डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

गुहा यांनी प्रस्तुत लेखात मांडलेली माहिती खूपच त्रोटक वाटली. भारतीयांनी धर्मगुरू दलाई लामा यांचा खूप मान राखला. चीनच्या रोषाला न जुमानता त्यांना केवळ सन्मानच नव्हे, तर अभिव्यक्ति स्वातंत्र्यसुद्धा दिले; त्याची दलाई लामा यांनी सढळ हस्ते परतफेड केली. या विधानाची पुष्टी करण्यासाठी लेखकाने थोडे विस्ताराने सांगणे आवश्यक वाटले.

दलाई लामांनी सढळ हस्ते परतफेड केली? 
दलाई लामांनी तिबेटमधून पलायन करून भारतात आश्रय घेतल्याच्या घटनेस 60 वर्षे झाल्याचे औचित्य साधून रामचंद्र गुहा यांनी लिहिलेला लेख 20 एप्रिलच्या साधना अंकात वाचनात आला. दलाई लामा, चीन-भारत संबंधातील 50-60 वर्षांपूर्वी असलेले चढ-उतार याविषयी काहीशा अनभिज्ञ असलेल्या युवकांना या लेखाद्वारे थोडीफार माहिती मिळावी, अशी अपेक्षा आहे. तथापि, गुहा यांनी प्रस्तुत लेखात मांडलेली माहिती खूपच त्रोटक वाटली. भारतीयांनी धर्मगुरू दलाई लामा यांचा खूप मान राखला. चीनच्या रोषाला न जुमानता त्यांना केवळ सन्मानच नव्हे, तर अभिव्यक्ति स्वातंत्र्यसुद्धा दिले; त्याची दलाई लामा यांनी सढळ हस्ते परतफेड केली. या विधानाची पुष्टी करण्यासाठी लेखकाने थोडे विस्ताराने सांगणे आवश्यक वाटले. चिनी सेनेने दलाई लामा व त्यांच्या तिबेटी सहकाऱ्यांचे बंड मोडून काढल्यावर तिबेटमधून स्तोनामार्गे पलायन करून लामा भारतात आले. तेव्हापासून आजपर्यंत भारतीयांनी त्यांच्याकडे आदराने व प्रेमाने पाहिले. त्यांचे गेली 50-55 वर्षे धरमशाला येथे सुसज्ज निवासस्थानात वास्तव्य आहे. परंतु दलाई लामा यांच्या पाठोपाठ निर्वासित म्हणून आलेल्या तिबेटी नागरिकांची भारताकडे पहाण्याची दृष्टी कशी आहे, हे लामांना कितपत माहीत आहे याची शंका आहे. साठ वर्षांपूर्वी चीनला कंटाळून आलेल्यांना त्यांचे आयुष्य नव्याने सुरू करण्यास भारताने शक्य अशी सर्व मदत केली. दिल्ली व आसपास दिसणारी तिबेटी मार्केट्‌स व वसाहती ही त्याची उदाहरणे आहेत. आता ती इतर राज्यांतही दिसतात. काही वर्षांपूर्वी गढवाल, कुमाऊँ भागात काही आठवडे राहण्याचा प्रसंग आला, तेव्हा परतीच्या वेळी धरमशाला येथे गेलो होतो. तिथे पोहोचलो तो दिवस बहुधा बुधवार होता आणि ठरल्याप्रमाणे दलाई लामा त्या वेळी संध्याकाळी जमलेल्या लोकांसमोर खुल्या बाल्कनीत येणार, असे समजले. 

त्या निमित्ताने जवळ असलेल्या तिबेट मार्केटमध्ये तिबेटी नागरिकांनी विक्रीसाठी विशेष करून चीनमध्ये बनवलेल्या खूप वस्तू आणल्या होत्या. साहजिकच सर्वत्र उत्साह दिसत होता. सहज म्हणून तेथील एका स्टॉलवर एक वस्तू पाहत मी विक्रेत्याला किंमत विचारली, परंतु त्या तिबेटी विक्रेत्याने काही उत्तर दिले नाही. कदाचित त्याला एकदा विचारलेले समजले नसेल म्हणून मी पुन्हा एकवार त्याला वस्तूची किंमत विचारली. पण माझ्याकडे दुर्लक्ष करून डॉलर घेऊन परदेशी गिऱ्हाइकाला वस्तू विकण्यात त्याला जास्त स्वारस्य दिसत होते. अखेर अधिक शांत बसवेना म्हणून मी त्या विकेत्याला विचारले की- ज्या भारताने तुम्हाला आश्रय दिला, त्या देशात तुम्ही भारतीयांकडे तिरस्काराने पहाता परदेशी नागरिक तुम्हाला डॉलर्स देतात यासाठी? ज्या वस्तू तुम्ही विक्रीस ठेवता, त्या वस्तू जिथून तुम्हाला पलायन करावे लागले त्या चीनमध्ये बनवल्या असून त्यांची विक्री करून तुम्ही त्याच देशाला आर्थिक बळकट कशासाठी करता? भारतीय लोक तुम्हाला रुपयांत किंमत देतात, त्याचा तुम्ही अनादर करता, तो चुकीचा आहे.

साहजिकपणे त्या तिबेटी विक्रेत्याकडे माझ्या प्रश्नांना उत्तर नव्हते. पण इतक्यावर गप्प न बसता त्याने इतर तिबेटी विक्रेत्यांना गोळा करून मलाच दमबाजी करायला सुरुवात केली.  निर्वासित आलेल्या तिबेटी नागरिकांच्या तिसऱ्या पिढीने भारतातच जन्म घेतलेला आहे. त्या पिढीला चीनपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या लढ्याची जराही कल्पना नसेल. उलट तिबेटी नागरिकांना भारतात नीट वागवले जात नाही असे सूर दलाई लामा मधून-मधून लावतात आणि तिबेटी नागरिक चीनचा निषेध करत दिल्लीत तणावाचे वातावरण तयार करत असतात. ही 60 वर्षे खूप वाटतात. 
डॉ.श्रीकांत परळकर, मुंबई   

पुलवामानंतरचे प्रश्न आणि उपप्रश्न
दि. 16 मार्चच्या साधनातील ‘पुलवामानंतरची देशभक्ती’ हा रामचंद्र गुहा यांचा सडेतोड लेख वाचला. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि भारतीय हवाईदलाने केलेली कारवाई, तसेच यानंतर मोदी सरकार व मोदीसमर्थक तथाकथित देशभक्तीचा- देशप्रेमाचा अचानक आलेला गहिवर याचे वर्णन ‘उन्मादी देशभक्तीचे अविवेकी जाहीर प्रदर्शन’ या वाक्यरचनेत करावे, इतके हे देशप्रेम उथळ स्वरूपाचे असल्याचे अनुभवास आले. त्यामुळे ‘पुलवामानंतरची देशभक्ती’ असे सडेतोड शीर्षक असलेल्या या लेखाच्या अनुषंगाने काही गोष्टींचा ऊहापोह करणे क्रमप्राप्त ठरते. पुरस्कृत पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि त्या साहजिकच म्हणाव्या अशाच होत्या. त्यामुळे पाकला लष्करी कारवाईतून एक चांगला धडा शिकवण्याचा जनतेच्या मनात साठलेला संताप या दृष्टीने भारतीय हवाईदलाने केलेली ही कारवाई योग्य होती, असे वाटते. कारण मोदी सरकारकडून अशा हल्ल्याची अपेक्षा देशवासीयांकडून व्यक्त होत होती. पण या अनुषंगाने विचार करता, आपल्याला अनेक प्रश्नांना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उपप्रश्नांना पुन्हा एकदा नव्याने भिडावे लागणार आहे आणि त्यासाठी आपली तयारी आहे का? पुलवामासारख्या अतिशय कडेकोट लष्करी सुरक्षा क्षेत्रात स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा सुरक्षाकवच भेदून प्रवेश होतोच कसा, हा एक प्रश्न. तसेच आपल्याच देशातील एक नागरिक या हल्ल्यात सहभागी असणे आणि यासाठीची आत्मघातकी प्रेरणा त्याच्यात मुळातच निर्माण होतेच कशी, हा यातून येणारा उपप्रश्न. यांचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आपल्याला उपाययोजना राबवाव्या लागतील. 
बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी, पुणे   

गुहांची ती सूचना पटण्यासारखी नाही
दि.20 एप्रिलचा साधना अंक अगदी वेळेवर हाती आला. अंकातील पानन्‌ पान वाचनीय आहे. काहीशा गोंधळलेल्या मतदारांना- विशेषत: नवमतदारांना कोणाला मत द्यायचे, असा यक्षप्रश्न पडलेला आहे. अशा वेळी प्रस्तुत अंकातील संपादकीय- ‘मतदारांसाठी पंचशील’ अत्यंत मोलाचे ठरावे, यात शंका नाही. त्याचबरोबर छाया दातार यांच्या ‘चला, पुन्हा एकदा प्रजातंत्रावर जनतेचा हक्क सांगू’ या प्रस्तावनेच्या माध्यमातून विचारांना चालना मिळते. ही प्रस्तावना काही थोडे महिने अगोदर मिळती, तर तिचे चीज झाले असते. बेट्टी व इयान बॅलेंटाईन या पुस्तकलेखन, प्रकाशनक्षेत्रात सुरेख व भरभरून योगदान दिलेल्या दांपत्यास वासंती फडके यांनी केलेले अभिवादन वाचताना, काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील पेंग्विन बुक्स संस्थेस दिलेल्या भेटीचे राहून-राहून स्मरण झाल्यावाचून राहत नव्हते. कारण तेथे असलेल्या बेट्टी यांच्या आकर्षक छायाचित्राखालील दिलेल्या माहितीत त्यांचा जन्म फैझाबाद येथे झाल्याचे वाचनात आले होते. 1919 मधील तेव्हाचे आणि शंभर वर्षांनंतर 2019 मधील फैझाबाद... किती महद्‌ अंतर! रामचंद्र गुहा यांचा दलाई लामा या आदरणीय व्यक्तीवरील लेख वाचला. तिबेटमधून 60 वर्षांपूर्वी ते पलायन करून भारतात आश्रयार्थ आले. त्याचे औचित्य साधून हा लेख असेल, तर विशेष वाटण्यासारखे काही नव्हते. शिवाय दलाई लामांनी भारतात राहून स्वतंत्र तिबेटच्या गोष्टी केल्या आणि चीनचा रोष भारतावर लादला, असे म्हटले पाहिजे. त्यांच्या पाठीराख्यांच्या वसाहती भारतात जागोजागी उभ्या राहिल्या. त्याने तिबेटी लोकांना कसे स्वातंत्र्य मिळाले, यांचे उत्तर दलाई लामा यांना रामचंद्र गुहा विचारू शकतात. परंतु त्यांना (दलाई लामा यांना) भारतरत्न द्यावे, ही सूचना अगदी न पटण्यासारखी आहे. भारतरत्न मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता हा वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. 
पम्मी प्रदीप खांडेकर, मुंबई.   
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा