डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

परंजय गुहा यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे की, आज 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये 50 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. 1 अब्ज नोंदणीकृत सिमकाडर्‌स वापरली जात आहेत. 2018 च्या अखेरपर्यंत येथील 75 कोटी मोबाईल फोन्सपैकी 40 कोटी फोन्समधून इंटरनेटचा वापर केला जात आहे. याचा अर्थ केवळ महानगरे-निमशहरी भाग यांच्यापुरता हा वापर मर्यादित नाही, तर दुर्गम भागातही तो पोचलेला आहे. दर तीन मतदारांतील एक आज व्हाट्‌सॲप वापरत आहे. या माध्यमांच्या दुरुपयोगाची, एकाधिकारशाहीची चर्चा जगभर सुरू आहे. ही एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी काही उपाययोजनाही तयार केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना फेसबुकच्या भारतातील कार्यप्रणालीबाबत शोध-अभ्यास करावासा वाटला.

मी स्वत: फेसबुक वापरत नाही. कारण? खरं काही विशेष नाही, पण आळस, स्वत:विषयी काही सांगण्यासारखे आहे असे वाटत नाही. मूड आणि आलेले तुटक-फुटक विचार सर्वांपर्यंत पोचवावेत, असेही कधी वाटले नाही. फोटो व्हाट्‌सअँपनेही पाठवता येतात. मागील दोन-तीन वर्षांपासून तर फेसबुकच्या चुकीच्या वापराच्या ज्या बातम्या येऊ लागल्या आहेत, त्याने तर घाबरायला होते. गुगलवरसुद्धा आपली इतकी माहिती असते हे जेव्हा लक्षात येते, तेव्हासुद्धा चमकायला होते. कोणी तरी आपल्याला फॉलो करत आहे, सावलीसारखे मागे-मागे येत आहे, हे कळून जरा दबकायला होते. फेसबुकचा खरा चेहरा उलगडला गेला तो केम्ब्रिज अँनॅलेटिका या कंपनीने डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकन अध्यक्षांसाठी लाखो व्यक्तींच्या फेसबुक टिपण्यांचा वापर करून त्यांची मने जाणून घेऊन ट्रम्पना अनुकूल मते मिळवून देण्यासाठी प्रचार केला, तेव्हा. फेसबुक या कंपनीने केम्ब्रिजला हे लाखो अकाऊंट्‌स विकले होते. त्यातील माहिती वापरून एकसारखी मते असणाऱ्या व्यक्तींचे विविध गट तयार करून त्यांना आवडेल-पटेल अशा ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या बाजू, त्यांची त्या प्रकारची वक्तव्ये त्या-त्या गटाला पोचतील अशा पद्धतीने त्यांनी पोस्ट तयार केल्या आणि ही अनुकूलता मिळविली, असे म्हटले जाते.

या पार्श्वभूमीवर परंजय गुहा-ठाकुरता यांचे मराठीत अनुवादित झालेले पुस्तक हाती लागले आणि एका दिवसात वाचून झाले. परंजय गुहा-ठाकुरता हे प्रसिद्ध पत्रकार आहेत. अंबानींच्या आर्थिक साम्राज्यावर त्यांनी भले मोठे पुस्तक लिहिले आहे. मध्यंतरी काही काळ ते ‘इकॉनॉमिक अँन्ड पोलिटिकल वीकली’चे संपादक होते. सध्या ते ‘न्यूजलिंक’ या वेबपोर्टलचे मार्गदर्शक म्हणून काम करतात. ‘मुक्त शब्द’ या प्रकाशन संस्थेने मेरी पाटील यांच्या नावाने जो सन्मान जाहीर केला, त्या समारंभामध्ये त्यांना ऐकण्याचा योग आला. पुस्तकाच्या सुरुवातीला दोन-तीन पत्रकारांचे फेसबुकच्या उपयोगितेसंबंधी लेख आहेत, तेही वाचनीय आहेत. अपूर्वानंद हे दिल्ली विद्यापीठामध्ये हिंदी शिकवितात आणि राजकीय घटनांबद्दल भाष्य करतात. त्यांनी म्हटले आहे की- माणसाची जी कमकुवत बाजू आहे, त्यात प्रसिद्धी मिळविण्याचा सोस व अनेक मित्र मिळविण्याची इच्छा आणि त्यांनी दिलेल्या ‘लाइक्स’ने मिळविण्याचा आनंद यामुळेच फेसबुक मोठं व्हायला- अगदी एखाद्या देशाहूनही मोठं व्हायला मदत झाली. ते माहिती देतात की, जगभरात 2.2 अब्ज लोक दर महिन्याला फेसबुक लॉगइन करतात.

अनेक विचारवंत फेसबुकवर टीका करताना म्हणतात की, जगावर प्रभुत्व गाजविणे आणि फूट पाडणे हे त्यांचे मूलमंत्र आहेत. आपापल्या देशातील सीमा ओलांडून लोक एकमेकांशी जोडले जातात, हा फेसबुकचा दावा दुय्यम आहे. फेसबुकचा खरा उद्देश आपले कार्यक्षेत्र विस्तारून त्यातून व्यवसायवृद्धी करणे हा आहे. एकदा फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांनी असेही सांगितले आहे की, राजकीय जाहिरातींच्या माध्यमातून फेसबुकला मिळणाऱ्या पैशांबद्दल कायदा-सुव्यवस्था यंत्रणांनी आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. असे करण्याने आपण नव्या बदलांना मुकतो. अपूर्वानंद म्हणतात की- फेसबुक काय करतंय- तर माणसाच्या स्वमग्न असण्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेतंय. लोकांनी जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर घालवावा यासाठी त्यांना भाग पाडतंय. माणसाला गुलाम बनवतंय- अगदी चतुरपणे. मानवी इतिहासात झालं नाही असं सोशल इंजिनिअरिंग फेसबुक करतंय. एकाधिकारशाही राबवणाऱ्या सत्ता त्यापासून खूप काही शिकू शकतात! अपूर्वानंद म्हणतात की- लोकशाहीमध्ये विचारांच्या देवाणघेवाणीला, वाद-प्रतिवादाला अनन्यसाधारण महत्त्व असते, त्याशिवाय खरी लोकशाही अस्तित्वात असू शकत नाही. पण विचारांचा हा वाद वास्तव ज्ञानाच्या आधारानेच होऊ शकतो; विचारांच्या आभासावर नाही. फेसबुक मात्र वास्तव लोकशाहीचा एक आभास निर्माण करतंय, जिथे प्रत्येक जण कुठल्याही मध्यस्थाशिवाय सहभागी होऊ शकतो; त्यामुळेच हे लोकशाहीकरण आहे, असा भ्रम तयार होऊ शकतो. पण दुसऱ्या बाजूने ते लोकशाहीविरोधी कट- कारस्थानांमध्ये सहभागी असू शकते.

प्रबीर पुरकायस्थ या पत्रकाराने फेसबुकचाच एक भाग असलेल्या व्हाट्‌सअँपसारख्या माध्यमातून खोट्या, तथ्यहीन बातम्या कशा पसरविल्या जातात यावर भर दिला आहे. मोठ्या माध्यमांपेक्षा हे सर्व लहान-लहान समूहांतून, व्हाट्‌सअँपच्या ग्रुपमधून पसरविले जाते. याला उपायही आहेत. तसे करणारी अल्ट न्यूजसारखी माध्यमे निघाली आहेत. या सर्व खोट्या बातम्या ज्या समूहांमार्फत पसरविल्या जातात, त्यांना वेचून एकत्र करणे आणि त्यांचा मूळ स्रोत शोधून काढणे शक्य होते. (याची अनेक उदाहरणे आहेत आणि हा स्रोत मोदी सरकारपर्यंत पोचतो, असेही लक्षात आले आहे.) मात्र या बातम्या जेवढ्या व्हायरल होतील आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचतील, तेवढा वापरकर्त्यांचा डाटा (विदा) कंपन्यांना विकण्यासाठी- विशेषत: राजकीय कंपन्यांना विकण्यासाठी उपलब्ध होतो. ते व्हायरल करण्यासाठी जेवढा पैसा खर्च करतात तो केव्हाच वसूल होतो, असे पुरकायस्थ यांचे म्हणणे आहे.

परंजय गुहा यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे की, आज 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये 50 कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. 1 अब्ज नोंदणीकृत सिमकार्ड्स वापरली जात आहेत. 2018 च्या अखेरपर्यंत येथील 75 कोटी मोबाईल फोन्सपैकी 40 कोटी फोन्समधून इंटरनेटचा वापर केला जात आहे. याचा अर्थ केवळ महानगरे-निमशहरी भाग यांच्यापुरता हा वापर मर्यादित नाही, तर दुर्गम भागातही तो पोचलेला आहे. दर तीन मतदारांतील एक आज व्हाट्‌सअँप वापरत आहे. या माध्यमांच्या दुरुपयोगाची, एकाधिकारशाहीची चर्चा जगभर सुरू आहे. ही एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी काही उपाययोजनाही तयार केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना फेसबुकच्या भारतातील कार्यप्रणालीबाबत शोध-अभ्यास  करावासा वाटला आणि त्यासाठी त्यांनी 50 पेक्षा अधिक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. समाज- माध्यमांबाबत सार्वजनिक रीत्या उपलब्ध असलेली माहिती समाविष्ट केली. आधी पाच दीर्घ वृत्तांत न्यूजवीक या पोर्टलवर प्रकाशित केले. नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या भारलेल्या राजकीय वातावरणाच्या परिप्रेक्ष्यात या एकंदर आशयाची मांडणी केली. हे पुस्तक त्याचे फळ आहे.

फेसबुकमधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाजपला जवळून मदत केली आहे, भाजपसोबत काम केले आहे आणि ते अजूनही सुरू आहे. जवळपास नऊ वर्षे असलेली त्यांची ही जवळीक अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत आहे, त्यांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. फेसबुक आणि व्हाट्‌सअँपच्या भूमिकांचा चिकित्सकपणे वेध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. समाजमाध्यमातून पसरविण्यात  आलेल्या अफवा आणि तथ्यहीन माहितीमुळे देशभरात अनेक ठिकाणी मॉब-लिंचिंगसारख्या घटना घडल्याचे आरोप झाले, त्यातील तथ्य शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मोदींवर टीका करणाऱ्या, त्यांच्या ध्येयधोरणांची समीक्षा करणाऱ्या लोकांना एकटे पाडले जात आहे, मुख्य धारेतून बाजूला फेकले जात आहे याकडेही आम्ही लक्ष वेधले आहे. दि.14 नोव्हेंबर 2018 रोजी फेसबुकबाबतचा सर्वांत मोठा शोधवृत्तांत न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आला होता. त्यातून जगातील सर्वांत बलाढ्य डिजिटल माध्यम कंपनीच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या कंपनीचे दोन मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग व शेरिल सँडबर्ग यांचे राजीनामे मागण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय कार्यकारिणीच्या परिप्रेक्ष्यात भारतात काय घडले आहे आणि घडत आहे यावर प्रामुख्याने येथे भर देण्यात आला आहे.

लेखकद्वयाने काही उदाहरणे सादर केली आहेत. ही सर्व मुख्यत: न्यूजपेपर्स, वार्ताहर यांच्या अनुभवाबद्दलची आहेत. कॅरावान नावाचे एक वेबपोर्टल आहे आणि त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रावर दिलेली माहिती चुकीची होती, अशी बातमी छापली होती. त्यामध्ये शहांच्या पुत्राचा व्यवसाय, त्यातून मिळणारी नफ्याची आकडेवारी याभोवती बरेच प्रश्न उभे राहत होते. त्यांना ती बातमी कॅरावानच्या फेसबुकवर बूस्ट करायची होती. त्यासाठी त्यांनी फेसबुकला पैसेही देण्याचे कबूल केले होते. तरीसुद्धा 11 दिवस त्या बातमीला बूस्ट करण्याची परवानगी मिळाली नाही. या तंत्राने अशा काही महत्त्वाच्या बातम्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत थोड्या काळात पोचविता येतात. खूप पाठपुरावा करूनही फेसबुक अधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही. 11 दिवसांनंतर ती परवानगी मिळाली; पण तोपर्यंत त्या बातमीचे औचित्य, महत्त्व, लोकांनी दखल घेण्याची वेळ निघून गेली होती. अधिकृत, वैध खाते असताना परवानगी का नाकारली याबाबत त्यांना आश्चर्य वाटत राहिले. अशी असंख्य उदाहरणे समोर आली.

बीबीसीच्या एका वार्ताहराला फेसबुकला लॉगइन करायला अचानक मज्जाव केला गेला. टेलिग्राफच्या पत्रकाराने कळविले आहे की, ‘जनता का रिपोर्टर’ या न्यूज पोर्टलच्या फेसबुक पेजला 2017 मध्ये काही काळ फेसबुक वापरण्यापासून प्रतिबंधित केले गेले. कारण तेव्हा राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारासंबंधी वादग्रस्त ठरू शकतील, अशा बातम्या त्याने प्रकाशित केल्या होत्या. कॅरावान डेलीच्या पाच बातम्या स्पॅममध्ये टाकल्या गेल्या होत्या. (स्पॅममध्ये अशा बातम्या टाकल्या जातात, ज्या फेसबुकला बिनमहत्त्वाच्या वाटतात.) हिंदुस्तान टाइम्सच्या पाच कर्मचाऱ्यांची फेसबुक खाती अचानक बंद केली गेली. त्यांनी जेव्हा त्याबद्दल तक्रार केली, तेव्हा त्यांना अनेक प्रकारच्या ओळखपत्रांची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले. एन.डी. टीव्ही या वृत्तवाहिनीचाही एक अनुभव असा आहे की, सुप्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांचा प्राईमटाइम हा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे. वाहिनीवर प्रसिद्ध झाल्यावर तो फेसबुकवरून आणखी लोकांपर्यंत पोचविला जातो. परंतु असे लक्षात येऊ लागले होते की, ज्या कार्यक्रमामध्ये सरकारवर टीका असेल तो कार्यक्रम अतिशय धीम्या गतीने पोचविला जात असे. लाईक्स, कॉमेंटस, व्हिडिओ शेअर करणे या प्रक्रिया सावकाश केल्या जायच्या. त्यांना आश्चर्य वाटत असे की, या लोकप्रिय कार्यक्रमाबाबत प्रेक्षकसंख्येमध्ये वाढ कशी होत नाही? औपचारिक विचारणा करणाऱ्या पत्राला फेसबुकवरून उत्तर आले नाही.

याच वेळी अमित शहांनी कोटा येथे पक्षासाठी समाजमाध्यमे हाताळणाऱ्या स्वयंसेवकांना संदेश दिला होता की, ‘आपण लोकांपर्यंत हरतऱ्हेचा संदेश पोहोचविण्यात यशस्वी ठरलो आहोत- मग तो संदेश चांगला असो की वाईट... खरा असो की खोटा’, पुढे त्यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या वेळी असेही सांगितले की, ‘आपण हे करू शकतो, कारण आपल्या ग्रुप्समध्ये 32 लाख लोक आहेत. त्यामुळेच आपण गोष्टी व्हायरल करू शकतो. नरेंद्र मोदी आणि भाजपसमर्थक फेक न्यूजचा भरपूर वापर करतात, ही गोष्ट ‘अल्टन्यूज’ आणी ‘बूमलाइव्ह’ यांनी सर्वप्रथम उघडकीस आणली. अशी एक फेक न्यूज पसरविणारी वेबसाइट आहे, तिचे नाव ‘पोस्टकार्ड न्यूज’. याचे संपादक आहेत महेश हेगडे, भाजपचे सभासद. अनंतकुमार हे केंद्रीय मंत्रीही त्याच्याशी संबंधित. एका जैन साधूवर मुस्लिम तरुणांनी हल्ला केला, ही बातमी त्यांनी व्हायरल केली. बरखा दत्त व ममता बॅनर्जी यांच्याबद्दलही खोट्या बातम्या प्रकाशित केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.

‘जय मोदीराज’ नावाने एक फेसबुक पेज चालविले जाते. चौदा लाख लोक या पेजला फॉलो करतात. लाइक्सची संख्या वाढविण्यासाठी या पेजने एक अभियान  चालविले. ‘पंतप्रधान त्यांच्या विरोधकांना मारहाण करत आहेत’ असे दाखविणारी दृश्ये आणि फोटो तयार करून या पेजवर प्रसारित करण्यात आले. ‘इस्लामपासून धोका आहे’ असं सांगणाऱ्या पोस्टही तिथे आहेत. या फेसबुक पेजवर भारतीय सैन्यप्रमुखांची खोटी वक्तव्ये, शशी थरूर यांनी न केलेली वक्तव्ये, तसेच जागतिक बँकेकडून न घेतलेली कर्जे यांविषयी चुकीची माहिती असलेल्या पोस्टस्‌ सर्रास पसरविल्या जातात. अल्टन्यूजने जेव्हा या पेजच्या कार्यप्रणालीबाबत तपास केला, तेव्हा सहा जण मिळून हे पेज चालवितात असे कळले आणि नंतर पंतप्रधानांनी संबोधित केलेल्या एका कार्यक्रमात हे सर्व लोक सहभागी झाल्याचे दिसले. त्यातील एकाने तर स्वत:च्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिले आहे की, तो भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या आयटी सेलचा सभासदही आहे.

अमित मालवीय या आयटी सेलप्रमुखाने असेही म्हटले आहे की, येत्या काळातील निवडणुका मोबाईलवरून होणाऱ्या असतील. आपण त्याला व्हाट्‌सअँप इलेक्शन म्हणू शकतो. पंचवीस वर्षे भाजपबरोबर काम केलेल्या व नंतर बाहेर पडलेल्या शिवम शंकरसिंग यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये दाखवून दिले आहे की, आता ‘नमो’ नावाचे अँप तयार करण्यात आले असून अँन्ड्रॉईड अँप स्टोअर्समधून 50 लाख लोकांनी ते डाऊनलोड केले आहे. जिओनेही ही सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर कमी किमतीच्या फोन्समध्ये रिलायन्सने आधीच हे अँप उपलब्ध करून दिले आहे आणि असेच फोन्स 2018 मध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या आधी वाटले गेले. चीनने त्यांच्या देशात व्यवसाय करण्याची परवानगी नाकारली आहे, त्यामुळे भारत हीच फेसबुकसाठी मोठी व्यापारपेठ आहे. शिवम यांनी असे म्हटले आहे की- फेसबुक, व्हाट्‌सअँप व इन्स्टाग्राम या तीनही उपक्रमांनी मिळून डिजिटल एकाधिकारशाही प्रस्थापित केली आहे. तिची तुलना जगातील कोणत्याही एकाधिकारशाहीशी होऊ शकणार नाही. प्रवीण चक्रवर्ती यांनी 2014 च्या निवडणुकीतील परिणामांचे काँग्रेस पक्षासाठी विश्लेषण केले, तेव्हा 543 जागांपैंकी 282 जागांवर भाजपचा विजय हे अनपेक्षित होते, असे म्हटले आहे.

भारतात फेसबुकचे पहिले कार्यालय 2011 मध्ये उघडले गेले. अन्खी दास यांची नेमणूक संचालकपदी झाली. त्याआधी मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये त्या काम करत होत्या आणि महत्त्वाचे नेते व नोकरशहा यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. वर्षभरातच फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या भारतात 2.8 कोटींवर गेली. गुजरातमध्ये मुस्लिम समाजाविरुद्ध 2002 मध्ये दंगली झाल्या. त्यामुळे मोदींच्या प्रतिमेवर डाग पडला होता. तो दूर करण्यासाठी मोदींनी तंत्रज्ञानाची प्रगती, उद्योगांची चर्चा अशा विषयांवर उद्योगपतींशी संबंध वाढविण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून डिजिटल माध्यमांचा उपयोग करण्याचा त्यांना अनुभव सुरू झाला. फेसबुकची व्याप्ती 2016 नंतर वाढतच गेली आहे. आज काही सूत्रांच्या दाव्यानुसार फेसबुक व त्याच्याशी संलग्न माध्यमे भारतातून 3000 कोटी रुपये एवढं वार्षिक उत्पन्न मिळवतात. या सर्व उलाढालीमध्ये राजेश जैन यांची भूमिका महत्त्वाची दिसते. राजेश जैन यांनी 2010 मध्ये नरेंद्र मोदींना एक पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन दिले होते आणि त्यानंतर त्यांची गुजरातच्या माहिती प्रसारण करणाऱ्या सरकारी कंपनीचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षांतच जैनने राजकारणाच्या डिजिटल मार्केटिंगचे अभियान सुरू केले.

विरोधक नेहमी टीका करतात की, जैनने चालविलेल्या अभियानापासूनच मोदी नावाचे मिथक तयार होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासूनच त्याने डिजिटल कामे करणाऱ्या अनेक कंपन्या भराभर सुरू केल्या आणि नऊ वेबसाईट्‌ त्या चालवीत होत्या. 2009 मध्ये निवडणूक प्रचारासंबंधी लोकांना मोबाईलवर एसएमएस पाठविण्याचे काम करणाऱ्या कंपनीचा शोध भाजप घेत होती. त्या वेळी राजेश जैन यांना चांगली संधी मिळाली. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींसाठी मतदारांचा एक डेटाबेस तयार केला. याचा उपयोग काही ठरावीक मतदारांना लक्ष्य करून फेसबुक व व्हाट्‌सअँपद्वारा मेसेजेस पाठविले गेले. या डेटाबेसचे वैशिट्य म्हणजे यात गोळा केलेल्या माहितीचे मतदारांचे भौगोलिक स्थान, धर्म, जात अशा विशिष्ट आधारांवर वर्गीकरण केले गेले होते. एका अर्थाने हा डेटाबेस मुस्लिम व अल्पसंख्याक यांची माहिती वेगळी काढण्यासाठी वापरला गेला. मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करू नका, असे सांगण्यासाठी केला गेला. लेखकांच्या मते याची त्या वेळी चर्चा झाली नाही. राजेश जैनच्या टीमने हा सर्व डेटाबेस मोबाईल नंबरला जोडून भाजपच्या मिस्ड कॉल अभियानाची जोड दिली होती.  

मोदींचे डिजिटल प्रेम फार लवकर सुरू झाले होते तसेच खोटे बोलणेही. गुजरातमधील 1974 च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बाजावली, असे ते सांगत असत. त्याला धक्का देण्याचे काम 2004 मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अहमदाबाद आवृत्तीतील बातमीने केले होते. शीर्षक होते ‘मोदी कॉट इन अ वेब लाय’. मोदींनी 2009 मध्ये narendramodi नावाने टि्वटर अकाऊंट वापरायला सुरुवात केली होती. 2012 च्या मध्यापर्यंत सायबरस्पेसचा मोठा भाग त्यांनी व्यापला होता. (इंटरनेटवरील अस्तित्व) मोदी मुख्यमंत्री असताना त्यांनी शासनाचे अनेक विभाग फेसबुकने सक्षम केले. अनेक तरुणांना आकर्षक पॅकेजेस देऊन वेबसाइटची कामे करवून घेतली. सेव्ह गर्ल चाइल्ड, जागतिक पर्यावरणदिन अशी अनेक अभियाने चालविली. लेखक म्हणतात की, मोदींना आपले विचार पसरविण्यासाठी इंटरनेट हे व्यासपीठ वाटते. किंबहुना, कौशल्ये सादर करण्याचे नाट्यगृह म्हणूनच ते त्याचा वापर करतात. गोएंका हे भाजपच्या महाराष्ट्र आयटी सेलचे प्रमुख होते. त्यांनी सांगितलं की, 2012 मध्येच सोशल मीडियाने पारंपरिक माध्यमांचे वर्चस्व मोडून काढले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश 2012-2014 च्या दरम्यान झाला. सोशल मीडियामुळे नेते थेट लोकांशी संवाद करू लागले. आम्ही मीडियाला प्रतिक्रिया देणे बंद केले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, आम्ही अमेरिकेतील अनिवासी भारतीयांचे एक नेटवर्क तयार केले. त्यातील प्रत्येकाला सांगितले की, तुम्ही भारतातील तुमच्या संपर्कातील लोकांना सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी व्हायला सांगा. फेसबुक, व्हाट्‌सअँप मेसेजेसमध्ये सामील व्हा.

अल्टन्यूजचे सिन्हा सांगतात की, 2014 च्या निवडणुकांआधी भाजप हा फेसबुकचा एकमेव राजकीय ग्राहक होता. 2014 च्या विजयानंतर भाजपचे आणि मोदींचे नाते अधिक घट्ट होत गेले. मोदींच्या विजयामध्ये फेसबुकची भूमिका किती महत्त्वाची होती, हे अन्खी दास या कार्यकारी संचालक बार्इंनी एका लेखात सांगितले होते. असे खात्रीलायक सांगता येते की- मोदी आणि त्यांच्या पक्षाचे नेते, समर्थक यांना या माध्यमांचा प्रभावी उपयोग करण्यासाठी फेसबुकने मदत केली. लोकांना काय आवडत आहे, कोणत्या कल्पना यशस्वी होत आहेत, कोणत्या निरुपयोगी ठरत आहेत याबाबतचा अभिप्राय देण्यात फेसबुकने मदत केली आहे. मागील काही वर्षांत समाजमाध्यमे इंटरनेटवरील तथ्यहीन माहितीच्या यंत्रणेचे जगातील सर्वांत मोठे आयुध बनले आहे, हे मान्यच करावे लागेल.

माध्यम संशोधक डॉ.रवी सुंदरम सांगतात कीव् यावसायिक, राजकीय आणि खासगी या तीन स्वतंत्र बाबी आहेत. फेसबुकने या सगळ्यातील फरक मिटवून टाकून लोकशाहीला धोका पोचविला आहे. ‘लोकांना जवळ आणण्याचे काम करतो,’ असा दावा करताना ते लोकांना विभाजित करत आहेत. आतापर्यंत जे काही प्रयोग झाले आहेत, त्यातून लक्षात आले आहे की- फेसबुक आपल्या उपभोक्त्यांच्या जाणिवांवर ताबा मिळवू बघत आहे. कोणत्याही गोष्टींचा अतिरेक करणाऱ्या बाबी दाखविल्या तर भावनिक परिणामही अतिरेकीच होतो. त्यामुळे लोक फेसबुकवर अधिक काळ सक्रिय राहू शकतात. त्यांना तशी सवय लागते.

एक गोष्ट स्पष्ट होते की, फेसबुकमध्ये मोठ्या हुद्यावर काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचे भाजपशी जवळचे संबंध आहेत. त्यातील एक व्यक्ती तर अशी आहे की, तिने भाजपच्या 2013-14 च्या निवडणूकपूर्व अभियानातही काम केलेले आहे. लेखकाने म्हणूनच या लोकांचे हितसंबंध व त्याचे राजकारण काय आहे याचाही अभ्यास केला आहे. लेखकद्वयाने भारतीय फेसबुकच्या संचालकांना- अन्खी दास व शिवनाथ ठुकराल यांना 64 प्रश्नांची एक यादी पाठविली होती आणि ‘तुम्ही जर खासगीपणा टिकवून पण लोकशाहीला मदत करणारे असाल, तर भारतातील या धोरणांसंबंधात आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या’ असे कळविले होते. त्यापैकी कोणत्याही प्रश्नाला सरळमार्गी उत्तरे मिळाली नाहीत. केवळ अधिकृत माहिती उपलब्ध असते तीच पाठविली गेली. पारदर्शीपणा अजिबात दिसला नाही, असा शेवट लेखकद्वयाने केला आहे.

फेसबुकचा भारतातील खरा चेहरा
लेखक : परंजय गुहा ठाकूरता, सिरिल सॅम
अनुवाद : प्रियांका तुपे
प्रकाशक : मुक्त शब्द प्रकाशन, मुंबई.
पृष्ठे : 250, किंमत : 300 रुपये  

Tags: डॉ.रवी सुंदरम गोएंका राजेश जैन अन्खी दास प्रवीण चक्रवर्ती इन्स्टाग्राम शिवम शंकरसिंग अमित मालवीय जय मोदीराज ममता बॅनर्जी बरखा दत्त अनंतकुमार महेश हेगडे पोस्टकार्ड न्यूज बूमलाइव्ह अल्टन्यूज प्राईम टाइम रवीश कुमार हिंदुस्थान टाइम्स जनता का रिपोर्टर टेलिग्राफ बीबीसी अमित शाह कॅरावान शेरिल सँडबर्ग मार्क झुकेरबर्ग नरेंद्र मोदी भाजपा व्हाट्‌सअँप प्रबीर पुरकायस्थ अपूर्वानंद इकॉनॉमिक अँन्ड पोलिटिकल वीकली डोनाल्ड ट्रम्प केम्ब्रिज अँनॅलेटिका परंजय गुहा-ठाकुरता छाया दातार फेसबुकचा भारतातील खरा चेहरा नवे पुस्तक Ravi Sundaram Goenka Rajesh Jain Ankhi Das Pravin Chakravarti Shivam Shankarsingh Amit Malviy Namo App Jai Modiraj Mamta Banrji Barkha Datt Anantkumar Mahesh Hegade Postcard News Boomlive Alt News NDTV Ravish Kumar Hindustan Times Jnta Ka Reporter Telegraph BBC Amti Shaha Caravan Sheril Sandbard Mark Zukerbarg Narendra Modi BJP Instagram Whats App Prabir Purkaystha Apurvanand Economic And Political Weekly Donald Trump Cambridge Analytica Paranjay Guha-Thakurta Chhaya Datar Facebook Cha Bharatatil Khara Chehra Nave Pustak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

छाया दातार,  मुंबई, महाराष्ट्र
chhaya.datar1944@gmail.com

सामाजिक कार्यकर्त्या 


प्रतिक्रिया द्या