डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

‘‘विचारस्वातंत्र्य हा मूलभूत मानवी हक्क आहे असे मी मानतो. मी राज्यसत्तेच्या ताटाखालचे मांजर बनू इच्छित नाही. मुक्त राहू इच्छित असल्यामुळेच मी राजीनामा दिला आहे.’’ प्रा. हेमंतकुमार शाह, माजी प्राचार्य एच.के. कॉलेज ऑफ आट्‌र्स, अहमदाबाद. 

गुजरात विधानसभेचे लोकनियुक्त सदस्य जिग्नेश मेवानी एच.के. कॉलेज ऑफ आट्‌र्सचे माजी विद्यार्थी आहेत. गेल्या आठवड्यात या महाविद्यालयातील एका कार्यक्रमात त्यांना बोलण्यापासून रोखण्यात आले. खुद्द प्राचार्यांनीच त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. हिंदुत्ववादी गुंडांच्या रोषामुळे भयभीत होऊन विद्यालय विश्वस्तांनी निमंत्रण रद्द करावे, यासाठी प्राचार्यांवर दबाव टाकला. याच्या निषेधार्थ प्राचार्य आणि उपप्राचार्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. 
या निर्णयाची प्रशंसा करताना मी ट्वीट केले की, ‘ही मंडळी गुजरातच्या सर्वोत्तम परंपरेचे प्रतिनिधी आहेत. पटेल, गांधी आणि हंसा मेहता आज असते तर त्यांना या दोघांचा नक्कीच अभिमान वाटला असता.’ सरदार पटेल आणि महात्मा गांधी या नावांशी या स्तंभाचे वाचक तर सुपरिचित आहेतच. 
मात्र हंसा मेहता या गुजरातमध्येही विस्मृतीत जाऊ लागल्यामुळे त्यांची  आठवण करून देणे गरजेचे वाटते. महान देशभक्ताची ती तितकीच महान अर्धांगिनी होती. त्यांचे पती डॉ.जीवराज मेहता यांनी लंडनमधून वैद्यकीय प्रशिक्षण घेतले होते. डॉ.मेहता यांनी गांधींची शुश्रूषादेखील केली. डॉ.मेहता यांनी स्वातंत्र्य आंदोलनात अनेकवेळा तुरुंगवासही भोगला होता. तर दुसरीकडे त्यांची धर्मपत्नी हंसा यांचा समाजात आणि राजकारणात स्त्रियांसाठी समान हक्काचा पुरस्कार करणाऱ्या अखिल भारतीय महिला परिषदेमध्ये (ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स) सक्रीय सहभाग होता. 
भारताच्या संविधानसभेत मोजक्याच महिला सदस्य असल्यामुळे हंसा यांना संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले. येथे त्यांनी दिलेले योगदान खऱ्या अर्थाने जागतिक म्हणता येण्यासारखे होते. मानव अधिकारांच्या वैश्विक घोषणापत्राचा मसुदा तेव्हा तयार केला जात होता. तो तपासत असताना ‘सर्व पुरुष एकसमान आहेत’ हे वाक्य त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी हस्तक्षेप करत मसुद्यात ‘सर्व माणसं एकसमान आहेत’ असा महत्त्वपूर्ण बदल केला. 1949 मध्ये संविधान सभेतील चर्चा समाप्त झाल्यावर हंसा मेहता गुजरात राज्यात परतल्या. 
बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळाला. एका महिलेची कुलगुरू पदासाठी नेमणूक करण्याचा विचार त्यावेळी अमेरिकी किंवा ब्रिटिश विद्यापीठांनीदेखील केला नसता. महात्मा गांधींच्या मृत्यूला उणे-पुरे वर्षच उलटले होते आणि त्यामुळेच गांधीजींचा प्रभाव आणि त्यांची प्रेरणा गुजरातमध्ये ताजी होती. सोबतच बडोद्याला पुरोगामी विचार असलेले महाराज लाभले होते. त्यामुळे भारताच्या इतर भागात आणि जगभरातदेखील राबवता येऊ शकणार नाहीत अशा नवनवीन संकल्पना व उपक्रम या शहरात आणि या राज्यात राबवणे शक्य होते. 
हंसा मेहतांच्या नेतृत्वाखालील म.स. विद्यापीठाने विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांच्या अध्ययनासाठी नावलौकिक मिळवला. जर 1950 साली विद्यापीठ क्रमवारी अस्तित्वात असती तर तुलनेने जुन्या असलेल्या बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास विद्यापीठांना मागे टाकत म.स.विद्यापीठाने क्रमवारीत नक्कीच बाजी मारली असती. मेहता यांच्या कर्तृत्वामुळे व त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमुळे या नव्या विद्यापीठाला जणू अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले होते. केरळ, बंगाल येथील चित्रकार आणि शिल्पकार येथे शिकविण्यासाठी आले, त्यामुळेच ललित कलांच्या अध्ययनासाठी देशातील सर्वोत्तम विभाग अशी ओळख निर्माण झाली. 
हंसा मेहता यांनी मूळ गुजराती नसणाऱ्या अनेक नामवंत व्यक्तींची येथे प्राध्यापकपदी नियुक्ती केली. देशातील सर्वोत्तम समाजशास्त्रज्ञांपैकी एक असलेले मैसूरचे एम.एन. श्रीनिवास असोत की रामकृष्णन हे तमिळ जोडपे. यांपैकी सी.व्ही.रामकृष्णन हे जैवरसायन (biochemist) शास्त्रज्ञ होते तर त्यांची पत्नी राजलक्ष्मी या मानसशास्त्रज्ञ होत्या. या दांपत्यांच्या दोन्ही मुलांनी पहिली पदवी बडोद्यातूनच मिळविली. त्यांपैकी ललिता आता केंब्रिज विद्यापीठात प्राध्यापिका आहेत तर त्यांचे बंधू म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते वेंकटरमण (वेंकी) होत. 
हंसा मेहता यांच्या उत्कृष्ट कार्याचे अहमदाबादमध्ये अनुकरण करण्यात आले. दानशूर वृत्तीच्या साराभाई यांनी तेथे सर्वोत्कृष्ट संस्थांचे जाळे विणले. राष्ट्रीय डिझाईन संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन), राष्ट्रीय व्यवस्थापन संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) आणि भौतिक संशोधन प्रयोगशाळा (फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी) या त्यांपैकीच काही नामवंत संस्था. या संस्थांमध्येही केवळ देशभरातीलच नाही तर विदेशातीलही विद्यार्थी आणि प्राध्यापक होते. चाळीस वर्षांपूर्वी मी गुजरातला पहिल्यांदा भेट दिली. त्यावेळी विद्वानांचा, शास्त्रज्ञांचा, लेखक-कलावंतांचा आदर करणारे (आणि त्यांना आश्रय देणारे) राज्य म्हणून गुजरातची ओळख होती. हंसा मेहता आणि विक्रम साराभाई यांचा वारसा त्यावेळी जपला जात होता. म.स. विद्यापीठातील प्राध्यापक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांच्या ठायी असणाऱ्या सर्जनशील ऊर्जेचा अनुभव या मंडळींशी संवाद साधणाऱ्या प्रत्येकाला येई. या संस्था जरी गुजरातमध्ये असल्या तरी त्यांना एक प्रकारचे अखिल भारतीय आणि वैश्विक असे परिमाण लाभले होते. 
मात्र गेल्या काही वर्षांपासून गुजरातमधील बौद्धिक कार्यासाठीचे स्वातंत्र्य खुंटत चालले आहे. स्वतंत्र विचार करणारे विचारवंत, फक्त राजकारण व उद्योगांनाच नव्हे तर राजकारणी आणि उद्योजकांसाठीही डोकेदुखी ठरतात असा सर्वसाधारण समज राज्यातील अभिजनांनी केला आहे. त्याचबरोबर धार्मिक व जातीय दंगलींच्या लाटेमुळे येथील नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले, जे चिंतनासाठी आणि कल्पक संशोधनासाठी खचितच पोषक नसते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्याआधीपासून हा रासवटपणा अस्तित्त्वात असला तरी राज्याचा प्रमुख म्हणून त्यांच्या तेरा वर्षांच्या कार्यकाळात याला अधिकच चालना दिली गेली. 
एक काळ असा होता की, जगभर ख्याती असणाऱ्या बंगाली आणि तमिळ विद्वानांचे गुजरात माहेरघर होते. राज्यातील विद्यापीठे त्या काळी भविष्यातील नोबेल विजेत्यांना शिकविण्यास सक्षम होती. गतकाळातील हे ‘अच्छे दिन’ पुन्हा येतील काय, असा प्रश्न मला गेल्या वर्षीच पडला. याचे कारण म्हणजे गुजरातमधील एका खाजगी विद्यापीठात प्राध्यापकी करण्याचे निमंत्रण मला त्यावेळी मिळाले होते. मनुष्य नेहमी आशावादी असतो आणि त्यामुळेच हा प्रस्ताव स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला. होकार कळविण्यामागे इतरही अनेक कारणे होती. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आधुनिक काळातील सर्वांत जास्त प्रसिद्ध असणाऱ्या एका गुजराती व्यक्तीचा (महात्मा गांधींचा) मी चरित्रकार होतो; आणि एके काळी ज्या शहराला गांधींजी आपले घर म्हणाले होते, अशा शहरातील ‘गांधी हिवाळी शाळेला’ संचलित  करण्याच्या कल्पनेने मी आकर्षित झालो होतो. 
मात्र नवी दिल्लीतील एका शक्तिशाली मंत्र्यांनी त्या विद्यापीठात माझी नियुक्ती करण्याविरुद्ध विद्यापीठाच्या विश्वस्तांना चेतावणी दिली. त्यानंतर अहमदाबादमधील अ.भा.वि.प.च्या गुंडांनी मला धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर गुजरातमध्ये राहू किंवा शिकवू शकलो नसलो तरी तेथे एखादे व्याख्यान देण्याचे आणि मित्र- मंडळीना, सहकाऱ्यांना भेटण्याचा माझा मानस होता. त्यामुळे अगदी गेल्या महिन्यात अहमदाबादेतील एका प्रथितयश गांधीवादी संस्थेने मला महात्मा गांधींवर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले, तेव्हा मी ते आमंत्रण लागलीच स्वीकारले. 
अहमदाबाद भेटीबद्दल मी अतिशय उत्सुक होतो. गांधींवरील बरेचसे संशोधन मी साबरमती आश्रमातच केले असल्यामुळे, या शहराशी माझे ऋणानुबंध जुळले होते. गांधींविषयी मी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरु, कोलकाता, चेन्नई, कोझिकोड, बोस्टन, न्यूयॉर्क, लंडन आणि इतर अनेक ठिकाणी व्याख्याने दिली होती. अखेर मला स्वतः गांधीजींनी आपलेसे केलेल्या शहरात व्याख्यान देण्याची संधी मिळणार होती. दि.3 मार्च 2019 रोजी अहमदाबाद येथे या परिसंवादाचे आयोजन केले जाणार होते. ‘संवादक महात्मा गांधी’ हा विषय व्याख्यानासाठी निवडला होता. 11 फेब्रुवारीच्या सकाळी मला आयोजकांकडून एक ई- मेल आला. माझ्या भाषणातून सध्याच्या केंद्र सरकारवर प्रतिकूल टिपण्णी न करण्याची ‘विशेष सूचना’ या ई-मेल मधून मला करण्यात आली होती. त्यांना उत्तरादाखल कळवले की, ‘मी केवळ महात्मा गांधी, त्यांचे जीवन व त्यांचा वारसा यावरच बोलेन. कुठल्याही राजकारण्यावर किंवा सरकावर मी काहीच भाष्य करणार नाही.’ त्यानंतर दोन दिवसांनी 13 तारखेला मला अहमदाबादवरून फोन आला. सध्याचे ‘वातावरण’ पाहता हा परिसंवाद होणार नाही, असे मला कळवण्यात आले. आधीपासूनच हवालदिल झालेले आयोजक आणखी खजिल होऊ नयेत म्हणून मी त्यांना अधिक माहिती विचारत बसलो नाही. 
त्या आठवड्याच्या सुरुवातीला एच.के. कॉलेज ऑफ आट्‌र्समध्ये घडलेल्या घटनेमुळे बहुदा माझे भाषण रद्द करण्यात आले असावे. जिग्नेश मेवानी आणि प्रस्तुत लेखक यांचे वय आणि व्यवसाय भिन्न आहेत. दोघांची सामाजिक पार्श्वभूमी व वैचारिक बांधिलकीही भिन्न आहे. ‘सध्याच्या केंद्र सरकारचे टीकाकार’ हा आम्हाला जोडणारा समान दुवा आहे. विशेष म्हणजे मेवानी आपल्या कॉलेजमध्ये ‘डॉ.आंबेडकरांचे जीवन व त्यांचा वारसा’ या विषयावर बोलणार होते, तर मी अहमदाबादमध्ये ‘गांधीजींचे जीवन आणि त्यांचा वारसा’ या विषयावर भाषण देणार होतो. मात्र तरीही आम्हा दोघांचे निमंत्रण रद्द करताना दोघांनाही सारखेच कारण देण्यात आले. यावरून मात्र हे सिद्ध झाले की, स्वायत्त आणि स्वतंत्र समजल्या जाणाऱ्या गुजरात- मधील संस्थादेखील, पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या भारतीयांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यास धजावत नाहीत. आम्ही आमचे भाषणाचे विषय जरी बदलले असते तरी आम्हाला नकारच देण्यात आला असता. एच.के. कॉलेज ऑफ आट्‌र्सचे प्राचार्य व उप-प्राचार्य यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपली कारकीर्द पणाला लावायला मागे पुढे न पाहिल्यामुळे मी त्या द्वयींना नमन केले. त्यांच्या या कृतीमुळे पटेल, गांधी आणि (विशेषतः) हंसा मेहता यांच्या एकेकाळी अधिक समंजस आणि उदात्त परंपरा लाभलेल्या गुजरातची आठवण झाली. 
या राज्याच्या ठायी असणारा उदारपणा येथे पुन्हा पाहायला मिळेल याबद्दल मला यत्किंचितही शंका वाटत नाही. ‘हुकूमशहा’ आणि त्यांची ‘हुकूमशाही’ ही क्षणिक असते, तर मनुष्याची स्वातंत्र्याप्रति असलेली उत्कट इच्छा शाश्वत असते. ज्या गुजरातवर नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी आपले पाशवी वर्चस्व निर्माण केले, एकदा का त्यांची पकड ढिली झाली की, तो पूर्वीचा आणि अधिक मुक्त असलेला गुजरात पुन्हा उभारी घेईल. तो गुजरात पाहण्यासाठी (आणि तेथे बोलण्यासाठी) मी उत्सुक आहे. 
(अनुवाद : समीर दि. शेख,)

 

Tags: right to expression right to speech jignesh mewani Gujarat hansa Mehta kalparwa अभिव्यक्ती स्वातंत्र्य ramchandra guha जिग्नेश मेवाणी गुजरात हंसा मेहता कालपरवा रामचंद्र गुहा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन केले आहे 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा