डिजिटल अर्काईव्ह (2013-2020)

आजारी आणि दुःखी माणसांच्या वस्त्यांत राहून त्यांची सेवा बांधणारी मोठी माणसे इतिहासात बरीच झाली. त्यांच्या संतत्वाच्या कहाण्या आपण ऐकल्या आणि त्यांनी आपल्याला नतमस्तकही केले. अँजेलिना संत नाही. सारे बरे-वाईट  पाहून व अनुभवून त्यांच्याच भूमिका जिवंत करणारी ती एक समर्थ अभिनेत्री आहे. निर्वासितांच्या जखमी वस्त्यांत तिला तिच्या या भूमिकांसह तिचे खरे आयुष्यही अंगावरून उतरून बाजूला ठेवता येते आणि त्या वस्त्यांशी एकरूप होता येते. हा अनुभव वेगळा आणि तो अभिनयच असेल, तर त्याची जातकुळीही  वेगळी अन्‌ फार वरच्या स्तरावरची असणारी.

माझ्या समोरच्या दिमाखदार दिवाळी अंकात चार नट-नट्यांनी  स्वतःविषयी लिहिलेले तेवढेच दिमाखदार लेख आहेत. त्यातला एक रणबीर कपूर नावाच्या सध्याच्या लोकप्रिय  नटाचा, दुसरा दीपिका पदुकोन या तेवढ्याच लोकप्रिय नटीचा, तिसरा माधुरी दीक्षित या  कालच्या लोकप्रिय नटीचा आणि चौथा अॅंजेलिना जोली या साऱ्या जगावर राज्य करणाऱ्या  हॉलिवूडच्या नटीचा. यातले पहिले तीन भारतीय, म्हणजे बॉलिवूडचे. त्यांच्या लिखाणाला  त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांचे आणि व्यावसायिक क्षेत्राचे कुंपण आहे. त्यांचा सारा भर घरचे  वातावरण, व्यवसायातले चढ-उतार,  प्रसिद्धीने वाट्याला आणलेले मोठेपण आणि तेवढ्याच तिने आणलेल्या मोठ्या अडचणींवर. घर, आईबाप, असेल तर नवरा, इतर नातेवाईक आणि व्यवसायातील सहकारी व स्पर्धक यातच त्यांच्या अनुभवाचे विश्व  साकारून संपल्याचे दिसणारे. बॉलिवूडमधली माणसे चित्रपटात व दूरचित्रवाहिन्यांच्या  पडद्यावर पाहताना त्यांच्या नित्याच्या आकाराहूनच नव्हे तर कल्पनेतल्या मोठेपणाहूनही मोठी  दिसतात. त्यांच्या व्यक्तिगत कहाण्या पाहिल्या की त्यांच्यावर ते मोठेपण आपण लादत तर नाही ना, असा प्रश्न आपल्याला पडतो.

कारण ही माणसे कुंपण, अंगण, घराची चौकट आणि  त्यांच्या कौतुकाने भारलेले त्यांचे स्टुडिओ यापलीकडे फारशी जाताना दिसत नाहीत. खूपदा  वर्तमानपत्रे आणि सिनेमाला वाहिलेली गुळगुळीत नियतकालिके यातून ती दिसतात. त्यातले  त्यांचे स्वरूप अनेकदा पाहण्यासारखेही नसते. या साऱ्यांहून अँजेलिनाचे आत्मकथन नुसते वेगळेच नाही, तर या साऱ्यांसकट आपल्याही मर्यादा उघड करणारे आहे. अँजेलिनाला घर  आणि व्यवसाय यांची कुंपणे नसावीत आणि जगाला वेढून टाकणारी वेदना हेच तिचे विश्व  असावे, असे वाटायला लावणारा आणि वाचकाला पार नम्र व खुजे करून टाकणारा तिचा  अनुभव तिच्या त्या लेखात आहे. कीर्ती आणि वैभवाच्या शिखरावर असलेली अँजेलिना ही हॉलिवूडची आघाडीची नटी आहे. स्टंटपटांच्या नायिकेच्या भूमिकेपासून चरित्र अभिनेत्रीच्या भूमिकेपर्यंतची तिची कामे जगाने डोक्यावर घेतली आहेत.

केवळ नटी म्हणून आपले नाव इतिहासात कायमचे  नोंदविण्याएवढी तिची या क्षेत्रातली कामगिरी मोठी आहे. मात्र हे काम तिला थांबविणारे  आणि अडविणारे नाही. त्याहूनही अधिक मोठी आव्हाने तिला खुणावतात आणि त्या आव्हानांची सच्चाई हॉलिवूडचे बेगडी सिनेपण तिला जाणवून देते. हॉलिवूडच्या अशाच एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती कंबोडियात जाते आणि तिथल्या ‘रेफ्युजी कॅम्प’मध्ये (निर्वासितांसाठी उभ्या केलेल्या  तात्पुरत्या वसाहतीत) वर्षानुवर्षे राहिलेल्या मुला-मुलींची आणि वडीलधाऱ्यांची दैना पाहते. त्या अनुभवाने हिरावून  घेतलेला तिचा तोवरचा हॉलिवूडचा उन्माद मग युद्धांनी आणि  आक्रमणांनी निर्वासित केलेल्या मुलांना दत्तक घेऊन वाढविण्याच्या व्यापक मातृत्वात परिवर्तित होतो. गोऱ्या, काळ्या, तपकिरी आणि सावळ्या वर्णाची मुले मग तिच्या  घरातच नाही तर अंगाखांद्यांवर वाढू लागतात.. मध्यंतरी एका  चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती मुंबईला आली तेव्हा तिला पाहता आले. शूटिंगचा काळ संपला की, ती आपल्या या रंगीबिरंगी मुलांना  ऑटोरिक्षात घालून मुंबई दाखवायला निघताना दिसायची. वंश, वर्ण, जात, धर्म आणि देश या साऱ्या सीमांवर उठलेल्या अँजेलिनाचा अभिनय मोठा की  अनुभूती, ती नटी म्हणून श्रेष्ठ की माणूस म्हणून मोठी आणि  तिच्या त्या जगण्याने आपल्या आयुष्याचे कृपणपण  आपल्याला दाखविले की लहानपण- असाच प्रश्न मग कोणाही सहृदय माणसाला पडावा...

युद्ध आणि  बॉम्बस्फोटांनी घरादारांसह सर्वस्व गमावून बसलेल्या, हातपाय तुटलेल्या, दृष्टी आणि श्रवण घालविलेल्या  निर्वासितांच्या जगभरातील छावण्यांतून ती हिंडते. सिएरा लिओन, अफगाणिस्तान, टांझानिया, पाकिस्तान, थायलंड, इक्वेडोर, कोसोवो, केनिया, नामिबिया, श्रीलंका, जॉर्डन, इजिप्त, कोस्टारिका, सिरिया आणि इराक अशा विसाहून  अधिक युद्धग्रस्त देशांतील अशा वंचित व उपेक्षितांच्या  वस्त्यांत ती जाते. जेथे निर्वासित आहेत, त्या सर्व भागांतून  फिरते. अपंगांच्या व निराश्रितांच्या त्या भुकेल्या दुनियेतले निम्म्याहून अधिक लोक तिला 20 वर्षांहून कमी वयाचे  आढळतात. त्यातल्या अनेकांचा जन्मही त्या छावण्यांतच  झाला असतो. अन्नाचे अपुरेपण, पाण्याचे दूषितपण, औषधांचा अभाव, शाळा नाही, वर्तमान  नाही आणि कुठले  भविष्यही नाही- अशा स्थितीत या छावण्यांभोवतीची काटेरी कुंपणे पाहत जगणारे ते असुरक्षितांचे जग... त्यावर कोणत्याही क्षणी बॉम्ब पडतात आणि जवळची लष्करी वा निमलष्करी माणसे येऊन त्यातल्या पोरापोरींना सकारण वा  अकारण कधीही मारहाण करतात... हे अँजेलिनाचे आताचे जग त्यांच्यातले आहे.

तिला मग हॉलिवूडची दुनिया आठवत नाही. भारतीय नट-नट्यांसारखी मग ती आपल्या घरातल्या वा व्यवसायातल्या गोड-गोड गोष्टी सांगत नाही आणि ती जे  लिहिते, ते मग वाचवतही नाही. मात्र तिच्या तशा वागण्यात  शिस्त आहे. आपल्या कामाची सुरुवात करण्याआधी ती संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्वासितांना मदत करणाऱ्या कार्यालयात  जाते. त्यातील अधिकाऱ्यांकडून या छावण्यांची आणि  त्यातल्या गरजांची माहिती घेते. मग एकटीच त्या छावण्यांना  भेटी देत हिंडते. त्या फेरफटक्यात तिथल्या मुला-मुलींशी, स्त्री-पुरुषांशी आणि म्हाताऱ्याकोताऱ्यांशी जिव्हाळ्याने  बोलून त्यांच्याशी स्वतःचे नाते जुळविते. तेवढ्यावर न थांबता त्यांच्या मदतीसाठी जिवाचे रान करण्याच्या जिद्दीने  प्रसंगी आपले नटीपण विसरते... मी अँजेलिनाचा फॅन नाही. तिचे सगळे चित्रपट मी पाहिले नाहीत आणि पाहिले त्यातले  सारे आवडले असेही नाही. तिचे बरेचसे चित्रपट स्टंटपट आहेत आणि ते ओळीने यशस्वी झाले आहेत. तिचा नवरा ब्रॅड पिट हाही हॉलिवूडचा आघाडीचा व तिच्याएवढाच मोठा व यशस्वी अभिनेता आहे. मात्र या चित्रपटांच्या यशाने आणि अभिनेता असलेल्या तिच्या नवऱ्याने तिला तिच्या आताच्या जगात जाण्यापासून अडविले नाही. हॉलिवूडची मायानगरीही  तिला आपल्या मोहाच्या मर्यादेत रोखून ठेवू शकली नाही.

ती म्हणते... या छावण्यांध्ये जनावरासारखे आयुष्य  जगत असलेले अफगाण निर्वासित पाहिले आणि मला अक्षरशः गलबलून आले. मलूल झालेल्या आपल्या सहा  मुलांना पोटाशी कवटाळून एका मळक्या तंबूच्या आडोशाला  बसलेली असहाय आई मला तेथे दिसली. कुणी तरी कधी तरी  काही खायला आणून देईल आणि आपल्या उपाशी मुलांच्या  तोंडी घास जाईल, एवढी एकच काळजी तिच्या आयुष्यात उरली आहे... ...दुसऱ्या एका छावणीत हजारो माणसे पाहिली. त्यांच्यातल्या अनेकांना हात नव्हते, तर अनेकांना पाय. दोन्ही  हात कोपरापासून आणि दोन्ही पाय गुडघ्यांपासून कापलेल्या  जेते चार वर्षे वयाच्या एका जिवंत मुलाचं वळवळतं धड पाहिलं आणि वाटलं- कारण कोणतंही असो... माणसं अशी  वागू शकतात तरी कशी? जनावरांहून ती क्रूर होतातच कशी? ...या छावण्यांत दहा आणि पंधरा वर्षांपासून माणसं  कुंपणातलं जिणं जगतात. तिथं पाणी नसतं, स्वच्छतेच्या सोई  नसतात. खायला कधी असतं, कधी नसतं. तिथंच जन्माला यायचं आणि तिथंच मरायचं... तिथल्या प्रत्येकानं जवळची  माणसं मारली जाताना पाहिली आहेत. जवळच्या माणसांच्या  रक्तामांसाचा चिखल तुडविला आहे... जेते आठ वर्षांची एक अपंग आणि कृश मुलगी तिच्या दीड-दोन वर्षाच्या  भावाला स्वतः उपाशी राहून जगवताना तिनं तिथंच पाहिली.  

जगात ठिकठिकाणी सुरू असलेल्या लहानसहान युद्धांच्या  सचित्र बातम्या आपल्यापर्यंत पोहोचविणारी माध्यमे या युद्धांनी सामान्य माणसांच्या उद्‌ध्वस्त केलेल्या आयुष्याच्या  कहाण्या आपल्याला सांगत नाहीत. जमीनदोस्त झालेली  शहरे, नुसतेच ढिगारे होऊन पडलेले गावांचे अवशेष, मरून पडलेल्या प्राण्यांएवढीच सडत राहिलेली स्त्री-पुरुषांची  कलेवरे... या गोष्टी आपल्याला ठाऊकच नसतात. या युद्धांनी ज्यांना आपला देश आणि वस्त्या सोडून कुंपणाच्या आड तात्पुरत्या उभारलेल्या तंबूंच्या वसाहतीत वर्षानुवर्षे जगावे लागते; त्यांचे आयुष्य कसे असेल, भूत आणि वर्तान असे  सारेच गमावलेल्या या माणसांसमोरचे भविष्य कसे असेल, आपण मागे सोडून आलेली आपली गावे, घरे वा देश  आपल्याला पुन्हा दिसतील की नाही- या प्रश्नांचे भेडसावणे ही माणसे कसे अनुभवत असतील आणि त्यातही ज्यांचे  आई-बाप त्यांच्या डोळ्यांदेखत मारले गेले, त्या मुला- मुलींच्या डोळ्यांत त्यांचे वर्तान तरी कसे उगवत असेल? अँजेलिना या साऱ्यांसोबत जगते. ज्या जगाची आम्हाला  जाण नाही आणि जे जाणून घेणे आमच्या संवेदनशील  भावविश्वाला मानवणारे नाही, ते ती प्रत्यक्ष कसे अनुभवत  असेल? आजारी आणि दुःखी माणसांच्या वस्त्यांत राहून त्यांची सेवा बांधणारी मोठी माणसे इतिहासात बरीच झाली. त्यांच्या संतत्वाच्या कहाण्या आपण ऐकल्या आणि त्यांनी  आपल्याला नतमस्तकही केले.

अँजेलिना संत नाही. सारे  बरे-वाईट पाहून व अनुभवून त्यांच्याच भूमिका जिवंत  करणारी ती एक समर्थ अभिनेत्री आहे. निर्वासितांच्या जखमी  वस्त्यांत तिला तिच्या या भूमिकांसह तिचे खरे आयुष्यही  अंगावरून उतरून बाजूला ठेवता येते आणि त्या वस्त्यांशी  एकरूप होता येते. हा अनुभव वेगळा आणि तो अभिनयच असेल, तर त्याची जातकुळीही वेगळी अन्‌ फार वरच्या  स्तरावरची असणारी. अँजेलिनाचा अनुभव आपलेच भावविश्व उद्‌ध्वस्त  करतो. तिच्या सबंध लेखात या साऱ्या वस्त्यांसाठी तिने केलेल्या कामाचा एका अक्षरानेही उल्लेख नाही. हॉलिवूडची  आघाडीची नटी आणि पिट्‌ची पत्नी म्हणून तिच्याविषयी  साऱ्या जगात कुतूहल आहे. जीवन की सौंदर्य... या वादात  तिने जीवनाची बाजू घेत स्वतःवर एक शस्त्रक्रिया मध्यंतरी करून घेतली. तिच्या त्या जीवनवादासाठीही जगाने तिचा  गौरव केला. पण आपल्याविषयी आपणच लिहिलेल्या  लेखात तिच्या हॉलिवूडमधील रंगीत अनुभवांचा, लग्नाआधीच्या आणि नंतरच्या तेवढ्याच रंगतदार व  ऐश्वर्यसंपन्न आयुष्याचा किंवा तिच्या आणि पिट्‌च्या  संबंधांचा कुठेही उल्लेख नाही. लेखातली सारी चर्चा  जगभरातील निर्वासितांच्या तुटलेल्या अवयवांची आणि आयुष्यांची...

या तुलनेत मग आपल्या नट्यांचे आणि नटांचे लेख... ते मग आपण का वाचायचे? आणि कशासाठी? त्यांची श्रीमंती, त्यांचे वैभव, त्यांची कीर्ती आणि त्यांचे  रिकामपणाचे उद्योग वाचून आपल्या वंचना विसरण्यासाठी; की त्यांच्या उपलब्धीत आपली खोटी स्वप्ने खरी झाल्याचा  भ्रम अधोरेखित करण्यासाठी? या अंकातील रणबीर नावाच्या नटाच्या लेखाचे शीर्षकच ‘बेशरम’ हे आहे. ते पाहूनच तो वाचावासा वाटला नाही. माधुरी दीक्षितचा लेख स्वतःच्या आयुष्याची पुन्हा एकवार  उजळणी करणारा. देशातले, माहेरचे, अमेरिकेतले सासरचे  आणि बॉलिवूडमधल्या आरंभीच्या धडपडीचे व पुढल्या  यशाच्या शिखराचे... मराठी मध्यमवर्गातून पुढे येऊन राष्ट्रीय  पातळीवर गेलेल्या सुस्थितीतील व्यावसायिकतेचीही ही  मर्यादा आहे... दीपिका पदुकोनचा लेखही तिची  बॅडमिंटनमधली यशोगाथा सांगणारा. प्रथम जाहिरातक्षेत्रात, पुढे मॉडेलिंगच्या व्यवसायात आणि आताचे चित्रपटातील  भव्य-दिव्य वाटावेसे स्थान सांगणारा... सारे व्यक्तिगत.

त्यात बाकी फारसे काही नसणारा... पण आम्हा  आंबटशौकिनांना त्याचेही अप्रूप. इतरांचे प्रेम वा श्रीमंती पाहून समाधानी होण्याचा आमचा अल्पसंतुष्ट जीव... आपल्या सभोवतीची दैना आम्हाला न चाळवणारी. ती जिला  चाळवते ती अँजेलिना त्याचमुळे दूरची, तिकडची वाटायला  लावणारी. अशा वेळी पडणारा प्रश्न- यातले खरे कोण हा आणि  झालेच तर आपले कोण आणि आपण कुठे, हाही. अवतीभवतीच्या जगात आनंद पेरण्याची जबाबदारी  घेतलेल्या व ती व्यावसायिक यशाच्या संदर्भात चांगली कारकीर्द पार पाडून थांबणाऱ्यांची, की या आनंदाच्या खऱ्या  निर्मितीसाठी त्या जगातले दुःख, दारिद्र्य, हिंसा आणि त्या  साऱ्यांनी वाट्याला आणलेले निर्वासितपण संपविण्याचा  ध्यास घेऊन तेही काम आपलेच मानणाऱ्यांची? आपल्यातल्या कलावंतांचे मोठेपण आपण नेहमीच आदराचे  मानले. त्यांतल्या अनेकांच्या वाट्याला सन्मानाएवढीच  मिळकतही मोठी आली. त्यांची अंतःकरणे निदान  आपल्याहून जास्तीची मृदु, मऊ, तरल, लोकाभिमुख आणि  द्रवणारी असावीत, असेही आपण मानत आलो. तसे  त्यांच्यात काही अपवाद निघालेही. पु.ल. हा असा श्रेष्ठ व  आदरणीय अपवाद होता... पण बाकी साऱ्या क्षेत्रांतली अशी  मने निराशा करणारीच निघाली...

चित्रपट, संगीत, कला  यांसारख्या क्षेत्रांतील काहींना द्यावा लागणारा आयकरही  आपले डोळे दिपवणारा. त्यांचा पडद्यावरचा सेवेचा  अभिनयही आपल्या डोळ्यांत पाणी आणणारा... पण त्यात  अँजेलिना नाही, तिचे माणूस असणे नाही आणि तिच्या  कलेची सच्चाईही नाही... आमचे त्या क्षेत्रातले आदर्श हॉटेले काढणार, एखाद-दुसरी बालकवाडी काढून तिला आपले  नाव देणार वा आपल्या नावाची शिष्यवृत्ती सुरू करणार. अर्थात, त्याविषयीचे श्रेय आपण त्यांना देतही असतोच... अशा वेळी मनात येते ते एवढेच.. आपण अँजेलिना वाचायलाच नको होती. आपले आदर्श आपल्याला दिपवीत  आणि सुखवीत होतेच. आपणही त्यावर प्रसन्न होतो. आपल्या कर्तव्याच्या कुंपणांचे आखूडपणही मग आपल्याला  जाचत नव्हते. हे लिहून मी तरी काय साधत असेन? मी कलावंत नाही, धनवंत नाही. सेवाकार्याचा कोणताही स्पर्श माझ्या आयुष्याला नाही. तरीही हे सारे मनात का यावे? आणि यातून मी मिळवायचे काय? अनेकांचा राग, काहींचे शाप आणि काहींचे टोमणे... मग तू तरी काय करतोस, हा प्रश्न...

हे सारे  निरर्थक अर्थातच नाही. किमान त्याचे स्वागत करण्याएवढे  मला अंतर्मुख होता यावे. आपले लहानपण दाखविणारी, दुटप्पीपण उघडे करणारी आणि खोटेपण प्रकाशात आणणारी  माणसे कुणाला आवडतात? ती तसे मनात ठेवून काही करीत  नसली तरी आपल्या बाजूला उमटणारी आणि आपल्याहून मोठी असणारी जास्तीची सरळ रेषा कुणाला चालणार? मग तिचे वेगळेपण वा सरळपण, मोठेपण वा विलक्षण असणे  दुर्लक्षिणे हाच एक उपाय उरतो... माणसे मग तशीच  वागतात. हॉलिवूडची, बॉलिवूडची, सिनेातली आणि जगातली. हॉलिवूडचे सारेच जण अँजेलिनासारखे नाहीत. असणारही  नाहीत. तिच्या कामाची चर्चा तिथेही असावी तेवढी नाही. चर्चा  आहे आणि असते ती तिच्या अभिनयाची. चालणाऱ्या आणि  न चालणाऱ्या चित्रपटांची. तिच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची, आणि कधी झालीच तर ब्रॅड अन्‌ तिच्यात ‘असणाऱ्या’ वा ‘येऊ शकणाऱ्या’ वितुष्टाची...तेच साऱ्यांना भावत असावे. ते  आवडते म्हणून नाही, तर आपल्यासारखे असते म्हणून. अँजेलिनाचे जे आपल्यासारखे नाही, आपल्याहून वेगळे आणि  विलक्षण आहे ते जाळणारे आहे वा असते म्हणूनही आम्हाला  आमच्यासारखीच माणसे हवीत.  

एखाद्या जीवघेण्या घटनेने माणसाचे मन पालटल्याच्या  कथा खूप ऐकल्या, वाचल्याही. तशा पाहण्याने त्यांची आयुष्ये बदलल्याचेही पाहिले आणि वाचले. अनेक  सेवाभावी माणसांची आयुष्ये अशी बदलली आणि घडली. अँजेलिनाने तसे केले नाही. आपला ‘स्त्रीधर्म’ वा ‘गृहस्वामिनीचा धर्म’ तिने सोडला नाही. सिनेकामही सोडले नाही. ते तसेच जारी ठेवून ती या क्षेत्रात उतरली... म्हटले तर  ही दोन्ही कामे साऱ्या आयुष्याची मागणी करणारी आणि  त्यानंतरही न संपणारी. पण अँजेलिनाने आपले आयुष्य वाहून  घेतले आहे अभिनयाला आणि आपण ओढवून घेतलेल्या  जागतिक जबाबदारीलाही. ती दोन्ही कामे करते. त्यात व्यग्र  असते. ‘गिव्ह अन टू सीझर्स व्हॉट इज सीझर्स, ॲन्ड गिव्ह अन टू गॉड व्हॉट इज गॉड्‌स’ तसा ‘गिव्ह अन टू यू, व्हॉट इज  युवर्स ॲन्ड गिव्ह अन टू वर्ल्ड, व्हॉट इज वल्डर्‌स’ असा तिचा ताळेबंद आहे आणि तो तिला जमतो. त्यात ती न थकता रमतेही.

अशी माणसे खुणावतात, कौतुक करायला लावतात, रागही आणतात. आपल्याला न जमणारे त्यांना करता आले, याची एक असूयाही असते. त्यांना जमले ते त्यांच्यासारख्या इतरांना जमले नाही याची दुखरी खंत असते आणि  आपल्याला त्यातले काहीच करता आले नाही याचा  पराभवही असतो... अँजेलिनाचा मग राग येतो आणि  तिच्याबद्दल असूयाही मनात येते. ती नटी म्हणून मोठी की माणूस म्हणून, या प्रश्नाचा छळवाद मनात येतो. या  विचारचक्रात आपली माणसेही दिसतात. कलावंत, नामवंत, धनवंत, ज्ञानवंत... त्यांचे मोठेपण वा रिकामपण आणि त्या  रिकामपणात सजलेला त्यांचा पिटुकला आनंद...आता मनात येते- तो दिवाळी अंक मी वाचायलाच नको  होता. कशाला ओढवून घेतले त्यातून हे तापदायक अस्वस्थपण?

Tags: अँजेलिना जॉली सुरेश द्वादशीवार ब्रॅड पिट दीपिका पादुकोन रणबीर कपूर माधुरी दिक्षित सिनेमा दीपावली अंक रेफ्युजी निर्वासित कॅम्प हॉलिवूड तिचे जगणे स्वगत Hollywood Brad Pitt Refugee Camp Deepika Padukone Ranbeer Kapoor Madhuri Dixit Angelina Jolie Cinema Dipawali Ank Suresh Dwadshiwar Tiche Jagane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

सुरेश द्वादशीवार हे ज्येष्ठ पत्रकार-लेखक आहेत.


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा