डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

काही लेखक जाणीवपूर्वक ओबडधोबड भाषा वापरतात. उदाहरणार्थ- बाबूराव बागुल. त्यांच्या तशा शैलीतून जो अर्थ निर्माण होतो, तो तथाकथित वाचनीय शैलीतून होणं शक्य नाही. लेखकाला अभिप्रेत असलेला परिणाम अनुवादकाने साधण्याचा प्रयत्न केला नाही, तर तो लेखकाचा विश्वासघात ठरतो. या बाबतीत अनुवादकाने आपली भूमिका पक्की करणं अत्यंत गरजेचं असतं. मी अनुवाद करायला लागले, तेव्हाच माझी भूमिका पक्की झाली होती. स्वतंत्र लेखनात आपण कुठेही आणि कशाही उड्या मारायला मोकळे असतो, पण अनुवाद करताना आपण दुसऱ्याच्या लेखनाला बांधलेले असतो. अनुवाद हा एक प्रकारचा कायाप्रवेश असतो, अभिनयासारखा. पण सलमान खान जसा कोणत्याही भूमिकेत सलमान खानच असतो, तसे काही अनुवादकही प्रत्येक साहित्यकृतीवर आपला ठसा उमटवू पाहतात.

नमस्कार मंडळी. मला महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार घेताना तीन गोष्टींचा आनंद होत आहे, ज्यासाठी मी त्यांची मनापासून आभारी आहे. पहिला आनंद म्हणजे, महाराष्ट्र फाउंडेशन ही एक स्वतंत्र संस्था आहे याचा. या पुरस्काराला पुसटसाही सरकारी वास असता, तर तो स्वीकारताना माझी पंचाईत झाली असती. दुसरा आनंद म्हणजे, पुरस्कारासाठी माझ्याकडून ना अर्ज मागवला गेला, ना बायोडाटा. एके दिवशी अचानक विजया चौहान यांचा मला फोन आला की, ‘या वर्षी महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार तुला द्यायचं ठरलं आहे; तर तू त्याचा स्वीकार करशील का?’ मी बराच वेळ तत-पप केलं. कारण माझ्या इन-मीन दोन कादंबऱ्या, मूठभर कथा आणि थोडंफार ललित लेखन. एवढ्या ऐवजावर एवढा मोठा पुरस्कार मला कसा काय दिला जातोय, हे कळेना.

या कोड्याचं उत्तर सुनील देशमुख यांच्याकडून मिळालं. हा पुरस्कार माझ्या साहित्याबरोबर मुख्यतः माझ्या अनुवादांसाठी दिला जात आहे. हा माझा तिसरा आणि खास आनंद. कारण सर्वसाधारणपणे अनुवाद हा लेखनाचा प्रकार म्हणून मानला जात नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गोव्याला झालेल्या साहित्य महोत्सवात मला एका मुलाखतीत विचारलं गेलं की, ‘तुम्ही स्वतःला कोणत्या प्रकारची लेखिका समजता?’ कारण तुम्ही कादंबऱ्या लिहिल्या आहेत, नाटकं लिहिली आहेत, ललित लेखन केलं आहे आणि पत्रकारिताही केली आहे. मुलाखत घेणाऱ्याच्या यादीत अनुवादाचा उल्लेख नव्हता. मी म्हटलं, ‘मी स्वतःला अनुवादक समजते.त्यावर त्याचं तोंड जे आश्चर्याने उघडलं, ते उघडच राहिलं. मग स्वतःला सावरत तो म्हणाला, ‘हो- हो- अर्थातच, तेही आहेच.मी हट्टी. मी म्हटलं, ‘तेही आहेच नाही, तेच आहे. मी अनुवादक आहे. अनुवाद करताना मी माझं लेखनाचं कसब पूर्णपणे पणाला लावत असते. प्रत्येक शब्दाशी आणि वाक्याशी झगडत असते. इंग्लिशच्या सर्व शक्यता पडताळून बघत असते. उद्देश एकच असतो- संबंधित साहित्यकृतीचा आवाज आणि बाज तोच ठेवून तिला इंग्रजीत बोलतं करायचं. अनुवाद जमला की, मी माझी पाठ थोपटून घेते.

इंग्लिश कादंबरीकार टिम पार्क्सला अनुवादाबद्दल याहून वरचढ, म्हणजे उद्दाम म्हणावा असा अभिमान आहे. 2010 मध्ये ओब्सर्वरमध्ये लिहिलेल्या एका लेखात त्याने म्हटलं होतं, ‘तुम्हाला जो मिलान कुंदेरा प्रिय आहे, त्याची पुस्तकं इंग्लिशमध्ये कोण लिहितो? Michael Henry Heim. तुम्हाला ओरहान पामुक फार ग्रेट वाटतो, त्याची पुस्तकं कोण लिहिते? Maureen Freely. आणि ज्याच्या दांडग्या कल्पनाशक्तीचं तुम्ही कौतुक करता, त्या रॉबेर्तो कोलासोची पुस्तकं कोण लिहितो? तर, मी.पण पुढे पार्क्स असंही म्हणतो की, ‘माझ्या कादंबऱ्यांचे वाचक मी अनुवाद करतो हे ऐकून फारच खट्टू होतात. त्यांच्या मते खरा लेखक असतो, तो असलं दुय्यम दर्जाचं काम करीत नाही.

अनुवादाबद्दल वाचकच उदासीन असतात असं नाही, लेखकही तितकेच उदासीन असू शकतात. अरुण कोलटकरांनी जन्मात एकच मुलाखत दिली, ती कवयित्री युनिस डिसुझा यांना. डिसुझांनी त्यांना अनुवादाविषयी जेव्हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांचं उत्तर होतं, ‘इंग्लिशमध्ये जे अनुवाद करतात, ते आंतरराष्ट्रीय छाप इंग्लिश वापरतात. मूळ भाषा हिब्रू असो अथवा लॅटिन-अमेरिकन, अनुवादाची भाषा एकच असते. त्या मशीनमध्ये कोणतीही कणिक भरा, पलीकडून बाहेर पडते ती एकासारखी एक स्पगेटी. दुःखद गोष्ट अशी आहे की, अनेक अनुवादक खरोखरीच स्पगेटी बनवण्यात धन्यता मानतात.

लेखकांना अनुवादक वेगवेगळ्या कारणांसाठी आवडत नाहीत. काही लेखकांचं आपल्या हरेक शब्दावर इतकं प्रेम असतं की, त्यासाठी दुसऱ्या भाषेतला कोणताही प्रतिशब्द त्यांना पटत नाही. याचं एक उदाहरण- किरण नगरकर. त्याला त्याच्या बहिणीने केलेला सात सक्कं त्रेचाळीसचा उत्तम अनुवाद शेवटपर्यंत पसंत पडला नाही. त्याने माझ्याशी प्रत्येक शब्दावर चर्चा केली. हे बदललं, ते बदललं; तरी तो नाखूष. शेवटी त्याने उसासून अनुवाद प्रकाशकाला सुपूर्द केला. काही लेखक याउलट असतात. त्यांना निष्ठावंत अनुवादक त्रासदायक वाटतो. या बाबतीत महेश एलकुंचवारचा मला आलेला अनुभव मजेदार आहे. मी माझ्या खोलीत बसून केलेल्या अनुवादांवर तो खूश असायचा.

पण सिगल बुक्सने जेव्हा त्याची नाट्य त्रिधारा एकत्रित छापायचा घाट घातला, तेव्हा त्याची गोची झाली. त्या तीन नाटकांचे मी वेगवेगळ्या वेळी अनुवाद केले होते. प्रकाशकाला वाटलं की, तिन्ही नाटकांचे एका दमात अनुवाद केले आणि तेही लेखक-अनुवादक यांनी एकत्र बसून, तर ते एकसुती होतील आणि 100 टक्के अस्सल. म्हणून त्यांनी आम्हा दोघांना कलकत्ता क्लबच्या एका खोलीत सात दिवस डांबून ठेवले. आम्ही सकाळी नाश्त्यानंतर काम सुरू करायचो ते थेट संध्याकाळपर्यंत. पण 11 वाजेपर्यंत महेश कंटाळायचा. प्रत्येक शब्दाचा नको गं कीस काढत बसूसम्हणायचा आणि हळूहळू खुर्चीत मागे रेलून आढ्याकडे बघत बसायचा. मी मात्र ताठ बसून अनुवाद करायची.

इतर लेखकांचे इतर अनुभव आहेत. मिलान कुंदेरांचा रोष दोन प्रकारच्या अनुवादाकांवर आहे. चेक भाषा न जाणूनदेखील कुंदेरांच्या कादंबरीचा अनुवाद करणारा एक आणि अनुवादात कुंदेरांची शैली सुधारून घेणारा दुसरा. पहिल्या अनुवादकाला त्याने विचारलं, ‘बाबा रे, तुला माझी भाषा येत नाही; मग तू माझ्या पुस्तकाचा अनुवाद कसा काय केलास?’ अर्थात त्याने त्याच्या परिचयाच्या भाषेतल्या अनुवादाचा आधार घेऊन तो केला होता. पण त्याचं उत्तर होतं, ‘तुमच्या कादंबरीचा अनुवाद मी माझ्या हृदयाने केला.’ I translated with my heart. अनुवादाच्या या पद्धतीचा पुरावा म्हणून त्याने आपल्या छातीजवळच्या खिशात बाळगलेला कुंदेरांचा फोटो काढून त्यांना दाखवला. दुसऱ्या प्रकारचा अनुवादक फ्रेंच होता. कुंदेरा फ्रेंच भाषा चांगली जाणतात. त्यांच्या जोकनावाच्या कादंबरीचा या इसमाने केलेला अनुवाद वाचून ते हादरले. त्यांच्या रोखठोक वाक्यांना त्याच्या हाती अचानक फुलोरा आला होता. हाच अनुभव अमेरिकन लेखिका सुझन झोंटागला आला. तिने प्रकाशकाकडे तक्रार केली. त्यावर प्रकाशक म्हणाला, ‘तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे, पण त्यामुळे फ्रेंचमध्ये तुमचं लेखन किती वाचनीय झालंय, बघा ना-पण सुलभ वाचनीयता लेखकाच्या साहित्यकृतीचं उद्दिष्ट नसेल तर?

काही लेखक जाणीवपूर्वक ओबडधोबड भाषा वापरतात. उदाहरणार्थ- बाबूराव बागुल. त्यांच्या तशा शैलीतून जो अर्थ निर्माण होतो, तो तथाकथित वाचनीय शैलीतून होणं शक्य नाही. लेखकाला अभिप्रेत असलेला परिणाम अनुवादकाने साधण्याचा प्रयत्न केला नाही, तर तो लेखकाचा विश्वासघात ठरतो. या बाबतीत अनुवादकाने आपली भूमिका पक्की करणं अत्यंत गरजेचं असतं. मी अनुवाद करायला लागले, तेव्हाच माझी भूमिका पक्की झाली होती. स्वतंत्र लेखनात आपण कुठेही आणि कशाही उड्या मारायला मोकळे असतो, पण अनुवाद करताना आपण दुसऱ्याच्या लेखनाला बांधलेले असतो. अनुवाद हा एक प्रकारचा कायाप्रवेश असतो, अभिनयासारखा. पण सलमान खान जसा कोणत्याही भूमिकेत सलमान खानच असतो, तसे काही अनुवादकही प्रत्येक साहित्यकृतीवर आपला ठसा उमटवू पाहतात.

अशा एका बार्इंना एक लेखिका माझ्याकडे घेऊन आली होती. लेखिकेचं म्हणणं होतं- तिने लिहिलेलं चरित्र जसंच्या तसं, त्यातील सर्व तपशिलासकट अनुवादित व्हावं. अनुवादिकेचं म्हणणं होतं, असं कसं शक्य आहे? आपण अनुवाद करीत असताना आपली भाषा, शैली आणि वेळेनुसार आपल्याला सुचलेलं अधिक काही अनुवादात आपोआप उतरणारच. लेखिकेने मला विचारलं, ‘अनुवादाच्या नियमात असा हस्तक्षेप बसतो का?’ मी म्हटलं, ‘अनुवादाचे नियम कोणीही लिहून ठेवलेले नाहीत. ते प्रत्येकाने आपापल्यापुरते ठरवायचे असतात.लेखिका म्हणाली, ‘तुम्ही ठरवलेले नियम काय आहेत?’ मी समोरच्या सलमान खानचे डोळे चुकवत म्हटलं, ‘मी अनुवादात मूळ साहित्यकृतीच्या बाहेरचं काहीएक घालत नाही. हा नियम मी माझ्या स्वतःच्या कादंबऱ्यांचे अनुवाद केले, तेव्हादेखील काटेकोरपणे पाळलेला आहे.अनुवादात आणखी एक कळीचा मुद्दा आहे. तो म्हणजे- आपण अनुवाद का करतो आणि कोणत्या साहित्यकृतींचा करतो, हा. मात्र काही लोकांना आपण अनुवाद कोणासाठी करतो, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो. एक होतकरू अनुवादिका माझ्याशी चर्चा करायला आली. तिने मला विचारलेला पहिला प्रश्न- तुम्ही अनुवाद कोणासाठी करता?’ मी म्हटलं, ‘माझ्यासाठी.तिला वाटलं, मी विनोद करतेय म्हणून ती जोरजोराने हसली. मग म्हणाली, तसं नव्हे. म्हणजे, तुम्ही ज्या वाचकांसाठी करता त्यावर तुम्ही कोणतं इंग्लिश वापरता, हे अवलंबून असेल; नाही का?’ मी म्हटलं, ‘नाही. मी कोणतं इंग्लिश वापरते, ते मूळ साहित्यकृतीवर अवलंबून असतं.तिला वाटलं, मला तिच्या प्रश्नाचा रोख लक्षात आला नसावा, म्हणून तिने खुलासा केला- माझ्या म्हणण्याचा अर्थ की, अमेरिकन वाचक डोळ्यांसमोर असेल, तर अमेरिकन इंग्लिश वापरायला हवं; नाही का?’ तिच्या डोक्यात अनुवादप्रक्रियेबद्दल इतका घोळ होता की, तिला काय आणि किती सांगावं लागणार, या विचारानेच मी थकले.

एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की, अनेक लेखक आणि अनुवादक अमेरिकेत पोचण्याची आकांक्षा मनात बाळगून असतात. एक लेखक आपली दोन पुस्तकं घेऊन माझ्याकडे आले. त्यांच्या वर्तमानपत्रातल्या सदरांचे ते संग्रह होते. लेखकसाहेब मला म्हणाले, ‘माझी ही पुस्तकं महाराष्ट्रात खूप लोकप्रिय झाली आहेत. अमेरिकेतही होतील, कारण त्यांचा व्याप ग्लोबल आहे. तर तुम्ही जरूर त्यांचा अनुवाद करा. तुमची कीर्ती थेट अमेरिकेत पोचेल.मी त्यांना चहा दिला, बिस्किटं दिली आणि म्हटलं, ‘अमेरिकेपर्यंत झेप घेणं मला झेपणार नाही.त्यांना फारच आश्चर्य वाटलं. तरीही विचार कराम्हणाले आणि दोन्ही पुस्तकं माझ्याकडे सोडून गेले. मी ती शेजारच्या वाचनालयाला दिली.

तर, आपण अनुवाद कोणाकरता करतो, हा गैरलागू मुद्दा सोडून; तो का करतो, या प्रश्नाकडे वळू या. या प्रश्नाचं उत्तर सुझन झोंटागने दिलेलं आहे. ज्या साहित्यकृती एकदा वाचून संपत नाहीत तर पुन:पुन्हा वाचाव्याशा वाटतात, त्या जागतिक साहित्याच्या पिरॅमिडध्ये उच्च स्थानी असतात. अशा साहित्यकृतींचा अनुवाद करणं हे आपलं नैतिक कर्तव्य असतं. एवढंच नव्हे, तर अशा साहित्यकृतींचा काही पिढ्या उलटल्यानंतर पुन्हा अनुवाद व्हावा.स्मृतिचित्रे या आत्मचरित्राचा 60 वर्षांपूर्वी एक  आणि 30 वर्षांपूर्वी एक, असे दोन अनुवाद झालेले असतानाही मी गेल्या वर्षी त्याचा तिसरा अनुवाद केला.

काही श्रेष्ठ साहित्यकृती अनुवादाच्या दृष्टीने आव्हानात्मक असतात. त्यांचा अनुवाद करण्यात एक वेगळंच समाधान असतं. सतीश आळेकरांचं बेगम बर्वेहे नाटक अशा कलाकृतींत मोडतं. त्याचा अनुवाद करावा, असं मला खूप वर्षें वाटत होतं. शेवटी मी म्हटलं, ‘चल, खाज आहे ना तुला, मग बस आणि कर अनुवाद.केला. काही अमराठी नाटकवाल्यांना वाचून दाखवला. त्यांना तो आवडला. नाटक प्रकाशित होऊन अनेक वर्षं लोटली, तरी त्यातल्या सूत्रधाराच्या पहिल्या भाषणाबद्दल मी अजूनही समाधानी नाही. अधून-मधून मी त्याच्याकडे वळत असते आणि पुन्हा प्रयत्न करत असते. हळूहळू त्या महाकठीण भाषणाचा अनुवाद जमत आला आहे; तरीही 100 टक्के नाही. तसंच 80 च्या दशकात मी ब्रेश्तचं गॅलिलिओ गालीलेईहे नाटक पुन्हा म्हणजे चौथ्या-पाचव्यांदा वाचलं, तेव्हा एकाएकी मला पहिल्या प्रवेशातल्या गॅलिलिओच्या भाषणातला एक उतारा मराठीत स्पष्ट ऐकू येऊ लागला. ताबडतोब लेखणी काढून मी कामाला लागले. एकेक वाक्य अनुवादित होत होतं, तशी माझी excitement वाढत होती. आपली शहरं संकुचित आहेत, तशीच माणसांची मनंही. पण आता आपल्या मनात विचार येऊ लागला आहे की, केवळ असं आहे म्हणून ते असंच राहणार आहे का? नक्कीच नाही. कारण प्रत्येक गोष्टीला गती असते. आपली जहाजं जेव्हा स्वदेशाचे तीर सोडून खुल्या समुद्राला कापत नव्या देशांचा शोध लावू लागली, तेव्हा जगात एक प्रचंड हशा पिकला. आपल्या प्राचीन खंडावर अफवा उठली की, जगात इतरही देश आहेत आणि समुद्र म्हणजे केवळ तळ आहे. आता सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाऊन त्यांची कारणं शोधून काढण्याची प्रेरणा आपल्यात संचारली आहे. दगड खाली टाकला की, खाली का पडतो? वर फेकला की, वर का जातो? आज जख्खड म्हातारेदेखील तरुणांकडून नव्या शोधांची खबर कानात ओरडून घ्यायला उत्सुक आहेत.हे भाषण अनुवादित केल्यावर मी अख्खं नाटक केलं. हा अनुवाद माझ्यासाठी एक गृहपाठ होता.

सांगायची गोष्ट म्हणजे, त्याच सुमारास राजीव नाईक यांनी त्याच नाटकाचा अनुवाद केला होता आणि तो मंचित होण्याच्या बेतात होता. पिरॅमिडच्या शिखरावरच्या साहित्यकृती अनेक अनुवादकांना खुणावत असतात. अशाच आणखी एका साहित्यकृतीने मला गेली तीनचार वर्षे पछाडलेलं आहे. मर्ढेकरांची पिपात मेले ओल्या, उंदीरही कविता. मी फारशी कवितेकडे वळलेली नाही, पण काही वर्षांपूर्वी विलास सारंग यांनी मर्ढेकरांच्या 40 कवितांच्या अनुवादाचा संग्रह स्वखर्चाने खासगी प्रसारासाठी छापला. खासगी का, तर मर्ढेकरांच्या कुटुंबीयांनी आजपर्यंत त्यांच्या कोणत्याही कवितेचा अनुवाद प्रकाशित करण्याची परवानगी दिलेली नाही. सारंगांनी केलेल्या पिपात मेले...चा अनुवाद मला पटला नाही. त्यात उघड आणि गर्भित अर्थासकट कवितेचा ध्वनी, तोल, लय यापैकी एक-दोन गोष्टी त्यांच्या हातून सटकल्या आहेत, असं वाटलं. मुख्य म्हणजे कवितेच्या दोन महत्त्वाच्या ओळींचा तोल आणि गांभीर्य त्यांना पकडता आलेलं नाही, असं मला वाटलं. जगायची पण सक्ती आहे/मरायची पण सक्ती आहे, याचा अनुवाद त्यांनी Living is obligatory/ so too is dying असा केला आहे. त्यात मर्ढेकरांचा विचार गुंडाळून टाकल्यासारखा वाटतो. म्हणून मी या कवितेच्या मागे लागले आहे. ही कविता माझ्यासाठी रियाजासारखी झाली आहे. मी तिचे अनेक प्रकारे अनुवाद केले आहेत. पण दरखेपी माझी गाडी त्या दोन खतरनाक ओळींवर येऊन अडकते. मात्र, त्यांच्याशी माझी लढाई चालू आहे. शेजारी मर्ढेकर असतातच. स्वतंत्र लेखनात आपण एकाकी असतो. पण अनुवाद करत असताना मूळ लेखक आपला भिडू असतो. अनुवाद करताना मजा येते ती त्यामुळे.

(महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना 27 जानेवारी 2019 रोजी, पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात केलेले हे भाषण आहे.)

Tags: भाषण साहित्य जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) मुंबई शांता गोखले sahitya jeevangaurav purskar shanta gokhale speech Maharashtra foundation weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शांता गोखले,  मुंबई, महाराष्ट्र
shantagokhale@gmail.com

 लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक


प्रतिक्रिया द्या