डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

डॉ. आनंदीबाई जोशी यांना अनावृत पत्र

बाळंतपण ही नैसर्गिक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी असे तुला वाटत होते, आणि आजही प्रत्येक स्त्रीला ही प्रक्रिया सुलभ व्हावी असेच वाटते. कारण गरोदर स्त्री खूप त्रासातून जात असते, तिचे त्रास गरिबातील गरीब आणि दलितातील दलित असतात. पण मोठं आश्चर्य हे आहे की, तुला लहानपणीच हे इतकं कसं उमगलं?

प्रिय आनंदीबाई,

‘पन्नास वर्षांपूर्वी बेळगावला शिकत असताना, वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेण्याआधी बहुधा किंवा प्रवेश घेतल्यावर, माझ्या वडिलांनी ‘आनंदी गोपाळ’ ही कादंबरी मला वाचायला दिली होती. ती वाचून खरं तर मला त्रासच जास्त झाला होता. इतकी लहान असताना तुला इतकं सारं कसं कळत होतं, आणि त्याच वयाची मी असताना मला कसं इतकं कळत नाही, असं तेव्हा मला फार तीव्रतेने वाटलं होतं. एवढंच नाही तर गोपाळराव या नवऱ्याला तू इतकं कसं सहन केलंस, सोडून का नाही दिलंस असंही वाटलं होतं. त्यानंतरही तुझे संदर्भ अधूनमधून येतच राहिले. 

तुझ्यावरील साहित्यकृती- कादंबरी, चरित्र, नाटक आणि डॉक्युमेंटरी, दूरदर्शन मालिका व नुकताच प्रसिद्ध झालेला सिनेमा हे सर्व एका छोट्या मुलीने सव्वाशे वर्षांपूर्वी डॉक्टर होण्यासाठी केलेला प्रयत्न, यामुळेच केवळ असेल का? की याच्या पलीकडे तू आम्हाला विचार करायला लावणाऱ्या अनेक गोष्टी सांगून जातेस म्हणून असेल? तुझ्या मनात स्त्रियांची डॉक्टर व्हावे, हा विचार इतका प्रबळ का झाला असेल? महिलांना त्यांच्या गरोदरपणात आणि बाळंतपणात महिला डॉक्टरनेच मदत करावी असे तुला वाटत होते, याचे कारण डॉक्टर असलेल्या महिलेमध्ये वैद्यकीय ज्ञानाबरोबरच ममत्व व आस्थेची भावना जास्त असते, असेच तुझे मत होते ना? 

बाळंतपण ही नैसर्गिक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी असे तुला वाटत होते, आणि आजही प्रत्येक स्त्रीला ही प्रक्रिया सुलभ व्हावी असेच वाटते. कारण गरोदर स्त्री खूप त्रासातून जात असते, तिचे त्रास गरिबातील गरीब आणि दलितातील दलित असतात. पण मोठं आश्चर्य हे आहे की, तुला लहानपणीच हे इतकं कसं उमगलं? मी स्वतः स्त्रीरोगतज्ज्ञ असूनही मला हे कळायला खूप वर्षे लागली. मला खरं तर एम.डी. मेडिसीन करायचं होतं, कारण मी फक्त माझाच विचार करीत होते. म्हणजे महिलांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करताना मला माझी झोप आणि पाहिजे तेव्हा सुट्टी मिळणार नव्हती. परंतु माझे पती जे एमबीबीएस होते, त्यांच्या आग्रहामुळे मी गायनॉकॉलॉजिस्ट झाले. 

त्यांचं असं म्हणणं होतं की, आपण राहतो त्या परिसरातील महिलांना गायनॉकॉलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर महिलेची गरज आहे. मी ते शिक्षण घेतलं, पण सुरुवातीच्या काळात मी नाराज होते. मात्र प्रत्यक्ष प्रॅक्टिस करताना मी जे प्रसंग अनुभवले, त्यामधून तुझ्याशी सहमत झाले आणि मग माझी पुढची वाटचाल एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून आनंददायी झाली. माझ्यातील करुणेला व ममतेला त्यातून खूप खाद्य मिळालं. त्यानंतरची 40 वर्षे काम करताना मी हजारो महिलांवर उपचार करण्याचे समाधान मिळवले.   

या सर्व साहित्यकृतींमधून अजून एक दाखला सापडतो, डॉक्टर होण्यासाठी तुला स्वतःशी, जातीव्यवस्थेशी, रुढी-परंपरा आणि त्याहून अधिक दुर्दैव म्हणजे आप्तस्वकीयांशीही संघर्ष करावा लागला. हा संघर्ष तुला खूप प्रतिकूल परिस्थितीत करावा लागला. पण या परिस्थितीतही तू आनंदी राहण्याचा जणू निश्चय केला होतास, भल्याभल्यांना हे जमत नाही. बहुतेकजण आपला आनंद मिळविण्याकरता स्वार्थी बनतात, काहीजण हातबल होऊन प्रयत्न अर्ध्यातच सोडून देतात. 

