डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

नानांची पहिली ओळख आहे ती गांधीबाबांचा सैनिक म्हणून. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी क्रांतिकारकाचा रोल बजावला. साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, एसेम जोशी यांच्या साथीने ते लढले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संगमनेर-अकोले परिसरात गरिबांचा वकील म्हणून त्यांची ख्याती झाली. राष्ट्र सेवादलाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. नानांचं व्यक्तिमत्त्व साने गुरुजींच्या जातकुळीतलं होतं. लोक म्हणूनच त्यांना ‘अहमदनगरचे साने गुरुजी’ म्हणून आजही संबोधतात.

वंचित बहुजनांची राजकीय आघाडी, ओबीसी, मुस्लिम, दलित यांची एकजूट हे शब्द सध्या सगळीकडे चर्चेत आहेत. पन्नास वर्षांपूर्वी संगमनेर (जि.अहमदनगर) शहरात या संकल्पनेचं सोशल इंजिनिअरिंग करून नगर परिषदेत मुस्लिम-दलित-ओबीसींना भास्करराव दुर्वे यांनी सत्ता मिळवून दिली होती. या प्रक्रियेत मुस्लिम कार्यकर्ता नगराध्यक्ष झाला होता. हे रोल मॉडेल समाजवादी पक्षाने स्वीकारलं असतं, तर आज इतिहास काही वेगळा दिसला असता.

आंबेडकरी चळवळ, समाजवादी चळवळ, कम्युनिस्ट चळवळ किंवा इतर पुरोगामी चळवळी यांनी हातात हात घालून राजकारणात काम करावं; यासाठी भास्करराव दुर्वे यांनी केवळ विचारच मांडले नाहीत तर प्रत्यक्ष तसा प्रयोग करून दाखवला. समाजवादी विचारांचं संगमनेर-अकोले परिसरात दुर्वे यांनी एक रोल मॉडेल विकसित केलं होतं. 

भास्करराव दुर्वे यांना लोक दुर्वेनाना म्हणत असत. दुर्वेनाना यांची (2019-20) जन्मशताब्दी पुढील वर्षभर आहे. दुर्वेनाना यांचे विचार पुढे नेण्यासाठी संगमनेरात स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान कार्यरत आहे. या ट्रस्टमार्फत नानांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्यात येत आहे. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष थोर विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे आहेत. सचिव साथी राजाभाऊ  अवसक आहेत. दुर्वेनानांचा जन्म 29 एप्रिल 1920 रोजी संगमनेर येथे झाला. त्यांना अवघं 59 वर्षांचं आयुष्य लाभलं. दि.13 डिसेंबर 1979 रोजी त्यांचं निधन झालं. 

नानांनी 59 वर्षांच्या अल्प आयुष्यात डोंगराएवढं कार्य करून ठेवलं. नानांची पहिली ओळख आहे ती गांधीबाबांचा सैनिक म्हणून. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी क्रांतिकारकाचा रोल बजावला. साने गुरुजी, अच्युतराव पटवर्धन, एसेम जोशी यांच्या साथीने ते लढले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संगमनेर-अकोले परिसरात गरिबांचा वकील म्हणून त्यांची ख्याती झाली. राष्ट्र सेवादलाच्या अहमदनगर जिल्ह्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. नानांचं व्यक्तिमत्त्व साने गुरुजींच्या जातकुळीतलं होतं. लोक म्हणूनच त्यांना ‘अहमदनगरचे साने गुरुजी’ म्हणून आजही संबोधतात. संयमी स्वभाव, पराकोटीचा सोशिकपणा, शेवटच्या माणसांविषयी टोकाची तळमळ, नैतिक जीवन आरशासारखं स्वच्छ, पारदर्शी वर्तन ते नाना जगले. 

त्या वेळच्या समाजवादी पक्षामार्फत नानांनी संगमनेर परिसरात समाजवादी समाजरचना साक्षर करण्याचे अभिनव समाजवादी रोल मॉडेल साकारलं होतं. वंचितांना सत्ता मिळवून देण्याचा प्रयोग नगरपालिकेत केला.  डॉ.बाबा आढाव यांच्याही आधी ‘एक गाव-एक पाणवठा’ चळवळ संगमनेर-अकोले परिसरात गावोगाव नेली-राबवली. अहमदनगर-नाशिक परिसरात दादासाहेब रूपवते, दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहकार्य करून आंबेडकरी-समाजवादी चळवळीला एक केलं. देशभर गाजलेल्या संगमनेर कॉलेजच्या शैक्षणिक प्रयोगाला नानांनीच पाठबळ दिलं. या कॉलेजचे प्राचार्य म.वि. कौंडिण्य हे नानांच्या प्रेरणेचा उल्लेख नेहमी करीत असत. विडी कामगार, धरणग्रस्त, आदिवासी, शेतकरी, अलुतेदार-बलुतेदार, भटके-विमुक्त यांचा नानांनी कैवार घेतला. 

लोकांसाठी अविरत झटणाऱ्या नानांना लोकांनी म्हणूनच खराखुरा नायक मानलं. डॉ.रावसाहेब कसबे यांनी महाराष्ट्रातला पहिला द्रष्टा समाजवादी नायक म्हणून दुर्वेनानांचा गौरव केला आहे. डॉ.कसबे म्हणतात, ‘‘सर्व जाती-धर्मांच्या गरिबांना सामाजिक अभियांत्रिकीच्या साह्याने संघटित करणारा नेता म्हणून दुर्वेनाना महान होते.’’ दुर्वेनाना कार्य संगमनेरात करत होते; पण जगभर, देशभर कोणत्या प्रकारचे वैचारिक टकराव चालू आहेत, याबद्दल सजग होते. ते उत्तम वाचक-अभ्यासक होते. साधना साप्ताहिकातून ते घडामोडी समजावून घेत. साधना साप्ताहिकाचे वाचक वाढले पाहिजेत, याबद्दल ते सतर्क असत. वैचारिक मार्गदर्शनासाठी ते साने गुरुजींशी पत्रव्यवहार करत. साधना गावोगाव पोचली पाहिजे, असा गुरुजींजवळ आग्रह धरीत असत. डॉ.राममनोहर लोहिया यांनी तुरुंग-फावडे, प्रबोधन आणि मतपेटी ही चतु:सूत्री समाजवादी चळवळीला दिली. नानांनी त्याचा नुसता प्रचार केला नाही, ती अमलात आणली. 

रचनात्मक संघर्ष या गांधीविचाराचे नाना क्रियाशील पुरस्कर्तेच बनले. मूर्तिमंत प्रतीक बनले. विडीकामगार संघटना, सहकारी संस्था, साने गुरुजी वाचनालय, पेमगिरी रस्त्याचं श्रमदान, मुदखेल येथील श्रमदानातून तयार झालेली पाणीपुरवठा योजना, साने गुरुजी सभागृहाची इमारत अशा किती तरी गोष्टी नानांनी साकार केल्या. ही सर्व विधायक कामं त्यांनी गरीब म्हणून बंडखोरीसाठी उभा राहावा, समाजवादी क्रांतीसाठी सज्ज व्हावा म्हणून केली होती. 

दुर्वेनानांचं आंबेडकरी चळवळीसोबतचं नातं आतड्याचं होतं, वरवरचं नव्हतं. 1956 मधील गोष्ट आहे. डिसेंबर महिना होता. रात्रीचे 11 वाजले होते. दादासाहेब रूपवते घरी येणार म्हणून नाना वाट पाहत बसले होते. दादासाहेब रूपवते बोर्डिंगमधील शिकत असलेल्या तीन-चार मुलांना घेऊन नानांच्या घरी गेले. दादासाहेब दुर्वेनानांना सांगतात, ‘‘बोर्डिंगमधील मुलांना कमी-जास्त लागलं तर लक्ष असू द्या. तुमच्याशिवाय मला इथं कोण आहे.’’ त्या मुलांना सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये अडचण पडे तेव्हा नाना मदत करीत. त्या-त्या वेळी भाजीपाला, अन्नधान्य पाठवून देत. नाना या मुलांना घरी बोलावत. त्यांची विचारपूस करीत. गाव, घरची परिस्थिती, अभ्यासातील प्रगती, आजार यांसंबंधी चौकशी करत. या मुलांमधील एक जण पुढे प्राचार्य झाले. प्राचार्य जी.व्ही.रूपवते. प्राचार्य रूपवते यांनीच नानांच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. 

सन 1934 ते 77 या 43 वर्षांत जी वैचारिक वादळं तयार झाली तिचे अपत्य दुर्वेनाना होते. 1941 पासून राष्ट्र सेवादल सैनिक, 1942 च्या भारत छोडो आंदोलनातील क्रांतिकारक, नंतर काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचा कार्यकर्ता असा नानांचा वैचारिक पिंड प्रगल्भ होत होता. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवादी विचार, सामाजिक न्याय, जातिनिर्मूलन या विचारांची शिदोरी घेऊन नाना संगमनेरात कार्यरत झाले, व्यवस्थेशी झगडत राहिले. दुर्वेनाना हे समाजवादी चळवळीतील दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी. या पिढीने मधू लिमये, बॅ.नाथ पै, मधू दंडवते, राजनारायण, कर्पुरी ठाकूर, भाई वैद्य असे तत्त्वनिष्ठ-कर्मनिष्ठ समाजवादी तरुण राष्ट्राला अर्पण केले होते. या पिढीतले भाई वैद्य हे दुर्वेनानांचे मेहुणे. नानांची बहीण नलिनीताई या भाई वैद्य यांच्या पत्नी. त्यामुळे पुण्यातील समाजवादी चळवळीशी नानांचं असं पारिवारिक नातंही होतं. 

दुर्वेनानांची जन्मशताब्दी त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी साजरी करायची, असा निर्णय साथी राजाभाऊ अवसक आणि त्यांच्या टीमने घेतला. दि.29 एप्रिलपासून कार्यक्रम सुरू झालेत. ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या ताम्रपट या कादंबरीला पंचवीस वर्षें पूर्ण झाली, त्यानिमित्ताने ‘साहित्य आणि राजकारण’ या विषयावर 5 मे रोजी परिसंवाद झाला. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागातील प्रा.डॉ.वंदना महाजन,  ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, ज्येष्ठ संपादक सदा डुम्बरे यांना वक्ते म्हणून निमंत्रित केले होते. सकाळी परिसंवाद आणि सायंकाळी रंगनाथ पठारे यांचा गौरवसोहळा पार पडला. या सोहळ्याला अभिनेते सयाजी शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. 

‘ताम्रपट’ या कादंबरीतील नाना शिरूर हे नायक पात्र दुर्वेनाना यांच्यावर बेतलेलं आहे. संगमनेरच्या राजकारणाचं चित्रण करणारी ही कादंबरी आहे. सत्तास्पर्धा, सहकारी संस्था, शिक्षण संस्था, दलितांचे प्रश्न, जातीयता आदी सर्व अंगांना ही कादंबरी स्पर्श करते. नैतिकता-व्यवहारवाद, उपजत शहाणपण आणि बुद्धिमत्ता, सोज्वळ सोशिकता आणि बनेल धूर्तपणा अशा गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचं चित्रण या कादंबरीत येतं. ही कादंबरी 1942 ते 79 पर्यंतचा राजकीय-सामाजिक पट पुरेशा विस्ताराने आणि समर्थपणे उलगडून दाखविते. 

रंगनाथ पठारे हे संगमनेर महाविद्यालयात भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी दुर्वेनानांना प्रत्यक्ष पाहिलेले आहे. संगमनेरचं राजकारण प्रत्यक्ष जवळून बघितलेले पठारे यांनी ताम्रपटच्या माध्यमातून एक विस्तृत राजकीय-सामाजिक पट मांडलाय. दुर्वेनाना जन्मशताब्दी निमित्ताने ताम्रपटवर चर्चा आणि पठारे यांचा गौरव म्हणूनच महत्त्वाचा ठरावा. नानांच्या जन्मशताब्दी निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात बालसंस्कार शिबिरे, तरुण कार्यकर्त्यांची प्रबोधन शिबिरे, विद्यार्थी मेळावे, समाजवादी कार्यकर्ता मेळावे, समाजवादी विचारापुढील आव्हानांवर चर्चा असे उपक्रम घेण्यात येत आहेत. दुर्वेनाना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यंदा 75व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. त्याविषयी तपशील नंतर जाहीर करण्यात येतील. दुर्वेनानांच्या जन्मशताब्दी वर्षात ठरलेले कार्यक्रम होतील. पण हा विचारांचा जागर करत असताना पुढे काय? 

दुर्वेनानांचं जीवन समजून घेतलं तर ते फक्त कर्मकांड ठरेल. आजच्या काळाची आव्हानं काय आहेत? नानांचं जीवन समजून घेतल्यावर ती आव्हानं स्वीकारण्याचं बळ नक्की येतं. जागतिक भांडवलशाही अधिक विकृत, भयावह रूप धारण करीत आहे. त्यामुळे मूठभरांची समृद्धी वाढतेय. बहुजन समाज दारिद्य्राच्या गर्तेत अधिकाधिक जात आहे. सबंध समाज बाजाराधिष्ठित बनलाय. मानव वस्तुरूप बनत आहे. केवळ अर्थव्यवस्था बाजाराधिष्ठित बनली ही छोटी बाब आहे; पण संबंध समाजव्यवस्थाच बाजाराधिष्ठित बनतेय. शिक्षण, आरोग्य इतकेच नव्हे तर संस्कृतीही खरेदी-विक्रीची वस्तू बनलेली आहे. जग आणि भारतापुढे हे नवे आव्हान उभे आहे. जेवढी संपत्ती वाढतेय तेवढी विषमताही फोफावतेय. श्रीमंतांच्या वाढत्या संख्येपेक्षा गरिबांची संख्या कैक पटीने वाढतेय. शेतकरी आत्महत्या, आदिवासी- बालकांच्या कुपोषणाची संख्या हे ढोबळ पुरावे आहेत. या अक्राळ-विक्राळ आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतातील सर्व डाव्या पुरोगामी शक्तींनी एकजूट करण्याची गरज आज नाना असते तर त्यांनी नक्की मांडली असती. 

पूर्ण रोजगार, शेतकरी- विशेषत: कोरडवाहू यांना शेती उत्पादनातून जीवननिर्वाहाची शाश्वती, जाती-विध्वंसन, बालवाडी ते उच्च शिक्षण मोफत, समान व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह, सर्वांना आरोग्यसुविधा या कार्यक्रमावर सर्व पुरोगामी डाव्यांनी एकजूट करण्याची आवश्यकता आहे. समाजवादी विरुद्ध साम्यवादी हा जुना वाद आता रशिया आणि चीनमधील बदलानंतर संदर्भहीन बनलाय. जाती-विध्वंसन हा अजेंडा अग्रक्रमाचा बनवला पाहिजे. या अजेंड्यावर काम करणे म्हणजेच दुर्वेनानांच्या विचारांचा जागर करणे होय. द्वेषाच्या राजकारणावरचा दुर्वेनानांचा उतारा होता प्रेमाचा जागर करण्याचा. 

माणुसकीच्या पेरणीला त्यांनी सर्वांत जास्त महत्त्व दिलं. म्हणून आजही संगमनेरात हिंदू-मुस्लिम वाद उद्‌भवत नाही. द्वेष करणाऱ्या संघटना, पक्ष तिथं वाढत नाहीत; कारण नानांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, सर्वसमावेशकता, सहिष्णुता या बीजांची पेरणी केलेली आहे. त्याला समाधानकारक पीक आलं नाही म्हणून काय झालं; बीज अजून मेलेलं तर नाही ना? नानांसारख्या खऱ्या नायकाने पेरलेली बीजं सहजासहजी मरत नसतात, त्यांना एक ना एक दिवस कोंब फुटणारच असतो. पीक येणारच आहे, शेत फुलणारच आहे!
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजा कांदळकर,  मुंबई, महाराष्ट्र
rajak2008@gmail.com

पत्रकार 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा