डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

म्हसवडपासून तीन किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर या चाराछावणीचा परिसर पाहून अक्षरशः डोळे विस्फारतात. मोठी 6590 आणि लहान 1212 अशी एकूण 7802 जनावरं या छावणीत आहेत. पाण्याचे सहा टँकर तिथं सदैव चालू असतात. चारावितरणासाठी तब्बल 17 वजनकाटे आहेत. छावणीत गुरांना पाणी पाजताना माणसं दिसतात. सुट्टी असल्यानं लहान मुलंही इथंच आली आहेत. काही कॅरम खेळत आहेत. फक्त गुरंच नाहीत तर शेरडं, कोंबड्या असं सगळंच इथं दिसतं. 80 वर्षांच्या यमुनाबाई सूर्यवंशी आहेत आणि सात-आठ वर्षांचा संतोषही आहे. यमुनाबार्इंच्या खोपीसमोर गेल्यानंतर त्या गांगरून गेलेल्या दिसतात. काही तरी हुडकतात, पण लवकर सापडत नाही. त्या काय शोधत असाव्यात, असा प्रश्न पडतो. 

सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजचा हिरवागार परिसर. जागोजागी पाणी खेळताना दिसतं. एवढ्या कडकडीत उन्हातही डोळ्यांना निवणारा गारवा दिसू लागतो. समृद्धीच्या खाणाखुणा शिवारात जागोजागी दिसू लागतात. वेळापूर-साळमुख ओलांडल्यानंतर पिलीव येतं आणि आपण पिलीवला मागे टाकून म्हसवडच्या दिशेने निघतो, तेव्हा दोन्ही बाजूंनी विस्तीर्ण असा माळ पसरलेला दिसू लागतो. सगळीकडे एक प्रकारचा रुक्ष असा पांढुरकेपणा. डोळ्यांना खुपणाऱ्या उन्हात हे पांढरेपण आणखीच गवताच्या कुसळासारखं टोचू लागतं. डोंगरमाथ्यावरून दिसणाऱ्या पवनचक्क्या तेवढ्या अधून-मधून फिरताना दिसतात.

शेतातून पिकं निघालेली असतात, तेव्हा ती शेतं मोकलली जातात आणि काढलेल्या पिकांच्या खाणाखुणा दिसू लागतात. इथं तर तसंही नाही. काही म्हणजे काहीच नाही. कोणत्याही काढलेल्या पिकाचा ठावठिकाणा नाही. चुकार शेरडं तेवढी चरताना दिसतात. हातात एखादी काठी घेऊन त्या शेरडांना राखणारी माणसं काही अंतरावर दिसतात. कुठं कुठं शेरडांचे खांड नजरेला पडतात. ती राखणाऱ्यांच्या डोक्यावर उन्हापासून बचाव करण्यासाठी गुंडाळलेलं फडकं दिसतं. एके ठिकाणी सावलीसाठी लोखंडी टोपलं डोक्यावर धरणारी बाई दिसली. बहुधा कुठं तरी शेरडांना पाणी शेंदून पाजण्यासाठी हेच टोपलं कामी येत असावं. वाळलेल्या झाडाझुडपांनी व्यापलेले डोंगर आणि त्यांचे उघडे-बोडके माथे. अशा साऱ्या सुनसान वातावरणात भर दुपारी सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये प्रवेश केला, तेव्हा ‘माणदेशी फाउंडेशन’च्या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी फार शोधाशोध करावी लागली नाही. अतिशय आकर्षक पद्धतीचं बांधकाम असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर माणदेशी महिला सहकारी बँक आहे, तर पहिल्या मजल्यावर माणदेशी फाउंडेशनचं मुख्य कार्यालय आहे.

ग्रामीण महिलांना व्यवसायाचं प्रशिक्षण देणारं केंद्र- माणदेशी उद्योगिनी- माणदेशी चेंबर ऑफ कॉमर्स, माणदेशी एफएम तरंग वाहिनी, माणदेशी चॅम्पियन असे वेगवेगळे विभाग या इमारतीत आहेत. हे सारं  साम्राज्य उभं करणाऱ्या महिलेचं नाव चेतना-गाला सिन्हा. मुंबईत शिकलेल्या-वाढलेल्या चेतनाताई जयप्रकाश नारायण यांच्या संघर्ष वाहिनीशी जोडल्या. याच चळवळीत त्यांना विजय सिन्हा हे जोडीदार मिळाले. मग त्या म्हसवडला स्थायिक झाल्या. सुरुवातीला त्यांनी महिलांचे बचत गट बांधायला प्रारंभ केला. हळूहळू हे जाळं वाढत गेलं. आज माणदेशी महिला सहकारी बँकेच्या ठेवींनी 98 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि कर्जवाटप आहे 68 कोटींचं. या बँकेच्या शाखा म्हसवडसह गोंदवले, दहिवडी, वडूज, लोणंद, धायरी, कामोठा या ठिकाणी आहेत.

चेतना सिन्हा बाहेरगावी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांच्या सहकारी वनिता जालिंदर पिसे यांनी माणदेशी फाउंडेशनच्या सर्व उपक्रमांची माहिती फिरून दाखवली. या भागातील सर्वांत मोठी चाराछावणी माणदेशी फाउंडेशनच्या वतीने चालवली जाते. म्हसवडपासून तीन किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर या चाराछावणीचा परिसर पाहून अक्षरशः डोळे विस्फारतात. मोठी 6590 आणि लहान 1212 अशी एकूण 7802 जनावरं या छावणीत आहेत. पाण्याचे सहा टँकर तिथं सदैव चालू असतात. चारावितरणासाठी तब्बल 17 वजनकाटे आहेत. छावणीत गुरांना पाणी पाजताना माणसं दिसतात. सुट्टी असल्यानं लहान मुलंही इथंच आली आहेत. काही कॅरम खेळत आहेत. फक्त गुरंच नाहीत तर शेरडं, कोंबड्या असं सगळंच इथं दिसतं.

80 वर्षांच्या यमुनाबाई सूर्यवंशी आहेत आणि सात-आठ वर्षांचा संतोषही आहे. यमुनाबार्इंच्या खोपीसमोर गेल्यानंतर त्या गांगरून गेलेल्या दिसतात. काही तरी हुडकतात, पण लवकर सापडत नाही. त्या काय शोधत असाव्यात, असा प्रश्न पडतो. मग जरा वेळानं एक वस्तू त्यांच्या हाती लागते. तो असतो कुंकवाचा करंडा. मग कुंकवाचे दोन बोट कपाळाला लावून त्या खोपीच्या तोंडाला येतात. ‘स्वयंपाक करून खाता, का जेवण घेऊन येतं कुणी?’ असं विचारल्यावर, त्या खोपीतच एका बाजूला असलेली चूल दाखवतात. ‘‘जनावरं दूध देतात, ते डेरीला घालतो. घरी कोनी न्हाई. सम्दं आणलंय गोळा करून. पानीच नाही, तर बाकीचं काय असून नसल्यासारखंय. माणसाला प्यायला येतं टँकरचं पानी. चार-पाच दिवसाला एकदा.’’ असं त्या सांगतात.

बाजूच्याच खोपीत जयकुमार सूर्यवंशी  हे यमुनाबाईचे पती आहेत. त्यांनी सांगितलं, ‘‘सहा महिन्यांपासून पंधरा जनावरं घेऊन आलोय.’’ दोघंही नवरा-बायको इथंच राहतात. ‘जमीन किती आहे?’ असं विचारल्यावर उत्तर आलं... ‘‘चाळीस एकर!’’ बाजूच्या चारायंत्राच्या खडखड आवाजात हा आवाजही विरून जातो. सुरवा बाबा वीरकर ही महिला सांगते, ‘‘घरच्या रानात दोन हिरी हायती. जुंधळा, बाजरी, मका, कांदा अशी पिकं आम्ही घेतो. पाच-सहा एकर बागायती जमीन हाय की, पण पानी नसल्यानं सगळी रया गेली. पान्यानंच इथंवर आणलंय.’’ इथं माणसं भाकरतुकडा मोडताहेत, बाया धुणं धूत आहेत, लहान मुलं खेळत आहेत... सारं जणू एखाद्या गावासारखंच. ही छावणी म्हणजे काही महिन्यांसाठी वसलेलं एखादं गावच!

विजय सिन्हा या छावणीत भेटले. गेल्या पाच महिन्यांपासून ही छावणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दि.1 जानेवारी ते 1 एप्रिल या कालावधीत बजाजनं सहकार्य केलं. एक एप्रिल ते नऊ मेपर्यंत माणदेशी फाउंडेशननं ही छावणी चालवली आणि आता सरकारनं  अनुदान द्यायचं ठरवलंय, अशी माहिती ते देतात. पार आटपाडी, माळशिरस, सांगोला या भागातली जनावरं इथं आलीत. या छावणीत जनावरांची सोय जास्त होते, म्हणून जनावरं घेऊन येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. ‘शासन एका जनावराला दररोज 400 ग्रॅम पेंड देतं, आम्ही एक किलो देतो. सरकार 18 किलो चारा प्रति जनावराला द्या म्हणतं, आम्ही 20 किलो देतो. गतवर्षी तर आमच्या छावणीत 14000 जनावरं होती,’ असंही विजय सिन्हा सांगतात. ‘लोकसभेच्या निवडणुकीत पुढाऱ्यांनी अनेक ठिकाणी छावण्यांमध्ये जाऊन प्रचार केला, पण आमच्याकडं इथं पुढाऱ्यांना प्रवेश नव्हता, ना कुठला झेंडा लावायला आम्ही कुणाला परवानगी दिली. सरकारनं आता शेळ्यांसाठीही छावण्यांना परवानगी दिलीय, पण आमच्या छावणीत 1000 शेळ्या तुम्हाला आताही दिसतील. शेळ्यांसाठी सुरू झालेली ही पहिलीच चाराछावणी आहे. दोन किलो मूरघास, एक किलो कडबाकुट्टी किंवा एक किलो मका या तिन्हीपैकी एक आम्ही देतो,’ असंही सिन्हा म्हणाले.

विजय सिन्हा यांचं मूळ नाव विजय गुरव. एकदा चुकून त्यांचं नाव विजय सिन्हा असं छापून आलं आणि पुढे तेच त्यांनी धारण केलं. शेतकरी संघटनेतही त्यांनी काम केलंय. ‘एकदम संघर्षाचा मार्ग सोडून इकडं कसे वळालात?’ असं त्यांना विचारलं. तेव्हा ते म्हणाले, ‘‘संघटनेची गरज केव्हाच संपली होती आणि एखादी चळवळ बळेच चालवण्यात अर्थ नसतो.’’ एक मात्र खरं की, या छावणीत अन्य छावण्यांपेक्षा वेगळं वातावरण होतं. बाकी छावण्यांमध्ये गुरांमुळे अडकून पडलेली माणसं दिसतात. त्यांची अगतिकता दिसते. इथं एखाद्या नव्याच गावात रुळल्यासारखा माणसांचा वावर होता. कृश सावल्यांमध्ये खपाटीला पोटं गेलेली जनावरं इतरत्र दिसली. इथं ते चित्रं नव्हतं. आपापल्या जनावरांच्या शेजारीच माणसांनी संसार थाटलेले होते. जणू जितराबांसाठीच हे गाव वसलं होतं. पाऊस सुरू होईल आणि काही महिन्यांसाठी वसलेलं हे गाव पुन्हा उठेल. लोक आपापल्या गावी परतू लागतील.   

Tags: Drought Asaram Lomate दुष्काळ आसाराम लोमटे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आसाराम लोमटे
aasaramlomte@gmail.com

पत्रकार व लेखक.  आसाराम लोमटे यांचे आलोक (कथासंग्रह), इडा पिडा टळो (कथासंग्रह),धूळपेर (लेखसंग्रह) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६) मिळाला आहे. 


प्रतिक्रिया द्या