डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

खानदेशी बोली (म.सा.)संमेलनाचे अध्यक्षीय भाषण

कोणत्याही काळात लेखकाच्या भूमिकेला महत्त्व हे असतेच. लेखक आपली भूमिका कोणाच्या बाजूने मांडतो. आपलं वजन तो कोणाच्या पारड्यात टाकतो, याला महत्त्व आहेच. साहित्यिक-कलावंत म्हणून तो कोणाच्या बाजूने उभा आहे, याला महत्त्व आहे. अर्थातच माझी भूमिका स्पष्ट आहे. माझी लेखणी नेहमीच शोषित, वंचित, पीडितांच्या बाजूने उभा राहिलेली आहे. म्हणजेच साने गुरुजींनी दाखविलेला मार्ग माझ्या लेखणीने अनुसरलेला आहे, याचा मला आनंदच आहे. लेखकाने नेहमीच व्यवस्थेसोबत वाहवत जाता कामा नये, तर त्याने शोषित-वंचितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. प्रसंगी सवंग प्रसिद्धी, पुरस्कार, खोटा मानमरातब नाही मिळाला तरी चालेल. यापैकी थोड्याबहुतांचा अंश लाभल्यानेच, या वाटेवरचा थोडाबहुत प्रवासी असल्यानेच हा अध्यक्षपदाचा मुकुट मला मिळाला आहे, असे मी मानतो.  

सर्वप्रथम अमळनेरसारख्या पुण्य नगरीत येण्याचा आणि त्यानिमित्ताने आपल्यासारख्या पुण्यात्म्यांच्या सहवासात काही वेळ घालवण्याचा पवित्र योग प्राप्त करून देणाऱ्या आपणा सर्व साहित्यरसिकांचे आणि पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. अमळनेर ही पवित्र भूमी आहे. परमपूज्य संत सखाराम- महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. जगद्‌विख्यात मंगळग्रह मंदिरही याच परिसरात आहे. जगभरातील भाविक येथे मोठ्या संख्येने येतात. स्वातंत्र्यपूर्व काळात गोरगरीब, सामान्यांच्या मुला- मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करणारे प्रतापशेठजी याच मातीतले. येथे त्यांनी प्रताप तत्त्वज्ञान केंद्रासोबत प्रताप कॉलेजची उभारणी केली. शिवाय प्रताप मिलच्या माध्यमातून शेकडो हातांना रोजगार उपलब्ध करून दिला. याच परंपरेतील विप्रो कंपनीचे अझीम प्रेमजी यांचाही उल्लेख महत्त्वाचा वाटतो.

कामगार चळवळीचे, स्वातंत्र्य चळवळीचे हे मुख्य केंद्र राहिले आहे. याच भूमीने प्रताप मिल कामगारांचा लढा अनुभवला व स्वातंत्र्याची ज्योतही प्रज्वलित केली. अखंड मानवजातीच्या कल्याणाचा, मानवमुक्तीचा, शोषणाविरुद्धचा व भारतीय स्वातंत्र्याचा लढा तीव्र करणारे साने गुरुजींची ही कर्मभूमी. यांच्यामुळे ही क्रांतिकारकांची, समाजसुधारकांची, पुण्यात्मा साधू-संतांची व एकूणच सांस्कृतिक धुरंधरांची भूमी आहे. त्या अर्थाने एकूणच खानदेशच्या साहित्य, संस्कृती, तात्त्विक, आध्यात्मिक चळवळीचे हे केंद्र राहिलेले आहे. त्यामुळेच प्रतिपंढरपूर म्हणूनही तिचा नावलौकिक आहे. वर उल्लेख केल्याप्रमाने ही पवित्र भूमी, पुण्यभूमी आहे. अर्थातच खानदेशची सांस्कृतिक राजधानी म्हणून तिचा उल्लेख करताना मला अभिमान वाटतो.

अमळनेर येथेच काही काळ माधव ज्युलियन राहायला होते. तात्यासाहेब ऊर्फ वा.रा. सोनार, कवी गणेश कुडे, भा.ज. कविमंडन, सुभाष पाटील-घोडगावकर, गं.का. सोनवणे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अहिराणी लेखक कृष्णा पाटील, कवी-कथाकार गोकुळ बागुल, रमेश पवार, युवा समीक्षक प्रा.डॉ. रमेश माने या व इतर लेखक- कवींनी येथील साहित्यपरंपरा तेवत ठेवत समृद्ध करण्याचे अतुलनीय कार्य केले आहे. १९५२ मध्ये कृ.पा. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होऊन गेले. गेल्या वर्षी युवा नाट्य संमेलनाचे भव्य आयोजनही येथे झाले. अनेक छोटे-मोठे कार्यक्रम, कविसंमेलने, वाङ्‌मयीन पुरस्कार, व्याख्यानमाला आणि इतरही सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचल नेहमीच येथे असते. या शहराने अनेक चळवळी पाहिल्या. अनेक साहित्य-सांस्कृतिक घटना- घडामोडींचे हे केंद्र राहिलेले आहे. त्यात अर्थातच पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनायल ही संस्था नेहमीच अग्रभागी राहिली आहे. नव्हे, येथील साहित्यिक सांस्कृतिक चळवळीचे धुरीणत्व या मंडळींनी अनेक वेळा निभावले आहे. याच शृंखलेतील आजचे हे दोनदिवसीय ‘खानदेशी बोली साहित्य संमेलन’ म्हणावे लागेल.

अशा प्रकारचे खानदेशस्तरावरील हे पहिलेच संमेलन असावे. अशा अव्दितीय, संस्मरणीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करून संस्थेने माझा मोठाच गौरव केला आहे, याचा मला आनंद व अभिमान आहे. त्याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष श्री. दिलिप सोनवणे व त्यांचा सर्व कार्यकारी मंडळाचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. सोबतच अमळनेरवासीयांच्या ऋणातही राहू इच्छितो. खरं तर अवतीभोवती एवढे थोर-थोर विद्वान, प्रथितयश साहित्यिक मंडळी असताना माझ्यासारख्या पामराची या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड का झाली असेल, असा प्रश्न मला पडणे साहजिक आहे. यासंदर्भात विचारणा करणारा, अध्यक्ष दिलीप सोनवणे यांचा फोन मला जेव्हा आला; तेव्हा मी काहीसा गोंधळून गेलो होतो. एखाद्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी म्हणून विचारत असतील, असे वाटले होते. मात्र प्रत्यक्ष साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेने सर्वानुमते तुमची निवड केली आहे आणि तुम्हाला यावंच लागेल... नाही म्हणू नका! असा प्रेमळ आग्रह त्यांनी केला, तेव्हा मी बुचकळ्यात पडलो. नाही तर म्हणूच शकलो नाही. त्या संदर्भातील होकार या मंडळींना देऊन तर टाकला; त्यानंतर मात्र मी विचारात पडलो- आता काय करायचे? काय बोलायचे? कसे बोलायचे? जबाबदारी एकाएकी अंगावर येऊन पडल्यासारखे झाले. होकार तर देऊन टाकलेला; तेव्हा टाळता येण्यासारखा विषय नाही, हे माझ्या लक्षात आले.

त्यानंतर मात्र मी कामाला लागलो. का केलं असेल आपल्याला संमेलनाचा अध्यक्ष, असा विचार मनात घोळू लागला. तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली... ती म्हणजे, आपण आजवर सिंहावलोकन का केले नाही? मान वर करून का पाहिले नाही? लिहितोच आहे... लिहितोच आहे... खाली मान घालून लिहितोच आहे. रोज मरमर मरतो आहे. एखाद्या कास्तकाराप्रमाने नित्यनेमाने हे काम मी करत आलो आहे. आजूबाजूला बघायला- नव्हे, स्वतःकडे- स्वतःच्या लेखनकारकिर्दीकडे बघायलाही वेळ मिळाला नाही. एखादा मुलगा किंवा मुलगी स्वतःला किंवा त्याच्या घरच्यांना लहानच वाटतात, तसे काहीसे माझ्या बाबतीत झाले. या संस्थेने मला हक्काने सांगितले, ‘तुम्ही आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकता. चला, उठा... आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करा...’ मात्र अजूनही या बाबीवर माझा विेशास बसत नाहीये. एखाद्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याइतपत आपली साहित्यसंपदा मोठी आहे का? आपले वाङ्‌मयीन योगदान एवढे मोठे आहे का? या प्रश्नांच्या आधारे जेव्हा मीच मला न्याहाळू लागलो, तेव्हा दिसून आल्यात काही गोष्टी; ज्या मला आजच्या संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन आल्याचे मला जाणवले.

त्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे- मी आजवर ज्या निष्ठेने लेखन करीत आलो आहे, त्या माझ्या लेखननिष्ठेचा हा सन्मान आहे, असे मी मानतो! तर, त्या माझ्या लेखननिष्ठा कोणत्या? कोणत्या वाङ्‌मयीन निष्ठेने मी लेखन करीत आलो? माझ्या लेखनात काही विशिष्ट भूमिका वगैरे आहे का? तर, आहे! निश्चित आहे... मी एका विशिष्ट भूमिकेतून लेखनाकडे वळलेलो आहे, हे खात्रीने सांगू शकेन! लेखक-कलावंताने अशी कुठली भूमिका घेतली पाहिजे का? तर, निश्चित घेतली पाहिजे, असेही माझे मत आहे. त्याशिवाय त्याच्या लेखनाला मूल्य प्राप्त होणार नाही. लेखनाचे प्रयोजन केवळ कलेसाठी कला, असे असता कामा नये. केवळ मनोरंजनासाठी लेखन ही गोष्ट मला मान्य नाही. तर लेखक कलावंताने आपली विशिष्ट अशी भूमिका घेतलीच पाहिजे आणि त्याबरहुकूम वाटचालही केली पाहिजे. घेतलेली भूमिका टाकून देता कामा नये. त्यासाठी क्षणिक  प्रलोभनांपासून दूर राहता आले पाहिजे. प्रसंगी मानपमान पचवता आले पाहिजेत. त्यासाठी मनाची निश्चितता, निग्रहपूर्वक साधना योजावी लागेल. तेव्हाच या हृदयीचे त्या हृदयी होईल... तेव्हाच लेखकाची निष्ठा सिद्ध होईल... जो आपल्या मूल्यांशी, भूमिकेशी ठाम असेल; तोच लेखक-कलावंत यशस्वी होईल. प्रसंगी तात्पुरती अवहेलना-अपमान त्याच्या वाट्याला येईल, पण एवढ्या-तेवढ्याने तो डगमगून जाणार नाही. विशेषकरून शासनकर्त्यांच्या दहशतीपुढे तो झुकणार नाही, असाच लेखक-कलावंत आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठीच आजच्या संमेलानाचे प्रयोजन आहे, असे मला वाटते.

जो अन्याय-अत्याचार-मुस्कटदाबीच्या विरुद्ध बोलणार आहे, अशा कलावंताच्या पाठीमागे हे व्यासपीठ निश्चित उभे राहणार आहे. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे विवेकाचा आवाज बुलंद करण्यासाठीच असते. तो, या शहराने अनेक वेळा अनुभवलाय- नव्हे, क्रांतीचीपि रवर्तनाची ही भूमीच आहे. साने गुरुजींनी या भूमीत क्रांतीची ज्योत पेटवली. आपल्या कार्यकर्तृत्वाने सारे रान पेटवून दिले. खरा धर्म कोणता, हे जगाला सांगत मानवता धर्माची पताका फडकत ठेवली. कामगारांचा संप घडवून आणला. स्वातंत्र्यसमरात येथूनच उडी घेतली. ‘श्यामची आई’सारखी अजरामर कलाकृती सादर केली. म्हणूनच या व्यासपीठावरून उभा राहणारा लेखक कोणती भूमिका घेणार आहे, याला महत्त्व आहेच. कोणत्याही काळात लेखकाच्या भूमिकेला महत्त्व हे असतेच. लेखक आपली भूमिका कोणाच्या बाजूने मांडतो. आपलं वजन तो कोणाच्या पारड्यात टाकतो, याला महत्त्व आहेच. साहित्यिक-कलावंत म्हणून तो कोणाच्या बाजूने उभा आहे, याला महत्त्व आहे.

अर्थातच माझी भूमिका स्पष्ट आहे. माझी लेखणी नेहमीच शोषित, वंचित, पीडितांच्या बाजूने उभा राहिलेली आहे. म्हणजेच साने गुरुजींनी दाखविलेला मार्ग माझ्या लेखणीने अनुसरलेला आहे, याचा मला आनंदच आहे. लेखकाने नेहमीच व्यवस्थेसोबत वाहवत जाता कामा नये, तर त्याने शोषित-वंचितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. प्रसंगी सवंग प्रसिद्धी, पुरस्कार, खोट मानमरातब नाही मिळाला तरी चालेल. यापैकी थोड्याबहुतांचा अंश लाभल्यानेच, या वाटेवरचा थोडाबहुत प्रवासी असल्यानेच हा अध्यक्षपदाचा मुकुट मला मिळाला आहे, असे मी मानतो. त्यासाठी कारणीभूत ठरले आहे अर्थातच माझे लेखन.

कुठलाही लेखक हा त्याच्या कलाकृतींतून बोलत असतो. अर्थातच माझी भूमिका मी माझ्या लेखनातून वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती संबंधितांनी जरूर तपासून बघावी. माझे लेखन मी कुणालाही खूश करण्यासाठी किंवा कुणाच्याही क्षणभर करमणुकीसाठी केलेले नाही. करमणूक-मनोरंजनासाठी इतरत्र भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी अस्सल लेखकांनी लेखणी झिजवण्याची गरज नाही. म्हणूनच मी माझ्या लेखनाची प्रेरणा मनोरंजनाऐवजी माझ्या अवती-भवतीच्या माणसांची दुःखं, वेदनांना मुखर करण्याची मानली. काय होत्या आणि आहेत माझ्या लेखनप्रेरणा? वाचन करत असताना लक्षात आले की, आपल्या खानदेशी बोलीत भरघोस असे गद्यलेखन झालेलेच नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि प्रदेशातील बोलीतून ‘गोतावळा’, ‘बनगरवाडी’, ‘टारफुला’, ‘चौंडकं’, ‘भंडारभोग’ इत्यादी कलाकृती वाचायला मिळाल्या. मराठवाडा बोलीतील ‘पाचोळा’, ‘गांधारी’, वैदर्भीय बोलीतील ‘धग’, ‘मेड इन इंडिया’, ‘तहान’, ‘बारोमास’, तसेच कोकणी बोलीतील ‘माहिमची खाडी’, ‘इंधन’, मुंबईकडची ‘चक्र’ वगैरे ही यादी पुढे वाढवता येईल; मात्र येथे नमुना म्हणून काहीच नावे घेतली आहेत.

या सर्व कलाकृतींचे वाचन करताना माझ्या लक्षात आवर्जून एक गोष्ट आली, ती म्हणजे- या सर्व कलाकृती महान आहेत. ज्यांच्या-त्यांच्या जागी श्रेष्ठ आहेत. एक उणीव मला मात्र त्या सर्वांमध्ये दिसली. तशी तर ती उणीव नाहीच. फार तर बारकुले निरीक्षण म्हणता येईल. ते निरीक्षण कोणते? तर, या कलाकृतींमधून माझ्या आसपासचा माणूस दिसला नाही. माझ्या आसपासचा प्रदेश दिसला नाही. येथील कष्टकरी, शोषित, वंचितांचे वास्तव जिणे मला दिसलं नाही. त्यांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी दिसून आल्या नाहीत. कशा येणार? हे सगळे लेखक त्या-त्या भौगोलिक परिप्रेक्ष्यातून, आपापल्या प्रदेशातून आलेले होते आणि आपला अनुभव, आपला भवताल त्यांनी त्या-त्या कलाकृतींतून जोरकसपणे मांडलेला होता. अभ्यासक्रमातील धडे-कविताही याला आपवाद नव्हत्या. अभ्यासक्रमातील काही कलाकृतींतून- विशेषतः कवितांतून माझ्या खानदेशी भूमीचे थोडेबहुत दर्शन घडत होते. मात्र ते मला पुरेसे वाटत नव्हते. ‘श्रावण मासीं हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’ अशी स्थिती मला येथे कधी दिसून आली नाही किंवा लकाकणारी बोरही माझ्या दृष्टिपथात आली नाही.

तर, या बाबतीतला माझा अनुभव काय होता? मी जगत असलेला, अनुभवत असलेला खानदेश या पार्श्वभूमीवर  मला वेगळा दिसला. खानदेशातील बालकवींच्या कवितेतील मखमली गालिच्याची हिरवळ मला दिसली नाही. ती केव्हाच दुरापास्त झालेली होती. लकाकणारी बोरही कुठे दिसत नव्हती. त्याऐवजी अस्मानी-सुलतानी दुष्काळाने होरपळलेला खानदेश दिसत होता. एक काळ असा होता, येथे बारमाही वाहणाऱ्या आणि तुडुंब भरलेल्या नद्या होत्या. केळी, कापूस, काव्याचे भरभरून पीक देणारी सुपीक जमीन होती. आज त्या जमिनीला नापिकीने घेरलंय. धनदांडग्यांनी तिच्यातील सृजन हिरावून घेतलंय. आज येथील देवभोळा कास्तकार कर्जाचा डोंगर उपसता-उपसता स्वतःच मातीमध्ये गाडला जात आहे. त्याच्या काळ्या- कसदार सुपीक जमिनीवर शहरातल्या धनदांडग्यांची वक्रदृष्टी पडली आहे. परिणामी, ही जमीन झपाट्याने बिनशेती, पडीक, नापीक बनत आहे. वीज नाही, पाणी नाही, शेतमालाला भाव नाही, भाव ठरविण्याचा अधिकार नाही.

परिणामी तणावात जगत असलेला येथील कास्तकर दिवसेंदिवस दारिद्य्राच्या खाईत ढकलला जात आहे. शासनाचे धोरण याला कारणीभूत आहे. आश्रयदाताच त्याचा शोषणकर्ता ठरला आहे. ज्याच्याकडे वारंवार अपेक्षेने पाहावे, त्या नेत्वृत्वाकडूनच तो नागवला जात आहे. बी-बियाणे, खतांचे वाढते भाव, भ्रष्ट शासन-प्रशासन, कर्जदार सावकार, सहकारी सोसायट्या, पतपेढ्या, बँका, जागतिकीकरणाच्या वाटेने आलेल्या विविध मल्टिनॅशनल कंपन्यांनी आवाळलेला घट्ट पाश यांच्या चक्रव्यूहात येथला कास्तकार अडकून पडला आहे. या सर्व शोषणकर्त्या वर्गाने अपरिमित धुडगूस घातल्याने येथला शेतीव्यवसाय आतबट्‌ट्याचा ठरला आहे. शोषणवादी वृत्तीचा पुढारी, सावकार, शासक- प्रशासक ही येथल्या काळ्या-कसदार सुपीक जमिनीला नापीक करणारी हरळी-कुंध्याची बेटं ठरली आहेत. या चिवट तणकटाने येथल्या शेतीभातीसह गावगाड्याला पुरते ग्रासून टाकले आहे. सबंध गावगाड्याला वेढून असलेल्या या लागट तणकटाला इच्छा असूनही खोदून काढणे, मुळासकट नष्ट करणे शेतकऱ्यांसाठी दुरापास्त झाले आहे. आज शेतात पीक कमी आन्‌ ‘कुंधा’ जास्त झाला आहे. परिणामी, शेती मरणपंथाला लागली असून शेतकरी आत्महत्यांची मालिका उभी ठाकली आहे.

या सगळ्यांचा संदर्भ घेऊन माझ्या हातून ‘पाडा’, ‘कुंधा’, ‘दप्तर’, ‘रक्ताळलेल्या तुरी’, ‘गावाच्या तावडीतून सुटका’ यांसारख्या कादंबऱ्या लिहून झाल्या, ही माझ्यासाठी निश्चितच समाधानाची बाब ठरते. ‘कूड’, ‘सूड’, ‘आसूड’, ‘उलंगवाडी’ यांसारख्या कथासंग्रहांतून माझ्या निर्मिती प्रदेशातील भवतालाला आकळण्याचे काम माझ्या हातून काही प्रमाणात झाले आहे. खानदेशची माती तिच्या प्रसवशील प्रतिभेची साक्ष देणारी, मऊ-भुसभुशीत जमीन आहे. केळी, कापूस आणि काव्याचं भरभरून पीक देणारी ही माती जशी निर्मितिक्षम, तसाच येथला कास्तकारसुद्धा उद्यमशील कष्टकरी आहे. मात्र वर्तमानकाळात अनेक संकटांनी त्याला पुरते घेरून टाकलेले आहे. त्याच्या गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळणाऱ्या प्रवृत्तींचा समाचार घेण्याचे व्यसनच जणू माझ्या लेखणीला जडलेले आहे. हे सगळे प्रयत्न खास खानदेशी बोलीतून झाल्याने खानदेशी ‘तावडी बोली’ला वाङ्‌मयीन प्रतिष्ठा आणि ती भाषा बोलणाऱ्या समूहाच्या जगण्याला साहित्याची आशयवस्तू होण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे.

मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात माझ्या या बोलीचाच खारीचा वाटा आहे, याची नम्र जाणीव मला आहे. नव्हे, तिच्या प्रेमळ सहवासामुळेच मी या पदावर विराजमान झालो आहे. माझी बोली माझ्यासाठी सर्व काही आहे. असे असले तरी इतर भाषाभगिनींबद्दल, बोलींबद्दलही माझ्या मनात ममत्व आहे. तावडी बोली माझी आई असली, तर इतर खानदेशी बोली माझ्या माय-मावश्या आहेत. अहिराणी, पावरी, मावची, भिलाऊ, गुजरी, लेवागणबोली या खानदेशी बोली सगळ्या एकाच गोतातील आहेत, असे मी मानतो. त्यामुळे त्या सर्वांविषयी आनंद, अभिमान बाळगणे मी माझे कर्तव्यच समजतो. शेवटी कुठलाही लेखक- कलावंत थेट आभाळातून कोसळत नाही. त्याच्या जडणघड णीत अनेक घटकांचा सहभाग असतो. समाज, संस्कृती व तेथील भाषिक सत्त्व शोषून घेतल्याशिवाय लेखक घडू शकत नाही. त्याच्या लेखकीय बाहूत बळ येऊ शकत नाही, असे मी मानतो. या अन्वेषीय परिवेषातच मी मला  शोधतो. तेव्हा माझेच व्यक्तिमत्त्व उजळून निघते.

मी- अशोक कौतिक कोळी या व्यक्तिमत्त्वाने तुमच्यासमोर उभा असलो, तरी माझ्यातील सारे सत्त्व येथील समाजाचे आहे, माझ्या बोलीभाषेचे आहे, याची मला जाणीव आहे. खरे तर मी निमित्तमात्र आहे. येथल्या शोषित, पीडित, वंचितांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे. त्यामुळे आजचा हा सन्मान माझा नसून त्या सर्वांचा आहे. गोरगरीब कष्टकरी समाजाचा आहे. हा सन्मान माझ्या पूर्वसुरींचा आहे. माय सरोसती बहिणाईचा, पूज्य साने गुरुजींचा आहे.

मित्रांनो, खानदेशच्या पुण्य भूमीत हा गौरव होतो आहे, ही माझ्यासाठी मोठीच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. हा क्षण मी जन्मभर विसरू शकणार नाही. माझ्या आयुष्यात अमळनेरला विशेष महत्त्व राहिले आहे. आवर्जून सांगावेसे वाटते की, या शहराने मला खूप काही दिलेले आहे. विशेषकरून माझ्या आयुष्यातल्या पदार्पणातल्या गोष्टी येथेच मिळालेल्या आहेत. मला सांगताना अभिमान वाटतो की, माझ्या आयुष्यातली पहिली कथा व तिला मिळालेली दाद याचा संदर्भ येथलाच आहे. ‘कूड’ ही पहिली कथा लिहिली. ती ‘लोकमत’च्या दिवाळी अंक कथास्पर्धेसाठी पाठवून दिली होती. माझी ती कथा त्या वेळी कथास्पर्धेत पहिली आली होती. त्या कथास्पर्धेचे परीक्षक अमळनेर येथीलच सुप्रसिद्ध साहित्यिक-समीक्षक तात्यासाहेब वा.रा. सोनार होते. त्यांनी या कथेला उत्स्फूर्त दाद दिली होती. त्यांच्या शाबासकीच्या, आशीर्वादाच्या बळावरच मी माझा थोडाबहुत लेखकीय प्रवास करू शकलो आहे. नंतरच्या काळात ‘कूड’ याच शीर्षकाचा माझा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. या कथासंग्रहाला मिळालेला पहिला वाङ्‌मयीन पुरस्कार याच शहराने मला दिला.

अशा प्रकारे अनेक वेळा प्रेरणेची, शाबासकीची थाप येथील मान्यवरांकूडन मिळत राहिलेली आहे. आजच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्याच शृंखलेतील आहे, असे मी मानतो. हे संमेलन माझ्यासाठी आणखी दोन गोष्टीमुळे संस्मरणीय ठरणार आहे. ते म्हणजे, या संमेलनाचे उद्‌घाटन माझे व आमच्या पिढीचे मार्गदर्शक राहिलेले सुप्रसिद्ध लेखक राजन गवस सर यांच्या हस्ते झाले. ही गोष्ट माझ्यासाठी फारच मोलाची आहे. बोली, साहित्य- संस्कृती आणि एकूणच शोषित-वंचितांच्या लढ्यातील कृषिजनसंस्कृतीच्या संवर्धनातील सरांचे स्थान फारच वरचे राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या येण्याने या संमेलनाची उंची वाढली आहे व अप्रत्यक्षपणे माझा गौरवही झाला आहे. मला सांगताना आनंद वाटतो की, माझ्या लेखकीय कारकिर्दीत राजन गवससर आणि आजचे प्रमुख वक्ते व प्रसिद्ध समीक्षक मित्रवर्य रणधीर शिंदे यांचेही मोठेच योगदान राहिले आहे. या संबंधातील एक आठवण सांगावीशी वाटते.

माझ्या लेखनकालाच्या सुरुवातीलाच राजन गवस यांनी जेव्हा माझ्या कथा-कादंबऱ्या वाचल्या, तेव्हा त्यांनी आवर्जून कळविले की- तू जे लिहितोस ते भन्नाट तर आहेच, पण तुझ्याजवळ भाषेचे फार मोठे सत्त्व आहे. हे धन संचयित करण्याचे काम तू आवर्जून कर. सरांच्या सूचनेनुसारच मी माझ्या तावडी बोलीतील शब्दसंग्रहाचे काम करू शकलो. दुसरे अतिथी रणधीर शिंदे यांनी गेल्याच वर्षी प्रकाशित झालेल्या माझ्या ‘रक्ताळलेल्या तुरी’ या कादंबरीला आश्वासक असे बर्ल्ब लिहून दिले आहे.

अमळनेरच्या या संमेलनाने असाही आश्वासक संयोग माझ्या आयुष्यात घडवून आणला आहे. या बाबतीतले अमळनेरकरांचे प्रेम भविष्यातही मिळत राहील, अशी अपेक्षा बाळगतो. अध्यक्षपद माझ्यासारख्या खूपच छोट्या माणसाला बहाल करून संयोजकांनी माझ्या खांद्यावर मोठीच जबाबदारी टाकली आहे. ती पेलण्याचे बळ या पुढील काळातही या पवित्र भूमीने मला पुरवावे, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. 

Tags: रणधीर शिंदे राजन गवस उलंगवाडी आसूड सूड कूड गावाच्या तावडीतून सुटका रक्ताळलेल्या तुरी दप्तर कुंधा पाडा खानदेश बालकवी रमेश माने रमेश पवार गोकुळ बागुल कृष्णा पाटील गं.का. सोनवणे सुभाष पाटील-घोडगावकर गणेश कुडे तात्यासाहेब सोनार माधव ज्युलियन साने गुरुजी सखाराम महाराज अमळनेर अशोक कौतिक कोळी अध्यक्षीय भाषण मराठी साहित्य संमेलन खानदेशी बोली थेट सभागृहातून Randhir Shinde Rajan Gavas Ulangwadi Aasud Sud Kud Gavachya Tavditun Sutka Raktalalelya Turi Daptar Kundha Pada Khandesh Balkavi Ramesh Mane Ramesh Pawar Gokul Bagul Krushna Patil G. K. Sonavane Subhash Patil-Ghodgaonakar Ganesh Kude Tatyasaheb Sonar Madhav Julian Sane Guruji Sakharam Maharaj Amalner Ashok Koutik Koli Adhykshiy Bhashan Marathi Sahity Sammelan Khandeshi Boli Thet Sabhagruhatun weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. अशोक कौतिक कोळी,  कूड, जि. जळगाव
ashokkautikkoli@gmail.com


प्रतिक्रिया द्या