डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

6 ऑगस्टला सकाळी 9.15 वाजता विमानाची झडप उघडून 31 हजार फुटांवरून साडेचार हजार किलो वजनाचा ‘लिटिल बॉय’ अणुबॉम्ब हिरोशिमावर फेकला गेला. बॉम्ब सोडताच टिब्बेट्‌सने झर्रकन विमान वळवले. बॉम्ब फुटला तोवर ‘एनोला गे’ अकरा मैल दूर निघून गेले होते, पण तरीही त्यांना विजेच्या धक्क्यासारखे झटके बसले. साठ हजार फूट उंचीवरून शहराला तीनदा प्रदक्षिणा घालून ‘एनोला गे’ तळाकडे निघाले.
‘लिटल बॉय’ हिरोशिमावर फुटला तेव्हा सकाळ असल्याने लोक कामाला निघाले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर होते. इशारा देणारे भोंगे पुन्हा वाजवण्यात आले, पण तोवर उशीर झाला होता. एक दशांश सेकंदात 2,80,000 सेल्सियस तापमानाचा 100 फूट व्यासाचा गोळा शहरावर पडला. न्युट्रॉन आणि गॅमा किरण शहरात घुसले. हजारो लोकांची क्षणार्धात वाफ होऊन गेली. शहराच्या नव्वद हजार इमारतींपैकी साठ हजार इमारती भुईसपाट झाल्या. 80,000 लोक जागीच मृत्युमुखी पडले. जखमी झालेले अनेकजण नंतर मृत झाल्याने ही संख्या 1,60,000 च्या पुढे गेली.    

पांडवांचा वंश समाप्त करण्यासाठी कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या अखेरीस उत्तरेच्या पोटातील गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग करणाऱ्या अश्वत्थाम्याला चिरवेदना भोगावी लागली. तशीच गती दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या पर्वात हिरोशिमावर अणुबॉम्ब फेकणाऱ्या विमानांच्या ताफ्यातल्या क्लॉड इथर्ली या वैमानिकाची झाली. त्या अमानुष कृत्याने पश्चात्तापदग्ध होऊन त्याला उत्तर आयुष्याची काही दशके दुःस्वप्ने पहात मनोरुग्णालयात घालवावी लागली, त्याची ही कहाणी.

क्लॉड इथर्लीचा जन्म 2 ऑक्टोबर 1918 रोजी अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर त्याने शिक्षकी पेशासाठी नॉर्थ टेक्सास टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. क्लॉड कॉलेजात असताना सप्टेंबर 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यानंतर दुसरे महायुद्ध युरोपात पेटले. अमेरिका अद्याप युद्धात पडली नव्हती तरी 1940 साली फ्रान्सच्या पाडावानंतर अमेरिकेत युद्धाची तयारी सुरू झाली; सैनिक भरती मोठ्या प्रमाणात सुरू झाली व देशप्रेमाने भारलेला क्लॉड शिक्षण सोडून आर्मी एअर कोअरमध्ये भरती झाला. ऑगस्ट 1941 मध्ये तो सैन्याच्या बॉम्बर स्कूलमधून प्रशिक्षण घेऊन सेकंड लेफ्टनंट झाला. त्याची नियुक्ती 393 बॉम्ब स्क्वॅड्रनमध्ये बी-29 फायटर विमानावर झाली.

जपानने पर्ल हार्बर या पॅसिफिक बेटांवरील अमेरिकन तळावर हवाई हल्ला केल्यानंतर डिसेंबर 1941 मध्ये अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली. जर्मनी अणुबॉम्ब तयार करत असल्याची वदंता होती. 1942 साली अमेरिकेने रॉबर्ट ऑपेनहायमेर या शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली गुप्तपणे ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’ या सांकेतिक नावाने अणुबॉम्बसाठी अत्यंत वेगाने संशोधन सुरू केले. 1944 साली उत्तर पॅसिफिक महासागरामधल्या मरीना बेटांवर अमेरिकेने हल्ला चढवून ती काबीज केली. जपानवर विमानांनी थेट हल्ला चढवण्याच्या टप्प्यात ही बेटे असल्याने, रणनीतीत या बेटांचे विशेष महत्त्व होते.

या बेटांपैकी टिनियन या बेटावर 509 काम्पोझिट ग्रुपमध्ये मेजर क्लॉड इथर्लीची नेमणूक ‘स्ट्रेट फ्लश’ नावाच्या बी-29 बॉम्बरचा वैमानिक म्हणून झाली. बी-29 सुपरफोरट्रेस या तत्कालीन अत्याधुनिक विमानांची निर्मिती बोर्इंगने केली होती व त्यातील सिल्व्हरप्लेट जातीच्या विमानांत अणुबॉम्ब नेण्यासाठी विशेष सोय केली होती. या बॉम्बर ग्रुपचा प्रमुख लेफ्टनंट कर्नल पॉल टिब्बेट्‌स होता. टिनियन बेटाच्या नॉर्थ फील्डस विमानतळावरून 1944-45 मध्ये जपानवर तूफान ज्वालाग्राही बॉम्बवर्षाव करण्यात अन्य पायलटांबरोबर इथर्ली व टिब्बेट्‌स दोघांचाही प्रमुख सहभाग होता. एका प्रसंगी क्लॉड इथर्लीने जपानी सम्राटाच्या राजवाड्यावर बॉम्बफेकीचा प्रयत्न केला, पण नेम चुकून शेजारचा पूल उद्‌ध्वस्त झाला.

दरम्यान 7 मे 1945 रोजी जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करल्याने युरोपमधील युद्ध संपुष्टात आले. पण जपानबरोबरचे पॅसिफिकमधील युद्ध अद्याप सुरूच होते. 16 जुलै 1945 रोजी, न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात अमेरिकेने ‘ट्रिनिटी प्रकल्प’ या नावे अणुबॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. ‘लिटल बॉय’ या सांकेतिक नावे ओळखल्या जाणाऱ्या युरेनियम बॉम्बचे व ‘फॅट मॅन’ नावे प्लुटोनियम बॉम्बचे भाग टिनियन बेटावरील तळावर गुप्तपणे आणून त्यांची जोडणी करण्यात आली. दि.26 जुलै 1945 रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रूमन, ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल व चीनच्या चँग कै शेक सरकारचे प्रतिनिधी यांच्यातील पोट्‌सडॅम ठरावाप्रमाणे जपानला ‘विनाशर्त शरण’ येण्यासाठी निर्वाणीचा इशारा अमेरिकेने दिला. 29 जुलै रोजी जपानी सरकारने हा इशारा धुडकावून लावला.

इकडे बॉम्ब आणलेली अमेरिकन बोट जपानने 30 जुलै रोजी बुडवली, त्यात 879 अमेरिकन नाविक मरण पावले. जपानमधील पाच शहरे बॉम्बहल्ल्यासाठी निवडण्यात आली होती. त्यात सुरुवातीला नागासाकीचा समावेश नव्हता. पण निवडलेले क्योटो हे शहर सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे व अनेक बुद्ध मंदिरे असल्याने ते वगळून त्याऐवजी नागासाकी शहर हल्ल्याच्या केवळ आठवडाभर आधी निवडण्यात आले. दि.6 ऑगस्ट 1945 रोजी मध्यरात्री 12.00 वाजता लेफ्टनंट कर्नल पॉल टिब्बेट्‌सने हिरोशिमावरील हल्ल्यात सहभागी होणाऱ्या सात विमानांच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यानुसार मेजर क्लॉड इथर्लीचे ‘स्ट्रेट फ्लश’ बॉम्बर आधी जाऊन हवामानाची पाहणी करणार होते. एक विमान राखीव म्हणून वाटेतल्या इवो जिमा बेटावर ठेवण्यात आले. पॉल टिब्बेट्‌सचे ‘एनोला गे’ मुख्य बॉम्बहल्ला करणार होते. 12.05 वाजता फादरला बोलवून या प्रसंगासाठी रचण्यात आलेली विशेष प्रार्थना सगळ्यांनी म्हटली. पहाटे 1.37 वाजता क्लॉड इथर्लीचे ‘स्ट्रेट फ्लश’ व त्याच्या सोबतच्या दोन बी-29 सिल्व्हरप्लेट विमानांनी टिनियनवरून उड्डाण केले. त्यानंतर पहाटे 2.45 वाजता ‘एनोला गे’ व त्याचे रक्षण करणाऱ्या दोन विमानांनी उड्डाण केले. कर्नल पॉल टिब्बेट्‌सच्या आईचे नाव ‘एनोला गे’ होते, आपल्या आईच्या स्मरणार्थ तेच नाव त्याने आपल्या विमानाला दिले होते.

या विमानातून जगातला पहिला ॲटम बॉम्ब ‘लिटल बॉय’ नेण्यात आला. टिनियनहून निघाल्यावर तासाभराने ‘लिटल बॉय’ला त्याचे फ्यूज जोडण्यात आले. सकाळी 7.15 वाजता बॉम्बचे सेफ्टी डिव्हाइस काढून टाकण्यात आले. सकाळी 8.09 वाजता क्लॉड इथर्लीचे ‘स्ट्रेट फ्लश’ हे विमान व दोन साथीदार विमाने जपानी हद्दीत शिरली, तेव्हा हिरोशिमामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे वाजवण्यात आले व जपानी नागरिक सुरक्षित स्थानी लपले. 8.24 वाजता क्लॉड इथर्लीने पॉल टिब्बेट्‌सला सांकेतिक भाषेत हवामान उत्तम असून बॉम्बहल्ला कर असा इशारा दिला. 8.31 वाजता इथर्लीच्या विमानाने हिरोशिमा सोडले. तेव्हा विमाने गेली व संकट टळले असे वाटून ‘सारे काही ठीक’ असल्याचा इशारा शहरातील भोंग्यांनी वाजवला, नागरिक सुरक्षित जागांमधून बाहेर पडले.

तेवढ्यात 9.12 वाजता ‘एनोला गे’चा ताफा हिरोशिमावर आला. 6 ऑगस्टला सकाळी 9.15 वाजता विमानाची झडप उघडून 31 हजार फुटांवरून साडेचार हजार किलो वजनाचा ‘लिटिल बॉय’ अणुबॉम्ब हिरोशिमावर फेकला गेला. बॉम्ब सोडताच टिब्बेट्‌सने झर्रकन विमान वळवले. बॉम्ब फुटला तोवर ‘एनोला गे’ अकरा मैल दूर निघून गेले होते, पण तरीही त्यांना विजेच्या धक्क्यासारखे झटके बसले. साठ हजार फूट उंचीवरून शहराला तीनदा प्रदक्षिणा घालून ‘एनोला गे’ तळाकडे निघाले.

‘लिटल बॉय’ हिरोशिमावर फुटला तेव्हा सकाळ असल्याने लोक कामाला निघाले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर होते. इशारा देणारे भोंगे पुन्हा वाजवण्यात आले, पण तोवर उशीर झाला होता. एक दशांश सेकंदात 2,80,000 सेल्सियस तापमानाचा 100 फूट व्यासाचा गोळा शहरावर पडला. न्युट्रॉन आणि गॅमा किरण शहरात घुसले. हजारो लोकांची क्षणार्धात वाफ होऊन गेली. शहराच्या नव्वद हजार इमारतींपैकी साठ हजार इमारती भुईसपाट झाल्या. 80,000 लोक जागीच मृत्युमुखी पडले. जखमी झालेले अनेकजण नंतर मृत झाल्याने ही संख्या 1,60,000 च्या पुढे गेली. पुढील पिढ्यांना विविध विकृतींचा सामना करावा लागला. जपानने त्वरीत शरणागती पत्करावी, अन्यथा आणखी भयानक परिणाम भोगावे लागतील, अशा अर्थाची पत्रके पुढे दोन दिवस अमेरिकेने विमानांतून जपानवर टाकली.

दरम्यान जपानने सोव्हिएत युनियनला शरणागतीची बोलणी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची विनवणी केली. सोविएत युनियनने दोस्तांकडे प्रस्ताव ठेवला असता तर कदाचित नागासाकीवरील हल्ला टळला असता. सोविएत युनियन व जपानमध्ये 1941 पासून युद्धबंदीचा करार होता. पण स्टालिनने जपानची मध्यस्थीची विनंती तर फेटाळलीच, शिवाय सोविएत-जपान युद्धबंदी करार एकतर्फा मोडून जपानशी युद्ध जाहीर केले आणि 9 ऑगस्ट रोजी सोव्हिएत फौजांनी मांचुरियावर हल्ला केला. महासत्तांमध्ये जग विभागण्याची प्रक्रिया युरोपमध्ये सुरू झालीच होती, ती आशियातही विस्तारली.

दि.9 ऑगस्ट रोजी हिरोशिमाप्रमाणेच नागासाकीवर ‘बॉक्स कार’ विमानातून ‘फॅट मॅन’ प्लुटोनियम बॉम्ब टाकण्यात आला. खरं तर जपानचे कोकुरा शहर बॉम्बहल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते, पण तेथील खराब हवामानामुळे नागासाकीकडे विमाने वळवण्यात आली. नागासाकीमध्ये 75,000 लोक त्वरीत मृत्युमुखी पडले. नागासाकीवर बॉम्बहल्ला झाला, त्यावेळी शरणागतीची तयारी करण्यासाठी जपानी इम्पेरिएल सुप्रीम वॉर कौन्सिलची बैठक टोकियोमध्ये सुरू होती. 10 ऑगस्टला जपानी सम्राट हिरोहिटोने वॉर कौन्सिलमध्ये हस्तक्षेप करून पोट्‌सडॅम ठरावाप्रमाणे शरणागती करण्याचे ठरवले व तसा संदेश अमेरिकेला पाठवला. काही जपानी जनरलनी बंड पुकारून युद्ध सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर 15 ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली.

युद्धानंतर क्लॉड इथर्ली अमेरिकेत परतला व त्याची सैन्यात सेवा सुरू राहिली. पॉल टिब्बेट्‌स, क्लॉड इथर्ली व अन्य अधिकाऱ्यांना शौर्य पदकांनी गौरवले गेले. बॉम्ब पडला तेव्हा क्लॉड इथर्लीचे विमान हिरोशिमा सोडून टिनियन बेटाच्या दिशेने निघाले होते, त्यामुळे त्याने विध्वंसाचे प्रत्यक्ष दृश्य पाहिले नव्हते. पण अणुबॉम्बमुळे झालेल्या प्रचंड मनुष्यहानीचे तपशील जसजसे प्रसिद्ध होऊ लागले, तसा इथर्ली अस्वस्थ होऊ लागला. अपराधीपणाच्या भावनेने त्याला ग्रासले. त्याची अणुबॉम्बविरोधी भूमिका अर्थातच प्रस्थापनाला आवडली नाही. सैन्याच्या परीक्षेत घोटाळा केल्याचा आरोप ठेवून इथर्लीला 1947 साली निवृत्त करण्यात आले. मग त्याने टेक्सासमधील एका तेलकंपनीत नोकरी धरली.

पगाराचा काही भाग तो नियमितपणे अणुहल्ल्यात बळी पडलेल्या अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी पाठवू लागला. त्यासोबत तो त्या मुलांची क्षमायाचना करणारे पत्र जोडत असे. पण अपराधी भावना दिवसेंदिवस वाढतच गेली. त्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला. अनेकदा टेक्सासमधल्या मोठ्या स्टोअर्समध्ये आणि पोस्ट ऑफिसांमध्ये घुसून, खेळण्यातल्या बंदुकीचा धाक दाखवून तिथली रोकड एका डब्यात घालायला तो सांगे, पण ते पैसे न घेताच निघून जाई. ‘वॉर हीरो’ म्हणून असलेली आपली प्रतिमा नष्ट करून या गुन्ह्यांमधून स्वतःला शिक्षा व्हावी म्हणून तो असे प्रकार करत असे, असे मत काही मनोविश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

एकदा चेकची अफरातफर करून ती रक्कम त्याने हिरोशिमाच्या मुलांच्या मदतीसाठी पाठवली. त्याबद्दल खटला चालून त्याला एक वर्षाची कैदेची शिक्षाही झाली. पुढे क्लॉडची अपराधीपणाची भावना वाढतच गेली. तो झोपेतून किंचाळत उठत असे. ‘रोज रात्री मला दुःस्वप्नात उसळत्या लालभडक ज्वालांमध्ये जळणारी हिरोशिमातली मुले दिसतात. माझा मेंदू जळत आहे.’ असे त्याने त्याच्या भावाला सांगितले होते. पुढे एका हॉटेलच्या खोलीत त्याने आत्महत्येचा पुन्हा प्रयत्न केला, पण सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आले. त्याला वेडसर ठरवून सैनिकांसाठी असलेल्या एका मनोरुग्णालयात ठेवण्यात आले.

हिरोशिमा-नागासाकीवर बॉम्बफेक करणाऱ्या दुसऱ्या कोणत्याही वैमानिकाला अशा तऱ्हेचा पश्चात्ताप झाला नव्हता. हिरोशिमावर प्रत्यक्ष बॉम्ब फेकणाऱ्या ‘एनोला गे’चा वैमानिक पॉल टिब्बेट्‌स याने आयुष्याच्या अखेरपर्यंत अणुबॉम्बचे जाहीर समर्थन केले. त्याच विमानातील आणखी एक अधिकारी कॅप्टन रॉबर्ट लुई याने तर एनोला गे विमानातील हल्ल्यावेळी लिहिलेल्या लॉगचा (नोंदीचा) बेकायदेशीर लिलाव करून तीन लक्ष एक्क्याण्णव हजार डॉलर कमावले! काही लोकांनी क्लॉड इथर्लीला देशद्रोही ठरवायलाही कमी केले नाही. एका वैमानिकाने म्हटले, ‘क्लॉडला स्वतःच तो अणुबॉम्ब टाकायचा होता, पण ज्येष्ठतेमुळे ती संधी पॉल टिब्बेट्‌सला दिली गेल्याने वैफल्यग्रस्त होऊन क्लॉड अणुबॉम्बचा निषेध करत आहे.’

‘इथर्लीला प्रसिद्धी आणि पैसा हवे होते, म्हणून त्यानं अणुबॉम्बविरोधी संघटनांशी संगनमत करून बॉम्ब टाकल्याबद्दल पश्चात्ताप होत असल्याचे नाटक केले आहे,’ असाही आरोप त्याच्यावर करण्यात आला. क्लॉडच्या समर्थनार्थ त्याचा एकमेव सहकारी पॉल गिडरी म्हणाला, ‘क्लॉड इथर्ली 100 टक्के सच्चा अमेरिकन आहे, अतिशय प्रेमळ मनुष्य आहे’. ‘एनोला गे’वरील आणखी एक वैमानिक थिओडर व्हॅन कर्कने अणुबॉम्बची भीषणता वर्णन करताना म्हटले, ‘ते दृश्य पुन्हा कुणाला पाहावे लागू नये, अशी माझी प्रार्थना आहे. किती नुकसान झाले, किती प्राण गमावले! आम्ही पहिला अणुबॉम्ब टाकला आणि माझी अशी आशा आहे की आपण कायमचा धडा शिकलो आहोत अशी पाळी पुन्हा कोणावर येणार नाही.’

क्लॉडने मनोरुग्णालयातून शांतीसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवक गटांशी संपर्क साधला. व्हिएन्नामधील गुंथर अँडर्स या अणुबॉम्बविरोधी प्रसिद्ध जागतिक नेत्याशी त्याचा बराच पत्रव्यवहार झाला. हा पत्रव्यवहार ‘बर्निंग कॉन्शन्स’ (ज्वलंत सद्‌सदविवेकबुद्धी) या नावे प्रसिद्ध झाला आहे. क्लॉडने एका पत्रात लिहिले आहे, ‘अमेरिकन समाज माझी अपराधीपणाची भावना स्वीकारू शकत नाही, कारण त्यामुळे अधिक खोल अशा सामूहिक अपराधीपणाची भावना समाजाला स्वीकारावी लागेल.’ त्यावर अँडर्सनी लिहिले, ‘केवळ वेडे ठरवण्यात आलेले लोकच असे लिहीत आहेत, असा हा किती दुर्दैवी काळ आहे.’

या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत नोबेल शांती पुरस्कारप्राप्त बर्ट्रांड रसेल यांनी ‘क्लॉड इथर्लीला मनोरुग्ण ठरवले, हे त्या डॉक्टरनाही पटले नसेल’ असे लिहिले आहे. ते लिहितात, ‘हत्याकांडात भाग घेतल्याबद्दल जग त्याचा सत्कार करायला तयार होते, पण त्याला पश्चात्ताप झाला तेव्हा जगाला त्यात स्वतःचा धिःकार दिसला.’ शेवटी मृत्यूनेच त्याची मानसिक यातनांतून सुटका केली. 1 जुलै 1978 रोजी वयाच्या साठाव्या वर्षी क्लॉड इथर्लीचा कॅन्सरने मृत्यू झाला, अपराधी भावनेने तगमगणारा एक जीव कायमचा शांत झाला. एका अश्वत्थाम्याची चिरवेदनेतून मुक्तता झाली. पण क्लॉड इथर्लीच्या व्यथेतून जगातले सत्ताधारी काही शिकले का?

संदर्भ :

1)http://marcuse.faculty.history.ucsb.edu/projects/anders/- nders1962BurningConscienceEatherlyOCR.pdf  

2)https://www.atomicheritage.org/history/hiroshima-andnagasaki-bombing-timeline

3)http://evangelicalfocus.com/blogs/1911acingsupsjosesdessegoviasmanuelscruz

4) https://ww2db.com/personsbio.php?personsid=510 
5) https://www.youtube.com/watch?v=-4-j1FyiWvw

Tags: सुधीर जोगळेकर Hiroshima क्लॉड इथर्ली Claude Robert Eatherly Sudhir Jogalekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुधीर जोगळेकर,  बेळगाव, कर्नाटक


प्रतिक्रिया द्या