डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

स्वतःबद्दल सांगायचे तर पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर माझ्यातील देशभक्त हादरून गेला, अतिशय क्रोधित झाला. अतिरेक्यांचे जाळे उभारणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे, असे मला वाटले. मात्र एके काळी इस्लामाबादशी घनिष्ट संबंध असणाऱ्या अमेरिकेने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केल्यामुळे, माझी क्षुधा काही अंशी शांत झाली. आणि प्रत्युत्तरादाखल आपण केलेले हवाई हल्ले योग्यच असल्याचे माझे मत झाले. 

1940 साली जॉर्ज ऑर्वेलने ‘माझा देश उजवा की डावा?’ (My Country Right or Left) या शीर्षकाखाली एक निबंध लिहिला. तेव्हा ब्रिटन आणि जर्मनी युद्धासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि लुफ्तवाफे (नाझी वायुसेना)ची विमाने लंडनवर घिरट्या घालत होती. या चिकित्सक वृत्तीच्या लेखक महाशयांनी मात्र भावनिक झालेल्या राष्ट्र्‌वाद्यांच्या तोंडी न लागता, त्या धुमश्चक्रीपासून अलिप्त राहणे पसंद केले होते. तर युद्धासाठी आतुर असलेल्या डाव्या बुद्धिवादी मंडळींना उद्देशून लिहिलेल्या त्या निबंधात ऑर्वेलने उत्स्फूर्तपणे युद्धविरोधी व एकांगी म्हणावी अशी भूमिका घेतली. कारण समाजवादी विचारांचा ऑर्वेल युद्धाचे भयंकर परिणाम जाणून होता आणि म्हणून युद्ध सुरू होण्यापूर्वीच्या वर्षांमध्ये, युद्धाविषयी सावधगिरी बाळगत संयमाची भूमिका घेण्याचे आवाहन (पत्रकांच्या माध्यमातून)
करत होता. 

मात्र त्या दोन देशांमधील शत्रुत्व शिगेला पोहोचले, तेव्हा ऑर्वेलला आपण निस्सीम देशभक्त असल्याचा साक्षात्कार झाला आणि मग स्वदेशाची बाजू कमकुवत करण्याचे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची शाश्वती देऊन, युद्धाला पाठिंबा देत, प्रसंगी रणांगणावर उतरण्याची ‘इच्छा’ त्याने व्यक्त केली. पुराणमतवादी (उदारमतवादविरोधी) सरकार सत्तेत  असूनही ऑर्वेलने पत्र लिहून आपल्या ‘निष्ठेविषयी’ निशंक राहा' असे सांगितले होते. नंतर त्या युद्धात नाझींचा पाडाव होऊन त्याच्या देशात (ब्रिटनमध्ये) आणि जगभरात शांती प्रस्थापित झाली. 

त्यानंतर जवळपास सहा वर्षांनी ऑर्वेलचा ‘मी का लिहितो’ (Why I Write) हा निबंध प्रकाशित झाला. एखादी व्यक्ती पुस्तके किंवा निबंध (लेख) का लिहिते, यामागील चार कारणे त्याने त्या निबंधात दिली होती. कुणी अहंगंड पोसण्यासाठी लिहितो, तर कुणी सौंदर्यशास्त्रीय कुतूहलापायी, कुणी इतिहासाचा उमाळा येतो म्हणून, तर कुणी निव्वळ राजकीय उद्देशापायी लेखन करतो असे ऑर्वेल म्हणतो. स्वतःच्या लेखनाबाबत तो म्हणतो की, ‘पुस्तक लिहायला बसताना, माझ्या हातून साहित्यसेवा घडणार आहे.’ अशी खूणगाठ काही मी स्वतःशी बांधत नाही. मी लिहितो, कारण मला खोटारडेपणा उघड करायचा असतो, काही तथ्यांकडे लक्ष वेधायचे असते. तर मग आजच्या भारतासाठी कोणता ऑर्वेल समर्पक वाटतो? अति-राष्ट्रवादी की सत्यवादी? म्हणजे लेखक, पत्रकार, संपादक आणि टीव्हीवरील वृत्तनिवेदक आदी मंडळींनी सरकारची तळी उचलून धरावी, की शासन लपवू पाहणारी तथ्ये उजेडात आणून सरकारचे पितळ उघडे पाडावे?   

स्वतःबद्दल सांगायचे तर पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर माझ्यातील देशभक्त हादरून गेला, अतिशय क्रोधित झाला. अतिरेक्यांचे जाळे उभारणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे, असे मला वाटले. मात्र एके काळी इस्लामाबादशी घनिष्ट संबंध असणाऱ्या अमेरिकेने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केल्यामुळे, माझी क्षुधा काही अंशी शांत झाली. आणि प्रत्युत्तरादाखल आपण केलेले हवाई हल्ले योग्यच असल्याचे माझे मत झाले. कारण 26/11 च्या हल्ल्यानंतर आपल्या सरकारने दाखवलेल्या संयमित भूमिकेमुळे पाकिस्तानची जगभर नाचक्कीच झाली; पण त्याची थोडीही लाज त्या देशाला आणि तो चालवणाऱ्या मंडळींना नाही हे उघड आहे. त्यामुळेच 26/11 नंतरही जवळपास दशकभर भारतीयांविरुद्धच्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवाया अखंडितपणे सुरूच आहेत. त्यामुळे बालाकोट येथील जैश-ए-मुहम्मदच्या तळांवर आपण केलेला हल्ला योग्यच होता असे मला वाटते.

मात्र 2019 सालचा भारत हा काही 1940 चा ब्रिटन नाही, या मला आधीपासूनच माहीत असलेल्या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा आला. यासंदर्भातील पहिली बाब म्हणजे, आपण ज्या परिस्थितीला सध्या तोंड देत आहोत, ते रूढार्थाने युद्ध नसून कमी तीव्रतेचा संघर्ष आहे. दुसरे म्हणजे आपल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत. म्हणजेच दिल्लीतील सरकार पाकिस्तानशी सुरू असणाऱ्या संघर्षाकडे बघताना भारतावर याचा काय परिणाम होईल याकडे लक्ष देत असले तरी, ही घटना भाजप पुन्हा निवडून आणण्यासाठी कारणीभूत ठरेल काय, याचीही चाचपणी करत आहे. 

सांगायचे काय तर, पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायला या मंडळींना खूप वेळ लागला नाही. भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री शहीद जवानांच्या गावी जाऊन त्यांच्या शवपेट्यांसमोर सेल्फी काढत होते. भाजप सरकार नियुक्त राज्यपाल ट्वीटरवरून आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष भाषणांमधून, काश्मीर विरुद्ध भारत असा संघर्ष उभा करण्यात व्यस्त होते. असे केल्याने बहुसंख्याक समाज आपल्या गोटात येईल, अशी आशा त्यांना वाटत होती. 

हल्ल्याच्या घटनेनंतर दहा दिवसांनी राष्ट्रीय युद्धस्मारकाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रदर्शन करण्याची नामी संधी चालून आली होती. पण सत्ताधारी पक्षाला हे मान्य नसावे. कारण एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने आपल्या ‘बॉस’ला खुश करण्यासाठी ट्वीट केले की, ‘पहिल्या राष्ट्रीय युध्दस्मारकाचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाला सत्तर वर्षे (नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची) वाट पहावी लागली.’ बॉसनेसुद्धा या उदघाटन सोहळ्याचा उपयोग काँग्रेस पक्षावर तोंडसुख घेत, गांधी कुटुंबावर जोरदार हल्ला चढविण्यासाठी केला. ‘देशाला अधिक सुरक्षित करण्यासाठी जर कुणी काही केले असेल तर ते केवळ मी आणि माझ्या पक्षानेच’ असा पंतप्रधानांच्या भाषणाचा एकूण सूर होता. 

दहशतवाद आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या प्रकारचे भाष्य खूपच भयानक होते. मात्र हे सगळे इतक्यावरच थांबले नाही. 26 फेब्रुवारी रोजी सीमेपलीकडे हवाई हल्ले केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्वीट केले की, ‘आज करण्यात आलेल्या कारवाईमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि करारी नेतृत्वाखाली भारत सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.’ निवडणुका जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या अमित शहा यांचा शिष्टाचार आणि सभ्यतेशी दूरान्वयेही संबंध नसल्यामुळे, त्यांच्याकडून अशी कृती अपेक्षितच होती. मात्र सर्वात निराशाजनक बाब म्हणजे, निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या एका केंद्रिय मंत्र्याने, हा हवाई हल्ला म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘करारी नव्या भारताचा’ पुरावाच असल्याचे ट्वीट केले. त्याच दिवशी स्वतः पंतप्रधानांनी राजस्थान येथील एका सभेत राजकीय भाषण दिले, त्यावेळी मंचावर त्यांच्यामागे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे फोटो लावण्यात आले होते.

इथे पुन्हा जॉर्ज ऑर्वेलकडे वळावेसे वाटते. त्याच्या दोन निबंधांमधील काही घटना मी वर उद्‌धृत केल्या. आता त्याच्या दोन पुस्तकांतील काही गोष्टी उद्‌धृत करतो. ‘ॲनिमल फार्म’ या त्याच्या पुस्तकात नेपोलियन नावाचे एक पात्र आहे. विशेष म्हणजे त्या पात्राला नाव नेपोलियन असूनही, मृत फ्रेंच सम्राटापेक्षा (तेव्हा) जिवंत असणाऱ्या रशियन हुकूमशहाने अधिक प्रेरित केले.   कादंबरीतील ते पात्र कुणी महामानव नसून, ‘महाप्राणी’ आहे. या पात्राचे वर्णन करताना ऑर्वेल लिहितो, ‘‘आता नेपोलियनला केवळ ‘नेपोलियन’ म्हणून संबोधले जात नसे. ‘आमचे नेते कॉम्रेड नेपोलियन’ असा औपचारिक उल्लेख केला जायचा. शिवाय फार्मच्या प्रत्येक यशस्वी कामगिरीचे आणि चांगल्या नशिबाचे श्रेय नेपोलियनला देणे नित्याचे झाले होते.’’ 

यानंतर साहजिकच आठवते ते ऑर्वेलचे दुसरे पुस्तक ‘1984’. त्यातही विशेषकरून आठवते, त्या पुस्तकातील खोटारडेपणात आकंठ बुडालेले सत्य मंत्रालय, द्वेष पसरवणे व विरोधी आवाजांची मुस्कटदाबी करण्यात व्यस्त असलेले प्रेम मंत्रालय, हुजरेगिरी करणारी माध्यमे (Newspeak), विचार निरीक्षक (Thought Police), आणि तुमच्यावर सतत पाळत ठेवणारा ‘बिग ब्रदर’. भाजपच्या ‘ट्रोल आर्मी’शी साधर्म्य दाखवणाऱ्या ‘दोन मिनिटे द्वेष’ (Two Minutes Hate) या प्रचारकी सिनेमाचे (Propaganda film) वर्णनही ‘1984’ या कादंबरीत येते. 

त्या सिनेमात समरस होण्यापासून कादंबरीतील प्रेक्षक स्वतःला रोखू शकत नाहीत. म्हणजे भीती व खुनशीपणाचा हिडीस उन्माद, विरोधकांना ठार मारण्याची इच्छा, छळ करण्याची, मोठ्या हातोड्याने तोंड छिन्नविच्छिन्न करण्याची तीव्र भावना हे सर्व विद्युतप्रवाहाप्रमाणे त्या लोकसमूहांमधून वाहताना दिसते. 

अर्थात, मोदींचा भारत हा काही स्टॅलिनचा रशिया नव्हे. रशियाचा प्रवास झारच्या निरंकुश सत्तेकडून जुलमी कम्युनिस्ट राजवटीकडे, म्हणजे एका हुकूमशाहीकडून दुसऱ्या हुकूमशाहीकडे असाच झाला. आपल्या देशात मात्र गेली सत्तर वर्षे मुक्त वातावरणात निवडणुका होतात. यामुळेच देश आणि राज्य पातळीवर अनेक पक्ष आणि नेतृत्वबदल पाहावयास मिळाले. मात्र हा देश काही ऑर्वेलचा इंग्लडही नाही. 

आपल्या माध्यमांनी प्रचंड तडजोडी केल्या आहेत, विविध संस्था दिवसेंदिवस कमकुवत होत असून त्या अनिष्ट मंडळींच्या ताब्यात जात आहेत, आपल्या राजकारण्यांनीही जनहिताऐवजी स्वहितावर लक्ष केंद्रित केले आहे. मी हा स्तंभ लिहायला घेतला, तेव्हा पुलवामा हल्ल्याला दोन आठवडे होऊन गेले आहेत. पंतप्रधान आणि त्यांचे सरकार देशाच्या सुरक्षेसाठी नक्की काय पावले उचलणार आहेत, याची माहिती विरोधी पक्षातील नेत्यांना देणे अपेक्षित होते. परंतु तसे अद्याप झालेले नाही. 

नुकतेच व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि विरोधी पक्षांना भ्रष्टाचारी व संधिसाधू म्हणून हिणवत, आपल्या (गुणवैशिष्ट्याला अनुसरून) प्रचारकी ढंगात राजकारण करण्यातच धन्यता मानली. अशा परिस्थितीत एका लेखकाचे किंवा पत्रकाराचे काय कर्तव्य असायला हवे? आपल्या सीमांचे रक्षण करण्याऐवजी राज्यसत्ता आपल्याविरुद्ध छुपे युद्ध खेळत असताना, लेखक व पत्रकारांनी सरकारी भूमिकेवर आणि माहितीवर अवलंबून राहावे काय? कॅबिनेट मंत्र्यांनी माजवलेल्या व्यक्तिपूजेच्या पंतप्रधानांच्या स्तोमाच्या आहारी जात ‘मोदी मीडिया’ बनावे काय? की सरकारच्या अपयशावर टीका करत, सरकारकडून देण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीचा समाचार घ्यावा? आपल्या गुप्तचर यंत्रणांना पुलावामा हल्ल्याची पूर्वकल्पना का मिळू शकली नाही, महत्त्वाचे म्हणजे बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबाबत अतिशयोक्तीपूर्ण वाटणारे आकडे सरकारने का प्रसृत होऊ दिले, असे प्रश्न आपण विचारायला नको काय? पक्षपाती हेतूने केलेल्या दाव्यांचे पितळ उघडे पाडणे ही देशभक्ती होऊ शकत नाही काय? 

आगामी निवडणुकींबाबत चिंता बाळगण्याऐवजी आपल्या लेखनातून व कार्यक्रमांमधून, भारतातून दहशदवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठीच्या अल्प व दीर्घकालीन उपाययोजनांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो काय? या प्रश्नांची साचेबद्ध उत्तरे कदाचित आपल्याला देता येणार नाहीत. मात्र त्याबाबत माहिती असणे आणि आपल्या प्रवृत्ती व विवेक यांच्या आधारे या प्रश्नांची उकल करणेही पुरेसे ठरणार आहे. आपली मातृभूमी, संस्कृती, आपला देश आणि देशबांधव यांच्याविषयी प्रेम असणे नैसर्गिक तर आहेच; पण प्रशंसनीयसुद्धा आहे. आपण सर्वजण देशभक्त होऊ इच्छित असलो तरी लेखकांनी मात्र नेत्यांचे, पक्षांचे किंबहुना सरकारचेही प्रचारक मुळीच होता कामा नये.

 

(अनुवाद : समीर दि. शेख) 
 

Tags: पुलवामा pulwama George orwell Why I write My Country Right or Left माझा देश उजवा की डावा? मी का लिहितो? रामचंद्र गुहा जॉर्ज ऑर्वेल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन केले आहे 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा