डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

8 जूनच्या साधना अंकात रामचंद्र गुहा, विनय हर्डीकर, अभय टिळक, सुनील तांबे, विवेक घोटाळे या पाच मान्यवरांनी निवडणुकीच्या निकालाची मीमांसा केली आहे. आर्थिक क्षेत्रात फारसे यश न मिळालेल्या भाजपने मतदारांना आपल्याकडे कसे वळवले याची तीन कारणे सांगितली गेली आहेत. एक म्हणजे मोदींचे दमदार व्यक्तिमत्त्व, दुसरे- नव्या पिढीच्या आकांक्षा (ज्या बाकीच्यांना कळलेल्या नाहीत म्हणे) आणि तिसरे- हिंदू राष्ट्रवादाकडे वळलेले जनमत. मोदींच्या तोडीचे व्यक्तिमत्त्व इतर कोणाजवळ नसेल तर इंग्रजी म्हणीप्रमाणे  what cannot be cured must be endired.

तर मोदीद्वेष मोदींनाच बळकटी देईल!

श्री. रामचंद्र गुहा यांचे ते भयसूचक विधान (हिंदू पाकिस्तानच्या दिशेने भारताची काही पावले पडत आहेत.) त्यांच्या लेखांत वाचल्यावरच प्रतिक्रिया देण्याची उर्मी माझ्या मनांत आली होती. परंतु अशा विषयावर वाद करण्याने मने आणखीच कलुषित होतात, म्हणून मी ते टाळले. परंतु आता 8 जूनच्या साधनात लखनसिंह कटरे यांचे पत्र वाचून तसेच भाजपाच्या निवडणूक विजयावर विविध लेखकांनी केलेली विधाने वाचून, माझ्यासारख्या सामान्य वाचकाचे मत आणि भविष्यांत काय होईल याचा माझा अंदाज मांडावासा वाटतो.

कटरे यांनी सर्व मुद्दे बरोबर मांडलेत, पण निष्कर्ष काढतांना गुहांचीच री ओढली. भारताच्या एकविसाव्या शतकांतील संभाव्य घडामोडींविषयी अंदाज बांधताना कोणकोणत्या गोष्टी लक्षांत घ्यायला हव्यात, याचा नीट विचार व्हायला हवा. भारत हा हिंदुबहुल देश आहे, तसाच तो एकच देश हिंदूंचा म्हणून जगात पाहिला जातो, संबोधला जातो. हिंदू धर्मांत अनेक पंथ, उपपंथ व इतर धर्मही सामील केले जात असले तरी, त्या सर्वांना मूर्तिपूजा मान्य तरी असते किंवा तिला कडवा विरोध तरी नसतो. दुसरी गोष्ट, हिंदू धर्माने कधीही धर्मपरिवर्तनावर भर दिलेला नाही. याउलट जगांतील दोन प्रमुख धर्म केवळ धर्मपरिवर्तनामुळेच संख्येने आज क्रमांक एक व दोनचे धर्म झाले आहेत.

दोन्ही धर्मांच्या मूलभूत धार्मिक ग्रंथांमध्ये धर्मपरिवर्तनाचा आग्रह धरण्यांत आलेला आहे. ह्या सर्वाचा परिणाम हिंदूंना रहिवासासाठी उपलब्ध प्रदेश सतत संकुचित होत आलेला आहे. ही गेल्या अनेक शतकांत घडत आलेली गोष्ट आहे. ती नाकारून किंवा आपल्याला सोयीस्कर अर्थ लावून, सन्माननीय लेखकांना आपले पूर्वग्रहदूषित मत मांडणे सोपे जात असेल. पण ती सर्वसामान्यांना दिसणारी वस्तुस्थिती आहे. हिंदुत्ववादाची मांडणी जरी सुमारे शंभर वर्षांपूर्वीची असली तरीही, हिंदूंना उपलब्ध प्रदेशाचा संकोच अनेक शतकांचा आहे.

आता उरलेला प्रदेश, ज्याला भारत वा इंडिया असे आपण म्हणतो, परंतु पाकिस्तान नेहमीच हिंदुस्तान म्हणतो (पंतप्रधान मोदीही हिंदुस्थानच संबोधतात), तो प्रदेश आणखी आक्रसत जाण्याचीच शक्यता अधिक व आजवरच्या ऐतिहासिक प्रवाहाशी सुसंगत आहे. इतिहासांत वेळोवेळी तथाकथित हिंदू धर्माने अस्तित्वासाठी उसळी मारलीही असेल, पण अखेर त्याला माघारच घ्यावी लागते, हेच सिध्द झाले आहे. धर्मांतील अनेकानेक उणीवा, धर्मश्रध्दा व धर्माची कर्मकांडे यांच्यापुढे वैचारिक भाग फोल वाटणं, हा धर्म इतर दोन धर्मांसारखा संघटीत व नियोजित नसणं (किंवा विस्कळीत असणं), यामुळे त्याचा प्रभाव कमी कमीच होत जाणार. त्यामुळे गुहांचे विधान ‘हिंदू पाकिस्तानच्या मार्गावर काही पावले’ हा फारच नजिकच्या काळाचा अंदाज ठरेल. त्यापेक्षा ‘हिंदुस्थानची इस्लामिक पाकिस्तान  होण्याच्या मार्गावरील आणखी काही पावले’ हेच विधान खरे होण्याची शक्यता जास्त आहे. पण मी आज केलेले हे विधान दूराग्रही आणि भयगंडातून आलेले, असे उल्लेखिले जाईल. मला जाब विचारला जाईल. परंतु माझे हे विधान इतिहासाच्या चक्रवत प्रवाहावर आधारित आहे. मूर्तीपूजा न मानणारे धर्म प्राचीन मूर्तीपूजक धर्माला आज ना उद्या गिळंकृत करणारच.

हिंदुत्ववाद्यांची धडपड हा काळ कांही शतकांनीसुद्धा वाढवू शकणार नाही. ज्यांना गुहांचे विधान भयसूचक वाटते, त्यांनी गुहांना असे विधान करून लोकांना भडकवण्याचे काम केल्याबद्दल जाब विचारायला हवा होता. मी मागेही एका पत्रांत श्री. गुहांची पूर्वग्रहदूषित व पुराव्याशिवाय केलेली विधाने दाखवली होती. त्यांच्या कुणाही समर्थकाने ती विधाने सत्त्याधारित आहेत असे नुसते म्हटले देखील नाही. असो. नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालाबद्दल 8 जूनच्या अंकातील संपादकीयांत लिहिलेला ‘आणखी एक संधी हा म.सा.वि.’ अगदी योग्य आहे.

अंकातील इतर लेखांमध्ये मात्र आत्मपरिक्षणापेक्षा पळपुटेपणाच जास्त दिसतो. उदा.एका लेखांत डिमॉनेटायझेशनला ग्रेटेस्ट स्कँडल म्हटले आहे. डिमॉनेटायझेशनला लहान किंवा मोठे ब्लण्डर म्हटले असते तर ते मत झाले असते, परंतु त्याला स्कँडल म्हणणे हा दूषित पूर्वग्रह आहे. तेव्हा आता गरज आहे, आत्मपरिक्षणाची; सर्वच धर्मांनी वैज्ञानिकतेच्या चांचणीत कर्मकांडे घालून पाहण्याची, धर्मांतरांचा विचार सोडून धर्मा-धर्मांतील अंतरे कशी मिटवता येतील याचा विचार करण्याची, पक्षीय किंवा विशिष्ट तात्विक विचारप्रणाली यांच्या आहारी न जाता लोकांच्या आजच्या व भविष्यांतल्या गरजा समजून त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची! तसा विचार करता येत नसेल तर केवळ मोदीद्वेष हा मोदींनाच बळकटी देईल.

-अरविंद खानोलकर, मुंबई


हा देश हिंदू पाकिस्तान बनणार नाही!

‘हिंदू-पाकिस्तानच्या मार्गावर काही पावले...’ हा रामचंद्र गुहा यांचा लेख (दि. 15 मे) वाचला आणि याच अनुषंगाने एक सच्चा हिंदू म्हणून काही विचार मांडणे क्रमप्राप्त ठरते. धर्माभिमान जागता ठेवणे ही हिंदुत्वाचे राजकारण करणारांची आजची राजकीय अपरिहार्यता झाली आहे. वास्तविक त्यांना हिंदू धर्माशी काहीही देणे घेणे नाही. आहे तो फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थ. बहुसंख्यांकांना अल्पसंख्याकांची भीती दाखवत वेळप्रसंगी छद्म राष्ट्रवादाची बेमालूमपणे सरमिसळ करत, त्यांना आपला राजकीय अजेन्डा राबवायचा आहे. गेल्या काही दशकांपासून बहुसंख्यांकवादाच्या आडून धर्माधिष्ठित राजकारणाचा एक नवा घातक खेळ देशात खेळला जात आहे.

हिंदुत्ववादी विचारसरणी जोपासणाऱ्या संघटनांच्या, ‘अखंड भारत’ या संकल्पनेच्या धडका धर्मनिरपेक्ष संहितेचा आदर राखणाऱ्या विचारप्रवाहावर सातत्याने होत आहे. पण अखंड भारत या संकल्पनेत पाकिस्तानी मुसलमान नागरिकांचा सहभाग काय असेल, यावर सतत मौन बाळगलेले दिसते. ‘अखंड भारत म्हणजेच हिंदू राष्ट्र’ ही अशक्यप्राय बाब असल्याचे दिसताच, या संघटनांनी आपला मोर्चा ‘भारत हिंदू राष्ट्र’ या संकल्पनेकडे वळलेला दिसतो. ‘हिंदू राष्ट्रवाद हाच भारतीय राष्ट्रवाद’, म्हणून मांडला जातो आहे आणि यात या हिंदुत्ववाद्यांना काही प्रमाणात यशदेखील मिळत असल्याचे दिसते.

मध्ययुगीन कालखंडात इस्लामी राजवटींची आक्रमणे होत असत, तेव्हा हिंदूंचे एकत्रीकरण समजण्यासारखे होते. पण आज 80 टक्क्यांहून अधिक हिंदू समाज असलेल्या देशात हिंदूंमध्ये असुरक्षितता आणि त्यातून आक्रमकता निर्माण करण्याचे राजकारण करणे म्हणजेच हिंदूंमध्ये इस्लाम मधील कट्टरता आणि धर्मांधता आणण्याचे काम आहे. पण दुर्दैवाने ‘आपला राजकीय स्वार्थासाठी वापर होत असल्याचे भान’ हिंदू समाजाला आहे, असे दिसत नाही. म्हणूनच कदाचित रामचंद्र गुहांनी त्या लेखात भारत हिंदू-पाकिस्तानच्या मार्गावर काही पावले जात असल्याची भिती व्यक्त केली आहे.

वर्तमान राजकीय वातावरणातील परिपेक्ष्यात विचार करता लेखकाची ही भीती अगदीच अनाठायी आहे, असे म्हणता येणार नसले तरी ‘भारत हिंदू पाकिस्तान होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे का’, या प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. कारण हिंदू धर्म हा इस्लामसारखा विशिष्ट धर्मग्रंथाला बांधलेला संघटित धर्म नाही. शिवाय हिंदू धर्मात लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांना बळ देणारी मूल्ये आहेत. इस्लाम धर्मातील कट्टरता अजून तरी हिंदू धर्मात प्रस्थापित झालेली नाही, लोकमान्यता पावलेली नाही. हिंदू धर्म आणि इस्लाम धर्म यात हाच प्रमुख गुणात्मक फरक  असावा. पण म्हणून हिंदू धर्मात सर्व काही आलबेल आहे, असे मानण्याचे कारण नाही. 

मुळातच हिंदू धर्म हा रूढार्थाने धर्म नाही. तो कुराण किंवा बायबल यांसारख्या धर्मग्रंथांनी बांधलेला नाही. इस्लामसारखा दैवी शक्तीचे उदात्तीकरण लाभलेला शरियासारखा कायदा, तसेच धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेचा पुरस्कार करणारे नीती नियम हिंदू धर्मात नाहीत. तसेच हिंदू धर्मातील अनेक विचारप्रवाह कमालीचे उदात्त आणि मुक्तीदायक आहेत. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘भारत हे हिंदू राष्ट्र असणार ‘नाही’ अशी ग्वाही संविधानात दिली गेली आहे, विविधतेतील एकता जपणारे राष्ट्र म्हणून भारत वाटचाल करणार असल्याची दिशा स्पष्ट केली गेली आहे.

आज जरी हिंदू राष्ट्रवाद आक्रमकपणे समोर मांडला जातो आहे, तरी असा प्रखर राष्ट्रवाद नेहमीच संकुचित असतो. हिटलर आणि मुसोलिनी हे अशाच प्रखर राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. पण त्यांचे पुढे काय झाले, हा इतिहास सर्वश्रुत आहे. अगदी त्यांच्या जर्मनी आणि इटली या देशांतही त्यांचे नाव आदराने कोण घेत नाही. वर्तमान आणि भविष्याची सुसंगत रचना म्हणजेच इतिहास असल्याने, भारत हिंदू पाकिस्तान बनण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी, तशी सुतराम शक्यता वाटत नाही. हिंदू राष्ट्रवादाचा धोका देशापुढे असला तरी बुद्धिवादी हिंदूंना तो कदापि मान्य होणार नाही. अर्थात, या तर्काला खरे की खोटे ठरवायचे हे सर्वस्वी बहुसंख्य हिंदू धर्मीय जनतेवरच अवलंबून असणार आहे.

-बाळकृष्ण शिंदे, पुणे


दुसरे कारण जास्त प्रभावी?

8 जूनच्या साधना अंकात रामचंद्र गुहा, विनय हर्डीकर, अभय टिळक, सुनील तांबे, विवेक घोटाळे या पाच मान्यवरांनी निवडणुकीच्या निकालाची मीमांसा केली आहे. आर्थिक क्षेत्रात फारसे यश न मिळालेल्या भाजपने मतदारांना आपल्याकडे कसे वळवले याची तीन कारणे सांगितली गेली आहेत. एक म्हणजे मोदींचे दमदार व्यक्तिमत्त्व, दुसरे- नव्या पिढीच्या आकांक्षा (ज्या बाकीच्यांना कळलेल्या नाहीत म्हणे) आणि तिसरे- हिंदू राष्ट्रवादाकडे वळलेले जनमत. मोदींच्या तोडीचे व्यक्तिमत्त्व इतर कोणाजवळ नसेल तर इंग्रजी म्हणीप्रमाणे  what cannot be cured must be endired.

अभय टिळक यांनी दुसरे कारण जास्त प्रभावी मानले आहे. नव्या पिढीची मानसिकता विशद करताना त्यांनी नॅनो कारची कथा चांगली वर्णन केली आहे. ‘चारचाकीचे अन्य मॉडेल परवडत नाही म्हणून आम्ही नॅनो घेतो,’ हा शिक्का नवमध्यमवर्गाला नकोसा वाटत होता; हे त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण टिळक असेही म्हणतात की, ‘‘मोदी सरकारने देशापुढील आर्थिक समस्यांच्या निराकरणासाठी फार काही ठोस पावले 2014 ते 2019 या पाच वर्षांत उचललेली नव्हती, हेही मतदारांनी अनुभवले होते.’’ म्हणजे मोदी-1 सरकारच्या कामगिरीवर खूष होऊन मतदारांनी त्यांना मते दिली असे काही म्हणता येत नाही.

भाजपचा राष्ट्रवाद ही मात्र एक गंभीर समस्या आहे, त्याने हिंदू समाजही प्रतिगामी बनतो आणि निरनिराळ्या समाजांमधील सामंजस्यही बिघडते. त्या मुद्यावर जनजागृती करण्याचे काम जितके राजकीय पक्षांचे आहे, तितकेच ते सर्वसाधारण विचारवंतांचेही आहे. पण हे करणाऱ्यांची विेशसनीयता चांगली असायला हवी. विनय हर्डीकर यांनी ‘बालिश देशभक्ती’ असा एक छान शब्दप्रयोग त्यांच्या लेखात वापरला आहे. मला समाजवाद किंवा परिवर्तनवाद या शब्दांनासुद्धा बालिश असा शब्द जोडावासा वाटतो. कारण या वादांचा पुरस्कार करणाऱ्यांना जग बदलल्याची जाणीवच नाही. अभय टिळक यांनी हे दाखवले आहे की, आजच्या वृद्धिष्णू पिढीला जीवनात नेमस्तपणा नको आहे. तसे असेल तर मग गांधींचे विचार त्यांच्यापुढे सांगत बसण्यात काही अर्थ नाही.

दोन मुद्यांबद्दल तर समाजवादी व परिवर्तनवादी यांच्याकडे विचारस्पष्टताच नाही. एक म्हणजे संपत्ती उत्पादनाची काही पर्यायी पद्धत असेल तर ती कोणती आणि दुसरा म्हणजे जे काही उत्पादन होईल, त्यावर कुणाचे आणि किती मानवी   हक्क आहेत. हा मुद्दा मी 27 फेब्रुवारी 2016 च्या साधनात मांडला होता आणि या बाबतीत बौद्धिक अंधश्रद्धा नको, असे 30 एप्रिल 2016 च्या अंकात म्हटले होते. या अस्पष्टतेमुळे राष्ट्रवादावरील त्यांच्या लिखाणाला किती मान्यता मिळेल याची मला शंका वाटते. त्यांनी आपली विश्वसनीयता वाढवण्याची गरज आहे.

विनय हर्डीकर त्यांच्या लेखात बालाकोटवरील हल्ल्याबाबत म्हणतात की, ‘आपली विमानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेलेली नव्हती... भारताच्या हवाई हद्दीतूनच व्यवस्थित बॉम्बिंग केलं.’ त्यांच्या या विधानाला काही आधार दिसत नाही. त्यामुळे त्यांची विश्वसनीयता डागळत तर नाही ना हे त्यांनीच ठरवावे.

गेली काही महिने श्री.सुरेश द्वादशीवार नेहरूंवर लेखमाला लिहिताहेत. त्यातून नेहरूंचे व्यक्तिमत्त्व उजळते आहे खरे, पण इतिहासाचा तपशील थोडा बिघडतो आहे. दि. 11 मे च्या अंकात ते म्हणतात की, ‘प्रत्यक्षात 1937 ची निवडणूक नेहरू आणि जीना यांच्यातच झाली, हिंदूबहुल क्षेत्रात काँग्रेसचे तर मुस्लिमबहुल क्षेत्रात मुस्लिम लीगचे उमेदवार विजयी झाले आणि पंजाब व बंगाल हे दोन प्रांत मुस्लिम लीगच्या ताब्यात गेले.’ पण गुगलवरून जी माहिती मिळते ती अशी- मुस्लिम लीगचे स्वतःच्या बहुमताचे सरकार कोणत्याच प्रांतांत झाले नाही. पंजाब व बंगालमध्ये लीग व इतर यांची संयुक्त सत्ता आली आणि सिंधमध्ये लीगेतर मुसलमानांची आली. भारतभर लीगला किती यश मिळाले? एकंदर 485 जागांपैकी 108 जागा. जिना भारतात कसे परतले याचे वर्णन एखाद्या चुटकुल्यासारखे वाटते,इतिहासकथन वाटत नाही

-भ. पा. पाटणकर, नागपूर


सिद्ध न झालेले विधान

साधनाचा 8 जून 2019 चा अंक वाचला. त्यामध्ये सुनील तांबे यांनी लिहिले आहे की, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचारात भाजप कार्यकर्त्यांनी ईेशरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडला. माझ्या माहितीप्रमाणे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांनी एकमेकांवर हा पुतळा फोडल्याचे आरोप केले आहेत, परंतु पुतळा कोणी फोडला हे अजून न्यायालयात सिद्ध झालेले नाही. अशा परिस्थितीत ‘पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी फोडला’ असे विधान सुनील तांबे यांनी कसे केले? आणि ‘साधना’ने असे सिद्ध न झालेले विधान कसे छापले?

-विजय आपटे, मुंबई


तिथे जुमलेबाजी चालणार नाही...

दि. 8 जूनच्या अंकात भाजपच्या पुनर्विजयाचे रहस्य पाच लेखांतून वाचले. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी मोदींचे आवाहन मानले, असे सर्वांनीच म्हटले आहे. म्हणजे या पिढीला कुठल्याही पूर्व-इतिहासाचे ओझे वाहावयाचे नाही, भविष्याची त्यांना काळजी आहे. त्यामुळे काही एका आशेने त्यांनी एकगठ्ठा म्हणता येईल असे मतदान केले असावे. मात्र ह्या पिढीला फार काळ वाट पाहणे आवडणारे नाही. तशी त्यांची घडणही नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना तातडीने हात घालावा लागेल. तिथे जुमलेबाजी चालणार नाही. येत्या शंभर दिवसांत त्याची काही सुरुवात तरी दाखवावी लागेल.

-सुरेश चांदवणकर, मुंबई


डॉ.आनंदी आणि डॉ.रुक्मिणी

डॉ. आनंदीबाई जोशी एकमेवाद्वितीयम. साधनाने त्यांच्यावर विशेषांक काढलाय. मीडियानेही सर्व प्रकारे त्यांना न्याय दिलाय. पण ‘हे लग्न मला मान्य नाही.’ इथूनच डॉ.रुक्मिणीबार्इंची सुरुवात. आजही हे करणे अवघडच. नंतर तिने उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून हयातभर प्रॅक्टिसच केली. मीडियाने याची कितपत दखल घेतली, कितपत हळसहश्रळसहीं केले, माहीत नाही. भेदभावात्मक वाटते. डॉ.आनंदी व डॉ.रुक्मिणी या दोघी समकालीन. प्रत्येक विद्याशाखेत तौलनिकता हा एक विभाग असतोच. लेखकांनी तरी हा मुद्दा व न्याय विचारात ठेवणे जरूरीची आहे, असे वाटते. न्याय, समावेशकता, तौलनिकता इत्यादी मानदंड मीडीयात आहेतच.

वृन्दाश्री दाभोलकर, सातारा

Tags: pratisad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या