डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

दि. 10 ऑगस्टच्या अंकात सुधीर जोगळेकर यांनी अणुबाँबची संहारकता व त्याच्या वापराबद्दल अमेरिकी शासनाला व जनतेला खंत व अपराधी न वाटणे या गोष्टी ठळक केल्या आहेत. नंतरच्या राजकारण्यांनी, विशेषत: क्युबन मिसाइल क्रायसिसवेळी, जास्त शहाणपणा वापरला. आता ट्रंपच्या कारकिर्दीत धोका वाढला आहे. याच अंकात समीर शिपूरकर म्हणतात त्याप्रमाणे, आता अणुभट्ट्या जास्त सुरक्षित झाल्या आहेत. आता निवड करावयाची आहे ती अणुभट्ट्या व कोळसा यांपैकी एकाची.

ते स्वप्न आणखी एक जुमलेबाजी?

दि. 27 जुलैच्या अंकातील ‘तपशीलाकडे डोळेझाक करण्याचा पवित्रा! हे अभय टिळक यांनी लिहिलेले संपादकीय वाचले. त्यात मोदी 2.0 सरकारमधील देशाच्या पहिल्या महिला (पूर्णवेळ) अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे यथोचित विच्छेदन केले आहे. संसदेत सादर केलेल्या आपल्या पहिल्या-वहिल्या अर्थसंकल्पाचे वर्णन अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ‘बहीखाते’ असे केले आहे. बहीखाते म्हणजे (गुजराती भाषेत) जमा-खर्च वही. पण या अर्थसंकल्पात रुपया येणार कसा? आणि तो खर्च होणार कसा याचा कोणताही ठोकताळा मांडायचे औचित्य त्यांनी दाखवलेले नाही. त्यातल्या त्यात हा एक इतिहासच म्हणायला हवा. लाल, तपकिरी रंगाची सूटकेस जाऊन लाल रंगाची बाड यासाठी निवडली गेली. ‘गुलामगिरीतून मुक्तता’ म्हणून प्रतिकात्मक वापरलेले लाल रंगाचे बाड, हे वेगळेपणातील समीकरण देशवासीयांच्या गळी उतरवण्यास मात्र त्या विसरल्या नाहीत.

या अर्थसंकल्पाची सारी मदार देशाला पुढील पाच वर्षांत पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न जनतेला दाखवण्यावर दिसली. सामान्य जनतेला बुलेट ट्रेन, जागतिक महासत्ता, पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था इत्यादी मोठ्या घोषणांचे नेहमीच आकर्षण आणि कुतूहल असते. मोदी सरकार या आकर्षणातून नवभारत संकल्पनेची बांधणी करत आहे आणि यात काही गैर नसले तरी, मोठी स्वप्ने उराशी बाळगताना वास्तवाचे भान ठेवणे व स्वप्नांना कृतीची जोड देणेदेखील तेवढेच गरजेचे असते. ते भान आणि जाण या सरकारला आहे असे एकूणच कार्यपद्धतीवरून तूर्तास तरी दिसून येत नाही. कारण हे सरकार आजही फसलेल्या नोटाबंदी, जीएसटी यांसारख्या धोरणांच्या (आर्थिक सुधारणा संबोधत असते) फुशारक्या मारण्याचे काम करताना दिसून येते. नोटाबंदीच्या एककल्ली निर्णयाचे आणि जीएसटीच्या घिसाडघाईतील अंमलबजावणीचे दुष्परिणाम अनेक आर्थिक अवहाल, अर्थतज्ज्ञ यांच्या माध्यमातून एव्हाना सप्रमाण सिद्ध झाले आहेत. तरीही भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात पाच लाख कोटी डॉलर्सची असेल असे स्वप्न या सरकारने भारतीय जनतेला दाखवले आहे. पण हे स्वप्न सर्वसामान्य देशवासीयांसाठी ‘दिवास्वप्न’ ठरू नये असे वाटते.

भारत विकसनशील देशाचा कोष भेदून विकसित देशाच्या रांगेत जाऊन बसणार, तसेच भारत जागतिक अर्थ महासत्ता बनणार असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. यासाठी काही देशांच्या आर्थिक प्रगतीचे दाखलेदेखील दिले जात आहेत. पण आपल्या बाळाने ‘बाळसे’ धरावयाचे असे वाटत असेल तर शेजारच्यांच्या ताटात डोकावणे उपयोगाचे नसते, हे सरकारने ध्यानात घेणे गरजेचे आहे. कारण पाच लाख कोटी डॉलर्सची ध्येय साध्य करायचे असेल तर पुढील आठ-दहा वर्षे देशाचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन) आठ टक्क्यांच्या गतीने वाढणे गरजेचे आहे. या सरकारला हे पाच लाख कोटी डॉलर्सचे लक्ष्य पाच वर्षांतच गाठायचे असेल तर पुढील पाच वर्षे देशाचा जीडीपी सरासरी 12 टक्के इतक्या गतीने वाढणे अत्यावश्यक आहे. ते होणार कसे यावर हे सरकार आपल्या अर्थसंकल्पात भाष्य करताना दिसले नाही. रिझर्व्ह बँकेनेदेखील यंदाच्या वर्षी विकासदर हा 7 ते 7.3 दरम्यान राहील असेच मत नोंदवले आहे.

नायजेरियासारख्या आपल्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या अनेक देशांचे दरडोई उत्पन्न तसेच मानवी विकास निर्देशांक आपल्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे पाच लाख कोटी डॉलर्सचे लक्ष्य असाध्य नसले तरी ते साध्य करण्यासाठी देशातील गुंतवणूक वाढीस पोषक वातावरण तयार करावे लागेल. उद्योगक्षेत्रात, कृषिक्षेत्रात वाढीसाठी धोरण राबवावे लागेल. आर्थिक सुधारणा हिरहिरीने रेटाव्या लागतील. जेणेकरून देशात प्रत्येक हाताला काम मिळेल. अर्थसंकल्पात तर कृषीक्षेत्राची दुरावस्था दूर करण्यासाठी कुठल्याच योजना नाहीत. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी अर्थ संकल्पाच्या पूर्वसंध्येला गुंतवणूक माहात्म्य गायले ते असे की, ‘आर्थिक विकासाची मुख्य ऊर्जा ही गुंतवणूकच आहे. गुंतवणुकीतून क्षमता निर्माण केली जाईल. मागणीत वाढ झालेली दिसून येईल. श्रम उत्पादकतेत वाढ दिसून येईल. सर्जनशील उलथापालथ तीच घडवून आणील आणि नवीन रोजगार निर्मितीचा प्रवाह ती वहाता ठेवेल.’ पण गुंतवणूक वाढीसाठी देशात उद्योगपूरक आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करावे लागेल. आणि वर्तमान मॉब लिंचिंग, जय श्रीराम घोषणेची सक्ती आणि यातून निर्माण झालेले झुंडगिरीचे विखारी वातावरण, यात ते साधणार कसे? याबाबत देशातील आघाडीचे उद्योगसमूह जसे की इन्फोसिसचे नारायणमूर्ती, बजाजचे राहुल बजाज, गोदरेजचे आदी गोदरेज इत्यादींनी रास्त चिंता व्यक्त केली आहे. पाच लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न सामान्यजनांना कितीही रंजक वाटत असले तरी ते आणखी एक ‘जुमलेबाजी’ ठरू नये.

-बाळकृष्ण शिंदे, पुणे  

 

असा पितृतुल्य माणूस दुजा होणे नाही

दि. 3 ऑगस्टच्या साधनातील यदुनाथ थत्ते यांच्यावरील सुरेश द्वादशीवार यांचा लेख वाचला. यदुनाथजी हे आमचे श्रद्धास्थान! यदुनाथजी हे आमचे प्रेरणास्थान! 1985 मध्ये औरंगाबादच्या विद्यापीठात पहिल्यांदा त्यांचे भाषण ऐकले आणि आम्ही त्यांच्या प्रेमातच पडलो. त्यांचा स्नेह अखेरपर्यंत लाभला. माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, 1987 साली!

मी साहित्य संजीवन या नावाने दिवाळी अंक काढत असे. त्या अंकाला दरवर्षी यदुनाथजींचा लेख असे. पाठकोऱ्या कागदावर लिहिलेला लेख. मानधन देऊ केले, तरी घेत नसत. नांदेडला आले की, स.दि. महाजन यांच्याकडे उतरत. मी त्यांना विचारत असे, ‘त्यांचे कोणाशी जुळत नाही, तुमचे कसे जुळते?’ ते म्हणायचे, ‘आपल्याला दुर्गुणांशी काय देणे- घेणे? चांगले गुण पाहायचे.’ आम्ही निरुत्तर!

माझ्या शाळेत त्यांचे भाषण ठेवले होते. तेव्हा पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेवर ते बोलले. बोलले म्हणजे मुक्त संवाद साधला. मुले खूष! शे-दोनशे मुलांनी यदुनाथजींना पत्रे लिहिली, अभिप्रायाची. त्या सगळ्यांना वैयक्तिक पत्र लिहून यदुनाथजींनी आपल्या भावना कळविल्या. नांदेडला आले म्हणजे माझ्या घरी येणारच. काय लिहितोस? चौकशी करणार! नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी मी त्यांची ‘प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील’ या विषयावर व्याख्याने आयोजित केली.   न कंटाळता. जिल्हाभर फिरायचे. आवडीने संवाद साधायचे. त्यानंतर त्यांचे प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील हे पुस्तक छापून आले. त्याच्या अनेक प्रती आम्ही जिल्ह्यात विकल्या. यदुनाथजींनी आम्हाला झपाटले होते. त्यांच्यात आम्ही साने गुरुजी पाहायचो. ते फारच जीव लावायचे. असा पितृतुल्य माणूस दुजा होणे नाही! द्वादशीवारांच्या लेखामुळे त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आपले मनापासून, अगदी मनापासून अभिनंदन आणि आभार!

-सुरेश सावंत, नांदेड

 

देशाच्या उभारणीचे कार्य

दि. 22 जूनच्या अंकातील सुधा बोडा यांचे अण्णांना (साने गुरुजी) 70 वर्षांनी लिहिलेले पत्र वाचले. त्यांना पाठवलेल्या ‘सुंदर पत्रां’बद्दलच्या भावना वाचताना डोळे सारखे भरून येत होते. ‘आपला अण्णा देशासाठी तुरुंगात गेला आहे...’ अशा सांगण्यानेच सुधातार्इंची गुरुजींशी ओळख झाली. पंढरपुरात उपोषणाला बसलेल्या अण्णांना भेटावयास गेलेल्या त्यांना त्यांच्या कृश देहाकडे पाहून काही बोध होईना.

परंतु खूप काही येथे घडत आहे, हे जाणवत होते आणि अनिष्टांच्या वाळवीने देशाला जणू पोखरलेले बघून ‘आज तुम्ही असतात, तर किती वेळा मृत्यूला कवाटळलं असतं!’ असा आक्रोशही त्या करतात! आपल्या मोठ्या बंधूंच्या आजारपणात मल-मूत्र साफ करून त्यांची सेवा करणारे, ‘सुंदर पत्रांतून’ साऱ्या महाराष्ट्रातील मुलांशी संवाद साधून त्यांना आनंद देण्याचा, हसत-खेळत गोष्टी सांगत भरभरून ज्ञान देणारे आणि सत्तेकडे जाणारी माणसे सेवेकडे दुर्लक्ष करून भ्रष्ट मार्गांचा मागोवा घेताना बघून, ‘असं वाटतं, कुठे दूर निघून जावं’ असे हताशपणे लिहिणारेही साने गुरुजी येथे आपणास भेटतात! एकूणच सुधातार्इंनी आपल्या अण्णांविषयीच्या आठवणी उत्कट व सडेतोडपणे व्यक्त केल्या आहेत.

तसेच, दोघांधला भावनिक नातेसंबंधही वेळेवेळी उलगडून दाखवला आहे! जाता-जाता, साने गुरुजींनी साप्ताहिक ‘साधना’ची सुरुवात 15 ऑगस्ट 1950 रोजी मुंबईच्या आर्थर रोड जेलच्या शेजारील दुकानांच्या एका गाळ्यात केली. जेलच्या अर्ध्या-एक कि.मी. अंतरावर असलेल्या मजुरांच्या बीडीडी चाळीत माझा जन्म झाला. मी तेव्हा सात-आठ वर्षांचा असेन. आम्ही मुले त्या दुकानांच्या मागे असलेल्या मैदानात खेळावयास जात असे. त्यावेळी त्या गाळ्यात लिहीत बसलेले किंवा समोरच असलेल्या बसस्टॉपवर बसची वाट बघत, विचारात गढलेले साने गुरुजी अनेक वेळा पाहिल्याचे स्मरते.

-गोविंद काजरोळकर, पुणे


अणुऊर्जेवर चर्चा घडवावी

दि. 10 ऑगस्टच्या अंकात सुधीर जोगळेकर यांनी अणुबाँबची संहारकता व त्याच्या वापराबद्दल अमेरिकी शासनाला व जनतेला खंत व अपराधी न वाटणे या गोष्टी ठळक केल्या आहेत. नंतरच्या राजकारण्यांनी, विशेषत: क्युबन मिसाइल क्रायसिसवेळी, जास्त शहाणपणा वापरला. आता ट्रंपच्या कारकिर्दीत धोका वाढला आहे. याच अंकात समीर शिपूरकर म्हणतात त्याप्रमाणे, आता अणुभट्ट्या जास्त सुरक्षित झाल्या आहेत. आता निवड करावयाची आहे ती अणुभट्ट्या व कोळसा यांपैकी एकाची. दुसऱ्या शब्दांत, अणुभट्ट्याचे अपघात व निर्माण होणारा किरणोत्सर्गी कचरा जास्त संभवनीय व धोकादायक व पृथ्वीव्यापी का पृथ्वी तापण्याचा- वातावरण बदलाचा धोका अधिक तीव्र, व्यापक आणि चिरस्थायी व संभवनीय? विजेची, ऊर्जेची गरज/मागणी एकदम कमी करणे हुकूमशाहीलाही शक्य नाही. जागतिक स्तरावर तरी अशक्यच. तिसऱ्या जगात तर विजेचा दरडोई पुरवठा वाढवणेच आवश्यक. सौर व पवन वीज 24 तास खात्रीचा पुरवठा (बेसलोड) करू शकत नाही. जलऊर्जेचे जवळपास सर्व स्रोत वापरून झाले आहेत. अशा वेळी अणुऊर्जेला योग्य पर्याय दिसत नाही. या महत्त्वाच्या विषयावर साधनेत जरूर विचारांची देवघेव व्हावी.

-सुभाष आठले, कोल्हापूर.  

Tags: 31 august 2019 pratisad प्रतिसाद weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा