डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

गौतमची कल्पनाशक्ती भन्नाट आहे. त्याच्या कल्पनांना फुटलेले धुमारे कवितेतून समोर येतात. मातीशी खेळताना तो माती मळतो. मातीचा किल्ला करतो, पणती करतो, चॉकलेट करतो. पण हे करताना मातीच्या डोळ्यांतून अश्रू आल्याचे त्याला जाणवते. आणि हे वाचताना आपणही क्षणभर जागच्या जागी थांबून अवाक्‌ होतो. मिरचीताईचे लग्न हीही गौतमची एक भारी कल्पना एका कवितेत आहे.

‘गौतमच्या कविता’ हा कवितासंग्रह 2017 मध्ये प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा ‘बालकवी पुरस्कार’ जाहीर झालाय. या पुरस्कारानं मुलांच्या लेखन चळवळीला बळ मिळालंय. समडोळी (ता.मिरज) या लहानशा खेड्यातला गौतम आता इयत्ता सहावीत शिकतोय. इयत्ता दुसरीत असल्यापासून तो आपल्या भाव-भावना शब्दांत गुंफतोय. शिक्षक व पालकांनी मुलांना अभिव्यक्तीसाठी उद्युक्त केलं आणि त्यासाठी आवश्यक ते पाठबळ पुरवलं, तर किती सौंदर्यपूर्ण आणि आशयघन लेखन आपल्या हाती येतं याचा एक उत्तम नमुना म्हणजे ‘गौतमच्या कविता’ हा कवितासंग्रह होय. 

गौतमच्या कवितांतून मुलांचं भावविश्व, त्यांच्या धमाल कल्पना, त्यांचं कुतूहल, त्यांची निरागसता यांचा प्रत्यय येतो. गौतम पुस्तकभर निसर्ग आणि पशू-पक्षी यांच्याशी बोलण्यात रमलाय. त्याची शब्दकळा इतकी वेधक आहे की, त्याचं हे बोलणं वाचताना वाचणाराही त्यात गुंतत जातो. चित्रकार अरुण सुतार यांच्या कुंचल्यातनं अवतरलेल्या चित्रांनी पुस्तकातील प्रत्येक कविता चित्रित केली आहे. ही चित्रं कवितेचा आशय बोलका करणारी आहेत. आशय, चित्रं आणि मांडणी यांचा मनमोहक मेळ या पुस्तकात साधलाय.  का, काय, कसं, कधी, कुणी हे उमलत्या मनाचे परवलीचे शब्द असतात. 

गौतमच्या कविता वाचताना हे प्रकर्षानं जाणवतं. बालसुलभ कुतूहलापोटी मुलांना कोड्यात टाकणाऱ्या बाबी गौतम कवितेत सहजपणानं मांडतो. का, कसं विचारत राहतो. पावसाचा आवाज ऐकता-ऐकता गौतम पावसाला विचारतो, ‘पावसा पावसा, गातोस कसा?’ उजेडात खेळता-खेळता तो सूर्याला विचारतो, ‘जगात प्रकाश येतो कसा?’ झाडांच्या पानांचंही तसंच. प्रत्येक झाडाची पानं वेगवेगळ्या आकारांची. या पानांकडं बघत गौतम त्यात हरवून जातो आणि विचारतो, ‘पंचवीस नद्या एकाच पानात, तर किती नद्या सर्व पानांत?’ समुद्राचं अथांग रूप बघून गौतम अचंबित होत म्हणतो, ‘समुद्रा तुझे कसे रूप, तुझ्या अंगात पाणी खूप.’

गौतमची कल्पनाशक्ती भन्नाट आहे. त्याच्या कल्पनांना फुटलेले धुमारे कवितेतून समोर येतात. मातीशी खेळताना तो माती मळतो. मातीचा किल्ला करतो, पणती करतो, चॉकलेट करतो. पण हे करताना मातीच्या डोळ्यांतून अश्रू आल्याचे त्याला जाणवते. आणि हे वाचताना आपणही क्षणभर जागच्या जागी थांबून अवाक्‌ होतो. मिरचीताईचे लग्न हीही गौतमची एक भारी कल्पना एका कवितेत आहे. या लग्नाला तो ताईसह गाय, भोपळा, काकडी, ससा यांना पाचारण करतो; त्यांची लगीनघाई शब्दांत मांडतो. फुलपाखरू या कवितेत तो स्वत: फुलपाखरू होण्याचं स्वप्न रंगवतो. त्याला फुलपाखरू का व्हायचंय, ते वाचून मुलांच्या फुलपंखी जगण्यातली निरागसता आपणाला भावते. प्राण्यांचे वनभोजन ही गौतमची आणखी एक भारी कल्पना आहे.

ससा या कवितेत गौतम म्हणतो, ‘सशाने मारली उडी, त्याला सापडली पुडी, ससा म्हणाला पुडी कोणाची, मासा म्हणाला, पुडी वाघाची, ससा गेला पळत, वाघ होता लोळत!’ आता ही कविता वाचताना गौतमनं वाघ कुणाला म्हटलंय, हे ध्यानात येताच आपण अचंबित होतो. वाघासारखा माणूस; पण तंबाखूच्या व्यसनानं कसा कासावीस होतो आणि सुंदर जगण्याला मुकतो, हे किती सूचकतेनं गौतमनं मांडलंय! मेघाशी बोलताना गौतम एक तक्रार करतो, ‘तुझी मैत्रीण वीजराणी, गाते ती रागीट गाणी!’ खरंच, हे किती मस्त रूप दिलंय गौतमनं!

या कविता वाचताना लहानशा गौतमची समज खूप व्यापक आहे, हेही जाणवतं. पाऊस कवितेत तो म्हणतो, ‘पडले पाण्याचे सडे, हिरवी झाली झाडे’. आणखी एका कवितेत तो पावसाला म्हणतो, ‘तुझा थेंब असतो लहान, धरतीची भागवतो तहान’. तर दुष्काळाची भयाणता आणि माणूसपण नोंदवताना म्हणतो, ‘सर्वांनी वाचवावे पाणी, पक्षी गातील गाणी’. परीक्षा या कवितेतली शब्दांची ‘नदी मनात वाहते, तसे जोडावे परीक्षेशी नाते’ ही ओळ शिक्षणात आवश्यक असलेली सहजता अधोरेखित करते.

गौतमच्या या कविता ताल, लय, प्रतिमा, दृक्‌संवेदन, मजा, अर्थाच्या अनेक छटा अशा गुणांनी भरलेल्या आहेत. वाचनाचा पुरेपूर आनंद देणाऱ्या या कवितांसाठी गौतमचं मन:पूर्वक अभिनंदन! गौतमच्या कविता वाचताना, त्याला लिहितं करणारे नामदेव माळी आणि कृष्णात पाटोळे यांचे कष्ट लक्षात येतात. त्यांनी मुलांचं लेखन ही गांभीर्यपूर्वक करवून घेण्याची गोष्ट आहे, हे तत्त्व पक्कं करून लेखन चळवळ आकाराला आणली आहे. 
 

Tags: santosh jagtap संतोष जगताप गौतमच्या कविता gautamchya kavita weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संतोष जगताप,  लोणविरे, सोलापूर


प्रतिक्रिया द्या