डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

‘आनंदी गोपाळ’ सिनेमाचे दिग्दर्शन करताना

प्रेक्षकांनी पाठवलेल्या प्रतिक्रिया खूप आहेत. आलेले फोन, मेसेज एक-दोन वाक्यांचे आहेत, पण फेसबुक-टि्वटरवर लोकांनी पानपानभर लिहून प्रतिक्रिया कळवल्या आहेत. मला सांगायला आनंद वाटतोय की, यातील 80 टक्के प्रतिक्रिया मुलींच्या तर 20 टक्के प्रतिक्रिया मुलांच्या आहेत. या मुलांनी सांगितलंय की, ‘आम्हाला गोपाळराव व्हायला आवडेल.’ काही मुलींनी असं कळवलंय की, ‘आम्हाला खूप अनुकूलता आहे, खूप साधनं (रिसोर्सेस) आहेत, तरीही आम्ही तक्रार करतोय, असं हा सिनेमा पाहून वाटलं.’ काही पुरुषांनी, हा सिनेमा पाहून अपराधीपणाची (गिल्ट) भावना त्यांच्या मनात आल्याचं सांगितलं. मला वाटतं हा ‘आनंदी गोपाळ’चा विजय आहे. आम्ही घेतलेल्या सिनेमॅटिक लिबर्टीमुळे सिनेमा पाहणाऱ्यांच्या मनात काही वेगळं चित्रं निर्माण झालं असतं, तर ते या सिनेमाचं अपयश मानता आलं असतं.

प्रश्न- ‘आनंदी गोपाळ’ हा मराठी सिनेमा बनवण्याचा विचार तुमच्या मनात कसा आला?
- ‘आनंदी गोपाळ’ सिनेमा करू या, हा विचार प्रथम आमच्या निर्मात्यांच्या डोक्यात आला. रमा पिक्चर्स, झी स्टुडिओ, फ्रेशलाइन फिल्म्‌स. हा सिनेमा करण शर्मा यांनी हिंदीत लिहिला होता. माझी ‘डबल सीट’ ही फिल्म निर्मात्यांनी पाहिली होती, त्यामुळे त्यांनी मला बोलावलं आणि ‘या विषयावर सिनेमा करायला आवडेल का?’ असं विचारलं. त्याआधी मी आनंदीबाईविषयी लहानपणी वाचलं होतं, पण त्यावर सिनेमा करावा असं मला कधी वाटलं नव्हतं. निर्मात्यांकडून प्रस्ताव आला तेव्हा मी ते ऐकून घेतलं. 

तर मला गंमत अशी वाटली की, त्यांनी या विषयाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलंय. पटकथा लिहिणारा तो लेखक मराठी नाहीये. आपलं या विषयाशी असलेलं नातं एक मराठी माणूस असं असतं. शिवाय ती संस्कृती, सामाजिक रचना, सोशल इंजिनिअरिंग हे आपल्याला माहीत असतं. हे सर्व त्या लेखकाला माहीत नव्हतं. त्यामुळे त्याने या विषयाकडे कथा म्हणून पाहिलं, अर्थात खूप महत्त्वाची कथा. ती पटकथा वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की, हा ॲप्रोच आपल्याला इतक्या सहजासहजी नसता आला. कारण आपण आनंदीबाई व गोपाळराव यांच्याकडे पाहताना ते दोघे किती मोठे होते, हा विचार करत असतो. त्या नवरा- बायकोमध्ये काही तरी घडलं असेल, हे आपल्याला पटकन कळत नाही किंवा पकडता येत नाही. ते त्याने पकडलं होतं, हे मला खूपच आवडलं. 

पण माझ्या लक्षात असंही आलं की, ‘पटकथा हिंदीत आहे, आपल्याला मराठी सिनेमा करायचा तर यात योग्य ते बदल करावे लागतील. शिवाय या पटकथेत न घडलेल्या काही गोष्टी आहेत, त्या जरा कमी कराव्या लागतील. मग ते बदल करण्यासाठी मी इरावती कर्णिकला ऑन बोर्ड घेतलं आणि तिने ती पटकथा मराठीत अनेक बदलांसह आणली. तिने संवादही लिहिले. पटकथा तगडी होत नाही तोपर्यंत पुढे जायला नको, असा आमचा विचार होता. शिवाय, आपण असा बायोपिक बनवतोय, ज्या विषयावर अद्याप बनलेला नाही, हे भान असल्याने दहा वेळा क्रॉसचेक केलं पाहिजे असं वाटत होतं. आणि मग आपण एक कथा सांगत आहोत, चित्रपट करत आहोत, हेही लक्षात ठेवायचं होतं. म्हणजे आम्हाला आनंदीबाईंच्या आयुष्यावर डॉक्युमेंटरी किंवा डॉक्युड्रामा बनवायचा नव्हता, तर लोकांपर्यंत ती कथा पोचवायची होती. त्यामुळे त्यांच्या ज्या आयुष्याच्या नोंदी नाहीत, तेथील वेगवेगळ्या बाजू तपासून घ्यायच्या होत्या. म्हणून आम्ही एक वर्ष घेतलं.
 
प्रश्न- सुरुवात कधी केली? या विषयावर रिसर्च करण्याची प्रक्रिया कशी होती?
- ऑक्टोबर 2016 मध्ये सुरुवात केली. मग श्री.ज.जोशी यांची ‘आनंदी गोपाळ’ ही कादंबरी, अंजली कीर्तने यांनी लिहिलेलं ‘डॉ.आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व’ हे चरित्र, काशिबाई कानेटकरांनी लिहिलेलं आनंदीबाईंचं चरित्र आणि इंटरनेटवर असलेलं इतर लेखन वाचलं. पण मूळ लेखकाची पटकथा आम्ही मध्यवर्ती ठेवली होती. कारण कादंबरीत काय घडलंय व प्रत्यक्षात काय घडलं होतं, यात आम्ही अडकून पडलो तर काहीतरी एक हरवून बसणार होतं. मात्र सिनेमॅटिक लिबर्टी घेत असताना त्या दोन पात्रांच्या बाबतीत विचित्र असं काही निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेतली. काल्पनिक असं जे काही घातलं ते सांगायचं, पण त्यांच्याविषयी जे काही माहीत होतं त्यापलीकडे काही तरी वाटतंय  असं सिनेमा संपल्यावर प्रेक्षकांना वाटलं पाहिजे अशी आमची भूमिका होती. 

मला आश्चर्य वाटतं, आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो, पण आजही कित्येक कुटुंबांमध्ये महिलांना स्वातंत्र्य नसतंच. त्या नोकरी करतात, पण बाहेर कुठे जायचं ठरलं तर त्यांना नवऱ्याची परवानगी घ्यावी लागते. अगदी सर्वत्र हे दिसतं, माझ्या नात्यातही. काही ठिकाणी स्त्रिया तक्रारी करतात, अनेक ठिकाणे नाही करत. तर गोपाळराव या माणसाने आनंदीबाईला मारलं, छळलं. पण तिने ठरवलं होतं, ‘मला डॉक्टर व्हायचंय.’ त्यामुळे मला प्रश्न पडला, ‘त्याने आधी जे काही केलं ते गरजेचं होतं का? काही बदल करायचे असतील, तर टोकाची भूमिका घ्यावी लागते. तसं काही गोपाळरावांनी केलं होतं का?’ तर हे नातं सिनेमात आणायला पाहिजे असं वाटलं आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची भर आम्ही घातली. 

गोपाळरावांचं पात्रं समोर ठेवून त्यांचं विक्षिप्तपण दाखवता येईल, त्यांचा काळ दाखवता येईल, त्यांचं पुढारलेपण दाखवता येईल अशा प्रकारची भर घातली. त्यातून त्यांच्यातील माणूसपण दाखवता येईल असंही वाटलं. कारण त्यांनी एका पत्रात लिहिलंय, ‘‘तुम्ही गेल्यानंतर एकही दिवस असा गेला नाही की, मी रडलो नाही.’’ गोपाळरावांची ‘विक्षिप्त’ ही एकच प्रतिमा आहे, पण दुसरी बाजू माहीत नाही किंवा कमी असल्याने दुर्लक्षित केली जाते, तीसुद्धा बाहेर येणं महत्त्वाचं वाटत होतं. शिवाय, त्यांना फक्त तिला शिकवायचं होतं आणि डॉक्टर बनण्याचा निर्णय तिचा होता हेही मला दाखवायचं होतं. हे अँगल मी जे काही वाचलं त्यात कथास्वरूपात जाणवले नाहीत, म्हणून आम्ही त्यांची जोड दिली. 
या टप्प्यापर्यंत येण्यासाठी आम्ही खूप फिल्मस्‌ पाहिल्या. त्यातही ‘गांधी’ फिल्म अशी आहे की, ती केवळ त्यांच्या राजकारणाविषयी बोलत नाही, तर त्यांच्या माणूसपणाविषयही बोलते. वेषभूषा, रंगभूषा, तो काळ यासाठी आम्ही आनंदी गोपाळ यांच्या काळातलं लेखन वाचलं. त्या काळात त्यांच्या घरी काय असेल? बंब असेल का, तो तांब्याचा असेल का? स्टील असणे शक्य नाही. वेषभूषेचंही असंच. त्यावेळी रंग असणारच, पण आजच्यासारखे नसणार. मग गोपाळराव इंग्रजांच्या जवळ होते, पोस्टात होते तर कोट वापरत असतील, धोतर वापरत असतील... असं स्वातंत्र्य आम्ही घेतलं. (गोपाळरावांचा एकच ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो आहे आणि तोही अस्पष्ट आहे. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर त्यांना मांडीवर घेतलंय असे बारीक झालेले गोपाळराव, असा तो फोटो आहे.) 

नंतर आम्ही रिसर्च केला लाईट्‌सचा. 1890 मध्ये कलकत्त्यात वीज आली आणि आपली कथा तर 1875 पासूनची आहे. म्हणजे तेव्हा कंदिल असतील, पणत्या असतील, दिवे असतील. त्यासाठी आम्ही जुनी पेंटिंग्ज पाहिली. त्यात लाईट कसा दाखवलाय, साधनं कोणती दाखवलीत याचा विचार केला. त्यामुळे सिनेमातील रात्रीचे प्रसंग आम्ही समया व कंदील यांच्या आधारे चित्रीत केलेत.

प्रश्न- या सिनेमासाठी अभिनेता, अभिनेत्री कसे निवडले गेले? शूटिंगची ठिकाणं निवडताना काय निकष लावले? शूटिंग कुठे, कधी, कसं झालं? 
- पटकथा वाचली तेव्हाच माझ्या मनात गोपाळरावांच्या भूमिकेसाठी ललित प्रभाकर हे नाव आलं, कारण मी त्याचं ‘ढोल-ताशे’ या नाटकातील काम पाहिलं होतं. नंतर एक नाटक आम्ही बरोबर करायला घेतलं होतं, ते पूर्ण झालं नाही. पण त्या काळात तो मला चांगला कळला. प्रोसेसवर विश्वास असणारा, नाटकावर नितांत प्रेम असणारा, अभ्यासू असा तो आहे. ढोल-ताशेमध्ये त्याने जी भूमिका केली ते पात्र गोपाळरावांच्या खूप जवळ जाणारं आहे, जग विरुद्ध गेलं तरी आपल्याला योग्य वाटतं त्याप्रमाणे जगणारं. 

आनंदीच्या भूमिकेसाठी मला तिच्यासारखी दिसणारी मुलगी हवी होती, पण ती अभिनेत्री असली पाहिजे असंही वाटत होतं. अर्थात, चेहऱ्यासाठी मी हट्ट धरणार नव्हतो. सुदैवाने तशी दिसणारी अभिनेत्री मिळाली- भाग्यश्री मिलिंद. तिचं काम मी ‘बालक पालक’मध्ये पाहिलं होतं. तिच्या दोन-तीन ऑडिशन्स घेतल्या, तिची लुकटेस्ट केली आणि मग निवड अंतिम केली. आनंदीबाईंच्या भुवया सरळ होत्या, चेहऱ्यावर देवीचे व्रण होते, असे थोडेफार बदल आम्हाला दाखवावे लागले.  

शूटिंग लोकेशन्स निवडण्यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्र सात-आठ महिने पाहात होतो. अगदी वाई, भोरपासून संकेश्वरपर्यंत जाऊन आलो. कमीत कमी शंभर वर्षांपूर्वीचं घर आम्ही शोधत होतो. मग गोपाळरावांचं कल्याणचं घर दाखवण्यासाठी फलटणमध्ये एक वाडा मिळाला. त्यांचं अलिबागचं घर दाखवण्यासाठी गुहागरमध्ये एक घर मिळालं. कुरुंदवाडला दोनशे वर्षांपूर्वीचा एक वाडा मिळाला, तो आम्ही गोपाळरावांचं कोल्हापूरचं घर म्हणून दाखवला. पुणे, मुंबई, वाई, भोर, सातारा, कुडाळ या ठिकाणी काही शूटिंग केलं आणि अमेरिकेतील प्रसंग दाखवण्यासाठी आम्ही जॉर्जियाला गेलो. 

प्रश्न- पण सिनेमा पाहताना मात्र असं जाणवत नाही की, इतक्या विविध ठिकाणी तुम्ही शूटिंग केलं असेल. इतकी एकसंधता आलेली आहे. 
- एका टप्प्यानंतर आपली ऑब्जेक्टिविटी जाते, तसं माझं झालं होतं. त्यामुळे ही रिॲक्शन चांगली आहे. 

प्रश्न- हा सिनेमा एकोणिसाव्या शतकाच्या काळाची कथा सांगणारा आहे, बायोपिक आहे, ‘मास’ला अपरिचित विषय आहे. त्यामुळे प्रेक्षक याला कसं स्वीकारतील अशी काही काळजी, चिंता तुम्हाला कधी वाटली होती का?
- सिनेमा दिग्दर्शित करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा मी दोन दिवस विचार करत बसलो होतो. हा सिनेमा मी का करावा, असा प्रश्न स्वत:लाच विचारत होतो. मुळात मी नाटक करीत होतो, अजूनही करतो. पूर्वीची क्लासिक नाटकं आपणही बसवावीत, असं मला वाटत होतं. घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, गारंबीचा बापू इत्यादी. पण जुनी नाटकं करीत राहावीत याचा मला कंटाळा आला होता. विशेषत: आजूबाजूला इतकं काही नवं घडत असताना, उपलब्ध असताना! त्यामुळे ‘आनंदी गोपाळ’ हा एकोणिसाव्या शतकातील  काळाचा सिनेमा आपण का करावा, असा प्रश्न मला पडला होता. तर मला त्या दोघांचं जे नातं होतं त्याचं आकर्षण वाटलं. सुरुवातीला त्यांचं नातं विद्यार्थी- शिक्षक असं होतं, नंतर नवरा-बायको असं होतं आणि आनंदीबाई अमेरिकेला गेल्यानंतर तर ते दोघं मित्र झाले. तिथून पत्र लिहिताना ‘प्रिय गोपाळराव’ असा मायना आनंदीबाई लिहू लागल्या. त्यांचा हा बारा वर्षांचा प्रवास आणि त्यावेळचा कर्मठ समाज हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं, त्यांचं नातं अधिक खुणावत राहिलं. 140 वर्षांपूर्वीचा हा प्रवास आहे. म्हणून वाटलं की, हा सिनेमा सांगितला पाहिजे, आजच्या काळाला हे नातं रिलेट होईल. 

प्रश्न- अलीकडच्या काळात चांगले मराठी सिनेमे येतात आणि बऱ्यापैकी चालतातही. पण तेसुद्धा दोनतीन आठवडेच, जास्तीत जास्त चार आठवडे (‘सैराट’सारखा एखादा अपवाद). पण ‘आनंदी गोपाळ’ हा सिनेमा दीड महिना झाला तरी चांगला चालला आहे. तर याला एकूण प्रतिसाद कसा मिळाला आहे? प्रेक्षकांचा, अभ्यासकांचा, सिनेमाच्या समीक्षकांचा?
- आम्ही जी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आणि काही काल्पनिक प्रसंग टाकले आहेत, त्याला काही अभ्यासकांनी आक्षेप घेतला आहे. आणि मला वाटतं, त्यांचं बरोबर आहे. त्यांनी इतकी वर्षे अभ्यास केला असेल तर त्यांना तसं वाटणं साहजिक आहे. पण सुरुवातीपासून आमच्या मनात ही स्पष्टता होती की, आपल्याला बायोपिक बनवायचा आहे, डॉक्युमेंटरी करायची नाही. प्रेक्षकांनी पाठवलेल्या प्रतिक्रिया खूप आहेत. आलेले फोन, मेसेज एक-दोन वाक्यांचे आहेत. पण लोकांनी फेसबुक-टि्वटरवर पानपानभर लिहून प्रतिक्रिया कळवल्या आहेत. 

मला सांगायला आनंद वाटतोय की, यातील 80 टक्के प्रतिक्रिया मुलींच्या तर 20 टक्के प्रतिक्रिया मुलांच्या आहेत. या मुलांनी सांगितलंय की, ‘आम्हाला गोपाळराव व्हायला आवडेल.’ काही मुलींनी असं कळवलंय की, ‘आम्हाला खूप अनुकूलता आहे, खूप साधनं (रिसोर्सेस) आहेत, तरीही आम्ही तक्रार करतोय, असं हा सिनेमा पाहून वाटलं.’ काही पुरुषांनी, हा सिनेमा पाहून अपराधीपणाची (गिल्ट) भावना त्यांच्या मनात आल्याचं सांगितलं. मला वाटतं हा ‘आनंदी गोपाळ’चा विजय आहे. आम्ही घेतलेल्या सिनेमॅटिक लिबर्टीमुळे सिनेमा पाहणाऱ्यांच्या मनात काही वेगळं चित्रं निर्माण झालं असतं, तर ते या सिनेमाचं अपयश मानता आलं असतं, 

प्रश्न- तुम्ही सिनेमा संपवताना देशविदेशातील अनेक नामवंत वा यशस्वी महिलांचे फोटो दाखवलेत. त्याची काहीच गरज नव्हती, उलट तो अडथळाच ठरतोय, असं अनेकांप्रमाणेच मलाही वाटतं.
- हो, अशा प्रतिक्रिया आहेत की, ‘कशाला टाकलंय ते मध्ये, आम्हाला मूळ आशय बरोबर पोहोचला होता.’ पण (विज्ञान, खेळ, राजकारण, समाजकारण, साहित्य इत्यादी क्षेत्रांतील त्या महिलांचे फोटो पाहून) काही प्रतिक्रिया अशाही आल्या की, ‘ते पाहून आम्हाला भरून आलं... असं वाटलं की, केवढं काम करून ठेवलंय या बायकांनी.’ अभ्यासकांना, समीक्षकांना ते खटकलं जे मला मान्य आहे, पण सामान्य प्रेक्षकांसाठी मला ते आवश्यक वाटलं. 

प्रश्न- हा सिनेमा पाहून नाट्य व सिनेमा क्षेत्रातील तुझ्या मित्रांच्या काय प्रतिक्रिया आहेत? 
- ‘आम्हाला हे बघायला मिळालं यासाठी थँक यू व्हेरी मच’ अशा प्रतिक्रिया नाट्य व सिनेक्षेत्रातील मित्रांकडून आल्यात. 

प्रश्न- हा सिनेमा महाराष्ट्रात किती ठिकाणी लागला? अन्यत्र कोणत्या शहरांत, राज्यांत? 
- महाराष्ट्रात सर्व प्रमुख शहरांत सिनेमा लागला. रोज साडेतीनशे शो त्याचे होत आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी जास्त प्रतिसाद आहे. नागपूर व मराठवाड्यात तुलनेने कमी आहे. गोव्यात चांगला प्रतिसाद आहे. कोकणात थिएटर्स जास्त नाहीत, त्यामुळे तो पट्टा तसाच राहतोय. त्याचं काय करायचं याचा विचार व्हायला हवा. बंगलोर, हैदराबाद, दिल्ली, बडोदा इत्यादी शहरांतही लागलाय. इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड इथेही प्रदर्शित झालाय.

प्रश्न- असा काही सर्व्हे झालाय किंवा अंदाज आहे का, की विशिष्ट वयोगटातील लोकांनी हा सिनेमा जास्त पाहिला?
 - ओह! चार वर्षांपासून अगदी म्हाताऱ्या झालेल्या व्यक्तींनी हा सिनेमा पाहिला. पण तरुण मुला-मुलींनीही पाहिला. काही तरुणांनी असंही सांगितलं की, त्यांचे आजोबा खूप आजारी होते, पण सिनेमा पाहायला गेले, पाहून खूप भारावून आले.
 
प्रश्न- तरुण वर्ग ते पुढचा वयोगट यांचा विचार केला तर किती लोकांना ‘आनंदी गोपाळ’ यांच्याविषयी माहिती होती? मला वाटतं, सिनेमा पाहणाऱ्यांमधील दहापैकी एक असे ते प्रमाण असेल...
- मला ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातील दहापैकी दोन लोकांनी ‘आनंदी गोपाळ’ यांच्याविषयी थोडंबहुत वाचलेलं होतं. पण आठ लोक असे होते की, ‘आनंदीबाई ही डॉक्टर झालेली पहिली भारतीय महिला’ एवढंच त्यांना माहीत होतं. त्यामुळे आता काही लोक पुस्तकं मिळवून वाचण्याचा प्रयत्न करताहेत. अर्थात, अनेक लोकांना वाटतं की, श्री.ज.जोशी यांच्या ‘आनंदी गोपाळ’ या कादंबरीवर हा सिनेमा आधारलेला आहे, पण तसा तो नाहीये.

प्रश्न- या सिनेमाला आपण बायोपिक म्हणतोय. त्यामुळे काही अभ्यासकांचे आक्षेप आहेत, यातील काल्पनिक प्रसंगांबद्दल व पात्रांबद्दल! आणि सर्वसामान्य लोकांना असं वाटत असतं की, हे सर्व असंच्या असंच घडलं असणार! म्हणून रेकॉर्डवर हे येणं आवश्यक वाटतं की, यातील काल्पनिक प्रसंग व पात्रं कोणती आहेत? 
- गोपाळरावांची सासू म्हणजे त्यांच्या पहिल्या बायकोची आई, हे पात्र या सिनेमात जेवढं दाखवलं आहे तेवढं आनंदी-गोपाळ यांच्या आयुष्यात नव्हतं. त्यांच्या त्या प्रवासाचा प्रेक्षकांना सहअनुभव मिळण्यासाठी आम्ही ते पात्रं तसं घेतलं. गोपाळरावांचा पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा कृष्णा मामाकडे होता आणि 16 वर्षानंतर निघूनच जातो (तिथपर्यंत सिनेमा जात नाही), त्याचे काही काल्पनिक प्रसंग आहेत. आनंदी-गोपाळ भूजला असताना त्यांना ते पत्र आलं (अमेरिकेत आनंदीबाईला प्रवेश मिळतोय हे सांगणारं), ते दाखवणं आम्हाला शक्य नव्हतं, म्हणून ते कल्याणला असताना ते पत्रं आलं असं दाखवलं. अमेरिकेला जाताना ती म्हणते, ‘मी एकटी जाईन’ आणि नंतर म्हणते, ‘तुम्ही नाही येणार?’ तर प्रत्यक्षात जे नाट्य घडलं असेल, त्यापेक्षा थोडं लाऊड करून सिनेमात ते दाखवलंय. कारण त्यांच्या जीवनात त्यावेळी जो भावनिक संघर्ष घडला असेल, तो प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचवण्यासाठी तसं दाखवलं. 

प्रश्न- अमेरिकेत गोपाळराव जातात आणि आनंदीबाईच्या पदवीदान समारंभात जे वर्तन करतात, ते लोकांना जास्त नाटकी वाटतं. म्हणजे त्या समारंभात शिट्टी वाजवणं वगैरे कसं घडलं असेल. 
- गोपाळरावांचं अमेरिकेत गेल्यानंतरचं वागणं ज्यांनी वाचलं असेल त्यांना ते दाखवलेलं फारसं खटकणार नाही असं वाटतं. कारण तिकडे गेल्यावर ते भगवी वस्त्र घालून फिरले, व्याख्यानं देत राहिले. हे लक्षात घेतलं तर ते भावनिक होतात, रडतात, शिट्टी वाजवतात हे सिनेमाच्या क्लायमॅक्सला साहजिक वाटेल. त्या पात्राचा ओलावा तर दिसला पाहिजे ना. 

प्रश्न- आणखी काही सांगायचंय?
- आम्हाला सिनेमा करताना एवढंच माहीत होतं की, आपण ‘थीन लाईन’वर चालतोय, सत्य आणि काल्पनिक या दोहोंच्या मध्ये कुठेतरी आपल्याला राहायचंय. लोकांना तो अनुभव द्यायचाय, तर ही कथा दोन लेव्हलवर सांगायचीय. पहिल्या महिला डॉक्टरची कथा आणि त्या नवरा-बायकोचं नातं. आपण बऱ्याचदा घटनांच्या मागे धावतो आणि ती व्यक्ती लहानपणीच मोठी बनलेली असते, असं मानून चालतो. प्रत्यक्षात असं नसतं. त्या माणसांचा शून्य ते शंभर हा प्रवास चुका करत झालेला असतो.

प्रश्न- समीर, या सिनेमाने तुझ्यातल्या दिग्दर्शकाला काय दिलं आणि पुढे कोणता सिनेमा करण्याचा विचार आहे?
- एखाद्या कथेला सर्वांगाने भिडण्याची ताकद मला या सिनेमाने दिली, आपण तसं केलं तर प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचतं हा आत्मविश्वास दिला. पुढचा सिनेमा मी राजकारणावर करतोय, कारण त्या ‘पॉलिटिक्स’ची मला लहानपणापासून आवड आहे. सिनेमाचं काम सुरू झालंय, त्याचं नाव आणि इतर तपशिल लवकरच आम्ही जाहीर करू. 

(मुलाखत : विनोद शिरसाठ)

Tags: आनंदी गोपाळ समीर विद्वांस anandi gopal sameer vidwans weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

समीर विद्वांस,  पुणे, महाराष्ट्र

नाटक- चित्रपट दिग्दर्शक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा