डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

‘न्यूयॉर्क टाइम्स’चा प्रतिनिधी या संदर्भात राय यांची मुलाखत घेण्यास आला असता, त्यांनी बाकीच्या गोष्टींची चर्चा न करता फक्त चित्रपटाच्या आशयसूत्रांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘या चित्रपटात मला माणसाच्या आजच्या गरजा, पुरातन भारतीय परंपरा व भविष्यांतील अंतराळयुग या तीन वेगवेगळ्या शक्तींचा संघर्ष दाखवायचा आहे.’’ मात्र काही तरी, कुठे तरी फिसकटते आहे, असे राय यांना वाटू लागले. या बाबतीत एक गोष्ट त्यांना चांगलीच खटकली. हॉलीवुडमध्ये एके दिवशी कोलंबियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी रायना विचारले, ‘‘तुम्हाला या प्रकल्पात माईक विल्सन का हवा आहे? कोण आहे तो? तुम्ही त्याच्याबरोबर या कामात सहकारी का बनला आहात?’’ रायनी स्वत:ला हा प्रश्न विचारला, मात्र त्यांनाही त्याचे उत्तर देता आले नाही.‘न्यूयॉर्क टाइम्स’चा प्रतिनिधी या संदर्भात राय यांची मुलाखत घेण्यास आला असता, त्यांनी बाकीच्या गोष्टींची चर्चा न करता फक्त चित्रपटाच्या आशयसूत्रांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘या चित्रपटात मला माणसाच्या आजच्या गरजा, पुरातन भारतीय परंपरा व भविष्यांतील अंतराळयुग या तीन वेगवेगळ्या शक्तींचा संघर्ष दाखवायचा आहे.’’ मात्र काही तरी, कुठे तरी फिसकटते आहे, असे राय यांना वाटू लागले. या बाबतीत एक गोष्ट त्यांना चांगलीच खटकली. हॉलीवुडमध्ये एके दिवशी कोलंबियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी रायना विचारले, ‘‘तुम्हाला या प्रकल्पात माईक विल्सन का हवा आहे? कोण आहे तो? तुम्ही त्याच्याबरोबर या कामात सहकारी का बनला आहात?’’ रायनी स्वत:ला हा प्रश्न विचारला, मात्र त्यांनाही त्याचे उत्तर देता आले नाही.

सत्यजित राय हे एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. चित्रपट दिग्दर्शक म्हणून ते जगप्रसिद्ध आहेतच; शिवाय ते आपल्या चित्रपटांच्या पटकथा स्वत:च लिहीत, काही चित्रपटांसाठी त्यांनी कविताही लिहिल्या, अनेक चित्रपटांना संगीतही दिले. ते उत्तम चित्रकार होते, आपल्या चित्रपटांची पोस्टर्स तेच तयार करीत, पात्रांच्या पोशाखांची व सेटची डिझाइन्स तयार करीत. चित्रपटाव्यतिरिक्त मुलांसाठी त्यांनी ‘संदेश’ नावाचे मासिक काढले, कथालेखन केले, मासिकासाठी चित्रे काढली. त्यांनी लिहिलेल्या रहस्यकथा व विज्ञानकथा अजूनही बंगालमध्ये लोकप्रिय आहेत. ते उत्तम वाचकही होते. त्यांचे काका-आजोबा कुलद रंजन यांनी अनुवादित केलेली ज्युल व्हर्नची Mysterious Island ही कादंबरी त्यांनी लहानपणी वाचली व त्यांना विज्ञानकथांच्या वाचनाची गोडी लागली. त्यांनी या संदर्भात लिहिले आहे, ’Addiction to this genre occurs either at adolescence or not at all. ’

‘संदेश’ हे मासिक मुळात सत्यजित यांच्या वडिलांनी सुरू केले होते. मात्र त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे ते बंद पडले. निर्माता-दिग्दर्शक म्हणून यश व नावलौकिक मिळाल्यावर सत्यजित यांनी 1961 मध्ये या मासिकाचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले. या मासिकातच त्यांची ‘बंकूबाबूर बोन्धू’ बंकूबाबूंचा मित्र ही कथा प्रकाशित झाली.

राय यांची ही ‘बंकूबाबूर बोन्धू’ कथा थोडक्यात अशी होती-

बंकूबाबू रागावलेले कुणीही कधीही पाहिले नव्हते. गेल्या वीस वर्षांपासून ते या खेड्यातील शाळेत भूगोल आणि बंगाली शिकवीत आहेत. किती तरी विद्यार्थी त्यांच्या हाताखालून, त्यांची थट्टा-मस्करी करीत, शिकून गेले. कधी मुले फळ्यावर त्यांचे विचित्र चित्र काढीत, कधी त्यांच्या खुर्चीला डिंक चिटकवीत, कधी कालीपूजेच्या वेळी त्यांचे लक्ष नसताना त्यांच्यामागे फटाके उडवीत... पण या व्रात्य मुलांकडे दुर्लक्ष करून बंकू बाबू आपले ध्यान हुशार मुलांवर केंद्रित करीत. घरी बोलावून त्यांना देशोदेशीच्या नवलकथा सांगणे बंकूबाबूंना फार आवडे.

सुटीच्या दिवशी बंकूबाबूंना गावचा मुखिया श्रीपती मजुमदार याच्याकडे खास बोलावणे असे. तेथे जे टोळके जमा झालेले असे, त्यांच्यासाठी बंकूबाबू हे मनोरंजनाचे मोठे साधन होते. ते त्यांची भरपूर चेष्टा तर करीतच, कधी त्यांच्या चपला तर कधी छत्री लपवून ठेवत. प्रत्येक वेळी बंकूबाबू ठरवीत की, यापुढे कधीच या बैठकीत जायचे नाही; पण श्रीपतीबाबूंचे बोलावणे आले की, भिडस्तपणामुळे, हा निर्धार पाळणे त्यांना शक्य होत नसे.

त्या दिवशी या बैठकीत उपग्रहाच्या संदर्भात चर्चा चालू होती. काही दिवसांपूर्वी आकाशात अनेकांना एक वेगळाच तेजस्वी प्रकाश दिसला होता. उपग्रहाबद्दल कुणालाच फारशी माहिती नव्हती, पण त्यामुळे त्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना करण्याला तर कुणी मनाई केली नव्हती ना! एक जण म्हणाला, ‘‘ते एखादे परग्रहावरून आलेले यानही असू शकेल.’’ बंकूबाबू सहज म्हणाले, ‘‘आणि ते यान आपल्या येथे उतरले तर?’’

लोकांना लगेच त्यांची चेष्टा करण्यास विषय मिळाला. ‘‘वा बंकूबाबू, परग्रहावरील यान येथे उतरेल? या आपल्या खेडकुल्यात? लंडन, मॉस्को, न्यूयॉर्क किंवा कलकत्ता सोडून ते येथे येईल?’’

एक जण म्हणाला, ‘‘मला तर वाटते, ते पाश्चिमात्य देशातच उतरेल.’’

दुसरा म्हणाला, ‘‘मला तर बंकूबाबूचेच बरोबर वाटते. कारण त्या यानातील प्राण्यांना जर पृथ्वीवरील एखादा नमुना गोळा करायचा असेल, तर बंकूंपेक्षा चांगला नमुना त्यांना कोठे मिळेल?’’

तिसरा बंकूबाबूंच्या पाठीवर जोराने थाप मारीत म्हणाला, ‘‘त्यांच्या वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवायला हा अगदी योग्य नमुना आहे!’’

बंकूबाबू मुकाट्याने उठले. तरी जाताना एक जण म्हणालाच, ‘‘जपून जा. आज अमावास्या आहे. भुतांची रात्र...’’

बंकूबाबू घराकडे निघाले. हा रस्ता त्यांच्या सवयीचा होता, तरी थोडे अंतर चालून गेल्यानंतर त्यांना काहीसे वेगळे वाटू लागले. काही क्षणांत त्यांच्या ध्यानात आले की, नेहमी ऐकू येत ते बेडकांचे-कीटकांचे आवाज आज मुळीच ऐकू येत नाहीत. सगळे झोपलेत की काय? पलीकडल्या तलावाच्या पृष्ठभागावर त्यांना कसला तरी प्रकाश दिसला, जो शेजारच्या झाडांवरदेखील पडला होता. आता त्यांच्या कानांत एक वेगळाच आवाज घुमू लागला. जवळ गेल्यावर त्यांना दिसले की, तळ्यात एक प्रकाशमान वस्तू अर्धवट बुडालेल्या स्थितीत तरंगते आहे; तिच्यातून तो प्रकाश येतो आहे. एखाद्या सजीवाने श्वासोच्छ्‌वास करावा, तसा!

त्यांनी त्या वस्तूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना जाणवले की, कुणा अदृश्य शक्तीने त्यांना जागच्या जागी जखडून टाकले आहे. त्यांच्यात कसलीही हालचाल करण्याची शक्ती उरलेली नाही. अकस्मात तो घुमणारा आवाज थांबला आणि एका अनोळखी भाषेत उच्चारलेले काही शब्द त्यांच्या कानांवर पडले. ही कोणती भाषा आहे, त्यांना कळेना.

आता त्यांना इंग्रजीत एक प्रश्न ऐकू आला. ‘‘तुम्ही कोण आहात?’’  

‘‘मी बंकूबिहारी दत्त आहे सर’’ त्यांनी शक्य तितक्या अदबीने इंग्रजीत उत्तर दिले.

‘‘तुम्ही इंग्रज आहात?’’

‘‘नाही. मी बंगाली आहे- बंगाली कायस्थ.’’

एका क्षणानंतर शुद्ध बंगालीत उच्चारलेले शब्द त्यांच्या कानी पडले, ‘‘नमस्कार.’’

पाठोपाठ त्या ‘वस्तू’मध्ये एक दरवाजा उघडला गेला व त्यांतून एक चमत्कारिक प्राणी बाहेर आला. तो बंकूबाबूंहून लहान आकाराचा, हडकुळा प्राणी होता. त्याचे डोके गोलाकार असून त्यावर डोळ्यांच्या जागी दोन मोठी छिद्रे होती व त्यांतून पिवळा प्रकाश बाहेर येत होता. त्याचे सारे शरीर एखाद्या गुलाबी धातूचे बनल्यासारखे होते.

त्या प्राण्याने बंकूबाबूंना विचारले, ‘‘तुम्ही मानव आहात?’’

‘‘हो.’’

‘‘मग ही पृथ्वी आहे का?’’

‘‘हो.’’

‘‘मला वाटलेच! माझ्या यानात काहीतरी बिघाड झाल्यामुळे ते इथे उतरले आहे. खरे तर मी प्लुटो ग्रहावर चाललो होतो.’’

तो प्राणी आणखी जवळ आला व त्याने बंकूबाबूंचे शरीर चाचपून पाहिले. नंतर तो म्हणाला, ‘‘माझे नाव अंग. मी क्रेनास नावाच्या ग्रहावर राहतो. मला वाटते, आम्ही तुमच्यापेक्षा खूपच पुढारलेलो आहोत.’’

बंकूबाबूंच्या चेहऱ्यावरचा अविश्वास त्या प्राण्याने ओळखला. तो म्हणाला, ‘‘मी ते सिद्ध करू शकतो. मला सांगा- तुम्हाला किती भाषा येतात?’’

‘‘बंगाली, इंग्रजी आणि थोडी हिंदी.’’

‘‘म्हणजे अडीच. मला चौदा हजार भाषा येतात. मी पंचवीस ग्रहांचा प्रवास केलेला आहे. बरे, तुमचे वय किती आहे?’’

‘‘पन्नास.’’

‘‘माझे वय आठशे तेहतीस आहे.’’ अंगने त्यांच्या हातातील एक स्फटिक बंकूबाबूंच्या हातात दिला. त्याला स्पर्श करताच त्यांच्या शरीराला एक लहानसा झटका बसला.

‘‘या स्फटिकाद्वारेच मी तुमची हालचाल बंद केली होती. मी तुम्हाला आणखी काही दाखवितो. मला सांगा- तुम्हाला कोणता देश, कोणते जग पाहावयाचे आहे?’’

भूगोल हा आवडीचा विषय असलेल्या बंकूबाबूंना अनेक देश पाहावयाचे होते. अर्थातच ते त्यांना अशक्य होते. ते म्हणाले, ‘‘मला उत्तर ध्रुवप्रदेश पाहावयाचा आहे.’’

अंगने त्यांच्या हातात दुर्बिणीसारखी एक वस्तू दिली आणि तिच्या एका बाजूकडून पाहण्यास सांगितले. क्षणात बंकूबाबूंना उत्तर ध्रुव समोर दिसू लागला. आजवर पुस्तकात वाचलेली ती दृश्ये पाहताना बंकूबाबूंचे भान हरपले. यानंतर अंगने त्यांना ब्राझीलचे जंगल दाखविले. मग तो म्हणाला, ‘‘आता तरी मी तुमच्याहून खूप पुढारलेला आहे, हे मान्य कराल?’’

‘‘होय. त्यांत काहीच शंका नाही.’’

‘‘मी तुमचे अंग चाचपून पाहिले तेव्हा माझ्या ध्यानात आले की, माणूस म्हणून तुम्हाला मर्यादा आहेत; तरी तुमच्या मर्यादेत तुम्ही खूप चांगले आहात. तुमच्यांत कोणती उणीव आहे, माहीत आहे का? तुम्ही फार भिडस्त, गरीब स्वभावाचे व सहनशील आहात. म्हणून तुम्ही आयुष्यात फार काही मिळवू शकला नाहीत. तुम्हीच का -प्रत्येकाने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे, त्याचा प्रतिकार करायला पाहिजे. ठीक आहे. माझा मार्ग भटकल्यामुळे तुमची-माझी गाठ पडली, पण तुम्हाला भेटून मला आनंद झाला. मी आता जातो.’’

‘‘खरे तर मीच नशीबवान आहे. तुमची भेट झाली... नमस्कार.’’ बंकूबाबू असे बोलत आहेत तोवर अंग त्याच्या यानात गेला व त्याने ते चालू केले. क्षणात ते नजरेआडही झाले.

बंकूबाबू घरी कसे आले, त्यांना समजले नाही. त्यांना वाटले- आपण चालत नाही, आकाशात उडतो आहोत. हे सारे अकल्पनीय होते. महत्त्वाचे म्हणजे, पृथ्वीवरील कोट्यवधी लोकांमधून अंगने भेटण्यासाठी नेमकी त्यांची निवड केली होती. आज ते पृथ्वीवरील असे एकमेव व्यक्ती आहेत, ज्याला परग्रहावरील माणूस भेटला...

दुसऱ्या दिवशी रविवार होता. मुखियाच्या घरी नेहमीप्रमाणे बैठक भरली होती. पण बंकूबाबू अजून आले नव्हते.

एक जण म्हणाला, ‘‘आज बंकूला का उशीर झाला आहे?’’

दुसरा म्हणाला, ‘‘तो आज काय येतो! काल आपण त्याची चांगलीच खेचली होती.’’

श्रीपती म्हणाले, ‘‘पण त्याच्याशिवाय मजा नाही. तो आला नाही की करमत नाही. राम कन्हाय, तुम्ही जाऊन त्याला घेऊन या बरे.’’

त्यांचे बोलणे संपत नाही तोपर्यंत बैठकीत बंकूबाबूंनी प्रवेश केला. जणू एक वादळच दिवाणखान्यात आले. आल्या-आल्या त्यांनी सुमारे एक मिनिटभर गडगडाटी हास्य केले. असे हास्य या माणसांनी कधीच ऐकले नव्हते. हसणे थांबल्यानंतर बंकूबाबू स्पष्ट आवाजात म्हणाले, ‘‘दोस्तहो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, या बैठकीत येण्याचा माझा हा शेवटचा दिवस आहे. मी येथे आलो ते तुम्हाला काही सांगण्यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे- तुम्ही सगळे इथे, तुम्हाला न कळणाऱ्या गोष्टींबद्दल अतिशय मूर्खासारखी बडबड करीत असता. दुसरे म्हणजे- या वयात कुणाच्या चपला, छत्री लपवून ठेवणे अतिशय बालिशपणाचे आहे. आणि श्रीपतीबाबू, तुम्ही येथील मुखिया आहात. असल्या टवाळखोरांसोबत कुटाळक्या करणे तुम्हाला शोभत नाही.’’

आपले बोलणे संपल्यावर बंकूबाबूंनी चक्रवर्तीच्या पाठीवर इतक्या जोरात थाप मारली की, त्याचा श्वास अडकला. नंतर ते जसे आले तसेच वेगाने बाहेर पडले.

राम कन्हाय हे सारे पाहून एवढा आश्चर्यचकित झाला की, त्याच्या हातातील चहाचा कप निसटून खाली पडला आणि त्यातील चहा त्याच्या व इतरांच्या अंगावर उडाला.

000

ही कथा अतिशय लोकप्रिय झाली. यानंतर सत्यजितनी ‘प्रोफेसर शंकू’ या नावाचे पात्र निर्माण करून विज्ञानकथांची एक मालिकाच लिहिण्यास सुरुवात केली. या संदर्भात आपले ज्ञान अद्ययावत राहावे म्हणून वेगवेगळी वैज्ञानिक मासिके, ’National Geographic’ सारखी मासिके काळजीपूर्वक वाचण्यास त्यांनी प्रारंभ केला. शिवाय समकालीन जागतिक विज्ञानकथाकार काय लिहितात, तेदेखील वाचण्यास सुरुवात केली. ‘या अभ्यासाशिवाय उत्तम विज्ञानकथा लिहिता येत नाही’, असे त्यांनी लिहिले आहे.

कलकत्त्याला 26 जानेवारी, 1966 रोजी जो भारतातील पहिला ’Science Fiction Cine Club’ स्थापन झाला,  त्याचे अध्यक्ष सत्यजित राय हेच होते. या क्लबविषयी राय यांनी जगप्रसिद्ध विज्ञानकथालेखक आर्थर सी. क्लार्क यांना पत्र लिहून कळविले. येथून दोघांचा नियमित पत्रव्यवहार सुरू झाला.

काही दिवसांनी राय लंडनला गेले असता, त्यांची व क्लार्क यांची भेट झाली. या भेटीत राय यांनी त्यांना ही कथा थोडक्यात सांगितली आणि तिच्यात काही भर घालून तिच्यावर एक चित्रपट तयार करण्याचा आपला मनसुबादेखील बोलून दाखविला. क्लार्क यांना ती आवडली आणि कोलंबिया येथे परत गेल्यावर त्यांनी त्यांचा एक मित्र माईक विल्सन याला तिच्याबद्दल सांगितले.

हा माईक विल्सन मोठा हरहुन्नरी माणूस होता. तो चित्रपटलेखक, दिग्दर्शक व निर्माता तर होताच, पण त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी संबंधदेखील होते. माईकने लगेच सत्यजित यांना पत्र लिहून या प्रकल्पात आपल्याला रस असल्याचे कळविले. पुढे, 1980 मध्ये राय यांनी या सगळ्या घटनांवर ’The ordeals of the Alien’ या नावाचा दीर्घ लेख लिहिला. त्यांत ते लिहितात, ‘जेव्हा असा माणूस तुम्हाला पत्र लिहून सांगतो की, तो तुमच्याबरोबर काम करण्यासाठी उजवा हातदेखील कापून देण्यास तयार आहे, तेव्हा तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतोच.’

राय यांनी माईकला पत्र लिहून कळविले की- काही तुरळक नोंदींशिवाय त्यांच्याजवळ अधिक काही नाही, तेव्हा तो सरळ कलकत्त्याला येऊन बसला व त्यांना पटकथा पूर्ण करण्याचा आग्रह करू लागला. पटकथा लिहिताना आपल्याला त्यांच्यासोबत राहू द्यावे, अशीही विनंती त्याने केली. मी फक्त शेजारी बसून राहीन आणि तुमच्यासाठी कॉफी बनवीन, असे तो म्हणाला. सत्यजितनी लिहिले आहे, ‘त्याने कॉफी तर बनविली नाहीच, पण आपल्या चमत्कारिक कल्पना तो माझ्यावर फेकत राहिला.’

राय यांनी आपली मूळ कथा कुमार वाचकांसाठी लिहिली होती. आता त्यांना हा चित्रपट सर्व वयाच्या प्रेक्षकांसाठी तयार करावयाचा होता. शिवाय त्या कथेची मांडणी बरीचशी सुबोध होती आणि तिच्यात जीवनविषयक चिंतन नव्हते, जे आतापावेतो राय यांच्या चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य बनले होते. यासाठी त्यांनी आपली कथा पूर्णपणे बदलून टाकली.  

राय यांच्या पटकथेची सुरुवातच परग्रहावरून आलेले यान बंगालमधील एका खेडेगावातील तळ्यात पडते येथून होते. त्यांनी या चित्रपटासाठी एक बंगाली नाव ठरविले होते. आपल्या पटकथेतून त्यांनी मूळ कथेतील बंकूबाबू हे पात्रच काढून टाकले. या यानातील जीवाचे नाव त्यांनी ‘एलियन’ असे ठेवले. या जीवाची व त्या खेड्यातील हबा नावाच्या मुलाची मैत्री होते.

एलियनचे वर्णन राय यांनी असे केले आहे-‘एलियन हे पुराणकथेतील ठेंगू माणूस व दुष्काळी भागातला, उपासमार झालेला आधुनिक मुलगा यांचे मिश्रण आहे.’ त्याचे डोके खूप मोठे आहे, हात-पाय बारीक. तो पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी, माहीत नाही. त्याच्याकडे पाहिल्यावर प्रथम जाणवतो तो त्याचा निष्पापपणा. त्याच्यात फार मोठी शक्ती असेल किंवा कुटिलपणा असेल, असे वाटत नाही. राय यांचे विेश्व ‘पापरहित’ आहे असे म्हटले जाते, त्याचा हा आणखी एक पुरावा.

मात्र असे काही तरी तळ्यात दिसते आहे, ही बातमी आसपास पसरायला वेळ लागत नाही. गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे बोअरवेल खोदण्यासाठी गगनलाल बाजोरिया नावाचा एक मारवाडी आपली आधुनिक यंत्रे घेऊन आलेला असतो. जो डेवलिन नावाचा या क्षेत्रातील कुशल अमेरिकन इंजिनिअरही त्या भागात असतो. शिवाय ही यंत्रे घेऊन बाजोरिया काय करणार आहे याचा मागोवा घेण्यासाठी मोहन नावाचा एक वार्ताहरदेखील कलकत्त्याहून येथे आला आहे. यानाच्या येण्याची ही एक नवीच आश्चर्यजनक घटना या तिघांनाही त्यांतून उद्‌भवलेल्या परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहावयास भाग पाडते. बाजोरियाला वाटते की, तळ्यातून एक स्वयंभू मंदिर अर्धवट बाहेर आले आहे. या तळ्यातील पाणी उपसून ते मंदिर पूर्ण बाहेर काढायचे, त्याचा जीर्णोद्धार करायचा, तळ्यात सर्वत्र संगमरवरी फरशी बसवायची, हे एक नवे तीर्थस्थान म्हणून विकसित करावयाचे आणि तेथे ‘जीर्णोद्धार व सुशोभन- गगनलाल बाजोरिया’ अशी पाटी लावायची- असे स्वप्न तो पाहू लागतो.

यानात बसून एलियन हे सारे न्याहाळतो आहे. रात्रीच्या वेळी सारे मानवप्राणी निघून गेल्यावर तो यानाबाहेर येतो व कमळाच्या पाकळ्यांवर पाय देत तळ्यातून जमिनीवर जातो. हा प्राणी जितका चमत्कारिक आहे, तितकेच त्याचे वागणेही निराळेच आहे. त्याला आजूबाजूच्या या नव्या जगाबद्दल एक बालसुलभ कुतूहल आहे. त्याच्याजवळ अनेक शक्ती आहेत, पण त्यांचा उपयोग तो नाना गमतीजमती करण्यासाठी करतो. तो एका लहान झुडुपाकडे पाहत असताना त्याचे डोळे पिवळ्या प्रकाशाने चमकतात आणि त्या झाडाला फुले येतात. आपल्या या करामतीचे त्यालाच हसू येते. एक फूल तोंडात टाकून चघळत असताना त्याला मुंग्यांचे एक वारूळ दिसते. तो बोटाने त्या मुंग्यांना डिवचतो. त्या इकडे-तिकडे पळू लागतात. एलियनच्या डोळ्यांतून आता निळा प्रकाश येऊ लागतो. त्याला मुंग्यांचे ‘बोलणे’ ऐकू येऊ लागते. मग त्याला आंब्याच्या झाडाभोवती चमकणारे काजवे दिसतात. तो झाडाची फांदी हलवितो. काजवे त्याच्याभोवती फेर धरून नाचू लागतात.

एलियनला आता एक गरीब मुलगा झोपडीत झोपलेला दिसतो. त्याच्या डोळ्यांतील प्रकाश जांभळा होतो आणि त्याला त्या मुलाच्या मेंदूतील घडामोडी कळतात. हबा झोपेत स्वप्न पाहतो आहे. एलियन त्या स्वप्नाचा भाग बनतो. ते दोघे जण आनंदाने नाचू-गाऊ लागतात.

हबाला झोपडीत सोडून एलियन बाहेर येतो. त्याला सुकलेले भाताचे एक शेत दिसते. त्याच्या डोळ्यांतून पिवळा प्रकाश बाहेर पडतो. रोपे पुन्हा तरारून ताजीतवानी होतात.

सकाळी जेव्हा गावकरी हे शेत पाहतात, तेव्हा त्यांच्या आश्चर्याला सीमा उरत नाही. आता तळ्यातून एक मंदिर वर आल्याची बातमी सगळीकडे पसरते. त्या मंदिरामुळे अनेक चमत्कार होत आहेत, अशी लोकांची धारणा बनते. पाणी उपसण्याच्या कामी बाजोरियाला जो डेवलिनची मदत हवी आहे, तसेच या कामाला प्रसिद्धी न देण्यासाठी मोहनचीही. मोहनने सध्या तरी वर्तमानपत्रात या घटनेबद्दल काही लिहू नये, म्हणून बाजोरिया त्याला विनंती करतो. जो डेवलिन याला मंदिर वगैरेची कल्पना पटत नाही. तो तर्काने विचार करणारा आहे, शिवाय अमेरिकन आहे. असल्या गोष्टीवर त्याचा विेशास नाही.

या ठिकाणी सत्यजित राय यांनी बाजोरियाच्या तोंडी एक अत्यंत महत्त्वाचे वाक्य टाकले आहे. तो म्हणतो, ‘‘व्यवसाय आणि धर्म हे जगातील सर्वांत विलक्षण असे कॉकटेल आहे- चमत्कार घडविणारे, अतिशय प्रभावी, असामान्य कॉकटेल!’’

मुलांसाठीच्या कथेतून एक विचारघन चित्रपट निर्माण करताना राय कोणत्या दिशेने विचार करीत होते, हे आता  लक्षात येते. माणसे ‘चमत्कारांना’ कशी सामोरी जातात, जे आपल्याला आकलन होत नाही त्याच्याकडे पाहताना माणसाच्या मूळ प्रवृत्तीचा कल कसा स्वार्थ साधण्याकडे असतो, इकडे ते आपले लक्ष वेधतात. सामान्य माणसाच्या दृष्टीने अनुभवाचा अर्थ वगैरे शोधणे या दुय्यम गोष्टी. पुढे एका प्रसंगात बाजोरिया कलकत्त्याहून आलेल्या वार्ताहराला म्हणतो, ‘‘हे मंदिर विलक्षण वेगळे आहे याची मला खात्री आहे, कारण प्राचीन मंदिरांचा मी अभ्यास केलेला आहे. अनेक मंदिरांचा मी जीर्णोद्धार केला आहे.’’

वार्ताहर म्हणतो की, त्याला प्राचीन मंदिरांचे असे रूप बिघडविणे पटत नाही. तेव्हा बाजोरिया म्हणतो, ‘‘मग काय ही मंदिरे तशीच नष्ट होऊ द्यायची?’’

या बोलण्याला एक व्यक्तिगत व सामाजिक संदर्भ आहे. त्या काळात प्रसिद्ध उद्योगपती बिर्ला यांनी बंगालमधील अनेक मंदिरांची ‘जीर्णोद्धार’ या नावाखाली डागडुजी केली होती आणि तसे करताना आधुनिक स्थापत्याची त्यांत भेसळ केली होती. राय यांना हे मुळीच आवडलेले नव्हते.

दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण झाला नाही, पण हे बीज राय यांच्या मनात तसेच राहिले व पुढे ‘गणशत्रू’ तयार करताना इब्सेनच्या मूळ नाटकात त्यांनी ‘धार्मिक भावना व व्यवसाय’ यांच्या कॉकटेलची अप्रतिम भर घातली.

बाजोरियाला डेवलिन म्हणतो, ‘‘पाणी काढण्यासाठी तुम्हाला माझी मदत कशाला हवी? ते काम तुमचे मजूरही करू शकतील.’’ खरे तर बाजोरियाला डेवलिनची मदत दुसऱ्याच कामासाठी हवी असते. तो म्हणतो, ‘‘ते काम माझे मजूरच करतील. तुम्ही फक्त तुमच्याजवळची बंदूक घेऊन माझ्यासोबत राहायचे.’’

‘‘बंदूक घेऊन?’’

‘‘हो. सर्वांना दिसेल अशी. तुम्हाला ठाऊक नाही इकडले लोक कसे आहेत ते. तो पाहा, तो वर आलेला भाग कसा चकाकतो आहे! माझी खात्री आहे, मंदिराचे शिखर शुद्ध सोन्याचे आहे. हे जर लोकांना समजले, तर कुदळ- फावडी घेऊन ते मंदिरावर आणि शस्त्रे घेऊन आपल्यावर तुटून पडतील!’’

बिजोरिया डेवलिनला बरीच रक्कम देण्याचे आमिषही दाखवितो. शेवटी डेवलिन तयार होतो. मात्र आता वार्ताहराच्या मनात शंका निर्माण होते. त्याला आठवते- दोन दिवसांपूर्वी आकाशात एक विलक्षण प्रकाशरेषा फिरताना अनेकांनी पाहिली होती. तो रशिया किंवा अमेरिकेचा उपग्रह असावा, अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली होती. हे ‘मंदिर’ म्हणजे तो उपग्रहच तर नसावा? किंवा हे दुसऱ्याच कुणा ग्रहावरून आलेले यान तर नसेल? डेवलिन त्याची चेष्टा करीत म्हणतो, ‘‘अशा कल्पना करण्यासाठी तुला पगार मिळतो का?’’

‘‘हे जे चमत्कार घडताहेत ना, त्यामुळे माझी खात्री झाली आहे.’’

दुसऱ्या दिवशी बाजोरिया त्याचे मजूर घेऊन तळ्याजवळ येतो. डेवलिन, मोहन तेथे आलेले आहेतच. त्या वेळी मोहन आपली ‘परग्रहावरील यानाची’ कल्पना बाजोरियाला सांगतो. बाजोरिया त्याला वेड्यात काढतो. पण डेवलिनलाही आता मोहनच्या बोलण्यात तथ्य वाटू लागते. तो अचानक तळ्यात उडी मारतो व पोहत ‘मंदिरा’जवळ जातो. त्याला दिसते की, त्या आकृतीच्या आतून एक प्रकारचा प्रकाश येतो आहे व ती थरथरते आहे. तो झपाट्याने परत येतो व म्हणतो, ‘‘सरकारी सूत्रांना ताबडतोब कळवा. हे परग्रहावरील यान आहे व ते धोकादायक असू शकते.’’

तेवढ्यात त्यांना दिसते, ती वस्तू हळूहळू तळ्यातून वर येते आहे. डेवलिन बंदूक उचलून त्या वस्तूवर गोळीबार करतो. तिला काहीच इजा होत नाही. आता यानाचा अंतर्भाग आपल्याला दिसतो. आत एलियन ‘बुद्ध-मुद्रेत’ बसला आहे. त्याच्यासोबत हबा आहे आणि भोवती कमळाची फुले, बेडूक, एक साप, एक बुलबुल, एक खार आणि काही काजवे आहेत. हे मित्र त्याने गोळा केलेले आहेत. सारे जण एक मधुर गीत गात आहेत. हळूहळू संगीत थांबते. यानाच्या भोवती हिरवा प्रकाश दिसू लागतो व क्षणार्धात यान अदृश्य होते.

राय यांची पटकथा ‘विज्ञान’ किंवा ‘चमत्कार’ यांच्या तपशिलात न जाता माणसाच्या त्यांच्या संदर्भातील प्रतिक्रियांवर अधिक लक्ष केंद्रित करते. सामाजिक चित्रपटातील ‘तत्त्वचिंतक’ राय येथेही आपल्याला भेटतात. एलियन हे नेहमी दुष्ट व घातक असतात; ते पृथ्वीवर राज्य करण्यासाठी येतात वगैरे नेहमीच्या कल्पनांत राय यांना रस नाही. एलियनजवळ एक बालसुलभ निरागसता आहे. हबाच केवळ त्याचा मित्र बनतो; कारण जो निरागस असतो तोच ‘सृष्टी-रहस्याच्या’ जवळ जाऊ शकतो, यावर राय यांची श्रद्धा आहे. पटकथेत या निरागसतेचे अतिशय काव्यात्म वर्णन राय यांनी केले आहे. हा चित्रपट तयार  झाला असता, तर याला किती अप्रतिम दृश्यरूप राय यांनी दिले असते याची आता आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

00

पंधराएक दिवसांत पटकथेचा पहिला खर्डा तयार झाला. हा चित्रपट इंग्रजी व बंगाली अशा दोन भाषांत बनवावा, अशी कल्पना राय यांच्या मनात आली. या नव्या कथेत मारवाडी व्यापाऱ्याचे जे प्रमुख पात्र होते, ते त्या काळचा लोकप्रिय अभिनेता पीटर सेलर्स याने करावे, अशी राय यांची इच्छा होती. कारण त्याच्या नावावर परदेशात वितरक मिळाले असते. माईक म्हणाला, ‘‘ते होऊन जाईल.’’ त्याने सेलर्सच्या एजंटला पत्र लिहिले. त्यावर सेलर्सचे पत्र आले की, कल्पना त्याला आवडली आहे, पुढील गोष्टी भेटीअंती ठरवू. यानंतर एप्रिल 1967 मध्ये राय माईकसोबत पॅरिसला जाऊन सेलर्सला भेटले. त्याच्याशी चर्चा करताना रायनी त्याला विचारले, ‘‘तुम्ही माझे चित्रपट पाहिले आहेत का?’’

त्याने सत्यजित यांची ख्याती ऐकली होती, पण सिनेमे पाहिलेले नव्हते. तो म्हणाला, ‘‘नाही. पण जोनाथन मिलरने तुमच्याबद्दल खात्री दिली आहे आणि ती मला पुरेशी आहे.’’

पण रायना ते पुरेसे वाटत नव्हते. त्यांनी लंडनहून ‘चारुलता’ची प्रिंट मागविली व सेलर्सला दाखविली. तो अतिशय प्रभावित झाला व म्हणाला, ‘‘तुमचे अभिनेते माझ्यापेक्षा चांगले काम करतात. तुम्हाला मी कशाला हवा आहे?’’ पण तो कशासाठी हवा होता, ते त्यालाही माहीत होते व रायनाही. सेलर्सने या चित्रपटात काम करण्याचे मान्य केले.

आता या सिनेमाला भांडवल मिळविण्यासाठी माईक हॉलिवुडला गेला व राय कलकत्त्याला परतले. काही दिवसांनी माईकचा निरोप आला की, कोलंबिया ही प्रख्यात निर्मिती संस्था या प्रकल्पात भांडवल गुंतविण्यास तयार आहे. शिवाय चित्रपट कसा बनवायचा याचे पूर्ण स्वातंत्र्य राय यांना राहील. त्याने हेही कळविले की, चित्रपटातील एका अमेरिकनाची भूमिका करण्यासाठी मार्लन ब्रान्डो व स्टीव्ह मेक्वीन दोघेही उत्सुक आहेत. त्याच्या पत्रामुळे राय यांचा उत्साह वाढला व ते नवी आशा घेऊन हॉलीवुडला गेले. तेथे गेल्यावर त्यांनी पाहिले, माईकने एका आलिशान हॉटेलात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले तेव्हा माईक म्हणाला, ‘‘काळजी करू नका मास्टर, कोलंबियाने खर्चासाठी बराच ॲडव्हान्स मंजूर केला आहे.’’

या सुमारास सेलर्सही हॉलिवुडमध्येच होता. त्याची व राय यांची पुन्हा एकदा भेट झाली. या भेटीत सेलर्स म्हणाला, ‘‘काही दिवसांपूर्वी एका भारतीय ज्योतिषाने मला सांगितले होते की, एका भारतीय दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मला मिळणार आहे. ते खरे ठरले.’’ 

‘अपु या सिनेमाच्या तीन मालिकेमुळे राय यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. अशा दिग्दर्शकाचा हॉलिवुडच्या सहकार्याने चित्रपट निर्माण करण्याचा प्रकल्पही एव्हाना एक मोठी बातमी बनली होती. हॉलिवुडमधील अनेक वर्तमानपत्रांनी तिला ठळक प्रसिद्धी दिली. दि.12 जून, 67 रोजी Los Angeles Times ने या संदर्भात लिहिले, ‘बुडालेला खजिना, विज्ञानकथा, पीटर सेलर्स यांपैकी एकही गोष्ट सत्यजित राय यांच्या चित्रपटाचा घटक असू शकेल, असे वाटत नाही; तरी हे सत्य आहे. राय यांचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट कोलंबियासाठी ’Alien’ या नावाने भारतात चित्रित केला जाईल. सेलर्स हा श्रेष्ठ भारतीय दिग्दर्शकाबरोबर काम करणारा पहिला मोठा पाश्चात्त्य अभिनेता ठरेल. तो या चित्रपटात एका श्रीमंत बंगाली उद्योगपतीची भूमिका करणार आहे.’

‘बुडालेला खजिना’ हे शब्द बातमी लिहिणाऱ्याने माईक विल्सन याच्या संदर्भात लिहिले होते. माईकला समुद्रात खोलवर जाण्याची आवड होती आणि पाच वर्षांपूर्वी त्याला लंकेजवळच्या समुद्रात चांदीच्या नाण्यांचा मोठा साठा सापडला होता. या बातमीत ‘माईक या चित्रपटाची निर्मिती करणार आहे’ असाही उल्लेख होता. हा चित्रपट ही एक अर्थाचे अनेक पदर असलेली दृष्टांत कथा असेल व तिला सामाजिक, धार्मिक व तात्त्विक पैलू असतील, असेही बातमीत लिहिले होते. माईक हा अतिशय कुशल असा व्यवहारी व्यावसायिक होता. त्याने आपले जाळे पद्धतशीरपणे फेकावयास सुरुवात केली होती. मात्र राय यांना अजून हे समजायचे होते.

सेलर्सने या संदर्भात अजून लेखी करार केला नव्हता; परंतु त्यानेदेखील काही वर्तमानपत्रांना मुलाखती देताना आपण राय यांच्याबरोबर काम करीत आहो, अशी कबुली दिली होती.

‘न्यूयॉर्क टाइम्स’चा प्रतिनिधी या संदर्भात राय यांची मुलाखत घेण्यास आला असता, त्यांनी बाकीच्या गोष्टींची चर्चा न करता फक्त चित्रपटाच्या आशयसूत्रांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘या चित्रपटात मला माणसाच्या आजच्या गरजा, पुरातन भारतीय परंपरा व भविष्यांतील अंतराळयुग या तीन वेगवेगळ्या शक्तींचा संघर्ष दाखवायचा आहे.’’

मात्र काही तरी, कुठे तरी फिसकटते आहे, असे राय यांना वाटू लागले. या बाबतीत एक गोष्ट त्यांना चांगलीच खटकली. हॉलिवुडमध्ये एके दिवशी कोलंबियाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी रायना विचारले, ‘‘तुम्हाला या प्रकल्पात माईक विल्सन का हवा आहे? कोण आहे तो? तुम्ही त्याच्याबरोबर या कामात सहकारी का बनला आहात?’’ रायनी स्वत:ला हा प्रश्न विचारला, मात्र त्यांनाही त्याचे उत्तर देता आले नाही.

एके दिवशी हॉटेलमधील माईकच्या खोलीत त्यांना काही कागद टाईप करून ठेवलेले आढळले. त्यांनी ते पाहिले तेव्हा त्यांना दिसले की, त्यांनी लिहिलेल्या पटकथेच्या पहिल्या ड्राफ्टच्या अनेक प्रती माईकने काढून ठेवल्या होत्या आणि त्यांवर ठळक अक्षरांत ‘Copyright Mike Wilson and Satyajit Ray’ असे लिहिले होते. राय चक्रावले. पटकथा लेखनात माईक याचा तर काहीही सहभाग नव्हता व त्याचे नाव टाकण्याचा असा अधिकार रायनी त्याला कधीच दिला नव्हता. त्यांनी माईकला विचारल्यावर सारवासारव करीत तो म्हणाला, ‘‘मास्टर, एकापेक्षा दोन डोकी केव्हाही चांगली असतात.’’

या संदर्भात राय आणि आर्थिक व्यवहारांचे अज्ञान याबद्दल थोडे सांगावयास हवे. राय यांना आर्थिक व्यवहार मुळीच कळत नसत. त्यांचे तिकडे लक्षही नसे. त्यांचे सर्व व्यवहार अनिलबाबू नावाचे त्यांचे सहायक पाहत. राय यांच्या व्यक्तिगत खर्चाचा हिशेबही तेच ठेवत. एकदा राय यांना नवे घर भाड्याने घ्यायचे होते; तेव्हा जुन्या घराचे भाडे आपण किती भरतो व नव्या घराचे भाडे परवडेल किंवा नाही, याबद्दल त्यांना काहीच सांगता आले नव्हते. ही गोष्ट अनिलबाबूंना विचार, असे त्यांनी पत्नीला सांगितले. लेखी करार, देणे घेणे या बाबतीत ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. शिवाय इतरांवर चटकन विेशास टाकण्याचा त्यांचा स्वभाव होता. म्हणून माईक विल्सन काय करतो आहे, हे त्यांच्या ध्यानात आले नाही.

भारतात आल्यावर या प्रकल्पासंदर्भात पुढे बरेच दिवस काहीच घडले नाही. राय यांना आता चिंता वाटू लागली. मात्र काही दिवसांनी त्यांना सेलर्सचे एक पत्र आले. त्यात चित्रपटाबद्दल काही नव्हते, परंतु सेलर्सने ‘पाथेर पांचाली’बद्दलची त्याची प्रतिक्रिया त्यांना एक कविता लिहून कळविली होती. त्याने आपल्या काही मित्रांना हा चित्रपट दाखविण्यासाठी बोलाविले होते. त्या संदर्भात त्याने लिहिले-

‘‘I could say to my friends the evening of that day

Is the film of a Trilogy

And is called ‘‘Pather Panchali’’

In which there is a scene of two children in a field of barley

Watching a train go by

Under an azure sky

So beautiful you feel that want to die.’’

  ‘Alien’ ची म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. अशात आणखी एक अनपेक्षित घटना घडली. कोलंबिया USAने हा प्रकल्प कोलंबिया UKकडे वर्ग केला. आता नव्याने बोलणी करण्यासाठी राय यांना लंडनला जावे लागले. माईकही तेथे आला. या वेळीही त्याने राय यांची व्यवस्था आलिशान हॉटेलात केली होती. त्याच्या स्वभावाचा आणखी एक नमुना राय यांना पाहावयास मिळाला. कोलंबियाच्या अधिकाऱ्यांवर त्याचा मुळीच विश्वास नव्हता. म्हणून तो ज्या वेळी त्यांना भेटे, त्या वेळी त्यांचे बोलणे तो गुपचूप रेकोर्ड करू लागला. हे रायना आवडले नाही. कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनाही माईकचा संशय येऊ लागला होता. तो जवळ नसताना एकदा त्यांनी रायना स्पष्ट विचारले, ‘‘पटकथालेखनासाठी तुम्हाला देण्यासाठी आम्ही 10000 डॉलर ॲडव्हान्स रक्कम माईकजवळ दिली होती, ती तुम्हाला मिळाली का?’’

रायना तर अशी काहीच रक्कम मिळाली नव्हती. म्हणजे माईक त्यांच्या पैशावर उंची हॉटेलमध्ये मजा करीत होता. रायनी माईकला विचारले तेव्हा तो म्हणाला की, लंडनचे अधिकारी खोटारडे आहेत. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना खरी माहिती आहे.

लंडनहून परतताना कारमध्ये बसून विमानतळावर जाताना माईकने काही पेपर रायसमोर ठेवले व त्यावर सही  करण्याची विनंती केली. हे कसले पेपर आहेत, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘मला सिनेमासंदर्भात अनेक लोकांशी व्यवहार करावे लागतात. तुम्ही आणि मी पार्टनर आहोत असे या पेपरमध्ये लिहिले आहे.’’

आता सत्यजित बरेच सावध झाले होते. ते म्हणाले, ‘‘हे पेपर कलकत्त्याला पाठवून द्या. मग पाहू.’’

नंतर हे पेपर त्यांच्याकडे कधीच आले नाहीत. भारतात आल्यावर त्यांना कोलंबियाकडून 26 मार्च, 1968 या तारखेचे एक दीर्घ पत्र आले. त्यांनी कळविले होते की- माईक याने ‘इंडस इंटरनॅशनल प्रॉडक्शन’ नावाची कंपनी स्थापन करून तिच्याकडे ‘सत्यजित व त्याने’ लिहिलेल्या कथेचे हक्क आहेत, असे सांगितले होते. त्यासाठी कोलंबियाने त्याला 15000 डॉलर ॲडव्हान्स दिला होता. या गोष्टीचा जाब व हिशेब राय यांनी माईककडेच मागावा.

यानंतर 18 एप्रिल, 68 रोजी त्यांनी रायना आणखी एक पत्र लिहिले. त्यांत लिहिले होते की, माईकने कोलंबियाकडून विविध कारणांसाठी 48800 डॉलर उचलले असून त्याचा हिशेब त्याने दिलेला नाही. कोलंबियाने असेही सांगितले की, अजून ते राय यांच्याबरोबर चित्रपट निर्माण करण्यात सहभागी होऊ इच्छितात; मात्र त्यासाठी राय यांनी लिहून द्यायला हवे की, या पटकथेशी माईक याचा काहीही संबंध नाही. पटकथेच्या ड्राफ्टवर दोघांचे नाव असल्यामुळे राय तसे करू शकत नव्हते. त्यांनी माईकला पत्र लिहून या प्रकल्पापासून दूर होण्यास सांगितले. आता मात्र माईकने त्याचे खरे रूप दाखविले. त्याने राय यांनाच ‘चोर’ व खोटारडा’ ठरविले आणि कोणत्याही परिस्थितीत पटकथेवरील हक्क सोडणार नाही, असे कळविले. त्याने या बाबतीत सेलर्सला काय कळविले, कुणास ठाऊक; कारण 21 जून, 68 रोजी सेलर्सने रायना पत्र लिहिले, ‘तुमच्या चित्रपटातील माझी भूमिका तुम्हाला पूर्ण वाटत असेल, पण मला तसे वाटत नाही. अशी अपूर्ण भूमिका करण्यात मला स्वारस्य नाही.’

आता हा प्रकल्प रद्द झाल्यातच जमा होता. अशा परिस्थितीतही राय यांची विनोदबुद्धी शाबूत होती. त्यांनी पीटरला त्याच्याच शैलीने कवितेच्या रूपात एक पत्र लिहिले-

‘Dear Peter, if you wanted a bigger part

You should told me right at the start,

By disclosing it at this juncture

You have surely punctured

The Alien balloon

Which I dare say will now be grounded soon

Causing a great deal of dismay

To Satyajit Ray.’

सेलर्सकडून काहीच उत्तर आले नाही. नंतर काही दिवसांनी अनपेक्षितपणे आर्थर सी.क्लार्क यांच्याकडून रायना एक पत्र आले. त्यांनी लिहिले होते, ‘माईकने त्याच्या डोक्याचे मुंडण केले आहे व तो जंगलात जाऊन ध्यानधारणा करतो आहे.’

त्यानंतर काही दिवसांनी माईक विल्सनची एक चिट्ठी रायना मिळाली. तिच्यात लिहिलेले होते- ‘प्रिय रावणा, सीतेला तूच ठेवून घे. ती तुझीच आहे. तिला सांभाळ, तिला व जगाला आनंदी कर.’

उपसंहार :

सत्यजित राय यांच्या दृष्टीने हा अध्याय आता संपला होता. ते आता आपल्या नव्या चित्रपटाकडे वळले. राय यांची चरित्रकार मारी सेटन हिने ’Portrait od a Director’ या ग्रंथात त्यांच्याविषयी एक फार अप्रतिम टिपण्णी केली आहे. ती म्हणते, ‘राय यांच्याबद्दल सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे- ’his capacity never to dwell upon his trobles or difficulties. He remains serene.’

पण ही पटकथा राय यांचा पिच्छा असा सोडणार नव्हती. त्यांनी अशी पटकथा लिहिली आहे, हे आतापावेतो चित्रपटविश्वातील अनेकांना माहिती झाले होते. अधून- मधून कुणी निर्माता त्यांना या कथेबद्दल विचारी. सॅनफ्रान्सिस्को येथील एका वकिलाने त्यांना या कथेवर चित्रपट तयार करण्यासाठी फायनान्स करण्यास तयार असल्याचे 1980 मध्ये कळविले. दि.7 जून, 81 रोजी इला दत्त या वार्ताहराला मुलाखत देताना ही गोष्ट राय यांनी सांगितली. मात्र अजून काही लेखी करार झाला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘या कथेवर नव्याने थोडे काम करावे लागेल. ही कथा मी बारा वर्षांपूर्वी लिहिलेली असल्यामुळे तिच्यात त्या काळाचे बरेच संदर्भ आहेत. ते बदलून त्यांत समकालीन संदर्भ टाकणे गरजेचे आहे. शिवाय इतक्या वर्षांत स्पेशल इफेक्ट चित्रित करण्याच्या तंत्रात प्रचंड प्रगती झालेली असल्यामुळे त्यांचा उपयोगही करून  घ्यावा लागेल.’’ परंतु या नव्या घटनांतूनदेखील काहीच निष्पन्न झाले नाही.

आणि अचानक एके दिवशी बातमी आली की, 11 जून, 1982 रोजी स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा ‘E.T.’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो प्रचंड लोकप्रिय बनला आहे व टीकाकारांनीही त्याचे खूप कौतुक केले आहे. परग्रहावरून आलेला एक जीव आणि पृथ्वीवरील दहा वर्षांचा एक मुलगा यांच्या मैत्रीची कहाणी स्पिलबर्ग याने या चित्रपटात सांगितली होती. त्या वर्षीच्या हिवाळ्यात आर्थर सी.क्लार्क यांनी हा चित्रपट पाहिला, तेव्हा त्यात व राय यांच्या ’The Alien’ च्या पटकथेत अनेक साम्यस्थळे त्यांना जाणवली. त्या कथेतील काही प्रसंगांचा स्पिलबर्ग याने उपयोग करून घेतला आहे, याबद्दल त्यांच्या मनात शंका उरली नाही. त्यांनी फोन करून ही गोष्ट राय यांच्या कानांवर घातली. राय यांनी ’E.T.’ पाहिल्यावर त्यांचेही हेच मत पडले. फेब्रुवारी 1983 मध्ये ‘इंडिया टुडे’ला मुलाखत देताना ते म्हणाले की, माझ्या चित्रपटाची पटकथा बारा वर्षांपूर्वी हॉलीवुडमध्ये सर्वत्र फिरत होती. ’E.T.’would not have been possible without my script.’

या मुलाखतीत राय असेही म्हणाले की, क्लार्क यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, हे प्रकरण असेच सोडून देणे योग्य नव्हे; या संदर्भात स्पिलबर्गवर कल्पनाचौर्याची केस दाखल करायला हवी. राय यांची ही मुलाखत असीम छाब्रा नावाच्या एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याने वाचली. राय आणि स्पिलबर्ग या दोघांचाही चाहता असलेला असीम त्या वेळी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जर्नालिझमचा कोर्स करीत होता. या बातमीत त्याला एक ‘स्टोरी’ सापडली. त्याने राय,  स्पिलबर्ग व क्लार्क तिघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात त्याच्या एका मित्राने बारा वर्षांपूर्वीच्या राय यांच्या पटकथेची एक प्रत त्याला उपलब्ध करून दिली. ती वाचल्यावर असीमलाही तिच्यात व स्पिलबर्गच्या सिनेमात अनेक साम्यस्थळे आढळली. एक म्हणजे, दोन्हीमध्ये परग्रहावरून आलेल्या जीवाची व पृथ्वीवरील लहान मुलाची मैत्री दाखविली होती. दोन्ही जीवांचे दृश्यरूप जवळजवळ सारखे होते. दोन्ही जीवांजवळ जखमा बऱ्या करण्याची शक्ती होती. सुकलेली झाडे दोघेही फुलवू शकत.

स्पिलबर्गने असीमच्या पत्राला उत्तर दिले नाही. मात्र वर्तमानपत्रात जेव्हा या गोष्टीची चर्चा सुरू झाली, तेव्हा त्याने आपल्यावरील आरोप फेटाळत सांगितले की, ज्या वेळी राय यांची पटकथा अमेरिकत फिरत होती त्या वेळी तो शाळेत शिकत होता. परंतु ‘Star Weekend Magazine’ ने त्याचा हा दावा फेटाळून लावला. त्यांनी सिद्ध केले की, त्या वेळी स्पिलबर्ग हायस्कूल पास करून हॉलीवुडमध्ये सिनेमाच्या क्षेत्रात धडपडत होता. स्पिलबर्ग याचा मित्र, प्रख्यात दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेसी यानेही सत्यजित यांच्या दाव्यात तथ्य असल्याचे मत मांडले. ‘I have not qualms in admitting that Spielberg’s E.T. was influenced by Ray’s Alien. Even Sir Richard Attenborough pointed this to me.’

असा सर्व गदारोळ उठला असताना क्लार्क यांनी अचानक आपले मत बदलले. त्यांनी रायना पत्र लिहून कळविले, ‘स्पिलबर्ग याच्यावर केस करावी, असे मी म्हटल्याचे मला आठवत नाही!’ या पत्रात ते पुढे लिहितात, In any case, for God’s sake, don’t get involved with lawyers.

या पत्रामुळे राय यांचा या प्रकरणातील रस संपला. असीमला फोनवर दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘‘मी यासंदर्भात माझ्या वकिलांशी चर्चा केली आहे आणि त्यांचे मत पडले की, कायदेशीर कारवाई करण्यात अर्थ नाही. एक तर स्पिलबर्गने फक्त माझी कल्पना घेतली आहे व त्यांत खूप बदल केले आहेत. दुसरे म्हणजे, येथे भारतात बसून या गोष्टीचा पाठपुरावा करणे शक्य नाही. आर्थिकदृष्ट्या ते अवघड तर आहेच, शिवाय मी सध्या जो चित्रपट निर्माण करतो आहे त्यांत विनाकारण अडथळा येईल.’’ मग काहीसे उदास होऊन ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत माझ्या मनात त्या कल्पनेवर चित्रपट निर्माण करण्याची इच्छा होती, पण आता ती मला कायमची सोडून द्यावी लागणार आहे. कारण आता जरी मी तो चित्रपट काढला, तर लोक म्हणतील- मी स्पिलबर्गच्या कल्पनेची चोरी केली!’’

एका मनस्वी कलावंताच्या मनातले एक स्वप्न अशा प्रकारे कायमचे विरून गेले. या साऱ्या घटनामालिकेला एक रुपेरी किनार आहे. राय आणि स्पिलबर्ग यांच्यातील मतभेदांमुळे दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल कटुता निर्माण झाली नाही. राय यांनी ‘स्पिलबर्ग हा एक चांगला दिग्दर्शक आहे’ असे उद्‌गार त्याच्याबद्दल नेहमीच काढले. आणि राय यांना जेव्हा ऑनररी ऑस्कर देण्याच्या प्रस्तावावर विचार चालू होता, त्या वेळी त्याला पाठिंबा देऊन त्याचा पाठपुरावा करणारे जे चार दिग्दर्शक होते, त्यांपैकी एक स्पिलबर्ग होता!  

Tags: Film Script Alien Peter Sellers Steven Spielberg Arthur C. Clarke Satyajit Ray Vijay Padalkar Eka vidnyanpatachi nawalkahani Sadhana Diwali issue 2019 weekly Sadhana चित्रपट पटकथा एलियन पीटर सेलर्स स्टीव्हन स्पिलबर्ग आर्थर सी. क्लार्क सत्यजित राय विजय पडाळकर एका विज्ञानपटाची नवलकहाणी साधना दिवाळी अंक 2019 साप्ताहिक साधना weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विजय पाडळकर
vvpadalkar@gmail.com


प्रतिक्रिया द्या