डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

मराठी नाटकात आनंदी साकारताना

अरे, प्रेक्षक वेडे व्हायचे वेडे...! म्हणजे मला आठवतंय- एकदा मुसळधार पाऊस पडत होता. काहींना असंही वाटत होतं की- एवढा पाऊस पडतोय, कोण येणार आहे प्रयोगाला? पण आम्ही आपले आलो. कारण आम्हाला वाटलं, आपण तारीख दिली आहे तर थिएटरवर यायला पाहिजे. तर त्या पावसातसुद्धा हाऊसफुल प्रयोग झाला होता! आणि तेव्हा प्रयोग असे असायचे की, दुपारी चारला आणि सकाळी अकराला. तर, या दोन्ही प्रयोगांना बायका हौसेने रडायला यायच्या. अगदी खरं सांगते, ‘त्यांचं असं असायचं की, ‘काहीही झालं तरी मला हे नाटक पाहून जायचंय.’ अगदी मनसोक्त रडायच्या. आत्ताच्या काळात हे फार बदललंय. आता असं कुठं तरी झालंय की, विनोदी नाटक आहे का; मग आम्ही नाटकाला येतो. आम्हाला डोक्याला ताण नको आणि आम्हाला फार विचार नाही करायचा. ही वृत्ती जवळजवळ गेली वीस वर्षे मी पाहते आहे.
 

‘‘श्री.ज. जोशीलिखित ‘आनंदी गोपाळ’ या कादंबरीवर आधारित राम जोगळेकर यांनी लिहिलेलं ‘आनंदी गोपाळ’ याच नावाचं ते नाटक होतं. ते नाटक प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा मी लहान होतो. तरीसुद्धा, या नाटकातील अभिनय इतका ताकदीचा होता की, आता तुझ्याशी बोलताना त्यातील काही प्रसंग डोळ्यांसमोर स्पष्ट दिसत आहेत. आता हे मी तुला साधारण 40 ते 42 वर्षांपूर्वीचं सांगतोय हं... त्यात आनंदीबाईंची भूमिका सुहास जोशी यांनी केली होती आणि गोपाळराव होते काशीनाथ घाणेकर! आणि काय अभिनय केला होता दोघांनी! नाटकातील सुहासतार्इंचा तो नऊवारी साडीवर बूट घालण्याचा प्रसंग मला अजूनही आठवतो... प्रेक्षक नाटकात पूर्णपणे बुडून गेले होते आणि शेवटी आनंदीबाईंना पाणी देण्याच्या सीनला तर प्रेक्षकांना गोपाळरावांचा अक्षरशः राग आलेला... आता या नाटकाबद्दल तुला याहून अधिक आणि सखोल माहिती सुहास जोशीच देऊ शकतील.’’ अतुल पेठे यांच्याकडून हे ऐकताना या नाटकाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढली. 

दि.15 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आनंदी गोपाळ’ या सिनेमाच्या निमित्ताने आनंदीबाई जोशी पुन्हा एकदा आपल्यासमोर आल्या. पण यापूर्वी त्या नेमक्या कोणकोणत्या माध्यमांतून आपल्यासमोर येऊन गेल्या आहेत, तर चरित्र, कादंबरी, मालिका,  डॉक्युमेंटरी फिल्म, आणि हे नाटक. या नाटकाबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली तेव्हा आश्चर्य याचं वाटलं की, तीन आठवडे शोध घेऊनसुद्धा नाटकाचे व लेखकाचे नाव, नाटकातील आनंदीबाई आणि गोपाळराव हे पात्र साकारलेल्या कलाकारांचे नाव एवढे वगळता इतर कोणतीच माहिती कुठेही मिळाली नाही. यावरून लक्षात आले की, सुहास जोशींची ही मुलाखत आपण विसरून गेलेल्या एका विलक्षण नाटकाबद्दलच्या आठवणी जागवणारी ठरणार आहे. आनंदी गोपाळ या नाटकाच्या निमित्ताने काही हरवलेल्या आठवणी, ‘नाट्यक्षेत्रातील तेव्हाचे प्रयोग’, ‘तेव्हाचा प्रेक्षक’, ‘ती’ भूमिका आणि एकूणच ‘ते’ नाटक याबद्दल सुहास जोशी यांची ही मुलाखत... 

प्रश्न - मुलाखत सुरू करण्याआधी तुम्हाला जर काही बोलायचं असेल, तर मला ते ऐकायला आवडेल. त्यातून जर काही प्रश्न राहून गेले आहेत असं वाटलं, तर प्रश्न-उत्तरं अशा प्रकारानेही आपण चर्चा करू या.
- हो. मला तसं चालेल. आपण प्रश्नं-उत्तरं अशी मुलाखत सुरू करण्याआधी एकूणच आनंदी गोपाळ हे नाटक करण्याचं कसं ठरलं आणि मला ही भूमिका कशी मिळाली, याची थोडीशी पार्श्वभूमी सांगते. श्री.ज. जोशीलिखित ‘आनंदी गोपाळ’ ही कादंबरी तेव्हा लोकप्रिय झाली होती. ते चरित्र नव्हतं. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी कादंबरीमध्ये काल्पनिक गोष्टी असतातच. त्याला नाइलाज असतो. पण श्री.ज. जोशींची कादंबरी वाचायला खूप चांगली होती. ग्वाल्हेरचा ‘आर्टिस्ट कंबाईन’ या नावाचा नाटकाचा एक ग्रुप होता. त्यांच्यातल्याच राम जोगळेकर नावाच्या व्यक्तीने ते नाटक लिहिलं होतं आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ते सादर केलं होतं. तर त्या ग्रुपचे आणि भालचंद्र पेंढारकर यांचे खूप चांगले संबंध होते. (भालचंद्र पेंढारकर यांच्या पत्नी ग्वाल्हेरच्या होत्या.) भालचंद्र पेंढारकर- ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने ‘अण्णा’ म्हणायाचो- यांनी ते नाटक पाहिलं आणि म्हणाले की, मी हे नाटक प्रोफेशनली काढतो. अर्थात लेखकानेही परवानगी दिली. 

आणि सुरुवातीलाच त्यांनी गोपाळरावांच्या भूमिकेसाठी डॉ.काशीनाथ घाणेकर यांना नक्की केलं. कारण गोपाळराव यांचा कोकणस्थपणा, स्वभाव, ते घारे डोळे याला काशीनाथशिवाय तेव्हा पर्याय नव्हता. आणि त्यांच्यासाठीसुद्धा ते एक चॅलेंज होतं खरं. कारण तोपर्यंत केस वगैरे उडविणारे नट असतात तशा भूमिका ते करत होते... ‘कडक’ वगैरे असं सगळं त्यांचं सुरू होतं... अशा वातावरणात या नाटकासाठी मात्र गोटा लावून, एका विचित्र अशा माणसाची भूमिका त्यांना करायची होती. आणि समाजाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर गोपाळराव हा विचित्रच माणूस होता. काशीनाथ या रोलसाठी तयार झाले. 

मी जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीमधून आले होते, तेव्हा पहिलं नाटक अण्णा पेंढारकरांकडेच केलं होतं. ‘रक्त नको, मज प्रेम हवे’ असं त्या नाटकाचं नाव. आपल्या लोकांना ते नाटक काही पचलं नाही आणि त्याचे 24 वगैरे प्रयोग होऊन ते बंद पडलं. दरम्यान, मला मुलगी झाली. ती जेमतेम दोन वर्षांची होती... तेव्हा मला या भूमिकेसाठी पेंढारकरांनी विचारलं. आणि ‘आनंदी गोपाळ’ करायचं ठरलं. मग दोन वर्षांच्या मुलीला कधी बहिणीकडे, कधी सासूबार्इंकडे ठेवायचे व त्या नाटकाच्या तालमी करायला जायचे. चौपाटीजवळच्या बिर्ला कला केंद्रामध्ये आम्ही तालमीसाठी हॉल भाड्याने घेतला होता आणि मी ठाण्याहून रोज तिथं जायचे. सकाळी अकरा ते संध्याकळी सहापर्यंत आमच्या तालमी व्यवस्थित सुरू झाल्या. नंदकुमार रावते हे आमचे दिग्दर्शक होते. 

प्रश्न- या नाटकाबद्दल अजून काही विशेष गोष्टी ऐकायला आवडतील. जसे की, या रंगमंचावरील तयारी किंवा कलाकारांचं या नाटकाशी तयार होत गेलेलं नातं. 
- या नाटकाच्या पहिल्या अंकात लग्नाच्या आधीची आनंदी म्हणजे छोटी यमू होती. त्यामुळे पहिल्या अंकासाठी छोटी यमू म्हणून एक मुलगी काम करायची, तिचं नाव होतं मीनल नाईक. आणि दुसरा व तिसरा अंक मी करायचे. आता हे जे छोट्या यमूचं लग्नानंतरच्या मोठ्या आनंदीत होणारं ट्रान्सफॉर्मेशन होतं, ते फार सुंदर केलं होतं. ती लहान आनंदी एक श्लोक म्हणत असताना तिच्यावर फोकस लावला होता आणि त्याच श्लोकाचा पुढचा भाग मी म्हणजे मोठी आनंदी म्हणते तेव्हा फोकस माझ्यावर शिफ्ट होतो. तर या सीनला अक्षरशः टाळ्या यायच्या. कारण एका श्लोकात ती आनंदी मोठी झालेली दाखवली जायची. 

आणखी एक खासियत अशी की, या नाटकाचं  रिव्हॉलव्हिंग (फिरते) स्टेज होतं! कारण लोकेशन्स खूप होती. आता तर बहुधा हे कुणीच वापरत नाही. तर, ती सगळी लोकेशन्स दाखवता यावीत म्हणून रिव्हॉलव्हिंग स्टेज होतं. पण याचा एक तोटा असतो. तो म्हणजे ॲक्टिंग एरिया खूप कमी मिळतो. पण ते नाटकच तसं होतं. त्या नाटकात पात्रंच जवळपास सोळा-सतरा होती. काही जण दोन-दोन रोल करायचे. या नाटकाचे सुरुवातीचे शंभर प्रयोग हाऊसफुल झाले, जस्ट बिकॉज ऑफ काशीनाथ घाणेकर! त्यांचं नाव असल्यामुळे ते प्रयोग हाऊसफुल व्हायचे. 

आणि त्या हाऊसफुल प्रयोगाचा मला फायदा झाला, कारण एवढे लोक नाटक बघून गेले. या नाटकामुळे मला कधी मागं वळून बघावं लागलं नाही. आजतागायत मला नाटकं मिळत गेली. म्हणजे बघ ना- 1972 मध्ये माझा नाटकाचा प्रवास सुरू झाला; आज 47 वर्षे झाली तरी मी अजून कामं करतच आहे. तेव्हा मलाही कुठं तरी स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. या नाटकाने मला ती संधी दिली आणि मी स्वतःला प्रूव्ह करू शकले की, मराठी रंगभूमीवर मी काम करू शकते. 

प्रश्न- या नाटकाचे एकूण किती प्रयोग झाले आणि साधारण कोणकोणत्या शहरांत? त्या प्रयोगांचा अनुभव ऐकायला आम्हाला आवडेल. 
- याचे शंभर प्रयोग काशीनाथ घाणेकर यांच्यासोबत केले आणि नंतरचे साधारण 24 प्रयोग कमलाकर सोनटक्के यांच्यासोबत केले. शंभर प्रयोग झाल्यावर काशीनाथ यांनी नाटक सोडून दिलं. दौरे आठवायचे झाले तर कमलाकर सोनटक्के यांच्या बरोबरचा कोकण दौरा मला आठवतोय. आणि एक दौरा झाला होता दिल्लीला. त्या वर्षी नाट्य संमेलनच दिल्लीला होतं आणि त्यात ‘आनंदी गोपाळ’ हे नाटक केलं होतं. दिल्लीला केलं म्हणून मग ग्वाल्हेरच्या लोकांनीही बोलावलं. मग ग्वाल्हेरचा दौरा झाला. याव्यतिरिक्त फक्त मुंबई आणि पुणे इथंच प्रयोग झाले. आणि नाटकाचा लवाजमा केवढा तरी होता! आर्टिस्ट आणि मटेरियल किती होतं! आणि इथं हाऊसफुल प्रयोग असताना बाहेर जायचं कशाला, असंही होतं. हे नाटक 1975 ला आलं आणि एकाच वर्षात याचे साधारण सव्वाशे प्रयोग झाले आणि तेवढं वर्षभरच ते प्रयोग आम्ही केले. 

प्रश्न- रंगमंचावरचे विविध प्रयोग- जसे की रिव्हॉल्व्हिंग स्टेज, लाईट्‌सचा वापर वगैरे- हे तुम्ही सांगितलंत. त्याच धर्तीवर एक प्रश्न असा आहे की, या नाटकाच्या निमित्ताने 19 वे शतक व्यासपीठावर उभं करताना काय काय करावं लागलं? कारण त्यात भारत व अमेरिका असे दोन देश दाखवायचे होते. 
- आता यात महत्त्वाचा रोल होता स्टेज आणि लाईट्‌सचा. त्यावर खूप अभ्यास झाला. खरं म्हणजे पूर्वीचं ते पडद्यावर पुढे येऊन गाणं म्हणणं आणि मग पडदा वर गेला की, सीन लागणं अशी पद्धत होती- ते सगळं गेलं आणि बॉक्स सेट आला. त्यानंतर लोकेशन्सची नाटकं सुरू झाली. म्हणजे मग लेव्हल्स आल्या. आणि लाइटिंगमध्ये तर खूपच सुधारणा झाली आहे. खरं म्हणजे मी लाईट्‌समधलं कमी जाणते, पण इतकं सांगू शकते की, लाईट्‌समुळे तेव्हा खूप मदत झाली होती. 19 वे शतक उभे करायचे म्हणजे खूप छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घ्यावा लागतात. जसं की- तेव्हाच्या जुन्या वाड्यांचे फोटो म्हणजे कटआउट्‌स काढून आणायचे, मग खुंट्या पाहिजेत, त्या खुंट्यांवर लुगडी अशी निऱ्या करून गुंडाळून ठेवलेली पाहिजेत, खण पाहिजे... असं सगळं. त्या काळातलं फर्निचर आम्ही बनवून घेतलं होतं. 

तिसरा संपूर्ण अंक अमेरिकेतला सेट होता. त्या अंकात 19 व्या शतकातल्या अमेरिकन पद्धतीनं सगळं मांडलं होतं. म्हणजे त्या स्टाईलचे फुल पडदे, गुबगुबीत सोफे हे सगळं केलं होतं. आणि हा सेट बदलला जायचा, तेव्हा ते जुनाट वाड्याचं वातावरण, तो तपकिरी-काळपट रंग बदलून अमेरिकेचा फील येण्यासाठी एकदम ब्राईट कलर समोर यायचा. त्यात ब्लू, पर्पल आणि असे सगळे रिच कलर घेतले होते. आणि महत्त्वाचं म्हणजे, हे असे सेट बनवणारे होते- द.ग.गोडसे. गोडसे जिथे असतील तिथे अभ्यासाला काय कमी होती? ते इतका बारकाईने अभ्यास करायचे. 

साधी गंमत सांगते की, कॉस्च्युम (वेशभूषा) करायचे तर त्यातसुद्धा ते विरुद्ध रंग निवडायचे. आता पुन्हा त्याच विरुद्ध रंगाची फॅशन आलीये म्हणा. कुठल्याही साडीवर कुठलाही ब्लाऊज ते स्वतः तयार ठेवायचे. आणि मी आनंदी करताना घोट्याच्या वर साडी आली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असायचा. घोट्याच्या खाली आणि आता जशी पायघोळ साडी नेसतात तशी तेव्हा ब्राह्मणाची बाई नेसायची नाही. कारण त्या बायका घरात खूप काम करायच्या, त्यांना असे लोळलेले कपडे चालायचे नाहीत. आणि म्हणून घोट्यापर्यंत त्यांचे पाय दिसायचे. एवढंच कशाला, ते गोंदवणं असायचं ना! तर गोडसे ते गोंदण हातावर काढून दाखवायचे, कसं पाहिजे आणि ठरलेलं असायचं की, कुठे कुठे पाहिजे. दर प्रयोगाला आम्ही ते गोंदवून घ्यायचो. आणि संगीताचं म्हणशील तर, तसा फार संबंध नव्हता. पण कुणी तरी मयेकर होते, त्यांचं म्युझिक असायचं. म्हणजे मला आता असं अर्धवट आठवतंय. आणि त्यांनी प्रत्येक सीनच्या कलानुसार वाद्यसंगीत दिलं होतं. 

प्रश्न- तुम्हाला आनंदीची भूमिका करण्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली का?
 - तयारी तर निश्चितच करावी लागली. कारण 19 व्या शतकात जायचं होतं. ड्रामा स्कूलमध्ये गेल्यापासून मला वाचनाची खूप आवड लागली होती. तर 19 वे शतक दर्शविणाऱ्या काळातली बरीचशी पुस्तकं मी वाचून काढली होती. पण या नाटकासाठी ‘आनंदी गोपाळ’ कादंबरीची पारायणंच केली. स्क्रिप्ट तर रोजच वाचायचे. आता भूमिकेचं म्हणाल तर- त्या बाईचा जो प्रवास आहे, म्हणजे ती एक साधी खेळणारी लहान मुलगी ते ती डॉक्टर होणं आणि बरोबरीने एक आजार जोपासत जाणं. हा त्या प्रवासातला एक महत्त्वाचा भाग होता. म्हणजे गोपाळराव ज्या वेळेला छळतोय, त्या वेळेला ती तो छळ करून घेत होती. सहन करत होती. आताची कुणी बाई छळ करून घेणार नाही. आणि उलट उत्तर द्यायचा सवालच नव्हता! पदर कमरेला किंवा खांद्यावर! ती बाई याव्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हती. या बारक्यासारक्या गोष्टी आहेत, पण यांनी भूमिका भरून काढल्या जातात. या गोष्टी रोलसाठी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे कुठल्याही वेळेला पदर बांधलेला असताना बाहेरचा मनुष्य आला रे आला की, पदर खांद्यावर येतो. तर या लहान-सहान बारकाव्यांवर मी बरंच काम केलं. माझ्याच घरात असणाऱ्या माझ्या आजीचं निरीक्षण करणं किंवा माझी आईही नऊवारी नेसत असे, तेही मी पाहिलेलं होतं.  

आता अजून खोलात जर भूमिकेच्या बाबतीत म्हणाल ना, तर- जसं गोपाळरावांना कळत जातं की ही मुलगी बुद्धिमान आहे. आपण हिला नुसतं शिकवतोय, श्लोक म्हणवून घेतोय, गणितं घेतोय, अमुक करतोय, तमुक करतोय; पण हिच्यात काही तरी वेगळा स्पार्क आहे. तर तिथे खरं म्हणजे त्यांचं डोकं फिरायला सुरुवात होते. त्यांना वाटतं की, माझ्यापेक्षा ही हुशार आहे. अनेक वर्षं परंपरागत चालत आलेलं आहे की, बायको नवऱ्यापेक्षा हुशार चालत नाही. तर, त्यांचा माथेफिरूपणा खरा तिथून चालू होतो. त्यांना वाटलं होतं की, मी समाजात असं काही तरी करून दाखवीन की माझी बायको मॅट्रिक केली किंवा बी.ए. केली. पण याहून जास्त तिची स्वप्नं असतील, असं त्यांना वाटत नसावं. मी हे जे बोलतीये त्याचा खरं तर थेट असा उल्लेख कुठेच नाहीये. पण हा त्यांच्या मानसिक द्वंद्वाचा भाग नक्की होता. 

याचं प्रमाण म्हणजे नाटकात एक सीन असा होता की- ते तिला विचारतात, हे पुस्तक वाचलंस का? आणि ती उत्तर द्यायच्या आतच ते तिला मारझोड करायला सुरुवात करतात. ती रडत-रडत सांगते की, माझं झालंय हे पुस्तक वाचून. तेव्हा ‘अरे, मग झालं का? कसं वाटलं? यां पुस्तकात काय आहे?’ अशी चर्चा करायची सोडून, मारणं सुरू ठेवून ते म्हणतात, ‘मग एका पुस्तकावर का थांबलीस? पुढचं पुस्तक का नाही वाचलंस?’ हा जो गोपाळरावांचा मेंटल प्रवास आहे ना, तो चमत्कारिक होता. पण तो महत्त्वाचा होता, कारण माझी भूमिका होती त्याला रिॲक्ट होणं! 

नाटकामध्ये ॲक्शनपेक्षा रिॲक्शन फार महत्त्वाची समजली जाते. माझा रिॲक्शनवर सत्तर टक्के जास्त विश्वास आहे. म्हणजे तुम्ही तीस टक्के ॲक्टिंग करा आणि सत्तर टक्के रिॲक्शन द्या, मग ती भूमिका चांगली होते. आणि आनंदी गोपाळ’मध्ये माझी भूमिका रिॲक्शनवर आधारित जास्त होती. आणखी एक तयारी करायची होती. ती म्हणजे, जसा आनंदीचा क्षय वाढत जातो तसा खोकला वाढतो. म्हणजे काय तर, वाक्यं पण बोलायची आहेत, रडायचंय पण आहे आणि खोकायचंय पण! या तिन्हींचा मेळ साधायचा आणि हे तिन्ही प्रेक्षकांना ऐकूसुद्धा गेलं पाहिजे. कुठं रडायचं, कुठं थांबायचं, कुठं खोकायचं, कुठं दम लागतो आणि कुठं अर्धं वाक्य होतं, बाकीचं वाक्य कुठं पूर्ण होतं वगैरे सगळ्यांचं अक्षरशः माझ्या स्क्रिप्टवर मार्किंग होतं. मग त्याची प्रॅक्टिस करून-करून इतका सराव झाला होता की, एकाही प्रयोगाला इकडचं रडणं तिकडे नाही किंवा तिकडचा खोकला इकडे नाही! तर ही आजाराची प्रॅक्टिस मला वेगळी करायला लागली, कारण पूर्वी कधी मी अशी भूमिका केली नव्हती. एखादं गाणं बसवतो तसं ते खोकला, रडणं, बोलणं मी बसवलं होतं! 

प्रश्न- एक मुद्दा तुम्ही बोलता-बोलता मांडलात की, गोपाळरावांच्या मनातलं द्वंद्व आणि त्यामुळे त्यांचं चमत्कारिक वागणं. जरी त्याचा कुठेही लिखित उल्लेख नसला तरी तो फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आनंदीच्या जीवनप्रवासाशी तसा त्याचा संबंध आहे का? तुमचे वैयक्तिक मत काय आहे? 
- हा मुद्दा कुठेही लिखित नसला तरी तो तसा स्पष्ट समजण्यासारखा होता. म्हणजे काही प्रसंग- जसं की- आनंदी अमेरिकेला होती आणि गोपाळराव तिथं गेले तेव्हा त्यांनी तिथे जो चक्रमपणा केला... म्हणजे तिथे सबंध भगवे कपडे काय घालून आले, त्या कार्पेन्टर बार्इंच्या घरात काय तमाशे केले... ही सगळी फक्त त्यांच्यातली असूया होती. जेव्हा आनंदी मरायलाच टेकली, तेव्हा ते पोटातलं प्रेम कुठे तरी उफाळून आलं की- हिनं माझ्यासाठी एवढं केलं आणि आपण काहीच करू शकत नाही आहोत. ज्या वेळेला ती मरायला आली तेव्हासुद्धा त्यांचं सुरूच होतं- मी तुझ्यासाठी मुळी आणली आहे, अमुकच आणलंय, हे देतो तुला, ते देतो... आणि ती स्वतः डॉक्टर असून कशालाच नाही म्हणू शकत नव्हती. त्या अवस्थेतसुद्धा ‘तुम्ही म्हणाल ते मी करते’ असं तिचं सुरू होतं. 

कादंबरीत उल्लेख आहे की, या आजारात पाणी द्यायचे नसते आणि ती पाणी मागत असते. ते संध्या करायला बसतात की ‘कोण म्हणतं मी ख्रिश्चन झालोय म्हणून?’ आणि तिथेही ते त्या संध्येचंच पाणी तिला पाजतात आणि ती मरते. म्हणाल तर गोपाळरावांच्या वागण्याचा आनंदीबाईंच्या आयुष्याशी बराच संबंध आहे.

प्रश्न- तेव्हाचा प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा जाणवला? आणि एकूणच आताचा आणि तेव्हाचा प्रेक्षक यात काय फरक जाणवतो?
 - अरे, प्रेक्षक वेडे व्हायचे वेडे...! म्हणजे मला आठवतंय, एकदा मुसळधार पाऊस पडत होता. काहींना  असंही वाटत होतं की, एवढा पाऊस पडतोय, तर कोण येणार आहे प्रयोगाला? पण आम्ही आपले आलो. कारण आम्हाला वाटलं, आपण तारीख दिली आहे तर थिएटरवर यायला पाहिजे. त्या पावसातसुद्धा हाऊसफुल प्रयोग झाला होता! आणि तेव्हा प्रयोग असे असायचे की, दुपारी चारला आणि सकाळी अकराला. तर, या दोन्ही प्रयोगांना बायका हौसेने रडायला यायच्या. अगदी खरं सांगते, त्यांचं असं असायचं की, ‘काहीही झालं तरी मला हे नाटक पाहून जायचंय.’ अगदी मनसोक्त रडायच्या. आत्ताच्या काळात हे फार बदललंय. आता असं कुठं तरी झालंय की, विनोदी नाटक आहे का; मग आम्ही नाटकाला येतो. आम्हाला डोक्याला ताण नको आणि आम्हाला फार विचार नाही करायचा. ही वृत्ती जवळजवळ गेली वीस वर्षे मी पाहते आहे. फक्त कॉमेडी नाटक पाहिजे, तरच मजा. म्हणजे काय, तुम्हाला फक्त हसायला यायचंय? बाकी नाटक नाही पाहायचं? 

आणि नाटकाचा बेस काय आहे, तर नवरस आहे. म्हणजे नऊच्या नऊ रस जेव्हा तुम्ही अनुभवता, तेव्हा तुम्ही ते नाटक पाहता ना? आणि अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कोणताही रस चालू शकतो- तो बीभत्सही असू शकतो. मग ‘आनंदी गोपाळ’मध्ये करुण रस आहे की- ज्यामुळे आपल्याला त्या बाईबद्दलची सहानुभूती वाटणं, आपल्याला स्वतःला त्या बाईमध्ये कुठं तरी पाहणं आणि तिच्या सिच्युएशनमध्ये आपण कुठं तरी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही प्रेक्षक म्हणून रडता, तेव्हा ते रडणं तुम्ही एका अर्थी एन्जॉय केलेलं असतं. किंवा एखादा बीभत्स सीन स्टेजवर झाल्यानंतरचा पिन-ड्रॉप सायलेन्स जो असतो, तो प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो! तेव्हा ते ती भावना फील करत असतात. तर सगळेच रस महत्त्वाचे आहेत, असं मला सांगायचं आहे. 

प्रेक्षक म्हणून तुम्ही विविध भावना पूर्णतः फील केल्याने तुम्हालाच मोकळं मोकळं वाटतं आणि ती संधी नाटक तुम्हाला देतं. पण आता प्रेक्षक फार बिघडलाय. कदाचित टीव्हीमुळे असेल आणि आता या वेब सिरीजमुळे पुन्हा सुधारला तर बघू या... पण नाटक हा आपला बेस आहे. आणि आपल्याकडे आजही असे प्रयोग करणारी खूप माणसं आहेत. अतुल पेठे हे एक नाव तर आहेच आहे. पण खेडोपाडी, इकडे-तिकडे सिरियस नाटकं करणारी अनेक माणसं आहेत. त्यांना फक्त हा मुंबईचा प्लॅटफॉर्म मिळत नाही; त्यांना पैसेसुद्धा मिळत नाहीत, पण तरीही ते हे हट्टाने करत राहतात. म्हणून मला वाटतं की, मी ‘आनंदी गोपाळ’ करायचे तेव्हाच्या आणि आत्ताच्या प्रेक्षकांमध्ये खूप फरक पडलाय.

 प्रश्न- तुम्ही केलेल्या त्या नाटकात अजून काही रिॲलिस्टिक वेगळेपणा हवा होता, असं आज वाटतं का?
 - निश्चितच! जसं मी सुरुवातीला म्हणाले की, ते नाटक एका कादंबरीवरून लिहिलं गेलं होतं, तर त्यात काल्पनिक गोष्टी असणं साहजिक होतं. त्याउलट, अंजली कीर्तने या बार्इंनी चांगला अभ्यास करून जे लिहिलं आहे, ते पुस्तक जर तेव्हा मिळालं असतं तर आमचं नाटक नक्कीच वेगळं झालं असतं.

 प्रश्न- 19 व्या शतकतील आनंदीबाई आणि गोपाळरावांचे संघर्षमय जीवन जी सामाजिक विषमता आणि स्त्रियांचे एकूणच प्रश्न मांडत होते, त्यात आज काही बदल जाणवतो का? किंवा आजच्या समाजात स्त्रियांविषयीच्या कोणत्या प्रश्नांमुळे आनंदीबाई अजूनही आठवतात?
 - माझं म्हणणं असं आहे की, उलटंच्या पालटं झालेलं आहे. तेव्हाचा काळ आणि आताच्या काळात तुलनाच होऊ शकत नाही. आणि करायचीच झाली तर त्या तुलनेत आता बाई पूर्णत: मोकळी झालेली आहे. स्त्रीमुक्ती वगैरेंसोबत आता काही प्रमाणात पुरुष- मुक्तीचीसुद्धा वेळ आलीये, इतकं ते झालेलं आहे! अर्थात खेडीपाडी वगळून ही मुक्ती आहे. मुंबई आणि पुण्यातल्या बायका तरी छान मोकळ्या झालेल्या आहेत. आणि तुझा उपप्रश्न म्हणशील तर- जर एखाद्या स्त्रीला वाटतंय की, मी काही तरी करायला हवं आणि त्यासाठीची परिस्थिती साजेशी नाही, तर तिला आनंदीबाईंच्या आयुष्याने प्रोत्साहन नक्कीच मिळू शकतं. डॉक्टर नाही तर मी दुसरं काही तरी होईन. आनंदीबाईंच्या काळात डॉक्टर होणं ही फार मोठी गोष्ट होती. आता कुठलंही क्षेत्र असं राहिलेलं नाही जिथे बाई पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी नाही. काळानुरूप झालेला हा बदल खूप मोठा आहे. हां, आता विषमता ही पगारात कुठं तरी दिसते. म्हणजे मजूर बायकांचं उदाहरण घेतलं तर त्या श्रम सारखेच करतात, कधी कधी जास्तसुद्धा; पण पुरुषांच्या तुलनेत त्यांना पैसे कमी मिळतात. तर आजचे प्रश्न म्हणशील तर, अशा  प्रकारचे विषमतेचे आहेत.

 प्रश्न - आनंदीबाईंचे एकूण आयुष्य म्हणजे निराशाजनक शेवट किंवा आनंदीबाईंच्याच शब्दांत- ‘इतके सगळे केले, पण आजारामुळे डॉक्टर होऊनसुद्धा काहीच उपयोगी आले नाही, सगळे परिश्रम वाया गेले...’ तर तुम्ही ती भूमिका केली असल्याने तुम्हाला याबद्दल काय वाटतं?
 - खरोखर पाहिलं तर तसं वायाच गेलं ते! इतकी धडपड करून डॉक्टर होऊनसुद्धा तिला प्रॅक्टिस नाहीच करता आली. आज भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून तिचं नाव तरी निघतंय. तेही निघालं नसतं, जर काही लोक तिच्यामागे उभे राहिले नसते. ती आजारी आहे हे समजल्यावर पहिले शंभर रुपये तिला लोकमान्य टिळकांनी पाठवले होते. ‘तिच्यावर उपचार करा आणि आधी त्या बाईला बरं करा. ती इतकं सगळं शिकून आलीये आणि आपल्याला तिची गरज आहे.’ तिला शिक्षणासाठी बाहेर जायला कोल्हापूरच्या संस्थानाने स्कॉलरशिप दिली होती. त्यामुळे कोल्हापूरमध्ये ते हॉस्पिटलसुद्धा काढून देणार होते. सगळं राहून गेलं ना... त्यामुळे वाया गेलं, ही गोष्ट अगदी शंभर टक्के सत्य आहे. तशी ती मेहनत वाया जायला नको होती. पण तरी वाया का गेली? तर, आपल्या बाकीच्या वातावरणामुळे! मुळात गोपाळरावांमुळे आणि त्यांच्या हट्टीपणामुळे. 

अमेरिकेच्या भौगोलिक वातावरणात तिने जर गरम कपडे घातले असते, तर कदाचित क्षय लागलाही नसता. फिलाडेल्फियाच्या थंडीमध्ये आपण जेव्हा जाऊन येतो, अनुभव घेतो, तेव्हा लक्षात येतं अशा वातावरणात नऊवारी पातळ नेसून वावरणं गंमत आहे का? अरे, आज आम्ही जातो तेव्हा कपड्यांच्या आत बॉडी वॉर्मर आणि लेगिन्स घातल्याशिवाय हिंडू शकत नाही; आणि ही मुलगी ते पातळ नेसून कशी वावरत असेल? म्हणजे काय तर- आपल्या परंपरा व रूढी यानुसार स्त्रीने कोणते व कसे कपडे घालावेत हे ठरणार. मग ते वातावरणाला साजेसे असोत, अगर नसोत. अमुक नाही, तमुक नाही... यामुळे खरं तर आनंदीबाईंचा मृत्यू झाला. ‘तिथे जाऊन मी नॉनव्हेज खाणार नाही!’ असा हट्टीपणा असेल तर त्या वातावरणात ते शरीर गरम कसं राहणार? त्या शरीराला उब कुठून मिळणार? कसं जगणार त्या वातावरणात मग? म्हणून तिच्या मरणाला कारणीभूत खरं तर गोपाळराव आणि त्यांनी तिच्यावर घातलेली ही रूढीची बंधनं! आणि तिने ते ऐकलं... कारण ती त्या काळातली होती! पण याबद्दल कुठेच असा थेट उल्लेख दिसत नाही. कादंबरीत नाही, अंजली कीर्तने यांच्या पुस्तकातही नाही. 

ती अमेरिकेहून तिचा एक फोटो पाठवते तेव्हा, ‘पदर खांद्यावरून घसरलाय!’ असं गोपाळराव एकदा तिला म्हणतानाचा उल्लेख आहे. पण हा त्यातला एक पैलू होता. इतर गोष्टी म्हणजे, अमेरिका तरी तेव्हा कुठे इतकी प्रगत होती? तिथे हीटर नव्हते, कोळसा जाळून ऊब मिळविली जायची. त्या कोळशाच्या धुरानेसुद्धा त्रास झालेला असू शकतो. तिची खोली देखील अंधारी असणार. असा सगळ्यांचा मिळून झालेला तो परिणाम आहे. 

प्रश्न - आनंदीबाईंचा हा असा शेवट अभिनयातून साकारताना तुम्हाला काय वाटायचं?
 - वाईट निश्चितच वाटायचं. पण हे सगळं वाईट वाटणं रिहर्सलमध्ये संपवावं लागतं, आमच्या थिअरीप्रमाणे! आणि दर प्रयोगाला मला तसंच वाटत राहिलं, तर मी निराश होऊन घरी येणार. त्यामुळे जो अभिनय आहे तो करायचा; बाकी रडणं, वाईट वाटणं, हसू येणं असं जे काही असतं- ते रिहर्सलमध्ये करून घ्यायचं. एखादी भूमिका साकारताना तुमच्या वैयक्तिक भावना त्याच्या आड येता कामा नयेत. तिथे अभिनयच करायचा असतो. 

प्रश्न- नुकताच आलेला ‘आनंदी गोपाळ’ सिनेमा तुम्ही बघितलाय का? त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? 
- सिनेमा मी बघितला नाही, पण काही लोकांकडून त्याचं कौतुक ऐकलंय की, चांगला केला आहे.

 प्रश्न - या नाटकाच्या अनुषंगाने तुम्हाला आपल्या वाचकांना आणखी काही सांगायला आवडेल का?  
- हम्म... तसं काही विशेष सांगायचं नाहीये; कारण तेव्हा ते नाटक केलं, ते लोकांना आवडलं, झालं! आता या मुलाखतीच्या निमित्ताने त्याला पुन्हा उजाळा मिळतोय हेच खूप आहे, नाही का? आणि मलासुद्धा ‘आनंदी गोपाळ’ नाटकाच्या आठवणीत पुन्हा एकदा जायला मिळालं. मजा आली.

( मुलाखत : दीपाली यमू-रमेश अवकाळे, पुणे )
 

Tags: सुहास जोशी आनंदीबाई जोशी suhas joshi anandi joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुहास जोशी

अभिनेत्री 


प्रतिक्रिया द्या