डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

समाजप्रबोधन पुरस्कार । हरी नरके

विचारकलहात हिरीरीने भाग घेऊन त्याला समाजहिताचे वळण देऊन, महाराष्ट्राची पुरोगामी वाटचाल अधिक दमदार व्हावी यासाठी हरी नरके काम करतात. त्यासाठी ते वर्तमानपत्रे, साप्ताहिके/मासिके व पुस्तके या प्रिंट मीडियाचा वापर तर करतातच. पण फेसबुक, ब्लॉग, टीव्ही चॅनेल्स यांचाही उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. शिवाय विद्यापीठातील अभ्यासवर्ग व चर्चासत्रे, कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे आणि जाहीर सभांतून व्यक्त होण्यासाठी सातत्याने राज्यभर व राज्याबाहेर आणि परदेशातही प्रवास करत असतात. एकाच वेळी क्लास आणि मास यांना अपील होईल अशी त्यांची भाषणे असतात. टीव्ही वरील चर्चेत दोन-तीन मिनिटातही आपला मुद्दा पटवून देण्यात किंवा समोरच्याचा मुद्दा खोडून काढण्यात ते वाकबगार आहेत.

प्रश्न - महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे प्रबोधनकार्यासाठीचा पुरस्कार आपल्याला मिळाला आहे, त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन! प्रबोधनाचं काम करण्यासाठी वाचन, लेखन आणि वक्तृत्वाची बैठक असावी लागते. तुमचा वाचनाचा प्रवास कुठून आणि कधीपासून सुरू झाला?

- माझा जन्म उसतोडणी कामगारांच्या कुटुंबामध्ये झाला. उसतोडणीचं काम मिळेल त्या गावी माझे आई- वडील फिरत असत. त्यामुळे हे भटकं कुटुंब होतं, असं म्हणायला हरकत नाही. पुण्याजवळच्या हडपसरमध्ये ते मजुरीसाठी गेले आणि सलग काम मिळत गेल्याने तिथेच स्थिरावले. अशा कुटुंबात जन्म झाल्यामुळे घरात वाचनाचं वातावरण असण्याची शक्यता नव्हती. वडील माझ्या लहानपणीच वारले होते. आई आणि भाऊ दोघंही निरक्षर होते, पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मला दाखल करण्यात आलं. शाळेत तर जात होतो, पण घराच्या आसपासचं वातावरण मात्र रूढार्थाने वाचनाला पोषक नव्हतं. त्या दिवसांत मी पारशी समाजाच्या कब्रस्तानमध्ये काम करत होतो. तिथल्या संगमरवरी कबरी धुणं, परिसराची झाडलोट करणं आणि झाडांची निगा राखणं असं त्या कामाचं स्वरूप होतं. वाचताना आश्चर्य वाटेल, पण माझ्या वाचनाची सुरुवात तिथून झाली. मला खेळण्यासाठी सवंगडी नव्हते, त्यामुळे कब्रस्तानातल्या त्या स्मशानशांततेत मी वाचत बसत असे.

प्रश्न - सुरुवातीच्या वाचनाचं स्वरूप काय होतं?

- मला आठवतंय त्याप्रमाणे मी सुरुवातीला ‘चांदोबा’चे अंक वाचायचो. विक्रम आणि वेताळाच्या सुरस कथा वाचताना मला मजा येत असणार बहुधा. अर्थात, त्या गोष्टींचा उपयोग मी मात्र अगदी भलत्याच ठिकाणी करायचो. बहुजन समाजातल्या अनेक कुटुंबांप्रमाणे आमच्याही घरी चातुर्मास असायचा. आषाढ ते कार्तिक या काळात तो दर वर्षी केला जायचा. दररोज संध्याकाळी पांडवप्रताप, हरिविजय वा रामविजय अशा पोथ्यांचं वाचन होत असे. ते करण्यासाठी गुरुजी येत असत. पण काही कारणाने गुरुजी आले नाहीत, तर पोथी वाचायला मला बसवलं जाई. ऐकण्यासाठी आमच्या वस्तीतली आसपासची माणसं असत. ही सगळी माणसं कष्टकरी वर्गातली असल्यामुळे दिवसभर मजुरीची कामं करून थकून आलेली असत. माझ्या आयुष्यातला हा पहिला श्रोतृवर्ग कंटाळू नये किंवा झोपू नये, म्हणून मी पोथीमधल्या श्लोकांचे अर्थ सांगताना गोष्टी सांगत असे. या गोष्टी एक तर शाळेत शिक्षकांकडून ऐकलेल्या असत किंवा चांदोबामध्ये वाचलेल्या असत. आपल्या वाचनाचा अशाप्रकारे होत असलेला उपयोग मला त्या वयात आणखी वाचण्यासाठी ऊर्जा देत असणार.

प्रश्न - लहानपणी चांदोबाचं वाचन तर अनेक जण  करतात, म्हणजे त्या काळामध्ये करत असत; पण त्यासोबत वाचन वाढण्यासाठी आणखी कोणते घटक पोषक ठरले?

- घरात पोथी वाचताना गोष्टी सांगायला मिळत. त्याचप्रमाणे वर्गात मॉनिटर असल्यामुळे मुलांना शांत ठेवण्यासाठी गोष्टी सांगायची संधी मिळत असे. मग चांदोबाबरोबरच पंचतंत्र, इसापनीती आणि गोष्टींच्या अनेक पुस्तकांचं वाचन होत असे. काही योगायोग आयुष्याला वळण देत असतात. माझ्या शालेय वयात जुळून आलेल्या एका योगामुळे माझ्या पुढच्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला, असं वाटतं. आमच्या शाळेच्या शेजारी राष्ट्र सेवादलाची शाखा भरत असे. तिथे माझी भेट डॉ.बाबा आढाव, डॉ.अनिल अवचट या मंडळींशी झाली. नाथमाधव किंवा हरी नारायण आपट्यांच्या पुस्तकांत मी रमलेला असताना, नकळतपणे सामाजिक विषयांवरच्या वाचनाकडे ओढला गेलो. परिणामी, घरात डॉ.आंबेडकरांचा फोटो लावण्यासाठी मी मारही खाल्लेला आहे. (मध्यम जातींमधल्या कुटुंबांमध्ये आजही बाबासाहेबांचा फोटो लावला जात नाही, हे प्रखर वास्तव म्हणून स्वीकारलं पाहिजे.) या काळात खूप नाही, पण काही प्रमाणात का होईना मी फुले-आंबेडकर आणि इतर परिवर्तनवादी साहित्य वाचू लागलो होतो. त्याच वेळेला पु.ल. देशपांडे, गो.नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून ते जयवंत दळवी आणि जी.ए. कुलकर्णी यांच्या पुस्तकांचं वाचनही जोमानं चालू होतं. वाचनाच्या या टप्प्यावर माझी भेट ज्येष्ठ विचारवंत गं.बा. सरदार यांच्याशी झाली. ती भेट मौल्यवान ठरली. माझ्या वाचनाच्या आणि विचार करण्याच्या प्रवासाचे ते मार्गदर्शक बनले. ललित आणि वैचारिक वाचनाचा समतोल साधायला त्यांनी मला शिकवलं.

प्रश्न - वाचनाचा उपयोग सामाजिक भान वाढवण्यासाठी कशा प्रकारे झाला?

- हडपसरच्या आमच्या जिल्हा परिषद शाळेनंतर मी पुढे पुणे विद्यार्थी गृहात आलो. तिथे आल्यावर तर एकदम वीस हजार पुस्तकांचं ग्रंथालय माझ्यासाठी खुलं झालं. तिथल्या वाचनात साने गुरुजी आणि विनोबा भावे अधिक भावले. ते दोघं जे अत्यंत सोपं, प्रवाही आणि रसाळ मराठी लिहितात त्याच्या प्रेमात तर मी आजही आहे. पण तिथे मराठीच्या बरोबरीनं थोडं हिंदीही वाचायला लागलो. त्याच ग्रंथालयात मी प्रेमचंदांची सगळी पुस्तकं वाचली. हे चालू असतानाच सेवादलामुळे माझी अनेक नव्या विषयांची, पुस्तकांची आणि कार्यकर्त्यांची ओळख होत होती. मी नववीत असतानाची गोष्ट आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, यासाठी आंदोलन सुरू झालं होतं. कार्यकर्त्यांमध्ये वावरत असल्यामुळे मी मुंबईत झालेल्या सत्याग्रहामध्ये सहभागी झालो. पोलिसांनी सर्वांनाच अटक केली आणि पुढचे तीन आठवडे मलाही तुरुंगवास घडला. ते तीन आठवडे म्हणजे माझ्या माणूस म्हणून घडणीचा महत्त्वाचा काळ ठरला. त्या काळात कॉ.शरद पाटील, रावसाहेब कसबे, बाबूराव बागुल, ग.प्र. प्रधान यांच्यापासून डॉ.कुमार सप्तर्षी आणि अनिल अवचटांपर्यंत अनेकांचा सहवास लाभला. दिवसाचे चोवीस तास आम्ही एकत्रच होतो. या सगळ्यांच्या चर्चा, वादविवाद आणि गप्पा ऐकता आल्या. सामाजिक क्षेत्राचा दिंडी दरवाजा माझ्यासाठी तुरुंगानं खुला झाला.

प्रश्न - सतत वाचतं राहण्यासाठी आणखी कोणाची प्रेरणा मिळाली?

- तशी अनेक नावं सांगता येतील. पण पु.ल. देशपांडे यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. मी नववी-दहावीत असताना पुलंच्या एका वाढदिवसाला त्यांना एक पुस्तक भेट द्यायला गेलो. त्यांनी माझी चौकशी केली आणि वाचनाची आवड पाहून कौतुकही केलं. त्यानंतर ते मला नवनवी पुस्तकं वाचायला द्यायला लागले. यात पुलंसारखा एवढा मोठा लेखक आपल्या वाचनाचं कौतुक करतो याचा त्या वयाला साजेसा आनंद होता. त्या आनंदाचं रूपांतर सकारात्मक ऊर्जेत होऊन माझं वाचन आणखी वाढलं. परिचय वाढल्यानंतर तर पु.ल. नव्याने प्रकाशित झालेली पुस्तकं आवर्जून मला वाचायला देऊ लागले. त्यामुळे रामनगरी, उपरा किंवा बलुतं यांसारखी पुस्तकं अगदी ताजी आणि चर्चेत असताना माझ्या वाचनात आली. त्यामुळे मला दलितांचे, भटक्यांचे आणि अलुतेदार-बलुतेदारांचे प्रश्न, त्यांचं जगणं आणि भावविश्व समजायला खूपच उपयोग झाला.

प्रश्न - प्रबोधनाच्या प्रवासामध्ये वाचनाइतकाच भाषणांचाही सहभाग आहे. तुम्ही महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही हजारो भाषणं दिलीत. भाषणांची सुरुवात कशी झाली?

- मी चौथीत असल्यापासून भाषणं करायला सुरुवात केली. निमित्त अर्थातच शाळेतल्या आणि आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांचं होतं. पुढे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये तर मी भरपूरच सहभाग घेतला. आणि खूप बक्षिसं मिळवली. पण त्या काळी स्पर्धेतली भाषणं, टाळ्या, कौतुक आणि बक्षिसं हे सगळं फारच भारी वाटायचं. बक्षिसं मिळवण्याची नशा पण काही काळ माझ्यावर स्वार होती. मात्र बक्षिसांच्या अलीकडचं आणि पलीकडचं मी जे मिळवत होतो, ते जास्त मोलाचं होतं.

बक्षिसांच्या अलीकडचं म्हणजे स्पर्धेच्या भाषणांची तयारी करत असताना मला वैचारिक शिस्त खूप लागली. भाषणाची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन घ्यायला मी एकदा गं.बा. सरदार यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे मुद्दे मागितले. पण आयते मुद्दे द्यायला त्यांनी नकार दिला. मला वाचायला आणि विचार करायला उद्युक्त करणं हा त्यामागचा हेतू होता. मग मी त्या अनुषंगानं वाचलं. विचार केला आणि काही मुद्दे घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यावर आधारित त्यांच्यासमोर पंधरा मिनिटं बोललो. त्यावर ते पंधरा मिनिटं बोलले. त्यातून मी स्पर्धेच्या भाषणाची तयारी केली. या प्रक्रियेनंतर अर्थातच मला पहिलं बक्षीस मिळालं. त्यानंतर ती पद्धतच पडून गेली. प्रत्येक स्पर्धेच्या आधी आम्ही तसं करायचो. बक्षिसांच्या अलीकडे मला खूप काही मिळालं असं म्हटलं, ते या अर्थानं.

बक्षिसांच्या पलीकडचं म्हणजे या स्पर्धांच्या निमित्तानं मला खूप मित्र मिळाले. आपले समवयस्क काय वाचतात, कसा विचार करतात आणि इतर कोणकोणत्या उपक्रमांत भाग घेतात, हे कळत गेलं. कधी त्या गोष्टींचं कौतुक वाटलं, कधी काही बाबी अनुकरणीय वाटल्या तर कधी मतभेदही झाले. शिवाय स्पर्धांच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये मी प्रथमच गेलो. वेगवेगळ्या संदर्भात त्या गावांविषयी पुस्तकांमध्ये वाचलेलं होतं; ती गावं प्रत्यक्षात बघण्याची, तिथल्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली. तो सगळा अनुभव समृद्ध करणारा होता.

भाषणांची तयारी करताना शैलीवरही काम करायचो. माझ्या भाषणांवर कोणाचा प्रभाव आहे असा प्रश्न जर कोणी विचारला, तर अगदी अनपेक्षित नाव सांगावे लागेल. माझी आई आणि भाऊ कामाचा भाग म्हणून म्हशीचं दूध काढायचे. ते दूध कोरेगाव पार्कमध्ये आचार्य रजनीशांच्या आश्रमात पोचवण्याचं काम माझ्याकडे होतं. तिथे दूध दिल्यानंतर रजनीशांची भाषणं ऐकायला मी थांबत होतो. त्यांची विषयाची मांडणी, त्यात दिलेले संदर्भ, भाषाशैली, उदाहरणं आणि त्या सगळ्यांचा श्रोत्यांवर होणारा परिणाम हे फार विलक्षण होतं. त्यांचं भाषण चालू असताना एक प्रकारचं भारावलेपण सगळ्या वातावरणात भरलेलं असायचं. मी वयानं लहान असल्यानं कदाचित, मला ते अधिक जाणवत असेल. पण मी रजनीशांची दोनशे तरी भाषणं ऐकली. रजनीशांप्रमाणेच नरहर कुरुंदकर यांचाही प्रभाव माझ्या भाषणांवर होता. त्यांच्या भाषणांना अकादमिक शिस्त होती. शिवाय विरोधकांच्या विचारांचा प्रतिवाद करण्याची त्यांची अशी सभ्यता होती. ‘विरोधकांचे विचार मला मुळीच मान्य नाहीत’ असं म्हणायच्याऐवजी ते म्हणायचे, ‘विरोधकांचं मत मी शांतपणे ऐकलेलं आहे. ते मला समजलेलंही आहे. त्यांच्या म्हणण्याशी सहमत व्हायलाही मला आवडलं असतं. पण नाइलाज आहे. माझ्यासमोरचे पुरावे मला तसं करू देत नाहीत.’ तर वक्ता म्हणून घडण्याच्या काळात कुरुंदकरांच्या भाषणांनी आणि अर्थातच पुस्तकांनीसुद्धा माझ्या विचारांना निश्चित अशी दिशा दिली. माझ्या भाषणांवर प्रभाव असणारं आणखी एक नाव पुलंचंच आहे. ते संपूर्ण शरीरानं बोलायचे. त्यांच्या शब्दांआधी त्यांचे डोळे श्रोत्यांशी संवाद साधायचे. भाषण हे एक सादरीकरण असतं, याचं भान मला पुलंमुळे आलं. त्यामुळे वैचारिक भाषण करतानाही ते प्रेक्षकांना कंटाळवाणं होता कामा नये, ही जाणीव सतत मनात तेवत राहिली.

प्रश्न - त्यानंतरची वाटचाल कशी होती?

- त्यानंतरच्या काळातही भाषणं चालू राहिलीच, पण त्याला एक वेगळं परिमाण लाभलं. १९८९ मध्ये बाळ गांगल नावाच्या गृहस्थांनी महात्मा फुले यांची बदनामी होईल अशी मांडणी केली. त्यामुळे राज्यात बराच गदारोळ झाला. तोपर्यंत माझं फुले वाङ्‌मय वाचून झालेलं असल्यामुळे मीही एक लेख लिहिला. तो लेख वाचल्यानंतर पुलंनी मला बोलावून घेतलं. केवळ लेखावर न थांबता यावर पुस्तक लिहिण्याची सूचना केली. मी भरपूर तयारी केली आणि गांगलांच्या म्हणण्याचा प्रतिवाद करणारं ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ हे पुस्तक लिहिलं. ते सुगावा प्रकाशनाचे विलास वाघ यांनी प्रकाशित केलं. चंद्रपूरला एका कार्यक्रमात पुलंच्याच हस्ते त्याचं विमोचन झालं. त्यानंतर फुल्यांचं स्मृतिशताब्दी वर्ष सुरू होत होतं. त्या पार्श्वभूमीवर मला वेगवेगळ्या भागांमधून भाषणांची निमंत्रणं येऊ लागली. पुस्तकाच्या निमित्तानं अभ्यास झाला होता. स्पर्धांच्या निमित्तानं भाषणकलेचा सराव झाला होता. त्यामुळे लोकांना माझी भाषणं आवडू लागली आणि निमंत्रणं वाढू लागली. फुले साहित्य या एकाच विषयावर मी पाचशे भाषणं दिली. पण याकडे मी केवळ भाषण म्हणून पाहिलं नाही. गांगल यांच्याप्रमाणेच इतर कोणाच्या मनात फुल्यांविषयी गैरसमज असतील तर ते दूर करावेत आणि लोकांना माहिती नसलेले फुले-विचाराचे पैलू प्रसारित करावेत, या हेतूने मी बोलत गेलो. त्यानंतर आजवर मी दिलेल्या भाषणांचा आकडा मध्यंतरी मोजला, तर तो तब्बल अकरा हजारांच्या घरात आहे. तो आकडा पाहिल्यानंतर मला गोविंदराव तळवलकरांची आठवण झाली. भाषणं करण्याच्या ते विरोधात होते. भाषणांमध्ये ऊर्जा खर्च झाली की लेखन होत नाही, असं त्यांचं मत होतं. आज इतक्या वर्षांनी त्यांच्या बोलण्यामधलं तथ्य माझ्या लक्षात येतं आहे. मी सतत भाषणांमध्ये व्यग्र असल्यामुळे माझ्या हातून जेवढं लेखन (आणि संशोधन) एरवी होऊ शकलं असतं, तेवढं झालेलं नाही. पण याला दुसरी बाजूही आहे. आपल्या देशाची आजवरची परंपरा मौखिक आहे. आणि काही निवडक शहरं सोडली, तर उर्वरित महाराष्ट्रात पुस्तकं पोचतच नाहीत. शिवाय जिथे पोचतात तिथेही ती पुरेशा प्रमाणात वाचली जात नाहीत. सर्वदूर पुस्तकं वाचली गेली पाहिजेत, ही भूमिका मान्यच आहे, पण तसं घडत नाही, तोवर आपण वाट बघू शकत नाही. निश्चित विचार पोचवणारी परिणामकारक भाषणं करत राहणं, हाच त्यावरचा उपाय आहे.

प्रश्न - भाषणं करताना अप्रिय बोलण्याचे प्रसंग कधी आले का? कोणते?

- “Worshipping False Gods” या नावाने अरुण शौरी यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होईल असा मजकूर त्यात होता. त्या वेळेला मी राज्यभरात मिळून पाचशेपेक्षा जास्त भाषणं केली. अरुण शौरी यांनी दिलेले चुकीचे संदर्भ आणि बाबासाहेबांच्या बोलण्याचा त्यांनी केलेला विपर्यास या दोन बाबींचा समाचार या भाषणांमधून मी घेतला. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या विचारांची आणि कार्याची सविस्तर मांडणीही केली. या भाषणांना मिळालेला प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा होता. एका वर्गाला ते खूपच आवडत होतं, पण नाराज होणारे श्रोतेही भेटत होते. त्यानंतरच्या काळात सनातनी संस्थांचे कारनामे वाढत गेल्यावर त्यांचा पर्दाफाश करणारी भाषणं मी केली. त्यातल्या काही भाषणांच्या वेळी निदर्शनं केली गेली. ‘हरी नरके यांच्या भाषणांवर बंदी आणावी’ अशीही मागणी केली गेली. मध्यंतरी भारताच्या राज्यघटनेचं पुनरावलोकन करण्याचा घाट काही शक्तींनी घातला होता. त्यावर मी खेड्यापाड्यांत जाऊन पाचशेपेक्षा जास्त भाषणं दिली. राज्यघटना म्हणजे काय, ती लिहिताना घटनाकारांच्या मनात काय होतं, त्याचं स्वरूप कसं आहे आणि नेमका खोडसाळपणा कुठे चालू आहे- या सगळ्याविषयी मी बोलत असे. त्यानंतर राजर्षी शाहूमहाराजांची जयंती हा उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतला. तेव्हा लक्षात आलं की, पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्याच्या इतर भागांत शाहूमहाराजांविषयी फारशी माहिती नव्हती. म्हणून मग शाहूंचं योगदान आणि त्याची सामाजिक फलश्रुती अशा आशयाची पाचशे भाषणं मी दिली.

प्रश्न - ही भाषणं देताना काय शिकायला मिळालं?

- एका शब्दात उत्तर द्यायचं तर- लवचिकता. सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत संघर्ष तर होणारच. जोपर्यंत

आपण खोलीत बसून लेखन करतो तोपर्यंत त्याचं स्वरूप वेगळं असतं. पण प्रत्यक्ष लोकांमध्ये गेल्यावर मात्र तो जमिनीवरचा सामना बनतो. तिथे खूप ताठर राहून चालत नाही. विरोधकांच्या मांडणीमधली शेरेबाजी, शिवराळपणा आणि आक्रस्ताळेपणा बाजूला सारून त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे का, हे शोधता आलं पाहिजे. त्या मुद्द्याचा तर्कसंगत मुकाबला करता आला पाहिजे. योग्य मुद्दा असेल, तर तो मान्यही केला पाहिजे. मुख्य म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वात खुलेपणा असला पाहिजे, हे या काळात मी शिकलो. अन्यथा, विरोधकांप्रमाणेच आपणही वागण्याचा धोका असतो. मात्र भाषणं करायची असतील, तर प्रत्येक विषयावर भूमिका घेता आली पाहिजे. कोणतीच भूमिका न घेण्याचे काही फायदे असतात. कोणाशीच भांडण होत नाही, लोकप्रियता मिळते. पण ज्या समाजासाठी आपण काम करतो, त्यासाठी ते हिताचं नसतं. भूमिका घेणं आणि ती संयतपणे मांडणं, हेही मला भाषणांनीच शिकवलं.

प्रश्न - संस्थात्मक कामाची सुरुवात कशी झाली?

- दहावीनंतर मी प्रशिक्षणार्थी कामगार म्हणून टेल्को (आताची टाटा मोटर्स) मध्ये दाखल झालो होतो. तिथे आठ तासांची नोकरी करून एम.ए. पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासही खूप रस घेऊन केल्यामुळे मला बी.ए. आणि एम.ए.ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुवर्णपदक मिळालं. पुढे १९९० ला फुले शताब्दी वर्षाचे कार्यक्रम चालू असताना राज्य शासनाने अनेक उपक्रमांची आखणी केली. त्या वेळी मुख्यमंत्री शरद पवार यांनी टाटांशी बोलून मला प्रतिनियुक्तीवर मंत्रालयात काम करण्याची संधी दिली. तिथून माझ्या शासनासोबतच्या आणि पर्यायाने संस्थात्मक कामाला सुरुवात झाली. तिथे गेल्यावर लक्षात आलं की, महात्मा फुल्यांचं समग्र साहित्य अत्यंत वाजवी दरात लोकांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मग लक्षात आलं की, त्यांचे विचार महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलेच नाहीत. त्यासाठी स्वतंत्र तरतूद करून आणि यंत्रणा उभी करून इंग्रजीसह तेरा भाषांमध्ये ते साहित्य उपलब्ध करण्याच्या कामात मला सहभागी होता आलं. हे चालू असतानाच लक्षात आलं, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं लेखन आणि भाषणांच्या खंडांचं काम सतराव्या खंडापर्यंत होऊन काही कारणांनी थांबलं होतं. मग ती जबाबदारी मी घेतली आणि बाविसाव्या खंडापर्यंतचं संपादनाचं काम पूर्ण केलं. त्यानंतरच्या काळात शासनाच्या पंचवीसहून अधिक महामंडळांवर काम करता आलं. ज्या इतर संस्थांमध्ये काम केलं; त्यात महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य महामंडळ, अभिजात भाषा मराठी समिती आणि भांडारकर प्राच्यविद्या इत्यादी संस्थांचा सहभाग आहे. येथील कामांमुळे मला लेखनाचं आणि संपादनाचं काम करता आलं. त्यासाठी य.दि. फडके आणि रा.चिं. ढेरे या ज्येष्ठ संशोधकांसोबत काम करता आलं आणि खूप काही शिकता आलं. या दोघांचाही मी अत्यंत ऋणी आहे.

प्रश्न - इतकी वर्षं काम केल्यानंतर सध्याच्या समाजाकडे बघताना काय वाटतं?

- मी असमाधानी आहे, निश्चित अशा ध्येयानं आणि उत्साहानं मी तीस-पस्तीस वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली आणि स्वत:शी प्रामाणिक राहून सातत्यानं काम करत राहिलो. पण आज समाजाकडे बघताना मन विषण्ण होतं. सगळ्या पुरोगामी चळवळी क्षीण किंवा विस्कळीत झालेल्या आहेत. ज्या प्रतिगामी शक्तींच्या विरोधात यथामती आणि यथाशक्ती लढा दिला, त्यांची ताकद वाढताना दिसते आहे. महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकरांच्या विचारातून उभ्या राहिलेल्या चळवळींमुळे शिक्षणाचा प्रसार झाला. त्यातून बहुजन समाजामध्ये मध्यमवर्ग तयार झाला. पण आज त्या नवमध्यमवर्गाचं वर्तन संतापजनक आहे. फुल्यांची आणि बाबासाहेबांची अशी धारणा होती की- या समाजाला शिक्षण मिळालं की, त्याच्या ज्ञानप्रेरणा जागृत होतील. तो समाज विविध विषयांच्या अभ्यासामध्ये, अभिजात कलांमध्ये आणि जीवन समृद्ध करणाऱ्या गोष्टींमध्ये रस घेईल. पण शिकून, नोकरी करून स्वावलंबी झालेला हा वर्ग मात्र तसं करताना दिसत नाही.

प्रश्न - पुढच्या वीस-पंचवीस वर्षांचं आपल्या समाजाचं भवितव्य कसं दिसतं आहे?

- मला असं वाटतं की, सकारात्मक पद्धतीनं सामाजिक बदल करण्याची क्षमता कोणत्याही धर्मामध्ये  किंवा विचारसरणीमध्ये उरलेली नाही. त्यातल्या त्यात आशा असेल तर ती आता कलेकडूनच आहे. त्यामध्ये साहित्य, नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन असे सगळेच आले. त्या दृष्टीनं नागराज मंजुळे, जयंत पवार किंवा आसाराम लोमटे ही मंडळी मला खूप महत्त्वाची वाटतात.

प्रश्न - महाराष्ट्र फाउंडेशननं हा प्रबोधनाचा पुरस्कार आपल्याला दिला आहे. त्यादृष्टीनं पुढच्या कामाची दिशा काय दिसते आहे?

- मी सध्या जे काम करतो आहे, ते तर चालूच राहणार आहे. पण त्याशिवाय प्रबोधनकार्यासाठी चांगल्या वक्त्यांची, लेखकांची आणि संशोधकांची गरज लागणार आहे. त्यासाठी नव्या पिढीमधून वक्ते, लेखक आणि संशोधकांची फळी उभी करायला आवडेल. समाजाची साथ मिळाली, तर त्यासाठी एखादी संस्थाही उभी करता येईल. त्यातून काही तरी आश्वासक निर्माण होईल, असं वाटत आहे.

(संवादक : आनंद अवधानी)

Tags: anand avadhani mulakhat interview hari narke samaj prabodhan purskar Maharashtra foundation awards 2018 Maharashtra foundation purskar 2018 आनंद अवधानी मुलाखत मराठी भाषण हरी नरके समाजप्रबोधन पुरस्कार महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार २०१८ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हरी नरके
harinarke@gmail.com

मराठी लेखक, संशोधक, वक्ते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक,  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा