डिजिटल अर्काईव्ह (2013-2020)

साहित्य जीवनगौरव । शांता गोखले
शांता गोखले या नावाजलेल्या पत्रकार आणि रंगभूमीच्या इतिहासकारही आहेत. त्यांनी १८४३ ते २००० पर्यंतच्या मराठी रंगभूमीचा इतिहास लिहिलेला आहे. कोणत्या सामाजिक-राजकीय पार्श्वभूमीवर मराठी रंगभूमी आकाराला आली, याचाही वेध त्यांनी घेतला आहे. अनुवादक म्हणून, संपादक म्हणून, त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व थक्क करणारं आहे. स्मृतिचित्रे (लक्ष्मीबाई टिळक) ते अच्युत आठवले ते आठवण (मकरंद साठे), गोडसे भटजींचा ‘माझा प्रवास’ ते सतीश आळेकरांचं ‘बेगम बर्वे’ अशा एकाच वेळी अभिजात आणि आधुनिक ग्रंथांचा अनुवाद करण्याचं त्याचं कौशल्य निश्चितच दाद देण्याजोगं आहे.
 

नावाप्रमाणेच दिसायला शांत. पण लेखनातून परखड मते मांडणाऱ्या, नाजूक चणीच्या शांता गोखले यांचा साहित्यक्षेत्रात दबदबा आजही कायम आहे. त्या ‘टाइम्स’मध्ये काम करीत होत्या, तेव्हा तर त्यांचे नाव कलाजगतात खूप गाजत होते. त्यांच्या कला पुरवणीने मुंबईतील कलाजीवनात जणू उत्साहाची लाट आली होती; किंबहुना, जी लाट वा सळसळ अस्तित्वात होती, ती खळाळत वाहू लागली होती. लोकांपर्यंत जाऊ लागली होती. त्या कला पुरवण्या आजही आदर्श मानल्या जातात. त्या पुरवण्या बंद होऊनही बराच काळ लोटला आहे. खरं तर आजच्या माध्यमस्फोटाच्या काळात असे मूलभूत नि कलाजगतातील सर्जनशील काम सामान्य रसिकापर्यंत येणे महत्त्वाचे आहे.

त्यांचे बहुआयामी काम हे पत्रकारिता, अनुवाद, माहितीपटलेखन ते सर्जनशील लेखन- असे पसरलेले आहे, नि प्रत्येक विधेत त्यांनी लक्षात राहील असे काम केलेले आहे. त्यांना २०१६ मध्ये संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक मिळाले. अनुवादासाठी बाळशास्त्री जांभेकर पारितोषिक, आणि आता यंदाचा  महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव.

साधारणपणे पत्रकारितेत इतरांच्या कामाबद्दल लिहिता-लिहिता व्यक्ती स्वत:ची स्वतंत्र कामे करू शकत नाही. कारण ते क्षेत्र डेडलाइनवर चालत असल्याने वेळ सांभाळणे, लोकांचे करणे, पाहणे, लिहिणे ह्यातच वेळ जातो. स्वत:चे लेखन हे तब्येतीत करायचे काम असते, त्याला वेळ राहत नाही. पण शांतातार्इंनी ही गोष्ट अडचणीची होऊ दिली नाही. कथा, कादंबऱ्या, ॲन्थॉलॉजी, अनुवाद- मराठीतून इंग्लिश नि इंग्लिश ते मराठी, अनेक लघुपटांचे स्क्रिप्ट लेखन, तसेच चित्रपटांसाठी लेखन त्यांनी केले आहे. त्यांची ‘रिटा वेलिणकर’ ही गाजलेली मराठी कादंबरी, ‘त्या वर्षी’ ही दुसरी कादंबरी.

रिटा वेलिणकरचा काळ हा स्त्रीने स्वत:चा विचार करायचा, स्वतंत्र होण्याच्या जाणिवेचा होता. कादंबरीची कथानायिका आहे दुसरी स्त्री. आई-वडिलांनी स्वत:च्या संसाराचा भार तिच्यावर टाकला, तिचा विचार न करता दुसऱ्या मुलींची आयुष्ये मार्गी लावली. हिचा विचार करणारा तिचा बॉस तिच्या जिवाचा आधार झाला, पण तो आपला संसार सोडून यायचं नाव नव्हता घेत. त्याच्या लेखी ती दुसरी स्त्री होती. त्याच्या जीवनाला काही कसर न लागता हे संबंध त्याला हवे होते. त्यात रिटा कोसळते, पण नंतर सावरून स्वत:च्या आयुष्याचा ताबा घेत राहण्याचा निर्धार करते. रिटाला भारी किंमत द्यावी लागते. रिटा वेलिणकर ही महत्त्वाची कादंबरी स्त्री चळवळीच्या विचाराला दिशा देते. पुढे त्यावर शांता गोखले यांच्या कन्येने- रेणुका शहाणेने त्याच नावाचा चित्रपट केला.

अनुवादाच्या आरंभाबद्दल एका भाषणात त्या म्हणाल्या होत्या की, त्या इंग्रजी घेऊन बी.ए. करीत असताना पोळ्या करता-करता आई म्हणाली, ‘इंग्रजीत शिकून देशाला काय उपयोग?’ तर त्या म्हणाल्या, ‘शिकवेन.’ आईनं सुचवलं, ‘इंग्रजीत उत्तम लेखन आहे. ते मराठीत आणता आलं तर बघ.’ आणि मग त्यांना ही अनुवादाची वाट सापडली.

आपल्याकडे चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाट्य यांचे फारसे ज्ञान नसते. टाइम्सच्या १५० व्या वर्धापन वर्षात शांताबार्इंना सलग आठ पाने त्यासाठी मिळाली. त्या काळात मुंबईत व्हीटी स्टेशनमध्ये चित्रांचे प्रदर्शनही टाइम्सने भरवले होते. सामान्यांपर्यंत कला नेण्याचा हा एक प्रयत्न होता. तेव्हा शांताबाई ग्लॅक्सोत काम करीत होत्या, ते सोडून त्या टाइम्सला गेल्या. पत्रकारितेत अनेक प्रयोग त्यांनी केले. कलाजाणिवा वाढाव्यात म्हणून लेख लिहवून घेतले. प्रायोगिक रंगभूमीत खूप शक्यता आहेत, असं त्यांना वाटे. म्हणून त्यांनी मराठी-हिंदी-इंग्रजी समांतर रंगभूमीला त्यांच्या कला पुरवणीत भरपूर स्थान दिले. पुढे ती पुरवणी व्यवस्थापनाने अचानक बंद केली. त्या तिथे काम करीत राहिल्या. पुढे रंगभूमीवरच्या पुस्तकाच्या कामासाठी नोकरी सोडली. त्यांची सहकारी आणि मैत्रीण बची कार्कारिया ही ‘मिड-डे’ला गेली, तिथे तिने शांताबार्इंना सदर लिहायला लावले. त्या तिथून पुन्हा टाइम्सला गेल्या तेव्हा तिथे पुन्हा सदर सुरू केलं. ‘मिरर’मध्ये १५ वर्षे सांस्कृतिक स्तंभ लिहिला. मराठीत त्यांना अरुण टिकेकरांनी लोकसत्तात लिहायला लावले, तसेच सदा डुम्बरे यांनी साप्ताहिक सकाळमध्ये. सांस्कृतिक जगताच्या अनेक अंगांवर- जसे ‘सभ्य असभ्य’- मॅनर्सवर लिहिले.

संसारी जीवनातही त्या तितक्याच रमतात. मुलगा-सून यांची साथ, लेकीकडे जाणे-येणे, नातवंडांशी मस्ती करणे हा त्यांचा रविवारचा विरंगुळा असतो. अन्यथा, काम हाच विरंगुळा असतो. आजही त्या लेखनात भरपूर मग्न असतात. कादंबरी आणि इतर लेखन सुरू असते. अशा व्यक्तींना वय विचारू नये, कारण त्याचा स्पर्श त्यांच्या शरीराला झालेला असला तरी उत्साहाला झालेला नसतो. आजूबाजूच्या परिस्थितीचा त्यांना अत्यंत राग येतो. आजच्या अस्वस्थ काळाबद्दलची चीड त्यांच्या बोलण्यातून जाणवते; पण हे सारे नक्कीच बदलेल, असा विश्वासही त्या व्यक्त करतात. लेखकाने आपल्या लेखणीतूनच बोलावे, असे त्यांचे मत आहे.

प्रश्न - लेखनावर प्रेम कधीपासून जडलं?

- लेखन हे बाहेरचं आहे, तिथे काही पाहून-घडून मग लिहिलंय असं न होता; जे आत होतं, ते बाहेर यायला सुरुवात बालपणापासूनच झाली. शाळेतल्या निबंधलेखनातच आतून बाहेर व्यक्त होणं झालं. आतल्या आत गोष्ट चालत असे. मग मी वहीत लिहून ठेवू लागले. वसईत जन्मले, मुंबईत आलो. आम्ही दोघी बहिणी. मला साहित्याची आवड, तर तिला विज्ञानाची. मी कापाकापीपासून दूर, तर ती सरासर करायची. पुढे तिने कॅन्सर रिसर्चमध्ये काम केलं. मी स्कॉटिश शाळेत शिकले, इंग्रजी माध्यमातून. पुढील शिक्षणासाठी १५ व्या वर्षी ब्रिस्टल विद्यापीठात- इंग्लंडला गेले नि इंग्रजी साहित्य घेऊन पदवी मिळवली. इथे परतल्यावर मुंबई विद्यापीठातून इंग्लिश साहित्यात एम.ए. केलं. इंग्लंडला असताना तिथल्या हकिगती पत्रातून लिहीत असे. तिथे आमच्या कॉलेजात ‘रॅग डे’ इत्यादी असे फ्लोट्‌स असत. विद्यार्थी आपापल्या विभागात थीमनुसार (चॅरिटी) फ्लोटची सजावट करून त्याची मिरवणूक गावभर फिरवत असत. आम्ही चॅरिटीसाठी लोकांसमोर डबे वाजवत असू. लोक पैसे टाकत, मग ते पैसे समाजसेवा करणाऱ्या संस्थांना दिले जात.

प्रश्न - पत्रकारितेचा व ललित लेखनाचा प्रारंभ कसा झाला?

माझे वडील तेव्हा टाइम्स ऑफ इंडियात संपादकीय विभागात काम करीत होते. त्यांनी एकदा मी इंग्लंडहून पाठवलेली पत्रं एम. जी. मॅथ्यू- सहसंपादक यांना दाखवली. त्यांनी छापून टाकली! जिथे आपण काम करतो तिथे असे छापून येणं वडिलांना आवडलं नाही. पण मॅथ्यूंना ते पसंत पडले होते, म्हणून ते छापले होते. माझी ती पत्रं बहुधा अर्धमराठीत आणि अर्धइंग्लिशमध्ये असत. आईसाठी वेगळा मजकूर असे, त्यात घरगुती पदार्थ वगैरे असत. घरच्यांना ती वाचून मजा यायची. आईने आणि मी चाकणला जाऊन तावूनसुलाखून विकत घेतलेल्या म्हशीबद्दलचा माझा लेख मॅथ्यूंनीच आपणहून रस्किन बाँड हे संपादित करीत असलेल्या ‘इंप्रिंट’ नावाच्या मासिकाकडे पाठवला. तिथे तो छापून आला. काही वर्षांनी तो संक्षिप्त स्वरूपात ‘रिडर्स डायजेस्ट’मध्ये छापून आला. मुद्दा हा की माझ्या आयुष्याच्या श्रेयावलीत आई-वडिलांनंतर एम.व्ही. मॅथ्यू यांचं नाव आहे. आणि त्यांच्यानंतर सत्यदेव दुबे यांचं. त्यांचा भाषांतराचा हुकूम निघायच्या आधीच, म्हणजे १९६२ मध्ये मी इंग्लंडहून परत आले तेव्हाची गोष्ट. मग १९७१-७२ ला प्रेमविवाह करून मी विशाखापट्टणमला गेले. तिथं मुलंबाळं झाली, त्यांचं करण्यात वेळ जाई. मनात खूप काही घोळत असे. तेव्हा एका वेगात मी ३०-३२ कविता लिहून टाकल्या. त्या निस्सीम इझीकेलना पाठवल्या. त्यांचं पत्र आलं-

‘कविता लिहू नकोस. मराठीतून लिही.’ त्या वेळी दोनतीन गोष्टी मनात घोळत होत्या. सपाट्यात तीन कथा लिहून टाकल्या. मग त्या पु. आ. चित्रेंना पाठवल्या. त्यांनी कळवले की, दोन मी छापतो, एक सत्यकथेला देतो. तशा त्या ‘अभिरुची’ नि ‘सत्यकथा’ या मासिकांतून आल्या. त्यानंतर ‘रिटा वेलिणकर’ लिहिलं.

‘रिटा वेलीणकर’ प्रथम ‘ग्रंथाली’ला दिली. दिनकर गांगल यांना ती खूप आवडली. पण प्रसिद्ध काही होईना.

दोन वर्षं लोटली. एके दिवशी श्री.पु. भागवतांचा फोन आला. तेही वडिलांच्या वर्तुळातले. त्यांनी ती वाचायला मागितली. पाठवल्यावर दोन दिवसांनी श्रीपुंचा फोन. ‘‘मला कादंबरी आवडली. तुमची हरकत नसेल तर आम्ही छापू इच्छितो.’’

कादंबरी एका वर्षांत प्रसिद्ध. त्यानंतर काही वर्ष लोटली. मग पुन्हा श्रीपुंचा फोन. दुसरी कादंबरी लिहिताय ना? नियमितपणे दोन-चार महिन्यांनी असेच फोन. कादंबरी डोक्यात होती. पण लिहायला वेळ मिळत नव्हता. शेवटी श्री.पु. जायच्या आधी दोन महिने ‘त्या वर्षी’ ही माझी दुसरी कादंबरी लिहून झाली. श्रीपुंनी ती दोन वेळा डोळ्याखालून घातली. एकेक चूक टिपून काढली. मग ते गेले. त्यानंतर मी कादंबरी लिहिली नाही.

प्रश्न - मराठी माणसाला गंड असतो इंग्रजीत आपलं काही छापून येत नाही?

- आपली ही वृत्तीच आहे की, आपलं सारं श्रेष्ठ आहे नि इतर त्याची दखल घेत नाहीत. मी टाइम्सची पुरवणी पाहत असताना नेहमी मराठी नाटक- खास करून प्रायोगिक, कारण त्यात नवनवे बदल वा प्रयोग होत होते संगीतकार, चित्रकार यांना आवर्जून स्थान देत असे. पण आमच्या मनात ही दादागिरीची भावना न्यूनगंडातून आलेली आहे. समाजातही पाहा- सगळं दुसऱ्या कुणी तरी सांगितलं तरच आम्ही करणार. स्वच्छता कुणी दुसरा शिकवणार. त्यानं सांगितलं, तरच आम्ही कायदा पाळणार. साहजिकच मग राजकारण्यांचं फावतं. ते आपली मतं ठामपणे लादू पाहतात. लोकशाही मानत नाहीत. आम्ही सांगू तेच लिहा, करा. त्यातून खरी लोकशाही, वैयक्तिक स्वातंत्र्य दूर राहतं. त्यांचा छडीवर विश्वास असतो. त्याखेरीज कामं होणार नाहीत. म्हणूनच त्यांना स्ट्राँग नेते हवे असतात. साध्या गोष्टीत हळवे होतात. पण मला खात्री आहे, सामान्य माणूस एकत्र येऊन बदल आणेल. अखेर लोकांच्या रेट्यानेच दिल्लीच्या ज्योती सिंग बलात्कार प्रकरणात कायदा येऊ शकला.

प्रश्न - माहितीपटाचा अनुभव कसा होता?

- महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात तारापूर येथे पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर १९६७ मध्ये कार्यान्वित झाला. तेव्हा गोविंद निहलानींना माहितीपट बनवण्यासाठी तत्संबंधी सरकारी खात्याकडून विचारणा झाली, तेव्हा निहलानींनी मला पटकथा लिहायला सांगितलं. तेव्हा मला त्यासंबंधी फारशी माहिती नव्हती, पण मी पटकथा लिहायची ठरल्यावर त्याचा अभ्यास केला. तो माझा पहिलाच अनुभव होता. तो यशस्वी झाल्यावर मग मला आत्मविेशास आला नि मी अनेक माहितीपटांचं लेखन केलं. आपल्याकडे documentary ह्या शब्दाला जोडून एक साचेबद्ध कल्पना येते. त्यात चार डोकी असतात. ज्यांनी माहितीपटाच्या नायकाचा निरनिराळ्या शब्दांत उदो-उदो करायचा असतो. काही प्रख्यात गायकांवर केलेले माहितीपट मी पाहिले आहेत. त्यात त्यांच्या कलेचा पत्ता नाही, फक्त बडबड. मी सुर्व्यांवर पटकथा लिहिली, त्यात त्यांच्या बारा महत्त्वाच्या कविता अभिनित करण्यासाठी वाव ठेवला होता. त्यामुळे त्यांच्या कवितेतली नाटकीयता खुलून आली. शिवाय चित्रपट केला तेव्हा सुर्व्यांची हॉस्पिटलमध्ये नुकतीच ये-जा झाली होती. त्यांना शूटिंगची दगदग मानवली नसती. म्हणून किशोर कदम या अभिनेता-कवीला त्यांची भूमिका दिली. माहितीपटाच्या सुरुवातीला सुर्व्यांच्या समक्ष तो नारायण गंगाराम सुर्वे बनतो. पटकथेच्या शेवटी किशोर ज्या बाकावर बसलेला असतो, त्या बाकावर सुर्वे येऊन बसतात. तो निघून जातो आणि ते माहितीपटातल्या त्यांच्या कवितेच्या शेवटच्या ओळी म्हणतात. जसा विषय तसा पटलेखनाचा रूपबंध कल्पण्यात निर्मितीचा आनंद होता. साचेबद्ध पटलेखन करणं माझ्या तब्येतीला झेपलं नसतं.

प्रश्न - शूटिंगला तुम्ही हजर असायच्यात?

- विंदांवर साहित्य अकादमीने केलेला माहितीपट नंदन कुढयाडी यांनी दिग्दर्शित केला. त्या माहितीपटासाठी मी लेखन केलं. तेव्हा त्यात विंदांची मुलाखत मीच घ्यायची असल्याने शूटिंगच्या वेळी तिथे गेले. अरुण खोपकरने नारायण सुर्वेंवर माहितीपट केला होता. त्यात कृष्णाबार्इंना त्यांच्या विवाहाची काही तरी मजेदार हकिगत सांगायची होती. त्या मला म्हणाल्या, ‘तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे उभ्या राहा, म्हणजे मी सारं काही नीट सांगू शकेन.’ म्हणून मी शूटिंगला गेले होते. त्यांनी ही हकिगत माझ्याकडे पाहून सांगितली. अरुण खोपकरांच्या अनेक माहितीपटांचे लेखन मी केलेय. त्यांचा इंडोनेशिया-भारत यांच्यात असलेल्या पूर्वापार संबंधांवरील एक माहितीपट होता, त्याचे लेखन केले. अभिजात आणि चित्रपट संगीताविषयीचे दोन माहितीपट होते. जहांगीर सबावाला यांच्या चित्रांविषयीचा माहितीपट मी लिहिला.

अरुण खोपकरांनी दिग्दर्शित केलेल्या दोन कथाप्रधान चित्रपटांच्या पटकथांचे लेखन मी केले. ‘हाथी का अंडा’ हा मुलांसाठी, दुसरा चित्रपट होता ‘कथा दोन गणपतरावांची’ अलीकडे गोविंद निहलानींना एका नाटकात सामाजिक आशय आणण्यासाठी फेरफार करून हवे होते. त्यात मी बरेच बदल केले. त्यावर त्यांनी चित्रपट केला ‘ती आणि इतर’ तो एक आठवडा चालला.

प्रश्न - अनुवादाची निवड कशी करता नि त्यात आव्हानं काय असतात?

- पहिलं भाषांतर केलं गोदूताई परुळेकरांचं ‘माणूस जेव्हा जागा होतो’. एक वेगळं जग माझ्यासमोर खुलं झालं. त्याचं कुणी तरी अगोदर भाषांतर केलं होतं, पण ते गोदूतार्इंना पसंत नव्हतं. म्हणाल्या, तू कर. मी केलं. त्यांना पसंत पडलं. त्यावर माझं नाव आलं नाही. त्यात गोदूतार्इंचा काही दोष नव्हता. दुसरा अनुवाद सत्यदेव दुबेंच्या हुकूमावरून चिं. त्र्यं. खानोलकरांच्या ‘अवध्य’चा.

एखादी कथा, कादंबरी, आत्मचरित्र वा वैचारिक लेखन मला आवडलं आणि सामाजिक व साहित्यिक दृष्ट्या महत्त्वाचं वाटलं, तर मी त्याचा अनुवाद करते. ते करताना विचार हाच होता की, मूळ लेखकाचा आवाज त्याच्या पोतासह, वैशिष्ट्यासह, लकबीसकट, शैलीसकट, लयीसकट अमराठी वाचकाला ऐकता आला पाहिजे. यासाठी माझ्या हाती जी जागतिक भाषा होती, ती पणाला लावली. माझ्याकडून जे अनुवाद झाले, ते सहजपणे झाले. पण याचा अर्थ अडथळे येतच नाहीत, असे नाही. अनुवाद होऊच शकत नाही असे नसते. काही म्हणतात, वाक्यप्रयोग- सांस्कृतिक संदर्भ यांचा अनुवाद अवघड असतो. परंतु लेखकाला ह्याच शब्दांत काय म्हणायचंय हे समजून घेतलं, त्याची शैली समजली आणि आपलं इंग्रजी भाषेवरचं कौशल्य पणाला लावलं; तर मार्ग निघतो, आपण वाचकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचू शकतो. एलकुंचवारांच्या ‘प्रतिबिंब’चा प्रयोग बर्मिंगहॅममध्ये तेथील नाट्यविभागाने मंचित केला. त्यांचा दिग्दर्शक म्हणाला की, त्यांना एक शब्दही बदलावा लागला नाही. ‘प्रतिबिंब’ हे शहरी नाटक आहे. त्यामुळे त्याचा अनुवाद सहज झाला. पण ‘वाडा चिरेबंदी’ किंवा उद्धव शेळकेंची ‘धग’ करताना वऱ्हाडी भाषेची अडचण आली. वऱ्हाडी भाषेचा ठसका इंग्रजीत आणणं कठीण होतं, पण थोडा प्रयत्न करता ते जमलं. सतीश आळेकरांच्या ‘बेगम बर्वे’ने वेगळेच आव्हान उभे केले. त्यातील संगीत, नाट्यविेशातले संदर्भ, तिरकस शैली हे सारे इंग्रजीत आणताना नाकीनऊ आले. याच अनुवादाच्या आधारे ते नाटक हिंदीत मंचित केले गेले. इंग्रजीतील अनुवादाचा फायदा असतो की- तिथून ती कथा, कादंबरी वा नाटक इतर भारतीय भाषांत अनुवादित होऊ शकते. गोडसे भटजींचा ‘माझा प्रवास’ आणि लक्ष्मीबार्इंची ‘स्मृतिचित्रे’ करताना अनेक अडचणी आल्या. खास करून ‘लोळण फुगडी’चं काय करावं आणि ‘अगं अगं म्हशी’ कसं सांगावं? विचार करता, असं लक्षात आलं की, दोन्ही शब्दपुंजात एक चित्र आहे- ते डोळ्यांसमोर ठेवून शब्दरचना केली. अशी पर्यायी शब्दरचना शोधली की, काही तरी अचानक हाती लागतं. पर्याय समोर येतात नि गुंता अचानक सुटतो. अर्थात त्या दोन्ही लेखकांच्या भाषेचं एकूण स्वरूप सरळ, सुलभ असल्या कारणाने, बहुतांश अनुवाद सहज होऊ शकला. अनेकदा नवे शब्द कॉइन करावे लागतात. आईच्या इच्छेप्रमाणे माझ्या हातून मराठीतील काही महत्त्वाच्या ग्रंथांची भाषांतरे झाली आहेत. त्यात ‘धग’, ‘माझा प्रवास’ आणि ‘स्मृतिचित्रे’ यांचा समावेश आहे. अजून दोन करायची बाकी आहेत, ती समोर ओळीने उभी आहेत - ‘ब्राह्मणकन्या’ आणि ‘श्यामची आई’.

प्रश्न - इंग्रजीतून मराठी का करावंसं वाटलं, जेरी पिंटोचं पुस्तक?

- मी उलटतर्फी म्हणजे इंग्रजीतून मराठीत अनुवाद दोनच केले. पहिला होता गिव्ह पटेल यांच्या ‘मिस्टर बेहराम’ या नाटकाचा. हे नाटक भाषेच्या दृष्टीने आव्हानात्मक व नाटक म्हणून जबरदस्त असल्याने मला अनुवादक म्हणून ते अनेक वर्षं खुणावत होतं. शेवटी अनुवाद झाला आणि अनेक वर्षांनी पुण्यात होणाऱ्या विनोद दोशी वार्षिक नाट्यमहोत्सवासाठी अनिरुद्ध खुटवड यांनी त्याचं दिग्दर्शन केलं. नंतर त्यांनी त्याचे चार-सहा प्रयोगही केले. जेरी पिंटो यांच्या Em And The Big Hoom या हलवून टाकणाऱ्या कादंबरीचं भाषांतर केलं. ती निवड दोन कारणांनी केली. एक म्हणजे, ती कादंबरी उत्तम आहे म्हणून. दुसरं म्हणजे, रोमन कॅथॉलिक समाज आपल्या इतक्या जवळचा असूनदेखील आपल्या साहित्यात त्याचं चित्रण कुठेही वाचायला मिळत नाही. तिसरं म्हणजे, जेरीची भाषा व शैली मराठीत आणणं हे प्रथमदर्शनी न पेलण्यासारखं आव्हान वाटलं, आणि म्हणूनच ते पेलून दाखवण्याचा हट्ट मी केला. चौथं म्हणजे, जेरी माझा फार जवळचा मित्र आहे. त्याच्या कादंबरीचा अनुवाद मी नाही करायचा, तर कोणी? या अनुवादासाठी मला ‘बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ मिळाला. तेव्हा मला जो आनंद झाला, तो उत्तम गुण मिळवून पास झाल्याचा होता.

प्रश्न - आजची सामाजिक, राजकीय स्थिती पाहून काय वाटते?

झालेल्या इतिहासाला सामोरं जाण्याचं नैतिक बळ आपल्यात का नाही? इतिहास बदलून त्या खोट्या इतिहासाबद्दल गर्व मानायचा हा कसला पळपुटेपणा? या सर्व प्रश्नांनी मन उद्विग्न होतं तेव्हा काळ वर्तुळाकारी आहे या विचाराने मनातली आशा जागृत ठेवावी. देशाच्या कानाकोपऱ्यांत याही परिस्थितीत विचारी, विवेकी, बुद्धिनिष्ठ माणसं आहेत आणि ती देशाला प्रगल्भ करण्याच्या कामात, न्याय्य समाज घडवण्याच्या कार्यात अखंड गुंतलेली आहेत हा विचार मन खुलवतो. उदाहरणार्थ अरुणा रॉय. उदाहरणार्थ कैलाश सत्यार्थी. उदाहरणार्थ गूंज संस्थेचे अनशू गुप्ता. उदाहरणार्थ विल्सन बेझवाडा. उदाहरणार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, असे किती तरी. या सर्वांच्यामुळे फरक पडणार हे नक्की. पण अलीकडे समाजात जे चाललंय ते पाहिलं की, ग्रीक मिथककथेची आठवण येते. त्यात झ्युस हा परमात्मा मानवावर कोपलेला असतो. त्याच्यावर सूड उगवायचा म्हणून तो पँडोरा निर्माण करतो. त्याच्याकडे एक पेटी सोपवतो आणि ती उघडायची नाही, अशी सक्त ताकीद देतो. पण न राहवून तो पेटी उघडतो नि त्यातून भयानक विकार बाहेर पडतात. जंतूंसारखे ते सर्वत्र पसरतात. त्यात रोगराईबरोबरच क्रोध, द्वेष, असूया ही मंडळी असतात. त्यांचा संसर्ग झाला की, माणूस पुन्हा निरोगी होणं महाकठीण. आपल्या समाजाचं असंच काही तरी झालंय, असं वाटतं. जे लोक कळपाबरोबर झापडं बांधून एका दिशेने धावू इच्छित नाहीत, ते शत्रू ठरत आहेत. एकदा का शत्रू ठरला की, मग कुणीही सोम्यागोम्याने बंदुकीने वा लाठ्याकाठ्यांनी मारावे आणि त्या कृत्याच्या फुशारक्या माराव्यात. आजच्या या वास्तवाने मन उद्विग्न होते, पण धीर धरून आहे. पँडोराच्या त्याच पेटीत आणखी एक शक्ती आहे- ‘आशा’. तिच्यावर माझा गाढ विेशास आहे. बघू काय होतं ते. आजचा काळ केवळ भयानक आहे, हे खरं.

(संवादक : संजीवनी खेर)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शांता गोखले,  मुंबई, महाराष्ट्र
shantagokhale@gmail.com

 लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा