डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

महात्मा गांधींची पत्नी असल्याचा त्यांना अभिमान जरूर होता, पत्नीपद मात्र त्यांनी कधी मिरवले नाही. नाताळच्या पहिल्या महिला सत्याग्रहाबद्दल आपल्याला गांधीजींनी (त्यांच्या दृष्टीने कोणतेही कारण असले तरी) सांगितले नाही, याबद्दल त्यांना वाईट वाटले. गांधीजींना मी सत्याग्रहात सामील होणार आणि जरूर पडल्यास मीच सत्याग्रहाचे नेतृत्व करणार असे ठणकावणारी कस्तुरबाई ही स्वत:च्या मुलांचीच नव्हे तर राष्ट्रमाता बनली हे तिचे कर्तृत्व. तिच्या संबंधी काही माहिती न मिळवता शेरे मारणाऱ्यांना केव्हा तरी कळेलच, अहिंसक सत्याग्रहाचे परदेशात नेतृत्व करण्याचा पहिला मान त्यांनी महिला जगताला मिळवून दिला. बालविवाह, दारिद्र्य, अस्वच्छता, दलित उद्धार अशी कामे देशभर फिरून केली. एका कुटुंबाचा संसार चालविताना स्त्री दमून जाते. टॉलस्टॉय फार्म, फोईनिक्स सेटलमेंट, साबरमती आश्रम यांचे संसार त्यांनी अत्यंत शिस्तीत व पारदर्शकपणे केले.

पोरबंदर! ब्रिटिशांच्या काळातील काठेवाडातील एक प्रसिद्ध बंदर. या बंदराला ऐतिहासिक महत्त्व आहे. महात्मा गांधींचे हे जन्मस्थान. याचबरोबर या बंदरगावी महात्मा गांधींची पत्नी व हिंददेशाची राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी यांचेही हे जन्मस्थान आहे हे सहसा कुणाच्याही लक्षात येत नाही. पोरबंदरचे सुप्रसिद्ध व्यापारी गोकुळदास कापडिया आणि ब्रजकुंवर कापडिया या दांपत्याने एप्रिल 1869 साली कन्यारत्नाला जन्म दिला. नाव ठेवले कस्तुर. पोरबंदरला त्यांचा मोठा वाडा होता. याच वाड्यात दोन मुलांवर कस्तुरचा जन्म झाला. त्या संपन्न व वैभवशाली वाड्यात एकुलती एकच मुलगी म्हणून कस्तुर खूपच कौतुकात व लाडाकोडात वाढली होती.

महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 ला झाला तो याच गावी. कापडिया व गांधी या कुटुंबाचा फार घरोबा होता. कापडियांचे घर हे गावात होते. अरुंद गल्ल्या आणि एकाला एक चिकटलेली घरे. करसनदास गांधींचे हे घर गावापासून किंचित दूर, मोकळे अंगण, थोडा बागबगिचा असलेले होते. कापडियांची मुले त्या अंगणात खेळायला जात. कस्तुर ही आईबरोबर कधी तरी गांधींच्या घरी जाई. त्या काळी मुले-मुली एकत्र खेळण्याची व बोलण्याचीही पद्धत नव्हती. त्यामुळे कस्तुर आणि मोहनदास यांचा एकमेकांशी कधी संवादही होणे शक्य नव्हते.

गांधीजींशी विवाह झाल्यानंतर हळूहळू घरात स्थिर होऊ लागलेल्या कस्तुरबाईच्या लक्षात एक गोष्ट आली. मोहनदास या तिच्या शांत नवऱ्यात पडलेला फरक. मोहनदास हा आपल्या बायकोवर हक्क गाजविणारा व संशयी स्वभावाचा बनत चालला होता. आपली बायको फक्त आपली आहे, आपण तिच्याशी प्रामाणिक राहणारच तसेच तिनेही राहिले पाहिजे. एके दिवशी रात्री त्याने कस्तुरबाईला बजावले की, कस्तुरने मोहनदासची परवानगी घेतल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही. गंगा किंवा नंदकुंवरबा जशी आपल्या नवऱ्यांची परवानगी न घेताच बाहेर मैत्रिणी, नातेवाईक, देऊळ वगैरे कुठेही जात, मग आपल्याच नवऱ्याने ही सक्ती का करावी याचे कारण समजले नाही. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी शब्दांमुळे होणारी हिंसा तिला नको होती.

रोज तिने नवऱ्याला न विचारता आपल्या सासूबार्इंबरोबर देवळात जायला सुरुवात केली. मोहनदासने याबद्दल तिला फटकारले, तेव्हा ती शांतपणे म्हणाली, तुमच्या आईची आज्ञा मी मोडणे तुम्हाला आवडले असते का? म्हणून मी गेले व जात राहणार आहे. त्यानंतर त्या घरातल्या इतर बायकांबरोबरही बाहेर पडू लागल्या. वादविवाद टाळून आपल्याला हवे ते करून घेण्याच्या कसबाचे पुढील आयुष्यातही अनेक प्रसंग आले. मोहनदासला आपली पत्नी जर साक्षर झाली, तर आपले विचार तिला समजतील असे हायस्कूलात असतानाच वाटू लागले. शाळेतून घरी आल्याबरोबर रात्री लवकर त्यांनी कस्तुरबाईला साक्षर करण्याचे खूप प्रयत्न केले. तिने आपल्याला नको असलेले शिक्षण आपल्यावर लादून घेतले नाही. दिलेला धडा न गिरवता ती रोज रात्री शिकायला बसे. अनेक आठवडे गेले, तरी तिची प्रगती शून्य होती. शेवटी शिकवणी बंद झाली.

यानंतर 1893 एप्रिलमध्ये मोहनदासला साऊथ आफ्रिकेत एका हिंदी कंपनीचा वकील म्हणून नोकरी मिळाली. मोहनदासचे साऊथ आफ्रिकेतील एक वर्ष फार भरभराटीचे गेले. याच वर्षातील त्यांना आगगाडीतून फेकून दिल्याची आठवण. इंग्रज माणूस आपल्यावर राज्य करतो, आपल्याला लाचार करतो ही गोष्ट त्यांना डाचू लागली. घर, कस्तुरबाई, दोन मुले व इतरही कुटुंबीय यांच्या आठवणीने विद्ध होऊन त्यांनी उत्तम जम बसवलेला असूनही स्वदेशी परतण्याचा निर्णय घेतला, तीन वर्षांनी मोहनदास आपले कुटुंब घेऊन दक्षिण आफ्रिकेत स्थायिक होण्यासाठी परत जाण्यासाठी हिंदुस्तानात आला. डोळ्यांत प्राण आणून कस्तुरबाई नवऱ्याच्या भेटीची वाट पाहत होती. प्रत्यक्षात तिच्यासमोर उभा राहिला तो नखशिखान्त बदललेला अनोळखी चेहऱ्याचा तरुण. संपूर्ण पाश्चात्य पोशाखातील नवऱ्याचे असे स्वरूप तिच्या डोळ्यांना अनोळखी होते. आपला स्वत:चा संसार, मुले, पती यांच्यासोबत राहता येणार ही गोष्ट तिला सुखावून जात होती. प्रत्यक्ष बोटीत बसेपर्यंत सासर व माहेरची माणसे, त्यांच्याबरोबर घालवलेले सुखद क्षण तिच्या सोबतीला होतेच. बोटीवर चढल्यापासून लगेच आपली मोठीच कसोटी लागणार आहे, याचा फक्त पुसटता विचार मनात येत होता.

आफ्रिकेतील दैनंदिन जीवनाची सवय व्हावी म्हणून तिची व मुलांची मोहनदासनी तयारी करून घ्यायचे ठरवले. सर्वांना बूट, स्टॉकिंग्ज, मोजे, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत घालायला दिले. जमिनीवर फतकल मारून बसणे मना केले. जेवायला टेबल, खुर्ची व चमचे. मोजे व बुटात चालणे तिघांनाही कठीण होत होते. तिघेही ते काढून टाकण्यासाठी रात्रीची वाट पाहत. पावले आंबून गेलेली असायची. मोज्यांना घामट वास येत होता पण आता आयुष्यभर यातून सुटका नव्हती. बोटीचा प्रवास अथांग समुद्रातून. पाण्यापलीकडे काही दिसत नसे. हा सागरी प्रवास हवामानामुळे वाढला. आता उतरण्याचे ठिकाण जवळ आले असे वाटले, पण जंतुविरोधके मारून बोट निर्जंतूक केल्याशिवाय ती बंदराला लागू शकत नव्हती. कस्तुरबाई व मुले वैतागून गेली. शेवटी तो उतरण्याचा क्षण येऊन मुले तयार झाली. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तोच कॅप्टनने येऊन गांधी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी रात्र पडल्यावरच बोट सोडण्यास परवानगी दिली. रिकाम्या बोटीत कर्मचारी व फक्त चार गांधी होते. या सर्वच प्रकारामुळे कर्मभूमीवर पाय ठेवण्याआधीच कस्तुरबार्इंचे मत आफ्रिकेबद्दल चांगले झाले नाही.

शेवटी चक्रे फिरली व दिवसाउजेडीच बंदोबस्तात जालजी रुस्तुजी यांच्या घरी बग्गीतून गांधींचे कुटुंब जाण्याचे ठरले. स्वत: मोहनदास दोन किलोटर अंतरावरच्या रुस्तुजींच्या घराकडे चालत निघाले. इतक्यात मोठ्या जमावाने गोरे लोक आले. त्यांनी गांधींना मारून मारून रक्तबंबाळ केले. तोपर्यंत मुले व कस्तुरबाई  अनोळख्या माणसांच्या कुटुंबात पोहोचून पतीची वाट पाहत होती. रक्तबंबाळ पतीला पाहून ती भयभीत झाली. भराभर तिने मोहनदासच्या जखमा धुऊन मलमपट्टी केली. या प्रसंगामुळे तर आपण कुठे येऊन पडलो व परत कधी तरी हिंदुस्तानातल्या घरात जाऊ शकू की नाही या भयाने कस्तुरबार्इंचा ताबा घेतला.

नंतर गांधी कुटुंब बीच ग्रोव्ह व्हिला येथे रहायला गेले, कस्तुरबाई तेथे गर्भार होती. आफ्रिकेत त्या वेळी प्रसूतीगृहे नव्हती. डॉक्टर घरी येऊन बाळंतपण करीत. परपुरुषासमोर बाळंत होण्याच्या कल्पनेने कस्तुरबार्इंचा थरकाप उडाला. आफ्रिकेत इंडियन डॉक्टर होते ते आले. पण नर्स नव्हती. कस्तुरबार्इंची प्रसुती तशी कठीणच. मोहनदासने नर्सचे काम केले. कस्तुरबार्इंना तिसरा मुलगा झाला रामदास. 23 मे 1900 रोजी कस्तुरबार्इंना चौथा मुलगा झाला देवदास. या वेळी डॉक्टरांना बोलवायलाही वेळ मिळाला नाही. सर्व बाळंतपण मोहनदासनेच केले. कस्तुरबाला आपले आफ्रिकेत जन्मलेले 2 मुलगे घरातल्या वडिलधाऱ्यांच्या आशीर्वादासाठी व देवदर्शनाला घेऊन जायची ओढ लागली.

परिणामी 1901 ऑक्टोबरमध्ये कस्तुरबाईचे सर्व कुटुंब स्वगृही राजकोटी परतले. त्यांना मिळालेला सर्व आहेर मोहनदासनी आपल्या स्वत:च्या भावाचे कौतुक म्हणून दिला आहे, म्हणून नाताळ काँग्रेस ट्रस्टला दिला. त्यात कस्तुरबाला मिळालेले दागिने व मुलांना मिळालेल्या वस्तूंचाही समावेश होता. आपणही घरची सर्व जबाबदारी घेऊन मोहनदासला सगळ्या जबाबदारीतून मुक्त केले म्हणून तर ते काम करू शकले. त्यामुळे निदान तिला मिळालेल्या सर्व वस्तुवर तिचा हक्क आहे, म्हणून ती आपल्या सुनांसाठी हे ठेवू पाहत होती. तिच्या भावनेपेक्षा आपली तत्त्वे श्रेष्ठ आहेत, असे मोहनदास म्हणाले. त्यासमोर तिला झुकावेच लागले. सासरी तिला सर्व आहेर दाखवून आपल्या नवऱ्याचे कौतुक करून घ्यायचे होते. पण तसे न घडताच ते कुटुंब स्वगृही राजकोटला परतले होते.

ऑगस्ट 1902 मध्ये मोहनदास, त्यांचे तीन पुत्र व कस्तुर मुंबईत गिरगावात राहायला आले. सांताक्रूझमध्ये गांधी परिवाराची घडी बसते न बसते तोच डरबानहून एक्स्प्रेस तार आली. ‘चेंबरलेन हा ब्रिटिश कॉलनी सचिव येत आहे. तुम्ही ताबडतोब निघा. तुमच्या येण्याचे पैसे भरत आहे.’ थोडक्यात काय तर मुंबईची सर्व व्यवस्था, घर संसारासकट लावून मोहनदासला निघावेच लागले. हिंदी जनतेला जेव्हा गरज असेल त्या वेळी मी हजर होईन असे वचन मोहनदासने आफ्रिकेत निरोपसमारंभात जाहीरपणे दिले होते.

कस्तुरबाला प्रत्येक वेळी असे विंचवाच्या पाठीवरचे बिऱ्हाड करणे मान्य नव्हते. मोहनदासला वाटले आपण एक वर्षात परत येऊ, तशी त्यांनी संसाराची व्यवस्था केली, पण तसे घडले नाही. मोहनदासना ही कल्पना आवडली आणि जोहान्सबर्गला राहण्याचे निश्चित करून कस्तुरबा व मुले यांना बोलावून घेतले. कस्तुरबा 1904 मध्ये नव्या वर्षातच दक्षिण आफ्रिकेला पोहोचली. 8 खोल्यांचे घर तिची वाट पाहत होते. मोहनदासनी आपली सर्व साठवलेली रक्कम साप्ताहिकात खर्च केली होती, ही गोष्ट कस्तुरबापासून लपवली होती. याच सुमारास प्लेगची साथ पसरू लागली होती. गांधीजी रोग्यांची सेवा करत होते. प्लेग फैलावत होता. कस्तुरबांनी मोहनदासना सांगितले की तीही त्यांच्या बरोबर मदतीला येत आहे. कस्तुरबांचा हा निर्णय मोहनदासना चकित करून गेला.

दुसरे दिवशी सकाळी मणीलालच्या ताब्यात त्याचे दोन भाऊ देऊन कस्तुरबा आपल्या मिशनवर गेली. घरोघरी हिंडून तिने बायकांना प्लेगची भयानकता समजावली. घराजवळचे वेअरहाऊस साफ करून घेतले. चादरी, गाद्या, उशा इत्यादी गोळा केलेले सामान तिथे लावून वेअरहाऊसला हॉस्पिटलचे रूप दिले. कस्तुरबानी हे सर्व केले ते मोहनदासला खूश करण्यासाठी नव्हते. तो तिचा आतला आवाज होता. पुढच्या आयुष्याची नांदी होती. यानंतर मार्च 1907 मध्ये ब्रिटिश सरकारने हिंदी जनतेवर बंधने घालणारा काळा वटहुकूम आणला. त्याविरोधात गांधीजींनी सत्याग्रह सुरू केला, तेव्हा सरकारने अटकसत्र सुरू केले. मोहनदासच्या अटकेची बातमी आली, त्या वेळी त्यांच्या सुनेचे डोहाळेजेवण चालले होते. मोठी दावत, भेटवस्तूंचे देणे-घेणे, हास्य- विनोद याला ऊत आला होता. अशावेळी ही बातमी म्हणजे कस्तुरबाच्या कानात तप्त रसच पडला. तिला आता दोन महिने कदान्न खाणारे, पोलिसांच्या लाठ्या खाणारे, सर्व प्रकारची कमी प्रतीची कामे करणारे मोहनदास डोळ्यांसमोर आले. ती उत्स्फूर्तपणे म्हणाली, या सत्याग्रह्यांची सुटका होईपर्यंत मी गोड व मीठ या दोन्ही  वस्तू माझ्या खाण्यात येणार नाहीत. अगदी आजच्या जेवणापासून. सत्याग्रहाला पाठिंबा देण्याचा हा माझा वैयक्तिक विचार. जमलेले सर्व महिला मंडळ आवाक्‌ झाले.

मोहनदास तुरुंगात एकटे नाहीत, त्यांच्याबरोबर बरेच सत्याग्रही आहेत, हे ऐकून त्यांना आपल्या नवऱ्याच्या नेतृत्वाचा अभिमान वाटला. यानंतर मोहनदान सुटून आल्यावरही परत काही दिवसांनी अटक झाली. त्यांचा मुलगा हरिलाल हाही दोन-तीन वेळा तुरुंगात गेला. कस्तुरबांच्या मनात तुरुंगात गेल्यावर होणाऱ्या हालांची जी कल्पना होती, त्याला छेद देणारा अनुभव परत आल्यावर मोहनदासनी सांगितला. कस्तुरबाला खूप बरे वाटले. मोहनदासांच्या तुरुंगवाऱ्यात कस्तुरबांनी फोईनिक्स सेटलमेंटच्या माणसांची सर्व प्रकारची काळजी एखाद्या कुटुंबप्रमुखासारखी घेतली या वसाहतीत सर्व धर्मांचे, जातींचे, उच्चशिक्षित, सुशिक्षित असे निवासी होते. कित्येकांची भाषा ही तिला समजत नव्हती, पण त्यांच्या संबंधीचा तिचा भाव व सदिच्छा ती आपल्या वागणुकीने सर्वांपर्यंत पोहोचवीत होती. या सर्व लोकांचे मन तिने जिंकले. हाच तिच्या संबंधीचा अनुभव हिंदुस्तानातील सर्व गांधीआश्रमातील स्वातंत्र्य सैनिकांना आला.

कस्तुरबा हुकूमशहा नव्हत्या. त्यांचा नातू अरुण गांधी आजीच्या चरित्रात लिहितो, (she was a demanding task master.) विसरणे किंवा नजरेतून सुटणे असे शब्द तिच्या कोषात नव्हतेच. न स्वत:साठी की न सभोवतालच्या लोकांसाठी. अफगणिस्तानचा गंधही नसताना तिच्या मेंदूत पै न पैचा हिशेब असे. या बाबतीत ती मोहनदासची पत्नी शोभे. जोहान्सबर्गला मोहनदास अप्रामाणिक आहे, अशा घोषणा देत मोहनदासवर काही लोकांनी हल्ला चढविला. त्याला लाथाबुक्क्यांनी तुडविले. हाडे मोडली नव्हती, पण ते रक्तबंबाळ झाले. त्यांच्या शुश्रुषेसाठी कस्तुरबानी जाणे अपेक्षित होते. मोहनदासचे काम, त्यांची तत्त्वनिष्ठा ही आता कस्तुरबात उतरली होती. तिने जोहान्सबर्गच्या मित्रांना कळवले, ‘मी इथे त्यांचेच काम करत आहे. तुम्ही सर्व तिथे माझ्यापेक्षाही काळजी घेणारे लोक आहात. मी इथले काम सोडून तिकडे त्यांच्या सेवेसाठी येणे हे मला व त्यांना पटणारे नाही. सध्या हाती असलेल्या फंडामध्ये फोईनिक्स आश्रमाचा खर्च ही आमची दोघांची जबाबदारी आहे. ईश्वर त्यांच्यासोबत आहे, मी न येण्यामागची भूमिका समजून घ्या.

ख्रिस्ती धर्माप्रमाणे ज्यांची लग्ने झाली नाहीत, ती सर्व बेकायदेशीर आहेत. अशा लग्नापासून झालेल्या मुलांना वारसा हक्क मिळणार नाही, असा एक अजब व धक्कादायक फतवा सरकारने काढला. टॉलस्टॉय फार्म व फोईनिक्स सेटलमेंट या दोन्ही आश्रमातील बायकांनी या विरुद्ध आवाज उठवायचं ठरविले. मोहनदासानी त्यांना नेतृत्व करण्याचे मान्य केले. या मुद्द्यावर बायकांनी सत्याग्रह करायचा. त्याचा गाजावाजा प्रसिद्धी काहीच करायची अशी चर्चा चाललेली कस्तुरबांच्या कानावर पडली. दोन्ही आश्रमातील बायकांची सत्याग्रहासाठी तयारी करून घेणाऱ्या मोहनदासनी आपल्याला या सत्याग्रहाबद्दल सांगितले नाही याचे दु:ख त्यांना झाले.

त्या म्हणाल्या, ‘मीही सत्याग्रह करणार. करणार म्हणजे करणारच.’ या सत्याग्रहासाठी घडलेल्या कारणापासून मी अलिप्त नाही. मोहनदासनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये जाऊन तिचा आजार परत बळावला तर आपण स्वत: त्यात अडकून बसू. सत्याग्रहाच्या बांधणीची परवड होईल ही भीतीही त्यांनी बोलून दाखवली. कस्तुरबा हार गेल्या नाहीत. मोहनदास हा अतिशय श्रेष्ठ व तत्त्वनिष्ठ माणूस आहे, हे त्यांना पटले होते. पण त्यांनी अंगिकारलेले काम हे प्रचंड मोठे आहे हेही कस्तुरबांना पटले आणि म्हणूनच त्यानी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. कोणी करायला सांगितले किंवा सुचविले म्हणून कस्तुरबा ऐकणाऱ्या नव्हत्या. कोणतीही गोष्ट का करायची, त्याची कारणे व महत्त्व पटले तरच त्या करीत.

 23 सप्टेंबर 1913 या दिवशी 16 गुजराती भाषक (12 पुरुष, 4 स्त्रिया) स्त्री-पुरुष फोईनिक्सहून ट्रान्सवालच्या सीमेवर सत्याग्रहासाठी पोहोचले. कस्तुरबाकडे नेतृत्व होते. सीमेवर पोहोचल्यावर त्यांनी आपले नाव, गाव, पत्ता काहीच न सांगितल्यामुळे त्या सर्वांना अटक झाली. न्यायाधिशाला मात्र सर्व खरी हकिगत सांगितली. दोषी ठरवून या सर्वांना तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. कस्तुरबाला आपल्याबरोबर आलेल्या तरुण मुली व आपण स्वत: सत्याग्रहात भाग घेणाऱ्या ‘‘पहिल्या महिला आहेत’’ याचा आनंद वाटला. त्यांची व त्यांचा 13 वर्षांचा मुलगा रामदास यांची ही पहिलीच तुरुंगवारी.

कस्तुरबा व फोईनिक्स आश्रमकन्या यांना मॅरिट्‌झ बर्ग  येथील कारागृहात पाठवले. त्यांच्याकडे कपडे धुण्याचे काम, फाटलेले-उसवलेले व कैद्यांचे कपडे शिवण्याचे काम होते. हे काम इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर लादले होते, की ते त्यांच्या ताकदीबाहेरचे होते. त्या चौघींना शाकाहारी व थोड्या बऱ्या प्रतीचे अन्न मिळावे याकरता बांनी रदबदली केली. ती अयशस्वी झाली. महिला कैद्यांना बरोबर घेऊन त्यांनी संध्याकाळी प्रार्थना व भजने म्हणायला सुरुवात केली. फोईनिक्स सत्याग्रहीबरोबर सर्वच महिला कैदी आता कस्तुरबाला ‘बा’ नावाने संबोधू लागल्या. खऱ्या अर्थाने त्या कस्तुरबार्इंच्या ‘बा’ झाल्या. तुरुंगात या चौघींचीही प्रकृती अगदी खालावली त्यांच्यावर धड उपचार ही केले जात नव्हते. कस्तुरबा भिंतीवर रोज एक फुली मारून शिक्षेचे किती दिवस संपले याचा हिशेब ठेवत होत्या. अशा परिस्थितीत त्या असतानाच मोहनदासना अटक आणि नऊ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाल्याचे वृत्त समजले.

गांधी कुटुंबातले आता चौघे तुरुंगात आणि 13 वर्षांचा रामदास व 7-8 वर्षांचा देवदास हे दोघेच फोईनिक्स सेटलमेंटच्या आश्रमात राहिले. मोहनदासना 18 डिसेंबर 1913 रोजी विनाअट मुक्त केले. ‘बा’ व फोईनिक्स आश्रमकन्या यांची शिक्षा 22 डिसेंबर 1913 संपत होती. मोहनदास हरमन कॅलेनबरा, श्री. व सौ. हेन्री पोलॅक व शेकडो नागरिक मॅरिट्‌झबर्ग कारागृहाच्या दारात त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. कस्तुरबाना धड चालता येत नव्हते, इतकी त्यांची प्रकृती खराब झाली होती. मोहनदास आणि प्रचंड समुदाय स्वागताला येणं हे कस्तुरबाना अपेक्षित नव्हते. त्याना भरून आले. सर्वजण फोईनिक्सला परतल्यावर मोहनदासनी जनरल स्मट्‌स याना सर्वच सत्याग्रहींना सोडावे व एक निपक्षपाती युरोपियन सदस्यांचे एक चौकशी समिती नेण्याची मागणी केली सत्याग्रही सुटले पण चौकशी समितीची मागणी फेटाळली गेली.

‘बा’ फोईनिक्सला पोहोचल्या. 1 जानेवारी 1914 रोजी गांधी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन डरबानकडून प्रिटोरियाला न्याय मिळालाच पाहिजे, म्हणून सत्याग्रह करणार होते. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेच्या गोऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीतील काही अटींच्या निषेधात देशव्यापी संप केला. ‘इंग्रजांची अडचण ती आपली संधी’ असा विचार गांधीसारख्या सत्याग्रह नेत्याचा नव्हता म्हणून 1 जानेवारीचा सत्याग्रह तात्पुरता पुढे ढकलला. याच वेळी कस्तुरबांची प्रकृती एकदम अधिकच बिघडली. मोहनदासला हे समजल्यावर ते तातडीने घरी परतले. जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमधले काही दिवस अत्यंत काळजीचे गेले. ‘बा’चे हाल पाहवत नव्हते. आता फार दिवस काढणार नाही असे मोहनदाससकट सर्वांनाच वाटत होते. देवाची कृपा मार्चच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यापासून ‘बा’ सुधारत गेली. जूनमध्ये इंडियन रिलिफ बिल युनियन पार्लमेंटने पास केले. त्यात

(1) तीन पौंड कर रद्द झाला.

(2) सर्व धर्माच्या लोकांच्या लग्नविधी पद्धतीला मान्यता मिळाली.

(3) काही प्रमाणात इमिग्रेशन कायदे हे सुशिक्षित हिंदी लोकांकरता शिथील झाले.

(4) काळ्या कायद्यातील मुख्य अटी तशाच राहिल्या.

असे असले तरी दक्षिण आफ्रिकेतच प्रथम सुरू झालेल्या सत्याग्रहाचे यश मानलेच पाहिजे.

गुरुवर्य नामदार गोखले यांच्या इच्छेप्रमाणे मोहनदास आता कायमचे हिंदुस्तानात येणार होते. लंडनमार्गे कस्तुरबांना बरोबर घेऊन त्यांनी दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम केला. तो दिवस होता 18 जुलै 1914. दक्षिण आफ्रिकेने गांधी दांपत्याला ठिकठिकाणी मोठे समारंभ भरवून सत्कार करून निरोप दिला. कस्तुरबाला ते दोघेही दक्षिण आफ्रिकेत आल्यावर आपण खूपच बदललो, हे जाणवले. यानंतर गांधी कुटुंब भारतात आले, चंपारण्यचा सत्याग्रह झाल्यावर त्यांनी गुजरातमध्ये अहमदाबादजवळ कोचरब येथे आश्रम बांधला, तोच साबरमती आश्रम हे त्यांचे निवासस्थान झाले.

साबरमती आश्रमात आश्रमवासियांबरोबरच बाहेरगावहून, परदेशातून येणारे पाहुणे, स्थानिक मंडळी, कार्यकर्ते यांची दिवसभर वर्दळ असे. साबरमती आश्रम हे एक स्वतंत्र गावच होते. आश्रमाच्या नियमाप्रमाणे आश्रम चालविणे, इतर कुरबुरींची दखल घेणे, आरोग्य, चरखा शिक्षण, बापूंची व्यवस्था व प्रकृती इत्यादी करण्यात कस्तुरबांना दिवस पुरत नसे. आश्रमातील पै न पैचा हिशेब त्यांच्या जीभेवर असे. येरवडा जेलमध्ये असताना गांधीजींच्या अस्वस्थ प्रकृतीचे कारण अपेंडिक्स आहे, हे कळले. तातडीने ऑपरेशन झाले. अशा वेळी ‘बां’नी बापूजींच्या जवळ असणे अगत्याचे होते. इतक्या तातडीने ‘बां’ना निघणे शक्य नव्हते. आश्रमाचा पसारा अवाढव्य होता. एक-दोन दिवसात तिथली व्यवस्था करणे अशक्य होते. आपल्या  जबाबदाऱ्या सोडून ‘बां’नी त्यांच्याजवळ येणे हे बापूंनाही आवडणे शक्य नव्हते. ‘बां’नी देवदासला येरवड्याला पाठवले. ‘बां’ना बापूइतके प्रिय काहीच नव्हते. बापूंचीच शिकवण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. तेच ‘बा’ करीत होत्या.

12 मार्च 1930 या दिवशी गांधीजींची ‘दांडी’ यात्रा सुरू झाली. यात्रेला प्रारंभ अर्थातच साबरमती आश्रमापासून. गांधीजींबरोबर 79 सत्याग्रही गुजरातमधील दांडीच्या समुद्राकडे पायी चालत निघाले होते. तिथे जाऊन ते समुद्राजवळच्या मिठागरातून मीठ उचलून सत्याग्रह करणार होते. गांधीजींच्या कुटंबातील चार पिढ्या- मोहनदास ते त्यांचा नातू कांतीलाल, सून सुशीलाबेन यांचा समावेश होता. ‘बां’वर नेहमीप्रमाणे आश्रमाची पूर्ण जबाबदारी होती. त्यांनी कुंकुमतिलक लावून सत्याग्रहींना शुभेच्छा दिल्या. मीठाच्या सत्याग्रहाचे नेते गांधीजी येरवडा तुरुंगात रवाना झाले होते. रोज सत्याग्रहाच्या तुकड्या सर्वत्र समुद्र किनाऱ्यावर सत्याग्रह करीत होत्या. स्त्रियाही मोठ्या संख्येने सत्याग्रहात उतरल्या. सरोजिनी नायडू यांनाही अटक झाली. ‘बां’ना स्वत:ला असे वाटू लागले की आश्रमातील स्त्रियांनी आता मागे न राहता सविनय कायदे भंग चळवळीत उतरणे गरजेचे आहे. या स्त्रियांना उद्देशून गांधीजींनी येरवडा जेलमधून पत्र लिहिले, ‘मला पूर्ण खात्री आहे, की या अहिंसक चळवळीचे यश हे तुम्हा सर्व स्त्रियांच्या ताकदीवर अवलंबून आहे.’ ‘बा’नी प्रत्यक्षात सत्याग्रहात भाग न घेता ही जी स्त्रियांची सत्याग्रहात जाण्यासाठी बांधणी केली. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन गांधीजींना खूप बरे वाटले. आपण येरवडा जेलमध्ये कातलेले सूत त्यांनी कस्तुरबांसाठी साडी विणण्यासाठी भेट म्हणून पाठवून दिले. त्यांच्या प्रेमाचे व कौतुकाचे प्रतीक.

या सत्याग्रह संबंधात त्यांच्या कामाबद्दल लिहिताना गांधीजी म्हणतात- ‘Ba's work porved this long-held theory,  I believe the strength which women possess is given them by God. Hence they are bound to succeed in whatever they undertake.‘

1931 मधील गोलमेज परिषदेच्या बोजवाऱ्यानंतर हिंदुस्तानात सर्वत्र निषेध व्यक्त होऊ लागला. जानेवारीमध्ये 15000 व फेब्रुवारीत 18000 लोकांना अटक झाली. त्यात महिलांची संख्या प्रथमच मोठी होती. ‘बा’ व त्यांच्या आश्रमातील स्त्रिया साबरमती आश्रमातून पकडून नेल्या. या दोन वर्षांत ‘बा’ना सहा आठवडे ते सहा महिन्यांपर्यंत पाच वेळा कारावास झाला. ‘बा’ साबरमती जेलमध्ये व बापू येरवडा जेलमध्ये. 20 सप्टेंबर 1932 या दिवसापासून गांधीजींनी हिंदी राज्यघटनेध्ये दबलेल्या जमातीसाठी स्वतंत्र मतदार संघ देण्याचा कलमाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले. कस्तुरबांची उरलेली शिक्षा त्याना येरवडा तुरुंगात पूर्ण करायची होती. कस्तुरबा जातीने काळजी घेऊ लागल्या. त्याबाबात इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन कर्नल इ. इ. डोयल म्हणाले, पुणे कराराच्या सह्या होईपर्यंत गांधीजींना जिवंत ठेवण्याचे काम कस्तुरबांच्या उपस्थितीशिवाय झालेच नसते. पुणे करारावर सह्या केल्यावर कर्नल साहेब म्हणाले, ‘गांधीजी, आपला उपवास सोडण्यासाठी मोसंबीचा रस देण्याच मान मी श्रीमती गांधी यांना देतो.’ यातच सर्व काही आले नाही का? ‘बा’ परत येऊन आपल्या कामाला लागल्या. लवकरच त्यांना स्त्रियांना स्वातंत्र्याच्या चळवळीत ओढल्याचे निमित्त सांगून सहा महिन्यांची शिक्षा झाली. परत साबरमती जेल. ब्रिटिश अधिकारी म्हणाला, कस्तुरबांना ही शिक्षा गांधींमुळे झाली नाही. त्यांच्या स्वत:च्याच कामासाठी झाली. कस्तुरबाना एकटीला ठेवले होते. भेटी गाठी बंद होत्या. प्रत्येक आठवड्यााला येणारे गांधीजींचे पत्र हाच फक्त त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंध. 64 वर्षांच्या ‘बा’च्या आयुष्यात अशी एकटेच राहण्याची प्रथमच शिक्षा झाली. ती त्यांना आनंदाने व तक्रार न करता सोसली. साबरमती आश्रम बंद झाल्यामुळे ‘बा’ना आता घरी जायचे म्हणजे कुठे जायचे असा प्रश्न होता. गांधीजींनी आपले शिष्य विनोबाजी भावे यांच्या सहाय्याने वर्ध्याला एक मातीची झोपडी बांधून घेतली होती. कस्तुरबांनी आता हरिजनांसाठी काम करायचे ठरवले होते. त्या आता पूर्वीच्या कस्तुरबा नव्हत्या, हजारो हरिजनांच्या सभेत त्या भाषण करत. स्त्रियांना संघटीत करण्याचे काम करीत. डिसेंबर 1936 मध्ये कस्तुरबांची झोपडी तयार झाली. गांधीजींना व कस्तुरबांना आता आश्रम स्थापन करून राहण्याची ताकद नव्हती. आता जिथे ते स्थायिक झाले होते तिथे आश्रमाचेच स्वरूप येऊ लागले. तेव्हा त्यांनी आपण राहत असलेल्या भागाला ‘सेवाग्राम’ हे नाव  जाणिवपूर्वक दिले. ‘बा’ना लिहायला-वाचायला शिकवण्याचा त्यांचा नवऱ्याचा प्रयत्न फसला. सेवाग्राममध्ये प्रयत्न करून त्या हळूहळू वाचू लागल्या. वर्तानपत्रही सावकाश वाचीत. पुस्तकी ज्ञानात त्या मागे असल्या तरी त्या बहुश्रुत होत्या. स्त्रिया व दलितांशी बोलताना त्या त्यांच्या मनाले भिडेल असे बोलत. सर्वांशी प्रेाने वागून त्या त्यांच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत. 1942 मधील ‘चलेजाव’ च्या आंदोलनातही त्या त्यांच्या स्वत:च्या पद्धतीनेच काम करणार होत्या. 8 ऑगस्ट 1942 ला गांधींनी गवालिया टँकवरील काँग्रेस अधिवेशनात चलेजावची घोषणा दिली. ‘करेंगे या मरेंगे’चा त्यांनी दिलेला नारा लोकांनी उचलून धरला. गांधीजी मुक्कामावर पोहोचले आणि काही वेळातच त्यांना त्यांच्या भाषणाबद्दल अटक झाली. त्यांचे वय व कष्ट यांनी प्रकृती खराब झाली होती. तेव्हा त्यांना जेलमध्ये ठेवण्यापेक्षा पुण्याला आगाखान पॅलेसमध्ये नेऊन ठेवले. 9 ऑगस्टला शिवाजीपार्कवर गांधीजी जनतेला उद्देशून भाषण करणार होते. कस्तुरबांनी स्वत:हून हे काम करायचे ठरवले. कस्तुरबांना सकाळीच अटक झाली व पुण्याला पाठविले. हे भाषण झाले असते, तर ते एक प्रभावी व हृदयस्पर्शी भाषण होणार होते. यानंतर कस्तुरबा आगाखान पॅलेसमध्येच आपल्या व गांधीजींच्या वृद्धावस्थेशी सामना करीत होत्या. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कस्तुरबांना देशाने आपल्या माता मानल्या त्या त्यांच्या स्वत:च्या कर्तृत्वामुळे. गांधीजींना सुभाषबाबूंनी राष्ट्रपिता म्हणून संबोधले म्हणून त्या राष्ट्रमाता झाल्या हे गांधीविरोधी हाताच्या बोटावर मोजणाऱ्यांचे विधान अत्यंत अश्लाध्य आहे. कस्तुरबा या राष्ट्रमाता का? ते दलितांना विचारा. चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या इतिहासाला विचारा, महिला सत्याग्रहींच्या मुलाखतीत वाचा. गांधीजी हे पुरुषप्रधान संस्कृती जन्मलेले व वाढलेले होते. त्यांची आई पुतळीबाई व कस्तुरबा यांच्या कुटुंबातील व समाजातील लोकप्रियता गांधीजींनाही समजत गेली. अत्यंत पारंपरिक संस्कार व त्या संस्कारांचे हिंदू धर्माशी नाते त्यांनी सुरुवातीला जोडले. त्यामुळे लहानपणापासून धर्मबाह्य समजल्या गेलेल्या प्रथा पद्धतींना अयोग्य मानणे हा विचार पटेपर्यंत त्यांच्या मनात तो संघर्ष चालू राहिला. त्या नकळत बदलत गेल्या. कस्तुरबांनी ‘राजा बोले दळ हाले’ या म्हणीप्रमाणे गांधीजींच्या म्हणण्याचा स्वीकार केला नाही. त्यांना ज्या गोष्टी-विचार मनापासून पटले (किंवा त्यातले तथ्य म्हणून पटले) त्याच गोष्टी त्यांनी केल्या. गांधीजी आपल्या ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्रात लिहितात - अहिंसेची मूलतत्त्वे मी कस्तुरबाच्या वागणुकीतूनच शिकलो. कस्तुरबा निर्विकारही नसे किंवा आक्रमकही नसे. परंतु तिला जी गोष्ट योग्य आहे, असे मनापासून पटे तेवढेच ती करे. इतर बाबींकडे कानाडोळा करे.’ गांधीजींचे म्हणणे तिला चुकीचे वाटले तर ती सावकाश अहिंसकरीत्या (भांडणतंटा न करता) कोणताही युक्तिवाद न करता सत्य काय आहे ते त्यांना दाखवून देई. गांधीजी म्हणत, हाच गाभा अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा आहे. कस्तुरबांचा कस्तुर ते राष्ट्रमाता कस्तुरबा हा प्रवास थक्क करणारा आहे. महात्मा गांधींची पत्नी असल्याचा त्यांना अभिमान जरूर होता, पत्नीपद मात्र त्यांनी कधी मिरवले नाही. नाताळच्या पहिल्या महिला सत्याग्रहाबद्दल आपल्याला गांधीजींनी (त्यांच्या दृष्टीने कोणतेही कारण असले तरी) सांगितले नाही, याबद्दल त्यांना वाईट वाटले. गांधीजींना मी सत्याग्रहात सामील होणार आणि जरूर पडल्यास मीच सत्याग्रहाचे नेतृत्व करणार असे ठणकावणारी कस्तुरबाई ही स्वत:च्या मुलांचीच नव्हे तर राष्ट्रमाता बनली हे तिचे कर्तृत्व. तिच्या संबंधी काही माहिती न मिळवता शेरे मारणाऱ्यांना केव्हा तरी कळेलच, अहिंसक सत्याग्रहाचे परदेशात नेतृत्व करण्याचा पहिला मान त्यांनी महिला जगताला मिळवून दिला. बालविवाह, दारिद्र्य, अस्वच्छता, दलित उद्धार अशी कामे देशभर फिरून केली. एका कुटुंबाचा संसार चालविताना स्त्री दमून जाते. टॉलस्टॉय फार्म, फोईनिक्स सेटलमेंट, साबरमती आश्रम यांचे संसार त्यांनी अत्यंत शिस्तीत व पारदर्शकपणे केले. सूतकताई व खादीचे विणकाम घरोघर पोहोचवले. स्त्रियांना निर्भय बनवले. 7-8 वेळा दक्षिण आफ्रिकेत व हिंदुस्तानातील चळवळीत तुरुंगवास भोगला. एका श्रीमंत कुटुंबात लाडाकोडात वाढलेल्या कस्तुरने आपला सुगंध इतिहासात पसरविला. देह ही कारावासात ठेवून ही राष्ट्रमाता कस्तुरबा 22 फेबु्रवारी 1944 मध्ये अनंतात विलीन झाली.

Tags: rohini gawankar kasturba gandhi रोहिणी गवाणकर कस्तुरबा गांधी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रोहिणी गवाणकर,  पुणे, महाराष्ट्र

लेखिका, अनुवादक


प्रतिक्रिया द्या