डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

आपणाला फारसे किंवा अजिबात माहीत नाही फार मोठा माणूस, मोठा कवी...

मला राहवले नाही. भटांना म्हटले, ‘‘देवधर राजीवशी बोलले तर ही अट लगेच बदलेल किंवा देवधर हे ऑटो इलेक्ट्रिकचे सर्वेसर्वा आहेत. हे त्या सचिवाला सांगितले तरी हे काम कदाचित होईल.’’ त्या वेळी भट मला जे म्हणाले, ते सांगावेसे वाटते- भट-देवधर ही माणसे कोणत्या मातीची बनलीत, ते समजावे म्हणून. भट म्हणाले, ‘‘दाभोळकर, पैसे देऊन, लाच देऊन काम करून घेणे आणि ओळख काढून, ओळख वापरून काम करून घेणे यात नैतिक दृष्ट्या काहीही फरक नाही. आज काही शे कोटी रुपये मिळतात, त्याऐवजी काही हजार कोटी रुपये मिळवून काय करायचंय? आपण काही दिडक्या कमवायला जन्माला आलेलो नाही. या देशात संपत्ती निर्माण करायची, या देशातील रचना कार्यक्षम, प्रामाणिक, पारदर्शक बनवायची हे खरे आव्हान आहे. मी आणि देवधरांनी ओळखी काढून, ओळखी वापरून आपले काम करून घ्यावे, हे तुमचे सांगणे भयंकरच आहे!’’

आपले मित्र, मित्रांबरोबर होणाऱ्या गप्पा किंवा चर्चा, आपले विचार, चिंतन, मनन- खरं तर आपण या बंदिस्त वर्तुळात नकळत फिरत असतो. माझीच गोष्ट सांगतो. मी आयुष्यातील चाळीस वर्षे फक्त भारतात राहून संशोधनक्षेत्रात काढली. वेगवेगळ्या संशोधनक्षेत्रांचा अनुभव घेतला. शेवटी वैतागून एक लेख लिहिला- ‘भारतातील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ- नवनिर्माते की झारीतील शुक्राचार्य?’- ते राहू दे. लेख वाचून जयंत नारळीकरांचे मला एका ओळीचे पत्र आले, ‘तुमच्या मताशी मी सहमत आहे!’

मी जे लिहिले, त्यामागे प्रचंड अपेक्षाभंग आणि निराशा होती. वेदनादायी अनुभव होते. सीबासारख्या बहुराष्ट्रीय औषधी कंपनीने 1962 मध्ये भारतात आशियातील सर्वांत मोठी अशी संशोधन संस्था गोरेगावला उभी केली. पंडित नेहरूंनी तिचे उद्‌घाटन केले. सर्व सोईसुविधा, खूप चांगले पगार. नंतर लक्षात आले- भारतात सर्व गोष्टी स्वस्त म्हणून ते भारतात संशोधन करायचे. एका टप्प्यावर ते संशोधन परदेशात घेऊन जायचे. देशाचा संशोधन-क्षेत्रातील फायदा शून्य!

सरकारने सर्व उद्योगधंद्यांना प्रयोगशाळा काढण्यासाठी पैसे दिले. संशोधनावर जो खर्च कराल, त्याच्या दीडपट- दुप्पट आयकरात सूट दिली; पण त्या वेळी या देशात या  उद्योगधंद्यांना स्वदेशीच्या नावाखाली स्पर्धा नव्हती. एकदा परवाना मिळाला की, मक्तेदारी मिळाली. मग या देशात कमी प्रतीचा, हलक्या प्रतीचा माल पाहिजे त्या चढ्या दराने विकायला हे उद्योगधंदे मोकळे झाले. त्यांना वस्तूची गुणवत्ता वाढवायला वा किंमत कमी करायला संशोधन अजिबात नको होते. त्यांना फक्त आयकरात प्रचंड कपात करून घेण्यासाठी संशोधन केले असे कागदावर दाखवायचे होते. आपल्या अंतरिक्ष विभागाचे आणि मंगळयान वगैरे सोडण्याचे वारेमाप कौतुक करताना आपणाला माहितीही नसते की, मंगळावर यांत्रिक करामती करणारे ‘व्हायकिंग’ अमेरिकेने 1977 मध्ये मंगळावर उतरवलंय. पण अमेरिकेचे असू दे; आपल्यानंतर अंतरिक्ष विभागात उतरलेला चीन अनेक योजने आपल्यापुढे आहे. आपण अगदी युद्धपातळीवर उतरून जैतापूरच्या अणुप्रकल्पाची चर्चा केली. आपण या प्रकल्पात अतिप्रचंड किंमत देऊन फ्रान्सकडून अठरा वर्षांत एकूण 9,900 मेगावॉट विद्युत्‌शक्ती असलेल्या सहा अणुभट्‌ट्या बसवणार आहोत. चर्चेत कुणी चुकूनही विचारले नाही- या अणुभट्‌ट्या, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतर भारतात का बनत नाहीत?

पंडित नेहरूंनी 1948 मध्ये ‘अणुशक्ती आयोगा’ची स्थापना केली. लोकशाहीवर विलक्षण प्रेम असणाऱ्या नेहरूंनी इतरांचा विरोध होत असताना भाभांना सर्वाधिकार दिले आणि भाभांनी या देशाला त्या वेळी अभिवचन दिले होते, ‘1980 पर्यंत हा देश स्वस्त, स्वच्छ, सुरक्षित अशी 25 हजार मेगावॉट वीज निर्माण करेल.’ त्याचे काय झाले, असा साधा प्रश्नसुद्धा लोकसभेत एकानेही विचारला नाही. म्हणजे बोफोर्स, राफेल यांच्या चर्चेत, ‘या देशात या गोष्टी का बनत नाहीत?’ हे एकानेही का विचारले नाही याचे आपणाला आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही! आम्ही काहीच केले नाही आणि काहीच करू शकणार नाही, हे या देशाला पटवून देण्यात या देशातील तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ यशस्वी झालेत.

आणखी एक उदाहरण घेऊ या. देशातील पन्नास राष्ट्रीय प्रयोगशाळांना पंडित नेहरूंनी नवी मंदिरे, नवी तीर्थस्थाने म्हटले. त्यांच्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा, चांगले पगार आणि सर्व सोईसुविधा दिल्या आणि या प्रयोगशाळांचे मूल्यमापन करायला त्यानंतर चाळीस वर्षांनी आपण जी आबिद हुसेन समिती नेमली, त्यांनी आपल्या अहवालात म्हटलंय, ‘या देशात स्वातंत्र्योत्तर काळात शास्त्रज्ञांची चांदी झालीय आणि संशोधन मात्र धुळीला मिळालंय! संशोधनाची मढी जपण्यासाठी आपण हे अतिभव्य पिरॅमिड्‌स उभारलेत!’ आबिद हुसेन यांनी एक स्वप्न पाहिले होते. या संशोधन संस्था ‘औद्योगिक संशोधन’ करण्यासाठी आहेत. भविष्यकाळात कधी तरी या संशोधन संस्था दर वर्षी त्यांच्यावर जो खर्च होतो त्याच्या किमान वीस टक्के तरी उद्योगधंद्यांना संशोधनसेवा पुरवून मिळवतील! तो सोनियाचा दिवस येण्याची शक्यता अजिबात नाही, हे या संशोधनसंस्थांनी दाखवून दिलंय! पण भोवतालचा हा अंधार आपण आपल्या मनात पाझरायला देतो. भोवताली काही प्रकाशाची बेटे आहेत, हे आपण लक्षातच घेत नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळात असामान्य कर्तृत्वाची काही माणसे पारतंत्र्य नाहीसे व्हावे म्हणून कार्यरत होती. स्वातंत्र्योत्तर काळात असे काम संशोधनक्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात करणारी अफाट कर्तृत्वाची माणसे पण समाजात होती, त्यांची प्रकाशसूक्ते आपण रचली नाहीत. त्या प्रकाशवाटा आपण पाहिल्या नाहीत. प्रत्येक क्षेत्रात असे असामान्य प्रतिभावंत आहेत. तासगावच्या वैराण भूमीवर द्राक्षबागा फुलवून दर वर्षी  काही शे-कोटी रुपयांचे परकीय चलन या देशाला मिळवून देणारा ‘प्रयोग परिवार’ आणि त्यांचे ‘द्राक्ष माउला व्हेन्चरानंद’ साधनेच्या वाचकांना थोडेफार माहीत आहेत. असे आणखीन तीन अवलिया आहेत.

एक आहेत दीपक गद्रे. (समतानंद गद्रे त्यांचे चुलतआजोबा) पिढीजात तसा थोडाफार व्यवसाय किराणा भुसार मालाचा. शिक्षण बी.कॉम, एम.कॉम असे काही. मुक्काम रत्नागिरी. भारतात मिळणाऱ्या माशांवर प्रक्रिया करून चीन, कोरिया, जपान येथील लोकांना खायला रुचकर वाटतील असे चविष्ट खाद्य प्रकार बनवून शीतपेटीतून तिथे पाठवायचे. ग्राहकांनी फक्त शीतपेटीतून काढून ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे, एक-दोन मिनिटांत ते जेवणाच्या टेबलावर! गद्रेंचे एक ऑफिस आहे सिंगापूरला. तिथे त्यांनी प्रमुख म्हणून अमेरिकन माणूस नेमलाय. त्यांच्या न्यूयॉर्कमधील ऑफिसचा प्रमुख आहे मेक्सिकन माणूस. रत्नागिरीत गद्रेंनी तीन हजार तरुणतरुणींना नोकऱ्या दिल्यात. रात्रपाळीत येणाऱ्या- जाणाऱ्या महिलांसाठी विश्रामगृहे, लहान मुलांची काळजी घेणारे पाळणाघर- हे सारे खरे की खोटे, हे पहावयास गेलो. आणखी विस्मयजनक, विलक्षण गोष्टी समोर आल्या. काही छोटे मासे जाळ्यात सापडले तर ते भारतात खात नाहीत, म्हणून कोळी ते किनाऱ्यावरच टाकायचे. त्या माशांवर थोडी प्रक्रिया केली तर ते तैवानी लोकांचे आवडीचे खाणे आहे, हे गद्रेंनी दाखवून दिले. पकडलेला एकही मासा आता फुकटात मरत नाही! हे सारे समजण्यासारखे आहे.

एक गोष्ट प्लॅस्टिकवर बंदी आणणाऱ्या जनमानसाला जाग आणणारी आहे. मासे येणार म्हणजे प्रचंड प्लॅस्टिकच्या पिशव्या आल्या. म्हणजे त्या पिशव्यांचे डोंगरच उभे राहणार. गद्रे या प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासूनच नव्हे, तर बाजारातून वापरलेल्या प्लॅस्टिक पिशव्या आठ रुपये किलोप्रमाणे विकत घेऊन या वापरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून ते दिवसाला आठशे लिटर डिझेल बनवतात. हे डिझेल जागतिक दर्जाचे आहे. त्यांच्या सर्व शीतगृहांत हेच डिझेल वापरतात. जपानमध्ये येणाऱ्या प्रत्येक खाद्य पदार्थाची सर्वांगीण तपासणी करणारी जपानी यंत्रणा केवळ त्या डिझेलचीच नव्हे, तर डिझेल निर्माण करणाऱ्या त्यांच्या विभागाचीही तपासणी करते आणि बाजारात आठ रुपये किलोने वापरलेल्या पिशव्या विकत घेऊन त्यांना ते डिझेल 28 रुपये लिटरने पडते- पण असो. सायन्स काँग्रेसला गद्रेंचा पत्ता नसतो, हे समजण्यासारखे आहे. पण आपणालाही तो माहीत नाही, कारण मराठी वृत्तपत्रांनाही ते माहीत नाहीत. ‘पद्मश्री’ वगैरे बेगडी मान्यतेपासून तर ते खूप-खूप लांब आहेत. तरीही काही बिघडत नाही, कारण गद्रे अजून साठीपासूनही दूर आहेत. परिस्थिती बदलते आहे. तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणून किमान महाराष्ट्र गद्रेंना पुढे आणेल.

पण  म.गो.भट आणि प्रभू देवधरांचे काय? देवधरांनी आता 80 वर्षे ओलांडलीत आणि भटांनी वयाच्या 82 व्या वर्षी जगाचा निरोप घेऊनही 22 वर्षे उलटलीत. या दोन मराठी तरुणांनी इतिहास घडवलाय. स्वातंत्र्य मिळाले होते. फार हुषार मुलांनी इंजिनिअर किंवा डॉक्टर बनायचे आणि देशाचे नवनिर्माण करायचे, या मंत्राने वातावरण भारावलेले होते. हे दोन तरुण पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून बाहेर आले. खिशात दमडा नाही, मागच्या सात पिढ्यांत औद्योगिकताच काय- व्यवसायाच्यासुद्धा पाऊलखुणा नाहीत; पण ‘ऑटो इलेक्ट्रिक’ आणि ‘ॲपलॅब’ हे कारखाने उभे राहिले. जगाच्या पाठीवर इलेक्ट्रॉनिक्स हे नवे युग येत होते. जर्मनीत डोशलट्रॉफ येथे 1965 मध्ये जगभराच्या नवनव्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अतिभव्य प्रदर्शन भरले होते. भट आणि देवधर आपण भारतात, भारतीय तंत्रज्ञान आणि भारतीय साधनसामग्री वापरून बनवलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ‘मेड इन इंडिया’ ही तप्त सुवर्णमुद्रा त्यावर कोरून तिथे घेऊन गेले. उपकरणे सुबक होती, सुंदर होती, स्वस्त होती; पण एक वांदा होता. अशा उपकरणांना प्रमाणपत्र लागते. त्यांचे पृथ:करण पण सोबत द्यावे लागते. भारतात त्या वेळी त्या सोई नव्हत्या. त्याहीपलीकडे, अशा काही गोष्टींची गरज असते याचीपण या उत्साही तरुणांना कल्पना नव्हती. प्रमाणपत्राशिवाय कोणतीच व्यापारी संस्था ही उपकरणे घ्यावयास तयार नव्हती. या

दोन अननुभवी तरुणांसमोर एकच मार्ग होता. ते प्रमुख वितरकाला म्हणाले, ‘‘फुकटात ही तुमच्याकडे ठेवा, ग्राहकांना द्या, त्यांचा अभिप्राय आम्हाला कळवा. तोवर भारतात या प्रमाणपत्र वगैरे गोष्टी आम्ही तीन महिन्यांत संपवतो. ती प्रमाणपत्रे तुम्हाला पाठवतो, मग योग्य वाटल्यास आणखी उपकरणे मागवा.’’ मात्र एक महिन्यातच वितरकाचे पत्र आले- ‘ग्राहकांचा उदंड प्रतिसाद आहे, प्रमाणपत्र पण आम्ही येथे मिळवलंय; आणखी वस्तू लगेच पाठवा.’ सुरुवात अशी  अडखळत झाली, पण नंतर या दोघांनी अनेक धमाल गोष्टी केल्या.

जपानमध्ये एक नवे यंत्र आले होते. त्यातील इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे महाजाल होते. फार गुंतागुंतीचे महाजाल. भट-देवधर परवानगी घेऊन तो कारखाना बघावयास गेले. त्यांना कारखाना बघायला दोन तासांचा वेळ दिला होता. मात्र भट दहा मिनिटांतच देवधरांना म्हणाले, ‘‘आपले काम झालंय. चल, भारतात परत जाऊ या, हे महाजाल बनवायला हे किचकट यंत्र आपल्या उपयोगी नाही. स्वेटर विणू शकणाऱ्या अनेक मुलींना हे महाजाल बनवायला आपण भारतात नेमू या!’’- भटांनी अनेक गोष्टी केल्या.

शेजवलकरांचे ‘पानिपत’ ह.वि.मोटे यांनी प्रसिद्ध केले म्हणून महाराष्ट्रासमोर आले. पण ते पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी लागलेले सर्व पैसे अज्ञात राहून भटांनी दिले. तासगावची द्राक्षक्रांती करणाऱ्या प्रयोग परिवाराला त्यांच्या पाऊलखुणा वाचत भटांनी मदत दिली. सरकारी अनुदानापासून वंचित राहणाऱ्या प्रतिभावान शास्त्रज्ञांना विदेशातील प्रदर्शने पाहावयास भटांनी पाठवले. हे सारे काम त्यांनी धर्म, भाषा, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन केले. इलेक्ट्रॉनिक्स सर्किटसाठी लागणारे, फक्त जपानमध्ये उपलब्ध असलेले ‘सायकलाइज्ड रबर’ त्यांनी भरपूर आर्थिक मदत देऊन डॉ.परवेझ या बिहारी मुस्लिम तरुण शास्त्रज्ञाकडून बनवून घेतले. भटांच्या कामाची काय, त्यांच्या मृत्यूचीसुद्धा साधी नोंद ना भारतातील वैज्ञानिक संस्थांनी घेतली, ना महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी. भटांचे राहू देत, आता आपण बोलताय भटांचे जुळे मित्र प्रभू देवधर यांच्याबद्दल.

भट-देवधर यांच्या आयुष्यात एक विलक्षण योग आला. या दोघांचा मुंबई- दिल्ली विमानप्रवास कायम सुरू असे. त्या वेळी राजीव गांधी राजकारणात आले नव्हते. ते वैमानिक होते. वेगवेगळ्या गोष्टी समजावून घेण्याचे त्यांचे वेड विलक्षण होते. विमान चालवताना वेळ मिळाला की, ते येऊन प्रवाशांशी गप्पा मारत. त्यांची आणि देवधरांची अशी मैत्री झाली. राजीव गांधींना उद्या जग जिंकणारे इलेक्ट्रॉनिक्सचे महाजाल समजावून घ्यायचे होते. रात्री मुंबईत मुक्काम असला, तर दुसऱ्या दिवशी दुपारी विमान चालवत दिल्लीला जाण्याच्या मधल्या वेळेत ते ॲपलॅबला जाऊन हे महाजाल समजावून घेत.

इंदिरा गांधींची हत्या झाली, त्या वेळी राजीव ॲलेक्झांडरना म्हणाले, ‘‘मला फार एकाकी  वाटतंय, मला आधार हवाय. विमान पाठवून मुंबईहून माझा मित्र प्रभू देवधरांना बोलावून घ्या.’’ येणाऱ्या सरकारी विमानाची वाट पाहत देवधर थांबले नाहीत. ते विमानतळावर पोचले. काही तासांत मित्राला आधार द्यायला ते तिथे पोचले. मात्र राजीववर पंतप्रधानपदाची अजिबात नको असलेली जबाबदारी आली. या देशाला देवधरांचे ज्ञान आणि दृष्टी पुढे नेईल, ही त्यांची खात्री होती. राजीवने त्यांना कायम तिथेच राहून मदत आणि मार्गदर्शन करण्याची गळ घातली. मनात अजिबात नसताना देवधर दिल्लीत राहिले. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून. त्यांना इलेक्ट्रॉनिक्स कमिशनचे चेअरमनपदही नाइलाजाने स्वीकारावे लागले.

प्रभू या टोपणनावाचा प्रभू किंवा पी.एस.प्रभू हा राजीवचा एकमेव जवळचा मित्र होता. मात्र भट, गद्रे यांच्याप्रमाणेच प्रसिद्धीच्या झोतात त्यांना अजिबात जायचे नव्हते. प्रसिद्धी आणि दिल्लीतील वरची वर्तुळे यांपासून ते पूर्णपणे बाजूला राहिले. प्रसिद्ध पराङ्‌मुखता म्हणजे किती? भारताची, राजीवच्या कालखंडातील या क्षेत्रातील प्रगती केली देवधरांनी आणि भारतात नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा आपण त्याचे श्रेय देतो सॅम पित्रोदा यांना. देवधरांचे नावसुद्धा आपणाला माहीत नाही. मात्र जाहिरात म्हणजे काय, पित्रोदा वाकबगार! पित्रोदांचे मोठेपण मला अजिबात नाकारायचे नाही. मी त्या वेळी किस्त्रीम दिवाळी अंकासाठी एक दिवसभर गप्पा मारून पित्रोदांची सविस्तर मुलाखत घेतली होती. त्यात हे सर्व आहे.

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात देवधरांनी केलेले काम एका शब्दांत सांगायचे तर- अद्‌भुत आहे. पण ती जंत्री बाजूला ठेवू या. भट आणि देवधर ही माणसे कोणत्या मातीची बनली आहेत आणि देवधरांची दिल्लीत कशी घुसमट होत होती, हे लक्षात यावे म्हणून एक उदाहरण सांगतो.

भारतातील पहिली शंभर ‘एटीएम’ मशिन्स भट- देवधर यांच्या ॲपलॅबने बसवली. स्वस्त, सुबक, सुंदर. त्यातून परदेशातील ‘एटीएम’ मशिन्सपेक्षा स्वस्त. भारत सरकारने भारतात अशी दहा हजार मशिन्स बसवायचे ठरवले. त्या विभागाच्या सचिवाने निविदा मागवल्या. त्यात त्याने एक ग्यानबाची मेख मारली. त्याने अट घातली- जगात ज्यांनी अशी पाचशे मशिन्स बसवलीत, त्यांनाच निविदा भरता येईल. भारतातील एकमेव कंपनी या प्रक्रियेतून बाहेर फेकली गेली. आता फक्त जगभरच्या तीन कंपन्या निविदा भरू शकणार. डॉलर्समध्ये सचिव अर्थपूर्ण वाटाघाटी करणार! मला राहवले नाही. भटांना म्हटले, ‘‘देवधर राजीवशी बोलले तर ही अट लगेच बदलेल. किंवा देवधर हे ऑटो इलेक्ट्रिकचे सर्वेसर्वा आहेत. हे त्या सचिवाला सांगितले तरी हे काम कदाचित होईल.’’ त्या वेळी भट मला जे म्हणाले, ते सांगावेसे वाटते- भट-देवधर ही माणसे कोणत्या मातीची बनलीत, ते समजावे म्हणून.

भट म्हणाले, ‘‘दाभोळकर, पैसे देऊन, लाच देऊन काम करून घेणे आणि ओळख काढून, ओळख वापरून काम करून घेणे यात नैतिक दृष्ट्या काहीही फरक नाही. आज काही शे कोटी रुपये मिळतात, त्याऐवजी काही हजार कोटी रुपये मिळवून काय करायचंय? आपण काही दिडक्या कमवायला जन्माला आलेलो नाही. या देशात संपत्ती निर्माण करायची, या देशातील रचना कार्यक्षम, प्रामाणिक, पारदर्शक बनवायची हे खरे आव्हान आहे. मी आणि देवधरांनी ओळखी काढून, ओळखी वापरून आपले काम करून घ्यावे, हे तुमचे सांगणे भयंकरच आहे!’’ ते असो.

नवनिर्माणाचे भरपूर काम करत असताना दिल्लीच्या वातावरणात देवधरांचा जीव घुसमटला होता. ते तिथे फक्त राहत होते आपल्या मित्रासाठी. राजीव गांधींच्या हत्येनंतर केवळ काही तासांत दिल्लीला कायमचा रामराम ठोकून देवधर मुंबईला परत आले. मुंबईत परत आले आणि देवधरांनी मोकळा श्वास घेतला. त्यांच्यातील कवी प्रगट झाला. ‘कॅपिटल पनिशमेंट’ हा त्यांचा विलक्षण वेगळा असलेला कवितासंग्रह बाहेर आला. नावावरून आपल्याला वाटते, ‘कॅपिटल पनिशमेंट’ म्हणजं ‘मृत्युदंडा’बाबत काही असणार! तसे काही अजिबात नाही. आपल्याला काही वर्षे या राजधानीत राहायची जी शिक्षा झाली, त्याच्याबद्दल! कविता म्हणून त्याची उंची फार मोठी आहे. मंगेश पाडगांवकरांच्या वात्रटिका आणि उपहासात्मक राजकीय भाष्य करणाऱ्या दत्तू बांदेकरांच्या चारोळ्या यांच्यामधील अवकाश व्यापत या कविता उभ्या आहेत. जे पाहिले-जे भोगले, त्याचे शब्दरूप तिरकस-भेदक, दाहक आहे, पण त्याच वेळी वाचकांना अस्वस्थ करत त्या अंतर्मुख करतात. आठ विभागांत विखुरलेल्या अशा या पन्नासेक कविता आहेत. देवधरांची त्यांच्या शैलीतील सुरुवातीची चिंतनात्मक पाने, वसंत साठेंची प्रस्तावना आणि श्याम जोशींनी काढलेली  अफलातून रेखाचित्रे यात आहेत. हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला त्या वेळी ‘आयआयटी’ आणि दिल्लीमधील किंवा खरं तर उत्तरेतील इंजिनिअरिंग कॉलेजात तो भलताच लोकप्रिय होता. त्या कवितासंग्रहावरच विद्यार्थी-विद्यार्थिनी कवी संमेलन करायचे. ‘इथे मराठीचीये नगरी’ला याची फारशी काय, अजिबात काही बातमी नव्हती. त्यानंतर ग्रंथालीने या कवितासंग्रहाचे मराठी भाषांतरही प्रसिद्ध केले. ते फारसे कुठे पोचले नाही. कवितांचे भाषांतर खरेच फार कठीण असते; पण यातील भाषांतर फसलेय, असे मला आणि देवधरांनाही वाटले. मात्र वाचकांना या पुस्तकाचा ओझरता परिचय करून द्यायचा तरी काही कवितांचा जमेल तसा अनुवाद करायला हवा. ते औधत्य करून आणखी एक फसणारा प्रयत्न!

मी वानगीदाखल फक्त तीन-चार कविता घेतोय. त्यातून त्या कवितांमधीलही तीन-चार ओळी. गरज वाटली तर सहज, सोप्या, सुंदर मूळ इंग्रजी ओळीपण देणार आहे. काही वेळा कविता विसरून वेगळे भाष्यही करेन. आणि मी हे सारे औधत्य का करतोय, तेही शेवटी सांगतो. माझ्या मते खरे महत्त्वाचे ते तेवढेच! प्रथम कवितांबद्दल. एकूण आठ भाग. त्या भागांना नेमकी मार्मिक नावे आहेत.

1. द व्हिजन दॅट इझन्ट, (अगा जे घडलेच नाही),

2. वॉर्डन्स ऑफ द सिस्टीम (रचनेचे रक्षक... छे- छे, भक्षक),

3. केज्ड विदिन (तुरुंगवास आपल्याच घरात, किंवा घुसमट),

4. द सॉलिटरी कनफाइनमेंट (माझ्या घरी मी पाहुणा),

5. टू मायसेल्फ (स्वत:ला शोधताना),

6. जर्नी ऑफ द कॅप्टिव्ह (प्रवास- तुरुंगात केलेला),

7. बियाँड द वॉल (कुंपणाच्या पलीकडे/किंवा चष्म्याच्या पलीकडे).

‘ए चॅलेंज टू विझ्‌डम’ या आपल्या कवितेत, या देशातील संगणकयुगाचे शिल्पकार असलेले देवधर विचारताहेत...
कशासाठी गोळा करताय ही आकडेवारी?
त्यातून काही माहिती मिळते आहे का?
आणि समजा असेलच मिळाली,
तरी तुमच्या ज्ञानात काही भर पडलीये का?
आणि करतो मान्य हवं तर ते
पण मुला-बाळांना स्मरून प्रामाणिकपणे सांगा.
If this new tech
Fails to enrich the lives
Of our rural folks
To enrich their work and art
खरं सांगू का?
आपण फक्त की-बोर्डशी खेळतोय
आपल्या बोटाची खाज भागवत!

त्यांची एक वेगळी कविता (‘पोटॅटोज ॲन्ड कॅबिजेस’).  ही कविता गोष्ट सांगते माणसाला अनेक डोळे फुटलेत याची! अनेक डोळे फुटलेत म्हटल्यावर खरं तर तुम्हाला-मला मोर आठवतो. मोराचा पिसारा आठवतो. प्रत्येक पीस म्हणजे एक डोळा, ही कविकल्पना आठवते. पण देवधर कवितेत असे काही सांगत नाहीत. कारण मोराचे हे डोळे आपोआप, जन्मजात येतात. देवधर सांगताहेत, बटाटा खाण्यासाठी निकामी होतो आणि त्याला डोळे फुटतात. आपला प्रत्येक डोळा नवनिर्माण करणार असेही वाटते, त्याला टोपलीत डुलकी घेताना! ते असो. देवधर सांगताहेत, ‘आपला हा प्रत्येक नवा डोळा म्हणजे आपल्या रिमोटवर फिरणारी एक-एक वाहिनी! प्रत्येक वाहिनी, प्रत्येक नवा डोळा!’

कविता बाजूला ठेवू या. यावर भाष्य गरजेचे आहे. ‘दूरदर्शन’ ही एकच सरकारी वाहिनी नको. निकोप लोकशाहीसाठी अनेक खासगी वाहिन्या पाहिजेत, ही कल्पना मूळ देवधरांची! त्यांनी राजीवला खूप सांगून पाहिले. मात्र खेडुताचे व्यवहारज्ञान बरोबर असलेल्या राजीवना ते अजिबात पटत नव्हते. शेवटी राजीव म्हणाला, ‘‘प्रभू, एक सादरीकरण करा.’’ राजीव, प्रमुख केंद्रीय मंत्री, प्रमुख सचिव यांच्यासाठी देवधरांनी एक नेटके प्रभावशाली सादरीकरण केले. बाकी सारे जण भारावले. राजीव मात्र म्हणाला, ‘‘पटत नाही.’’ सारी योजना गेली बासनात! मग राजीव काळाच्या पडद्याआड गेला.

नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यांच्या मनात ते सादरीकरण रूतले होते. त्यांनी देवधरांना बोलावले. दूरदर्शनचे खासगीकरण, सार्वत्रिकीकरण करण्यासाठी एक आयोग बसवला. बाबापुता करून देवधरांना त्याचे प्रमुखपद स्वीकारायला लावले! ते असो. कविता वाचताना वाटते, देवधर सांगताहेत- राजीव बरोबर होता!  

स्वातंत्र्य टिकवायचे असेल
तर लागते अखंड सावधानता
पण हे कधी कळेल आपल्याला?
सर्वाधिक अखंड सावधानतेची
गरज आहे आपल्याला
दूरदर्शन समोर बसताना!
आणि हे गरजेचे आहे अगदी
कारण नकळत प्रत्येकजण
जगभर सर्वत्र
बनतोय बटाटा दूरदर्शनसमोर बसल्यावर

या देशातील नोकरशाहीवर जळजळीत भाष्य करत असतानाच या देशाचा घृणास्पद इतिहास देवधर विसरत नाहीत. ते म्हणतात-

Look back into our history

……………..

Todays public servents

once paid never grouse

Unlike their historic cousins

never demand

your daughter and spouse!

 

खरं तर हे यापूर्वी लोकहितवादींनी आपल्या शतपत्रात सौम्य शब्दांत सांगितलंय, ‘बिना द्रव्यम्‌ न गंतव्यम्‌ राजानाम्‌ ब्राह्मणो गुरु’ हा आमचा संस्कार आहे. देवधर आठवण करून देतात- आपल्या, बायका, मुले-बाळी, सुना या साऱ्या एक वेळ त्यांचीच मालमत्ता होती.

प्रत्येक कविताच नव्हे, तर प्रत्येक कवितेतील प्रत्येक ओळ आपल्याला अस्वस्थ करून जाते. आपल्या विंदांची एक कविता आहे ‘सारे वर्ण शेवटी सुवर्णात जाऊन विलीन होतील, असे ब्रह्मा प्रजापतीला सांगत होता’ म्हणून सांगणारी. राजीव गांधी ‘मिशन’ या शब्दाने झपाटले होते, त्यांनी प्रत्येक विभागाचे मिशन बनवले. देवधर नकळत हळूच विचारतात, प्रत्येक मिशनचे कमिशन बनविण्याचे आपले जे अगाध ज्ञान आहे, त्याचे आपण काय करणार?

देवधर उद्योजक नंतर आहेत. प्रथम ते आहेत तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ. या देशाच्या आजच्या दैनावस्थेला फक्त तुम्हीच जबाबदार आहात हे या देशातील शास्त्रज्ञांना सांगताना देवधर अनावर होता. ‘ड्रिम मर्चंट’ या आपल्या कवितेत ते विचारतात

अरे तुम्ही शास्त्रज्ञ आहात

की आहात कारकून?

तुम्ही बनलाय

रद्दी निर्माण करणारे कारखानदार

आणि या देशातील भरडलेली जनता

ताटकळते आहे तुमच्या दारात

त्यांची स्वप्ने घेऊन

तुम्हाला स्वप्नांचे सौदागर समजून.

आता तरी सांगा त्यांना- आम्ही फक्त कारकून आहोत...!

असो. थांबतो! हे सारे मी आज सांगतोय याचे कारण, आता बरोबर 25 वर्षे मागे पडलीत. डिसेंबर 1993 मध्ये एका मराठी कवीचे हे इंग्रजी कवितांचे पुस्तक बाहेर पडले. अस्वस्थ करणाऱ्या कविता- हिंदीभाषक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी या कवितांचा आनंद उपभोगत जल्लोष केला. राजधानी दिल्लीत ‘आयआयटी’मधील विद्यार्थ्यांनी यावर परिसंवाद घेतला. दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी याचे जाहीर वाचन केले.

आता 25 वर्षांनंतर तरी मूळ इंग्रजी कवितांच्या पुस्तकाची नवी आवृत्ती, श्याम जोशींच्या अफलातून रेखाचित्रांसह आणि कवितांच्या भाषांतराची नेमकी जाण असलेल्या डॉ.निशिकांत मिरजकरांसारख्या एखाद्या अनुवादकारांनी केलेल्या अनुवादासह आपण प्रसिद्ध करू का? भट, गद्रे, देवधर या अफाट कर्तृत्वाच्या मराठी माणसांनी केलेले अलौकिक कार्य... आपल्याला ना ती माणसे माहीत आहेत, ना त्यांचे कार्य- आपल्या कर्तृत्ववान मराठी माणसांना आणि त्यांच्या कार्याला उपेक्षेने व अनुल्लेखाने संपवण्याचा आपला मराठी बाणा आपण विसरणार आहोत की नाही?

 (पी.एस.देवधर,  psdeodhar@aplab.com)  

Tags: नवसंशोधन विज्ञान दीपक गद्रे म.गो.भट आणि प्रभू देवधर दत्ताप्रसाद दाभोलकर aplab science innovation Prabhu deodhar M. G. bhat Deepak gadre Rajiv Gandhi Dattaprasad Dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्तप्रसाद दाभोळकर,  सातारा, महाराष्ट्र

वैज्ञानिक आणि लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा