डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत घडलेल्या राजेंद्र बहाळकर यांचा पिंडच कार्यकर्त्याचा ! समता, न्याय, लोकशाहीवादी वृत्ती हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग. वेगवेगळ्या जनआंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेत आणि सुरुवातीच्या वाटचालीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. सेवा दलाच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षपदाची धूराही त्यांनी काही काळ सांभाळली. महाराष्ट्र आरोग्य मंडळात त्यांनी सोळा वर्षे सेवा केली. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटचे ते सचिव आहेत. त्यांचा उत्साह आणि उर्जा कुणाही तरुणाला लाजवेल अशीच आहे. त्यांच्या उत्साह-उर्जाचे प्रतिक म्हणजे ते घेत असलेल्या कार्यशाळा. विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये रुजवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विद्यार्थीच नाही तर पालक, शिक्षक, व्यावसायिक यांच्यासाठीही ते कार्यशाळा घेतात. 1 फेब्रुवारी रोजी ते 500 कार्यशाळा घेत आहेत. त्यानिम्मिताने घेतलेली ही मुलाखत.

प्रश्न - सर्वप्रथम हे सांगा की, तुम्ही कधी कुठल्या कार्यशाळा अटेंड केल्या आहेत का? त्याचा तुमच्या मनावर काही नेमका प्रभाव राहिला आहे का?
- खरं सांगायचं तर ज्या पद्धतीच्या कार्यशाळा मी संचलित करतो, त्या पद्धतीची कार्यशाळा मी कधीच अनुभवली नाही. आम्ही घेत असलेल्या कार्यशाळेच्या तळाशी शरीर-मनाची मोकळीकता हा गाभाघटक आहे. मी लहानपणापासून राष्ट्र सेवादलाशी संबंधित आहे. त्यामुळे सेवा दलाची निरनिराळी शिबिरं अनुभवलेली होती. त्यात भाषणं, मार्गदर्शन अशा बौद्धिकांचा अधिक वापर राहिला आहे. मात्र केवळ खेळ-गप्पा-गाण्यांच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार रूजवायचा अशी इतर कुणाची कार्यशाळा मला अनुभवता आली नाही.

प्रश्न - मग कार्यशाळेची कल्पना कशी सुचली?
 - मला आठवतंय, एस.एम. जोशी यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पथनाट्याची पथकं उभारून प्रबोधनाची मोहिम राबवण्याचं आम्ही ठरवत होतो. त्यासाठी पथनाट्य करणाऱ्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यायला सुरुवात झाली. या तज्ज्ञांच्या एका गोष्टीचे मला आकर्षण वाटले, ती म्हणजे- कोणतंही नाटक अगर पथनाट्याचा सराव घेण्याआधी जमलेल्या व्यक्तींमध्ये मोकळीकता निर्माण करणे. त्यासाठी चार-सहा खेळ घेऊन शरीर आणि मन   सैल करून घ्यायचे. मला या खेळांमधील मोकळेपणा भावला. मग मी ते खेळ शिकून घेतले आणि पथनाट्य करू पाहणाऱ्या नव्या तरुणांना तशी प्रशिक्षणं देऊ लागलो. पथनाट्यातून किती जनमानसाचे प्रबोधन होईल हे सांगता येणार नाही. मात्र ते सादर करणाऱ्या तरुणाईवर त्यांचा चांगला प्रभाव पडतो, हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे मोकळीकता निर्माण करून खेळ-गाणी-गप्पांच्या माध्यमातून विषयभान आणणे, गटचर्चा घडवून विषयाच्या तळाशी घेऊन जाणे ही ताकद माझ्या लक्षात आली. त्यातूनच कार्यशाळेची कल्पना सुचली.

प्रश्न - आत्ता आपण जरी कार्यशाळेची पार्श्वभूमी समजून घेत असलो तरी तुमची वैचारिक जडणघडण कशी झाली? तुमची राष्ट्रसेवा दलाशी ओळख कधी झाली? सेवा दलाचे संस्काराचे दिवस, तुमची वैचारिक बैठक आकाराला येण्याचे दिवस कसे होते?
- मी मूळचा धुळ्याचा. तिथंच मी बी.एसस्सी केली. लहानपणापासूनच माझ्या गावी राष्ट्र सेवादलाच्या शाखेत जाण्याची संधी मिळाली. माझ्यासारख्या अनेकांचा त्या खुल्या विद्यापीठात विकास झाला. माझ्या आईच्या गावी साने गुरुजी येत असत. आई त्यांच्या आठवणी सांगत असे. तिच्याकडून तोही वारसा मिळाला होता. आमचे शाखा शिक्षक, वरिष्ठ कार्यकर्ते खूप चांगले होते. तिथं वाचायला पुस्तकं मिळत होती. शाखेच्या अभ्यासवर्गाबरोबर आम्ही मुलं प्रत्यक्ष ग्रामीण भागात सायकलींवर फिरायचो. दिसतील त्या प्रश्नांवर गटचर्चा करायचो. त्यातून सामाजिक जाणिवा वाढू लागल्या, अस्वस्थता वाढत गेली आणि आपण सामाजिक काम करायचं हे ठरत गेलं.

प्रश्न - मग पुण्यात कसे आलात? सामाजिक कामाचं बीज आधी तुमच्या मनात रूजलेलं होतं, त्याला पुण्यात कशारितीने खतपाणी मिळालं?
- आणीबाणीनंतरच्या काळात शिक्षकांचा खूप मोठा संप झाला होता, त्यामुळे शासनाने दहावीच्या परीक्षांची केंद्रे कमी केली होती. गावखेड्यातून येणाऱ्या मुलांच्या निवासाची सोयदेखील (शिक्षक नसल्यामुळे) झालेली नव्हती. त्यावेळी राष्ट्र सेवादलाने अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी ठिकठिकाणी पंधरा दिवसांची अभ्यासकेंद्रे सुरू केली होती. तेव्हा धुळे जिल्ह्यातील रामबोरीस गावाची जबाबदारी माझ्याकडे होती. देखरेखीसोबत आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतही होतो.
आमच्या कामाकडे पाहून गावकऱ्यांनी आम्हाला महात्मा गांधी, मदर तेरेसा, साने गुरुजी अशी बिरूदावली देऊन पुरस्कृत केले. या कार्यक्रमास ग.प्र.प्रधानसर पाहुणे म्हणून आले होते. प्रधानसरांचं राज्यभरातील कार्यकर्त्यांशी चांगलं नातं होतं. तेच मला पुण्यात घेऊन आले. प्रधानसर म्हणाले होते, ‘पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत  असणाऱ्या तुझ्यासारख्या कार्यकर्त्याला मानधन म्हणून दरमहा रुपये तीनशे देणेही आज सेवादलास नियमितपणे शक्य होणार नाही. म्हणून ज्यात समाजकार्य आहे अशी नोकरी तू कर.’ खरं तर त्यावेळी मी बुद्धिबळाचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून नावारूपास आलो होतो. खेळाडू म्हणून बँकेत नोकरीही मिळाली होती. मात्र समाजकार्याला प्राधान्य द्यावेसे वाटले. मग पुण्यात हडपसरच्या महाराष्ट्र आरोग्य मंडळात पंधराएक वर्षे जनसंपर्क अधिकारी म्हणून राहिलो. इथं माझ्या आवडीचं काम करायला मिळालं. इथं अनाथ मुला-मुलींचं बालसदन होतं. ग्रामीण, आदिवासी मुलांसाठीचं काम होतं.

प्रश्न - पुण्यात तुम्ही आलात, सेवा दलाच्या कामात अधिक सक्रिय झालात. याच कालखंडात कार्यशाळेचं बीजं अंकुरत गेलं असं वाटतं का?
 - हो. राष्ट्र सेवादलाची सर्वांत महत्त्वाची ताकद कोणती तर त्यांच्या शाखा आणि प्रशिक्षण शिबिरं. अजूनही वर्षभरात शंभरेक शिबिरं होतात. पूर्वी शिबिरांत खूप बौद्धिक असायचे आणि मैदानात खो-खो, लेझिम, डंबेल्स असे फार दमवणारे खेळ असायचे. परिणामी, बौद्धिक चर्चासत्रात शिबीरार्थी पेंगुळलेले असायचे. या पॅटर्नमध्ये बदल केला पाहिजे, असं मी संयोजकांना सांगायचो. मैदानी खेळांऐवजी सृजनाला साद घालणारे कल्पक खेळ-गाणी हा पॅटर्न असावा असं मला वाटत होतं. हा विचार रूजवण्यासाठी सुरुवातीला शिबिर घेणारे प्रशिक्षक, मैदान प्रशिक्षक यांच्या कार्यशाळा घेतल्या. सेवा दलाच्या धुरीणांनाही कार्यशाळेची कल्पकता पटत होती, पण वळत नव्हती. त्यामुळे सेवादलासोबतच स्वतंत्रपणेही कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. मग शाळा- महाविद्यालये, पालकवर्ग यांच्यासाठी स्वतंत्रपणे कार्यशाळा घेऊ लागलो. इथं माझं मला पूर्ण स्वातंत्र्य मिळतं.

प्रश्न - गेल्या सहा वर्षांत एखादे मिशन हाती घ्यावे याप्रमाणे तुम्ही कार्यशाळा घेत आहात आणि त्यातूनच पाचशेचा टप्पा गाठला आहे. पण तुम्ही पहिली कार्यशाळा घेतली तेव्हा आपण या कार्यशाळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करू आणि पाचशेचा टप्पा गाठू, असं काही मनात होतं का?
 - मला कार्यशाळा संचलन करण्यात खूपच आनंद मिळत राहिला आहे. त्यामुळे आपण कुठवर ते घेऊन जाऊ हे नेमकं ठरलेलं नसलं, तरी सातत्याने कार्यशाळा घ्यायच्या हा विचार मनात होताच. समता आणि न्यायाची भूमिका हा आमच्या कार्यशाळेचा गाभाघटक. त्यानुसार प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घ्यायचं हे ठरवलं. माझ्या कार्यशाळेत वैचारिकता असली तरी भाषणबाजीला जागा नाही. उलट चांगली गाणी-खेळ दिले तर मुलं शंभर टक्के सहभागी होतात. सध्या शाळांमध्येही सर्वसाधारण क्षमतांच्या मुलांकडे दुर्लक्ष केले जाते. वस्तुत: त्यांना प्रेरणादायी वातावरण दिलं तर ही मुलं व्यक्त व्हायला लागतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात छोटे आणि चांगले बदल होऊ लागतात. त्यांचा आत्मविश्वास बळावतो.

 प्रश्न - उदाहरणार्थ म्हणून एखादा खेळ सांगाल?
 - तुम्ही मनमुराद कधी हसलात ते आठवतंय का? नाही ना! असंच असतं. मुलंही कित्येक दिवसांत खळखळून मनमुराद हसलेली नसतात. सर्वप्रथम त्यांना मोकळं करणं महत्त्वाचं वाटतं. त्यासाठी फजिती होणारे खेळ घेतो. जसं की पदार्थाचं नाव घेतलं की खातो/खाते म्हणायचं. आम्ही दगड,माती, पाणी असं नाव घेतो तेव्हाही खेळण्याच्या ओघात मुलं खातो/खाते म्हणतात आणि हसत सुटतात. दुसरा कल्पकतेचा खेळ.
उदाहरणार्थ, एखाद्या गटाला कल्पकतेने फुलाचा आकार करून दाखवण्यास सांगतो. पण सुरूवातीला घडतं असं की, एकानेच नेतृत्व केलेलं असतं आणि आकार ठरवलेला असतो. बाकीच्यांनी माना डोलावून ऐकलेलं असतं. असं नेहमीच्या आयुष्यातही घडतंच. आपलं काहीतरी चुकेल म्हणून बहुतांश मुलं बोललेली नसतात. मग त्यांना समजावतो की प्रत्येकाने काहीतरी मत द्यायचं. एकमेकांना प्रेरणा देणं हा खूप महत्त्वाचा गुण आहे. यातून मग मुलं एकमेकांना मत मांडण्यास प्रोत्साहन देऊ लागतात, एकमेकांच्या अधिक जवळ जातात. एकमेकांचा आदर करू लागतात. दुसऱ्यांदा मग झाड बनवायला सांगतो तेव्हा न बोलणारी मुलं बऱ्यापैकी मोकळी झालेली असतात. मात्र आपल्या व्यवस्थेने कल्पकताच मोडीत काढलेली आहे. झाड बनवतानाही ते एकरेषीय विचार करतात. कुणी झाडाला पाणी घालतंय. कुणी झाडाखाली झोपलंय, फळं फुलं तोडत आहेत, दुष्काळातील झाड असा विचार मुलांनी केलेला नसतो. हे लक्षात आणून दिले की, मुले अवाक होतात. पुढच्या खेळात साचेबद्धता तोडण्याचा विचार करू लागतात. कल्पकतेला चालना मिळते. त्यांना कल्पना वा विचार सुचायला लागतात. व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे खेळ महत्त्वाचे ठरतात. यातून लोकशाहीचे, समतेचे  प्राथमिक धडे रूजविण्याचा प्रयत्न होतो.

प्रश्न - कार्यशाळेसाठी काय काय लागतं?
- बाकं नसलेला एक रिकामा हॉल आणि सतरंजी. स्पीकर असेल तर उत्तम, नसला तरी फरक पडत नाही.

प्रश्न - वा! अगदी कमीत कमी घटकांमध्ये कार्यशाळा होऊ शकते. कार्यशाळेची रचना कशी असते?
- कार्यशाळेचे उद्‌घाटन होत नाही. प्रारंभीच अभिनय गीत घेतो. मुलांना सूरातल्या टाळा सांगतो. मुलंही गाण्यात सहभागी होतात. यानंतर सहज ‘आईसब्रेकींग’ होणारे खेळ होतात. यात अनेकदा इतरांची किंवा स्वत:ची फजिती होते आणि विद्यार्थी मोकळेपणाने हसू लागतात. यानंतर मग ठरलेल्या विषयानुसार खेळ, गप्पा होतात. उदा. आमचा शाळेला होणारा त्रास, आम्ही पालकांना देत असलेला त्रास, असे विषय मुलांसाठी खुले करायचे. मुलं विचार करू लागतात. मुद्दे मांडू लागतात. मग गटचर्चा घेतली जाते. कार्यशाळेत कुठलंही पठडीबाज भाषणं अगर भाष्य होत नाही. खूप विखुरलेल्या स्वरूपात मात्र मुलांमध्ये पाझरेल, झिरपेल अशी खेळगाणी, गोष्टी, गप्पा, संवाद इत्यादी माध्यमांतून मुलांचे ‘अपग्रेडेशन’ केले जाते. कार्यशाळेचं उद्‌घाटन होत नाही तसा समारोपही होत नाही. मुलांनीच दोन मिनिटांत त्यांचं मनोगत सांगून कार्यशाळा संपवायची.

 प्रश्न - अशा कोणकोणत्या विषयांवर कार्यशाळा घेता? पहिल्यांदा कशावर कार्यशाळा सुरू केल्या?
- सर्वात पहिल्यांदा ‘अभ्यास करू या मजेत’ हा विषय घेण्यास सुरूवात केली. आजही शाळाशाळांत दहावी जवळ आली की, अभ्यासाचा ताण मुलांना दिला जातो. ताणरहित अभ्यास होणं गरजेचं आहे वाटलं तेव्हा, नववी- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घ्यायला लागलो. मला नेहमी वाटतं, विद्यार्थी नव्हे तर शिक्षणव्यवस्था नापास होत असते. म्हणजे नापास होण्यात विद्यार्थी स्वत: कमी जबाबदार असतो, व्यवस्था अधिक जबाबदार असते. विद्यार्थ्यांचा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलावा लागतो. शिक्षक चांगलेच शिकवतात, ते स्वत: अभ्यास करून येतात असं मुलांना पटवून दिलं की, मुलंही शिक्षकांच्या मेहनतीकडे सकारात्मकतेने पाहू लागतात.

प्रश्न - त्यानंतर कोणत्या विषयाच्या कार्यशाळा घेतल्या?
- त्या त्या वेळची गरज म्हणून विविध विषयांवर कार्यशाळा होतात. चार वर्षांपूर्वी निर्भया प्रकरणानंतर भीतीची एक लाट पसरली होती. बलात्काराची तर भीती होतीच, पण एकुणच मुली व पालकांमध्ये मुलींच्या घराबाहेर पडण्याबाबतच भीती दाटली होती. त्यामुळे ‘चला निर्भय होऊ या’ हा विषय घेतला. सरसकट समाज वाईट नाही, घाबरण्याचे कारण नाही, इथपासून ते ठामपणे नकार कसा द्यायचा? दटावून बोलणं, डोळ्यांना डोळे देणं, संवाद साधणं यांची परिणामकारता त्यातून पोहोचवता  आली. मुलींचे, महिलांचे सर्वात जास्त लैंगिक शोषण हे ओळखीच्या, प्रतिष्ठित माणसांकडून होते; तेव्हा कसा प्रतिकार करायचा हेही सांगता आलं. काही जणी स्वत:लाच दोषी समजतात. तो गंड गटचर्चांतून घालवण्याचा प्रयत्न करता आला. मुला मुलींना लैंगिकतेचंही बरंच आकर्षण असतं. वयात येणं म्हणजे काय? पाळी म्हणजे काय? याबाबत वैज्ञानिक माहिती दिली जाते. मुला-मुलींच्या भरपूर शंका असतात. ते अनेक प्रश्न विचारतात. सुरुवातीला चिठ्‌ठ्यांतून नाव न लिहिता प्रश्न विचारणारी मुलं नंतर थेट समोरून प्रश्न विचारू लागतात. खरं तर मुलगा मुलगी दोघांनाही एकमेकांचं शरिरशास्त्र समजून घ्यायचं असतं. मात्र विज्ञानाच्या पुस्तकातील शरीरशास्त्राविषयीचे धडे शिक्षक शिकवत नाहीत, तर नुसते वाचून यायला सांगतात. कार्यशाळेत मात्र शरीरशास्त्राचं कुतूहल वैज्ञानिक मार्गाने शमवलं जातं. पोर्नोग्राफी हे सध्याचे जगातील सर्वात वाईट व्यसन असल्याचे मी मानतो. लैंगिकता ही घाणेरडी गोष्ट नसून, चांगली बाब आहे. परंतु पॉर्नफिल्म पाहत लैंगिक विकृती कशी तयार होत जाते, हे आम्ही वैज्ञानिक दृष्ट्या कार्यशाळेत समजावण्याचा प्रयत्न करतो.

 प्रश्न - पालकांसाठी कार्यशाळा घेतल्यात का?
- विद्यार्थ्यांमध्ये झालेले छोटे बदल टिकवायचे असतील तर त्यात पालक-शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर कार्यशाळा घेतो. पालकांचा मुलांबाबत नकारात्मक भाव जास्त असतो. त्याला काही येतच नाही, सतत खेळत असतो, मोबाईलवर असतो, अभ्यास करत नाही अशा तक्रारी असतात. पण मुलांच्या आयुष्यात चांगलंही काही सुरू असतं, त्याकडे त्यांचं दुर्लक्ष असतं. म्हणून पालकांचा दृष्टिकोन बदलला, मुलांना समजून कसं घेता येईल हे त्यांनी तपासून पाहिलं तर फार फरक पडतो. पालकांनी स्वत:हून आपला दिनक्रम शेअर केला, संवाद वाढवला तर मुलंही आपल्या विश्वातल्या गोष्टी त्यांना सांगू लागतात.

 प्रश्न - शिक्षकांसाठी काही कार्यशाळा घेतल्यात?
 - आपल्याकडील डी.एड, बी.एडचा अभ्यासक्रम सर्वोत्कृष्ट आहे. शिकवण्याच्या पद्धतीबरोबरच मुलांच्या मानसिकतेचा, मानसशास्त्राचा विचार त्यात केला आहे. पण शिक्षक नोकरीला लागेपर्यंत याचा अवलंब करतात आणि नंतर विसरतात. त्यांनी जर साध्या साध्या गोष्टी केल्या तरी आनंदी शिक्षण सुरू होतं. मी शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतो, त्यातून हेच ठसवलं जातं. अगदी वर्गात गेल्यावर सुरुवातीला सूरातील टाळी वाजवा. गाता येत असेल तर एखादं गाणं म्हणा, विनोद सांगा. स्वत:चा व विद्यार्थ्यांचा कंटाळा जाईल. पहिल्या पाच मिनिटांत मुलं शिक्षकांच्या वर्तणुकीवरून ठरवतात की, ते काय शिकणार आहेत. काही शिक्षकांवर तर विद्यार्थ्यांनीच काट मारलेली असते. शिक्षक उत्साही आनंदी असेल तर मुलांचा कंटाळा गायब होतो.

प्रश्न - कार्यशाळेच्या गाभाघटकात समतेची, न्यायाची भूमिका आहे. त्याअनुषंगाने मुला-मुलींच्या एकत्रित कार्यशाळा घेतल्या आहेत का?
- होय. बहुतांश कार्यशाळा एकत्रच असतात. प्रत्येक गटात निम्म्या मुली व निम्मी मुले असतात. सुरुवातीला परस्परांचा हात धरण्यातही खूप संकोच असतो. हळूहळू केवळ संकोचच जात नाही तर कार्यशाळेतील खेळांमधील सहभागाने परस्परांकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन गळायला सुरुवात होते. निकोप, निखळ मैत्री होत जाते व मर्दानगीच्या, पुरुषत्त्वाच्या खोट्या कल्पना बाजूला जातात, समतेच्या दिशेने प्रवास सुरू होतो.

प्रश्न - चळवळीमधील तरुणाईसाठी देखील अशा प्रशिक्षणांची गरज वाटते का?
 - खरे तर मी पुरोगामी चळवळीतूनच मोठा होत आलेला, शिकत असलेला कार्यकर्ता आहे. सर्वसाधारणपणे पुरोगामी संघटना, चळवळींमधील कार्यक्रम निश्चितच समतेच्या बाजूचे, लोकशाहीवादी असतात. त्यात काम करणारे नेते, कार्यकर्तेदेखील अतिशय चांगले, त्यागी असतात. मात्र व्यापक अर्थाने या संघटनांचे वातावरण व कार्यक्रम अतिशय पारंपरिक असल्याने त्याच त्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात. ते आजच्या तरुण पिढीला अजिबात आकर्षित करत नाहीत. सतत कुणाच्या तरी विरोधात असणारी नकारात्मक भाषा आजच्या तरुणाईला आवडत नाही. त्यामुळे ‘सर्वात अपरिवर्तनीय कोण तर परिवर्तनवादी संघटना’ असे मला विनोदाने म्हणावेसे वाटते. म्हणून कल्पक उपक्रम सुचण्यासाठी, संघटनांमधील वातावरण अधिक सकारात्मक करण्यासाठी, कार्यकर्त्यांची नवी रिक्रुटमेंट होण्यासाठी चळवळी वा संघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी  अशा प्रशिक्षण कार्यशाळांची गरज वाटते.

प्रश्न - एकूण 500 कार्यशाळांचा ठळक गोषवारा सांगू शकाल?
 - गोवा, ओरिसा, मध्यप्रदेश व बिहार या चार राज्यांत मिळून 13 कार्यशाळा झाल्या आहेत. महाराष्ट्रात 487 कार्यशाळा झाल्या आहेत. महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमधून या कार्यशाळा झाल्या आहेत. पुणे जिल्हा-131, पालघर जिल्हा-116, ठाणे जिल्हा-58 व अन्य 15 जिल्ह्यांमधून उर्वरित कार्यशाळा झाल्या आहेत.

प्रश्न - या वाटचालीबद्दल काय सांगाल?
 - किमान पाच तासांची एक अशा पाचशे कार्यशाळा पूर्ण होताहेत, याचा आनंद तर होतोच आहे, पण काहीसे आश्चर्यही वाटत आहे. कारण खूप अडचणी आणि अडथळे आले. सुरुवातीला मी अनेक शाळा, महाविद्यालये, संस्था व तेथील मान्यवर यांना कार्यशाळा आयोजनासाठी विनंती करीत असे. चांगले मित्र असतील तर त्यांच्या मागेही लागत असे. काही वेळा लोक मला हसत, परतवून लावत असत. काही ‘हो’ म्हणायचे, पण प्रत्यक्षात काहीच घडत नसे. आता मात्र मला फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. शाळा, महाविद्यालये, संस्था स्वत:हून माझ्याशी संपर्क करतात. या साऱ्या प्रयत्नांमधून वर्षाला साधारणपणे 80 कार्यशाळा होतात. खरे तर वर्षाला 150 पर्यंत कार्यशाळा होऊ शकतात. परंतु आयोजकांची उदासीनता, नकारात्मकता मध्ये येते. तसेच मी पुर्णवेळ कार्यकर्ता आहे. माझ्या संस्थेकडून मला दरमहा मानधन मिळते आणि हे मानधन कार्यशाळेसाठी आकारल्या जाणाऱ्या सहयोगनिधीतून दिले जाते. सुरुवातीला अनेक महिन्यांचे मानधन थकलेले असायचे, अनेकदा तुटीचाच हिशोब असायचा. स्नेहसंमेलन इत्यादीवर लाखो रूपये उधळणाऱ्या संस्था, मुलभूत बदल घडविणाऱ्या कार्यशाळेच्या आयोजनासाठी मात्र अनेकदा हात आखडता घेतात. आता मात्र सर्व घडी नीट बसल्याचे समाधान आहे.

प्रश्न - कार्यशाळेतील काही अविस्मरणीय अनुभव सांगाल?
 - एका शाळेत ‘चला निर्भय होऊ या’ ही कार्यशाळा झाली. नंतर त्यातील (वडील गमावलेली) एक मुलगी येऊन भेटली आणि म्हणाली, ‘एका मध्यरात्री मला अचानक जाग आली, पाहते तर काका येऊन चिकटलेला. मी मोठ्याने ओरडून सुटका करून घेतली. पण त्यानंतर कित्येक महिने मी नीट झोपू शकले नाही.’ अतिशय भीतीच्या वातावरणात वाढत असलेली ती मुलगी हे सांगत होती. मी त्या काकाला जाऊन अक्षरश: खूप झापले. आता ती मुलगी अतिशय आनंदात असून एस. वाय. बी.ए.ला शिकत आहे. ‘कार्यशाळेमुळे, तुमच्यामुळे संकटातून बाहेर येऊ शकले,’ असे ती सांगते. आदिवासी बहुसंख्य असणाऱ्या एका शाळेत मुलींची कार्यशाळा संचलित करण्यासाठी एका शिक्षकाने मला आवर्जून बोलावून घेतले, का तर त्या शाळेतील सातवीच्या दोन मुलींना फसवले गेले होते, त्यांना दिवस गेलेले होते. उर्वरित मुलींना कार्यशाळेतून मी नक्की चांगले समजावून देऊ शकेन, असा विश्वास त्या शिक्षकाला वाटला होता. सोशल जस्टिस मिशन या संस्थेने मुलूंडच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
अण्णा नावाचा सन्मित्र एका कॉर्पोरेट कंपनीच्या सीईओला घेऊन तिथे आला होता. दहा मिनिटांसाठी पत्नीसह आलेला हा इसम संपूर्ण पाच तास थांबला आणि पुढील कार्यशाळा संयोजनासाठी एक लाख रुपयांची देणगी देऊन गेला. ‘कार्यशाळेमुळे, राजेंद्र बहाळकर यांच्यामुळे माझ्या मनातील नकारात्मक विचार, आत्महत्या करण्याचे विचार निघून गेलेत’ असे एक तरूणी सांगते. पालघरच्या पुढे वाणगाव आदिवासी मुलींची कार्यशाळा झाली आणि मासिक पाळीच्या संदर्भात शेकडो प्रश्न मुली विचारू लागल्या. दुसऱ्या दिवशी ‘माझ्या आईला असा त्रास होतो, माझ्या बहिणीला असे होते... मी निघण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मुली विचारत होत्या. समाधान करून घेण्याचा प्रयत्न करीत होत्या. मासिक पाळीसंदर्भात त्यांच्या मनातील अंधश्रद्धादेखील गळून पडत होत्या, हे विशेष. असे प्रतिसाद प्रत्येक कार्यशाळेतून कमी अधिक प्रमाणात मिळतात. दमलो असं कधी वाटत नाही, आणखी कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते.

(मुलाखत व शब्दांकन : हिनाकौसर खान-पिंजार)

Tags: विद्यार्थी-शिक्षण राष्ट्र सेवा दल विद्यार्थी कार्यशाळा मनासाठी कार्यशाळा कार्यशाळा राजेंद्र बहाळकर student-studies relation student workshop for mind worshop rajendra bahalkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजेंद्र बहाळकर
rajendrabahalkar@gmail.com

सामाजिक कार्यकर्ता


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा