डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

मे 2014 पासून जागतिक स्तरावरील भारताच्या लौकिकाला उतरती कळा लागली आहे. एके काळी चीनच्या बरोबरीने जगातील एक उदयोन्मुख सत्ता म्हणून ओळखले जाण्यापासून ते आता पाकिस्तानबरोबर जोडले जाऊन एक अलिप्त, आत्ममग्न आणि जिथे हुकूमशाही आणि धार्मिक उन्मादाला चालना मिळाली आहे अशी ओळख आपल्या राष्ट्राची बनत चालली आहे. जागतिक घडामोडींची जाण असणाऱ्या कोणालाही हे लागलीच लक्षात येईल की, ही दुर्गती 5 ऑगस्ट 2019 च्या अगोदरच सुरू झाली होती. आणि तरीसुद्धा आपल्या सरकारने त्या दिवशी तो दुर्दैवी निर्णय घेण्यास मागे-पुढे पाहिले नाही. काश्मीरच्या भौगोलिक स्थानामुळे आणि काश्मीर ज्या बाबीचे प्रतिनिधीत्व करते, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांचे पुन्हा संयोगीकरण (रि-हायफनेशन) अगदी वेगाने सुरू झाले आहे. रिपब्लिक आणि झी न्यूज या वाहिन्यांच्या सूत्रसंचालकांकडून याचे स्वागतच केले जाण्याची शक्यता असली तरी आपणा सर्वांना या बाबीने चिंतीत केले पाहिजे.   

दि. 26 जानेवारी 2006 रोजी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ‘इंडिया एव्हरीवेर इन द आल्प्स’ या मथळ्याखाली एक बातमी दिली होती. या बातमीची सुरुवात अशी होती- ‘दावोसमध्ये बुधवारी सर्वत्र फक्त दिल्लीचाच प्रभाव दिसत होता. भारताने या दिवशी एका व्यापक आणि खर्चिक जनसंपर्क अभियानाला प्रारंभ केला आहे. या अभियानाची योजना भारताचा प्रचार जगाच्या अर्थव्यवस्थेतील एक चमकता तारा व विदेशी गुंतवणूकदारांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच चीनच्या तुलनेत एक लोकशाही पर्याय असा करण्याची आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या पहिल्या दिवशी भारताशी संबंधित काही पाहण्यापासून, अथवा ऐकण्यापासून अथवा भारतीय पदार्थ पिण्यापासून अथवा खाण्यापासून तुम्ही अलिप्त रहाल अशी कोणतीच जागा इथे नव्हती. आयोजकांनी या अभियानाचे नामकरण ‘इंडिया एव्हरीवेर’ असे केले आहे. आजच्या अनुभवातून तर असेच प्रतीत होत आहे की, भारतीय आयोजक फक्त शब्दांमधूनच नाही तर कृतीमधूनसुद्धा हेच दाखवू इच्छितात.’

या घटनेनंतर एका आठवड्याने मी बंगलोरमध्ये माझ्या उद्योजक मित्राला भेटलो जो नुकताच स्वीस टेकड्यांच्या सहवासात आयोजित करण्यात आलेल्या महान व उत्तम आणि श्रीमंत व उच्चभ्रू व्यक्तींच्या त्या वार्षिक बैठकीमधून परतला होता. या भेटीत तो अतिशय उत्साही दिसत होता, त्याने सांगितले, ‘आपण करून दाखवले! शेवटी आपण भारत आणि पाकिस्तान संबंधाचे विसंयोगीकरण (डिहायफन) करण्यात आणि त्याऐवजी या समीकरणात चीनला आणण्यात यशस्वी झालो आहोत. आपल्या प्रयत्नांमुळे भारत-पाक समीकरण आता चीन-इंडिया असे झाले आहे!’ मित्राच्या उत्साहाचे मी कौतुकच केले, मात्र त्याच्या उत्साहाला योग्य संदर्भ देऊ इच्छित होतो. म्हणून त्याला सांगितले, ‘तुमच्यासारख्या उद्योजकांचे यात मोठे योगदान असले तरी भारतातील राजकीय वर्गाला याचे अधिक श्रेय जाते. विदेशात आता आपल्या देशाला अधिक गांभीर्याने घेतले जाते, याचे कारण आपली आर्थिक वृद्धी हे तर आहेच, मात्र याहीपेक्षा महत्त्वाचे योगदान आपल्या लोकशाही मूल्यांचे आहे.

खरे तर दावोसमधील आपल्या प्रचारअभियानाचा उद्देश भारताला ‘जगातील सर्वांत वेगाने वाढणारी मुक्त बाजारपेठ असलेली लोकशाही’ असे सादर करणे हा होता. आपण चीनच्या अगदी उलट केले, सांस्कृतिक बहुविविधता आणि लोकशाही पद्धतीने असंतोष व्यक्त करण्याला चालना दिली. यामुळे ज्या युरोप आणि अमेरिकेतील देशांमधील गुंतवणूक आपण आकर्षित करू इच्छित होतो आणि त्यांच्या बरोबरील मैत्री अधिक उंचीवर घेऊन जाऊ इच्छित होतो, त्यांच्या आपण अधिक जवळ जाऊ शकलो.

मी मित्राला सांगितले की, ‘भारताच्या यशामागील भारतीय उद्योगक्षेत्राचे निश्चितच भरीव योगदान असले तरी त्यास चालना मात्र आपल्या राजकीय नेत्यांनी दिली आहे. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून ते मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानांनी नेहरू काळातील लायसन्स परमीटराजला फाटा देऊन मुक्त बाजारव्यवस्थेला चालना दिली. या धोरणांच्या परिणाम- स्वरूप आपल्याला अतिशय प्रभावी आर्थिक वृद्धीचा दर गाठता आला. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अलिप्तवाद निरर्थक ठरला. नंतर नरसिंहराव, वाजपेयी आणि मनमोहनसिंग या सर्वांनीच पश्चिमेकडील देशांबरोबरचे संबंध बळकट करण्यावर भर दिला. यातही सर्वांत शक्तिशाली आणि आपल्या आयटी क्षेत्राची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या अमेरिकेबरोबरील संबंधांना अधिक उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे, वरील धोरणे या सर्व पंतप्रधानांनी आपल्या लोकशाही आणि बहुसांस्कृतिक मूल्यांना तिलांजली न देता आखली. तसेच त्या वर्षीच्या दावोस परिषदेतील प्रमुख कार्यक्रमांपैकी विशेष आकर्षणाचा कार्यक्रम नोबेल मानकरी अमर्त्य सेन यांच्या तेव्हा नुकत्याच प्रकाशित झालेल्या आणि अगदी त्या दावोस परिषदेला समर्पक असे नाव असलेल्या ‘अर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ या पुस्तकावरील भाषणाचा होता.’

2006 मधील माझे ते संभाषण आता आठवताना एक प्रकारे दु:ख होत आहे. आज 13 वर्षांनंतर एकीकडे भारत आणि चीन संबंधांचे विसंयोगीकरण (डिहायफनेशन) झाले आहे, तर दुसरीकडे अगदी स्पष्टपणे पुन्हा एकदा भारतपाक संबंधांचे संयोगीकरण (हायफनेशन) होत आहे. यामागील एक कारण अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आहे, दुसरे कारण दिवसागणिक हुकूमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या सत्तेखाली लोकशाही मूल्यांची होत असलेली घुसमट आहे. आपण आता सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहिलेलो नाही आणि ना आपण पूर्वीप्रमाणे स्वातंत्र्यप्रेमी राहिलो आहोत. भविष्यातील इतिहासकार 5 ऑगस्ट 2019 या दिवसाची नोंद अशाप्रकारे करतील की, हा दिवस टर्निंग  पॉइंट ठरेल. ज्या दिवसापासून आपल्या राजकीय नेत्यांनी आपल्या प्रजासत्ताक राष्ट्राच्या स्थापनकर्त्यांचा मूल्यांपासून फारकत घेतली. भारतातील एकमेव मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेल्या राज्याचे अस्तित्व संपवणे, त्यानंतर तेथे आपले बळ दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला फौजफाटा या सर्व घटना अतिशय नाट्यमय आणि दमनकारी होत्या.

परंतु आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या बहुसांस्कृतिक मूल्यांवर आघात करण्याचे कार्य मागील काही वर्षांपासून चालू आहे. निष्पाप मुस्लिमांच्या जमावाकडून हत्या होण्याच्या घटनांमध्ये मे 2014 पासून कमालीची वाढ झाली आहे. सार्वजनिक जीवनात विविध बाबा-बुवांचे वाढते प्रस्थ, ज्येष्ठ मंत्र्यांकडून निर्वासितांना वाळवी (‘टर्माइट’) म्हणून संबोधणे या सर्व गोष्टी आपल्या देशात बदललेल्या राजकीय व्यवस्थेमध्ये होत असलेल्या मूलगामी स्थित्यंतराकडे दिशानिर्देश करत आहेत. भारतीय संविधानाने नागरिकत्वाची व्याख्या वैयक्तिक स्वातंत्र्य, जात आणि लिंग समानता, सांस्कृतिक बहुविविधता, राज्यांचे अधिकार अशा व्यापक सर्वसमावेशक मूल्यांवर आधारित केली होती. आता या देशात असे वातावरण बनू पाहत आहे की, जिथे बहुसंख्याकांच्या धार्मिक परिप्रेक्षातून आपल्याला सर्वांत अगोदर एक ‘हिंदू’ देश म्हणून पाहण्यास सांगितले जात आहे. इथे राष्ट्राची ओळख बहुसंख्यांक धर्मीयांचे हित, आकांक्षा, त्यांचे पूर्वग्रह आणि त्यांना असलेल्या भयाच्या कक्षेत बनू पाहत आहे. आणि साहजिकच यामुळे होते असे की, इतर देशांतील लोकसुद्धा आपल्याला मुस्लिम पाकिस्तानची हिंदू आवृत्ती याच परिप्रेक्षातून पाहू लागतात.

ही सर्व प्रक्रिया 5 ऑगस्ट 2019 च्या पूर्वीपासून चालू होती, मात्र त्या दिवसाने या सर्व प्रक्रियेला चालना दिली आहे आणि त्यास अधिक केले आहे. या शतकाच्या सुरुवातीला आपण स्वतःला पाकिस्तानपासून वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. त्या वेळच्या सरकारला आपल्या देशाची उद्दिष्टे गाठण्यासाठी येथील उद्योजक वर्ग (या प्रवासातील) अपरिहार्य सहयोगी वाटत होता. विप्रो, टीसीएस आणि इन्फोसिस यांसारख्या आयटी कंपन्यांनी देशाची प्रतिमा नावीन्याची आणि उत्पादकतेची कास असणाऱ्या, बाह्य जगताशी जुळवून घेणाऱ्या भारतीयांच्या रूपात जगाला घडवून आणली. या कंपन्यांनी फक्त रोजगार, संपत्ती आणि गुंतवणुकीच्या संधीच निर्माण केल्या असे नाही. तर या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी परदेशात गेल्यावर सभ्यतेची, विवेकाची भाषा केली आणि परदेशातील उद्योजक, राजकारणी, पत्रकार यांचा विश्वास संपादन केला.

आपल्या देशाचे पाकिस्तानबरोबर पुन्हा होत असलेले संयोगीकरण (हायफनेशन) आता आपण पाहत आहोत. या वेळी विद्यमान सरकारला आपल्या ध्येयपूर्तीसाठी भारतीय दूरचित्रवाणी उद्योगाच्या रूपाने एक उत्तम सहकारी लाभला आहे. टाइम्स नाऊ, रिपब्लिक, आज तक आणि झी न्यूज यांसारख्या वाहिन्यांनी भारताची प्रतिमा (कोत्या वृतीचे आणि स्वतःला असुरक्षित मानणारे अशी) दाखवायला सुरुवात केली आहे. या वाहिन्या बेरोजगारी, शेतीक्षेत्रावरील अरिष्ट, सार्वजनिक संस्थांची होत असलेली अधोगती यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर तर दुर्लक्ष करतातच, पण त्याचबरोबर पाकिस्तानचे आणि भारतातील विरोधी पक्षांचे राक्षसीकरण करतात. आणि हे करताना ते अतिशय निंदनीय भाषेचा वापर करतात, ज्यायोगे आपल्याच देशातील नागरिकांमध्ये एक प्रकारची अनावश्यक भीती आणि निराशा पसरवली जाते.

मे 2014 पासून जागतिक स्तरावरील भारताच्या लौकिकाला उतरती कळा लागली आहे. एके काळी चीनच्या बरोबरीने जगातील एक उदयोन्मुख सत्ता म्हणून ओळखले जाण्यापासून ते आता पाकिस्तानबरोबर जोडले जाऊन एक अलिप्त, आत्ममग्न आणि जिथे हुकूमशाही व धार्मिक उन्मादाला चालना मिळाली आहे अशी ओळख आपल्या राष्ट्राची बनत चालली आहे. जागतिक घडामोडींची जाण असणाऱ्या कोणालाही हे लागलीच लक्षात येईल की, ही अधोगती 5 ऑगस्ट 2019 च्या अगोदरच सुरू झाली होती. आणि तरीसुद्धा आपल्या सरकारने त्या दिवशी तो दुर्दैवी निर्णय घेण्यास मागे-पुढे पाहिले नाही. काश्मीरच्या भौगोलिक स्थानामुळे आणि काश्मीर ज्या बाबीचे प्रतिनिधीत्व करते, त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांचे पुन्हा संयोगीकरण (रि-हायफनेशन) अगदी वेगाने सुरू झाले आहे. रिपब्लिक आणि झी न्यूज या वाहिन्यांच्या सूत्रसंचालकांकडून याचे स्वागतच केले जाण्याची शक्यता असली तरी आपणा सर्वांना या बाबीने चिंतीत केले पाहिजे.

(अनुवाद: साजिद इनामदार)  

Tags: झी न्यूज रिपब्लिक रि-हायफनेशन संयोगीकरण इन्फोसिस टीसीएस विप्रो अर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन दावोस परिषदे मनमोहनसिंग अटलबिहारी वाजपेयी नरसिंहराव चीन भारत-पाक विसंयोगीकरण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम इंडिया एव्हरीवेर न्यूयॉर्क टाइम्स रामचंद्र गुहा भारत-पाक ते चीन-इंडिया पुन्हा भारत-पाक कालपरवा Zee News Republic TV Infosys TCS Wipro Atal Bihari Vajpeyi Manmohan Singh Narsinhrao rehyphenation hyphenation World Economic Forum India Everywhere New York Times China Pakistan India Ramchandra Guha Kalparwa weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन केले आहे 


प्रतिक्रिया द्या