डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

कोकण रेल्वेचे शिल्पकार : जॉर्ज आणि श्रीधरन

नियोजन आयोग दरवर्षी नवीन रेल्वेमार्गासाठी 250-300 कोटी रुपयांच्या तरतूद करत असे. जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाले त्यावेळी देशामध्ये 20-25 नवीन रेल्वेमार्गांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी एक कोकण रेल्वे. 250-300 कोटी रुपयांचं वाटप 20-25 रेल्वेमार्गांना करायचं तर प्रत्येकाच्या वाट्याला 4-5 कोटी रुपये येत. या वेगाने कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण व्हायला 25 ते 30 वर्षं लागली असती. कोकण रेल्वे प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करायचा तर तो नियोजन आयोगाच्या चौकटीतून बाहेर काढायला हवा हे जॉर्ज फर्नांडिस यांच्या लक्षात आलं. कोकण रेल्वे प्रकल्प आर्थिक दृष्ट्या किफायतशीर आहे. या प्रकल्पामुळे मुंबई- मंगलोर अंतर दीड हजार किलोमीटरने कमी होईल, प्रवासाच्या काळात 24 तासांनी बचत होईल. त्यासाठी स्वतंत्र कंपनी काढावी, त्यामध्ये रेल्वे मंत्रालय आणि लाभार्थी राज्यांनी गुंतवणूक करावी. तसं झालं तर निधीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी कल्पना ई. श्रीधरन यांनी मांडली.

दोन डिसेंबर 1989 रोजी जॉर्ज फर्नांडिस यांनी केंद्रीय मंत्री म्हणून भारतीय रेल्वेचा कारभार स्वीकारला. जॉर्ज मूळचे उडुपीचे म्हणजे जन्माने कोकणी होते. कोकण रेल्वे आणि बिहार-उत्तर प्रदेश यांना जोडणारा गंडक नदीवरचा पूल या दोन प्रकल्पांना मी सर्वाधिक प्राधान्य देतो, असं जॉर्ज यांनी रेल्वे बोर्डाच्या पहिल्या बैठकीत जाहीर केलं. ई. श्रीधरन हे रेल्वे बोर्डाचे सदस्य या बैठकीला उपस्थित नव्हते. ते रजेवर होते. कामावर रूजू झाल्यावर त्यांनी जॉर्ज यांची सदिच्छा भेट घेतली. कोकण रेल्वे आणि गंडक नदीवरचा पूल हे दोन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची गळ जॉर्ज यांनी त्यांना घातली.

कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचं संपूर्ण श्रेय एका व्यक्तीला कधीही देता येत नाही. कारण कोणत्याही मोठ्या पायाभूत प्रकल्पासाठी प्रचंड गुंतवणूक गरजेची असते. तंत्रज्ञान आणि विविध यंत्रणा गरजेच्या असतात त्याशिवाय देशाची तत्कालीन आर्थिक-राजकीय परिस्थिती, भांडवली बाजाराची स्थिती, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा अनेक घटकांच्या ताणतणावांतून कोणत्याही पायाभूत प्रकल्पाची पायाभरणी, जडण-घडण होत असते. कोकण रेल्वेचा इतिहास थेट ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून सुरू होतो. 1853 साली धावलेली मुंबई-ठाणे रेल्वे ही कोकण रेल्वेच होती. काही वर्षांत ती घाट ओलांडून पुण्याला गेली  आणि तिथून दख्खनच्या पठारावर तिचा प्रवास सुरू झाला. तिची दुसरी शाखा नाशिकमार्गे उत्तर भारतात गेली. कसारा घाटापर्यंत ती कोकण रेल्वेच होती. पश्चिम रेल्वे- बॉम्बे-बरोडा, हीदेखील कोकण रेल्वेच होती. पण हे रेल्वेमार्ग दक्षिण कोकणाला जोडणारे नव्हते.

बॉम्बे-बरोडा आणि सेंट्रल इंडिया रेल्वेमधील (सध्याची पश्चिम रेल्वे) मुख्य ड्राफ्ट्‌समन, अर्जुन बळवंत वालावलकर यांनी कोकण रेल्वेचा पाठपुरावा केला. कोकण रेल्वे प्रकल्प ही पुस्तिका त्यांनी 1952 साली प्रसिद्ध केली. वर्तमानपत्रात लेख लिहिले, परिषदा व चर्चासत्रं आयोजित केली. तत्कालीन रेल्वेमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली. अनेकांनी त्यांच्या मागणीची चेष्टा केली. परंतु कोकण रेल्वेचा ध्यास श्री.वालावलकर यांनी घेतला होता. 1970 साली त्यांचं निधन झालं. वालावलकर यांच्या प्रस्तावाचा संसदेत पाठपुरावा केला बॅ.नाथ पै आणि त्यांच्यानंतर प्रा.मधु दंडवते यांनी.

बॅ.नाथ पै यांच्या प्रयत्नामुळे 1966 साली रेल्वे मंत्रालयाने दिवा-पनवेल रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. 1977 ते 1979, दोन वर्षं प्रा.मधु दंडवते रेल्वेमंत्री होते. त्यांच्या प्रयत्नामुळे पनवेल ते रोहा या ऐंशी किलोमीटर रेल्वेमार्गाचं काम सुरू झालं. 1986 साली ते पूर्ण झालं. पुरेसा निधी कोकण रेल्वेला मिळत नव्हता ही प्रमुख समस्या होती. हा काळ समाजवादाचा होता. नियोजन आयोग शिफारस करणार त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद होणार या मार्गाने आर्थिक तरतूद व्हायची. करसंकलनातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा विविध मंत्रालय वा विभागांना विकास कामासाठी उपलब्ध व्हायचा. आपल्याला अधिकाधिक निधी मिळावा म्हणून त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असे. त्यामुळे रेशनिंग करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता.

नियोजन आयोग दरवर्षी नवीन रेल्वेमार्गासाठी 250-300 कोटी रुपयांच्या तरतूद करत असे. जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाले, त्यावेळी देशामध्ये 20-25 नवीन रेल्वेमार्गांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी एक कोकण रेल्वे. 250-300 कोटी रुपयांचं वाटप 20-25 रेल्वेमार्गांना करायचं तर प्रत्येकाच्या वाट्याला 4-5 कोटी रुपये येत. या वेगाने कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण व्हायला 25 ते 30 वर्षं लागली असती. कोकण रेल्वे प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करायचा तर तो नियोजन आयोगाच्या चौकटीतून बाहेर काढायला हवा हे जॉर्ज फर्नांडिस यांच्या लक्षात आलं.

कोकण रेल्वे प्रकल्प आर्थिक दृष्ट्या किफायतशीर आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-मंगलोर अंतर सुमारे दीड हजार किलोमीटरने कमी होईल, प्रवासाच्या काळात 24 तासांनी बचत होईल. त्यासाठी स्वतंत्र कंपनी काढावी, त्यामध्ये रेल्वे मंत्रालय आणि लाभार्थी राज्यांनी गुंतवणूक करावी. तसं झालं तर निधीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी कल्पना ई. श्रीधरन यांनी मांडली. जॉर्ज फर्नांडिस यांना या संकल्पनेमागची व्यवहार्यता तात्काळ पटली. अठ्ठेचाळीस  तासात मी तुम्हाला या संबंधात नेमकं काय करायचं ते कळवतो, असा शब्द जॉर्ज फर्नांडिस यांनी श्रीधरन यांना दिला आणि अठ्ठेचाळीस तास पूर्ण होण्याआधी काही मिनिटं, त्यांनी श्रीधरन यांना बुलावा धाडला.

पंतप्रधान, व्ही.पी. सिंग, वित्तमंत्री मधु दंडवते, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष सर्वांशी चर्चा केली, त्यांना ही कल्पना पटली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची कंपनी कायद्याखाली नोंदणी करायची या कॉर्पोरेशनवर रेल्वे मंत्रालयाचा प्रशासकीय नियंत्रण असेल, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्य सरकारांनी कॉर्पोरेशनच्या भागभांडवलात सहभागी व्हावं. उरलेला निधी करमुक्त कर्जरोख्यांद्वारे उभा करावा अशी सूचना मुख्य आर्थिक सल्लागार, विमल जालन यांनी केली. या योजनेचा तपशील, प्राधान्यक्रम ठरवणं आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याचं कामं, जॉर्ज फर्नांडिस यांनी श्रीधरन यांच्यावर सोपवलं. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व केरळ राज्यांतील मुख्यमंत्र्याशी चर्चा करून त्यांची मंजुरी मिळवू असा आत्मविेशास जॉर्ज फर्नांडिस यांना होता.

महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार होतं. त्यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये पैसे गुंतवण्याच्या संकल्पनेला तात्काळ मंजुरी दिली. गोव्यामध्ये जनता दलाच्या मित्रपक्षाचं सरकार होतं, तिथेही ही मंजुरी मिळाली. प्रश्न होता कर्नाटक आणि केरळचा. या राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारं होती. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना राजी करून घेण्याची जबाबदारी फर्नांडिस यांनी श्रीधरन यांच्यावर टाकली. श्रीधरन यांनी त्या राज्यांच्या मुख्य सचिव आणि वित्त सचिवांसोबत बैठका घेतल्या. त्यांना ही योजना समजावून सांगितली. प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता आणि राज्यांना होणारे लाभ स्पष्ट केले. मुख्य सचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांची मंजुरी या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला मिळवली.

14 जुलै 1990 रोजी रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे मंत्रालयासाठी एक पत्रक प्रसृत केलं. कोकण रेल्वे प्रकल्पाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं आहे. या प्रकल्पाच्या संबंधीत फाईल्सवरती- कोकण रेल्वे तात्काळ असं ठळक अक्षरात नोंदवा. कोकण रेल्वे संबंधित कोणतीही फाईल जास्तीत जास्त 24 तासांत पुढे सरकली पाहिजे. जॉर्ज फर्नांडिस यांनी असा फतवा काढल्याने, कोकण रेल्वेची लाल फितीतून सुटका झाली. योजना आयोग, वित्त मंत्रालय आणि चारही राज्यांच्या राजधानीतून तुफान वेगाने धावू लागली. 19 जून 1990 रोजी चार मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी कर्नाटक भवनात ऐतिहासिक करारपत्रावर सह्या केल्या. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन या सरकारी मालकीच्या खाजगी कंपनीची स्थापना झाली. या प्रकारची स्वतंत्र भारतातली ही पहिली कंपनी.

30 जून रोजी ई. श्रीधरन सेवानिवृत्त होणार होते. त्याच्या एक आठवडा आधी, जॉर्ज फर्नांडिस यांनी चेन्नईमध्ये पत्रकार परिषदेत घोषित केलं की, ई. श्रीधरन कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक असतील. ही घोषणा केल्यानंतर जॉर्ज यांनी श्रीधरना फोन केला, 'तुम्ही निवृत्त होत आहात पण माझी इच्छा आहे की, तुम्हीच या प्रकल्पाचं नेतृत्व करावं.' ' हे काम करायला मला आवडेलच पण मला कोरा चेक हवा, प्रकल्पाची आखणी आणि साकारणी यामध्ये कुणाचाही-नोकरशहा वा राजकारणी, हस्तक्षेप होणार नाही याची हमी द्या', श्रीधरन यांनी विनंती केली.  क्षणभराचीही उसंत न घेता, जॉर्ज फर्नांडिस उत्तरले, दिला तुम्हाला कोरा चेक, करा कामाला सुरुवात.

 ई. श्रीधरन यांनी 30 ऑक्टोबर 1990 रोजी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पदाची सूत्रं हाती घेतली. 8 नोव्हेंबर 1990 रोजी व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं. जॉर्ज फर्नांडिस निवडणुकीच्या तयारीला लागले. समाजवादी चौकटीच्या बाहेर जाऊन नवीन विचार (इनोवेटिव्ह थिंकिंग) करणं, अल्पावधीत योग्य माणसाची पारख करून त्याच्यावर जबाबदारी सोपवणं, त्याला आवश्यक ती सर्व मदत व साधनसामुग्री पुरवणं आणि धडाडीने सत्वर निर्णय घेणं हे गुण असतील तर सह्याद्रीच्या पर्वतराजीत 1880 पूल आणि 91 बोगदे पार करणारा पायाभूत सुविधांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कमालीच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत मार्गी लावता येतो; आणि आपण सत्तेवर असू वा नसू, तो कमीत कमी काळात पूर्णही होतो हे जॉर्ज फर्नांडिस यांनी सिद्ध केलं.

(संदर्भ : इंडियाज्‌ रेल्वे मॅन-अ. बायोग्राफी ऑफ ई. श्रीधरन, लेखक - राजेंद्र बी. आकेलकर, रुपा प्रकाशन)

Tags: railway minister konkan railway corporation obituary article India's Railway Man: A Biography of E. Sreedharan anticogress george fernandes E. Sreedharan मृत्युपर लेख इंडियाज्‌ रेल्वे मॅन-अ. बायोग्राफी ऑफ ई. श्रीधरन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन ई. श्रीधरन जॉर्ज फर्नांडीस weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनील तांबे,  मुंबई
suniltambe07@gmail.com

सुनील तांबे हे राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार आहेत. 


प्रतिक्रिया द्या