डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

कोणत्या प्रकारची आधुनिक सभ्यता?

तर गाभारा भरत नाही

कोणत्या प्रकारची आधुनिक सभ्यता?

‘आजचे वास्तव आणि वंचितांच्या मागण्या’ या हेमंत गोळेंच्या टिपणात बराच वैचारिक गोंधळ दिसतो. (साधना : २८ सप्टेंबर २०१९) औद्योगिक सभ्यतेवरील त्यांची टीका वाचताना वाटते की, त्यांची टीका भांडवलशाही तत्त्वांवर आधारलेल्या औद्योगिक सभ्यतेवर म्हणजे फक्त पैसा, नफा यांचा ध्यास घेतलेल्या औद्योगिक सभ्यतेवर नाही, तर एकूणातच औद्योगिक सभ्यतेवरच ती आहे. या टिपणात भांडवलशाही, नफ्याचा ध्यास यांचा साधा उल्लेखही नाही! पण लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात कृषी- आधारित उद्योग तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रामधील सेवा पुरवणारी औद्योगिक वसाहत यांची (स्वागतार्ह) भलावण केली आहे. अशा परस्परविरोधी भूमिका ते घेतात, कारण भांडवली चौकटीतले अमानुष औद्योगीकरण व शक्य कोटीतले मानवी औद्योगीकरण यात ते फरक करत नाहीत. असा गोंधळ अनेक जण करतात. म्हणून गोळेंच्या टिपणावर प्रतिक्रिया देऊन काही प्राथमिक मुद्दे पुढे आणायचा प्रयत्न करीत आहे.

दुसरे म्हणजे ज्याला ते औद्योगिक सभ्यता असे म्हणतात (‘भांडवली’ हे विशेषण न लावता ) त्यावरील त्यांची टीका काही मुद्यांबाबत वैचारिक गोंधळामुळे आहे. ते म्हणतात औद्योगिक सभ्यता ही ऊर्जेच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. तिची दिशा स्वयंचलनीकरणाकडे (ऑटोमेशन) आहे, त्यामुळे माणसांना रोजगार देण्याची तिची क्षमता उत्तरोतर कमी होत चालली आहे. खरं तर ऊर्जेवर अवलंबित्व हे मानवाच्या प्रगतीसोबत अटळ आहे व त्यात काहीही वाईट किंवा धोकादायक नाही. (अमेरिकेतील कॅलिफोर्निया या प्रगत व मोठ्या राज्यासाठीची सर्व वीज २०३० पर्यंत पूर्णपणे पुनर्जीवी स्रोतांपासून मिळवता येईल असे तेथील काही शास्त्रज्ञांनी ठोसपणे मांडले आहे; पुनर्जीवी ऊर्जा एवढी विपुल आहे!) मुख्यत: सूर्यप्रकाश, वारा अशा पुनर्जीवी, विपुल उर्जा-स्रोतांवर जर समाज अवलंबून असेल व या स्रोतांचा हा समाज नियंत्रितपणे, शहाणपणाने वापर करत असेल तर काय बिघडले? गोळे यांनी उल्लेखिलेला कृषिआधारित उद्योग हा समाज अशा प्रकारे ऊर्जेवर अवलंबून असणार आहे की नाही?

भांडवलशाहीत फक्त अधिकाधिक नफा हेच उत्पादनाचे ध्येय असल्याने अशा प्रकारे पुनर्जीवी स्रोतांवर आधारित, विखुरलेले, नियंत्रित औद्योगिकीकरण झाले नाही, होणार नाही. पण ते शक्य आहे असे गोळे यांचेही म्हणणे आहे, असे त्यांचे टिपण वाचताना काही ठिकाणी जाणवते. पण एकूण सूर चुकीच्या पट्टीत लावला आहे. या त्यांच्या ओळींमधला दुसरा मुद्दा आहे रोजगारक्षमतेचा. हे खरे आहे की, भांडवलशाहीमध्ये स्वयंचलनीकरणानंतर त्या क्षेत्रात रोजगार घटतो. (मात्र ही स्वयंचलित यंत्रे बनवणाऱ्या उद्योगात व त्यावर अवलंबून असलेल्या इतर उद्योगात तो वाढतो.) पण खरं तर कामाचे तास कमी केले तर या क्षेत्रातही रोजगार घटणार नाही. मात्र असे करायचे म्हटले तर भांडवलदाराचा नफा कमी होईल. म्हणून गेल्या दोन-तीन दशकांमध्ये प्रचंड प्रमाणावर स्वयंचलनीकरण वाढले असले तरी, भांडवली अर्थशास्त्रानुसार समाज चाललेला असल्याने कामाचे तास कमी झाले नाहीत. त्यामुळे त्या त्या क्षेत्रात रोजगार घटला आहे. पण हे अटळ नाहीय, कारण भांडवली अर्थकारण चालू राहणे हे अटळ नाहीय हे गोळे लक्षात घेत नाहीत.

औद्योगिक सभ्यतेचा दुसरा परिणाम म्हणजे नैसर्गिक संपत्तीचे केंद्रीकरण होते आहे. हे त्यांचे विधान अशाच वैचारिक गोंधळातून येते. सूर्य-उर्जेच्या वापरातून विविधप्रक ारच्या वनस्पती वाढवून, त्यांचा औद्योगिक कच्चा माल म्हणून वापर करायचा, त्यासाठी सौर-ऊर्जेचे उष्णता किंवा वीज यात रूपांतर करून, विखुरलेल्या स्वरूपात कृषी- औद्योगिक विकास करायचा हे निश्चित शक्य, लाभदायी आहे व आवश्यक आहे असे के. आर. दाते आणि प्रभृती यांनी ठोसपणे मांडले होते. जेम्स कार्व्हरने शंभर वर्षांपूर्वी शेंगदाण्याच्या टरफलापासून मोटारीची बॉडी बनवली होती! आता ऑर्गनिक केमिस्ट्री, इंजिनिअरिंग यांची इतकी प्रचंड प्रगती झाली आहे की, वनस्पतीजन्य कच्च्या मालापासून  बहुतांश सर्व प्रकारचा औद्योगिक कच्चा माल बनवता येईल.

पण भांडवली आर्थिक गणितात ते बसत नव्हते म्हणून ते इतके दिवस झाले नाही, हे लक्षात न घेता औद्योगिक विकास म्हणजे खनिज संपत्तीच्या आधारे होणारे केंद्रीकरण असे समीकरण मांडले जाते. गोळेसुद्धा या गैरसमजाने ग्रस्त आहेत असे दिसते. स्वत:ला समाजवादी म्हणवणारे सोव्हिएत युनियन आणि चीन यांनी निसर्ग-संपत्तीचा सुयोग्य वापर, विखुरलेले, विकेंद्रित आधुनिकीकरण ही दिशा घेतली नाही हे खरे आहे. पण अशी दिशा घेताच येणार नाही असे नाही. आज क्युबा सकट अनेक देशात या बाबत लहान-मोठे स्वागतार्ह, आशादायी प्रयोग झाले आहेत, होत आहेत. त्यामुळे केवळ रशिया, चीनकडे बोट दाखवून पर्याय शक्य नाही, असे कोणी म्हणू नये हेही या निमित्ताने नोंदवावेसे वाटते.

डॉ. अनंत फडके, पुणे
 

तर गाभारा भरत नाही

दि. २८ सप्टेंबरच्या साधना अंकात ‘आजचे वास्तव आणि वंचितांच्या मागण्या’ हा हेमंत गोळे यांचा लेख मला मर्मस्पर्शी जाणवला. कारण तुम्हा-आम्हाला पटण्यासारखे आहे. आपल्या देशात सत्य सर्व समाजघटकांना माहीत आहे, पण त्यांचे अनुकरण कोणीही करत नाही. औद्यौगिकीकरणाने मानवाचे जीवन सुखी राहील असे वाटले होते, परंतु मनुष्यजीवन संकुचित झाले आहे. धर्म ही संकल्पना चांगली असली तरी, त्यात एक वास्तव आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे. ते म्हणजे- ‘वासरालेक रांच्या तोंडचे दूध काढून घेऊन गाभाऱ्यात ओतले तर गाभारा भरत नाही.’ अशा अनेक कारणांमुळे आपल्या देशात एक वर्ग वंचित राहात आहे. त्यासाठी हा लेख सर्व समाजघटकांनी वाचायला पाहिजे. समान नैसर्गिक साधनसंपत्तीचे सर्वांना हक्क मिळतील तेव्हा काही प्रमाणात समस्या कमी होतील.

विश्वनाथ किशनराव भालेराव, उदगीर, लातूर.

Tags: readers letter letters to editor वाचकांची पत्रे प्रतिसाद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या