तू मात्र लढत राहिलीस. सव्वाशे वर्षांपूर्वी केलेले समुद्र उल्लंघन, परकीय प्रवास आणि परदेशगमन या सर्व गोष्टींसाठी काय प्रकारचा संघर्ष तुला करावा लागला असेल, याची कल्पनाही करवत नाही. शिवाय परत मायदेशी आल्यावर आपलेच लोक आपल्याला स्वीकारतील का, हा विचार आणि भीती तुझ्या मनात होती. त्यांनी जर वाळीत टाकलं तर? हा विचार तुझा पाठपुरावा करत असणार. तुला तुझ्या घरातल्यांची आणि समाजाची सेवा करायची होती, नव्या पिढीतील मुलींसमोर एक उदाहरण घालून द्यायचं होतं. आणि त्यामुळे बेघर होण्याची वेळ आली तर त्यातील काहीच करता येणार नव्हतं. अशी मानसिक स्थिती असूनही सर्व काही तू निर्भयतेने स्वीकारलंस, मोठ्या धीराने जहाजातून समुद्रापार गेलीस, परक्या देशात चार वर्षे राहिलीस, कठीण अभ्यासक्रम पूर्ण केलास. इतर कुठल्याही गोष्टींचा परिणाम तुझ्या दृढ निश्चयावर होऊ दिला नाहीस. 

हे सगळं पाहिलं ना तर, कमालीच्या प्रतिकूलतेतून वाट काढत आपला विचार कृतीत कसा आणायचा, याचा धडा तू आम्हाला दिलास असेच मला वाटत राहते. तुला कॅरोलीनसारखी वयाने मोठी असलेली पण टेलरमेड मैत्रीण भेटली, जगण्यामध्ये केअरिंग आणि शेअरिंग मिळालं, तुला हवे असलेले उबदार व सुरक्षित घरटे तिथे मिळाले. एक भारतीय मुलगी अनेक अडथळे ओलांडून मेडिकलच्या शिक्षणासाठी अमेरिकेत येते, याचं कॅरोलीनला मोठंच कौतुक आणि प्रेम वाटत होतं. हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, ती एका ध्येयवेड्या मुलीला तिच्या मार्गातील अडथळे ओलांडण्यास मदत करीत होती. पण तिचा विश्वास संपादन करणं व चार वर्षे टिकवणं ही का सोपी गोष्ट आहे? त्यासाठीही तुला कष्ट पडले असतीलच ना? इतक्या चक्रम नवऱ्याशी तू कसं पटवून घेतलंस याचंही अनेकांना आश्चर्य वाटतं, ते मोठेच दिव्य असणार. कदाचित शून्यपेक्षा एक बरा, असे तू ठरवले असणार. 

अर्थात गोपाळरावांच्या पत्रांवरून असंही दिसतं की, ते प्रेमळही होते. आणि तसेही, कोणताही विक्षिप्त माणूस चांगल्या-वाईट विचारांचे मिश्रण असतो, त्यामुळे त्यांच्यातील चांगले आचार-विचार वेचून घ्यायचे असतात, याची तुला खूप चांगली जाण होती. म्हणूनच तू त्या काळातील हजारो मुलींपेक्षा वेगळी झालीस आणि सव्वाशे वर्षानंतरही लोकांच्या मनात राहिलीस. 

पण आनंदीबाई, तुला समाजाबद्दल असलेली जाणीव आणि कणव आज दुर्मिळ झाली आहे. आपण आपल्या कुटुंबीयांचे, नातेवाईकांचे, मित्र-मैत्रिणींचे आणि एकूण समाजाचेही असतो, हा विचार आजकाल दुर्बल होताना दिसतो आहे. आपल्या जडण-घडणीत योगदान असलेल्या समाजाला, आपण आपल्या पैशातून, श्रमातून काही तरी परत केले पाहिजे, ही जाण कमी होताना दिसते आहे. एकूण समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलायला हवा, हा साधा मुद्दाही बहुतांश लोक लक्षात घेत नाहीत. आपल्याशी संबंधित बहुतेक सर्व गोष्टींमध्ये सामाजिक आशय असतो असे मला वाटते, कारण आपण मूलतः सामाजिक प्राणी आहोत. 

त्यामुळे, जन्माला आलेल्या प्रत्येकाने लवकरात लवकर समाजाचे देणे द्यायचे असते, हा विचार माझ्या आई-वडिलांनी दिला. आम्हा भावंडांना त्यांनी सांगितले होते, एक रुपया मिळाला तर त्यातील एक पैसा गरजूला द्यावा. माझे पती डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचेही हेच म्हणणे होते. तेही सामाजिक प्रश्नांवर अखेरपर्यंत ध्येयनिष्ठेने लढत राहिले. या लढाईत लढणे हेच जिंकणे असते, असा त्यांचा विेशास होता. तुमच्यासारखी माणसे सामाजिक प्रश्नांवर लढत असतात, म्हणून इतर जण सुखरूपपणे जगत असतात. त्यामुळे तुझ्या कार्याला आणि ध्येयवेडेपणाला माझा सलाम! 

तुझी डॉ. शैला दाभोलकर 
 

Tags: डॉ. शैला दाभोलकर anandi gopal Dr. Shaila Dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. शैला दाभोलकर

स्त्रीरोगतज्ञ, पत्नी- डॉ नरेंद्र दाभोलकर 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा