डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसे वाटले असते?

काशी विश्वनाथ मंदिरास दिलेल्या सुरुवातीच्या भेटींमध्ये आलेल्या काहीशा वाईट अनुभवांमुळे गांधींनी त्यानंतर मात्र, वाराणसीमध्ये अनेक वेळा येऊनदेखील या मंदिरास पुन्हा भेट दिली नाही. पुरी शहरालादेखील भेट दिल्यानंतर त्यांनी जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यास नकार दिला. तंजावर येथेसुद्धा त्यांनी बृहदेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यास नकार दिला होता. परंतु, वीस वर्षे स्थानिकांनी केलेल्या अथक संघर्षानंतर 1946 साली दलितांना मदुराईमधील मिनाक्षी मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात झाली, तेव्हा हिंदू धर्मातील या रुढीवादी परंपरेला मंदिराने फाटा दिला या कृतीस समर्थन दर्शवण्यासाठी गांधींनी या मंदिराला भेट दिली. 1921 मध्ये गांधींनी अयोध्या शहरास पहिली आणि शेवटची भेट दिली. शहरातील इतर मंदिरांना भेट देण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. तिथे दिलेल्या एका भाषणात, त्यांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता हिंसेची निर्भत्सना कठोरपणे केली, आणि ‘हिंसेला ईश्वर आणि मानवा विरुद्ध केले गेलेले पाप’ असे संबोधले.

1932 साली वेरियर एल्विन नामक एका तरुण ख्रिश्चन धर्मोपदेशकास त्याच्या चर्चमधून हाकलून लावण्यात आले. ‘ऑक्सफर्ड’मध्ये शिक्षण घेतलेल्या या तरुणाने पुढे जाऊन मध्य भारतातील गोंड जमातीमध्ये आपले बस्तान बसवले. आदिवासींच्या परंपरा-चालीरीतींचा आदर असल्यामुळे त्यांच्यापर्यंत येशूची शिकवण पोहोचवण्यापेक्षा शिक्षण आणि आरोग्यसेवा घेऊन जाणे वेरियरने पसंत केले. आणि याच कारणामुळे वेरियरची धर्मोपदेशकपदापासून बिशपने हक्कालपट्टी केली. वेरियर एल्विन गांधींविषयी जाणून आणि आदर राखून होते.

चर्चमधून झालेल्या हकालपट्टीविषयी त्यांनी गांधींना पत्र लिहिल्यानंतर, गांधींनी उत्तरादाखल एल्विन यांना लिहिले, ‘निळे आकाश हेच तुझ्या चर्चचे छत आहे, आणि अवघी पृथ्वी तुझे व्यासपीठ आहे.’ एल्विन यांना सहानुभूती देत गांधींनी पुढे लिहिले, ‘आणि तसेही, इंग्लिश चर्च असू की रोमन चर्च, कुठल्याही चर्चने येशूचा खरा संदेश पोहोचवण्यापासून फारकतच घेतली आहे.’ ख्रिश्चन व्यक्तीस किंवा तसे पाहिले तर कुठल्याही धर्माच्या स्त्री-पुरुषास आपल्या धर्माचे पालन करण्यासाठी अतिभव्य अथवा सुंदर अशा वास्तूची गरज लागत नाही. गांधी स्वतःला धर्मपरायण हिंदू मानीत. पण आपल्या दृढ हिंदू धर्मश्रद्धेचे प्रदर्शन स्वतःसमोर (आणि दुसऱ्यांसमोर) करणेदेखील त्यांना नापसंत होते. त्यामुळेच अहमदाबादमधील प्रदीर्घ वास्तव्यादरम्यान शहरातील कोणत्याही मंदिरात ते गेले नाहीत. साबरमती नदीकिनारी असणाऱ्या झोपडीसमोरील अंगणात बसून ते प्रार्थना करत असत. सेवाग्रामच्या आश्रमात स्थायिक झाल्यानंतरही तेथील खुल्या वातावरणातच प्रार्थना करणे त्यांनी पसंत केले.

गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र- बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. इतर धर्मांच्याविषयी त्यांना तितकाच आदर होता आणि म्हणून आपले अवघे जीवन त्यांनी धार्मिक सलोखा निर्माण करण्याकरिता व्यतीत केले. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारले शब्द हे एका हिंदू देवतेचे रामाचे नाव होते. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती. समतावादी समाज त्यांच्या दृष्टीने ‘रामराज्या’समान होता. अध्यात्मिक कल असणाऱ्या मित्रांसोबत चर्चा करताना गांधी त्यांना एकाग्र चित्ताने आणि भक्तीभावाने रामनामाचा जप करण्याचे फायदे सांगत असत. गांधींचे मंदिरात जाणे क्वचितच होई; त्यांचा हिंदू धर्म विविध प्रकारे आणि वेगवेगळ्या जागी प्रतीत होत असे. मंदिरात जाणे हा गांधींसाठी धर्मातील महत्त्वाचा मुद्दा कधीच नव्हता. त्याचबरोबर प्रसिद्ध तीर्थस्थळी त्यांना आलेला अनुभवदेखील फार सुखद नव्हता.

1902 साली वाराणसीतील काशी विेशनाथ मंदिराला दिलेल्या पहिल्या भेटीने महात्मा गांधी फार प्रभावित झाले नाहीत. त्या वाराणसी भेटीचे वर्णन करताना गांधी लिहितात, ‘घोंगावणाऱ्या माश्या, यात्रेकरू आणि दुकानदारांचा गोंगाट हे सर्व माझ्यासाठी असह्य होते. जिथे शांत चित्ताने मन एकाग्र करता येईल आणि जिथे जिव्हाळ्याचे वातावरण असेल अशी अपेक्षा होती, तिथे सर्व काही अगदी विरुद्ध घडत होते.’ पुढे ते लिहितात, ‘या मंदिरात, देवाच्या शोधार्थ मी सर्वत्र फिरलो, मात्र या अस्वच्छतेने भरलेल्या परिसरात देव मला काही मिळाला नाही.’ 1916 मध्ये भारतात परतल्यानंतर गांधींनी काशी विेशनाथ मंदिराला पुन्हा भेट दिली. तेव्हा त्यांना तो परिसर पूर्वीपेक्षाही जास्त अस्वच्छ आणि बकाल वाटला आणि यामुळेच वाराणसीमधील या अनुभवाने त्यांची खात्री  पटली की, हिंदू धर्मातील देव-देवता या मंदिरांमध्ये असूच शकत नाहीत.

पुढील तीन दशकांत गांधींनी पायी चालत अथवा रेल्वेने देशभर प्रवास केला. या प्रवासादरम्यान महत्त्वाची हिंदू मंदिरे असणाऱ्या प्रत्येक शहरांना त्यांनी भेटी दिल्या. पण या पुरातन मंदिरांच्या आत प्रवेश न करता (फक्त एक अपवाद वगळता, ज्याच्याकडे आपण लेखात पुन्हा येऊ) ही मंदिरे त्यांनी बाहेरून पाहणेच पसंत केले. गांधींची मंदिराच्या आत जाऊन प्रार्थना न करण्यामागे दोन कारणे होती. एक- त्यांची अशी धारणा होती की, देव मानवाच्या हृदयात वास करतो आणि मानवाचा देवावरील विेश्वास किंवा देवावरील प्रेम हे प्रार्थना, कर्मकांड, तीर्थयात्रा, समारंभ यांच्यापेक्षाही जास्त वर्तणुकीतून प्रतीत होत असते.

दुसरे कारण म्हणजे, हिंदू मंदिरांमध्ये स्त्रियांविरुद्ध कठोरपणे लिंगआधारित केला जाणारा भेदभाव आणि दलितांच्या विरुद्ध निर्दयतेने जाती आधारित केला जाणारा भेदभाव त्यांनी जवळून पाहिला होता. काशी विश्वनाथ मंदिरास दिलेल्या सुरुवातीच्या भेटींमध्ये आलेल्या काहीशा वाईट अनुभवांमुळे गांधींनी त्यानंतर मात्र, वाराणसीमध्ये अनेक वेळा येऊनदेखील या मंदिरास पुन्हा भेट दिली नाही. पुरी शहरालादेखील भेट दिल्यानंतर त्यांनी जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्यास नकार दिला. तंजावर येथेसुद्धा त्यांनी बृहदेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यास नकार दिला होता. परंतु, वीस वर्षे स्थानिकांनी केलेल्या अथक संघर्षानंतर 1946 साली दलितांना मदुराईमधील मिनाक्षी मंदिरात प्रवेश देण्यास सुरुवात झाली, तेव्हा हिंदू धर्मातील या रुढीवादी परंपरेला मंदिराने फाटा दिला या कृतीस समर्थन दर्शवण्यासाठी गांधींनी या मंदिराला भेट दिली.

1921 मध्ये गांधींनी अयोध्या शहरास पहिली आणि शेवटची भेट दिली. शहरातील इतर मंदिरांना भेट देण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. तिथे दिलेल्या एका भाषणात, त्यांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता हिंसेची निर्भत्सना कठोरपणे केली, आणि ‘हिंसेला ईश्वर  आणि मानवा विरुद्ध केले गेलेले पाप’ असे संबोधले.

या भाषणाच्या काही दशकानंतर अयोध्येत जन्म झालेल्या (अशी मान्यता असलेल्या) देवतेचे नाव घेणाऱ्या जमावाकडून भारताच्या उत्तर आणि पश्चिमेत हिंसाचाराची एक भयानक लाट पसरवली गेली. 1980 आणि 1990 च्या दशकात रामाचे नाव घेऊन पसरवण्यात आलेली धार्मिक कट्टरता आणि द्वेष पाहून महात्मा गांधी फार अस्वस्थ झाले असते. मी वरील विधान फक्त गांधींचा एक चरित्रकार म्हणूनच नव्हे तर ही हिंसा अनुभवलेल्या काळाचा साक्षीदार म्हणून आणि याचा प्रत्यक्ष अभ्यास केलेला एक नागरिक म्हणून करत आहे. मी स्वतः याची साक्ष देऊ शकतो की, ही बाब हिंदूंची, हिंदू धर्माची आणि भारताची मान शरमेने झुकवणारी आणि एकप्रकारे या सर्वांचा अपमान करणारी होती. आपल्याला काय पुन्हा त्या भयानक काळाची पुनरावृत्ती आणि पुन्हा तेच सर्व अनुभवयाचे आहे?

 1990 पासून ते आजतागायत अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याच्या भावनिक आणि धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणणाऱ्या मुद्याऐवजी अनेक पर्यायी प्रस्ताव समोर ठेवण्यात आलेले आहेत. त्यात सर्वच जाती- धर्माच्या व्यक्तींना सेवा पुरवणारे रुग्णालय किंवा विद्यापीठ यांसारखे प्रस्ताव आहेत. स्वतः महात्मा गांधींचे नातू आणि तत्त्वज्ञ रामचंद्र गांधी यांनी सर्वांत पुरातन अशा आंतरधर्मीय अध्यात्मिक परंपरेच्या ‘सन्मानार्थ’ राम- रहीम चबुतरा निर्माण करण्याचा पर्यायी प्रस्ताव ठेवला आहे. यातील कोणता पर्याय महात्मा गांधींना सर्वात उचित वाटला असता हे आपणास सांगता येणार नाही. आपण हे मात्र खात्रीने सांगू शकतो की, ‘आपल्या धार्मिक श्रद्धेसाठी किंवा राष्ट्राच्या आणि संस्कृतीच्या गौरवाकरिता अतिभव्य अशा स्मारकाची गरज असते,’ या भावनेला गांधींचा विरोध होता. याबाबतीत कोणताच संदेह नाही की, सध्या चालवली जात असलेली अयोध्येतील भव्य राममंदिराची चळवळ गांधींना हिंदूंची आणि हिंदू धर्माची ऊर्जा अनावश्यकरीत्या खर्ची घालणारी शोकांतिका वाटली असती.
(अनुवाद : साजिद इनामदार)

Tags: हिंदू-मुस्लीम राम मंदीर अयोध्या कालपरवा महात्मा गांधी रामचंद्र गुहा ram mandir ayodhya mahatma Gandhi kalparwa Ramchandra guha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन केले आहे 


प्रतिक्रिया द्या