डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

आठवीत असताना अँटी-रिझर्व्हेशन मूव्हमेंटमध्ये मी होते. आम्ही भोपाळला होतो आणि मंडल कमिशनला विरोध करण्यासाठी ज्याने स्वतःला जाळून घेतलं, तो राजीव गोस्वामी माझा आदर्श होता. तेव्हा मला वाटायचं की, ‘खरंच किती अन्याय होतोय ब्राह्मणांवर! मिळतं त्यांना जास्त, तर ठीक आहे ना! त्यात काय गैर आहे?’ आणखी एक विशेष म्हणजे, मला त्या बाबरी मशिदीपाशी जाऊन माझ्या हाताने हातोडा मारून त्या डोमची एक तरी वीट पाडायची होती! तिथे राम मंदिर झालंच पाहिजे, या मताची मी होते. आणि हे सगळं करण्याला माझ्या घरून खूप पाठिंबा होता. कदाचित त्यामुळेही माझं खूप कौतुक झालं असावं.  

नर्मदा बचाव आंदोलनाविषयी आपल्याला तुकड्या- तुकड्यांतच माहिती असते. काहींनी तर हा विषय ऑप्शनला टाकलेला असतो. याची दोन महत्त्वाची कारणे. एक म्हणजे- हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे किंवा तसं दिसतं तरी. दुसरं म्हणजे, तुम्हाला-आम्हाला यात करण्यासारखं काही नाही, असं अनेकांना वाटतं. म्हणजे जे काही व्हायचं किंवा करायचं आहे ते सरकार, न्यायालये आणि आंदोलनकर्ते यांनीच करायचं आहे, असा तयार झालेला भल्याभल्याचा समज! कधी कधी आंदोलनकर्त्यांकडून, माध्यमांकडून त्याबाबतचा वैताग त्याच त्या पद्धतीने व्यक्त  झाल्याने बहुतांश लोकांनी कान व डोळे बंद केलेले असतात. परिणामी नर्मदा बचाव आंदोलनाचं रूप किती मोठं आहे? तिथल्या धरणांविषयीची वस्तुस्थिती काय आहे? नेमकी किती गावं अफेक्टेड आहेत? परिस्थिती किती आणि कशी कठीण आहे? आणि जे काही सुरू आहे त्याचं पुढे काय होणार आहे?... वगैरे. याबद्दल तपशीलवार माहिती सर्वसामान्य लोकांकडे नसते. त्यामुळे या विषयावर अभ्यास करून आणि प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन बनवलेली एखादी फिल्म महत्त्वाचं माध्यम ठरू शकते. ‘लकीर के इस तरफ’ या फिल्मने नर्मदा बचाव आंदोलनाच्या बाबतीत हे सिद्ध केलं आहे.

आंदोलन-चळवळ यांसारख्या विषयावर एखादी फिल्म आहे, असं आपण ऐकतो; तेव्हा आपण हे गृहीत धरतो की, ती फिल्म थोडी लाऊड असणार. त्यात अवजड आणि कठीण शब्दांचा मारा केलेला असणार. गोष्टी ‘बढा- चढाकर’ सांगितल्या गेल्या असणार. आपल्याला जे माहिती आहे तेच तिथे ऐकायला-बघायला मिळणार... वगैरे. मात्र या सगळ्याच्या उलट ‘लकीर के इस तरफ’ ही फिल्म आहे! या फिल्मच्या संवादात किंवा निवेदनात वापरले गेलेले शब्द आणि भाष्य कमालीचे सौम्य असूनही वास्तव ठामपणे मांडणारे आहेत. त्यामुळे ही फिल्म 98 टक्के लोकांसाठी अतिशय इफेक्टिव्ह ठरते. इतकी अनास्था, राजकीय- सामाजिक परिस्थिती, सभोवतालचं वातावरण आणि त्रास प्रत्यक्ष अनुभवूनसुद्धा या फिल्ममध्ये कुठेही मोठी विशेषणे वापरलेली नाहीत आणि म्हणूनच या फिल्मची कन्व्हिन्सिंग पॉवर जास्त आहे. या फिल्मवर टीका करणे कोणालाही बरेच अवघड जाणार आहे. कारण टीका कशावर करणार? जे काही वास्तव आहे, ते अजिबात वाढवून-चढवून न सांगता प्रत्यक्ष आहे तसं या फिल्मद्वारे प्रेक्षकांसमोर मांडले आहे. ही फिल्म पुढे सरकते तसे या सगळ्या वास्तवासोबत येणारे प्रश्न अगदी नम्रपणे, पण ठामपणे प्रेक्षकांसमोर उभे राहतात. म्हणूनच ही फिल्म प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आहे.

आणि म्हणूनच ‘लकीर के इस तरफ’ची लेखिका, दिग्दर्शिका, कॅमेरामन, निवेदिका अशी ‘सबकुछ’ असलेल्या शिल्पा बल्लाळची ही मुलाखत. यातला पहिला टप्पा म्हणजे, शिल्पाचा या फिल्मपर्यंत पोहोचण्याचा प्रवास. दुसरा टप्पा, मनात फिल्म करायचा विचार आल्यानंतर फिल्ममेकिंगची प्रोसेस- म्हणजेच स्क्रिप्ट लिहिणे, शूटिंग, एडिटिंग वगैरे. आणि तिसरा टप्पा म्हणजे, फिल्म रिलीज झाल्यानंतरचे अनुभव. असे तीन टप्पे लक्षात ठेवून ही मुलाखत घेतली आहे. एका अर्थाने ‘अ शॉर्ट आटोबायोग्राफी ऑफ शिल्पा बल्लाळ विथ रेफरन्स टू धिस फिल्म’!

प्रश्न - लहानपणापासून तुला मिळालेलं सभोवतालचं वातावरण, त्यानुसार झालेली जडण-घडण आणि आज तू जे काही करते आहेस, हे सर्व लक्षात घेता, स्वत:बद्दल तू काय सांगशील?

शिल्पा बल्लाळ - आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा आपली जडण-घडण होण्याशी संबंध असतो, यावर माझासुद्धा विेश्वास आहे. माझ्या शिक्षणाची सुरुवात नागपूरच्या एका मराठी शाळेतून झाली. नंतर बदली होऊन आम्ही भोपाळला गेलो तिथे मला ‘हिंदी माध्यमाच्या शाळेपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू या’ असा माझ्या आईचा आग्रह होता. तेव्हा मुलाला इंग्रजी माध्यमात आणि मुलीला मराठी किंवा हिंदी माध्यमात टाकण्याची पद्धत होती, त्यामुळे आईने धरलेल्या आग्रहाचं मला आता आश्चर्य वाटतं. पण मराठी माध्यमातून अचानक इंग्रजी माध्यमात आल्यामुळे माझ्यात जरासा न्यूनगंड तयार झाला होता. या अचानक झालेल्या बदलामुळे कधी कधी मला शंका वाटायची की- हे सगळं नवीन जे काही आहे, ते मला जमेल की नाही?

पण आमचं घराणं अत्यंत सुशिक्षित होतं. आजी- आजोबा प्रचंड शिकलेले होते. आजीसुद्धा नोकरी करायची. माझ्या आईचे आई-वडील आणि वडिलांचे आई-वडील असे माझे चौघे आजी-आजोबा कवी होते. त्यांचे कवितासंग्रहसुद्धा प्रकाशित झाले आहेत. म्हणून लहानपणापासून मी कविता करू लागले याचं खूप कौतुक झालं. त्यामुळे खूप लहानपणापासून मी भारी आहे, असंच वाटत राहायचं आणि म्हणून कॉन्फिडन्स व ओव्हर- कॉन्फिडन्स या दोन्हीमध्ये मी आलटून-पालटून असायची. वयाच्या नवव्या वर्षी माझ्या कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम वगैरे व्हायचे! माझे पणजोबा स्वातंत्र्यलढ्यात होते. ते असहकार चळवळीत काँग्रेसतर्फे काम करत असताना तुरुंगात गेले होते. मात्र आजोबांचे विचार पणजोबांच्या एकदम विरुद्ध होते. पणजोबा आणि आजोबा यांच्यात राजकीय व वैचारिक पातळीवर प्रचंड कॉन्फ्लिक्ट होता. जसा आत्ता माझ्यात आणि माझ्या पालकांमध्ये आहे. आमची फॅमिली अत्यंत राईट विंग आहे. म्हणजे अगदी हार्डकोअर आरएसएसचे विचार असणारी फॅमिली आहे,  असंही म्हणायला हरकत नाही.

प्रश्न - ही पार्श्वभूमी लक्षात घेता, तुझे विचार नेमके कसे घडत व बदलत गेले हे सविस्तर ऐकायला आवडेल.

- खरं सांगायचं झालं, तर मी दुर्गावाहिनीत वगैरे गेले असते- इतक्या मिलिटंट विचारांची होते. त्यामुळे कधी कधी आश्चर्य वाटतं की, माझी भाषा इतकी शांततापूर्ण कशी झाली? अर्थातच त्याचं क्रेडिट मी माझ्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या माणसांना देते. अत्यंत मिलिटंट स्वभावाची मी होते. तेव्हाच्या माझ्या कविता इतक्या उग्र आहेत आणि आता त्याची खूप लाज वाटते. नथुराम गोडसेंचं कौतुक करणारी एक कविता आहे. ती कविता केली याचा आज मला अत्यंत गिल्ट आहे, कारण गांधींना मारलं ते कसं बरं झालं या आशयाची ती कविता आहे. पण तरीसुद्धा मी ती ठेवली आहे; कारण जर मी भरकटले, तर त्या कवितेमुळे लाज वाटून का होईना परत जागेवर येईन असं वाटतं.

आठवीत असताना अँटी-रिझर्व्हेशन मूव्हमेंटमध्ये मी होते. आम्ही भोपाळला होतो आणि मंडल कमिशनला विरोध करण्यासाठी ज्याने स्वतःला जाळून घेतलं, तो राजीव गोस्वामी माझा आदर्श होता. तेव्हा मला वाटायचं की, ‘खरंच किती अन्याय होतोय ब्राह्मणांवर! मिळतं त्यांना जास्त, तर ठीक आहे ना! त्यात काय गैर आहे?’ आणखी एक विशेष म्हणजे, मला त्या बाबरी मशिदीपाशी जाऊन माझ्या हाताने हातोडा मारून त्या डोमची एक तरी वीट पाडायची होती! तिथे राम मंदिर झालंच पाहिजे, या मताची मी होते. आणि हे सगळं करण्याला माझ्या घरून खूप पाठिंबा होता. कदाचित त्यामुळेही माझं खूप कौतुक झालं असावं. कारण त्या सगळ्या मिलिटंट आणि उग्र विचारधारेला मी कवितेमध्ये उतरवत होते. माझं चालणं-बोलणं तसंच होतं. शाळेत ज्या काही वादविवाद स्पर्धांमध्ये किंवा इतर स्पर्धेत बोलायचे, तिथेसुद्धा असेच उग्र विचार मांडायचे.

आमच्या लहानपणी ‘चाणक्य’ नावाची एक टी.व्ही. सिरियल चालू होती. तेव्हा आजी-आजोबांनी मला एक पत्र लिहिलं होतं की, ‘अशा प्रकारची एखादी कलाकृती तूसुद्धा तयार करू शकतेस. तुझ्यात ती प्रतिभा आहे.’ तेव्हा मला कुठे तरी असं स्ट्राइक झालं असावं की, असं काही तरी आपण करायला पाहिजे. त्यामुळे एखादी लार्ज स्केल फिल्म आपण करूया, असा ओव्हर-कॉन्फिडन्स घेऊनच मी फिरत होते. दुसऱ्या बाजूला शिक्षण सुरू होते. सायन्सला असल्याने तर मेडिकलला जायलाच पाहिजे, असं आसपासचं वातावरण होतं. मला मार्कही खूप चांगले मिळत गेले, त्यामुळे भीती अशी होती की, मला मेडिकलला ॲडमिशन मिळणार. त्यामुळे काळजी वाटत होती की, माझं जे सिनेमा बनवायचं स्वप्न आहे, ते अर्धवट राहणार. आपल्याला एक मोठी फिल्म करायचीच आहे, हे डोक्यात कुठे तरी होतं. पण मला त्यातली काहीही अक्कल नव्हती. फिल्म डायरेक्शन म्हणजे काय, त्यासाठी काय करावं लागतं? काय शिकावं लागतं? याबद्दल किंचितही माहिती नव्हती; पण काही तरी भारी आपल्याला करायचं आहे, इतकं नक्की होतं.

थँकफुली, माझ्या बाबांची बदली बडोद्याला झाली आणि माझं मेडिकलची ॲडमिशन वगैरे सगळं कॅन्सल झालं. तिथून पुढे मनात असं खूप यायचं की, आपण गावांमध्ये जाऊन काही तरी काम करणार आहोत. वस्तुत: गावाचा आणि माझा फारसा संबंध आलेला नाही. कारण पूर्ण काळ मी शहरात राहिलेली व्यक्ती आहे. आजी मध्य प्रदेशमध्ये छिंदवाडा नावाच्या गावात असल्याने माझा जन्म तिथला आहे. गावाचं तेवढं एक कनेक्शन मात्र माझ्या वर्तमानासोबत कुठे तरी आहे, असं मला वाटतं. ही गोष्ट मी फिल्ममध्येसुद्धा घेणार होते. पण या फिल्मच्या स्क्रिप्टचा टोन तसा नव्हता म्हणून ते वगळलं. तर लहानपणी मामाच्या गावाला जेव्हा मी जायचे, तेव्हा तिथे अहिर व गोंड हे आदिवासी शेतात आणि घरात काम करायला यायचे. मला वाटायचं की, ही माणसे खूपच इंटरेस्टिंग आहेत. जरी त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. नागपूरहून जेव्हा आम्ही तिकडे जायचो, तेव्हा घाटातून त्यांची घरे दिसायची. त्या छोट्या-छोट्या झोपड्या वगैरे. मला ‘आदिवासी’ या गोष्टीचं आज खूपच आकर्षण आहे. याचं कारण कदाचित हेसुद्धा असेल की, मी लहानपणापासून आदिवासींबद्दल खूप उलट ऐकत आलेली आहे. म्हणजे जसे की- आदिवासी चोर असतात, ते अप्रामाणिक असतात, त्यांच्याशी फार जवळीक साधू नये, ते आपल्यासाठी राबण्याकरताच असतात वगैरे.

त्यात एक भयंकर प्रथा अशी होती की, आमच्या घरी काम करणारी आजोबांच्या वयाची आदिवासी माणसंही आमच्या सर्वांच्या पाया पडायची. ही गोष्ट खूप लहान असल्यापासून मला खटकायला लागली होती. आपल्याला तर असे शिकवले आहे की, आपण मोठ्यांच्या पाया पडत असतो. मग ही मोठी माणसं लहान मुलांच्याही पाया का पडतात? सातवी-आठवीपर्यंत याबद्दल काही बोलण्याची माझी हिंमत नव्हती. ते पाया पडायला आले की, मी मागे सरकायचे. नंतर एकदा असं झालं की- एक वयस्कर गृहस्थ होते, ज्यांनी मला पाया पडून नमस्कार केला; तेव्हा मीही त्यांना तसाच नमस्कार केला. त्यामुळे आमच्या घरचे सगळे असे शॉक्ड झाले की, काय करते ही मुलगी! तेव्हा मग मी सगळ्यांना सांगितलं की- ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, त्यांनी मला नमस्कार केला तर मीही करणार. यावर मला घरातल्यांनी खूप समजवलं की, त्यांनी पाया पडून नमस्कार केला की, त्यांना बरं वाटत असतं वगैरे...

पण मला काही ते पटेना! म्हणजे नमस्कार करून, वाकून कसं बरं वाटेल कुणाला? आपण घरातल्या उरलेल्या वस्तू वा पदार्थ कोणाला तरी देऊन टाकतो, ते घ्यायला कसं छान वाटेल त्यांना? असे प्रश्न पडायचे. आमच्या घरी काम करणाऱ्या महिलांसाठी अक्षरश: चहाचे वेगळे कप असायचे. लहानपणी आपल्याला अजिबात कल्पना नसते की, हे सगळं काय आहे? जे आहे ते आहे, असंच करायचं असतं, हेच सांगितलं जातं- तेच आपण करतही असतो. शिवाय लहान असल्यामुळे आपल्यावर फार विचार करायची वेळ कधी येत नाही किंवा येऊ दिली जात नाही. मी बारावीमध्ये गेल्यानंतर मात्र असं वाटायला लागलं की, आता मला त्यांच्याच कपात चहा प्यायचा आहे आणि असा कसा आई वेगळा कप ठेवते... वगैरे. पण घरातलं वातावरण असं होतं की, इतकं वाटूनसुद्धा माझी कधी तसं वागायची हिंमत झाली नाही.

पुढे असं झालं की, सायन्स हा अत्यंत आवडीचा भाग असल्याने मी झूलॉजीमध्ये बीएस्सी केलं. त्यानंतर एमएस्सी करण्याची वेळ आली, तेव्हा मनात विचार आला की, आपण एमएस्सी केलं तर आपल्या घरचे लोक लगेच लग्न करून टाकतील. मग कुठे तरी स्वयंपाक करत बस, कुणाच्या तरी पुढे-पुढे करत बस- हे करावे लागेल. हे काही माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. त्यातल्या त्यात एक बरं होतं की, घरातून शिक्षणाला सगळ्यांचा सपोर्ट होता. कुणी तरी सांगतलं की, एमबीए कर. पण त्यामध्ये गणित असल्यामुळे मी त्यासाठी तयार नव्हते. माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की, तू एचआर व्हायला हवंस. मग एकाने सुचवलं की, तू एमएसडब्ल्यूचा कोर्स कर, त्यामध्ये गणित नसतं आणि त्यातून तुला एचआरसुद्धा होता येईल. आणि मग माझा एमएसडब्ल्यूचा प्रवास 1996 मध्ये सुरू झाला. हा खरा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणता येईल. तिथून माझा खऱ्या अर्थाने एकूण समाजाबद्दलचा अभ्यास आणि चिकित्सा सुरू झाली. जसंजसं वास्तव लक्षात येत गेलं तसंतसं माझ्या विचारांमध्ये बदल होत गेले.

प्रश्न - रिझर्व्हेशन कसं चुकीचं आहे, बाबरी मशीद पाडून राममंदिर कसं झालंच पाहिजे, गांधीजी अहिंसेबद्दल जे सांगतात तो बावळटपणा आहे... अशा मिलिटंट असण्याच्या मुख्य तीन लक्षणांपासून ते ‘लकीर के इस तरफ’ ही फिल्म बनवून, ठामपणे मिलिटंट विचारधारेविरुद्ध मत मांडण्यापर्यंतचा तुझा हा प्रवास धाडसी आहे, असं म्हणायला हरकत नाही. तर, आदिवासी आयुष्याबद्दल तुला लहानपणापासून आकर्षण होतं, असं तू सांगितलं आहेस. हा प्रवास पुढे इतका फोकस्ड आणि ठाम कसा होत गेला?

- मी जसं आधी सांगितलं की- छिंदवाडा हे आमच्या मामाचं गाव होतं, तिथे पातालकोट नावाची एक अत्यंत फेमस जागा आहे. तिथे तामिया नावाचं एक जंगल आहे. त्या जंगलात आम्ही लहानपणी जायचो. रूडयार्ड किपलिंगचा जो  मोगली आहे, तो तिथल्या करमाजिरी नावाच्या जागी सापडला होता, अशी एक कल्पित कथा आहे. हे लहानपणापासून आम्ही ऐकलेलं होतं. त्यामुळे आम्ही तिथे सतत जायचो आणि लहान मुलांच्या मनात जसे विचार येतात तसे आमच्या मनात यायचे की- मोगली आपल्याला सापडला तर... वगैरे.

तेव्हापासूनच मी मनात अशा गोष्टी रचायचे आणि खूप लिहूनही ठेवायचे. तिथली पातालकोट ही जागा म्हणजे एक मोठी दरी आहे. साधारण सात किलोमीटर इतकी त्रिज्या असलेला तो भाग आहे. लहानपणी आम्हाला सांगितलं जायचं की, तिथे पंचवीस गावं आहेत आणि ती खूप खोलवर, खाली आहेत. तिथली माणसं फक्त मीठ व कापड घ्यायला वर येतात. त्यांना आपली भाषा येत नाही. त्यांच्याजवळ तीर- कमान असतात, आपण त्यांच्यापासून सांभाळून राहायला हवं. आपण त्यांच्याजवळ गेलो, तर ते आपल्याला मारतात किंवा लुटतात. या अशा गोष्टी लहानपणी मी ऐकल्या होत्या. कदाचित त्यामुळेच मला त्या लोकांबद्दलची आणि एकदा तरी त्यांना बघायची भयंकर क्युरिऑसिटी होती.

गंमत म्हणजे आमच्या घरी जे लोक येतात तेच हे आदिवासी असतात, हे मला माहीत नव्हतं. मला वाटायचं की, हे नोकर असतात, आणि आदिवासी म्हणजे जे पातालकोटमध्ये राहतात, ते. तर  माझी फार इच्छा होती की, एक तरी आदिवासी मला त्या पातालकोटमधून वर येताना दिसावा. एमएसडब्ल्यूनंतर माझी प्लेसमेंट रूरल भागात झाली, तेव्हा हा फरक हळूहळू लक्षात यायला लागला. एमएसडब्ल्यू करत असताना गगन सेठी नावाचे एक गृहस्थ आले होते. त्यांनी आम्हाला एकीकडे इंडस्ट्रीमध्ये जाऊन व्हाइस प्रेसिडेंटपर्यंत पोहोचणे, भरपूर पैसे कमावणे आणि दुसरीकडे एखादी एनजीओ जॉईन करून ग्राउंड लेव्हलला काम करून गरजेपुरते पैसे व समाधान मिळवणे यातला फरक सांगितला होता, जो मला पटला होता. त्यामुळे माझ्या नोकरीच्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा गावापासून झाली. त्या पहिल्या नोकरीपासून (आता बावीस वर्षे झाली) घराबाहेर आहे. विशेष म्हणजे माझ्या परिवाराने याला कधीही विरोध केला नाही. आमच्या घरातलं वातावरण शिस्तीचं असलं तरी, त्यामुळे आमचे हाल वगैरे होत होते असं काही नाही.

माझ्या विचारात परिवर्तन होण्याचं आणखी एक स्ट्राँग कारण म्हणजे, वेगवेगळ्या जातींच्या व्यक्तींशी मैत्री होणं! यामुळेही माझ्या विचारांच्या कक्षा रुंदावायला मदत झाली. दरम्यान खूप वेगवेगळी कामं मी करून बघत होते. म्हणजे विविध एनजीओमध्ये नोकरी करणे, ट्रान्सलेशनची कामे करणे, मध्येच न्यूज रिडिंग करणे वगैरे. मात्र काहीच वर्षांत मी एनजीओमार्फत फिल्डवर्क करणे, ट्रेनिंग देणे, त्याचं डॉक्युमेंटेशन बघणे यामध्ये रमले. अनेक ठिकाणी काम करताना माझे वाद-विवादसुद्धा झाले, काही वाद तर अगदी लीगल ॲक्शन होईपर्यंत गेले. कारण मला कुठल्याही चुकीच्या कागदावर सही करणे किंवा समोरच्या व्यक्तीवर अन्याय होईल असं काम करून घेणे कधीच मान्य नव्हते.

तसंही ठराविक काळानंतर नोकरीत तुम्ही वरच्या पोझिशनवर जायला लागता, तसतसा फिल्डशी आणि लोकांशी संबंध कमी होत जातो. त्यामुळे पुढे नोकरी करण्याची माझी अजिबात इच्छा राहिली नव्हती. काही तरी वेगळं करायचं होतं. म्हणजे असं काही तरी- ज्यात प्रवास असेल, वेगवेगळ्या लोकांना भेटणं असेल वगैरे. तरी यादरम्यान गाव आणि आदिवासी यांच्याशी निगडित काही ना काही कामे मी करत होते, असं आता इथे सांगताना माझ्या लक्षात येतंय.

प्रश्न - लहानपणापासूनच तुझं स्वप्न होतं की, तुला एक मोठी फिल्म बनवायची आहे. मात्र तुझं त्यात प्रशिक्षण झालेलं नव्हतं. या फिल्ममेकिंगची तुला पुन्हा आठवण कधी झाली आणि मग पुढे तू त्याचं काय केलंस?

- जसं मी आधी सांगितलं की- नोकरी करायची नाही, हे ठरवल्यानंतर मी घरी डिक्लेअर केलं की, मी पुण्याला चालली आहे. हे ऐकून घरच्यांना फार आनंद झाला. त्याचं कारण असं की, त्यांना वाटलं होतं- जर पुण्याला गेली तर हिला कोणी तरी मराठी मुलगा लग्नासाठी तिथे मिळेल. अर्थात त्याआधी जसं एखाद्या नवख्या माणसाला वाटावं तसंच मला सुरुवातीला वाटलं की, मी मुंबईला जावं आणि संजय लीला भन्साळींसारख्या कमर्शियल फिल्म कराव्यात. कारण तोपर्यंत माझा ओव्हर-कॉन्फिडन्स टिकूनच होता, पण मुंबईत माझ्या परिचयाचं कोणीही नव्हतं. त्यामुळे माझा मावसभाऊ पुण्यामध्ये होता, त्याच्याशी याबद्दल चर्चा केली. तो इंजिनिअर आहे, त्याने त्याच्या मेसवर वगैरे चौकशी करून एका व्यक्तीचा नंबर मिळवला. ती व्यक्ती म्हणजे वीरेंद्र वळसंगकर- जो फिल्मएडिटर आहे. मी वीरेंद्रना फोन केला तेव्हा ते मला म्हणाले की, ‘जेव्हा तुम्ही पुण्यात याल तेव्हा भेटा. मी त्यांना म्हटलं की, तेव्हा-जेव्हा नाही- मी आज रात्री पुण्याच्या बसमध्ये बसते आहे आणि उद्या तुम्हाला भेटते.’ ते ठीक आहे म्हणाले. आम्ही भेटलो आणि त्यांनी मला तीन ऑप्शन सांगितले. जयू नचिकेत पटवर्धन, अमोल पालेकर आणि सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर. सुमित्रा भावे (त्यांना आम्ही मावशी म्हणतो) यांचंदेखील एमएसडब्ल्यू झालेलं आहे. म्हणून मी तिथेच ठरवलं, आपण सुमित्रा भावेंसोबत काम करायचं. मग सुनील सुकथनकर यांना कॉल केला.

‘देवराई’ सिनेमाचं पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे, त्यामुळे नेक्स्ट प्रोजेक्टबद्दल विचार सुरू झाला की, तुला कळवू- असं नम्रपणे त्यांनी मला सांगितलं. मी अक्षरश: दर दिवसाआड त्यांना फोन करत होते. मग मला सुमित्रा भावेंचा निरोप आला की, भेटायला ये. मी रिझ्यूमे वगैरे घेऊन गेले होते. तर मला कळलं की, फिल्म लाईनमध्ये असं काही नसतं. सुमित्रामावशीने मला तेव्हा सांगितलं की, तू मोठ्या पोस्टवरून आली आहेस, पण या क्षेत्रात पडेल ते काम करावं लागतं, तुला ते जमेल का? मी त्यांना खात्रीशीर ‘हो’ म्हणाले.

‘बाधा’ नावाची एक फिल्म त्या करत होत्या, त्यांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून मी व समीर शिपूरकर जॉईन झालो. तिथे माझी समीर शिपूरकरशी पहिली ओळख झाली आणि हळूहळू पुढे आमची घट्ट मैत्री झाली. ‘बाधा’नंतर किर्लोस्करांची एक डॉक्युमेंटरी केली. त्याच्या एडिटिंगमध्ये मी थोडासा हातभार  लावला होता. त्यानंतर सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांनी ‘नितळ’ नावाची फिल्म केली. त्यात मी असिस्टंट डिरेक्टर होते. मग मला वाटलं की, आपण आता मुंबईला जायला हवं. त्याचवेळी समीरने मला विचारलं की, तो पाबळच्या विज्ञान आश्रमावर एक डॉक्युमेंटरी करतोय, तर त्यात मला काम करायला आवडेल का? आणि मी त्याला ‘हो’ म्हणाले. एकूणच माझा फिल्मसंबंधीचा प्रवास असा सुरू झाला.

प्रश्न - विविध संस्था, संघाटना, व्यक्ती वा आंदोलन यासंदर्भात फिल्म बनवल्या जातात आणि तशा काही फिल्म्स तू बनवल्या आहेस. त्याबद्दलचा तुझा अनुभव काय आहे?

- खऱ्या अर्थाने सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटना, आंदोलन यांच्याशी माझा पुण्यात येईपर्यंत काहीही संबंध नव्हता. पुण्यात असताना ‘नितळ’ या सिनेमाच्या शूटिंगच्या आधी उत्पल व.बा. आणि असीम सरोदे यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत एक निरोप आला होता. तो असा की, नर्मदा घाटीमध्ये काही व्हॉलिंटियरची गरज आहे. तुला जाता येणार आहे का? तेव्हा मी म्हटलं की, ही एक मोठी ॲपॉर्च्युनिटी आहे आणि गेले.

तिथे आम्ही काही गावांमध्ये गेलो आणि सलग तीन दिवस तिकडे राहिलो. पहिल्या दिवशी आम्ही मेधाताई पाटकर यांच्यासोबत एका सभेला जाणार होतो, तेव्हा अचानक एका कामासाठी त्यांना मुंबईला जावं लागलं. म्हणून त्यांनी आम्हाला विचारलं की, आपल्या सभेसाठी मी जाऊ शकत नाही, तुम्ही जाणार का? तेव्हा थोड्या वेळासाठी मी शॉक्ड झाले होते. मला असं वाटलं की- चक्क मेधातार्इंना असं वाटतंय की, आपली काही तरी जबाबदारी आहे आणि आपणही तिथे जाऊ शकतो. पुढे काही वर्षांनंतर मला कळालं की, तिथली आंदोलनाची पद्धतच आहे की- जे कोणी पाहुणे येतात, त्यांना सगळ्यांशी बोलायला लावतात. आम्ही होतो तेव्हा तीन-चार दिवसात रात्री-अपरात्री काही गावांमध्ये सभा घेण्यात आल्या. सर्व लोक एकमेकांना हे सांगत होते की, आपण आता बुडणार आहोत.

हे मी पंधरा वर्षांपूर्वीचं सांगते आहे. मला अजूनही ते चित्र डोळ्यांसमोर स्पष्ट दिसतंय- बडवानीमधलं जुनं ऑफिस आणि ती छोटीशी वाहणारी नर्मदा. तीन दिवस तिथे राहून आम्ही पुण्याला परत आलो आणि आपापल्या कामाला लागलो. इतकाच काय तो माझा आंदोलनाशी संबंध. त्यानंतर अगदी माझ्या डोक्यात त्याबद्दल काही विचार होता वगैरे, असेही नाही. मात्र मेधा पाटकर असं नाव कुठेही ऐकलं किंवा वाचलं की, माझं लक्ष तिकडे वेधलं जायचं आणि मग मला वाटायचं की, याबद्दल आपण अधिक वाचूया किंवा तिथे जाऊया. तर मेधातार्इंची आणि आपली ओळख व्हावी, अशी खूप प्रामाणिक इच्छा होती, इतकंच.

त्यानंतर मग आधी सांगितलं तसं समीर आणि मी मिळून विज्ञान आश्रमवर डॉक्युमेंटरी खूप मन लावून बनवली. तरीसुद्धा अगदी युनिसेफतर्फे छत्तीसगडला दंतेवाडामध्ये बनवलेली फिल्म आणि आत्ताची ‘लकीर के इस तरफ’ ही फिल्म बनवेपर्यंत हे माध्यम आपल्या खूप हातात आलेलं आहे, असं मला वाटत नव्हतं. या प्रवासात समीर शिपूरकर याचं एक प्रगल्भ मित्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. मी पुण्यात कोणतीही बॅकग्राऊंड न घेता आले होते. यातली एक गंमत मला सांगायला आवडेल. ‘बाधा’ सिनेमाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही रेकी करण्यासाठी फिरत होतो, तेव्हा समीर बरंच काय-काय बोलत होता. त्यात नाटक आणि डॉक्टर लागू असे रेफरन्सेस देत होता. म्हणून मी खूप जेन्युइनली त्याला विचारलं की, कोण डॉक्टर लागू? तर तो म्हणाला, ‘अगं, डॉक्टर श्रीराम लागू.’ त्यावर मी त्याला म्हणाले, ‘हो, पण श्रीराम लागूंचा आणि नाटकाचा काय संबंध आहे?’ म्हणजे इतकं अज्ञान घेऊन मी पुण्यात आले होते! त्यावर समीरकडे खरं तर कितीतरी ऑप्शन होते. म्हणजे माझी खिल्ली उडवणं किंवा ‘इतकं पण तुला माहिती नाही का?’ असं विचारणं. पण नाही. तो प्रत्येक वेळी, ‘ठीक आहे, मी सांगतो म्हणत’ शांतपणे मला सगळं समजून सांगायचा.

लहानपणी मी रणजित देसाईंचं ‘श्रीमान योगी’ वाचलं होतं. त्यानंतर कट टू डायरेक्ट मी जे मराठी पुस्तक वाचलं ते म्हणजे, मिलिंद बोकीलसर यांनी लिहिलेलं ‘उदकाचिया आर्ती’. त्यातूनच खरं तर मला मेधातार्इंची ओळख झाली होती. पण त्यातलं रागिणी नावाचं जे पात्र आहे, त्याचा कुठे तरी मेधातार्इंशी संबंध असावा, हे कळायला मला दहा वर्षे लागली. आणि आता ‘लकीर के इस तरफ’ पाहिल्यानंतर बोकीलसरांचा मला ई-मेल आला होता. त्यांना उत्तर लिहिताना मला खूप आनंद झाला की, त्यांच्यामुळे खरं तर सगळ्यात प्रथम मला मेधातार्इंची ओळख झाली होती. आणि लाइफ कम्स टू फुल सर्कल, असं मला तेव्हा वाटून गेलं.

प्रश्न - सामाजिक विषय आणि त्यातलं वास्तव मांडण्यासाठी फिल्म हे एक प्रभावी माध्यम ठरू शकतं, हे तुझ्या लक्षात कधी आणि कसं आलं? त्याबद्दलचे तुझे अनुभव काय आहेत?

- समीर शिपूरकर आणि मी-दोघांनी विज्ञान आश्रमची डॉक्युमेंट्री बनवली आणि ती सगळ्यांना दाखवली, तेव्हा त्याचा खरा इम्पॅक्ट आमच्या लक्षात आला. त्यांनीच केलेलं काम फिल्ममधून बघताना त्या लोकांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. म्हणजे तिथे आम्हाला इम्पॅक्ट थेट दिसत होता. तशा अर्थाने स्वतंत्रपणे केलेली ती आमची पहिलीच फिल्म असल्याने, आमच्या काही गोष्टी ठरल्या होत्या. एक तर, जो काही फीडबॅक येईल तो शांतपणे स्वीकारायचा. तिथल्या तिथे कुणाशीही वाद करायचा नाही. कारण लोक आम्हाला काहीही सांगायचे. उदा- हे शीर्षक तुम्ही बदला, म्हणजे अशा दोन बायका जात्यावर दळण दळताना दाखवा आणि त्या जात्यामधून असं टायटल व शब्द बाहेर आले, असं दाखवा... वगैरे. अशा गोष्टींनासुद्धा आम्ही नम्रपणे ‘हो, विचार करू’ अशी उत्तरे दिली आहेत.

पुढे आम्ही ग.प्र. प्रधानसर यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली. प्रधानसरांना जेव्हा आम्ही ती प्रत्यक्ष दाखवायला गेलो होतो, तेव्हाचा त्यांच्यासोबतचा अनुभव फार वेगळा होता. त्यांच्यातला साधेपणा, त्यांच्यातली कमिटमेंट प्रत्यक्ष बघणं खूप काही शिकवणारं होतं. ती डॉक्युमेंटरी रिलीज करायच्या वेळी प्रधानसरांची तब्येत अत्यंत बिघडली होती. आम्ही हॉस्पिटलबाहेर उभे राहून त्यांचा त्रास बघत होतो. ते पाहून मनात सारखा विचार यायचा- आपण नेमकं काय करू शकतो, यांचा त्रास कमी करण्यासाठी? आणि तेव्हाच आम्हाला काही माध्यमांचे फोन यायला लागले होते की, ‘तुम्ही प्रधानसरांवर एक डॉक्युमेंटरी बनवलेली आहे आणि त्यांची प्रकृती आता गंभीरच आहे तर आम्हाला ती आमच्या चॅनेलवर दाखवायला मिळेल का?’ वगैरे. त्यावर समीर खूप चिडला होता की, किमान माणुसकी दाखवा- ते अजून जिवंत आहेत. पुढे प्रधानसरांची प्रकृती सुधारली आणि त्यांच्याच हस्ते त्या डॉक्युमेंटरीचं उद्‌घाटन झालं.

त्यानंतर असीम सरोदे आणि रमा सरोदे यांच्यासोबत ‘न्यायनिवारा’ नावाची फिल्म मी स्वतंत्रपणे केली. एकटीने केलेली माझी पहिली फिल्म. या फिल्ममध्ये मी खूप वेगळे मॉड्यूल वापरले. उदाहरणार्थ- कठपुतळी, गोष्टी, रोल प्ले, इंटरव्ह्यू, गाणी वगैरे. या फिल्मला गिरीश कुलकर्णी आणि अश्विनी गिरी यांनी नरेशन दिलेलं आहे. यानंतर ‘बाएफ’साठी केलेली बचत गटाची फिल्म आणि त्यानंतर ज्योती मुंगसे नावाची एक व्यक्ती मला भेटली, तिच्या संस्थेसाठी एक फिल्म केली. तिला हृदयरोग होता आणि दोन महिन्यांपूर्वी ती गेली. पण हे सगळं असूनही ती प्रचंड काम करायची. या संपूर्ण प्रवासात मला असं सारखं जाणवत राहिलं की, आपण खूपच रडे आहोत. आपल्याकडे एवढं सगळं नीट आहे, आपण धडधाकट आहोत... लहानपणी काही वाईट घडलेलं नाही, उपासमार वगैरे झालेली नाही; आई-वडील मारत नव्हते, तरीसुद्धा आपण कशासाठी इतके रडतो? आणि कशाचं इतकं दुःख करत बसतो?

तर या अशा फिल्ममेकिंगच्या प्रवासात अनेक लोकांना भेटून मला स्वतःला जाणवायला लागलं की, आपण थोडं थांबून आपलं एकूण आयुष्य व जगण्यातच बदल करायला पाहिजे. आयुष्यानेही मला तशी संधी लवकरच दिली. 2014 मध्ये एका मोठ्या आजारामुळे मी अगदीच एका जागेवर होते. पण  त्यातून मी लवकर बाहेर आले. माझ्याभोवती माझ्यावर खरंच प्रेम करणारी आणि विश्वास ठेवणारी मित्रमंडळी होती म्हणून.

प्रश्न - नर्मदा बचाव आंदोलन मध्यवर्ती ठेवून ‘लकीर के इस तरफ’ फिल्म तू करावीस हे कसं घडलं? आणि त्याचबरोबर, या फिल्मची संकल्पना नेमकी कशी मनात आली, याबद्दलही आम्हाला सांग.

- ‘युनिसेफ’मध्ये अनेक वर्षे काम केलेल्या विजया चौहान यांच्याशी माझा परिचय होता. माझं काम त्यांना माहीत होतं. म्हणूनच त्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या जीवनशाळांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी मला विचारलं. ती नर्मदेत जाण्याची मोठी संधी वाटली आणि मी ‘हो’ म्हणाले. तेव्हा जावदेवाडीच्या नव्या वसाहतीमध्ये मेधातार्इंची मीटिंग होती, तिथेच आम्ही त्यांना भेटलो. शिक्षकांसोबतही बोललो आणि काही चर्चा झाल्या. त्यावेळी मी सोबत कॅमेरा नेला नव्हता आणि फिल्म वगैरे करायचं, असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. मी पूर्णपणे ‘जीवनशाळा’ हे नेमकं काय प्रकरण आहे, हे समजून घेण्यात रमले होते. कारण ते मला खूप वेगळं वाटत होतं.

मला वाटत होतं की, आपण फार मुख्य प्रवाहातल्या लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे, यांना काय देणार? म्हणजे तिथे राहिल्यानंतर लक्षात आलं होतं की, या इतक्या समंजस समाजाला आपण काय ट्रेनिंग देणार? आणि का? फक्त आपण शहरातून आलो आहोत म्हणून? आणि हा इतका प्रगल्भ समाज- जिथे पंचवीस वर्षांपासून इतकी सुंदर व्यवस्था आधीच आहे, तिथे आपण अजून काय सांगणार आहोत? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात गर्दी करत होते. सारखं वाटत होतं की, कोणत्याही आदिवासी समाजाला शहरातील लोकांनी काही शिकवायला जाऊ नये. ते जसे जगतात तसं त्यांना जगू द्यावं, कारण ते आपल्यापेक्षा फार पुढे गेलेले आहेत आणि आपल्याहून कैक पटींनी प्रगल्भ आहेत. (उदा.- घोटुलसारखी गोंड समाजाची समाजव्यवस्था. याबद्दल पुढे कधी तरी मी नक्की काही तरी मांडेन.)

त्यानंतर निरोप आला की, दि.2 ऑगस्ट, 2018 रोजी मनीबेलीच्या संघर्षाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत, तर  तुम्हीसुद्धा या. नेमका त्या दिवशी खूप पाऊस झाला. बस वगैरे कॅन्सल झाल्या. तेथील सुहासताईंनी मला सांगितलं होतं, ‘तू जरा मेधातार्इंशी बोलून घे.’ मला वाटलं की- थेट मेधाताईंना त्रास देण्यापेक्षा इतर कुणी तरी असेलच की त्यांच्याआधी बोलणारं, तर त्यांच्याशी बोलता येईल. त्यावर सुहासताई म्हणाल्या की- नाही, असं काही नाहीये; तू मेधाताईंशी थेट बोलू शकते. मी पाहिलं- मेधाताई अक्षरशः प्रत्येक फोन घेतात, अगदी कुठलाही आणि कोणाचाही असो. फक्त त्या मीटिंगमध्ये असल्या की, त्यांचा फोन तिथल्या कुणाकडेही असतो. जो काही फोन येईल त्याचा निरोप घ्यायचा, तो लिहून ठेवायचा आणि नंतर मेधाताईंना ते सांगायचं. त्या लोकांना कॉलबॅक करतात. (या सगळ्यात मेधाताई हा एक स्वतंत्र विषय आहे. ही फिल्म करताना कुठे तरी माझ्या डोक्यात होतं की, एक सेक्शन ‘24 घंटे मेधा पाटकर के साथ’. पण नंतर असं लक्षात आलं की, मेधाताईंना जितकं कमीत कमी आपण फिल्ममध्ये ठेवू तितकं त्या फिल्ममध्ये जास्तीत जास्त असतील. आणि तसंच घडलं. माझ्याकडे खरं तर मेधाताईंचे सहा ते सात तासांचे इंटरव्यू शूट केलेले आहेत. पण नंतर समीरशी बोलल्यावरं लक्षात आलं, ‘ती भाषाच आपण या फिल्ममध्ये घ्यायला नको.’ त्यामुळे मेधाताईंचा एकही इंटरव्ह्यू आपण या फिल्ममध्ये घ्यायला नको.)

तर झालं असं की, मी पहिल्यांदा घाटीत आले ती मेधाताईंसोबत. आम्ही एका मोटारबोटीतून जात होतो, तेव्हा त्या पाण्यावरून जाताना मेधाताई असं सांगत होत्या की- ‘आता आपण ज्याच्यावरून जात आहोत, त्याच्याखाली चिमलखेडी नावाचं गाव आहे... आता आपण ज्यावरून जातोय, त्याच्याखाली मुखडी गाव आहे!’ मला ते फारच भयंकर वाटलं. म्हणजे गावंच्या गावं पाण्याखाली आहेत! आणि तिथे मला हे प्रकर्षाने जाणवलं की, हे इतरांना कसं कळेल? जे घाटीत येतील, त्यांनाच ते माहिती होईल. आणि त्याक्षणी मला वाटून गेलं की, आपण यासाठी काही तरी तरी केलं पाहिजे. पण तेव्हासुद्धा ‘फिल्म’ असं काही स्पेसिफिक माझ्या डोक्यात नव्हतं.

दुसऱ्यांदा घाटीत आले, तेव्हा मात्र कॅमेरा सोबत घेऊनच आले होते. कदाचित माझ्या मनात फिल्मचा विचार आतमध्ये कुठे तरी तयार झालेला असावा. बोटीतून जाताना एका ताईने मोठ्याने आवाज दिला की- ‘बोट तिकडे घ्याऽऽ बोट तिकडे घ्याऽऽ’ आणि म्हणून आम्ही सगळे त्या दिशेने बघायला लागलो. तर, दुरून डोंगरावरून एक निळी रेष सरकताना आम्हाला दिसली. संपूर्ण हिरव्या पटलावर अशी एक निळी रेष... आणि ते काही तरी अद्‌भुत होतं. ती रेष म्हणजे या जीवनशाळेत शिकणाऱ्या निळा गणवेश घातलेल्या मुलांची रांग! कदाचित तोच क्षण होता की, जिथे मला वाटलं की- हे सगळं आपण इतरांसमोर मांडलं पाहिजे. त्या क्षणी मी फिल्मचा पहिला शॉट शूट केला. यातही ‘लाइफ कम्स टू फुल सर्कल’ याचा अनुभव आला.

आंदोलनाची सुरुवात मणिबेलीवरून झाली होती आणि सर्वोच्च टप्पा होता तो केवडिया- जिथे सरदार पटेल यांचा पुतळा उभा केला आहे. मी पहिल्यांदा मणिबेलीतच आले आणि या संपूर्ण शूटिंगदरम्यान मनाने मेधातार्इंसोबत मी पूर्ण काळ होते आणि शूटिंग शेवटाकडे येत असताना त्या मला म्हणाल्या, ‘मी आज केवडियाला चालली आहे.’ मला असं झालं की, ‘अरे बापरे! याचा अर्थ, आपल्या फिल्मचा शेवटचा शॉट जिथे घ्यायचा होता, तो तिथेच मिळणार आहे.’ मेधाताई मीटिंगला गेल्यानंतर तिथलाच एक मुलगा मदतीला घेऊन मी पुढे निघाले. ‘तो सरदार पटेल यांचा पुतळा कुठून पूर्ण दिसतो का?’ असं मी त्याला विचारल्यावर ‘एका डोंगरावरून तो दिसतो’ असं तो म्हणाला. आम्ही त्या डोंगरावर गेलो. तो पुतळा एकदम माझ्यासमोर प्रकट झाल्यासारखा आला आणि मला असं झालं की, ‘बाप रे! हे? यासाठी? हे तर असं झालं की- लम्हों ने खता की है और सदियों सजा पायी!’ म्हणजे या एका पुतळ्यासाठी इतका आटापिटा? हे सगळे लोक बुडवले गेले आणि अजून बुडवले जाणार, ते केवळ हा एक पुतळा बघण्यासाठी? आणि ते सगळे पुतळा बघणारे लोक पलीकडून येणार, म्हणजे त्यांना या इकडचं काहीच माहिती नसणार! आणि तिथेच ठरवलं की, माझ्या फिल्मचा शेवटचा शॉट म्हणजे सरदार पटेल यांचा पुतळा आणि सुरुवातीचा शॉट म्हणजे ‘जीवनशाळे’च्या मुलांची निळी रेष- असंच असेल! ‘लकीर के इस तरफ’चं बीज हे असं रूजलं.

प्रश्न - आता आपल्याला फिल्म करायची आहे, अशी जाणीव झाल्यानंतर ‘लकीर के इस तरफ’ या फिल्म बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल तू काय सांगशील?

- फिल्म बनविण्याच्या प्रक्रियेबद्दल मी बोलतेच, पण त्याआधी एक किस्सा सांगते. मी ही अशी फिल्म करणार आणि त्यातून आदिवासींची बाजू मांडणार म्हटल्यावर कोणी म्हणेल, ‘म्हणजे तुला असं म्हणायचंय का की, आदिवासी लोकांचं काही चुकत नाही? आणि ते एकदम बरोबरच  आहेत, त्यांच्यावरच फक्त अन्याय होतो?’ यावर मला उल्का महाजन यांचे एक वाक्य आठवले- ‘वंचित लोकांसाठी खरंच काम करायचं असेल, तर सर्वांत पहिले त्यांच्या पहिल्या शंभर चुका माफ करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. मग 101 व्या चुकीबद्दल काय करायचे, ते बघू या.’ आणि हे वाक्य अगदी खरं आहे, असं मला वाटतं. दलितांच्या बाबतीत जसे आत्ता म्हटले जाते की, ते फार अग्रेसिव्ह झालेत. मान्य आहे; पण ब्राह्मणांनी त्यांना काय कमी त्रास दिलाय का? आदिवासी असे वागतात, दलित असे वागतात, महिला अशा वागतात; हे आपण नुसतं बोलतो. पण ते असे का वागतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दल विनाकारण राग धरून ठेवायला नको.

आणखी एक उदाहरण सांगते- मी पुण्यात असताना बेरोजगार होते, तेव्हा काम शोधण्यासाठी नाबार्डच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे एक गृहस्थ होते. त्यांना मी सांगितलं की, मी बचत गटासोबत काम केलेलं आहे आणि मला त्यासंदर्भात एखादी फिल्म करायला आवडेल. ते मला म्हणाले, नाव काय तुमचं? मी म्हणाले, शिल्पा... पूर्ण नाव काय? ...शिल्पा बल्लाळ....बल्लाळ? मी म्हणाले, हो. ...नाही, काही काम नाही आमच्याकडे, असं सरळ त्यांनी मला सांगून टाकलं. मी त्यांना म्हटलं, अहो सर, माझं ऐकून तर घ्या. ...नाही, मला आता वेळ नाही. तुम्ही या आता. अगदी खरं सांगते, मला अजिबात राग आला नाही. उलट माझ्या मनात विचार आला की, बरोबर आहे. माझ्या पूर्वजांनी यांना किती वाईट ट्रीटमेंट दिलेली असणार आहे, ज्यामुळे आज हे असं वागतात! अपमान करण्याची आणि विषमतेची काय लेव्हल असेल तेव्हा! ‘आमच्या घरासमोरून जाताना चप्पल घालायची नाही, आमच्या घरात यायचं नाही, तुमची सावली पडली तरी आम्ही अंघोळ करणार, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही...’ बाप रे!! आणि काही ठिकाणी तर अजूनही हे सुरू आहे. मग आपण का यांना समजून घेऊन यांचीसुद्धा बाजू मांडू नये?

अशी ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता, अनेक निर्णय कटाक्षाने घेत ही फिल्म तयार करण्यात आलेली आहे. पहिला ठाम निर्णय हा घेतला होता की, फिल्ममध्ये एकही गोष्ट फिक्शनल किंवा ठरवून डायरेक्ट केलेली नकोय. ही फिल्म जितकी सत्य आणि आहे ते वास्तव थेट दाखवणारी असेल, तितकी ती मला जे सांगायचे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून पुढचा निर्णय हा होता की, या फिल्मला डायरेक्शन नसणार! याचा अर्थ असा की- कुणी काय बोलायचं, कसा अभिनय करायचा असं काहीही कोणालाही कधीच सांगितलं जाणार नाही. या फिल्मला सुरुवातीला कोणताही स्क्रीन प्ले नसणार! ज्या काही भेटीमध्ये मी नर्मदा घाटीत जाणार आहे, तेव्हा दोन गोष्टी प्रामुख्याने करणार, असं ठरवलं. एक म्हणजे- शक्य होईल तितक्या वेळा मेधाताई असतील तिथे त्यांच्याबरोबर माझा कॅमेरा घेऊन जाणं. त्यांना डिस्टर्ब न करता, आणि फिल्म करतेय असा कुठेही उल्लेख न करता मला जे फूटेज हवं आहे ते गुपचूप घेत राहणं. अर्थातच परवानगी घेऊन.

आणि दुसरं असं की, तिथल्या काही लोकांचे इंटरव्ह्यू घेत राहणं. हे सगळं फूटेज जमा झाल्यानंतर एडिटिंग करताना मात्र आपण या फिल्मला व्यवस्थित फ्लो येईल असं डायरेक्ट करू या, हे ठरलं होतं. म्हणजे, फिल्ममध्ये कोणता शॉट आधी लावायचा, काय नंतर घ्यायचं, या फिल्मला काय निवेदन लिहायचं वगैरे. फिल्ममध्ये जे निवेदन वापरलेलं आहे तो माझा निवेदनाचा सतरावा ड्राफ्ट आहे! आणि गंमत म्हणजे, पहिल्या ड्राफ्टचा व याचा कुठेही संबंध नाही. पहिला ड्राफ्ट अगदीच वेगळा होता, डेव्हलप होत-होत या ड्राफ्टपर्यंत फिल्म आली.

बऱ्याचदा कॅमेऱ्याच्या लाईटसाठी आणि इतर टेक्निकल गोष्टींसाठी बोलणाऱ्याला खूप गाईड करत राहावं लागतं. माझ्यासाठी ते बोलत असलेले कंटेंट महत्त्वाचे असल्यामुळे मी टेक्निकल गोष्टींसाठी त्यांना कुठेही डिस्टर्ब केलं नाही. आपण एका डेमोक्रॅटिक पद्धतीने चालत आलेल्या पस्तीस वर्षांच्या संघर्षावर फिल्म बनवत आहोत; ती बनवताना आपणसुद्धा त्यातले तत्त्व पाळावे, अशा अर्थाने ती फिल्म बनत गेली आहे. यापूर्वीच्या फिल्म्सना तरी काही स्ट्रक्चर आम्ही करायचो. पण ही माझी पहिली फिल्म आहे- जी मी अशा पद्धतीने केली आणि ज्यात मी निवेदन वापरलं आहे.

स्त्रीच्या आवाजात निवेदन पाहिजे, हे आमचं आधीच ठरलं होतं; मात्र ते मी करेन असं काही ठरलेलं नव्हतं. सुरुवातीला काही जणांनी मला सांगितलं, आपण स्वरा भास्करच्या आवाजात ते करू या. ती अशा विषयांवर बोलण्यासाठी चांगली आहे वगैरे. यावर मी म्हणाले, पण यामुळेच तर तिच्यावर एक लेबल लागलेलं आहे. उदा. ‘अच्छा, स्वरा भास्कर आहे का? हो, मग ती याच्या-त्याच्या विरुद्ध बोलणारच!’ त्यामुळे असे पूर्वग्रह होऊन त्याचा कदाचित फिल्मवर परिणाम होऊ शकतो. तसं मला आता कोणीच ओळखत नाही, माझ्याबद्दल कोणतेही पूर्वग्रह नाहीत. त्यात मला निवेदनासाठीचा जो एक स्ट्रक्चर्ड आवाज असतो, तो नको होता. मग त्या निवेदनाचा आशय आणि आवाज यातला एकजिनसीपणा येण्यासाठी ते मीच करावं, असं ठरलं. फिल्मचा पुढचा महत्त्वाचा निर्णय असा होता की, यात कोणताही बाहेरचा तयार केलेला साऊंड घ्यायचा नव्हता. जे काही आपण वापरू, ते सर्व घाटीतील असलं पाहिजे, हे आधीच ठरलेलं होतं. ते तसंच केलेलं आहे. पार्थ उमराणी हा पुण्यातला संगीतकार आहे. या फिल्ममध्ये ‘मां रेवा थारो पानी निर्मल, कलकल बेहतो जायें रे’ हे गाणं आहे, हे पारंपरिक, सुप्रसिद्ध गाणं पार्थने मला त्याच्या आवाजात, संगीतासह पुन्हा कंपोज करून दिलं. हेच फक्त बाहेरचं गाणं आहे. बाकी सर्व गाण्यांना घाटी लोकांचं संगीत व आवाज आहे. इतर गाणी घाटीतल्या माणसांनी तयार केलेली आणि गायलेली आहेत. या फार छोट्या-छोट्या गोष्टी आहेत; पण फिल्मच्या इम्पॅक्टसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, असं मला वाटतं.

फिल्म करायची हे जरी कन्फर्म केलेलं असलं, तरी ती मी कशी मांडणार आहे, याबद्दल मी आत्तापर्यंत साशंक होते. कारण तीस-पस्तीस वर्षांचे आंदोलन काही मिनिटांच्या फिल्ममधून दाखवायचं, हे मोठं चॅलेंजच म्हणायला लागेल. कारण त्याचा डेटाच तेवढा आहे. खरं तर आपली माध्यमं जे आपल्याला सांगतात आणि जी सत्य परिस्थितीची आहे, याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. रिसर्च हा माझा खूप आवडीचा विषय आहे. त्यामुळे यातही मी तेच केलं आहे. मेधाताई स्वतः एक रिसर्चर आहेत, असं मला वाटतं. मी पहिल्यांदा बडवानीला गेले, तेव्हा मी त्यांचं सगळं उपलब्ध असलेलं मटेरियल घेऊन वाचायला बसले होते. त्यातली प्रत्येक गोष्ट समजून घेतली. या सगळ्या अभ्यासानंतर माझं ठरलं की- खूप जास्त डिटेल्स आणि टेक्निकल गोष्टी आपल्याला मांडायच्या नाहीत. लोकांसाठी ते जड आणि कंटाळवाणं होईल. त्यामुळे विशेष महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच फिल्ममध्ये मांडल्या गेल्या पाहिजेत. त्यानुसार तशा गोष्टींचे मी रेकॉर्ड करून ठेवले. उदाहरणार्थ- काही फोटो काढून ठेवले, काही महत्त्वाचे रिपोर्ट वाचून त्यातल्या नोंदी करून ठेवल्या... वगैरे.

तशी ‘लकीर के इस तरफ’ ही माझी अकरावी फिल्म आहे. तरीही मगाशी सांगितलं तसं, ही एकमेव फिल्म आहे, ज्यात कोणतंही स्क्रिप्ट तयार नव्हतं. मी सहजगत्या शूटिंग करत गेले. कारण इतकं मोठं आंदोलन संपूर्ण समजून घेऊन, त्याचा आराखडा आखून, स्क्रिप्ट लिहून, त्यानुसार सगळे शूटिंग व एडिटिंग करून मग ती फिल्म रिलीज करणं- हे फार कृत्रिम झालं असतं. आता मला खूप समाधान वाटतं की, मी यातलं काहीही केलं नाही, त्यामुळे जी गावं आज बुडिताखाली गेलीत, त्यांचं निदान वेळेत चित्रीकरण होऊ शकलं. कारण असं की, आता 31 ऑगस्ट 2019 रोजी पुन्हा घाटीत जाऊन आले; तेव्हा जी गावं या फिल्ममध्ये दाखवलेली आहेत, ती सगळी आता पाण्याखाली गेली आहेत! एक तर- फिल्म मेकर म्हणून मला तिथलं काहीही फूटेज घेता आलं नसतं. दुसरं म्हणजे- ती गावं पाण्याखाली गेल्यावर तिथलं वास्तव कुणाला कधीच कळालंही नसतं कदाचित.

या फिल्ममध्ये जगदीशभाईंची मुलाखत घेतलेली आहे. त्यात ते म्हणतात, ‘ये तो अब कुदरत की मेहरबानी है कि दो साल से बारिश नहीं हुई है... वरना हमारा क्या हाल होता?’ इथे मला असं वाटलं की - शेतकऱ्यांच्या देशात एक शेतकरी हे म्हणतो की- बरं झालं, दोन वर्षे पाऊस नाही पडला; नाही तर आमचे काय हाल झाले असते? म्हणजे विकासाच्या नावाखाली आपण सगळं कुठे आणून ठेवलंय? या वर्षी पाऊस झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटलं की, तिथलेच आत्ताचे शॉट्‌स करावेत. म्हणजे ‘बारिश नहीं थी’ तेव्हा काय परिस्थिती होती ते आपण फिल्ममध्ये दाखवले आहे आणि ‘बारिश हो गई तो हमारा क्या हाल होगा?’ तर आता असे हाल झालेले आहेत! पुढे मी जेव्हा घाटीत जात होते तेव्हा तिथल्या लोकांनी मला प्रचंड सहकार्य केलं. ते स्वतःहून सांगायचे की, ‘अच्छा, फिर इस बारे में आपने उनसे बात की क्या? आपको उधर जाना चाहिए और परिस्थिती देखनी चाहिये’ वगैरे.

या फिल्मसाठीच्या दौऱ्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर- मी पहिल्यांदा मणिबेलीला गेले 2 ऑगस्ट, 2018 रोजी. तेव्हा माझं ठरलं की, फिल्म करायची. तेव्हाच मी हेही ठरवलं होतं की, मला स्वातंत्र्य दिवसाचं फुटेज हवं. आदिवासी तो दिवस साजरा करतात ही थीम माझ्या डोक्यात आधीपासून होती. स्पष्टच सांगायचं तर, ते बघताना इतरांना शरम वाटली पाहिजे, अशा प्रकारचे व्हिज्युअल मला हवे होते. ते या अर्थाने की, इतका त्यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने अन्याय होऊनसुद्धा ते लोक देशाच्या झेंड्यावर, संविधानावर आणि लोकशाहीवर विेशास ठेवून आहेत! हे शॉट मिळविण्यासाठी आम्ही मध्य प्रदेशमधील भादल ही जागा निवडली. 15 ऑगस्ट होता तरी ऊन फार होतं. काळजी होती की, माझा कॅमेरा अत्यंत सामान्य असल्याने फार दूरचे डोंगर आणि जवळचे दृश्य एकाच लेन्समधून कव्हर होणं तांत्रिकदृष्ट्या जवळपास अशक्यच होतं.

या पहिल्याच ट्रीपमध्ये माझी खूप दमछाक झाली होती. मेधाताई तर एकदम झपाझप चालत डोंगर-दऱ्यातून पुढे पोहोचत होत्या आणि मी माझ्या दोन बॅगा घेऊन त्यांना फॉलो करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. अगदी एक शॉट या डोंगरावरून, तर दुसरा शॉट दुसऱ्या डोंगरावरून- अशी माझी गंमत सुरू होती. तिथे वेगवेगळे अँगल्स मिळवणं आणि तेही कुणाला काहीही करायला न सांगता, हे फार महत्त्वाचं होतं. (कारण आधीच ठरवलं होतं की, कोणाला काहीही करायला लावायचं नाही.) त्या वातावरणात जे  घडतंय ते आपल्याला टिपता आलं, तर ठीक. तिथल्या लोकांशी बोलणे, त्यांचे ऐकून घेणे हेही करायचं होतं.

गोखरू सोलंकी नावाचे एक गृहस्थ या फिल्ममध्ये बोलले आहेत. आम्ही गावात गेलो तेव्हा शाळेच्या काही मुलांसमोर ते बोलत होते. ते मुलांना सांगताहेत, ‘ये हमारा गाव आहे, हमारा मकान है और हमारा हक है... और इसके लिए सरकार से झगडा किस तरह शांततापूर्ण करना है...’ वगैरे. मी सरळ कॅमेरा घेऊन तिथेच बसले आणि त्यांचं झाल्यानंतर त्यांना प्रश्न विचारायला लागले. त्यांनी मला उत्तरं द्यायला सुरुवात केली. आमचा संवाद होईपर्यंत माझ्यामागे 70 ते 80 मुलं-मुली शांततेत बसून ऐकत होते. या मुलांना कोणीही तसं सांगितलं नव्हतं. नंतर मला इतर अनेक अनुभव त्या मुलांबरोबर आले. मला जाणवलं की, अनेक महत्त्वाची मानवी मूल्यं त्यांच्यात टिकून आहेत.

असे खूप लोक होते ज्यांचे इंटरव्ह्यू घेण्यासारखे होते, पण इतकं करणं शक्य नव्हतं. ते वापरणार कुठे आणि कसं? म्हणून मी काही मुद्दे ठरवले आणि त्याबद्दल कुणाशी बोलायचं तसे इंटरव्ह्यू घेत गेले. प्रत्येकाला त्याच्याच भाषेत बोलू द्यायचं. माझं हिंदी, मराठी आणि गुजराती हे कॉम्बिनेशन व्यवस्थित असल्यामुळे मला त्यांची पावरी व भिलाली भाषा पूर्ण कळत होती. या फिल्मला पूर्ण सबटायटलींग राधिका मूर्ती या माझ्या मैत्रिणीने केले आहे. इतर माध्यमं किंवा इतर फिल्ममधून सतत समोर आलेलं आहे ते सगळं पुन्हा पुन्हा दाखवणं टाळायचं होतं. तरी मला फार कात्री लावता आली नाही. कारण त्यात काही खरंच चांगली व्यक्त होणारी माणसं आहेत. त्यांना टाळणं फिल्मसाठी मारक ठरलं असतं. उदा.- नूरजी. या सगळ्या लोकांचा मोठा अनुभव आहे, त्या अनुभवातून ते बोलतात म्हणून ते महत्त्वाचं होतं.

ऑगस्टनंतर सप्टेंबर 2018 ला म्हणजे नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादरम्यान तिथे गेले. तेव्हा तिथे मेधाताई आणि इतर आंदोलनकर्ते जल सत्याग्रह करणार होते. एका व्यक्तीचा इगो सांभाळण्यासाठी इतके लोक, गावं पाण्याखाली बुडवली जातात याविरोधात ते बोलत होते. ते सगळं मी शूट केलं. त्याच काळात त्यांची इंदूरला जाणारी रॅली निघणार होती. ती शूटिंग केली. ऑक्टोबरमध्ये शूटिंग करण्यासाठी तिथे गेले नाही, कारण तो एरिया प्रचंड तापतो आणि कॅमेऱ्यामध्ये गोष्टी टिपणं कठीण होऊन जातं. फिल्मच्या फॉरमॅटबाबतीत सगळे लाँगशॉट घ्यायचे असं माझं ठरलेलं होतं. कारण तो एरिया जसा आहे तसा दिसला पाहिजे. त्यामुळे कदाचित जे लोक ही केवळ एक फिल्म म्हणून बघतील, ते अशी टीका करू शकतात की, यात फार कमी क्लोज शॉट आहेत. मला असं वाटतं की, क्लोज शॉट हे फार इन्टिमेट गोष्टींचे घ्यावेत. त्यामुळे ज्या गोष्टी फार पर्सनल अशा आहेत, त्यांचे मी क्लोज शॉट घेतले.

मग नोव्हेंबर 2018 ते मार्च 2019 पर्यंत शूटिंगच्या निमित्ताने माझ्या घाटीत फेऱ्या होत राहिल्या. खरं तर 26 जानेवारी, 2019 पर्यंत फिल्म पूर्ण करायची, असं माझं ठरलेलं होतं, पण तिथले लोक म्हणाले की, बालमेळावा आणि होळी या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे फिल्ममध्ये घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून पुढचा वेळ द्यायचं ठरवलं. जे- जे राहिलं असं एडिटिंग करताना जाणवलं, ते घेण्यासाठी मी पुन्हा घाटीत गेले. उदाहरणार्थ- वसाहतीचे अंडर- कन्स्ट्रक्शनचे फूटेज माझ्याकडे काहीच नव्हतं. ते मिळवलं. आर्थिक गोष्टींचा विचार केला, तर माझ्या मित्रमंडळींनी थोडीफार मदत केली आणि कमीत कमी खर्चात हे करण्याचा प्रयत्न केला. या फिल्मचं टायटलसुद्धा फार विचारपूर्वक दिलेलं आहे.

फिल्मच्या फ्लोमध्ये काय काय कव्हर झालं होतं, हे मी बघत होते. आंदोलन आणि त्याची कारणे, नर्मदा घाटीचा व तिथल्या धरणांचा नेमका प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न, नव्या झालेल्या वसाहती आणि तिथली परिस्थिती, जीवनशाळा, बालमेळा, होळी, आदिवासींचे व मेधातार्इंचे इंटरव्ह्यू हे सगळं मिळालं होतं. त्यानंतर मेधाताई म्हणाल्या की, ‘तुम्ही भरुचला जाऊन आला का? तिथली नदी पूर्णपणे कोरडी झालेली आहे. तिथल्या लोकांची मुलाखत घेतली पाहिजे.’ मग मे 2019 मध्ये रणरणत्या उन्हात भरुचला गेले. तिथली काही मासेमार माणसं भेटली आणि आंदोलनातील दोन-चार कार्यकर्ते. ते मला सगळं दाखवत होते.

पिवळा टी-शर्टवाला एक माणूस फिल्ममध्ये दिसतो आणि बोलतो. तो खरं तर तिथे अचानक आला होता. त्यांच्यात झालेला जो संवाद आहे, तो वास्तव आहे. असं बोला किंवा असा प्रश्न विचारा, असं त्यांना सांगितलेलं नाही. शेवटी जेव्हा त्याला आम्ही सांगितलं की, ‘आम्ही अशी फिल्म करतोय आणि त्यासाठी हे शूटिंग केलं; पण त्यात तुमचा चेहरा किंवा नाव आम्ही घेणार नाही. कारण तुमची परवानगी घेतली नव्हती.’ त्यावर तो म्हणाला की, ‘असं काही नाही. तुम्ही मला पण बोलायला लावू शकता. मला त्यांचं म्हणणं पटलं. मी इथे नर्मदामातेचे दर्शन करायला आलो होतो, पण इथे तर नर्मदाच  नाहीये!’ तो पुढे हेही म्हणाला की, ‘दहा वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा तिथे वर उभा राहून नर्मदामातेचे दर्शन केले होते.’ तेव्हा मला असं वाटलं की, जर प्रोसेसने माणसांचं मतपरिवर्तन होणार असेल, तर नक्कीच ही फिल्म लोकांपर्यंत पोहोचेल.

मध्य प्रदेशच्या भाजप सरकारने नर्मदा घाटीतल्या लोकांना 31 जुलै, 2017 रोजी सांगितलं होतं की, आत्ताच्या आत्ता गावं खाली करा. तेव्हा पुनर्वसन पूर्ण झालेलं नव्हतं. टीन शेडमध्ये तुम्ही राहायला जा, असं सांगण्यात आलेलं होतं. पाऊस नसल्यामुळे, सर्व म्हणाले की, आम्ही नाही जाणार. त्यामुळे दर 31 जुलै ते साजरा करतात. आमच्या घरातून जबरदस्तीने आम्हाला बाहेर नाही काढू शकले, त्यानंतर 2018 च्या 31 जुलैला तिथे सेलिब्रेट करण्यासाठी एक मोठी सभा भरवली गेली, तशीच 2019 मध्येही. सगळं विलक्षण होतं. खूप जोरात पाऊस पडत होता. ही सभा बडवानीच्या मुख्य चौकात ठेवली होती. शक्य तेवढा मांडव घातलेला होता, त्यात सगळ्या महिला बसलेल्या होत्या. मांडवाच्या बाहेर सगळे पुरुष भर पावसात सभा होईपर्यंत सहा तास बसलेले होते. इतकी स्ट्राँग लीडरशिप मी आत्ताच्या काळात दुसरी पाहिलेली नाहीये. पाऊस सुरू झाला तेव्हा थोडी चलबिचल झाली होती. तर मेधाताई माईकवरून इतकंच म्हणाल्या, हम पानी से ही तो टकरा रहे है... तो फिर पानी से क्या डरना? जो जहाँ है वहीं बैठ जाये... ये जमीन हमारे लिये हि है... आणि हे ऐकल्याबरोबर तिथल्या चिखलात लोक तसेच्या तसे बसले, हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे. ते हेसुद्धा म्हणतात, ‘मेधाताई नसत्या तर आम्ही जिवंतच नसतो कदाचित. आम्हाला कधीच बुडवून मारलं असतं.’

 एडिटिंग करत असताना सारखं वाटायचं की, आपलं हे राहिलं ते राहिलं, आपण हे घेऊ शकतो ते घेऊ शकतो. त्यामुळे मी सतत बदल करत होते. पण एका पॉइंटला स्वतःला समजावलं की, हा विषय खरंच इतका मोठा आहे की, ही फिल्म कधीच संपणार नाही. त्यामुळे कुठे तरी थांबवायला लागेल. शेवटी ‘सारे जहाँ से अच्छा’ या इक्बाल यांनी लिहिलेल्या गीताची धून घ्यायची ठरलं. इतर गाणी तर सगळी घाटीतली ओरिजनल मिळत गेली, ती मी रेकॉर्ड करत होते. आणि तीच वापरली आहेत. एडिटिंग करताना किती तरी वेळा आम्हीच रडलो! सुरुवातीलाच एका ठिकाणी ती आदिवासी मुले एकत्र उभी राहून ‘भारतीय प्रजासत्ताकदिनाचा विजय असो’ असं म्हणतात, तेव्हा मला खूपच भरून यायचं. कारण एकीकडे आपण (आपल्या सोईसाठी त्या आदिवासी बांधवांना जबरदस्तीने त्याग करायला लावतो, स्वतःच्या घरातून बेघर करतो) जे संविधानाच्या अगदी विरुद्ध आहे आणि तरीसुद्धा ही मुलं ‘प्रजासत्ताकदिनाचा विजय असो’ असं म्हणत भारताच्या झेंड्याला नमन करतात! कुठून येतो इतका विश्वास आणि नम्रता?... असो. अशा प्रकारे फिल्म पूर्णवेळ त्या निळ्या रेषेत दिसणाऱ्या मुलांभोवतीच होती.

प्रश्न - फिल्म रिलीज झाल्यानंतर तुला काय प्रतिक्रिया आल्या? एकूण अनुभव कसा आहे?

- फिल्मला लोकांनी खूप सपोर्ट केला. अनेक लोक स्वतःहून पुढाकार घेऊन, खर्च करून त्याचे शो ठेवत आहेत. मला सगळ्यात महत्त्वाचं क्रेडिट द्यायचं आहे, आमची मैत्रीण स्वप्नाली अरुणा चंद्रकांत हिला! फिल्मचा पहिला ड्राफ्ट करत होते, तेव्हा ती म्हणाली होती की, ‘या फिल्मचा पहिला शो मी करणार.’ फिल्म पूर्ण झाल्यावर ती स्वतःहून आली आणि तिने ती आठवण करून दिली. या फिल्मच्या पहिल्या शोची सगळी तयारी तिने केली. दि. 30 जून, 2019 रोजी फिल्म रिलीज झाली. पुढे आमची मीटिंग झाली, तेव्हा असं ठरलं की आपला मुख्य उद्देश काय आहे? तर, या आंदोलनाविषयी लोकांनी बोलावं आणि त्यांनी त्याला सपोर्ट करावा. मग असं ठरलं की, फिल्म दाखवणे, एकमेकांना इंट्रोड्यूस करणं आणि चर्चा. त्यासाठी दोन प्रकारच्या लिस्ट करू या. एक लिस्ट शो आयोजित करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी तर दुसरी- आंदोलनाला सपोर्ट करू इच्छितात त्यांच्यासाठी. याच्यावर खूप चर्चा आणि चेष्टासुद्धा झाली.

माझे मित्र म्हणाले की, ‘हो-हो लोक तर तुटून पडणारेत लिस्टमध्ये नाव लिहायला! वगैरे.’ पण तसंच झालं! आम्ही त्याचे फोटो काढले आणि चिडवणाऱ्या मित्रांना ते दाखवले. माझ्या मित्रांच्या मदतीशिवाय ही फिल्म शक्य नव्हती. राधिका मूर्तीने तिची एडिटिंग सिस्टिम मला सहा महिन्यांसाठी देऊन टाकली होती. संपदा देशपांडे हिने न कंटाळता आतापर्यंतच्या तीस शोज्‌चे पोस्टर्स बनवले आहेत. आणि नूपुर नानल हिने तिचा महागडा रेकॉर्डर, नरेशन रेकॉर्ड करायला मला दिला होता.

खरं तर मला सुरुवातीपासून दोन गोष्टी क्लिअर होत्या. एक- ही फिल्म इमोशनली अपील झाली पाहिजे. दोन- ती मध्यमवर्गीय सर्वसामान्य लोकांना अपील झाली पाहिजे. कारण त्यांच्याबरोबर जास्त काम करण्याची गरज आहे. बदल आपल्या घरापासून सुरू होतो म्हणतात ना, तसं काहीसं. उदा- माझे नातेवाईक! साधारण माझ्या विचारात बदल झाल्यापासून माझ्या नातेवाइकांनी प्रश्न सुरू केले, ‘मेधा पाटकर? त्या मेधा पाटकरच्या बाजूची आहेस का तू?’ मी त्यांना उत्तर देते, ‘हो, मी त्यांच्या बाजूची आहे, म्हणजेच मी लोकांच्या बाजूची आहे.’ मग यावर साधारण टिपिकल उत्तर येतात, अरे, ती मेधा पाटकर फॉरेन फंडिंग घेते, तुला काय माहिती? वगैरे.

फिल्म रिलीज झाल्यानंतरचा एक किस्सा आहे. गांधी भवनला शो झाला आणि तिथे एक गृहस्थ प्रश्न विचारायला उभे राहिले. ते म्हणाले की, ‘मी आत्ता विकिपीडिया आणि इंटरनेटवर बघितलं की मेधा पाटकर यांना फॉरेन फंड मिळतात. त्या बाई सगळं खोटं बोलतात. तुम्ही जे काय सगळे सांगता त्यातलंही काही खरं नाही.’ मी अगदी शांतपणे त्यांना उत्तर दिलं, ‘सर, तुमची माहिती जरा कमी पडते आहे. मी तुमच्या लिस्टमध्ये माहिती ॲड करते. जो काही पैसा येतो ना, त्या मेधा पाटकर स्वतःसाठी घेतात आणि स्वतःसाठी वापरतात, असं तुम्ही ॲड करून टाका तुमच्या यादीमध्ये! आणि गरीब वगैरे असण्याचं हे मेधा पाटकरांचं नाटक आहे!! हे सगळं लिहून घ्या, विकिपीडियाला ॲड करा!’ अर्थात तिथे असलेल्या सगळ्यांना कळालं की, हा टोमणा आहे. पण त्या गृहस्थांना तो टोमणा कळला असेल तर बरं आहे! पण इतरांनी त्या काकांना बरंच ऐकवलं, अहो, तुम्ही विकिपीडिया आणि व्हाट्‌सअपसारख्या गोष्टीवरती विश्वास ठेवून बोलणार आहात का?

तुम्ही जरा नीट बघितलं तर मी सर्व मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न ऑलरेडी केलेला आहे. त्यात म्हटलेलं आहे की- ‘सोशल मीडियावाले लोग’ किंवा ‘एक दिवसात घाटीत जाऊन ॲडव्हेंचर टूर करून किंवा ट्रेकिंग करून तुम्हाला तिथली खरी परिस्थिती नाही कळणार.’ खरंच, हे स्क्रिप्ट मला माझ्याच माणसांनी दिलेलं आहे, असं मी मानते. कारण मी जेव्हा अहमदाबादला, शूट करायला गेले होते, तेव्हा माझ्या एका मैत्रिणीचा नवरा मला म्हणाला, ‘‘अभी तो हम वहाँ पर जा कर आए... मछली को खिलाने जाते है ना हम उधर... आप बता रहे हो उतने प्रॉब्लेम तो नही लगते वहाँ पर...’’ मी त्यांना विचारलं, ‘‘कहां जां कर आए और किनसे मिले?’’ तर ते म्हणाले, ‘‘वो जों कॅनॉल के किनारे किसान है ना, वो तो कह रहे थे यहां कोई प्रॉब्लेम नही है... पानी मिलता है...’’ त्यांना विचारलं, ‘‘त्यांना ऑफिशियली पाणी मिळतं का?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘वो तो नही पता. मगर वो ले लेते है वहाँ से.’’ त्यावर मी त्यांना समजावलं की, वही तो! वह लोग चोरी करते हैं ऐसा सरकार बोलती है... त्यावर ते पटकन म्हणाले, हां, वह तो चोरी हुई ना! उनका थोड़ी है पानी? मी जास्त आर्ग्युमेंट न करता इतकंच बोलले, यही तो प्रॉब्लेम है ना! पुढे मी हे सगळं स्क्रिप्टमध्ये घेतलं की, एक दिवसात तिथे जाऊन-येऊन पिकनिक करून तुम्हाला तिथले प्रश्न कळणार नाही.

हे स्क्रिप्ट मला लोकांनी दिलं म्हणण्याचं दुसरं कारण असं की, माझ्या घरातली माणसं ही भयानक भक्तगण आहेत. आंदोलन किंवा न्याय किंवा लोकांची बाजू याबद्दल प्रचंड नकारात्मकता आमच्याकडे आहे. त्यामुळे मला काहीही बोलायची सोयच नाही, असं म्हटलं तरी चालेल.  म्हणजे माझी आई एकदा म्हणाली, ‘तू असं सगळं का टाकतेस फेसबुकवरती? काय गरज आहे?’ त्यावर मी तिला म्हणाले, ‘तुला तर माहिती आहे ना, मी तर शहाणी नाहीच? मी सुरुवातीपासून अशीच आहे. जे पटतं ते मी मांडते.’ त्यावर आई म्हणाली, ‘अगं, पण त्यामुळे तुला उद्या कुणी काही केलं तर? काही प्रॉब्लेम तुला झाला तर?’ मी पटकन आईला म्हणाले, ‘आई, मला काही तरी प्रॉब्लेम होईल किंवा होऊ शकतो, हाच खरा प्रॉब्लेम आहे ना? आपण एक डेमोक्रॅटिक देश आहोत आणि आपल्याला आपली मतं मांडण्याची मोकळीक असलीच पाहिजे. तुम्हालाच भीती वाटते की तुम्ही ज्यांना इतके मानतात, ते लोकं तुमच्या मुलीला काही तरी करू शकतील; तर करू दे ना मग!’ असं सगळं पर्सनल लेव्हललासुद्धा सुरू आहे.

काही प्रश्नांची माझी उत्तरेसुद्धा फिल्म रिलीज झाल्यानंतर लोकांनी विचारण्याच्या आधीच तयार होती. मला शंभर टक्के माहिती होतं की फिल्म पाहिल्यानंतर मला हे नक्की विचारलं जाणार की- ‘तुम्ही एकच बाजू मांडली, दुसरी बाजू का नाही मांडली?’ माझे उत्तर असे की, ‘मी लहानपणापासून दुसरी बाजू ऐकत आणि बघत आले आहे. ती अनेक वेळा मांडलीसुद्धा आहे. पण ही बाजू कधीच मांडली गेलेली नव्हती. आज मला तशी संधी मिळत असेल, तर मी ती नक्की घेणार.’ काही लोकांनी खूप आर्ग्युमेंट केलं की, ‘तरीसुद्धा पाण्याखाली चाललेले गाव, आता पूर्ण बुडालेले असेल.  तुम्ही ती बाजू मांडली पाहिजे.’ त्यांना मी सरळ सांगितलं की, ‘तुम्ही त्या बाजूचे आहात का? मग तुम्ही ती बाजू मांडा. आपण दोन्ही बाजू एकत्र बघू या आणि हेही बघू या की, त्याचं पुढे काय होतंय ते.’

मला असं वाटतं की, पस्तीस वर्षांची लढाई आणि तरीही न बदललेली परिस्थिती याबद्दल ही फिल्म आहे. पुढे हळूहळू शो वाढत गेलेले आहेत. कोल्हापूर, सांगली, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा, हैदराबाद शहरांमध्ये आता शो सुरू आहेत. त्यामुळे जितक्या लोकांपर्यंत ही फिल्म पोहोचेल तितक्याच जास्तीत जास्त लोकांना होपफुली हा मुद्दा कळेल की- ‘आज भलेही हे आपल्या बाबतीत होत नाही, पण जर हे असंच सुरू राहिलं तर ही परिस्थिती आपल्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. आपण जागे होण्याची गरज आहे.’ इथे मला सर्वेश्वरदयाल सक्सेना यांच्या कवितेतील काही ओळी सांगाव्याशा वाटतात

देश कागज पर बना

नक्शा नहीं होता

कि एक हिस्से के फट जाने पर

बाकी हिस्से उसी तरह साबुत बने रहें

और नदियाँ, पर्वत, शहर, गांव

वैसे ही अपनी-अपनी जगह दिखें

अनमने रहें।

यदि तुम यह नहीं मानते

तो मुझे तुम्हारे साथ नहीं रहना है।

यदि तुम्हारे घर के

एक कमरे में आग लगी हो

तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो?

यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाशें सड़ रहीं हों

तो क्या तुम दूसरे कमरे में प्रार्थना कर सकते हो?

यदि हाँ, तो मुझे तुम से कुछ नहीं कहना है।

मुलाखत व शब्दांकन : दिपाली अवकाळे

मोबाईल क्र. 7875968100

प्रयोगासाठी संपर्क : शिल्पा बल्लाळ, पुणे

shilpaballal@gmail.com

मोबाईल क्र. 9403580232  

Tags: Film Sardar Vallabhbhai Patel Kewadia Manibeli Jeevanshala Aadiwasi Medha Patkar save Narmada movement Dipali Awkale Shilpa Ballal ‘Lakeer ke iss taraf’chi kahani Sadhana Diwali issue 2019 weekly Sadhana फिल्म सरदार वल्लभभाई पटेल केवाडिया मणिबेली जीवनशाळा आदिवासी मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलन दिपाली अवकाळे शिल्पा बल्लाळ ‘लकीर के इस तरफ’ची कहाणी साधना दिवाळी अंक 2019 साप्ताहिक साधना weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शिल्पा बल्लाळ
shilpaballal@gmail.com

सामाजिक कार्यकर्ती, डॉक्युमेंटरी मेकर 


प्रतिक्रिया द्या