डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

जत्रेचं ठिकाण जवळ आलं. भोंग्याचा आवाज कानावर पडू लागला. जवळच खळाळता झरा दिसला. मग त्याला जाणवलं की आपल्याला तहान लागली आहे. ओंजळीत पाणी घेऊन मनसोक्त पाणी प्यायला. थोडी तरतरी आली. चालून थकला होता तो. हळूहळू गर्दी दिसायला लागली. मग तो ही गर्दीचा एक भाग होऊन गेला.

त्याची पावलं झपाझप चालत होती. पायात चप्पल नाही. गुडघ्यापर्यंत धूळ माखलेली. खाकी रंगाची ढगळ पॅन्ट आणि मळकट पांढरा सदरा. गवतातून आणि झाडाझुडपातून तो चालत होता. शाळेतही तो असाच जातो. काटा रूतेल, ठेच लागेल याची भीती नाही. त्यानं मनातच काही ठरवलं होतं. सकाळची शाळा होती. घरी आल्याबरोबर कोपऱ्यात दप्तर फेकलं. खेळायला बाहेर पडावं, अशा सहजतेनं तो बाहेर पडला. गाव मागं सारून पुढं पुढं चालू लागला. दूरवर दिसणाऱ्या टेकडीकडं बघत तो अंदाज घेत होता. आणखी बरंच चालायचं होतं.

गावापासून साधारण चार ते पाच किलोमीटर दूर टेकडीवर देवीचं मंदिर आहे. वर्षातून एकदा तिथं पायथ्याशी तीन दिवस जत्रा भरते. आजूबाजूच्या गावांतील लोक मोठ्या संख्येनं येतात. रस्त्यानं कुणी ना कुणी त्या दिशेनं जाताना दिसत होते. डोक्यावर टोपली घेतलेल्या, नवं कोरं लुगडं नेसलेल्या बाया लगबगीनं चालत होत्या. कुणी टोपी घातलेले, फेटा बांधलेले. साऱ्यांची पावलं जत्रेच्या दिशेनं चालत होती.

त्यांच्यात न मिसळता तो ही एकटाच चालत होता. रस्त्यात झाडाला कैऱ्या दिसल्या. दोन चार दगड मारले, कैऱ्या पाडल्या. खात खात चालू लागला. त्यानं घरी कुणालाच काही सांगितलं नव्हतं. घरी होतं तरी कोण? म्हातारी आजी! बाप कुणाच्या तरी शेतात कामाला गेलेला होता. माय रानात गेली होती मोळी आणायला. धाकटी बहीण असेल कुठं तरी खेळत.

रस्त्यात काही गुराखी मुलं झाडाला सायकलचे टायर बांधून झोके घेताना दिसली. त्याला मोह आवरला नाही. चालताना सहजच हातात घेतलेली पळसाच्या फुलांची फांदी त्यानं टाकून दिली. मुलांची गंमत बघत काही वेळ तिथंच थबकला. मग त्यालाही संधी मिळाली झोके घेण्याची. एकदा तर एवढ्या जोरात झोका घेतला की वाटलं आपण आकाशातच उडालो! मजा तर आली पण भीतीही वाटली. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. खाली उतरला, पुन्हा चालायला लागला. त्याला जत्रा बघायची होती.  

वर्गात मुलांनी सांगितलं होतं, जत्रेत काय काय असतं ते. त्याच्या बालभारतीच्या पुस्तकातही जत्रा नावाचा धडा होता. त्यात जत्रेचं चित्रसुद्धा होतं. म्हणूनच त्याला कुतूहल वाटत होतं. रस्त्यात एक हडकुळा कुत्रा सारी शक्ती एकवटून त्याच्यावर भुंकू लागला. क्षणभर तो घाबरला पण त्यानं दगड उचलून मारल्यासारखं केलं तर कुत्रा कुठल्या कुठं पळून गेला. दूरवर जाऊन मागे वळून त्याच्याकडं बघू लागला.

जत्रेचं ठिकाण जवळ आलं. भोंग्याचा आवाज कानावर पडू लागला. जवळच खळाळता झरा दिसला. मग त्याला जाणवलं की आपल्याला तहान लागली आहे. ओंजळीत पाणी घेऊन मनसोक्त पाणी प्यायला. थोडी तरतरी आली. चालून थकला होता तो. हळूहळू गर्दी दिसायला लागली. मग तो ही गर्दीचा एक भाग होऊन गेला.

किती तरी दुकानं. काय बघू नि काय नको! बंदुकीचा नेम धरून फुगे फोडण्याचा अनेकांचा प्रयत्न चुकायचा. त्याला वाटायचं, सोप्पं आहे. मी तर पटापट सारे फुगे फोडू शकतो. आपला नेम जोरदार आहे! खेळण्याच्या दुकानातील बोलका पोपट त्यानं हातात घेऊन पहिला. किंमत विचारली अन ठेवून दिला. दोन कोंबडे असलेली खेळणी त्याला आवडली. एकामागोमाग एक ते दोन कोंबडे त्यांच्या प्लेटमध्ये चोच मारतात. प्लॅस्टिकची माऊ होती, भू-भू होता, खेळण्यातील सिनेमा होता. त्यात फिल्म टाकायची. मग एक डोळा बंद करून बघितलं की माणसं दिसायची. एक लाल रंगाची पुंगी त्याला आवडली. तिला एक पीस लावलेलं होतं. ती वाजवली की ते पीस उडायचं. खूप मजेदार वाटत होतं. त्यानं भीत भीतच ती वाजवून बघितली आणि ठेवून दिली. दुकानदार त्याच्याकडं रागानं बघू लागला.  

तो नुसता इकडून तिकडं भटकत होता. कपाळावरील घाम सदऱ्याच्या बाहीनं पुसत होता. भाजलेले शेंगदाणे आणि चणे-फुटाणे बघून तो थांबला, पण त्यानं मोह आवरला. पुढं जिलेबीच्या दुकानासमोरही तो रेंगाळला. कल्पनेतच मिटक्या मारत, जिलेबी कशी बनते हे तो बघत राहिला. विविध पदार्थांचा घमघमाट श्वासात भरून घेत होता. घरी आई कधी असे खमंग पदार्थ का बनवत नाही, असा प्रश्न त्याला पडला.

कुठंही गर्दी दिसली की तो लोकांच्या पायांमधून मार्ग काढीत पुढं जायचा. साप आणि मुंगसाची लढाई पाहण्यासाठी गर्दीत त्यानं सर्वात समोर जागा पटकावली. सापानं फणा उगारल्यावर मात्र त्याची भंबेरी उडाली.

चालताना कुणाचा तरी धक्का लागला, पण त्याला त्याचं काहीच वाटलं नाही. जत्रा बघायला आलेल्या लोकांचाच आपणही एक भाग आहोत, याचंच त्याला खूप अप्रूप वाटत होतं. आपण मोठे झालो असल्याचा त्याला उगीच भास झाला. गावातील काही ओळखीची मोठी मुलं त्याला भेटली. त्यांचे आई- वडील त्यांच्या सोबत होते. घराशेजारचे एक काका दिसले पण त्यानं त्यांची नजर चुकवली. पुढं त्याच्या कानावर कर्रर्र असा आवाज पडला. समोर स्टीलच्या आणि पितळेच्या भांड्यांचं दुकान होतं. भांड्यांवर मशीननं नाव टाकताना होत असलेला आवाज ऐकून तो बघतच राहिला. त्याच्यासाठी हे सारं नवं होतं. त्याला मज्जा वाटत होती. काय बघू नि काय नको असं झालं होतं. चालताना लाइट लागतात ते बूट त्याला खूप आवडले होते. तो खूप वेळ ते बूट पाहत होता. किंमत विचारावी, एवढं धाडस मात्र त्याला झालं नाही.

आकाशझुला त्यानं फक्त पुस्तकातच बघितला होता. आज पहिल्यांदाच बघू लागला. मुलं पैसे देऊन त्यात बसत होती. त्याला वाटलं आपणही बसावं. झुला उंच गेला की तिथून आपलं घर दिसतं का बघावं. त्यानं खिशात हात घातला पण गप्पच राहिला.

मागील तीन ते चार तास तो जत्रेचा आनंद मनात साठवत होता. सायंकाळ होत होती. सावल्या लांब पडायला लागल्या. गर्दी हळूहळू पांगायला लागली. कडेवरचं लेकरू अन डोक्यावरचं गाठोडं सांभाळत बाया घरी जायला निघाल्या. कुणी बैलगाडीनं आले होते. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज वातावरणात वेगळाच रंग भरत होता. हवेत धूळ उडत होती. सर्व दृश्य डोळ्यांत घेऊन तो ही माघारी फिरला. त्यानं बघितलेली एकेक वस्तू त्याला आठवत होती. जणू ती आपल्या हातात आहे, असा त्याला भास होत होता. तो वारंवार मागं वळून बघत होता. तीच पायवाट. तेच शेत. तो थकला होता. त्यानं काहीच खाल्लं नव्हतं. जत्रेच्या आनंदात तो सारं काही विसरला होता.

गावाजवळ पोहोचल्यावर एक आजोबा भेटले. त्यांनी ओळखलं, की हा जत्रेतून येत आहे. त्यांनी विचारलं, पोरा, जत्रेला गेला होतास ना? काय घेतलंस मग? यावर पँटच्या खिशात हात घालून रिकाम्या खिशांचे दोन्ही कान बाहेर ओढत, खालच्या नजरेनं तो म्हणाला, काही घ्यायला पैसा कुठाय माझ्याकडं!

बाजूच्या एका दुकानात टेप रेकॉर्डरवर शायर जहीर आलम यांचं गाणं सुरू होतं-

उन गरीब बच्चों का सब्र क्या मिसाली है

जा रहे है मेले में और जेब खाली है....

Tags: जहीर आलम संजय मेश्राम गोष्ट Jahir Alam Sanjay Meshram Jatra Gosht weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या