डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

सोनिया गांधींनी इब्न खल्दून का वाचायला हवा?

‘काँग्रेसने घराणेशाहीला रामराम ठोकायला हवा’ असे ट्वीट मी केल्यानंतर, उत्तर प्रदेशातील माझे लेखक मित्र अनिल माहेश्वरी यांनी मला चौदाव्या शतकातील महान अरबी विचारवंत इब्ने खल्दूनच्या लेखनातील एक भला मोठा उतारा पाठवला. इब्न खल्दून मांडणी करतो की, ‘राजकीय घराणेशाहींना शक्यतो तीन पिढ्यांनंतर आपला प्रभाव आणि विेशासार्हता टिकवून ठेवता येत नाही.’ याबाबत तो म्हणतो, ‘आपली कीर्ती प्रस्थापित करण्यासाठी चुकवाव्या लागलेल्या किमतीची कर्त्या पुरुषाला पूर्ण कल्पना असते.’ त्यामुळे आपली कीर्ती टिकविण्यासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्ये तो आपल्या अंगी बाणवतो. त्याच्यानंतर (गादीवर) आलेल्या त्याच्या मुलाला वडिलांचा व्यक्तिगत सहवास लाभलेला असल्यामुळे, तो या सर्व गोष्टी त्यांच्याकडून शिकतो. मात्र प्रत्यक्ष अनुभव आणि व्यवहारिक उपयोगातून शहाणपण आलेली व्यक्ती आणि केवळ पुस्तकी किंवा ऐकीव ज्ञान मिळवणारी व्यक्ती यांमध्ये गुणात्मक फरक आढळतो, त्याच अर्थाने (घराणेशाहीत) मुलगा वडिलांहून कमी कर्तबगार निपजतो.’ 

केंद्रात काँग्रेसची सत्ता होती आणि सार्वत्रिक निवडणुकांना वर्षभरापेक्षा जास्त कालावधी शिल्लक होता तेव्हा, जानेवारी 2013 मध्ये टेलिग्राफच्या अंकात मी राहुल गांधी यांच्यावर एक स्तंभ लिहिला होता. त्यात लिहिले होते की, ‘राहुल गांधींमधील सर्वांत चांगली बाब म्हणजे ते सद्‌हेतू असणारे एक हौशी व्यक्ती (dilettante) आहेत. त्यांच्या ठायी कुठल्याच प्रशासकीय क्षमता दिसल्या नाहीत, मोठ्या व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेण्याची इच्छा त्यांनी कधी दाखवलेली नाही, आणि गंभीर सामाजिक समस्या सोडविण्याची ऊर्जा व कटिबद्धताही त्यांच्यात दिसत नाही.’ 

पुढे म्हटले होते की, ‘राहुल गांधी जर कॉलेजमध्ये असते, खाजगी क्षेत्रात नोकरी करत असते किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय करत असते, तर त्यांच्या स्वभावातील हा हौशीपणा कदाचित महत्त्वाचा ठरला नसता. मात्र देशाच्या सर्वांत मोठ्या आणि आजही सर्वांत प्रभावशाली असणाऱ्या पक्षाचा उपाध्यक्ष, भावी अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचा भावी उमेदवार असणाऱ्या व्यक्तीला स्वभावातील हा हौशीपणा नक्कीच मारक ठरतो.’ माझा तो लेख काँग्रेस पक्षाशी घनिष्ट संबंध असणाऱ्या एका कार्यकर्त्याने वाचला. तेव्हा त्याने मनोरंजक खुलासा करणारी गोष्ट मला सांगितली. 

राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उचलून धरला होता, त्यामुळे संपुआने 2009 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी (civil society activists) राहुल गांधींना ग्रामीण विकास मंत्री होण्याची विनंती केली होती. त्यामुळे आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रशासकीय अनुभव त्यांना मिळवता आला असता. मात्र त्यांनी या सल्ल्याला केराची टोपली दाखवली. याबाबत काही कारणे देण्यात आली नसली तरी, ‘आपला मुलगा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये थेट पंतप्रधान म्हणूनच कार्यभार स्वीकारेल,’ असा विश्वास काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा असलेल्या त्यांच्या मातोश्रींना वाटत होता, असा तर्क आहे. 

या तर्कांना बळ मिळाले ते तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या एका वक्तव्यामुळे. सप्टेंबर 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, ‘2014 च्या निवडणुकीनंतर राहुल गांधी हेच पंतप्रधानपदासाठी आदर्श पर्याय असतील’. ते पुढे म्हणाले, ‘राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये काम करण्यास मला अतिशय आनंद वाटेल.’ 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यामुळे डॉ.सिंग यांची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. या निवडणुकीत काँग्रेसला जवळपास 160 जागा गमवाव्या लागल्या. त्याच महिन्यात ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचा केवळ 20 जागांवर पराभव झाला, तरीही त्यांचे नेते मिलिबँड यांनी तत्काळ राजीनामा दिला. मात्र भारतीय लोकशाही ज्या तथाकथित प्रारुपावर आधारित असल्याचे बोलले जाते, त्या वेस्टमिनिस्टर प्रारूपापासूनही (Westminster model) आता पुरती ढळली आहे. निवडणूक प्रचाराचा चेहरा असणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या उपाध्यक्षाला त्या पराभवानंतर अध्यक्ष केले गेले. 

आता राहुल गांधींचे नेतृत्व पक्षाला सार्वत्रिक निवडणुकांमधील सलग दुसऱ्या पराभवाकडे घेऊन गेले आहे. मग काँग्रेसने आता काय केले पाहिजे? ते नवीन अध्यक्षाची शोधाशोध करतील? गांधी कुटुंबीयांपलीकडे ते विचार करू शकतील काय? मी या प्रश्नांकडे येतोच, मात्र तत्पूर्वी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत दुसऱ्या बाजूचे म्हणजेच विजेत्यांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याबद्दल मला काही बोलायचे आहे. अनेक लेखकांनी नोंदवलेल्या निरीक्षणाप्रमाणे, जरी विद्रोही (insurgent) म्हणवत नरेंद्र मोदींनी जमातवादी अभिमान (sectarian pride) दूर लोटून विकासाच्या मुद्यावर प्रचार केला असला तरी त्यांनी एका बाजूला राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्याला अग्रभागी ठेवले तर जोडीला हिंदुत्ववादी बहुसंख्यांकवादालादेखील चुचकारले आहे. 

मात्र त्यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी राबविलेल्या प्रचारात एक ठळक साम्य  होते. 2014 मध्ये मोदींनी ‘नामदार’ म्हणजे कुटुंबीयांच्या नावामुळे ओळखला जाणारा, असे म्हणत राहुल यांची खिल्ली उडवली. स्वतःसाठी मात्र त्यांनी ‘कामदार’ अर्थात देशासाठी आणि आपल्या लोकांसाठी झटणारा ‘कर्मवीर’ अशी उपाधी वापरली. ते बालपणी ‘चायवाला’ म्हणजे चहाविक्रेता होते, असा दावा त्यांनी केला. त्यांचा मुख्य विरोधक मात्र सुखवस्तू कुटुंबात जन्मलेला असून, त्या कुटुंबाची चौथी (किंवा पाचवी म्हणता येईल) पिढी राज्य करत असल्याचे सांगितले गेले. 2019 च्या अध्यक्षीय प्रचारातही त्यांनी अतिशय हुशारीने मतदारांना सवाल केला, तुम्हाला मेहनती कामदार हवा की राहुल नामदार? 21 मे 2019 रोजी scroll.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखात सुप्रिया शर्मा लिहितात, ‘मी दौरा केलेल्या बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या मोठ्या राज्यांमध्ये विद्यमान पंतप्रधानांची प्रचंड लोकप्रियता कायम असून, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच भाजपला मत देणार असल्याचे बहुतांश मतदारांनी सांगितले.’ 

शर्मा पुढे लिहितात की, ‘राहुल गांधींच्या नेतृत्वाला मत देईल असा एकही मतदार या चारही राज्यांमध्ये मला सापडला नाही.’ त्यानंतर दोनच दिवसांनी आलेल्या निकालातून हीच बाब समोर आली. एका आकडेवारीनुसार 188 जागांवर भाजप आणि काँग्रेस (मोदी आणि राहुल) यांच्यात थेट लढाई होती, त्यांपैकी तब्बल 174 जागांवर भाजप किंवा मोदी यांनी विजय मिळवला. काँग्रेसचा हा लागोपाठ दुसरा पराभव आधीच्या अपयशापेक्षा अधिक मानहानीकारक ठरला असेल. विशेष म्हणजे काँग्रेस परिवारात राहुल गांधी हे एकमेव व्यक्ती असावेत, ज्यांच्याकडे या कामगिरीचे उत्तरदायित्व होते. त्यामुळे त्यांनी आपला राजीनामादेखील सादर केला. साहजिकच काँग्रेस कार्यकारी समितीने तो ‘एकमताने’ फेटाळला. 

दरम्यान, दिल्लीतील काँग्रेसधार्जिणे विचारवंत मात्र ‘राहुल गांधी हे नेहरूंच्या इहवादी विचारांचा (secularism) वारसा चालवणारे एकांडे शिलेदार आहेत’ असे भासवणारी कवने लिहिण्यात व्यस्त होते; केवळ घराणेशाहीच समस्या नाही, हे पटवून देण्यासाठी दिल्लीतील इंग्रजी भाषिक पत्रकार जगन रेड्डी आणि नवीन पटनायक यांच्या विजयाचा दाखला देत होते. मात्र, राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदावरून होणाऱ्या पायउताराला सर्वाधिक विरोध केला तो खुद्द त्यांच्या मातोश्रींनी. कुटुंबाबाहेरील कुण्या व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करण्याबाबत त्या अजिबात अनुकूल नाहीत, असे वाटते. 

‘काँग्रेसने घराणेशाहीला रामराम ठोकायला हवा’ असे ट्वीट मी केल्यानंतर, उत्तर प्रदेशातील माझे लेखक मित्र अनिल माहेश्वरी यांनी मला चौदाव्या शतकातील महान अरबी विचारवंत इब्ने खल्दूनच्या लेखनातील एक भला मोठा उतारा पाठवला. इब्न खल्दून मांडणी करतो की, ‘राजकीय घराणेशाहींना शक्यतो तीन पिढ्यांनंतर आपला प्रभाव आणि विश्वासार्हता टिकवून ठेवता येत नाही.’ याबाबत तो म्हणतो, ‘आपली कीर्ती प्रस्थापित करण्यासाठी चुकवाव्या लागलेल्या किमतीची कर्त्या पुरुषाला पूर्ण कल्पना असते.’ त्यामुळे आपली कीर्ती टिकविण्यासाठी आवश्यक असणारी गुणवैशिष्ट्ये तो आपल्या अंगी बाणवतो. त्याच्यानंतर (गादीवर) आलेल्या त्याच्या मुलाला वडिलांचा व्यक्तिगत सहवास लाभलेला असल्यामुळे, तो या सर्व गोष्टी त्यांच्याकडून शिकतो. मात्र प्रत्यक्ष अनुभव आणि व्यवहारिक उपयोगातून शहाणपण आलेली व्यक्ती आणि केवळ पुस्तकी किंवा ऐकीव ज्ञान मिळवणारी व्यक्ती यांमध्ये गुणात्मक फरक आढळतो, त्याच अर्थाने (घराणेशाहीत) मुलगा वडिलांहून कमी कर्तबगार निपजतो.’ 

आपली कीर्ती आणि स्थैर्य टिकवून ठेवणे दुसऱ्या पिढीला शक्य होत असले तरी पुढे परिस्थिती ‘जैसे थे’ राहत नाही. याबाबत इब्न खल्दून लिहितो की, ‘तिसरी पिढी अनुकरण करण्यात धन्यता मानते आणि परंपरेवर अवलंबून राहते. स्वतःची निर्णयक्षमता असणाऱ्या व्यक्तीपेक्षा, अंधपणे परंपरांचे अनुकरण करणारी व्यक्ती जशी गौण ठरते, अगदी तशीच, तिसरी पिढी आपल्या आधीच्या पिढीपेक्षा कमी कर्तबगार ठरते. चौथी पिढी तर आपल्या आधीच्या पिढ्यांपेक्षा सर्वच बाबतीत गौण ठरते. कारण या पिढीचा सदस्य घराण्याची कीर्ती टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असणारे गुण गमावून बसतो. घराण्याची ही कीर्तीरूपी इमारत, परिश्रम आणि उपयोजना यातून निर्माण झाली नसल्याचा समज तो करून घेतो. सामूहिक प्रयत्न आणि व्यक्तिगत गुणवैशिष्ट्यांमुळे नव्हे तर आपल्या (उच्चकुलीन) वंशाच्या प्रभावामुळे हे वैभव मिळाले असे त्याला वाटते.’
 
राजकीय घराणेशाहीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या पिढीतील व्यक्तींच्या समस्यांवर भाष्य करताना इब्न खल्दून म्हणतो, ‘जनतेकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आदर असला तरी हे प्रेम येते कुठून, त्याची कारणे काय, आदींची कल्पना तिसऱ्या व चौथ्या पिढीला नसते. त्यांना वाटते की, आपण आहोत मुळी जनतेचा आज्ञाधारकपणा कायम गृहीत धरण्यासाठीच...’ चौथ्या किंवा पाचव्या पिढीपर्यंत गेलेली राजकीय घराणेशाही स्वतःच्या अधःपतनाची बीजे रोवते, असे निरीक्षण इब्न खल्दून नोंदवतो. कारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीकडून मिळालेल्या किर्तीबद्दल रयतेच्या मनात असलेल्या आदराला मोठ्या प्रमाणात उतरती कळा लागते आणि मग चौथ्या पिढीतील नेते नामदार म्हणून हिणवले जावू लागतात. त्यामुळे, ज्यांच्या (नवनेतृत्वाच्या) गुणवत्तेची खात्री त्यांना पटते त्या नेत्याकडे किंवा वंशाकडे ते आपले (राजकीय) ‘नेतृत्व’ देतात. 

जगन आणि नवीन यशस्वी झाले असताना राहुल अपयशी का ठरले, हे समजून घेण्यासाठी इब्न खल्दून आपल्या मदतीला येतो. घराणेशाहीतील त्या दोघांचीही ही दुसरी पिढी असून, त्यांनी आपल्या वडिलांच्या कर्तबगारीचा अनुभव घेतला आहे. इंदिरा गांधींबाबतही असेच म्हणता येईल. त्या जवाहरलाल नेहरूंच्या सहवासात वाढल्या व स्वातंत्र्य लढ्यातील मूल्ये त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. त्यामुळेच आपला मुलगा किंवा नातवापेक्षा त्या अधिक विश्वासू आणि प्रभावी नेत्या म्हणून नावारूपाला आल्या. काँग्रेस पक्षातील प्रत्येकाने आणि विशेषतः सोनिया गांधी यांनी इब्न खल्दूनचे ही मांडणी वाचायला आणि आत्मसात करायला हवी. आई असल्यामुळे त्यांना आपल्या मुलासाठी या स्तंभलेखकाने वापरलेले, ‘सद्‌हेतू असणारा एक हौशी’ हे विशेषण कदाचित रूचणार नाही. 

पण राहुल (प्रस्तुत लेखक समजतो त्यापेक्षा) अधिक हुशार, अधिक उत्साही आणि राजकीय दृष्ट्या चाणाक्ष असतील तरी, इतिहास आणि समाजशास्त्रे त्यांच्या विरोधात जाणारी आहेत. कारण चौथ्या किंवा पाचव्या पिढीतील घराणेशाही जर मध्ययुगीन कालखंडातील सरंजामी अरबस्तानच्या पचनी पडत नव्हती, तर भारतासारखा आधुनिक आणि लोकशाहीवादी देश याहून वेगळा विचार का करेल? 

(अनुवाद : समीर दिलावर शेख)      
 

Tags: इब्न खल्दून घराणेशाही सोनिया गांधी समीर शेख रामचंद्र गुहा sameer shaikh Rahul Gandhi Soniya Gandhi ibn khaldun Ramchandra Guha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन केले आहे 


प्रतिक्रिया द्या