातंत्र्यासंबंधी ब्रिटिशांनी मांडलेल्या ऐतिहासिक प्रस्तावाचं विश्लेषण गांधींनी या लेखाद्वारे हरिजनमध्ये केलं.

त्या मजकुराखालीच त्यांनी दुसराही एक लेख लिहिला होता. या दुसऱ्या लेखाचं शीर्षक ‘मँगो सीड कर्नेल’ (आंब्याच्या कोयीतला गर) असं होतं. ‘अन्नधान्यं व चारा यांना वाजवी पर्याय’ ठरेल इतकं पोषणमूल्य आंब्याच्या कोयीतील गरामध्ये असतं, अशी वाखाणणी त्यांनी केली. ‘प्रत्येक आंब्याची कोय बाजूला काढली आणि त्यातील गर शिजवला व अन्नधान्याऐवजी खाल्ला किंवा गरजूंना दिला, तर ते फारच हिताचं ठरेल,’ असं त्यांनी लिहिलं. हरिजनमधला त्यापुढचा लेखही ‘एम. के. गांधी’ या सहीने लिहिलेला होता. गांधींनी त्यांचा सध्याचा वेळ निसर्गोपचारांना समर्पित केला आहे आणि हा तिसरा लेख त्याच विषयावर होता.

‘निसर्गोपचाराचे दोन भाग आहेत. एक- देवाचं नाव घेऊन किंवा रामनामाद्वारे आजार बरा करणं. आणि दोन- योग्य व स्वच्छ जीवनमान अंगीकारून आजारांना आळा घालणं... अंत:स्थ व बाह्य अशा दोन्ही स्तरांवर संपूर्ण स्वच्छता पाळली, तर आजार आसपास फिरकतही नाहीत.’ मग दुधाचं मूल्य स्पष्ट करताना त्यांनी लिहिलं की, ‘गाईच्या दुधाची सर म्हशीच्या दुधाला नाही.’ हरिजनचा हा अंक गांधींच्या एकंदर आस्थाविषयांचा आणि वैशिष्ट्यांचा खास नमुना आहे. गांधींना व्यक्तीच्या जीवनामध्ये रस आहे आणि व्यक्तीचं जगणं बहुआयामी असतं, त्यामुळेच गांधीसुद्धा बहुआयामी माणूस आहेत.

हरिजनच्या अंकांमधून गांधींनी ‘भुईमुगा’च्या विविध वापरांकडे नागरिकांचं लक्ष वेळोवेळी वेधलं आहे. त्याच वेळी, ‘थुंकण्याच्या क्रियेचा निषेध गांधी का करत नाहीत,’ असा प्रश्न एका महिलेने विचारला असता, त्यावरही ते प्रतिसाद देतात. आपण थुंकण्याचा निषेध कायमच केला असून, आत्ताही करतो आहोत, असं गांधी लिहितात. एखाद्या लेखात गांधी भारतीय स्वातंत्र्याची व्याख्या देतात. दुसऱ्या एखाद्या लेखात, ‘कॅन्डी तयार करण्यासाठी होणारा साखरेचा शिधापुरवठा कमी करावा,’ अशी विनंती करतात. तिसऱ्या लेखात, गुन्हा व गुन्हेगार यांची समस्या ते हाताळतात. तर, स्वतंत्र भारताने सैन्य राखू नये, अशी अपेक्षा चौथ्या लेखात व्यक्त करतात. मग पाचव्या लेखात, खोटेपणा कधीच समर्थनीय नसतो, असा नियम अधोरेखित करताना लिहितात : सत्यकथनाला कोणताही अपवाद स्वीकारार्ह नाही.

राजकारण जास्त महत्त्वाचं आणि भुईमूग कमी महत्त्वाचा, असा भेद संत व महात्मा रूपातील गांधी करत नाहीत. गांधी दिवसाचे चोवीस तास सार्वजनिक जीवन जगतात; किंबहुना त्यातून त्यांना ऊर्जा मिळते, ही त्यांच्याबाबतची अत्यंत विस्मयकारक गोष्ट आहे. डॉ. दिनशा मेहतांच्या मुंबई येथील दवाखान्यातील ओट्यावरच्या दगडी फरशीवर एक फळी आहे, त्यावर गांधींची चटई ठेवलेली असते. हा ओट्याचा भाग खुला आहे आणि जमिनीला समांतर आहे. अनेक अनुयायी आपल्या या गुरूजवळ त्याच ओट्यावर झोपतात. पहाटे चार वाजता महात्मा गांधी व त्यांचे सहकारी प्रार्थना म्हणतात. मग गांधी संत्र्याचा किंवा आंब्याचा रस पितात आणि पत्रांना स्वतःच्या हाताने उत्तरं लिहितात.  सध्या त्यांचं वय अठ्ठ्याहत्तर आहे. आपण सव्वाशे वर्षं जगू, अशी त्यांना आशा आहे. त्यांचं हस्ताक्षर स्पष्ट व ठाशीव आहे. त्यांची दृष्टी सुस्पष्ट आहे, त्यांना ऐकूही चांगलं येतं.

एका भारतीय राजघराण्यातील राजकुमारी अमृतकौर ही ख्रिस्ती महिला दिवसातून एकदा त्यांना बातम्या वाचून दाखवते. सर्वसंगपरित्याग करून त्या गांधींच्या प्रमुख इंग्रजी सचिव झाल्या आहेत. एका ब्रिटिश तारसंस्थेकडून मिमिऑग्राफ स्वरूपाची ही वार्तापत्रं त्यांच्यापर्यंत येतात. गांधी स्वतः वर्तमानपत्रं वाचत नाहीत, रेडिओ ऐकत नाहीत. मात्र, भारतभरातून त्यांना हजारो पत्रं येतात आणि शेकडो लोक त्यांना भेटायला येत असतात. निकेल धातूचं एक गोल घड्याळ गांधींच्या पंच्याला कमरेभोवती बांधलेलं असतं आणि त्यांची प्रत्येक कृती त्या घड्याळ्याच्या काट्यांनुसार घडते. ते अतिशय वक्तशीर आहेत. भेट घ्यायला आलेल्यांसोबतचा त्यांचा संवाद साधारण एखादा तास चालतो आणि बरोब्बर त्या क्षणी ते संवाद थांबवतात. तोवरचं जवळपास सगळं बोलणं गांधींनीच केलेलं असतं. बोलण्यातून त्यांना आनंद मिळतो.

खरं तर ते करत असलेली प्रत्येक कृती त्यांच्यासाठी आनंददायीच असते- विशेषतः बोलणं, चालणं, खाणं व झोपणं. या कृती त्यांच्यासाठी खास आनंदाच्या आहेत. 1942 मध्ये रणरणत्या उन्हाळ्यामध्ये सेवाग्राम येथे  मी आठवडाभर गांधींसोबत राहिलो. नंतर, 1946 मध्ये मी त्यांच्यासोबत सहा दिवस मुंबई, दिल्ली व अन्यत्र प्रवासात घालवले. दुसऱ्या भेटीत पहाटे साडेपाच वाजता मी त्यांच्यासोबत चालायला जात असे. पहिल्याच सकाळी त्यांनी मला विचारलं,

‘‘काल झोप कशी लागली?’’

मला धड झोप लागली नव्हती, एक डास सतत माझ्या कानाजवळ भुणभुण करत होता- हे मी त्यांना सांगितलं.

‘‘पण तुम्ही कसे झोपलात?’’ मी विचारलं.

‘‘मला कायम चांगलीच झोप लागते.’’ ते म्हणाले.

दुसऱ्या दिवशी सकाळीही त्यांनी पुन्हा माझ्या झोपेविषयी चौकशी केली. मी म्हटलं,

‘‘बरी लागली. तुम्हाला?’’

‘‘विचारूच नका. मला कायम चांगलीच झोप लागते.’’ ते म्हणाले.

तिसऱ्या दिवशी मीच त्यांना झोपेबाबत विचारलं.

‘‘मला तो प्रश्नच विचारू नका, असं मी म्हटलं ना तुम्हाला?’’ ते गरजले.

‘‘मला वाटलं, तुम्ही विसरला असाल!’’ मी थट्टेच्या सुरात म्हटलं.

‘‘अंहं! माझी तब्येत खालावलेय, असं तुम्हाला वाटतंय की काय? बरं, तुम्हाला कशी झोप लागली?’’ त्यांनी विचारलं.

‘‘काही विचारू नका!’’ मी म्हटलं.

‘‘बरंय. बुडत्याला काडीचा आधार’’, असं म्हणून गांधी हसले. नंतर काही दिवस सकाळच्या वेळी पावसाची रिपरिप सुरू होती.

‘‘आता काय, पावसातही चालायला जाणार की काय?’’ मी जरा विरोधी पवित्रा घेत विचारलं.

‘‘मग काय! चला, चला. असं म्हाताऱ्यासारखं वागू नका.’’ ते म्हणाले.

चार वर्षांपूर्वी ते जितकं वेगाने चालायचे, ती गती आता नाही. पण त्यांच्या चालण्यातील तीव्रता कायम आहे आणि पंचेचाळीस मिनिटं सलग चालल्यावरही ते थकत नाहीत. चालून परत आल्यावर ते दुसऱ्यांदा नाश्ता खातात, करतात, पाहुण्यांना भेटतात, डॉ.मेहता यांच्याकडून बराच वेळ मालिश करून घेतात आणि मग झोपतात. गांधींच्या खोलीत दगडी फरशीवर एक बिछाना टाकलेला आहे, त्यावरच त्यांचा दिवस जातो आणि दिवसाची झोपही ते तिथेच काढतात. चिनी मातीच्या ताटलीतून किंवा तकाकी दिलेल्या धातूच्या भांड्यांमधून त्यांना अन्न दिलं जातं. कच्च्या व शिजवलेल्या भाज्या, फळं, दुधात शिजवलेला खजूर, दुधातील सांजा व पातळ चपात्या असा त्यांचा आहार असतो.

गांधी अनेकदा एखाद्या झोपडपट्टीतील कच्च्या बांधणीच्या झोपडीत राहतात. या झोपडपट्टीत अस्पृश्यांची वस्ती असते. अस्पृश्यांशी संपर्क आल्यास आपल्याला विटाळ होतो, या धारणेने धार्मिक हिंदू लोक सर्वसाधारणतः अस्पृश्यांपासून अंतर राखतात. सवर्णांची ही क्रूर वागणूक बदलावी, अशी गांधींची इच्छा आहे. त्यामुळे शक्य असेल तेव्हा ते अस्पृश्यांमध्ये जाऊन राहतात. याचा परिणाम म्हणून सवर्ण हिंदूंनी अस्पृश्यांना नोकर व आचारी म्हणून कामावर ठेवायला सुरुवात केली आहे. भारतात सर्वत्र- विशेषतः शहरांमध्ये अस्पृश्य व सवर्ण हिंदू यांच्यातील भिंत कोसळून पडते आहे, असं मला सांगण्यात आलं.

हजारो वर्षं अस्पृश्यांसाठी बंद असलेल्या पवित्र मंदिरांची दारं अस्पृश्यांसाठी खुली करायला गांधींनी भाग पाडलं. ‘‘मी अस्पृश्य आहे’’, ते मला म्हणाले. जन्माने ते अस्पृश्य नाहीत, तर सवर्ण हिंदू आहेत. पण इतर हिंदूंनीही आपलं अनुसरण करावं, यासाठी ते स्वतःला अस्पृश्य मानतात. नंतर ते म्हणाले, ‘‘मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिस्ती आहे, ज्यू आहे, बौद्ध आहे.’’ काही अपवाद वगळता बहुतांश भारतीय हे गांधींसमोर आले की, वाकून वंदन करतात आणि सर्वसाधारणतः त्यांच्या पायांना स्पर्श करतात. बहुतेकदा गांधी असं करणाऱ्यांच्या पाठीवर मुठीने प्रहार करून त्यांना थांबवतात. मग हे लोक खाली बसतात आणि संवाद सुरू होतो. घरातल्या कोणालाही तिथे येऊन बसायची मुभा असते. पण बहुतेकदा हे बोलणं गांधी व संबंधित मनुष्य यांच्यापुरतंच मर्यादित राहतं. 

भारतातील विविध प्रांतांचा कारभार बघणारे काँग्रेसचे पंतप्रधान गांधींचा सल्ला घेण्यासाठी येतात. शिक्षणतज्ज्ञ आपल्या कल्पना गांधींसमोर मांडून पहिली चाचपणी करतात. नवी योजना सुचलेले किंवा अशी काही योजना  नसलेलेही गांधींचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. काही जण वैयक्तिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मदत मागायला येतात. मी गांधींसोबत असताना, एकदा एक अस्पृश्य जोडपं त्यांना भेटायला आलं. वैवाहिक जीवनात सुखी नसलेल्या या दाम्पत्याने आपल्या दुःखी कहाण्या ऐकवल्या. गांधींनीही त्यांच्याशी संवाद साधण्यात काही तास घालवले.

आवश्यक त्या आर्थिक व सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी शेतकरी व कामगार गांधींची मदत मागतात. 1946 च्या भेटीदरम्यान मी त्यांच्यासोबत पुण्याहून मुंबईला गेलो. साधारण साडेतीन तासांचा प्रवास होता. गांधींसोबत त्यांचे सुमारे दहा सचिव व अनुयायी आणि त्यांचा डॉक्टर असा चमू होता. तिसऱ्या वर्गाचा एक खास डबा त्यांनी व्यापला. ट्रेनमध्ये दणकट लाकडी बाकडं होतं. त्या दिवशी पाऊस कोसळत होता. थोड्याच वेळात ट्रेनच्या छतामधून पाणी गळायला लागलं. यादरम्यान गांधींनी ‘हरिजन’साठी एक लेख लिहिला. मग दुसऱ्या एका लेखाची मुद्रितं तपासली. त्यानंतर त्यांच्याशी बोलायला ट्रेनमध्ये चढलेल्या काही राजकीय नेत्यांशी चर्चा केली. प्रचंड पाऊस असतानाही प्रत्येक स्थानकावर गांधींना बघायला लोकांची गर्दी जमलेली असायची.

एका ठिकाणी साधारण चौदा वर्षांचे दोन मुलगे पूर्ण निथळत्या अवस्थेत गांधींच्या डब्याजवळ खिडकीपाशी उभे होते आणि ‘‘गांधीजीऽ गांधीजीऽऽ’’ असं ओरडत होते. ‘‘त्यांच्यासाठी तुम्ही कोण आहात?’’ मी गांधींना विचारलं. त्यांनी दोन बोटं स्वतःच्या टकलाच्या वरती धरली आणि म्हणाले, ‘‘ही शिंगं. मी प्रदर्शनात ठेवलेला शिंगवाला माणूस आहे.’’ (हे त्यांनी नेहमीप्रमाणे अचूक इंग्रजीत सांगितलं) त्यांच्यातील ऊर्जा पाहून मी थक्क झालो. रात्री दहा वाजायच्या आधी ते झोपत नाहीत. ते ओटीवर झोपेची तयारी करत असताना कधी कधी मी त्यांच्या जवळून जात असेन, तर ते माझी थट्टा करायचे किंवा ‘तुम्ही प्रार्थना केली तर झोप चांगली लागेल,’ असं म्हणायचे.

गांधी अत्यंत धार्मिक आहेत. देवावरील श्रद्धा, आपण देवाचं साधन आहोत ही धारणा, त्याचप्रमाणे स्वर्गातील देवापर्यंत पोचण्यासाठी आणि पृथ्वीवर शांतता व आनंद राखण्यासाठी अहिंसा हाच मार्ग आहे असा विश्वास- हा त्यांच्या धर्माचा गाभा आहे. त्यांच्या सर्व राजकीय कृती, विचार व विधानांची जडण-घडण अहिंसा या तत्त्वातून झालेली असते. गांधींनी दोन महायुद्धांचा अप्रत्यक्ष उल्लेख अनेकदा केला. ‘पाश्चात्त्यांना तुम्ही अहिंसेचा संदेश का दिला नाही,’ असं मी त्यांना विचारलं. ‘‘मी फक्त आशियाई आहे, निव्वळ आशियाई आहे. पण खरं म्हणजे येशूही आशियाई होता!’’ ते हसत म्हणाले. मग म्हणाले, ‘‘मी पाश्चात्त्यांना अहिंसेचा संदेश कसा देऊ? अजून भारतामध्येही सर्वांना हे तत्त्व पटवून देणं मला शक्य झालेलं नाही. माझे प्रयत्न व्यर्थच ठरले.’’

आपल्या देशातील तरुणाईची प्रवृत्ती हिंसक, अधीर व क्रांतिकारी आहे, हे त्यांना जाणवतं. गांधींनी त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. पण हे उद्दिष्ट हिंसेद्वारे साध्य करण्याची त्यांची इच्छा नाही. समाजवाद्यांशी या मुद्यावरून त्यांचं भांडण होतं. भारतातील वाढत्या समाजवादी चळवळीचे नेते पंचेचाळीस वर्षीय जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल बोलताना गांधी म्हणाले, ‘‘त्याचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा मी समाजवादी होतो.’’ जयप्रकाशांचं व्यक्तिमत्त्व लक्षणीय आहे. विस्कॉन्सन व ओहिओ इथल्या विद्यापीठांमध्ये ते शिकले, स्वच्छतागृहातील वस्तू घरोघरी जाऊन विकण्याचं काम त्यांनी शिकोगामध्ये केलं आणि भारतात त्यांनी वेळोवेळी तुरुंगवासही भोगलेला आहे. जगभरातील समाजवाद्यांप्रमाणे जयप्रकाशसुद्धा साम्यवादी व सोव्हिएत यांचे कट्टर विरोधक आहेत.

गांधींना जयप्रकाश आवडतात आणि तेही गांधींचे भक्त आहेत. पण 1942 मध्ये गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली भारतातील समाजवाद्यांनी हिंसक पद्धतींचा वापर केला. समाजवाद्यांनी त्यावेळी घातपाती कृत्यं केली, पोलिसांच्या नजरेस येणार नाही अशा रीतीने भूमिगत संघटना उभारली आणि बळाचा वापर करून प्रशासनाच्या कामकाजामध्ये अडथळे आणले. गांधींच्या अहिंसेच्या नियमांमध्ये अशा कृतींना स्थान नाही.  वास्तविक, राष्ट्रीय स्वातंत्र्याबद्दल समाजवाद्यांना वाटणाऱ्या तीव्र इच्छेचे जनक गांधी आहेत आणि अंतिम समाजवादी उद्देशही गांधींना मान्य आहे; पण तरीही त्यांचं समाजवाद्यांशी पटत नाही.

दुसऱ्या महायुद्धावेळी गांधींनी जपान्यांना व नाझींना विरोध दर्शवला, पण त्यांची भूमिका युद्धविरोधीही होती. शस्त्रसामर्थ्याच्या आधारावर शांतता प्रस्थापित करणं विजयी सत्तांना शक्य होणार नाही, असं त्यांना वाटत होतं. गांधी तात्कालिक उद्दिष्टांच्या पलीकडे पाहतात. गांधीजी मानवतेकडे पाहत असतात. खुद्द त्यांचा भारतही सत्तेच्या स्वार्थी ध्यासाकडे कलताना दिसतो आहे आणि राज्यसंस्था व खासगी मालमत्तेचा प्रचंड संचय या गोष्टींनी व्यक्तीला अंकित केलं आहे. गांधींच्या मनातील आदर्श आर्थिक रचनेमध्ये, शेती व कुटिरोद्योगांवर आधारलेली स्वावलंबी गावं आणि मोजकी लहान शहरं असतील. आपण गरिबांचे व लहान माणसांचे कैवारी आहोत, असं ते मानतात. बहुतांश भारतीयांप्रमाणे गांधी भारतीय संस्कृतीला श्रेष्ठ मानतात. भारत आजारी आहे, त्याचं हृदयच आजारी आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही.

भारतीय लोक मुख्यत्वे स्वतःच्या समस्यांविषयी विचार करतात. पण गांधींशी बोलताना भारताच्या आरशामध्ये संपूर्ण जगाचं प्रतिबिंब पडल्याचं पाहायला मिळतं. आजूबाजूची अवस्था व वस्तुस्थिती यांच्याविषयी गांधींशी केलेली कोणतीही चर्चा नीरस पातळीवर राहत नाही. एखाद्या शब्दप्रयोगाने ते सगळी चर्चा उच्च प्रतलावर नेऊन ठेवतात, त्यामुळे चर्चेचा विषय पृथ्वीवर मानवाला भेडसावणाऱ्या समस्यांच्या व्यापक तात्त्विक चौकटीमध्ये जाऊन बसतो.

अमेरिकेतील दुष्काळासंबंधी काम करणारं प्रतिनिधी मंडळ एकदा गांधींना भेटायला गेलं. त्यांपैकी एकाने विचारलं की, भारत उपासमारीच्या उंबरठ्यावर असताना जपानसारख्या गतकालीन शत्रूला अमेरिकेने अन्नपुरवठा करणं योग्य आहे का? यावर गांधी म्हणाले, ‘‘अन्नाची गरज जपान्यांना भारतापेक्षा जास्त असेल, तर अमेरिकेने आधी जपानला अन्नपुरवठा करायला हवा, कारण अमेरिकेने जपानचा अंतरात्मा संपवण्याचा प्रयत्न केला होता.’’ मग त्यांनी अणुबॉम्बच्या वापराचा कठोरपणे धिक्कार केला. गांधी राष्ट्रवादी आहेत, पण मानवतावादामुळे ते आंतरराष्ट्रीयतावादीही होतात. मात्र त्यांचा पहिला आस्थाविषय भारत हा आहे.

सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्याशी झालेलं संभाषण आणि भुईमुगाची लागवड या दोन्ही गोष्टी गांधींच्या लेखी एकाच ध्येयाकडे जात असतात- चाळीस कोटी भारतीयांचं कल्याण साधणं, हे ते ध्येय असतं. गांधींनी या लोकांमध्ये स्वतःला मिसळून टाकलेलं आहे. त्यामुळे ते भारतातील सर्वांत प्रिय आणि सर्वांत प्रभावशाली व्यक्ती आहेत. हिंदू लोक एका देवाची आराधना करतात, पण अनेक दुय्यम देवांची व मूर्तींचीही आराधना करतात. काही हिंदू मंदिरांमध्ये तर गांधींच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. ‘स्वर्गाची दारं गांधींच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहत आहेत...’ मुंबईतला एक संतप्त भांडवलदार मला म्हणाला. ‘स्वर्गाच्या दारांना आणखी वाट पाहायला लावायची गांधींची इच्छा असावी. त्याउलट, पृथ्वीलाच अधिक स्वर्गमय करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.’

पूर्वेकडील भाग इतका भुकेला, विपन्न व दुःखी आहे की, तो पोटातून विचार करतो, उघड्या-वाघड्या स्थितीतून जगाकडे बघतो आणि स्वतःच्या दुर्दशेतून परिस्थितीचा अनुभव घेतो. इथल्या करोडो लोकांना बलाढ्य शक्तींचा दरारा वाटतो, पण वैयक्तिक लाभावर पाणी सोडून सर्वांच्या कल्याणाकरिता जीवन समर्पित केलेल्यांनाच इथले लोक मनापासून मानतात. गांधी हे आजीवन सर्वसंगपरित्याग व समर्पणभाव यांचं प्रतीक आहेत. ते भारतीयांसारखे जगतात आणि भारतासाठी जगतात. अनेकांचे त्यांच्यासोबत मतभेद आहेत. ब्रह्मचर्य, संपूर्ण शांततावाद व निसर्गोपचार अशा विषयांवरचे त्यांचे विचित्र विचार अनेकांनी नाकारले आहेत. पण त्यांची सचोटी, शहाणीव व सत्याबाबतची उत्कटता यांबद्दल सर्वांना आदर वाटतो. गांधी स्वतःचंच म्हणणं खोडणारं विधान करतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचं पाश्चात्त्य व्यक्तीला वाटतं. पण पौर्वात्य व्यक्तीच्या मते, गांधी स्वतःशी प्रामाणिक राहत असल्यामुळे हा विरोधाभास दिसतो.

आपला व्यापक प्रभाव असल्याचं गांधी नाकारतात. मी देवाचा सेवक आहे, असं ते म्हणतात. पण वस्तुतः गांधी माणसाचे सेवक आहेत, म्हणून अनेक अश्रद्ध  व्यक्तीही स्वतःला त्यांचा अनुयायी म्हणवून घेतात. लोकशाहीचा व्यापक अर्थ केवळ शासनपद्धतीपुरता मर्यादित नाही... तर, ती माणसा-माणसामधील जवळपास प्रत्येक नात्यावर प्रभाव टाकणारी सामाजिक संघटनेची व्यवस्था आहे, हे वुड्रो विल्सन यांचं विधान गांधींना अंतःप्रेरणेने समजतं. अनेक लोकांच्या दृष्टीने, राजकारण म्हणजे शासन वा सरकार. गांधींच्या मते, राजकारण म्हणजे माणूस. नमुनेदार राजकीय नेता आणि हुकूमशहासुद्धा स्वतःला ‘लोकांचा मित्र’ म्हणवून घेतात. परंतु, गांधींना केवळ गर्दीच्या रूपातील लोकांमध्ये रस नाही, तर व्यक्तिरूपातील लोकांविषयी त्यांना आस्था वाटते. त्यांचा विचार विशिष्ट स्थितीपासून सुरू होतो आणि सार्वत्रिकतेपर्यंत जातो.

बंगालमध्ये 1946 मध्ये हिंदू व मुस्लिम यांच्यात क्रूर व रक्तरंजित दंगल झाली, त्यात हजारोंचा जीव गेला. दंगलीचा सर्वाधिक फटका बसलेल्या पूर्व बंगालातील एका मुस्लिम भागात महात्मा गांधी लगोलग गेले. जेमतेम एक वा दोन सहकारी घेऊन हा अशक्त वृद्ध माणूस गावोगाव चालत गेला. एखादी रात्र आपल्याला इथे राहू द्यावं, अशी विनवणी त्यांनी गरीब मुस्लिम शेतकऱ्यांपाशी केली. सुट्या व्यक्तींशी व गटांशीही त्यांनी चर्चा केली, आंतर-सामुदायिक मैत्री टिकवून ठेवण्यासाठी युक्तिवाद केले. त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आलेल्या सर्वांसमोर त्यांनी प्रार्थना केली. दुसऱ्यांना मारलेल्या व स्वतःचे नातलग गमावलेल्या सर्वसामान्य लोकांसोबत ते काही महिने राहिले. त्यांच्या झोपड्यांमध्ये ते राहिले, त्या लोकांकडे असलेलं अन्न त्यांनी खाल्लं आणि त्यांच्याप्रमाणे प्रवासही केला.

त्या लोकांना समजून घेण्यासाठी व त्यांच्यात सुधारणा घडवण्यासाठी गांधींनी स्वतःला त्यांच्यामध्ये मिसळून टाकलं. दुसरा कोणी सर्वसामान्य राजकीय नेता असता, तर सहिष्णुतेवर भाषण ठोकून घरी गेला असता. गांधींच्या पत्नीचं निधन झाल्यावर भारतीयांनी त्यांच्या सन्मानार्थ एक निधी स्थापन केला.  निसर्गोपचाराचा प्रसार करण्यासाठी हा निधी वापरला जाणार होता. डॉ.दिनशा मेहता यांना आनंद झाला. कित्येक वर्षं त्यांनी अपुऱ्या, कालबाह्य उपकरणांसह, अत्यल्प पैशांसह आणि प्रशिक्षित सहकाऱ्यांचा तुटवडा असतानाही काम सुरू ठेवलं होतं. पण गांधींनी असा निधी उभारण्याला नकार दिला. मोजक्या संपन्न लोकांना स्वतःची प्रकृती सुधारण्यासाठी जाता येईल अशी एखादी आदर्श संस्था उभारण्यात त्यांना फारसा रस नव्हता. शेतकऱ्यांपर्यंत निसर्गोपचार न्यावा आणि त्यांच्या आर्थिक स्तरावर तो सहजी वापरता यावा, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी घरगुती व स्वस्त पद्धतींनी प्रयोग सुरू केले आहेत. मातीचा लेप, सूर्योपचार, पोषणाहार, पाण्याद्वारे उपचार, मालिश, व्यायाम, अशा पद्धतींचा वापर ते करून पाहतात.

गांधी हे जगण्यातील समस्यांना मुळापासून उचकटून टाकण्याचा प्रयत्न करणारे जहाल क्रांतिकारीच आहेत. शब्दांमधून व स्वतःच्या कृतीचा दाखला घालून देऊन करोडो लोकांचं जीवन उन्नत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ते करतात. अस्पृश्यांना सहन करावं लागणारं क्रौर्य नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून ते रोजच्या जगण्यात स्वतःला अस्पृश्य मानतात. हिंदू व मुस्लिम यांच्यातील ज्वालामुखी भडकतो, तेव्हा ते स्वतःचा तंबू तप्त शिलारसाच्या काठावर नेऊन उभा करतात. सदासर्वकाळ ते शेतकऱ्यांच्या निकट राहतात, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे. जमिनीतील कोळसा बाहेर काढण्यासाठी वायूने भरलेल्या खाणीत जाणाऱ्या कामगाराला खरं तर राहण्याकरिता महाल मिळायला हवा, पण तो झोपडीत राहतो. त्याची मजुरी वाढली, तर महालातल्या लोकांचा संताप होतो. अशा कारणावरून संतापणाऱ्यांनी खाणकामगाराचं जीवन महिनाभर जगण्याचा प्रयत्न करून बघावा. गतकालीन शत्रूला उपाशी ठेवू पाहणाऱ्या द्वेषपूर्ण लोकांनी दिवसाला बाराशे कॅलरींवर जगण्याचा प्रयत्न करून बघावा.

सत्ताधारी माणसं व सत्ताहीन माणसं यांच्यातील दरी हे जगातील समस्यांचं एक मध्यवर्ती कारण आहे. सत्ताधारी माणसांनी सर्वसामान्य नागरिकांच्या दर तासाच्या जगण्यामध्ये प्रवेश करून पाहायला हवं. सर्वसामान्य नागरिकांनी सत्ताधारी माणसाची सत्ता आपापसात वाटून घ्यायला हवी- पर्यायाने, सत्ताधाऱ्यांच्या सत्तेत घट व्हावी. सरकारं, राजकीय पक्ष, कंपन्या, कामगार संघटना- किंबहुना, सर्व मानवी संस्थांना हे लागू होतं. अवाजवी सत्ता सर्वांसाठीच हानिकारक ठरते- त्या सत्तेचे अत्याचार सहन करणाऱ्यांसोबतच अशा सत्तेचा वापर करणाऱ्यांवरही त्याचे विपरीत परिणाम होतात.

बळावर मक्तेदारी असल्यामुळे हुकूमशहाकडे सत्ता येते, पण गांधींकडे बळाविनाच सत्ता आहे. ते कोणाला बक्षीस देऊ शकत नाहीत वा शिक्षा देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे कोणतंही पद नाही. पंचा नेसलेला व झोपडीत राहणारा हा एक इसम आहे. माणसाविषयी वाटणाऱ्या आस्थेतून गांधींचा प्रभाव निपजलेला आहे. बळ व पैसा नसलेले गांधी व्यक्तिवादी आहेत. पण कायद्याच्या चौकटीत मिळेल ते सर्व काही घ्यायचा अधिकार त्यांच्या व्यक्तिवादात अभिप्रेत नाही. त्यांचा व्यक्तिवाद मालमत्तेवर आधारलेला नाही, तर व्यक्तिमत्त्वावर आधारलेला आहे. आपला मुद्दा न्याय्य आहे असं वाटत असेल, तर ते जगाविरोधात एकट्याने उभं ठाकायलाही तयार असतात- अशा अर्थी ते व्यक्तिवादी आहेत. बाह्य परिस्थितीपासून अधिकाधिक स्वातंत्र्य आणि अंतर्गत गुणांचा अधिकाधिक विकास, हा गांधींच्या व्यक्तिवादाचा अर्थ आहे. गांधी हा आतून-बाहेरून मुक्त झालेला माणूस आहे. (‘गांधी अँड स्टालिन’ या 1947 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातील ‘पॉलिटिक्स ॲन्ड पीनट्‌स’ या प्रकरणाचा हा अनुवाद आहे.)

मराठी अनुवाद : अवधूत डोंगरे
dongareavadhoot@gmail.com

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लुई फिशर

(29 फेब्रुवारी 1896–15 जानेवारी 1970)  अमेरिकन पत्रकार, लेखक, व महात्मा गांधी व व्लादिमिर लेनिन यांचा चरित्रकार .


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा