डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

समाजकार्य जीवनगौरव । महारोगी सेवा समिती, ‘आनंदवन’

बाबा आमटे यांनी १९४९ मध्ये विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ओसाड व सर्व प्रकारचे दुर्भिक्ष्य असलेल्या प्रदेशात, आदिवासींच्या सहवासात आनंदवन या संस्थेची स्थापना केली. त्या घटनेला २०१९ मध्ये ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ वाटचालीत ‘आनंदवन’ संस्थेने किती प्रकारचे कल्याणकारी काम केले आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. परंतु ते कार्य वरवर दिसणारा एक छोटा भाग आहे. अधिक महत्त्वाचे आहे ते म्हणजे ही संस्था महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील तरुणाईला, कार्यकर्त्यांना ऊर्जास्रोत म्हणून उपयुक्त ठरली. बाबा आमटे हयात होते त्या साठ वर्षांत तर ते स्थान आनंदवनला होतेच, पण ते गेल्यानंतरही ते आकर्षण कायम राहिले आहे.

बाबा आमटे यांची एक कविता आहे-

श्रुंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई

दुख: उधळावयास आता आसवांना वेळ नाही

कोंडलेल्या वादळांच्या या पहा अनिवार लाटा

माणसांसाठी उद्याच्या येथुनी निघतील वाटा

पांगळ्याच्या सोबतीला येऊ दे बलदंड बाहू

निर्मितीची मुक्तगंगा द्या इथे मातीत वाहू

नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते

घाम गाळीत ज्ञान येथे येथूनी उठतील नेते

ह्याचसाठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई

दुख: उधळावयास आता आसवांना वेळ नाही

ही कविता बाबांनी लिहिली असावी १९६० च्या आसपास कधीतरी. आनंदवन मित्रमेळाव्यासाठी. आनंदवन म्हणजे ‘महारोगी सेवा समिती’चं काम झाडाखाली सुरू झालं १९४९ मध्ये आणि त्यानंतरची दहा-बारा वर्षे तर सुरुवातीच्या उभारणीची, अपार कष्टाची. पण बाबांचं वरील काव्य वाचलं तर लक्षात येतं की, केवढा प्रचंड आत्मविेशास घेऊन बाबांनी कामाला सुरुवात केली होती आणि भविष्याचं स्वप्न रंगवलं होतं. आपल्याला काय करायचं आहे ते स्पष्ट ध्येय बाबांसमोर होतं. त्यामुळेच त्यावेळचं हे काव्य म्हणजे केवळ कवीकल्पना न ठरता ते आजचं सत्य ठरलेलं आहे.

आनंदवनच्या कामाकडे पाहताना दोन महत्त्वाच्या बाबी आणि बाजूही आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. एक आहे ती बाबांची आणि दुसरी आहे ती डॉक्टर विकास आमटे यांची. याचं कारण बाबांनी आनंदवन उभं केलं. त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते केवळ महारोगी लोकांची सेवा करणं इतकंच मर्यादित नव्हतं, तर महारोग्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं होतं. केवळ महारोगीच नाही तर समाजातील उपेक्षित अशा सर्वांना. त्यातूनच आनंदवनात जसे संधिनिकेतन, मुक्तिसदन, उत्तरायण यांसारखे प्रयोग उभे राहिले, तसा या देशातील तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन सोमनाथ येथे ‘वर्कर्स युनिव्हर्सिटीचा’ प्रयोग उभा राहिला. यातून सामाजिक जाणिवेचे वैज्ञानिक तयार व्हावेत, हे बाबांचं स्वप्न होतं आणि काही प्रमाणात ते सत्यात उतरलं. इथे सुरू झालेल्या श्रमसंस्कार छावणीतून विविध क्षेत्रांत अनेक तरुण नेते उभे राहिले.

आनंदवनचं काम पाहताना एक लक्षात येतं की, बाबा आमटे यांनी एका झपाटलेल्या ऊर्मीतून काम सुरू केलं, पण त्याच्या मुळाशी पक्का विचार होता. त्यांची पुस्तकं वाचतानाही ते सतत जाणवत राहतं. या पुरस्काराच्या निमित्ताने या सगळ्या प्रवासामागचा विचार मुळातून समजून घेणं आवश्यक आहे.

प्रश्न - विकासभाऊ, आनंदवन संस्थेला हा जो मानाचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपलं अभिनंदन. या पुरस्काराविषयी आपल्या भावना काय आहेत?

- आधी साधनेविषयी- ‘साधना साप्ताहिक’ आणि ‘आनंदवन’ यांचा फार जवळचा संबंध आहे; तो यदुनाथजी थत्ते, ग.प्र.प्रधान असल्यापासूनचा आहे. आनंदवनच्या कामाचं विश्लेषण साधनात सातत्याने प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे या पुरस्काराशी साधनाचा संबंध असणं आणि साधनातून याविषयी लेख छापून येणं या दोन्ही बाबी विशेष महत्त्वाच्या आहेत.

आता पुरस्काराविषयी- गेल्या ७० वर्षांतली आनंदवनची वाटचाल अनेक संकटांनी, आव्हानांनी व्यापलेली असली तरी या वाटचालीचा वेग कधी मंदावला तर नाहीच, उलट तिचा परीघ कायम विस्तारतच राहिला. याचं कारण आनंदवन हा एक ‘सामूहिक आविष्कार’ आहे याबद्दल कमालीची स्पष्टता. त्यामुळेच व्यक्तीला मिळालेल्या पुरस्कारापेक्षा संस्थेला पुरस्कार मिळणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. बाबा आमटे यांनी आनंदवन उभं केलं त्या उभारणीच्या वेळी त्यांचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट होता. तो म्हणजे बहिष्काराचा आणि तिरस्काराचा शाप आजन्म सहन करत जगणाऱ्या कुष्ठरुग्ण बांधवांना त्यांचा आत्मसन्मान परत मिळाला पाहिजे. या भंगलेल्या मनांची पडिक जमीन अद्यापि नांगरली गेलेली नाही, याची बाबांना खात्री होती. बाबांनी याच पडिक जमिनीची मशागत करून त्यात ‘दान माणसाला दीन बनवतं, नादान बनवतं, लाचार बनवतं; श्रम माणसाला घडवतात, नवी अस्मिता जागी करतात’ या विचारांचं बीज रूजवलं. त्यातूनच आनंदवनकडे आणि कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला. आनंदवन ही कुष्ठरोग्यांची वसाहत नाही, तर ते एक कुष्ठमुक्तांनी चालवलेलं उत्पादन केंद्र आहे, याची जाणीव बाहेरच्या जगाला होऊ लागली. संधी मिळाली तर आम्ही हवं ते करून दाखवू शकतो, हा संदेशच कुष्ठरुग्णांनी विविध उद्योगांच्या यशस्वी पायाभरणीतून बाहेरच्या जगाला दिला. आणि हा संदेश फक्त कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनापुरताच मर्यादित आहे, असं मला वाटत नाही; कारण बाबा नेहमीच म्हणायचे, ‘अगर मेरे कुष्ठरोगी कर सकते है, तो कोई भी कर सकता है.’ देशातल्या बेरोजगारीच्या प्रश्नाला कुटुंबाने, समाजाने आणि प्रसंगी कायद्यानेही नाकारलेल्या कुष्ठरुग्णांनी दिलेलं हे सडेतोड उत्तर होतं. रोगामुळे येणाऱ्या शारीरिक विकृतींमुळे समाजातील सर्वोच्च घृणेचे प्रतीक ठरलेल्या कुष्ठरुग्ण बांधवांना न्याय्य, निरोगी व अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी बाबांनी दिली आणि जगासाठी कुष्ठरोग्यांचं दर्शनच सर्वार्थाने बदललं.

प्रश्न - पण बाबांचं एक वैशिष्ट्य मला जाणवतं की ते कुष्ठरोग्यांपुरते राहिले नाहीत...

- बाबा आमटे म्हणजे ‘कुष्ठकार्य’ एवढीच ओळख दुर्दैवाने जनमानसात रूजलेली आहे. प्रत्यक्षात बाबा आमटे ही व्यक्ती नसून ‘प्रवृत्ती’ आहे असं मी म्हणेन; आयुष्यातला प्रत्येक क्षण सत्कारणी लागावा आणि केलेला निर्धार पूर्ण व्हावा, ही अस्वस्थता जपणारी प्रवृत्ती! इथल्या मातीत विविध अभियानं, चळवळी जन्माला आल्या, बाबांमुळे प्रेरित होऊन देशभरात सामाजिक संस्थांचं जाळं निर्माण झालं ते यामुळेच.

आनंदवन हे ‘समृद्धीचं बेट’ बनू नये, आनंदवनातील मानव-विकासाच्या प्रारूपाचा परीघ समाजातील इतर वंचित घटकांपर्यंत विस्तारावा, हा विचार कायमच बाबा आमटेंच्या केंद्रस्थानी होता. त्यामुळे कुष्ठरुग्णांनी स्वतःच्या वेदनांवर विजय तर मिळवलाच; पण अंध, अपंग, कर्णबधिर, अनाथ, बेरोजगार ग्रामीण युवा, अन्यायग्रस्त आदिवासी, अल्पभूधारक शेतकरी अशा इतर वंचित घटकांना कालौघात सोबत घेऊन समर्थ वाटचालही केली. अर्थात, आत्मनिर्भरतेतून जागतिक संदर्भात कुष्ठरोग्यांच्या इतिहासाने एक क्रांतिकारक वळण गाठलं असलं तरी बाबा अस्वस्थ होते. रोगी शरीरात निरोगी मन बाबांना आनंदवनात दिसलं, तसं युवकांच्या निरोगी शरीरात वैफल्याने भरलेलं, रोगी मनही त्यांना दिसत होतं. प्रचलित शिक्षणपद्धतीमुळे समाजजीवनाच्या वास्तवापासून नकळत दूर गेलेल्या रीत्या तरुण मनाला समाजाच्या गाभ्याचा स्पर्श व्हावा, यासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टीने बाबा प्रयत्नशील होते. यातूनच ‘आंतरभारती श्रम-संस्कार छावणी’ यांसारखे अभिनव प्रयोग निबिड अरण्यात वसलेल्या आमच्या सोमनाथ प्रकल्पात प्रत्यक्षात आले.

‘पर्यावरण’ या डिक्शनरीत दडलेल्या संज्ञेला बाबा आमटेंनी बाहेर काढलं आणि ‘न्याय्य वाटप’ या आपल्या ऐतिहासिक स्टँडमधून पर्यावरणाच्या व्यापकतेची ओळख खऱ्या अर्थानं समाजापुढे ठेवली. जो मुक्तीला साहाय्यभूत होतो तो विकास. विकासाची सक्ती कुणावरही होता कामा नये. आपल्याला स्वत:ची सांस्कृतिक ओळख न गमावता विकास साधता आला पाहिजे. आधुनिकता हा काही सर्व प्रश्नांवरचा तोडगा नाही. आपण जे उपाय शोधून काढू, ते आपल्या संस्कृतीशी संलग्न असायला हवेत; आपल्या पारंपरिक आणि पर्यावरण-विषयक गरजांमध्ये चपखल बसले पाहिजेत, या ठाम विचारांतून बाबांनी मानवी जीवनाचा, जैवविविधतेचा आणि नदीवर अवलंबून असणाऱ्या पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या मोठ्या धरणांविरोधात वेळोवेळी भूमिका घेतल्या.

समाजात सलोख्याचं, भाईचाऱ्याचं बीज रूजावं यासाठी युवांना हाताशी घेत ‘भारत जोडो’सारख्या प्रकल्पांना वयाच्या सत्तरीत बाबा भिडले. समाजातले प्रश्न सोडवण्यामध्ये देशातली युवाशक्तीच महत्त्वाची भूमिका बजावेल, याबद्दल आश्वस्त असलेल्या बाबांनी देशातल्या तरुणाईला साद घालत ‘भारत जोडो’च्या झेंड्याखाली एकत्र केले आणि १९८५-८६ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर आणि १९८८-८९ मध्ये ईटानगर (अरुणाचलप्रदेश) ते ओखा (गुजरात) अशा दोन सायकल यात्रा काढल्या. याशिवाय मधल्या कालावधीत बाबांनी ‘पीस बाय पीस मिशन’अंतर्गत अख्खा पंजाब सहा वेळा पिंजून काढत ‘शांती के लिये मानव, मानव के लिये शांती’, हा नारा बुलंद केला.

प्रश्न - मला वाटतं सोमनाथ हा तरुणांच्या आकर्षणाचा सुरुवातीचा केंद्रबिंदू राहिला...

- सुरुवातीला कशाला, आजही तो तसाच आहे. आज पैसे देऊन तरुण सोमनाथ श्रम-संस्कार छावणीला यायला तयार आहेत आणि हे आकर्षण कामाचं आहे. मला असं वाटतं की, अशी कामं सुरू करण्यामागचा विचार अतिशय महत्त्वाचा होता. गेली पाच दशकं ‘हाँथ लागे निर्माण में, नही मारने, नही मांगने’ हा रचनात्मक विचार देणाऱ्या छावणीचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. छावणीचं आकर्षण कमी झालेलं नाही तर उलट ते वाढतच आहे. आणि हे कशामुळे झालं तर लोकांना यातील मूळचा विचार महत्त्वाचा वाटला असेल. मला वाटतं की, एकत्रितपणे काम करण्यासाठी, त्यातून नवं उभं करण्यासाठी लोक इथे येतात. एकत्रितपणे काहीतरी काम करणं यातून स्वतःतल्या श्रमशक्तीला आणि विचारशक्तीला चालना मिळते. यातून एका विचाराचे लोक एकत्र येतील, वैचारिक आदानप्रदान होईल. विचार जास्त महत्त्वाचा आहे, कारण सोमनाथ काय किंवा आनंदवन काय ही केवळ श्रमशक्तीची नाहीत तर विचारशक्तीची प्रतीकं आहेत. बाबा आमटे या झेंड्याखाली जरी सगळेजण एकत्र येत असले तरी त्या पलीकडे जाऊन ते स्वत:ची प्रेरणा मिळवतात. ही प्रेरणा मिळत आहे म्हणून ते येतात. ते केवळ बाबा आमटे या नावामुळे होत नाही. जर यात तरुणांना स्वत:चं काही मिळालं नसतं तर हे शिबीर कधीच बंद पडलं असतं.

प्रश्न - आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे अनेकांनी आनंदवनावर टीका केली की आलेले तरुण इथे कायमस्वरूपी टिकले नाहीत.

- मला तर ही आनंदवनची जमेची बाजू वाटते, कारण जर ते इथेच राहिले असते तर नव्या तरुणांना संधीच मिळाली नसती. आनंदवन हे कोणी कायमस्वरूपी राहावं म्हणून नाहीच. त्यांनी इथे यावं, विचार घ्यावे, स्वत:ची कौशल्यं वाढवावी आणि समाजात परत जावं अशीच अपेक्षा आहे. आनंदवनाची स्टेन्सिल वापरून इतरत्र, स्थानिक परिस्थितीनुसार, उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने प्रयोगांची आखणी व्हायला हवी. हा असा प्रवाह कायम सुरू राहिला पाहिजे; नाहीतर आनंदवनचं काम एकसुरी होत जाईल व बंद पडेल. आनंदवन हे ‘मिडवे होम’ आहे; ते कायमस्वरूपी नाहीये. कायमस्वरूपी आनंदवनमध्ये राहून काम करणं हा आनंदवनचा पराभव आहे; खरं तर दोघांचाही.

प्रश्न - आनंदवनच्या कामाचं एक वैशिष्ट्य सांगता येईल की, तरुण सातत्याने आनंदवनशी जोडले गेलेले आहेत आणि अगदी सोमनाथची श्रमसंस्कार छावणी, त्यानंतरचे भारत जोडो असेल किंवा कार्यकर्ते असतील. तुम्ही दोघे भाऊ तेव्हा तरुण होता...

- मघाशी बाबा आमटे यांच्या कुष्ठरोगाच्या पलीकडे जाणाऱ्या ‘इमेज’चा जो उल्लेख मी केला तो महत्त्वाचा आहे. जे तरुण आनंदवनाच्या सान्निध्यात आले ते आयुष्यातला प्रत्येक क्षण सत्कारणी लागावा आणि केलेला निर्धार पूर्ण व्हावा या विचाराने प्रेरित झाले. अशा तरुणांची किती आणि काय उदाहरणं द्यावी हा प्रश्नच आहे. आम्ही दोघं भाऊ पण याच तरुणांचा भाग की! ‘बाबा आमटे’ नावाची प्रवृत्ती भिनलेली माणसं नेमकी किती? खरं तर, याची मोजदाद आम्ही कधी केली नाही किंवा ती करावी असं कधी वाटलं नाही. नुकतेच गुगल डूडललाही बाबा आमटे महत्त्वाचे वाटले, याचं कारण बाबा आमटेंचा जो विचार आहे तो महत्त्वाचा आहे. बाबांनी लोकांना स्वतःच्या यातनांखेरीज समाजाच्या यातनांनीही असमाधानी बनवले. या असमाधानातून उभी राहिलेली स्वप्नांची प्रभावळ हेच आनंदवनाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल.

प्रश्न - आनंदवनने एक कामाचा नमुना जगासमोर मांडला, यातला एक महत्त्वाचा भाग मला वाटतो तो आहे आर्थिक स्वयंपूर्णतेचा. ती कशी आली?

- आत्मनिर्भरतेतून मिळवलेला आनंद चिरकाल टिकणारा असतो, कारण तो निर्मितीच्या मुक्तगंगेत भिजलेला असतो. मात्र, निर्मितीचे भव्य स्वप्न केवळ स्वप्नरंजनाने साकार होत नाही; ते फुलते रक्त, घाम आणि अश्रू यांच्या त्रिवेणी संगमातूनच, ही बाबा आमटेंची असीम श्रद्धा होती. याच श्रद्धेच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पाहत आनंदवनाचा आत्मनिर्भरतेचा प्रवास सुरू झाला. काळाच्या ओघात कुष्ठरुग्ण बांधवांच्या जोडीला अंध, अपंग, कर्ण-बधीर असे दिव्यांग बांधवही येऊन मिळाले. दोनशे एकरांवर विस्तारलेली आनंदवनातील शेती, जोडीला डेअरी, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन असे शेतीपूरक उद्योग आणि बांधकाम, लोहारकाम, टीनकॅन प्रोजेक्ट, मेटल फॅब्रिकेशन वर्कशॉपच्या माध्यमातून टीनशेड्‌स, लोखंडी कपाटं, पलंग, ट्रायसिकल निर्मिती, अंबरचरखा, मुद्रण, सुतारकाम, केनिंग, हातमाग, यंत्रमाग, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल फिटिंग, सतरंजी, हस्तकला, चर्मकला अशा विविध उद्योग आणि सेवांच्या पायाभरणीचा आधारही श्रम हाच होता. आनंदवनात ४० उद्योग व्यवसायांमधून हजारो वस्तू आणि सेवांची निर्मिती होत असते.

अर्थात, यशाचं मोजमाप करण्याची आनंदवनाची परिमाणंच वेगळी आहेत. शेती आणि इतर उद्योगांतून आनंदवनाला किती कोटींचं वार्षिक उत्पन्न मिळालं, यापेक्षा किती टन तांदूळ, भाजीपाला तयार झाला, किती टन मासे विकले गेले, किती लाख लिटर्स दूध निर्माण झालं, अशी ‘ताकद’ दाखवणारी, ‘तुमची दया नको, समान अवसर द्या’ असं छातीठोकपणे सांगणारी ही परिमाणं. आनंदवनाचं वेगळेपण म्हणजे हे यश कुटुंबाने, समाजाने आणि कायद्यानेही नाकारलेल्या माणसांचं आहे! ही माणसं भारताच्या सकल राष्ट्रीय ‘उत्पन्ना’त वर्षानुवर्षं भर घालत आहेत. एकार्थाने ही आजची ‘सीएसआर ऍक्टिव्हिटी’ आहे. आनंदवन सामाजिक जबाबदारी निभावतं आहे. समाजाने नाकारलेला वा उपेक्षित ठरवलेला वर्ग याच वर्गासाठी जगण्याचे नवे मार्ग उभे करतोय. या प्रकारची इकॉनॉमिक डेव्हलपमेंटही मला वाटतं, जगाच्या इतिहासात पहिल्यांदा झाली असेल. आणि या सगळ्यामागे बाबांचा स्वयंपूर्णतेचा विचार होता, तो महत्त्वाचा आहे. हा विचार काळाच्या वेदीवर रूजायला वेळ लागेल. पण हा विचार जगात रूजणं महत्त्वाचं आहे, कारण हा विचार शास्त्रशुद्ध आहे.

प्रश्न - म्हणजे लोकांच्या हाताला काम मिळालं आणि त्यातून ही आर्थिक स्वयंपूर्णता आली.

- हो निश्चित. संपूर्ण स्वयंपूर्णता असं म्हणता येणार नाही पण आपले प्रश्न आपण सोडवू शकतो हा आत्मविेशास आला. बाबा नेहमीच ‘अहेड ऑफ द क्लॉक’ होते. ते या लोकांना ‘पार्टनर्स ऑफ द सोसायटी’ म्हणत होते. ‘रॅशनल एन रिझनेबल नीड्‌स ऑफ लाइफ’ असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या भागवण्याचा आम्ही प्रयत्न केला.

प्रश्न - तुमच्या बोलण्यातून एक बाब मला सतत जाणवतेय की एका उपेक्षित वर्गाने आपल्यासारख्या

असंख्य लोकांसाठी एक शैक्षणिक मॉडेल उभं केलं...

- ‘ट्रेनीज बिकम ट्रेनर्स’ही बाब आनंदवनमध्ये घडली. बाबा म्हणायचे ‘एज्युकेशन फॉर ॲक्शन इन ॲक्शन’. लोकांना शिक्षण कशाला द्यायचं तर आत्मभान येण्यासाठी, आत्मनिर्भर करण्यासाठी. आपली आजची शैक्षणिक व्यवस्था बघितली तर ती अनिल सद्‌गोपाल म्हणतात त्याप्रमाणे ‘एज्युकेशन सिस्टीम नसून ‘एलिमिनेशन सिस्टीम’ आहे. तिथे ९५ टक्के लोक व्यवस्थेच्या बाहेर फेकले जातात. इथे अपंगत्वावर मात करत जगायचं कसं हे कुष्ठरोग्यांनी, शालेय परीक्षेत नापास झालेल्यांनी जगाला शिकवलं, म्हणून ते ट्रेनर आहेत. इथे लोक येतात, काम पाहतात आणि प्रेरित होतात.

सरकारी अनुदानावर चालणाऱ्या लेप्रसी कॉलनीज बंद पडल्या, कारण अनुदानाविना जगायचं कसं हे प्रश्न सातत्याने निर्माण होत गेले. आनंदवनने त्याच्यावर उत्तर शोधलं ते ‘इकॉनॉमिक टूल’च्या माध्यमातून. त्यामुळे आम्ही प्रश्नांतून मार्ग काढू शकलो. खरं तर याचा अगदी मुळापासून अभ्यास होण्याची गरज आहे.

याचा अर्थ असा नाही की सगळं नीट, सुरळीत चाललं आहे. आम्ही पण खूप भोगलं; भोगतो आहोत. प्रश्न तर रोज नवे आहेत, पण प्रश्न सोडवण्याचे मार्ग आम्ही सातत्याने शोधत राहतो. इथे राहणाऱ्या लोकांना प्रश्न सोडवण्याची दृष्टी आहे. त्यातून हे यश मिळत आहे. उदा.आम्ही सुरुवातीला आनंदवनमध्ये जल-संसाधनांवर जास्त लक्ष केंद्रित केलं. कारण पाण्याभोवती सर्व जग फिरतं. पाणी उपलब्ध झालं आणि त्याच्यावर पुढचं सगळं काम आम्ही करू शकलो.

प्रश्न - आनंदवनमध्ये तरुणांना सोबत घेऊन अनेक प्रकल्प उभे राहिले, त्यातला स्वरानंदवन हा मला

कलशाध्याय वाटतो. त्याची अगदी सुरुवातीची वाटचाल मी पाहिली आहे, आज स्वरानंदवन हा आनंदवनचा ब्रँड अँबेसिडर झालेला आहे...

- ‘स्वरानंदवन’ ही कल्पना मला सुचली तीसुद्धा या सगळ्या लोकांच्या हातात काहीतरी टूल पाहिजे या हेतूने. सहज विचाराने ऑर्केस्ट्रा हे टूल मिळालं. अंगी वेगवेगळ्या कला, हौस आणि उत्साह असलेले अंध, अपंग, कर्ण-बधीर, कुष्ठमुक्त तरुण याच्याशी जोडले गेले. ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून ते शिकत गेले, स्वतःची कला विकसित करत गेले. यातून आता गंमत अशी झाली की एक जण अनेक वाद्य वाजवू शकतो, एकाच वेळी अनेक वाजवू शकतो, एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडू शकतो. जवळपास सातशे आठशे जण आजवर या एका माध्यमातून तयार झाले.

आम्ही यांना ‘लँड आर्मी’ असं म्हणतो. ते लढाई हरले, पण युद्ध जिंकले! यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आहेत. एका नाण्याच्या या दोन बाजू आहेत की, ज्यांना कुणी हात लावू पाहत नाही असा समाज आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी उभं केलेलं काम जे त्याच समाजाचे प्रश्न सोडवतं!

प्रश्न - मला हा एकत्रित प्रयत्नांचा विचार महत्त्वाचा वाटतो. कदाचित तेच आनंदवनचं वैशिट्य मानता येईल.

- नक्कीच. ‘प्रभूचे हजारो अदृश्य हातच सामान्यांतल्या असामान्य जिद्दीद्वारे असे कार्य घडवून आणू शकतात’, असं जेव्हा बाबा आमटे म्हणतात तेव्हा त्यामागे आनंदवनाचा आविष्कार हा कुण्या एकट्या- दुकट्या व्यक्तीचा नसून संघटनशक्तीचा आहे, ही विशुद्ध भावना असते. आनंदवन हे ‘कलेक्टिव्ह आउटपुट’ आहे, ते कुणा एकाचं नाहीये आणि याच प्रकारे ते पुढे चालत राहणार.

गेली सत्तर वर्षे आनंदवनाचं काम सुरू आहे; पण आमचं म्हणणं असं की, आत्ता खरं तर आमच्या कामाला सुरुवात झाली आहे. समाजात विविध प्रश्न आहेत त्यांना अजून आम्हाला भिडायचं आहे. कारागृहांकडून विचारणा होते की ‘आमच्याकडे कुष्ठरोगी आहेत त्यांना आम्ही एका बाजूला ठेवतो, त्यांची काळजी घ्यायला तुमच्याकडचे कुष्ठरोगी पाठवा!’ कुटुंबाकडून, समाजाकडून मानहानी, बहिष्काराचे डंख, हाती जगण्याचे कुठलेही साधन नाही अशा व्यवधानांनी ग्रासल्याने, हातून घडलेल्या चुकांबद्दल ही माणसं जेलमध्ये डांबून पडलेली असतात. मी म्हणतो, त्यांना कारागृहात ठेवण्याऐवजी कृषी-विकासाची पंढरी म्हणून लोकमान्यता पावलेल्या आमच्या सोमनाथ प्रकल्पात पाठवा, तिथे ते शेती शिकतील, त्यांना आत्मविेशास मिळेल, आत्मसन्मान मिळेल, आपण काहीतरी करू शकतो याचा विेशास त्यांना येईल, त्यातून ते बदलतील.

अशीच बाबांची अजून अनेक स्वप्नं अपूर्ण राहिलेली आहेत. असे नवे नवे प्रश्न अंगावर घेत सोडवण्याकडे आनंदवनची वाटचाल सुरू राहील.

(संवादक : प्रसाद मणेरीकर)

Tags: interview mulakhat Prasad manerikar swaranandan maharogi seva samiti baba amte anandvan vikas amte samajkarya jivangaurav Maharashtra foundation awards 2018 Maharashtra foundation purskar 2018 मुलाखत प्रसाद मणेरीकर स्वरानंदवन महारोगी सेवा समिती बाबा आमटे आनंदवन विकास आमटे समाजकार्य जीवनगौरव महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार २०१८ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. विकास आमटे
vikasamte@anandwan.in

सचिव, महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा


प्रतिक्रिया द्या