Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

प्रिंट आणि डिजिटल : परस्परांना पूरकच!

15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केलेले साधना साप्ताहिक मागील 71 वर्षे अखंड प्रकाशित होत आहे. आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, वसंत बापट, ग. प्र. प्रधान, डॉ. नरेंद्र दाभोलकर असे दिग्गज या साप्ताहिकाला संपादक म्हणून लाभले आहेत. वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशी साधनाची ओळख आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन प्रामुख्याने साधनातून प्रसिद्ध केले जाते.

भारतीय संविधानाला अपेक्षित असलेल्या मूल्यविचारांचा प्रचार-प्रसार त्यातून केला जातो. मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याला प्राधान्य दिले जाते. परिणामी वाचकांच्या कक्षा रूंदावणे व सामाजिक जाणिवा विकसित होणे, या प्रक्रियेत हातभार लावता येतो. आणि म्हणूनच ‘मास’साठी काम करणाऱ्या ‘क्लास’चे साप्ताहिक असे साधनाबाबत म्हणता येते. अशा या साधनाला क्लासचा मजकूर मासपर्यंत पोचवण्यात सर्वाधिक यश लाभले, असा उपक्रम म्हणजे बालकुमार व युवा दिवाळी अंक. या वर्षी निघालेला बालकुमार दिवाळी अंक बारावा आहे, तर युवा दिवाळी अंक सहावा आहे. बालकुमार अंकाच्या सरासरी अडीच लाख प्रती आणि युवा अंकाच्या सरासरी चाळीस हजार प्रती असे प्रमाण आतापर्यंत राहिले आहे.

आशयसंपन्न मजकूर, दर्जेदार निर्मिती आणि तरीही किंमत कमी ही या यशाची त्रिसूत्री राहिली आहे. पण सर्व स्तरांतील व विविध क्षेत्रांतील व्यक्ती-संस्था-संघटना यांच्या सक्रिय सहभागामुळेच ही मोहीम यशस्वी होत आली आहे. या वर्षी मात्र या मोहिमेला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. आधीचा दुष्काळ, नंतर काही ठिकाणी अभूतपूर्व पूरग्रस्तता, आर्थिक मंदीचे सावट आणि त्यातच भर म्हणजे राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण, ही सर्व कारणे त्यामागे आहेत. शिवाय, साधनाने हाती घेतलेले नवे डिजिटल उपक्रम यामुळेही या मोहिमेला पुरेसा वेळ आम्ही देऊ शकलो नाही. झपाट्याने होत असलेल्या सर्वस्तरीय बदलांमुळे पाच-सहा वर्षांची एक पिढी, असे आता मानले जाते. त्या निकषांवर विचार केला तर बालकुमार अंकाने मराठी वाचकांच्या दोन उमलत्या पिढ्यांवर तर युवा अंकाने उमललेल्या एका पिढीवर, काही अंशी तरी प्रभाव टाकला असावा असे म्हणायला वाव आहे.

अर्थातच, याबाबत नेमकेपणाने विधान करण्यासाठी आणखी काही वर्षे जाऊ द्यावी लागतील. ते काहीही असो. उदयाला येणाऱ्या पिढ्यांच्या दृष्टिकोनाला नवे आयाम मिळावेत आणि उद्याच्या भारताचे नागरिक अधिक सुजाण व सक्षम असावेत, या प्रकियेत समिधा टाकण्याचे काम साधना यथाशक्ती करीत आहे.

मागील तीन वर्षे बालकुमार व युवा या दोन्ही अंकांमध्ये क्रमाक्रमाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आशय-विषय मध्यवर्ती येत गेले आहेत. याचे एक कारण तंत्रज्ञानात झालेल्या कमालीच्या वेगवान बदलांमुळे निर्माण झालेली अनुकूलता हे आहे. पण दुसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे, ते म्हणजे आपला सभोवताल समजून घेण्यासाठी व त्यात बदल घडवून आणण्यासाठी बदलते जग समजले पाहिजे. या संपूर्ण गुंतागुंतीच्या व व्यामिश्र प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञान मध्यवर्ती भूमिकेत आले आहे. आणि म्हणून डिजिटल साधना हा स्वतंत्र विभाग चांगलाच आकाराला येत आहे. पुढील तीन वर्षांत त्याला फोफावलेल्या झाडाचे रूप आलेले असेल. अर्थातच, तुकड्या-तुकड्यांतच विचार केला तर प्रिंट व डिजिटल ही दोन माध्यमे परस्परांचा प्रभाव कमी करणारी भासतील. समग्र विचार केला तर ही दोन्ही माध्यमे परस्परांना पूरक भूमिका बजावत आहेत अशी आमची धारणा आहे, असा आमचा अनुभव आहे!

Share on Social Media

अँडी फ्लाँवर आणि हेन्री ओलांगा

संकल्प गुर्जर

सप्टेंबर 2019 मध्ये मुगाबे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. आता झिम्बाब्वेत सत्ताबदल झालेला असला तरी, तो देश अजूनही भीषण परिस्थितीतच आहे. त्यामुळे हेन्री व अँडी यांना आपल्या देशात पुन्हा जाता येईल का, स्थायिक होता येईल का? या प्रश्नाचे उत्तर आज तरी देता येणार नाही.

आफ्रिका खंडात क्रिकेट खेळणारे तीन देश आहेत- झिम्बाब्वे, केनिया आणि दक्षिण आफ्रिका. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही चांगला खेळत आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षांत झिम्बाब्वे आणि केनियाच्या क्रिकेटचा फार वेगाने ऱ्हास झाला. झिम्बाब्वेचा संघ एके काळी- विशेषतः 1990 च्या दशकात- खूपच चांगले क्रिकेट खेळत असे. भारत, श्रीलंका व पाकिस्तान या संघांना ‘टफ फाइट’ देणारा, अशी झिम्बाब्वेच्या संघाची ओळख होती. त्या संघातील अँडी फ्लॉवर, एलिस्टर कॅम्पबेल, हीथ स्ट्रीक यांच्यासारखे अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या कामगिरीसाठी ओळखले जात असत. झिम्बाब्वेच्या इतिहासातला सर्वांत यशस्वी खेळाडू

असलेला अँडी फ्लॉवर हा उत्तम यष्टिरक्षक आणि त्याहीपेक्षा उत्तम फलंदाज होता. जसे ऑस्ट्रेलियाच्या संघात मार्क वॉ व स्टीव्ह वॉ हे भाऊ होते, तसेच झिम्बाब्वेच्या संघाकडून अँडी व ग्रांट फ्लॉवर हे दोघे भाऊ खेळत असत. झिम्बाब्वेवर ब्रिटिश वसाहतवाद्यांची सत्ता असल्याने या देशाच्या क्रिकेट संघात 1995 पर्यंत सर्व खेळाडू गौरवर्णीयच असत. त्यामुळेच 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेला 19 वर्षीय हेन्री ओलोंगा हा संघात समाविष्ट झालेला पहिला कृष्णवर्णीय खेळाडू होता. सर्वांत तरुण वयात झिम्बाब्वेसाठी खेळलेल्या ओलोंगाची ओळख त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेसाठी होत असे. याच हेन्री ओलोंगाची 1998 मध्ये शारजात आपल्या सचिन तेंडुलकरने केलेली धुलाई अनेकांना आठवत असेल.

हेन्री ओलोंगा आणि अँडी फ्लॉवर हे दोघे खेळाडू झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचे आधारस्तंभ होते. त्या देशातील 99.5 टक्के कृष्णवर्णीय जनतेसाठी ओलोंगा तर अक्षरशः हीरो होता. अशा या हेन्री ओलोंगा आणि अँडी फ्लॉवरने 2003 मध्ये आफ्रिका खंडात झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत एक राजकीय कृती केली होती. या कृतीमुळे या दोन्ही खेळाडूंना बहरलेल्या क्रिकेट कारकिर्दीवर पाणी सोडून जीव वाचवण्यासाठी देशत्याग करावा लागला. या खेळाडूंनी असे नेमके काय केले? या खेळाडूंच्या कृतीचे महत्त्व काय? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी झिम्बाब्वेची पार्श्वभूमी थोडीशी समजून घेऊ या.

आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला वसलेल्या व दीड कोटी लोकसंख्येच्या या देशावर ब्रिटिश वसाहतवादी सत्ता शंभर वर्षे होती. आफ्रिका खंडाचा ‘हिरा’ मानल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेतील सुपीक जमीन व उत्तम हवामानामुळे हजारो गौरवर्णीय लोक तिथे कायमचे स्थायिक झाले होते. या गौरवर्णीयांनी कृष्णवर्णीय जनतेला गुलामीत ठेवून स्वतःचे एक समृद्ध जीवन उभे केले होते. त्यामुळे झिम्बाब्वेमध्ये एका बाजूला संपन्न व श्रीमंत गौरवर्णीय तर दुसऱ्या बाजूला गरीब, अशिक्षित कृष्णवर्णीय अशी (वर्ण आणि वर्ग यानुसार) स्पष्ट विभागणी झाली होती. असा हा देश 1980 मध्ये वसाहतवादी सत्तेच्या जोखडातून मुक्त झाला. पण त्यापुढील 37 वर्षे रॉबर्ट मुगाबे नावाच्या एका निर्दयी, क्रूर आणि हुकूमशाही सत्ताधीशाने झिम्बाब्वेवर सत्ता गाजवली.

जगभरातील लाखो प्रेक्षक टीव्हीवर सामना ‘लाइव्ह’ बघत असताना केलेल्या या साध्याच परंतु परिणामकारक कृतीमुळे या दोघांना काय म्हणायचे आहे, हे सगळ्या जगात पोहोचले. दुसऱ्या दिवशी जगभरात त्यांच्या या कृतीची दखल घेतली गेली. त्यांच्यावर प्रशंसेचा वर्षावही झाला. मात्र त्यांच्याच देशातून त्यांच्यावर टीकेचा भडिमारही झाला. मुगाबे यांच्या समर्थकांकडून हे दोघे खेळाडू ‘देशद्रोही’ असून ‘ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत’ अशी जहरी टीका केली गेली. थेट जीवे मारण्याच्याही धमक्या देण्यात आल्या.

मुगाबे यांनी पक्षातला आणि देशातला सर्व विरोध संपवला. त्यांच्या काळात देशाची सर्व क्षेत्रांत अधोगती झाली. त्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी व समर्थकांना ‘मोबिलाईझ’ करण्यासाठी 1990 च्या दशकाच्या अखेरीस गौरवर्णीय जनतेकडे लक्ष वळवले. आर्थिक दृष्ट्या समृद्ध, शिक्षणात-व्यवसायात पुढारलेले, मात्र संख्येने अल्पसंख्य असलेले समूह हे कोणत्याही देशातील राजकीय नेत्यांचे नेहमीच आवडते व हमखास परिणाम मिळवून देणारे लक्ष्य असते. झिम्बाब्वेतील गौरवर्णीय समूहाबाबत असेच झाले. या समूहाला धडा शिकवला पाहिजे आणि त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या पाहिजेत, या दिशेने मुगाबे यांनी पावले टाकली. झिम्बाब्वेतील एकूण जमिनींपैकी चाळीस टक्के जमीन आणि अतिशय सुपीक जमिनीपैकी दोन-तृतीयांश जमीन गौरवर्णीय समूहाच्या ताब्यात होती.

तेव्हा संख्येने सहाच हजार असलेले गौरवर्णीय शेतकरी अतिशय प्रगत शेती करत असत. त्यामुळे देशातील चार लाखांहून अधिक लोकांना शेतीतून रोजगार मिळत असे आणि देशाच्या एकूण निर्यातीत कृषिक्षेत्राचा वाटा एक-तृतीयांशपेक्षा अधिक होता. गौरवर्णीय समूहाने केलेल्या अत्याचारांचा इतिहास आठवण्याचे व त्यांच्याकडून जमीन हिरावून घेण्याचे क्षुद्र राजकारण मुगाबेंनी 1990 च्या दशकात सुरू केले. या जमिनीचे देशातील कृष्णवर्णीय समूहांमध्ये पुनर्वाटप केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र त्यांच्या राजकारणामुळे ना त्या देशातील कृष्णवर्णीय समूहाची परिस्थिती सुधारली, ना जमिनीचे कृष्णवर्णीय समूहाकडे पुनर्वाटप झाले. उलट, झिम्बाब्वेतील व्यावसायिक रीतीने केली जाणारी शेती उद्‌ध्वस्त झाली, कृषिक्षेत्राची व ग्रामीण अर्थव्यवस्थेची पूर्ण वाताहत झाली आणि गौरवर्णीय समूह मोठ्या संख्येने देश सोडून गेला.

परिणामी एके काळी अन्नधान्याची निर्यात करणाऱ्या या समृद्ध देशावर उपासमारीची वेळ आली. तसेच शेतावर काम करणाऱ्या कृष्णवर्णीय कामगारांवर हल्ले करून मुगाबे यांच्या सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी त्यांनाही देशोधडीला लावले. सन 2000 ते 2002 या काळात त्या देशात शिल्लक असलेल्या लोकशाहीचा गळा घोटणे, आपल्याच देशातील जनतेवर हिंसाचार करणे व गौरवर्णीय विरुद्ध कृष्णवर्णीय असे विद्वेषी राजकारण करणे यांचा कळस झाला होता. या पार्श्वभूमीवर 2003 च्या क्रिकेट विश्वचषकातील काही सामने झिम्बाब्वे आयोजित करणार होता. त्यामुळे साऱ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष झिम्बाब्वेकडे लागलेले होते.

या स्पर्धेच्या थोडेच आधी ‘नायजेल हफ’ नावाच्या अँडी फ्लॉवरच्या मित्राने- जो झिम्बाब्वेसाठी स्क्वाश खेळत असे- त्याला स्वतःच्या शेतावर नेले होते. एके काळी अतिशय संपन्न असलेले ते शेत मुगाबे यांच्या धोरणामुळे पार उद्‌ध्वस्त झालेले पाहून फ्लॉवरला धक्काच बसला. नायजेल हफ इतक्यावरच थांबला नाही. त्याने अँडी फ्लॉवरला सांगितले, ‘झिम्बाब्वेत सर्वत्र असेच चाललेले आहे. त्यामुळे या विश्वचषकाच्या निमित्ताने झिम्बाब्वेत नेमके काय चालले आहे, हे साऱ्या जगाला सांगणे ही एक खेळाडू व एक आयकॉन या नात्याने तुझी नैतिक जबाबदारीच आहे.’

नायजेल हफच्या शेताला दिलेली भेट आणि त्याच्याबरोबरचा संवाद यामुळे संवेदनशील फ्लॉवरचा आपल्या देशाकडे आणि विश्वचषकाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. आपण आता काही तरी कृती केली पाहिजे, याच निश्चयाने तो घरी परतला. अँडी फ्लॉवर हा सुरुवातीपासूनच एक विचारी खेळाडू म्हणून ओळखला जात असे. झिम्बाब्वेच्या समाजजीवनात क्रिकेटचे काय स्थान आहे याची त्याला चांगलीच जाणीव होती. कारण त्याने करिअरच्या शिखरावर असताना, 1997-98 च्या सुमारास आपला क्रिकेट क्लब बदलला होता. म्हणजे नावाजलेला क्लब सोडून तो मुख्यतः कृष्णवर्णीय खेळाडू असलेल्या एका दुय्यम दर्जाच्या क्लबकडे गेला होता.

फ्लॉवर तिथे गेल्यामुळे त्याला झिम्बाब्वेतील उगवत्या कृष्णवर्णीय खेळाडूंना मार्गदर्शन करणे शक्य झाले होते. त्याचे क्रिकेटवर आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे स्वतःच्या देशावर किती प्रेम होते, याचा हा पुरावा आहे. असा हा फ्लॉवर नायजेल हफच्या त्या शेतावर जाऊन आला आणि अस्वस्थ झाला. आपल्या सरकारच्या धोरणांचा निषेध करायचा, त्यासाठी आपल्या संघातील सहकाऱ्यांना सोबत घ्यायचे, असे त्याने ठरवले. मात्र अशी राजकीय कृती करण्यासाठी संघातील किती खेळाडू आपल्यासोबत येतील, याविषयी तो साशंक होता. तसेच संघातील काही खेळाडू सरकारच्या बाजूने आहेत, हेही त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने 26 वर्षीय हेन्री ओलोंगाला सहभागी करून घ्यायचे ठरवले. ओलोंगाची तीक्ष्ण बुद्धी आणि तीव्र नैतिक जाणिवा त्याला माहीत होत्या. त्यामुळे आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे, हे ओलोंगाला नेमके कळू शकेल, असेही अँडी फ्लॉवरला वाटले. त्याचा विश्वास अनाठायी नव्हता.

फ्लॉवरचा प्रस्ताव ऐकताच ओलोंगा त्यात सहभागी व्हायला तयार झाला. जर फक्त अँडी फ्लॉवरने राजकीय कृती केली असती, तर एका गौरवर्णीय खेळाडूचा त्रागा अशा तुच्छतेच्या भावनेने त्याकडे पाहिले गेले असते. मात्र एक कृष्णवर्णीय आणि एक गौरवर्णीय अशा दोन खेळाडूंनी झिम्बाब्वेच्या सरकारविरोधी राजकीय कृती करणे, याला खूपच वेगळा अर्थ मिळणार होता. मुगाबे यांच्याविरोधात एक कृष्णवर्णीय खेळाडूही जाहीरपणे उभा राहणे यामुळे त्या राजकीय कृतीचे महत्त्व व परिणाम निश्चितच वाढणार होते. म्हणजे झिम्बाब्वे हा देश गौरवर्णीय समूहासाठी केवळ कृषिक्षेत्रातील व्यावसायिक शेतकऱ्यांसाठी असुरक्षित नसून, साऱ्या देशातील जनतेलाच मुगाबे यांनी वेठीस धरले आहे. हा संदेश या कृतीतून फार प्रभावीपणे देता आला होता.

प्रत्यक्ष कृती :

झिम्बाब्वेतील विरोधी पक्षात कार्यरत असलेले मानवी हक्क कार्यकर्ते आणि वकील डेव्हिड कोलटार्ट यांना भेटून या दोघांनी आपली कल्पना सांगितली. आता प्रत्यक्ष कृती करायची, असे ठरल्यावर नेमकी काय कृती करावी आणि त्याची परिणामकारकता अधिकाधिक कशी वाढवता येईल याविषयी चर्चा सुरू झाली. त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय होता- संपूर्ण विश्वचषक स्पर्धेवरच बहिष्कार टाकायचा आणि मुगाबेंच्या राजवटीला विरोध व्यक्त करायचा. मात्र या पर्यायातून दोन्ही खेळाडूंच्या प्रामाणिकपणाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते. तसेच या कृतीमुळे विरोधही फारसा परिणामकारक ठरला नसता. दुसरा पर्याय होता- विश्वचषकाचे सामने खेळताना दंडावर काळी पट्टी बांधायची आणि एका पत्रकाद्वारे ‘आम्ही असे का करत आहोत,’ हे जाहीर करायचे. ओलोंगा आणि फ्लॉवर यांनी कोलटार्ट यांच्या सल्ल्याने दुसरा पर्याय निवडला.

अँडी फ्लॉवरने सर्व पूर्वतयारी केलेली असल्याने त्याच्याकडे इंग्लंडमधील क्लब क्रिकेटचे कॉन्ट्रॅक्ट होते. मात्र ओलोंगाचे तसे नव्हते. सरकारविरोधी राजकीय कृती केलेली असली, तरीही आपण आपल्या देशात परत जाऊ शकू, असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने फारसे काही नियोजन केले नव्हते. मात्र त्याच्या कृतीमुळे तो ज्या क्लबकडून क्रिकेट खेळत असे, त्या क्लबने त्याचे सदस्यत्व रद्द केले. त्याच्या प्रेयसीनेही त्याच्याशी असलेले नाते पूर्णतः तोडून टाकले. तसेच जिवाला धोका असल्याने त्याला आपल्या देशातही परत जाता आले नाही. त्यामुळे फ्लॉवरप्रमाणेच तोही अखेर इंग्लंडमध्ये गेला. मग गायनाचे कार्यक्रम आणि जाहीर भाषणे देऊन उपजीविका करण्याचा मार्ग त्याने निवडला.

आपल्या या कृतीमुळे आपल्याला झिम्बाब्वे क्रिकेट संघाकडून पुन्हा खेळता येणार नाही, आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द कायमची संपुष्टात येईल आणि कदाचित आपला प्रिय देशही कायमचा सोडावा लागेल याची दोघांनाही पूर्ण जाणीव होती. दहा वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या फ्लॉवरचे वय 34 वर्षे असल्याने त्याच्यासाठी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेणे तुलनेने सोपे होते. मात्र 26 वर्षीय ओलोंगासमोर आणखी आठ-दहा वर्षांची क्रिकेट कारकीर्द होती. तसेच क्रिकेट खेळताना हे दोघेही खोऱ्याने पैसा कमावत होते, त्यावरही पाणी सोडावे लागणार होते. मात्र आपल्या देशासाठी व वैचारिक भूमिकेसाठी त्या दोघांनीही हा सगळा त्याग करायचे ठरवले होते.

झिम्बाब्वेचा पहिला सामना होता 10 फेब्रुवारी 2003 रोजी. हरारे या झिम्बाब्वेच्या राजधानीच्या शहरात खेळवला जाणारा हा सामना फारच ऐतिहासिक ठरला. क्रिकेटच्या मैदानापासून अध्यक्ष मुगाबे यांचे घर अक्षरशः हाकेच्या अंतरावर होते. एका हुकूमशहाच्या घरापासून इतक्या जवळ, आपले सर्वस्व पणाला लावून सारे जग दखल घेईल अशी राजकीय कृती करण्यासाठी किती धैर्य लागते याची कल्पनाच केलेली बरी. (या कृतीचे परिणाम कुटुंबीयांनाही भोगावे लागणार असल्याने आपण नेमके काय करणार आहोत, हे त्यांनी फक्त जवळच्या नातलगांना सांगितले होते.) सामन्याच्या दिवशी सकाळी या दोघांच्याही सह्या असलेले साडेचारशे शब्दांचे, अतिशय प्रभावीपणे लिहिलेले पत्रक त्यांनी पत्रकारांना दिले. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की,

‘आम्ही जरी क्रिकेटपटू असलो तरी आम्हालाही सदसद्‌विवेकबुद्धी आणि भावना आहेत. झिम्बाब्वेतील लाखो नागरिकांना रोज काय भोगावे लागत आहे आणि दारिद्य्र, उपासमार व एड्‌स यामुळे हजारो नागरिक कसे मृत्युमुखी पडत आहेत याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. अशा वेळी शांत बसणे म्हणजे देशात जे होते आहे त्याचा स्वीकार करणे किंवा स्वतःच्या सदसद्‌विवेकबुद्धीशी प्रतारणा करण्यासारखे आहे. आम्ही हे दोन्हीही करू शकत नाही. म्हणूनच देशात होणारे मानवी हक्कांचे उल्लंघन आणि लोकशाहीचा विनाश याचा निषेध करण्यासाठी विश्वचषक स्पर्धेत खेळताना आम्ही दंडावर काळी पट्टी बांधणार आहोत.’

अतिशय पॉवरफुल असे ते ‘स्टेटमेंट’ होते. जेव्हा सामन्याच्या बाविसाव्या षटकात अँडी फ्लॉवर फलंदाजीसाठी दंडावर काळी पट्टी बांधून उतरला, तेव्हा हेन्री ओलोंगाही ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीत आपल्या दंडावर काळी पट्टी बांधून उभा असलेला दिसला. फ्लॉवर आणि ओलोंगा यांच्या पत्रकामुळे पत्रकारांच्या हे लक्षात आले होते की, नेमके काय चालले आहे. जगभरातील लाखो प्रेक्षक टीव्हीवर सामना ‘लाइव्ह’ बघत असताना केलेल्या या साध्याच परंतु परिणामकारक कृतीमुळे या दोघांना काय म्हणायचे आहे, हे सगळ्या जगात पोहोचले. दुसऱ्या दिवशी जगभरात त्यांच्या या कृतीची दखल घेतली गेली. त्यांच्यावर प्रशंसेचा वर्षावही झाला. मात्र त्यांच्याच देशातून त्यांच्यावर टीकेचा भडिमारही झाला. मुगाबे यांच्या समर्थकांकडून हे दोघे खेळाडू ‘देशद्रोही’ असून ‘ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत’ अशी जहरी टीका केली गेली. थेट जीवे मारण्याच्याही धमक्या देण्यात आल्या.

मुगाबे राजवटीचा इतिहास पाहता, या खेळाडूंना आता सरकार जिवंत सोडणार नाही, असेही भाकीत वर्तवले जात होते. मात्र हे खेळाडू आपल्या कृतीमुळे जगभरात प्रसिद्ध झालेले असल्याने सरकारला त्यांच्याबाबत लगेचच काही करता आले नाही. पण हेन्री ओलोंगाला पुढील सामन्यांमधून संघातून वगळले गेले. मात्र फ्लॉवरबाबत तसे करता आले नाही; कारण ‘फ्लॉवरला संघातून वगळल्यास आम्ही संपावर जाऊ’, अशी धमकी इतर खेळाडूंनी दिली. या दोघांनी एकदा निषेधाची कृती करून झाल्यावर त्यांनी पुन्हा असे करू नये,’ असा सल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिला. त्यामुळे पुढच्या सामन्यात फ्लॉवर आणि ओलोंगाने दंडावर काळी पट्टी न बांधता डोक्यावर घाम पुसण्यासाठी बांधले जाणारे काळ्या रंगाचे स्वेटबँड्‌स वापरले. तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ प्रेक्षकांपैकी अनेकांनी उत्स्फूर्तपणे डोक्यावर काळी पट्टी बांधली होती.

स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व सामने दक्षिण आफ्रिकेत होणार होते. बरी कामगिरी, पाऊस व थोडे नशीब यांच्या आधारे झिम्बाब्वेचा संघ त्या टप्प्यासाठी पात्र ठरला होता. त्यामुळेच हेन्री ओलोंगा आणि अँडी फ्लॉवर यांना देशातून बाहेर पडता आले, अन्यथा तेही शक्य झाले नसते. सामने संपल्यावर दक्षिण आफ्रिकेतून हे दोघे थेट इंग्लंडलाच रवाना झाले. त्यांना इंग्लंडमध्ये निर्वासित म्हणून आसरा मिळाला.

अँडी फ्लॉवरने सर्व पूर्वतयारी केलेली असल्याने त्याच्याकडे इंग्लंडमधील क्लब क्रिकेटचे कॉन्ट्रॅक्ट होते. (त्याच्या पुढील वर्षी 2004 मध्ये अँडीचा भाऊ ग्रँट यानेही देश सोडला व तोही इंग्लंडमध्येच गेला. पुढे जाऊन अँडी फ्लॉवर 2009 ते 2014 या पाच वर्षांसाठी इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक झाला.)

मात्र ओलोंगाचे तसे नव्हते. सरकारविरोधी राजकीय कृती केलेली असली, तरीही आपण आपल्या देशात परत जाऊ शकू, असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने फारसे काही नियोजन केले नव्हते. मात्र त्याच्या कृतीमुळे तो ज्या क्लबकडून क्रिकेट खेळत असे, त्या क्लबने त्याचे सदस्यत्व रद्द केले. त्याच्या प्रेयसीनेही त्याच्याशी असलेले नाते पूर्णतः तोडून टाकले. तसेच जिवाला धोका असल्याने त्याला आपल्या देशातही परत जाता आले नाही. त्यामुळे फ्लॉवरप्रमाणेच तोही अखेर इंग्लंडमध्ये गेला. मग गायनाचे कार्यक्रम आणि जाहीर भाषणे देऊन उपजीविका करण्याचा मार्ग त्याने निवडला.

या दोघांनाही त्यांच्या ‘धाडसी आणि तत्त्वनिष्ठ’ भूमिकेसाठी इंग्लंडच्या ‘एमसीसी’ या क्रिकेट क्लबचे, अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाणारे आजीव सदस्यत्व दिले गेले आहे. सध्या फ्लॉवर इंग्लंडमध्ये तर ओलोंगा ऑस्ट्रेलियात राहतात. एका ऑस्ट्रेलियन स्त्रीशी 2004 मध्ये ओलोंगाने लग्न केले. मात्र दोघेही गेल्या सोळा वर्षांत आपल्या देशात परत गेलेले नाहीत. झिम्बाब्वे या देशाचा आणि त्यांच्या क्रिकेटचा प्रवास 2003 नंतर आणखी वेगाने अधोगतीच्या दिशेने झाला. देशाची आर्थिक स्थिती इतकी खालावली की, नोटबंदीचे अतिशय टोकाचे पाऊल त्या देशाला उचलावे लागले. तसेच क्रिकेटच्या गैरव्यवस्थापनामुळे त्या देशातील क्रिकेटचासुद्धा झपाट्याने ऱ्हास झाला. मग झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचा कसोटीचा दर्जाही काढून टाकला गेला आणि इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 च्या विश्वचषक एकदिवशीय स्पर्धेसाठी संघ पात्रही ठरला नाही आणि आता तर आयसीसीने या देशाला क्रिकेटमधूनच निलंबित केले आहे.

मुगाबे यांनी 2017 च्या डिसेंबरमध्ये 37 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर नाइलाजाने सत्तात्याग केला. सप्टेंबर 2019 मध्ये त्यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. आता झिम्बाब्वेत सत्ताबदल झालेला असला तरी, तो देश अजूनही भीषण परिस्थितीतच आहे. त्यामुळे हेन्री व अँडी यांना आपल्या देशात पुन्हा जाता येईल का, स्थायिक होता येईल का? या प्रश्नाचे उत्तर आज तरी देता येणार नाही. मात्र असे निर्भय व नैतिकतेची जाण असलेले देशप्रेमी खेळाडू जोपर्यंत त्या देशात तयार होत आहेत, तोपर्यंत त्या देशाविषयी असलेली आशा सोडून चालणार नाही.

लेखन : संकल्प गुर्जर

sankalp.gurjar@gmail.com

Share on Social Media

अँन ऑर्डिनरी गर्ल

दिपाली अवकाळे

सध्या मानसीचे लक्ष्य 2020 च्या टोकियो स्पर्धांकडे असले तरी वेळ मिळेल तेव्हा, ॲडव्हेंचर बियाँड द बॅरियर्स फाउंडेशन यांच्यासोबत ती इतर ॲडव्हेंचर अनुभवत असते. नशीब, असमर्थता आणि अशक्यता या गोष्टींवर अजिबात विश्वास नसलेली मानसी जोशी खरंच स्वतःच्या आयुष्यात लहान-मोठे असामान्य निर्णय घेऊन ते पूर्णत्वास घेऊन जाणारी तुमच्या-आमच्यामधलीच एक सामान्य मुलगी आहे!

दि.25 ऑगस्ट 2019 रोजी स्वित्झर्लंडमध्ये डब्ल्यूएफ पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या स्पर्धा पार पडल्या. यात SL3 वुमन्स सिंगल या गटात वयाच्या तिसाव्या वर्षी सुवर्णपदक मिळवणाऱ्या तीस वर्षीय मानसी जोशी हिची कहाणी आपल्याला स्वतःच्या आयुष्याचे सिंहावलोकन करायला लावणारी आहे. मूळची राजकोटची असलेली मानसी वडिलांच्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या नोकरीमुळे मुंबईत स्थायिक होती. आई, वडील, लहान भाऊ, बहीण असा तिचा परिवार. लहान असल्यापासून तिच्या वडिलांनी तिला विविध खेळांचा परिचय करून द्यायला सुरुवात केली होती. वयाच्या सहाव्या वर्षापासून वडिलांसोबत ती बॅडमिंटन खेळायची.

त्यांच्या घरी एकच रॅकेट असल्याने वडील तिच्या हातात ती रॅकेट द्यायचे आणि स्वतः मात्र हाताने शटलकॉक (बॅडमिंटनच्या खेळातील फूल) फेकायचे. आपल्या उंचीपेक्षा मोठी रॅकेट हाताळत ती ते शटलकॉक मारण्याचा प्रयत्न करायची. त्यानंतर शाळा आणि शहर पातळीवर बॅडमिंटनच्या काही स्पर्धादेखील ती जिंकली होती. पुढे शिक्षण आणि नोकरीसोबत वेळ मिळेल तसं ‘वर्क अँड लाईफ बॅलन्स’ साधत तिने हा छंद केवळ फिटनेससाठी जोपासला होता. तोपर्यंत बॅडमिंटनकडे तिने कधीच करिअर म्हणून पाहिले नव्हते. कारण सर्वसामान्य तरुणींप्रमाणे तिचीही स्वप्ने चांगली नोकरी, घर, गाडी इथपर्यंत मर्यादित होती. त्यानुसार तिने आपले आयुष्य जगायला सुरुवात केली होती.

लहानपणापासून विज्ञान व इंजिनिअरिंग या विषयांमध्ये आवड असल्यामुळे तिने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली आणि ॲटोस इंडिया कंपनीत सिनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी करू लागली. आयुष्यात सगळं सुरळीत सुरू असताना दि.2 डिसेंबर 2011 रोजी वयाच्या बाविसाव्या वर्षी, टू- व्हीलरने ऑफिसला जात असताना तिचा भीषण अपघात झाला. ट्रकसोबत झालेल्या या अपघातात इतर अनेक जखमांबरोबरच तिला संपूर्ण डावा पाय गमवावा लागला. दहापेक्षा जास्त तास सुरू असलेल्या शस्त्रक्रिया करूनही गँगरिन झाल्याने तिचा डावा पाय कापावा लागला. ती पन्नास दिवस हॉस्पिटलमध्ये होती. त्यानंतर तिला उभं राहण्यापासून ते पुन्हा चालणं शिकण्यासाठी रिहॅबिलिटेशन करावं लागलं. अशा प्रकारे, काही गोष्टी विसरण्याचा आणि अनेक गोष्टी पुन्हा नव्याने शिकण्याचा तिचा प्रवास सुरू झाला.

या पुन्हा नव्याने शिकण्याच्या प्रवासात तिला कृत्रिम पाय लावून रिहॅबिलिटेशन देणाऱ्यांमार्फत धावायला शिकण्याच्या एका शिबिरात जायची संधी मिळाली. त्यात जर्मनीचे पॅरा-ऑलिम्पियन (विकलांग खेळाडू) धावपटू आणि सुवर्णपदकविजेता हेन्रिक पोपोव यांनी मार्गदर्शन केले. तिथे ते क्रिकेट, व्हॉलिबॉल, डॉजबॉल यांसारखे खेळ खेळले. पुन्हा धावायला मिळाल्याने ती भारावून गेली. शिबिरानंतर तिने आयोजकांना विनंती करून तो विशेष कृत्रिम पाय पुढील काही आठवडे वापरण्यासाठी मागून घेतला.

त्या आठवड्यात, रोज ऑफिसमधून घरी आल्यावर ती धावायला जायची. आपल्याला धावायला मिळतंय, यामुळे तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र काही दिवसांनी ठरल्याप्रमाणे तिला तो विशेष कृत्रिम पाय परत करावा लागला आणि त्यानंतर तिचं धावणं पुन्हा थांबलं. आयुष्यातल्या या अपघाताबद्दल एका मुलाखतीत मानसी म्हणाली, ‘‘हे माझ्या नशिबात होतं आणि आता हेच माझं आयुष्य आहे, वगैरे गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही! माझं विकलांग असणं इतकंच माझं आयुष्य कसं असू शकेल? तो माझ्या आयुष्यात घडलेला केवळ एक अपघात होता. त्यानंतरचा माझा रिकव्हरी पिरियड जरी खूप लांबलचक असला, तरी मी नकारात्मक गोष्टींना माझ्या आत्मविश्वासावर ताबा कधीच मिळवू दिला नाही. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला मदत करण्याचा आपला निर्णय पक्का असेल; तर आजूबाजूला असे अनेक लोक आपोआप तयार होताना दिसतात, जे मनापासून आपल्या मदतीला येतात. ज्या गोष्टी मी करू शकणार नाही असं मला वाटतं, त्याच गोष्टी करण्यासाठी माझी फॅमिली मला कायम प्रोत्साहन देते. मलाही चॅलेंजेस स्वीकारायला आवडतं. कारण मी या मताची आहे की, मला किंवा कुणालाही ते विकलांग असल्यामुळे नव्हे, तर त्यांच्या कामगिरीमुळे ओळखलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या परिश्रमाचं व कर्तृत्वाचं कौतुक झालं पाहिजे.’’

ऑगस्ट 2012 मध्ये कंपनी लेव्हलला आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत, मानसी अपघातानंतरची तिची पहिली मॅच खेळली. तिथे ती वुमन सिंगलमध्ये पहिली आली. तिच्या परिवारातील सदस्यांनी, मित्रमंडळींनी आणि ऑफिसमधल्या लोकांनी तिला पुढे खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. या मॅचमुळे तिच्या लक्षात आले की, तिच्यामध्ये या खेळासाठी लागणारी स्किल्स अजूनही आहेत. मग तिने आपला जॉब सांभाळत प्रॅक्टिस सुरू केली. पहाटे साडेचारला उठायची, जेणेकरून ऑफिसला जाण्याअगोदर प्रॅक्टिस करायला भरपूर वेळ मिळावा. तेव्हा तिच्याकडे कोणीही कोच (प्रशिक्षक) नव्हता. तिचा लहान भाऊ बॅडमिंटन खेळतो. तोच तिला घरी शिकवायला लागला. शरीर आणि मन हे दोन्ही फिट ठेवण्यासाठी ती सातत्याने योगासुद्धा करायला लागली.

आपल्या पहिल्या कंपनी लेव्हलच्या मॅचनंतर ऑगस्ट 2014 मध्ये एशियन गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या निवडप्रक्रियेत तिने भाग घेतला. पण त्यात तिची निवड झाली नाही, त्याबद्दल तिचं मत वाचण्यासारखं आहे- ‘‘या स्पर्धेमुळे मला बॅडमिंटनमधील पॅरा- ऑलिम्पिक स्पर्धांबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळाली. आणि पॅरा-ॲथलिट क्षेत्रातील माझ्यासारख्या विविध लोकांशी मैत्री झाली. विकलांग असलेल्या किंवा झालेल्या व्यक्तींसाठी त्यांच्या विकलांगतेच्या पातळीवरून विविध गट तयार केले जातात. या गटांमध्ये स्पर्धकांची शारीरिक क्षमता लक्षात घेता, स्पर्धेचा प्रकार आणि त्यांच्या काठिण्याची लेव्हल ठरवली जाते. या खेळासाठीचे नियमसुद्धा सामान्य खेळापेक्षा वेगळे असतात. मी पॅरा-बॅडमिंटन जेव्हा SL3 गटातून खेळते, तेव्हा ते केवळ हाफ कोर्ट असतं (बॅडमिंटनच्या अर्ध्याच कोर्टमध्ये खेळणे). माझ्यासारख्या व्यक्तीसाठी ही महत्त्वाची माहिती होती.

तिथे भेटलेल्या केरळच्या नीरज जॉर्ज या पॅरा- ऑलिम्पियनने मला सांगितले की, ‘तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला हवा.’ त्याने हेही सांगितले की- मी माझे ध्येय मोठे ठेवावे, कारण त्याच्या निरीक्षणानुसार माझ्याकडे तितकी विविध कौशल्ये आहेत. म्हणून मी माझ्या खेळाचं काही श्रेय नीरजला देते. त्यामुळे माझं सिलेक्शन झालं नसलं तरी त्या प्रक्रियेतून खरं तर मला खूप काही मिळालं.’’

डिसेंबर 2014 मध्ये मानसीने नॅशनल लेव्हलवर खेळलेल्या तिच्या पहिल्या बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये सिल्व्हर मेडल मिळवले. ही स्पर्धा तिच्यासाठी स्पेशल होती, कारण तिला अर्जुन ॲवॉर्डविजेती पारुल परमारच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती. तिथूनच तिला स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी निवडले गेले. पहिल्या इंटरनॅशनल लेव्हलच्या खेळाची तयारी करण्यासाठी ती आपली नोकरी सांभाळत, सोमवार ते शुक्रवार रोज दोन तास आणि शनिवार-रविवारी प्रत्येकी चार तास असा सराव करू लागली. यामध्ये ती पायाची ताकद, कोअर स्ट्रेंदनिंग, तोल सांभाळणे आणि समन्वय अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करून सराव करू लागली. योगा, श्वासांचे व्यायाम आणि मेडिटेशन हे तिच्या दिनक्रमाचा भाग होते. याबद्दल तिचं मत असं आहे की-

‘‘आपण आयुष्यात गोष्टी बॅलन्स करायला शिकणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला नव्या गोष्टींशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो. माझ्याबाबतीत माझा कृत्रिम पाय जड व टाईट असल्याने शरीराला त्याच्याशी जुळवून घ्यायला लागणारा वेळ देणं महत्त्वाचं होतं. एकदा तुम्ही या गोष्टींशी जुळवून घेतलं की, मग तुमच्यासाठी त्याच गोष्टी फार सोप्या होऊन जातात. असंच काही तरी माझ्या बाबतीत झालं. कृतज्ञतापूर्वक हे सांगायला आवडेल की, माझ्या अवतीभवती अनेक लोक होते, ज्यांनी मला मदत केली. हे सगळे लोक अत्यंत संयमाने वागत होते.’’

मानसीचं हे म्हणणं केवळ कोणत्याही डिसेबल व्यक्तीसाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांसाठीसुद्धा किती खरं आहे; नाही का? या स्पॅनिश टुर्नामेंटनंतर मानसी 2015 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळली. ही स्पर्धा तिच्या आणि तिचा पार्टनर राकेश पांडे याच्यासाठी खूप यादगार होती, कारण अनेक वर्ल्ड चॅम्पियन्सच्या विरुद्ध खेळण्याची संधी त्यांना मिळाली. यामुळे त्यांना स्वतःचे पोटॅन्शियल समजायला मदत झाली, वेगळ्या प्रकारचा खेळ बघायला मिळाल्याने आपण आपल्या खेळात काय बदल करायला हवेत, हेही त्यांना समजले.

त्यानंतर 2016 ते 2018 च्या दरम्यान विविध देशांमध्ये झालेल्या पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत मानसीने कांस्य पदकं मिळविली. नंतर मात्र पुढील तयारीसाठी मानसीने हैदराबाद येथे पी.गोपीचंद यांची ॲकॅडमी जॉईन केली. तिथेच पूर्ण वेळ बॅडमिंटनचा परिश्रमपूर्ण सराव आणि सिन्सिअरली ट्रेनिंग घेत मानसीने 2019 चे हे सुवर्णपदक मिळविले आहे. ती या स्पर्धेपूर्वी तिच्या ट्रेनरला म्हणाली होती, ‘‘मी या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कशी परफॉर्म करणार आहे, मला माहीत नाही; पण हा सगळा खेळाचा प्रवास मी एन्जॉय करते आहे.’’ यावर ट्रेनर तिला म्हणाले, ‘‘जर तू हा प्रवास एन्जॉय करत असशील, तर तू ऑलरेडी विनर आहेस.’’ सगळे तिच्यावर विश्वास ठेवून होते. तिला कल्पनासुद्धा नव्हती की, गोल्डमेडल ती जिंकेल. तिचा विश्वास केवळ ती कालपेक्षा आज कशी बेटर असेल, यावरच होता आणि हेच तिला पुढच्या आयुष्यात करायचे आहे, असे ती एका मुलाखतीत म्हणाली.

2019 च्या बीडब्ल्यूएफ पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मानसीने वर्ल्ड चॅम्पियन क्रमांक एक असलेल्या पारुल परमार या उत्तम पॅरा-बॅडमिंटनपटूला 21-12, 21-7 अशा गुणांनी हरवून सुवर्णपदक जिंकले. याबद्दल मानसी म्हणाली, ‘‘पारुल परमार इज बेस्ट! मॅच संपल्याबरोबर वय वर्ष 46 असणाऱ्या पारुलने येऊन माझे अभिनंदन केले. ती खूश होती की, तिला हरवणारं कुणी तरी तयार झालेलं आहे. पारुल परमार चॅम्पियन आहे, यात वादच नाही. ती आजही पहिल्या क्रमांकावर आहे. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला अजून अनेक टुर्नामेंट खेळायच्या आहेत. त्यामुळे अजून तरी पारुल परमारची जागा मी घेऊ शकत नाही.’’

यापूर्वी पारुल परमार विरुद्ध तीन इंटरनॅशनल मॅचेस मानसी खेळली होती, मात्र तेव्हा ती जिंकली नव्हती. पारुल परमारकडून आपण खूप गोष्टी शिकलो, असे मानसीला वाटते. जसे की- खेळताना मनगटाचा योग्य वापर कसा करावा, कोर्टवरती व्यवस्थित मूव्हमेंट कशी करावी, बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसचे महत्त्व किती आहे वगैरे.

‘खेळामुळे आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे’ असे म्हणणारी मानसी आपल्या क्षेत्राबद्दलसुद्धा तितकीच विचारशील आहे. Ordinary ME (http://manasijosh.blogspot.com) या नावे मानसी ब्लॉग लिहिते. आपल्या अपघाताबद्दल, उपचाराच्या उशिरा मिळालेल्या सुविधेबद्दल, शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेबद्दल, त्यानंतर तिच्या आयुष्यात सुरू झालेल्या ‘इन्स्पिरेशन पॉर्न’बद्दल मानसी आपल्या ब्लॉगमध्ये अगदी ठळकपणे लिहिते. त्यासोबत आपले आवडते खेळ, खाद्य पदार्थ, छंद आणि नवनवीन प्रयत्न, करत असलेले ॲडव्हेंचर याबद्दलचे मानसीचे अनुभव वाचण्यासारखे आहेत.

पुढील तयारीसाठी मानसीने हैदराबाद येथे पी.गोपीचंद यांची ॲकॅडमी जॉईन केली. तिथेच पूर्ण वेळ बॅडमिंटनचा परिश्रमपूर्ण सराव आणि सिन्सिअरली ट्रेनिंग घेत मानसीने 2019 चे हे सुवर्णपदक मिळविले आहे. ती या स्पर्धेपूर्वी तिच्या ट्रेनरला म्हणाली होती, ‘‘मी या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कशी परफॉर्म करणार आहे, मला माहीत नाही; पण हा सगळा खेळाचा प्रवास मी एन्जॉय करते आहे.’’ यावर ट्रेनर तिला म्हणाले, ‘‘जर तू हा प्रवास एन्जॉय करत असशील, तर तू ऑलरेडी विनर आहेस.’’ सगळे तिच्यावर विश्वास ठेवून होते. तिला कल्पनासुद्धा नव्हती की, ती गोल्डमेडल जिंकेल.

पॅरा-ॲथलेटिक्स नेमके कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस फेस करतात? आपल्या देशातल्या इतर विकलांग व्यक्तींसाठी कोणत्या आणि कशा संधी उपलब्ध होऊ शकतील, याबद्दल तिचे विचार स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण आहेत. त्याबद्दल ती असं सांगते की, चालता येणे ही एक बेसिक गरज आहे, तो आपला जन्मसिद्ध हक्कसुद्धा आहे. तर, प्रोस्थेटिक्स (कृत्रिम अंग) वर जीएसटी का द्यावा लागतो? मानसीने जीएसटी काऊन्सिलला एका व्यासपीठावरून विनंती केली की, ‘व्हीलचेअर आणि प्रोस्थेटिक्स डिव्हायसेसवरून जीएसटी हटवण्यात यावा.’ याबद्दल ती पुढे समाजाला असे आवाहन करते की- ‘आपला देश टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्यापैकी प्रगत झालेला आहे. आपण मंगळ ग्रह आणि चंद्रावर यान पाठवत आहोत. तर मग इंजिनिअर्स आणि टेक्निकल एक्सपर्ट्‌सनी नावीन्यपूर्ण टेक्नॉलॉजी तयार करत, अशा प्रोस्थेटिक डिव्हायसेसना अधिक पॉकेट फ्रेंडली बनवण्यासाठी का प्रयत्न करू नयेत? तसे झाले तर या सुविधा हजारो लोकांना स्वस्तात उपलब्ध होतील.’

हे सगळं स्पष्टपणे सांगणारी मानसी स्वतः प्रोस्थेटिक पायांचे दोन सेट वापरते. एक चालण्यासाठी, तर दुसरा खेळण्यासाठी. जो कृत्रिम पाय ती चालण्यासाठी वापरते, त्याची किंमत बावीस लाख रुपये आहे आणि दर पाच ते सहा वर्षांनंतर हा पाय बदलावा लागतो. जो कृत्रिम पाय ती खेळण्यासाठी वापरते, त्याची किंमतही चार ते पाच लाख रुपये असून त्याला गुडघा नसतो. त्यामुळे हा पाय वजनाने हलका असतो. हा पाय किती दिवस टिकेल, हे त्याच्या वापरावर अवलंबून असते. या क्षेत्रातील काही प्रश्नांबाबत मानसी सांगते,

‘‘आपल्या देशात सरकारकडून वर्षातून एकच टुर्नामेंट आयोजित केली जाते आणि रँकिंग मेंटेन करण्यासाठी अनेक मॅचेस खेळायला लागतात. या मॅचेस खेळण्यासाठी लागणारी तयारी, ट्रेनिंग, डायट आणि इतर गोष्टींसाठी भरपूर पैसे लागतात. रिओच्या 2016 च्या पॅराऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंना चार पदकं मिळाल्यानंतर पॅरा-स्पोर्टकडे सगळ्यांचे लक्ष अचानक वेधले गेले. यातून असं लक्षात येतं की, या क्षेत्रातले फार कमी खेळ आहेत, ज्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. उदा. पॅरा-ॲथलेटिक, विकलांग-क्रिकेट, पॅरा-स्विमिंग वगैरे. अर्थातच, हे योग्य आहे. पण अजूनही पॅरा- बॅडमिंटनसारख्या खेळांकडे मात्र दुर्लक्ष आहे. आपल्या सरकारद्वारे अगदी तोकड्या आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धा स्पॉन्सर केल्या जातात. आणि नंतर खेळाडूंना स्वतःच स्पॉन्सरर शोधावे लागतात.

सरकारने सर्व स्पोर्ट्सवर योग्य पद्धतीने पैसा वितरित केला, तर खेळाचा सराव बाजूला ठेवून स्पॉन्सररसोबत बैठका आणि इतर गोष्टींसाठी खेळाडूंना वेळ द्यावा लागणार नाही. त्याचबरोबर आपल्या क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या स्पर्धा अधिक आयोजित केल्या, तर या खेळाकडे अधिक लोकांना येण्याची संधी वाढते.’’

स्पॉन्सरशिपबद्दल मानसीचं मत आहे की, विविध ब्रँडस्‌मध्ये चर्चा सुरू असते की, त्यांच्या कन्झ्युमरला कसं प्रोत्साहित करता येईल. पॅरा-सपोर्ट हे कदाचित अजूनही कुणाचं लक्ष न गेलेलं एक मोठं मार्केट आहे. व्यवस्थित मार्केटिंग केले, तर पॅरा-सपोर्ट ही अनेक कंपन्यांसाठी बिझिनेस, समाधान आणि कन्झुमरला अनेक उत्तम प्रेरणादायी स्टोरीज्‌ देणारी संधी आहे! सध्या मानसीचे लक्ष्य 2020 च्या टोकियो स्पर्धांकडे असले तरी वेळ मिळेल तेव्हा, ॲडव्हेंचर बियाँड द बॅरियर्स फाउंडेशन यांच्यासोबत स्कूबा डायव्हिंग, स्विमिंग आणि इतर ॲडव्हेंचर ती अनुभवत असते. नशीब, असमर्थता आणि अशक्यता या गोष्टींवर अजिबात विश्वास नसलेली मानसी जोशी खरंच स्वतःच्या आयुष्यात लहान-मोठे असामान्य निर्णय घेऊन ते पूर्णत्वास घेऊन जाणारी तुमच्या-आमच्यामधलीच एक सामान्य मुलगी आहे!

लेखन : दिपाली अवकाळे

deepaliawkale.25@gmail.com

Share on Social Media

वरूण ग्रोवरची मुलाखत

समीर शेख

मी कधीच काही प्लॅन केलं नाही. सगळं आपोआपच घडत गेलं. मुझे लिखने का चस्का है और अलग अलग एक्सपिरियन्स लेने का भी. मला सगळं लिहायचं आहे, प्रत्येक प्रकारचे लेखन करायचे आहे- प्रत्येक भाषेतील एक सिनेमा, हर तऱ्हेच्या कागदावर छापल्या जाणाऱ्या कादंबऱ्या. मला सगळं करून पाहायचं आहे. हां, पण सगळं काही मला करता येणार नाही, आयुष्य लहान आणि मार्ग अरुंद आहेत. पण या सगळ्यात मला जे सर्वाधिक प्रिय आहे- गीतलेखन, कॉमेडी व सिनेमा- हे तीनही प्रकार लिहिण्याचा प्रयत्न केलाय आणि हळूहळू त्यात पुढे सरकत आहे आणि खरं तर अजूनही बरंच काही शिकत आहे. त्यात खंड पडलेला नाही.

गीतकार, लेखक, पटकथालेखक, संवादलेखक, स्टँडअप कॉमेडीयन... असे सर्वच कलाप्रकार यशस्वीपणे हाताळत लोकप्रिय, परंतु अर्थगर्भ आशयनिर्मिती करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे वरुण ग्रोवर.. वरुणच्या सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात झाली 2004 मध्ये. ‘स्टार वन’ या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘द ग्रेट इंडियन कॉमेडी शो’ या कार्यक्रमासाठी तो लेखन करू लागला, मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या सिनेमाच्या गीतांनी. विशेष म्हणजे ‘गार्डियन’ या जगप्रसिद्ध वृत्तपत्राने जगभरातील सर्वोत्तम 100 सिनेमांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. त्यात ‘गँग्ज ऑफ वासेपुर’चा समावेश करण्यात आलाय. या सिनेमाला इतक्या उंचीवर पोहोचविण्यात वरुणने लिहिलेल्या 17 गीतांची प्रमुख भूमिका राहिली आहे. पुढे 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातील ‘मोह मोह के धागे’ या गीतासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय. मात्र इतक्यावरच समाधान मानेल तो वरुण कसला!

अगदी सुरुवातीपासून कथा लिहीत असला तरी, पटकथालेखक म्हणूनही त्याचे नाव चर्चिले जाऊ लागले ते ‘मसान’ या वास्तववादी सिनेमामुळे. काळाची पावले ओळखून त्याने वेबसिरीज या कलाप्रकारातही हात अजमावला. ‘सेक्रेड गेम्स’ या लोकप्रिय वेब-सिरीजचे लेखन वरुणने केलंय. पडद्यामागचा ‘मिडास राजा’ म्हणवण्याइतपत त्यानं मिळालेल्या संधींचं सोनं केलंय. एकीकडे अतिशय संवेदनशीलतेला हात घालणारी गीते आणि पटकथा, तर दुसरीकडे मानवी स्वभावातील विकृतींवर भाष्य करणारी गंभीर स्वरूपाची मालिका... हे दोनही प्रकार वरुणने लीलया हाताळले.

हे कमी म्हणून की काय, म्हणून तो स्टँडअप कॉमेडीही करतो. त्याच्या ‘ऐसी तैसी डेमोक्रॅसी’ नावाच्या कार्यक्रमाचे देश-विदेशांत प्रयोग होतात. इंटरनेटवर त्याचे ‘गंभीर विनोद’ प्रचंड लोकप्रिय ठरताहेत. भारतीय मानसिकता, त्यांमधील विरोधाभास यांचं सूक्ष्म निरीक्षण करणारा वरुण येथील समाजकारण, राजकारण यांच्यावर उपहासात्मक भाष्य करून आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. आयआयटी ग्रॅज्युएट असलेला हा इंजिनिअर तरुण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून लेखक बनण्यासाठी मुंबईत आला आणि एकापाठोपाठ उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती करू लागला. दर वेळी असं वाटत राहतं, वरुणचे हे सर्वोत्तम काम आहे. मात्र पुढच्या वेळी तो पूर्वीपेक्षा अधिक उत्तम काम करून दाखवतो. दर्जा आणि सातत्य यांचं मनोरंजनक्षेत्रातील आजच्या काळातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वरुण ग्रोवर.

अशा या हरहुन्नरी अवलिया तरुणाची जडण-घडण, त्याचे मनोविश्व आणि सौंदर्यदृष्टी, लेखनातील प्रेरणा या सर्वांचा वेध घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीद्वारे करण्यात आलाय...

प्रश्न - वरुण, येत्या जानेवारीत तू वयाची चाळिशी पार करतोयस, पण तुला स्क्रीनवर पाहताना तुझ्या वयाचा बिलकुल अंदाज येत नाही. तुझ्या शिडशिडीत अंगकाठीकडे पाहिलं की, तू 28-29 वर्षांचाच असशील, असं वाटतं. असो. आपल्या मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नाकडे येतो. तुझा जन्म हिमाचलचा. मात्र डेहराडून-उत्तराखंड आणि लखनौ- उत्तर प्रदेश या ठिकाणीही तू आयुष्याची काही वर्षे व्यतीत केलीस. याचं कारण तुझं शिक्षण होतं, की घरच्यांची नोकरी?

 • वडिलांची नोकरी हेच मुख्य कारण होतं. ते मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अर्थात ‘एमईएस’मध्ये तहहयात कार्यरत होते. त्यामुळे ठरावीक वर्षांनंतर त्यांची बदली होत राहायची. सुरुवातीला हिमाचल, मग डेहराडून, तिकडून लखनौ आणि मग चंदिगड असा बदल्यांचा (आणि सोबतच आमचाही) प्रवास होत राहिला. आम्ही बिऱ्हाड हलवलं की, माझी आई नव्या ठिकाणी शिक्षिकेची नोकरी बरोबर शोधून काढायची आणि प्रत्येक ठिकाणी शिक्षिका म्हणून तिला खूपच सन्मान मिळायचा.

प्रश्न - आई-वडील दोघेही उच्चशिक्षित आणि नोकरदार असल्याने तुझ्या घरी अभ्यासाचे वातावरण असेलच. शाळा-कॉलेजात असताना अभ्यासात तुझी गती कशी होती? तेव्हा मोठा होऊन काय बनण्याचं स्वप्न पाहायचास ?

 • बचपन से ही मुझे पढ़ने- लिखने का बहुत शौक था. माझा लहान भाऊ ‘तरुण’ शाळेत कायम पहिला क्रमांक मिळवायचा. तसा मीसुद्धा पहिल्या तीनमध्येच असायचो. आम्ही दोघं भाऊ शालेय पाठ्यपुस्तकांच्या बरोबरीनं बाल-कादंबऱ्या आणि नियतकालिकांचा अक्षरशः फडशा पाडायचो. आणि मोठा झाल्यावर लेखक व्हायचं, हे मी लहानपणीच मनाशी पक्कं केलं होतं; मात्र लेखक होतात कसं, हे मला ठाऊक नव्हतं. बरं मी पडलो लाजाळू, त्यामुळे याविषयी कुणालाही काही विचारलं नाही. एकदा कुठल्यातरी पुस्तकात एक ओळ वाचली होती. ‘चांगले पुस्तक तेच असते, जे वाचताक्षणी आपल्या मनात येतं की, यार या पुस्तकाचे लेखक/ लेखिका आपले मित्र/ मैत्रीण का नाहीत!’ मलाही नेहमी असंच वाटायचं.

मग मी लेखकांच्या नावाकडे लक्ष द्यायला लागलो. त्यापूर्वी, पुस्तकं ‘जादूई’ वाटायची. असं वाटायचं की, ती अनंत काळापासून अस्तित्वातच आहेत. जणू ती कुणी लिहिलेलीच नसावीत, तर थेट प्रकटच झाली असावीत. मग हळूहळू कळायला लागलं की, पुस्तकं प्रकट व्हायलासुद्धा एक निमित्त लागतं- एक जरिया चाहिये और वो जरिया होता है लेखक.

प्रश्न - आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचं स्वप्न कुणाचं नसतं? पण अभ्यासात जेमतेम असणारी मुलं अशा मातब्बर संस्थांच्या प्रवेश परीक्षांना बसायलाही घाबरतात. तू मात्र प्रवेश परीक्षा पास करून आयआयटी बनारस इथे प्रवेश मिळवलास आणि 2003 मध्ये इंजिनिअर बनून आयआयटीतून बाहेर पडलास. या प्रवासाविषयी काय सांगशील...?

 • आयआयटीची प्रवेश परीक्षा पास होणं, ही माझ्या आयुष्यातील तोपर्यंतची सर्वांत मोठी अचिव्हमेंट होती. अर्थात आज माझ्या लक्षात येतंय की, मेरिटची ही सगळी संकल्पनाच मुळी पोकळ आहे. मुळात आयआयटीपर्यंत पोहोचण्यामध्ये माझ्या मेहनतीचा जितका वाटा होता, तेवढाच- किंबहुना त्याहून जास्त वाटा- मला मिळालेल्या प्रिव्हिलेजचाही होता. एका मध्यमवर्गीय सवर्ण हिंदू परिवारात जन्म घेणे म्हणजे लॉटरी लागण्यासारखंच असतं. सर्वसामान्य लोकांना मिळत नाहीत, अशा अनेक संधी मला त्यामुळेच मिळत गेल्या. पण तेव्हा माझ्यासाठी तीच मोठी अचिव्हमेंट होती. त्यामुळे प्रवेशपरीक्षा पास झाल्यानंतर 1999 मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यासाठी मी बनारसला (वाराणसी) आलो. आणि बनारस हिंदू विद्यापीठ व बनारस शहराच्या प्रेमात आकंठ बुडालो. त्या चार वर्षांनी मला आयुष्यभराची नाती, समज आणि आत्मविश्वास दिला. त्या बळावरच तर मी अजूनही टिकून आहे.

प्रश्न - आयआयटीतून बाहेर पडल्यावर तू थेट पुण्यातल्या एका आयटी कंपनीत रूजू झालास. त्या काळात आयटी फिल्डचं तरुणाईला प्रचंड आकर्षण होतं. पैसाही बक्कळ असतो या क्षेत्रात. तू मात्र 2002 ते 2003 अशी जेमतेम एक वर्षच नोकरी करून या क्षेत्राला रामराम ठोकलास. काय घडलं होतं तेव्हा?

 • आयआयटीतून पास झाल्यावर मी पुण्यात नोकरी स्वीकारली ते तिथं एफटीआयआय आहे म्हणूनच, शिवाय मुंबई शहर पुण्याजवळ होते हेही एक कारण. मुझे IT की नौकरी का कोई शौक नहीं था और जॉइन करने के बाद तो बची खचि इच्छा भी भस्म हो गयी. केवळ 11 महिन्यांतच नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट मुंबई गाठली.

प्रश्न - आपल्या मुलाने आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण पूर्ण केले असेल, तर पालक त्याच्या भविष्याविषयी निश्चिंत होऊन जातात. पण तू तर गलेलठ्ठ पगार, सुखासीन आयुष्य सोडून अनिश्चिततेने भरलेला मार्ग निवडण्याचा निर्णय घेतलास, तेव्हा तुझ्या आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती?

 • माता-पिताने बचपन से ही अपने रास्ते ख़ुद चुनने की सीख दी है, और हमेशा बड़ी ईमानदारी से इसका हिस्सा निभाया भी है. पुण्यातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून मुंबईत लेखक बनण्यासाठी जातोय, असं जेव्हा मी वडिलांना सांगितलं; तेव्हा ते अजिबात रागावले नाहीत, ना त्यांनी कुठली शंका घेतली. ‘पुढे कसं होणार? तू नीट विचार केलायंस का?’ असं एकदाही त्यांनी विचारलं नाही. उलट तत्परतेने ते इतकंच म्हणाले, ‘अगर कोई जरूरत हो तो बता देना.’ आईची प्रतिक्रियाही काहीशी अशीच होती. यहाँ एक बार फिर मेरा प्रिव्हिलेज, मेरे जन्म की लॉटरी, मेरे काम आयी।

प्रश्न - महाराष्ट्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य अत्रे. लेखक, कवी, पत्रकार, शिक्षक, संपादक, राजकारणी, नाटककार, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका लीलया पेलणारे अत्रे हे उच्च कोटीचे सटायरिस्टही होते. शिव्या ही वाङ्‌मयातील हिंसा असेल तर विनोद ही वाङ्‌मयातील अहिंसा आहे, असे ते म्हणायचे. त्या अर्थाने तू गांधीवादीच भासतोस. तुझे विनोद तसेच तर आहेत. एकूणच कॉमेडी, सटायर आदींविषयीची तुझी स्वतःची फिलॉसॉफी काय आहे?

 • विनोदाविषयी माझी समज तयार झाली ती शरद जोशी, हरिशंकर परसाई आणि श्रीलाल शुक्ल या हिंदी साहित्यातील महारथींना वाचून. त्याचं लेखन वाचून व्यंग्य किंवा सटायरविषयीचं माझं आकलन वाढलं. सटायर में एक बहुत गहरा सच, अक्सर कड़वा सच, होना चाहिए जिसे बिना कॉमेडी की मदद की कहना नामुमकिन सा ही हो।

प्रश्न - ‘आजच्या काळात विनोद हे विरोधकांच्या (लिबरल) हातातील प्रभावी अस्त्र आहे,’ असं गेल्या वर्षी रामचंद्र गुहा आपल्या एका लेखात म्हणाले होते. सध्याची राजकीय परिस्थिती, लोकशाही अशा अनेक गोष्टींवर व्यंग्यात्मक शैलीत भाष्य करणारा तुझा ‘ऐसी तैसी डेमोक्रॅसी’ हा स्टॅण्डअप कॉमेडी शो सध्या प्रचंड लोकप्रिय ठरलाय. देश-विदेशांत जाऊन तू हा कार्यक्रम सादर करतोयस. गुहांच्या विधानाशी तू कितपत सहमत आहेस?

 • संकुचित विचारांच्या मंडळींशी-झुंडीशी लढण्यासाठी पुरोगामी/लिबरल मंडळींकडे व्यंग्याशिवाय दुसरे कुठले अस्त्र उरले नसेल, तर ते ही लढाई लढण्यापूर्वीच हरले आहेत असं म्हणावं लागेल. कुठल्याही कलेचा उद्देश समाज-परिवर्तन घडवणे हा नसतोच. कलेचा मुख्य हेतू असतो बदलत्या समाजाचं डॉक्युमेंटेशन करणं, समाजाला आरसा दाखवत त्याची स्तुती किंवा टीका करणं. आपल्या देशातील व संस्कृतीतील विविधता वाचविण्यासाठी असंख्य लोक आपापल्या स्तरावर लढाई करत आहेत. कला फार तर त्यातला छोटासा भाग आहे, असं म्हणता येईल.

प्रश्न - सध्या स्टॅण्डअप कॉमेडी हा कलाप्रकार तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतोय. हा कलाप्रकार मतभेद व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम बनलंय. तू आणि तुझ्यासारखी अनेक तरुण मंडळी स्टॅण्डअप कॉमेडीच्या माध्यमातून राजकीय भूमिका उघडपणे घेताना दिसतात. सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर मुख्य प्रवाहातील माध्यमे बिचकत-बिचकत टीका करत असताना, तुम्ही मंडळी मात्र अतिशय निर्भयपणे व्यंग्यबाण सोडता; हे धैर्य येतं कुठून?

 • ही काय आजची गोष्ट नाही. अशी टीकाटिप्पणी कायमच होत आलीय; आपल्या संस्कृतीत विदूषकांची मोठी परंपरा राहिलेली आहेच की! राजाच्या दरबारात एक विदूषक नेहमी असायचा. त्याच्याकडे राजावरही व्यंग्य करण्याची ताकद असायची. वर खुद्द राजाच त्याला पगार आणि सन्मान देऊ करायचा. स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे हास्यकवी संमेलनाची परंपरा राहिली, जी आजतागायत सुरू आहे. प्रत्येक काळात विदूषक आणि कवी जागल्याची भूमिका निभावतच आलेत. आज तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरणारे स्टँडअप कॉमेडियन्स याच परंपरेचे वाहक आहेत.

प्रश्न - अच्छा! म्हणून तुझ्या टि्वटर हँडलचे नाव विदूषक आहे तर, मग आम्हाला सांग, या पठडीतील कुठल्या कार्यक्रमांनी तुला सर्वाधिक प्रभावित आणि प्रेरित केले?

 • मी सर्वाधिक भारावून गेलो ते दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या जसपाल भट्टी यांच्या ‘फ्लॉप शो’ या मालिकेने. याशिवाय, शेखर सुमन यांचा ‘मूव्हर्स अँड शेकर्स’ हा कार्यक्रमही मला फार आवडायचा. सध्या अमेरिकन वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या ट्रेव्हर नोव्हा आणि जॉन ऑलिव्हर यांच्या लेट नाईट शोजमधूनही शिकण्यासारखं खूप असतं.

प्रश्न - वरुण, तुझ्या आजवरच्या प्रवासाकडे पाहिलं तर निदा फाजली यांचा एक शेर आठवतो- ‘एक आदमी में छुपे होते है दस-बीस आदमी, जिस को भी देखना हो, कई बार देखना.’ एकीकडे उच्च दर्जाचा सटायरीस्ट, त्याचवेळी उत्तम कथाकार, राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा गीतकार आणि बरेच काही... कसं काय जमून येतं हे सगळं?

 • मी कधीच काही प्लॅन केलं नाही. सगळं आपोआपच घडत गेलं. मुझे लिखने का चस्का है और अलग अलग एक्सपिरियन्स लेने का भी. मला सगळं लिहायचं आहे- प्रत्येक प्रकारचे लेखन करायचे आहे. प्रत्येक भाषेतील एक सिनेमा, हर तऱ्हेच्या कागदावर छापल्या जाणाऱ्या कादंबऱ्या. मला सगळं करून पाहायचं आहे. हां, पण सगळं काही मला करता येणार नाही, आयुष्य लहान आणि मार्ग अरुंद आहेत. पण या सगळ्यात मला जे सर्वाधिक प्रिय आहे- गीतलेखन, कॉमेडी व सिनेमा- हे तीनही प्रकार लिहिण्याचा प्रयत्न केलाय आणि हळूहळू त्यात पुढे सरकत आहे आणि खरं तर अजूनही बरंच काही शिकत आहे. त्यात खंड पडलेला नाही.

प्रश्न - राज्यसभा टीव्हीवरील मुलाखतीत तू म्हणाला होतास की- ‘तुझ्यातही उच्चवर्णीय पुरुषी पूर्वग्रह’ आहेत. या पूर्वग्रहांची जाणीव तुला कधी झाली? आणि ते तू यशस्वीपणे दूर कसे केलेस? पूर्वग्रह यशस्वीपणे दूर केलेस, असा दावा मी यासाठी करतोय की, वाराणसीत प्रेतं जाळण्याचे काम करणाऱ्या डोम समाजातील मुलाचे भावविश्व, जातिभेद, अनुभव याचं जिवंत चित्रण तू लिहिलेल्या ‘मसान’ या सिनेमाच्या पटकथेत आलंय. अतिशय वास्तववादी वाटणाऱ्या या सिनेमाला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. या प्रवासाविषयी थोडं विस्ताराने सांगशील?

 • आपण ज्या घरात, समाजात, जातीत किंवा धर्मात जन्म घेतो, त्या प्रत्येक घटकाचा प्रभाव आपल्यावर खूप खोलपर्यंत असतो. कसंय, विविध प्रकारच्या मिथकांवर आणि श्रद्धांवर (belief) मानवी विश्व आधारलेलं आहे. त्या मिथक आणि श्रद्धांशिवाय हा समज, इथली शांती आणि भ्रामक स्थैर्य (illusion of stability)- सगळंच उद्‌ध्वस्त होऊन जाईल.

पैसा काय आहे? दहा रुपयांच्या नोटेवर लिहिलेले असते, ‘मै धारक को दस रुपये अदा करने का वचन देता हूँ!’ म्हणजेच ती नोट दहा रुपये नसून दहा रुपयांचे वचन आहे. मग खरे दहा रुपये आहेत कुठे? त्यांचं अस्तित्वच नसतं, असतं ते केवळ ते देण्याचे वचन. धर्म, जात आणि लिंगाप्रमाणेच पैसा हीसुद्धा श्रद्धेवर आधारलेलीच व्यवस्था आहे. मात्र या साऱ्या व्यवस्था आपल्या आत रुतून बसतात, खूप खोलवर. बिलिफ सिस्टीममध्ये आपण ज्या स्तरावर आहोत, त्यामुळंच जीवनातल्या अनेक गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत; हे जेव्हा हळूहळू कळायला लागतं, तेव्हा तुमचा अहंकार गळून पडायला लागतो. तो गळायलाच हवा. अनेक लोक या परिवर्तनाला विरोधही करतात.

जसं सुरुवातीच्या काळात माझी देखील पक्की धारणा होती की, शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण असणं चुकीचं आहे. कारण आरक्षणाबद्दल न वाचताच, केवळ माझ्या भोवतालातून विरोधाची ही भूमिका स्वीकारली होती आणि त्यावेळी मला या भूमिकेची चिकित्साही करावीशी वाटली नाही. परंतु जसं-जसं तुमच्या विचारांत मोकळेपणा येतो, नवनवीन शंकांनाप्रश्नांना तुम्ही तुमच्या आत येऊ देता; तसतसे अशा धारणा-संकल्पनांचे आंधळेपण खुपायला लागतं... माझ्याही बाबतीत हेच घडलं.

प्रश्न - तुझ्या कॉमेडीमधून गांधीवाद डोकावतो, असं मी वर म्हणालो. मात्र ‘सेक्रेड गेम्स’ ही आजकालची सर्वाधिक चर्चिली जाणारी लोकप्रिय वेबसिरीजही तुझ्याच लेखणीतून साकारलीय. या सिरीजमध्ये हिंसा, शिवीगाळ आणि अन्य अनेक ‘तामसिक’ गोष्टी पाहायला मिळतात. सात्त्विक स्वभावाच्या वरुणचा अशा प्रकारच्या लेखनातही हातखंडा कसा?

 • तमस और उजाला... अंधकार आणि प्रकाश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाचे अस्तित्व असेल, तरच दुसऱ्याच्या असण्याला अर्थ आहे. आणि हो, ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अभ्यासाला वाव दिसतो, ती गोष्ट करून पाहायला मला आवडते. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीमध्ये अशाच अनेक वैशिष्ट्यपूर्ण थीम्स होत्या... जिनसे भिड़ने का मन किया तो हम कूद गए!

प्रश्न - आता प्रत्येकाला अगदी अल्प दरात रोज एक-दोन जीबी डेटा मिळू लागलाय. त्यामुळं इंटरनेटचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण झाले आहे. तू इंटरनेटचा सुरुवातीचा काळ पाहिला आहेस. जेव्हा अगदी मोजक्या लोकांकडे ही सुविधा उपलब्ध होती, तेव्हापासून तू सार्वजनिकरीत्या इंटरनेटशी जोडला गेलास... आणि अगदी अलीकडे ‘इंटरनेट आणि आपण’ याविषयीचा तुझा एक स्किटही चांगलाच लोकप्रिय ठरलाय. सोशल मीडिया आणि व्हर्च्युअल स्पेसमुळे सामाजिक व्यवहारांमध्ये काय बदल जाणवतात तुला?

 • जग जवळ आलंय ते इंटरनेटमुळे. जग जवळ आलंय पण लोकांच्या मनातली भीतीही वाढलीये. आता अगदी जगातल्या एका टोकावरील निर्वासितांचा प्रश्नही आपल्या दाराशी आल्याचा भास होतोय आणि मग तुमच्या आमच्यातील या भीतीचा वापर करत स्थानिक नेते लोकांना विभागण्याचं कामही करू शकतात.. याउलट, दूरवरचं दु:खही आपल्याला आपलंच वाटू शकतं. अमेरिकेतील एखाद्या शाळेतील गोळीबाराचे फोटो पाहून आपल्यालाही रडू कोसळतं. सद्य:स्थितीत जग एका हायपर-इमोशनल स्टेट म्हणजेच अति- भावनिक अवस्थेतून जात आहे. सब कुछ बहुत तेजी से हो रहा है और बहुत गजब की इंटेन्सिटीसे. या गदारोळातच हवामान बदलासारख्या समस्या आपला फासा टाकून म्हणताहेत, ‘आओ बेटा, ये बाजी भी हार लो!’

असं असलं तरी कलेसाठीचा हा सर्वोत्तम काळ आहे. प्रत्येक संकट कलेला अधिक सशक्त करते, मात्र जगासमोरच्या अडचणीही वाढवून ठेवते.

प्रश्न - संकटावरून आठवलं, ‘देश संकट में है’ हा सेक्रेड गेम्समधील तू लिहिलेला संवाद चांगलाच लोकप्रिय ठरलाय. तुझ्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला काय वाटतं, खरंच देश संकट में है?’

 • देशाचं काय घेऊन बसलास, सगळं जगच संकटात आहे! आणि याचं सर्वांत महत्त्वाचं कारण जे मी आत्ताच म्हणालो- हवामान बदलाची समस्या, ज्याकडे अजूनही दुर्लक्षच केले जाते.

प्रश्न - लेखक, पटकथाकार, गीतकार, स्टॅण्डअप कॉमेडीयन अशी विविध प्रांतांतील तुझी मुशाफिरी सर्वपरिचित असली तरी, तू दशकभरापासून बालसाहित्य लिहितोस याची अनेकांना कल्पना नाही. ‘पेपरचोर’ या तुझ्या पुस्तकाविषयी आणि ‘बिक्सू’ या ग्राफिक नॉव्हेलविषयी आम्हाला थोडं सांग.

 • लहान मुलांसाठी गेली तीन दशकं काम करणाऱ्या एकलव्य या संस्थेद्वारे ‘चकमक’ ही पत्रिका प्रकाशित होते. या पत्रिकेसाठी मी जवळपास दहा वर्षांपासून कथा, कविता आणि लेख लिहितोय. लहान मुलांसाठी लेखन करायला मला खूप आवडतं. कारण तिथे तुम्हाला स्वतःमध्ये खोलवर बुडी मारावी लागते आणि स्वतःला सोपं करत जावं लागतं. फिर समझ आता है की हम आम जीवन में कितना उलझ गए हैं, कितनी जटिलता में तैर रहे हैं। आणि ‘बिक्सू’विषयी म्हणशील तर लहान मुलांसाठीच्या या ग्राफिक नॉव्हेलचं बरचसं काम माझ्या बायकोने- राजकुमारीने- केलं आहे. लेखन आणि चित्रं- सगळं तिने स्वतःच केलंय. मी केवळ लेखनात थोडं साह्य केलंय.

‘पेपरचोर’ हे माझं एकमेव हिंदी पुस्तक आहे, त्यात लहान मुलांसाठी मी लिहिलेल्या दहा कथांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रश्न - भारत हा जगातील सर्वांत युवा देश आहे, म्हणजे सगळ्यांत जास्त युवक सध्या भारतात आहेत. पण हे मिलेनियल्स (1990 नंतर जन्मलेल्या युवकांसाठी वापरला जाणारा शब्दप्रयोग) आजकाल टिकेचा विषय बनले आहेत. पालक, नातेवाईक इथवर ठीक होतं, आता तर अर्थमंत्र्यांनीदेखील मंदीचे खापर ‘मिलेनियल्स’वर फोडलंय. आजच्या युवकांच्या सामाजिक आणि राजकीय समजेविषयीही नेहमीच शंका उपस्थित केली जाते. याविषयी तुझं काय मत आहे?

 • प्रत्येक काळातील युवक हा असाच असतो. युवा का काम ही है सबसे गाली खाना लेकिन अपने नए बिम्ब, नए मानक, नए हवाई किले गढ़ते रहना भी. माझ्या मते, मिलेनियल्स ही माध्यम-निर्मित संकल्पना (media generated idea) आहे, जिला शुद्ध मार्केटिंगही म्हणता येईल. आजचा युवक हा कुठल्याही काळातल्या युवकांसारखाच आहे. थोड़ा परेशान, थोड़ा रोमांटिक, थोड़ा गुस्सैल, थोड़ा delusional, थोड़ा भटका हुआ, थोड़ा सुधरा हुआ.

प्रश्न - तू युवकांविषयी किती छान बोललास रे. आता शेवटच्या प्रश्नाकडे वळू यात. खरं तर हा प्रश्न सुरुवातीलाच विचारायला हवा होता, पण जाणीवपूर्वक शेवटी विचारत आहे. त्याचं कारण तू जे उत्तर देशील ते आमच्या युवा मित्र-मैत्रिणींना वाचण्या-पाहण्यासाठी मदत करेल. तुझ्या व्यक्तिमत्त्वात व लेखनात साहित्य आणि सिनेमा यांचा मोठा प्रभाव जाणवतो. कुठल्या साहित्यिकांनी आणि दिग्दर्शकांनी तुझ्यावर प्रभाव टाकला?

-बडी लम्बी लिस्ट है. पर सरसरी तौर पर कुछ बताता हूं. अमृता प्रीतमच्या कथा आणि कविता, उदय प्रकाश यांच्या कथा, मनोहर श्याम जोशी यांच्या कादंबऱ्या, मंटोचे ‘मिठा जहर’सारखे किस्से, अमृत लाल वेगड यांची प्रवासवर्णनं, विनोदकुमार शुक्लांचे कुतूहलांनी भरलेले साहित्यिक जग, विसल्वा जिम्बोर्स्काच्या कविता, टेड चियांग आणि स्टीफन किंग यांच्या विज्ञानकथा यांनी मला प्रभावित केलंय. सिनेमांबाबत सांगायचं झालं तर पॉल थॉमस अँडरसन, ग्रेटा गर्विग, फिबी वॉलर ब्रिज, सिडनी ल्यूमेट, सत्यजित रे, गुलजार, मार्टिन स्कोर्सेसी, बोंग जून हो, माइकल हनेके आणि अल्फोंसो कूरों यांच्या कलाकृती मला प्रचंड भुरळ घालत आल्यात.

लेखन : समीर शेख

Sameershaikh7989@gmail.com

Share on Social Media

डॉटर ऑफ बाबासाहेब

हिनाकासैर खान-पिंजार

संगीत-क्षेत्रातल्या भल्या-भल्यांची नजर तिच्याकडे वळली, ती पम्मा बखलपुरीया यांनी लिहिलेल्या ‘फॅन बाबासाहेब दी’ या गीताने. तिच्या पॉप अंदाजातील या गाण्याला तरुणांनी चांगलेच डोक्यावर घेतले. अवघ्या 16 व्या वर्षी गायिलेल्या या गीताने तिला ओळख मिळवून दिली. तिच्या दहा वर्षांच्या सांगीतिक कारर्किदीतली ही सर्वांत मोठी घटना होती. लोक या छोट्या मुलीकडे जबाबदार गायिका म्हणून पाहू लागले.

मैं धीह हां बाबासाहिब दी,

जिन्हा लिखिया सी संविधान...

ऐसा बब्बर शेर सिंग जिने

कलम बनायी तीरं

जो हक दे सच ले लढिया,

साड्डी बदलती तकदीरं

वो बने मसिहा कौमलै...

...मैं फॅन हुं ऐसे सोच दी,

मै फॅन हुं बाबासाहेब दी.

‘फॅन बाबासाहेब दी’ युट्यूबच्या प्ले-लिस्टमध्ये हे गाणं रिपीट मोडवर होतं. पंजाबी अवगत नसल्याने सुरुवातीला न कळलेले शब्द वारंवार ऐकताना हळूहळू आकळू लागले. भाषेचा अडसर दूर होऊन अर्थही उमगू लागला. डॉ.बाबासाहेबांना ‘बब्बर शेर’ अशी प्रेमळ साद घालणाऱ्या गाण्यात व ते गाणाऱ्या ‘पंजाबी कुडी’त एक स्वैग होता. अवघ्या 16-17 वर्षांच्या या गायिकेचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. तिचे एक्स्प्रेसिव्ह डोळे आणि बोलका चेहरा नुसतंच गाणं नव्हे, तर विचार घेऊन येत असल्याचं उघडपणे जाणवत होतं. मग युट्यूबच्या महासागरात पुन्हा डुबकी मारली, तर तिच्या आजवरच्या सर्वच गाण्यांमध्ये समान धागा दिसत होता. तो म्हणजे विचारांचा, मूल्यांचा आणि वास्तवांच्या जाणिवांचा.

गिन्नी माही! बाबासाहेबांची लेक म्हणवून घेणारी ही पंजाब दी शान! पंजाबात उदयास येऊ लागलेल्या ‘चमार पॉप’ संगीतातील आजच्या घडीचा एक खणखणीत आवाज! वय अवघे 20 वर्षे. पण तिच्या आवाजाची, तिच्या गायिकीची भुरळ पंजाबपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. भारताच्या संगीतक्षेत्रात विद्रोही गीतांना नव्या सूरसाजासह ‘ट्रेडिंग’ करण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. पंजाबी लोकगीत असो, पॉप असो, रॅप असो- आपल्या गायिकीने वेड लावत संविधानातील समतेचा विचार ती ‘बुलंद’ करत निघाली आहे. आणि म्हणूनच नुसत्या पंजाबच्याच नव्हे, तर देश-विदेशांतल्या तरुणांसाठी गिन्नी माही आयकॉन ठरत आहे.

तिचं वय पाहता, या वयातील तरुण-तरुणींचा एक तर प्रेम-विरह गीते किंवा उडत्या चालीची, अर्थहीन शब्दांची पेरणी असलेल्या गीतांमध्ये रमण्याकडे कल असतो. गिन्नी मात्र त्याच वयात अर्थपूर्ण गीतांना आपल्या आवाजाचा साज चढवून पेश करत आहे. ही गिन्नी पंजाबच्या दोआब पट्‌ट्यातील जालंधर शहरातील. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी पंजाब हे अनुसूचित जातींतील सर्वाधिक लोकसंख्या असणारे (32 टक्के) राज्य आहे. आणि त्यातही दोआबमधली लोकसंख्या पंजाबच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 45 टक्के. त्याच पट्‌ट्यात जालंधर हे शहर येतं. आधुनिकेनं नटलेल्या चकचकीत, सुटसुटीत शहरी रुपड्याच्या जालंधरला लागून प्रचंड दाटीवाटीचं अबदपुरा नावाचं उपनगर आहे. नागमोडी वळणांचा, गर्दीनं गजबलेला हा भाग प्रामुख्यानं रविदासी समुदायाच्या लोकवस्तीचा म्हणून ओळखला जातो. याच अबदपुरामध्ये गिन्नी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे.

ती राहत असलेल्या वस्तीपासून दीड किलोमीटरच्या अंतरावर पूर्वापार चालत आलेल्या सात स्मशानभूमी आहेत. भारतात भूप्रदेश कुठलाही असो, जातिभेदांचं वास्तव सगळीकडे सारखंच आहे. आजवर ते आमोरासमोर होतं, पण अलीकडच्या काळात हे वास्तव सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अधिकच गहिरं होत चाललं आहे. या माध्यमावर सामाजिक संकेत धुडकावून उघड-उघड द्वेष करणे, जातींचा उल्लेख व शिवीगाळ हे प्रकार तर ‘नॉर्मलाईज’ होत चालले आहे. तिथं याच प्लॅटफॉमवरून समता व मानवतावादी विचार रुजवणारी गिन्नी वेगळी ठरत आहे.

गिन्नी! खरं तर गुरकँवल भारती. तिचं मूळ नाव गुरकँवल, पण तिला घरात लाडाने गिन्नी म्हणतात. तिचा जन्म 26 नोव्हेंबर 1999 रोजी राकेशचंद्र आणि परमजितकौर यांच्या घरी झाला. तिचे वडील तिचा जन्मदिवस खास मानतात, कारण 26 नोव्हेंबर हा भारताचा संविधान दिवस आहे. तिच्या पाठी दोन भाऊ आहेत. तिचं संयुक्त कुटुंब आहे. त्यामुळे घरात आजी, काका-काकू आणि चुलत बहीण-भावंडंही आहेत.

तिच्या वडिलांना आणि मोठ्या काकांना संत रविदास आणि डॉ.बाबासाहेबांविषयी प्रचंड आस्था. त्यामुळेच त्या दोघांशी निगडित कार्यक्रम असल्यास वडील व काका जात, त्या वेळी ते गिन्नीलाही घेऊन जात. घरात कायमच संत रविदास आणि आंबेडकरांशी निगडित पुस्तके-मासिके येत, त्यामुळे या दोन्ही महापुरुषांविषयी ऐकतच ती मोठी होत होती. आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव संपूर्ण कुटुंबावरच होता आणि त्याचा कळत-नकळत प्रभाव तिच्यावरही होऊ लागला होता. त्याचदरम्यान एक साधी घटना घडली. गिन्नी सात वर्षांची असेल- ती टीव्हीवर एक मालिका पाहत होती. त्या मालिकेला संगीताची पार्श्वभूमी होती. त्यामुळे मालिकेत सहा-सात गाण्यांचासुद्धा समावेश होता. त्यातलंच एक गाणं ती गुणगुणायला लागली होती.

तिच्या वडिलांनी- राकेश भारती यांनी तिची सुरेल गुणगुण ऐकली. गिन्नी सुरात गात आहे, तिचा आवाजही चांगला भासतोय, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही तिचं गाणं ऐकवलं आणि खात्री करून घेतली की, आपण केवळ मुलीच्या प्रेमापोटी आनंदून गेलोय, की खरंच ती चांगलं गात आहे. पण सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं. आपली लेक गात्या गळ्याची आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी तिला गायनासाठी प्रोत्साहन द्यायचं ठरवलं. तिथूनच तिचा संगीताचा प्रवास सुरू झाला. तिची संगीतातील रुची वाढावी म्हणून वडिलांनी जालंधरमधील लाला जगत नारायण स्कूलमध्ये प्रवेश घेऊन दिला.

गिन्नी सांगते, ‘‘घरात संगीतांची कुठलीच पार्श्वभूमी नाही. माझ्या घरातून मी पहिली गाणारी व्यक्ती. पप्पांमुळे मला संगीतात मुशाफिरी करण्याची संधी मिळाली. ते कायमच माझ्या पाठीशी राहिले आहेत. गाणं म्हणजे एक तऱ्हेचं एक्स्प्रेशनच. ते हळूहळू माझं पॅशन झालं. आपल्याला गायक व्हायचंय, हे मनाशी पक्कं होत गेलं. शौक पैदा हुवा तो सबकुछ अच्छा ही लगने लगा.’’

गिन्नीला त्या लहानपणातला दिनक्रम आठवत नाही, पण तिचे वडील राकेश भारती सांगतात, ‘‘गिन्नीचं संगीत आणि शालेय शिक्षण असं दुहेरी ट्रेनिंग सुरू झालं होतं. त्यामुळे तिचा दिनक्रम खूप जास्त व्यस्त झाला होता. पहाटे साडेपाचला उठून दोन तास रियाज, मग शाळेसाठी निघणं, शाळा झाल्यावर संगीतशिक्षण आणि पुन्हा घरी आल्यावर दोन तासांचा रियाज. संगीतात रुची निर्माण झाल्यामुळे ती खूश होती.’’

घरात आई व आजीच्या मुखात लोकगीतं असत, त्यामुळे सुरुवातीला गिन्नीदेखील भक्तिगीते-भजने अशाच प्रकारचं गायन करत होती. तिचा रियाज जोरदार सुरू होता. त्यानंतर दोन वर्षांनी वयाच्या नवव्या वर्षी तिला जालंधरजवळच्या जंडियाला या गावच्या जत्रेत गायची संधी मिळाली. तिचा तो पहिलाच ‘लाइव्ह परफॉर्मन्स’ होता. त्या जत्रेत गिन्नी गाणार म्हणून आई-वडील, आजी, काका सगळेच गेले होते. स्टेजवरून जनसमुदाय पाहून गिन्नी घाबरेल किंवा तिने जर गायलाच नकार दिला तर...? अशी कुटुंबीयांनाच भीती वाटू लागली. पण तसं काहीही घडलं नाही. गिन्नीने ‘सुमरिन बिन गोता खाओगे’ हे भजन म्हटलं. तिच्या आवाजाला उपस्थितांकडून भरपूर दाद, प्रेम मिळाले. गिन्नीकडे नुसताच गळा नव्हता, तर गीत सादरीकरणाचा विश्वासही होता. त्यानंतर तिने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.

तिच्या गाण्याचा प्रारंभ शास्त्रीय व भक्तिगीतांनी झाला. संत रविदासांना आळवणारी गीते ती सादर करू लागली. ‘‘अपने गुरुजनोंको याद करना है, अपने परिवार के लिए आशिष पाना है और फिर अपना विचार रखना है, बस यहीं सोच थी!’’ असं ती तिच्या या प्रारंभाविषयी सांगते. शालेय-आंतरशालेय स्पर्धांमध्ये ती सहभाग घेऊ लागली. तिला आसपासच्या परिसरातून भक्तिगीते व भजनासाठी निमंत्रणे येऊ लागली. अल्पावधीतच जालंधरच्या परिसरात गिन्नी माही हे नाव लोकप्रिय झालं होतं. हळूहळू ती रविदासी गाण्यांबरोबरच डॉ.बाबासाहेबांचा विचारही गाण्यांतून मांडू लागली होती. तरी ते सारं एका मर्यादित अर्थाने स्टेज शोजपुरतेच मर्यादित होते.

अमर ऑडिओ या जालंधरस्थित म्युझिक कंपनीपर्यंत तिची ‘खनक’ पोहोचली होती. त्यांनी तिला बोलावून घेतले आणि अल्बममध्ये गाणं गायची संधी दिली. मग वयाच्या 15 व्या वर्षी गिन्नीचा ‘गुरां दी दिवानी’ हा पहिला अल्बम आला. त्यानंतर 2016 मध्ये ‘गुरूपुरबा है कांशीवाले दा’ हाही अल्बम आला, हे दोन्ही अल्बम हिट झाले. या दोन्ही अल्बममध्ये संतांची आराधनाच होती. तिच्या वडिलांना मात्र वाटू लागलं की, तिच्या गाण्यांमधून संदेश पोहोचायला हवा. वास्तवाचं भान आणि प्रेरणा तिच्या गीतांतून मिळायला हवी, केवळ शब्दबंबाळपणा असून उपयोग नाही. कुठल्याही व्यक्तीला त्यातून काही तरी घेता यायला हवं. त्यातून दलित समाजाची स्थितीही मांडता यायला हवी. त्यामुळे राकेश भारती यांनी आपल्या मुलीचा एक म्युझिकल ग्रुप तयार करू; असा चंग बांधला.

त्यासाठी सर्वप्रथम उत्तम गीतकार सोबतीला हवेत, हे त्यांनी ताडलं. पंजाबमध्ये दलित चळवळींबाबत लेखन करणारे, दलित लोकसंगीतासाठी लेखन करणारे पाच-सहा गीतकार त्यांनी शोधले आणि गीतकारांचं एक पॅनलच उभं केलं. गाणी लिहून आल्यानंतरही कुटुंबीय मिळून तिच्यासाठी गाण्याची निवड करायचे. तिचं गाणं आहे तर चांगलंच असेल, एवढीच काळजी घ्यायचं सूत्र त्यांनी ठरवलं होतं आणि वडिलांच्या या प्रयत्नांना यशही मिळालं.

संगीतक्षेत्रातल्या भल्या-भल्यांची नजर तिच्याकडे वळली, ती पम्मा बखलपुरीया यांनी लिहिलेल्या ‘फॅन बाबासाहेब दी’ या गीताने. तिच्या पॉप अंदाजातील या गाण्याला तरुणांनी चांगलेच डोक्यावर घेतले. अवघ्या 16 व्या वर्षी गायिलेल्या या गीताने तिला ओळख मिळवून दिली. तिच्या दहा वर्षांच्या सांगीतिक कारर्किदीतली ही सर्वांत मोठी घटना होती. लोक या छोट्या मुलीकडे जबाबदार गायिका म्हणून पाहू लागले.

‘फॅन दी बाबासाहेब’ या गाण्याबरोबरच राजा बाबासाहिब दा, हक्का देना लढना बाबासाब सिखा गया... 1932-हक, ना चक्को तलवाराँ... संत रविदास या शीर्षकांची गीते तिची ओळख अधिकाधिक घट्ट करू लागली होती. तसेच ‘की होया जे मैं धी हाँ’ हे स्त्रीभ्रूणहत्येवर प्रकाश टाकणारं गीत प्रसिद्ध आहे. आणखी एका गाण्याने तिच्या शिरपेचात तुरा खोवला. ते म्हणजे डेंजर चमार!

हे 2016 मध्ये आलेलं गाणं तुफान गाजलं. आजवर या गाण्याला 40 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चमार म्हणजेच चांभार जातीचा उल्लेख असणाऱ्या या गाण्याच्या निर्मितीमागे एक घटना दडली आहे. गिन्नी कॉलेजमध्ये असताना जेवणाच्या सुट्टीत तिची मैत्रीण तिच्याजवळ आली आणि तिने थेट तिची जात विचारली. ती तो प्रसंग सांगते.

‘‘मैत्रिणीने येऊन थेट ‘तुझी जात कोणती?’ असं विचारल्यावर मी जरा गडबडलेच.

‘काय झालं? काही घडलंय का?’ मी आधी तिला असंच विचारलं.

त्यावर ती म्हणाली, ‘नाही, मी तुझे व्हिडिओ पाहिलेत. मला तुझी गाणी आवडतात. पण त्यामुळेच तुझ्याबाबत उत्सुकता आहे.’

असं थेट येऊन कुणी जात विचारल्याने मी किंचित अस्वस्थ झाले. मला ते बिलकुल आवडलं नव्हतं. मी तिला ‘भारतीय आहे’ असं उत्तर दिलं. पण तिला जात जाणून घेण्यात फारच रस होता. मग म्हटलं, ‘शेड्युल कास्ट.’ पण ती काही बधेचना.

ती पुन्हा म्हणाली, ‘शेड्युल कास्टमध्येसुद्धा खूप वर्गवारी आहे, तर तुझी नेमकी जात कोणती त्यातली?’

यावर वैतागून मी सांगून टाकलं, ‘चमार.’

तर ती एकदम रिॲरक्ट झाली, ‘चमार! चमार तो डेंजर होन्दे!’

आता यावर काय बोलावं, हे मला सुचलं नाही. मी स्मित केलं. पण मनातून थोडी खट्टू झालेच होते.’’

गिन्नीने हा संपूर्ण किस्सा आपल्या वडिलांना ऐकवला. आपल्याविषयीची अशी एक इमेज लोकांनी मनात घर करून ठेवली आहे, तर यावर काही तरी आपण केलं पाहिजे, असा विचार करून त्यांनी गीतकारांना ‘यावर काही करता येईल का?’ असं विचारलं आणि त्यातूनच जन्माला आलं- डेंजर चमार..

बेखौफ रहन्देने रखं दे

फिकर ना फाका सद्गगुरू रविदास है

जी साड्डा राखा कुर्बानी देनू

ना डर दे रहंदे हैगे तय्यार हैगे

असले नलो वाद डेंजर चमार...

डेंजर चमार...

या गीतातील ओळींचा साधारण अर्थ- ‘आम्ही निभर्यतेने राहतो, आम्हाला कोणाची भीती नाही. आम्ही कुठल्याही संघर्षात त्याग करायला, शहीद व्हायला कायमच तयार आहोत. कारण आमचे रक्षणकर्ता सदगुरू रविदास आहेत. आम्ही दारूगोळ्यापेक्षाही डेंजर आहोत. आमच्यावर अन्याय झाला, तर आम्ही डेंजर आहोत.’

तिच्या या गाण्याने यु-ट्यूबवर धुमाकूळ घातला. पंजाबच नव्हे, तर या गाण्याने तिला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. ती संत रविदास यांचा दोहा सांगून चमारचा एक वेगळाच अर्थही इथं सांगू पाहते,

‘‘हाड, मांस और रक्त का बना आकाल,

आँख पसार के देख लो सारा जगत चमार’

...च से चमडी, मा से मांस और र से रक्त. त्यामुळे हे तिन्ही घटक आपल्या प्रत्येकाकडेच आहेत. मग भेदाभेद कशाला?’’

गिन्नीचा मुद्दा योग्य होता. तिला दोहे, गीते मुखद्गोत तर आहेतच; पण आपण ज्या परिसरातून, समूहातून आणि कौटुंबिक परिस्थितीतून येतो, त्या सगळ्याचा कळत-नकळत परिणाम आपल्यावर होत असतो. तीसुद्धा त्याला अपवाद नव्हती. ती म्हणते, ‘‘लहानपणापासूनच घरात आंबडेकरवादी विचार होते. त्यानुसार चर्चाही व्हायच्या. आजी, काका, वडील यांच्याकडून दलितांची आधी कशी स्थिती होती, काय-काय त्यांनी भोगलं, हे कळत होतं.

डॉ.बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे आज दलित समाजातही घुसळण होत आहे. शिक्षणाचा प्रचार-प्रसार होत आहे आणि आज जी काय सुस्थिती दिसत आहे, ती संविधानाने हक्क दिल्यानेच. मला कुठल्याही प्रकारची अवहेलना प्रत्यक्ष वाट्याला आली नाही. अर्थात, हीसुद्धा बाबासाहेबांचीच देन. पण अजूनही जातिभेदाच्या भिंती आहेतच. एकीकडे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, तर दुसरीकडे अत्याचारही होत आहेत. त्या सगळ्यांवर प्रकाश टाकण्याचं काम संगीतातून करत आहे. आपल्या व्यवस्थेतील सर्वच प्रकारच्या असमानेतला प्रश्न करण्यासाठी गाते.

इथं मला कुठल्याही जातिव्यवस्थेवर बोट ठेवायचं नाहीये, कुणाच्याही भावना दुखावयाच्या नाहीत. मुळात विशिष्ट जातीचं गीत म्हणत नाही, तर मी मानवेतला आवाहन करण्यासाठी गाते. संविधानाने दिलेल्या समतेचा विचार रुजविण्यासाठी प्रयत्न करते. मुळातच मी स्वत:ला कार्यकर्ती समजत नाही. मला गाण्यांव्यतिरिक्त काही जमतही नाही. मी फक्त माझ्या गाण्यांतून सामाजिक विषयांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते. सामाजिक मूल्यं, समानतेचा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. तसंही मला वाटतं, गायकाला कुठलीही जात नसते. मी स्वत:ला भारतीय समजते, माणूस समजते.’’

स्वत:ची ओळख केवळ भारतीयच समजायची, ही शिकवण तिला कुटुंबातूनच मिळाली. आडनावावरून जाती ओळखणाऱ्या आपल्या समाजातून डिकास्ट व्हायचं असेल तर आडनाव सोडणं आवश्यक आहे, असा विचार तिच्या वडिलांनी केला. सुरुवात स्वत:पासून करावी, म्हणून त्यांनी आडनाव बदलून घेतले. त्यांचं मूळ आडनाव माही होते, ते त्यांनी बदलून भारती करून घेतले. अशा वातावरणात राहणाऱ्या तिच्या व्यक्तिमत्त्वावर असे बारीक-सारीक संस्कार कायम होत राहिले. ते संस्कार, ते विचार आपल्यापुरते मर्यादित राहू नयेत, म्हणून ती अनेक स्टेज शोजदेखील करते. डॉ.बाबासाहेब आंबडेकरांचा विचार पोहोचवण्याबरोबरच पंजाबमध्ये असलेली स्त्रीभ्रूणहत्या किंवा ड्रग्जसारख्या समस्यांवरही ती बोट ठेवते. जागरण, डेरा आणि कॉन्सर्ट असे ऑफलाईन कार्यक्रमही भरपूर करते.

प्रामुख्याने पंजाब आणि हरियानामध्ये आजवर तिचे एक हजाराहून अधिक स्टेज शो झाले आहेत. याशिवाय दिल्ली, अहमदाबाद, महाराष्ट्र या ठिकाणी; तर कॅनडा, ग्रीस, इटली, युरोप, जर्मनी अशा परदेशांत तिचे लाइव्ह परफॉर्मन्स झाले आहेत. जर्मनीमध्ये तर ग्लोबल मीडिया फोरमवर तिला पाचारण करण्यात आले होते. ‘यंग व्हॉईस इन इक्वॅलिटी ॲन्ड फ्रीडम’ अशी तिची ओळख करून दिली गेली. ‘‘स्टेजवर, खूप मोठ्या लोकांसमोर गाताना कधीही भीती वाटलीच नाही. कार्यक्रमाच्या आधी थोडा नर्व्हसनेस असायचा, पण गुरुजनांचं नाव घेऊन परफॉर्मन्स सुरू झाला की, मग भीती पळून जाते,’’ असं ती सांगते.

आजवर तिने 50-55 एकलगाणी म्हटली आहेत. पंजाबी लोकसंगीतात सजलेली आंबेडकरविचारांची गीते ही पंजाबपुरती मर्यादित राहतात. त्यामुळे अलीकडे ती काही गीते हिंदीतूनही सादर करत आहे. जसे की-

‘हर किसी की हम गुलामी करते ही रहते,

जुल्मों को सहेलेते थे मगर कुछ भी ना कहते

सर उठाकर हम कहीं भी आते जाते ना

अगर भीमजी इस दुनिया में आते ना..

बाबासाहिब इस दुनिया में आते ना’

किंवा

‘चारो और अंधेरा जब था, इस संसार में छाया

रोशनी की तब एक किरनने दुनिया को रोशनाया

पाप जुल्म का आपने ऐसा नाश किया

जडसे जातिवाद वृक्ष उखाड दिया

मानवता पर तुमने उपकार किये

पुरे दुनिये का कर्म निहार दिये

बाबासाहेबजी तुझको है प्रणाम मेरा...’

अलीकडेच ‘फोक फ्युजन’ नावाचा तिचा अल्बम रिलीज झाला. या अल्बममधील एक गीत ‘गोल्डन गर्ल’ ठरलेल्या हिमा दासवर आहे.

‘ना थकी, ना हारी,

उसपे थी जिम्मेदारी

पूरे देश की

ना टूटी उसकी आस,

किया उसने परयास..

दुनिया में देखो गुँज

रहा नाम है उसका खास

... हिमा दास’

हे गाणं 27 ऑगस्ट 2019 रोजी युट्यूबवरून प्रसारित झाल्यावर पुढील काही दिवसांत त्याचे एक लाखाहून अधिक व्ह्यूज झाले. तिच्या फेसबुकपेजवर सव्वापाच लाख चाहते आहेत. तिची लोकप्रियता यावरून उघड होते. तिचे व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, लोकसंगीतापासून हिपहॉप, रॅप अशा विविध संगीतप्रकारांत ती वावरताना दिसते. इतकंच नव्हे, तर बऱ्याचदा रविदासी किंवा आंबडेकरवादी गीते असली तरीही त्यांचं संगीत आणि सादरीकरण दोन्हीही आधुनिक असतं. आजच्या तरुणवर्गाला थेट भिडणारं असतं.

गिन्नी यावर म्हणते, ‘‘ट्रेंड के हिसाबसे रख्खा है वरना युथ सुनेगी कहाँ...! तुम्हाला जर लोकांपर्यंत तुमचा विचार पोहोचवायचा आहे, तर तो त्यांना त्यांच्या भाषेत सांगायला हवा. तुम्ही ‘प्रबोधन’ करायला आलात असं जर कुणाला वाटलं, तर ते तुमच्याकडे फिरकणारच नाहीत. त्यामुळे लोकांना कशा स्वरूपात सादर केल्यावर आवडेल याचा विचार संगीत आणि सादरीकरण दोन्हींत ठेवायला हवा. तुमचे संगीत, गीत आवडू लागले, त्यातून त्यांचं मन थोडं रिझायला लागलं की, त्यांच्यासमोर तुमचा विचार मांडणंही सोप्पं जातं. त्यामुळे आम्ही कायमच ट्रेंडच्या हिशोबाने चालतो.’’

गिन्नी सध्या जालंधरच्या हंसराज महिला महाविद्यालयात ‘व्होकल म्युझिक’मध्ये मास्टर्स करत आहे. तिचा दिवस पूर्णत: भरगच्च असतो. सकाळी रियाज, मग 9 ते 3 कॉलेज, संध्याकाळी पुन्हा रियाज असा तिचा दिनक्रम आहे. तिला पुढे जाऊन संगीतात पीएच.डी. मिळवायची आहे. लोकांनी आपल्याला डॉ.गिन्नी माही म्हणून ओळखायला हवं, असं ती हसतहसत सांगते. आज स्त्रिया घराबाहेर पडू शकत आहेत. अजून जेंडर इक्वॅलिटी यायला वेळ लागेलच; पण ज्यांची शिक्षणाची सोय होऊ शकत आहे, तिथे तर मुलींनीदेखील मागे राहायला नको. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा बाबासाहेबांचा विचार अमलात आणायचा असेल, तर आपल्या आवडीच्या विषयात खोलपर्यंत जायला हवं, असं तिला वाटतं.

तिचं आणखी एक स्वप्न आहे. ती आज आंबेडकरवादी गीतं आणि पंजाबी भाषेतच गात असली तरी तिला केवळ याच साच्यात अडकून पडायचे नाही. बॉलीवुड-हॉलीवुडमध्ये जाऊन नामवंत पार्श्वगायक होण्याचं स्वप्नदेखील ती पाहते. ‘आंबेडकरांचा समानतेचा विचार, जातिभेद संपवण्याचा विचार तर मी कायमच सांगत राहणार आहे. तो माझ्या जगण्याचाच भाग आहे. पण तुम्ही एकच गोष्ट करत राहिलात की, तिथंच अडकता. विविध संगीतप्रकार हाताळायचे आहेत. व्हर्सटाईल प्लेबॅक सिंगर ऐसी पहचान मुझे बनानी है. मी खरं तर अजून लहान मुलगीच आहे. मलाही अजून फार लांबचा पल्ला गाठायचा आहे.’’

तिच्या या प्रवासात तिच्या कुटुंबीयांचा विशेष वाटा आहे. आपल्या मुलीतील हुनर ओळखून तिची त्या क्षेत्रात हरतऱ्हेनं जडण-घडण करण्यात तिच्या वडिलांचा वाटा मोलाचा आहे. गिन्नीने जेव्हा गाण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, तेव्हा अनेक नातेवाइकांनी नाके मुरडली. ‘आपल्या घरच्या मुलींनी गाणं-बजावणं करावं- ही गोष्ट शोभते का?’ अशी टिपण्णीही केली. काहींनी वयात आल्याबरोबर लग्न लावून देण्यासाठी निंदा-नालस्ती केली. मात्र, तिचे पालक तिच्यासोबत उभे राहिले. आता तिची लोकप्रियता पाहून अनेकांच्या भुवया वर उंचावल्या. अगदी दूरदूरचे नातेवाईक आता ‘गिन्नी तो हमारी बेटी है..’ असं म्हणू लागले आहेत. तिच्या याच लोकप्रियतेमुळे राकेश भारती यांनी नोकरी सोडली. कारण तिला कॉलेजमध्ये ने-आण करणे, संगीताच्या क्लासला नेणे, रियाज करवून घेणे, राज्यातील व राज्याबाहेरील कॉन्सर्ट्‌समध्ये सोबत करणे- हे कामच लागले.

तिचे आई-वडील दोघेही तिच्या प्रत्येक कार्यक्रमात तिच्यासोबत राहतात. अनेकदा तिच्या गाण्याचा वापर राजकीय स्टेजवरूनही केला जातो किंवा तिला तिथंही गाण्यासाठी बोलावणी येतात; मात्र वडिलांनी राजकीय पक्षांच्या स्टेजपासून काटेकोरपणे लांबच राहण्याचं ठरवलं आहे. शेवटी गिन्नी म्हणते- विशेष करून तरुणांना,

‘‘गुरुनानकजी ने कहा है :

अव्वल अल्ला नूर उपाया,

कुदरत के सब बंदे,

एक नूर ते सब जग उपज्या,

कौन भले कौन मन्दे...

थोडक्यात सर्वांच्या रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त जर सारखंच आहे, तर भांडण्याला काय अर्थ आहे? जात-पात मिटवणं इतकं सोप्पं नाहीये, पण ते मिटविण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाचं हत्यार दिलं आहे, त्याचा वापर आपण प्रत्येकाने करायला हवा. मुख्य म्हणजे शिक्षण घ्यायला हवं. विशेष करून मुलींच्या शिक्षणाबाबतची उदासीनता आता तरी सोडायला हवी. संविधानाने जर स्त्री-पुरुष दोघांनाही समान संधी, समान शिक्षणाचा अधिकार दिला आहे, तर तो कुणीही तिच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना त्यांची उडान घेऊ दिली तर त्या स्वत:चं, कुटुंबाचं आणि देशाचं नाव उजागर करतील, यात शंकाच नाही!’’

लेखन : हिनाकौसर खान-पिंजार

greenheena@gmail.com

Share on Social Media

डिजिटल जगाची डार्लिंग

विनायक पाचलग

हे असे निर्णय तिने का घेतले, याचं लॉजिक तिनेच वेगवेगळ्या भाषणांत आणि मुलाखतीत सांगून ठेवलं आहे. जे आजच्या पिढीला फारच उपयुक्त आहे. ती असं म्हणते की, ‘हॅव इम्पॅक्ट!’ म्हणजे तुमचं काम तुमच्या समाजावर किती परिणाम करत आहे हे सर्वाधिक महत्त्वाचं! हे दोन्ही रोल निवडताना आपल्या कामाचा जगावर परिणाम होईल याची खात्री तिला होती, म्हणून तिने जाणीवपूर्वक क्रमांक दोनचं स्टार्टअपमधील पद निवडलं. दुसरं तत्त्व ती सांगते की, ‘मेजर ग्रोथ’ म्हणजे तुमच्या कामाने तुमची आणि संस्थेची वाढ किती झाली ते महत्त्वाचं.

शेरील सँडबर्ग! हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते 2012 च्या आयआयटी टेकफेस्टमध्ये. तिथे कोणी तरी फेसबुकचा सिनिअर प्रतिनिधी त्यांच्या नव्या बदलांविषयी बोलत होता आणि त्या एकाच भाषणात त्याने शेरील सँडबर्गचा उल्लेख कमीत कमी पाच-सहा वेळा केला असेल. अर्थातच कुतूहलाने त्या व्यक्तीबद्दल गुगल केले व त्यानंतर जी माहिती मिळाली, त्याने अचंबित तर झालोच; पण पुढे आजतागायत तिला फॉलो करत राहिलो आणि त्यातून डिजिटल जगाच्या या सम्राज्ञीबद्दल अनेकानेक पैलू उलगडत गेले. आजच्या माझ्या वयाच्या पिढीला गुगल व फेसबुक माहीत नसणे अशक्य आहे आणि त्यातल्या जवळपास प्रत्येकाने गुगल किंवा फेसबुक वापरलेलेसुद्धा आहे. शेरील सँडबर्ग म्हणजे या दोन्ही कंपन्यांची कर्तीधर्ती!

सन 2008 पर्यंत ती गुगलमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत होती, त्यानंतर आजतागायत ती फेसबुकची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहे. सीओओ हे कोणत्याही कंपनीतले क्रमांक दोनचे पद. त्यामुळे आपल्याला गुगलचे संस्थापक सर्जी बिन किंवा लॅरी पेज माहीत असतात किंवा मग फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग. पण या सगळ्यांच्या डोक्यात आलेल्या संकल्पना प्रत्यक्ष आणायला एक उत्तम वजीर लागतो, तो त्या कंपन्यांचा सीओओ असतो. शेरील ही तशी वजीर आहे.

गेली 11 वर्षे फेसबुक जगावर राज्य करत असताना ती ते राज्य शब्दशः मार्क झुकेरबर्गच्या शेजारी बसून सांभाळत आहे. याआधी ती असेच काहीसे काम गुगलमध्ये करायची. गुगलच्याही आधी ती अमेरिकन सरकारच्या एका खात्यात चीफ ऑफ स्टाफ म्हणून कार्यरत होती. थोडक्यात काय तर, ही पन्नास वर्षीय शेरील एकविसाव्या शतकातील जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिला आहे, असे म्हणता येईल. फेसबुकच्या बोर्डवर असणारी एकमेव महिला, शिवाय फॉर्च्युन 500 मधील अनेक कंपन्यांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कनेक्टेड असणं, जवळपास 100 अब्ज रुपयांची स्वतःचे नेट वर्थ (बाजारभाव) असणं या सगळ्याच गोष्टी तिची ताकद अधोरेखित करतात. पण शेरील सँडबर्ग ही इतकी ताकदवान आहे म्हणून केवळ महत्त्वाची नाही, तर तिचं तिथं असणं हे आजच्या जगातल्या 50 टक्के समुदायाचे- अर्थात महिलांचे प्रतिनिधित्व करणारे आहे म्हणून ते महत्त्वाचे आहे.

आज जग कसं चालावं, हे फेसबुक आणि गुगल ठरवते. अगदी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण असावा, इथंपासून ते आज कोणता विषय लोकांसमोर गेला पाहिजे इथपर्यंतचं सगळंच गुगल आणि फेसबुक ठरवतं. ब्रेक्झिट घडवण्यापासून ते अनेक देशांत क्रांती होण्यापर्यंत सगळं काही घडतंय, घडवलं जातंय ते इथूनच. अशा वेळी तिथे महिलांचा, महिलांबद्दलचा विचार करणारे कोणी तरी हवंच ना? ते काम गेली कित्येक वर्षे शेरील सँडबर्ग करत आहे. आज सोशल मीडिया वापरण्यामध्ये जेवढे पुरुष आहेत, तेवढ्याच स्त्रिया आहेत; मग स्त्रियांना नक्की हा सोशल मीडिया कसा हवा? त्यांचा हे माध्यम वापरण्याचा पॅटर्न कसा आहे? इन्स्टाग्राम महिला कशासाठी वापरतात आणि पुरुष कशासाठी वापरतात? या सगळ्यांत महिलांची प्रायव्हसी कशी जपायला हवी? हा संपूर्ण विचार शेरील करते आणि करत राहील. त्यामुळे, जगभरच्या महिलांसाठी ती एक आधार आहे, हे नक्की.

शेरील जितकी महत्त्वाची आहे, त्याहून महत्त्वाची आहे तिची कहाणी. अमेरिकन सरकार सोडून शेरील गुगलमध्ये आली, तेव्हा गुगल ही शंभरभर लोक काम करत असणारी एक छोटी कंपनी होती. अमेरिका सरकारच्या अत्यंत ताकदवान यंत्रणेतून बाहेर पडून एका छोट्या कंपनीत यायला खूप धाडस लागतं. पण प्रवाहाविरुद्ध पोहायचे धाडस तिने केले आणि गुगलला एक जायंट बनवत गेली. तिने 2008 मध्ये गुगल सोडायचा निर्णय घेतला, तेव्हा गुगल एक बलाढ्य कंपनी झालेली होती. अशा वेळी, कोणत्याही मोठ्या कंपनीची सीईओ म्हणजेच टॉप बॉस म्हणून काम करायची संधी तिला सहज मिळाली असती. पण तिने फेसबुकची निवड केली आणि तीही दोन नंबरच्या सीओओ पोस्टसाठी.

लोकांना हे भाषण आवडले ते शेरीलच्या अंतर्बाह्य प्रांजळपणामुळे. तिच्या बोलण्यात ना उपदेशाचा डोस होता, ना ‘मीच जग बदलणार’ असा अविर्भाव. आपल्या भाषणामुळे लोकांना फरक पडू शकतो आणि बदल घडू शकतो, हे कळल्यावर तिने तिथेच न थांबता 2013 साली ‘लिन इन’ नावाचे याच विषयाला वाहिलेले एक पुस्तक लिहिले; जे आजही बेस्ट सेलर आहे. नंतर याच विषयाला वाहिलेले हजारो फोकस ग्रुप जगभरात उभे केले, असंख्य कार्पोरेट्‌समध्ये जेंडर डायव्हर्सिटीबद्दल जनजागृती आणली आणि आपल्या कृतीतून कार्पोरेटचे विश्व महिलांसाठी अधिक सोपे व सुलभ केले.

ती फेसबुकमध्ये आली, त्या वेळी फेसबुकसुद्धा फक्त शंभर- दोनशे माणसांची कंपनी होती आणि मार्क झुकेरबर्ग तर ऐन विशीतला पोरगा होता. त्या वेळी, त्याच्याहून वयाने 15 वर्षांनी मोठी असणारी शेरील वेळ वाया घालवत आहे, अशा अर्थाची टीका तंत्रज्ञानवर्तुळात झाली होती. पण तिने तो निर्णय योग्य तर ठरवलाच, शिवाय गेल्या 10 वर्षांत फेसबुकला गुगलच्या शेजारी नेऊन बसवलं. हे असे निर्णय तिने का घेतले, याचं लॉजिक तिनेच वेगवेगळ्या भाषणांत आणि मुलाखतीत सांगून ठेवलं आहे- जे आजच्या पिढीला फारच उपयुक्त आहे. ती असं म्हणते की,

‘हॅव इम्पॅक्ट!’ म्हणजे ‘तुमचं काम तुमच्या समाजावर किती परिणाम करत आहे, हे सर्वाधिक महत्त्वाचं! हे दोन्ही रोल निवडताना आपल्या कामाचा जगावर परिणाम होईल याची खात्री तिला होती, म्हणून तिने जाणीवपूर्वक क्रमांक दोनचं स्टार्टअपमधील पद निवडलं. दुसरं तत्त्व ती सांगते की, ‘मेजर ग्रोथ’ म्हणजे तुमच्या कामाने तुमची आणि संस्थेची वाढ किती झाली, ते महत्त्वाचं. ग्रोथला महत्त्व दिले की, करिअर आपोआप चांगले होतेच. मिळणारे पद आणि मेहनत यापेक्षा ग्रोथ महत्त्वाची’.

ती आणखी एक तत्त्व सतत बोलून दाखवते. ते म्हणजे, थिंक बिग. तुम्ही आता जे काम करत आहात, त्यापेक्षा हे काम तुम्हाला मोठं करत कुठवर नेता येईल ते जास्त महत्त्वाचं तो स्कोप असला, तर मनाची तयारी करायची की- ‘मी हे करणारच!’ आणि उडी मारायची. तिची स्वतःची म्हणून आणखी काही मूल्ये आणि तत्त्वे आहेत. त्यांच्याबद्दल ती पदवीदान समारंभातून, मुलाखतीतून सतत बोलत असते. वेळ मिळाल्यास प्रत्येकानं तिच्या भाषणाच्या क्लिप्स युट्यूबवर ऐकल्या आणि पाहिल्या पाहिजेत, एवढं नक्की. इतकं सगळं होऊनही शेरील तंत्रज्ञान आणि बिझनेस वर्तुळाच्या बाहेर फारशी परिचित नव्हती.

मात्र, 2010 मध्ये तिला ‘टेड’ या प्रख्यात व्याख्यानमालेमध्ये बोलायचे निमंत्रण आले, तिने तिथे ‘व्हाय वी हॅव टू फ्यू वुमन लीडर्स ॲट द टॉप?’ या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच तिने काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. त्यापैकी महत्त्वाची गोष्ट ही होती की, अमेरिकेत काम करणाऱ्या व लग्न झालेल्या महिलांपैकी फक्त 33 टक्के महिलांना मुले आहेत. याउलट, काम करणाऱ्या आणि लग्न झालेल्या पुरुषांपैकी 66 टक्के पुरुषांना मुले आहेत. याचा अर्थ असा की, ‘घर का नोकरी?’ हा प्रश्न जागतिक असून त्यात महिलेचे आई, बायको म्हणून असणारे काम आणि बॉस म्हणून ऑफिसातले काम यात कुचंबणाच होत राहते.

शेरील एका मोठ्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेली होती तेव्हा तिला महिलांसाठी वेगळी वॉशरूमच सापडेना. तेव्हा तिच्या होस्टने हे मान्य केलं होतं की- ते या ऑफिसमध्ये एक वर्ष आहेत, पण त्यांना त्या ऑफिसमध्ये भेटायला येणारी ती पहिलीच महिला आहे. या साऱ्यातून तिने हे अधोरेखित केले की, काळानुरूप महिला जरी कमावत्या झाल्या, तरी त्यांचे प्रश्न संपलेले नाहीत. त्यांच्यापुढील अडचणी प्रचंड आहेत आणि ज्या कार्यरत महिला आहेत, त्या अजून त्यांच्या क्षेत्रातील टॉपच्या पोझिशनवर पोहोचल्या नाहीत. त्यामुळे महिला कमावत्या झाल्या असल्या, तरी त्या अजूनही डिसिजनमेकर नाहीत. त्याच भाषणात ती म्हणते, ‘‘माझ्याकडे या प्रश्नांची परिपूर्ण उत्तरे नाहीत. मी या भाषणाला येत असताना माझ्या तीन वर्षांच्या मुलाचं रडणं थांबवू शकले नाही.’’ हे प्रांजळपणे कबूल करत तिने हा फरक कमी करण्यासाठी थिअरी मांडली.

ती म्हणजे- ‘लीन इन’- अर्थात झोकून द्या. महिलांनी टॉपला यावं यासाठी स्वतःला झोकून द्यावं. त्यासाठी तीन सोपी आणि छोटी तत्त्वं पाळावीत, अशी मांडणी तिनं केली. त्यातलं पहिलं म्हणजे ‘सीट ॲट द टेबल’. म्हणजे काय तर- आपण समान आहोत हा भाव मनात ठेवून जी कमांड कामाच्या जागी पुरुष ठेवतात तशीच ठेवा. स्वतःला इन्‌फिरीअर मानू नका. दुसरं- स्वतःच्या पार्टनरला खराखुरा जोडीदार बनवा, म्हणजे त्याला विश्वासात घ्या. आणि तिसरं- भविष्याचा विचार करून वर्तमानात स्वतःवर निर्बंध घालू नका. ही मांडणी भलतीच गाजली.

आजही टेडवरच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या भाषणांत याचा समावेश होतो. हे भाषण गाजायचे एक प्रमुख कारण म्हणजे- ना यात पुरुषांवर आगपाखड आहे, ना क्रांती करायचे आवाहन! अगदी सोपा, साधा आणि सहज कळण्याजोगा फेमिनिझम ती मांडत होती. त्यात रोजच्या जगण्यातल्या महिलांच्या समस्यांचा सहज उल्लेख होता आणि छोट्या उपायांनी तो कसा बदलता येईल याची उदाहरणे होती. एक उदाहरणच द्यायचं झालं तर शेरील असं सांगते की- ती प्रेग्नन्ट होती आणि गुगलमध्ये काम करत होती, तेव्हा कंपनी आणि पार्किंग लांब असल्याने तिला अनेकदा त्रास होत असे. एक दिवस असाच त्रास झाल्यावर ती तडक उठून त्या वेळचा सीईओ असलेल्या इरिककडे गेली आणि गरोदर महिलांसाठी ऑफिसजवळ पार्किंग का हवे यासाठी भांडली. पण केबिनमधून बाहेर आल्यावर तिच्या लक्षात आले की, जोपर्यंत तिला स्वतःला हा त्रास होत नव्हता, तोवर तिलाही या प्रश्नाची जाणीव झाली नव्हती आणि आजवर गुगलमधल्या इतर अनेक महिलांनी हा त्रास सहन केला असणार व त्या गप्प बसल्या असणार. एक महिला असूनही ती स्वत: यावर आधीच विचार करू शकली नाही, म्हणून ती खजील झाली होती. असे छोटे-छोटे प्रसंग मांडून शेरीलने ही परिस्थिती बदलायला हवी, हे ठामपणे मांडले.

कर्तृत्वाने शेरीलच्या त्यातल्या त्यात जवळ जाणारी महिला म्हणजे याहूची पूर्वीची सीईओ मेरिसा मेयर. पण जेव्हा ती ‘याहू’ची सीईओ झाली, तेव्हा मेरिसबद्दल उठलेली वादळेसुद्धा तिने नमूद केली आहेत. भविष्यात आपल्यावर घर, नवरा, कुटुंब या जबाबदाऱ्या येणार आहेत; म्हणून आजचे आपले प्रमोशन, काम, नवी जबाबदारी महिला नाकारतात व भविष्यासाठी वर्तमान मारतात, हे एक महत्त्वाचे सत्य तिने त्या उदाहरणातून नमूद केले होते. लोकांना हे भाषण आवडले ते शेरीलच्या अंतर्बाह्य प्रांजळपणामुळे. तिच्या बोलण्यात ना उपदेशाचा डोस होता, ना ‘मीच जग बदलणार’ असा आविर्भाव.

आपल्या भाषणामुळे लोकांना फरक पडू शकतो आणि बदल घडू शकतो, हे कळल्यावर तिने तिथेच न थांबता 2013 मध्ये ‘लीन इन’ नावाचे याच विषयाला वाहिलेले एक पुस्तक लिहिले; जे आजही बेस्ट सेलर आहे. नंतर याच विषयाला वाहिलेले हजारो फोकस ग्रुप जगभरात उभे केले, असंख्य कॉर्पोरेट्‌समध्ये जेंडर डायव्हर्सिटीबद्दल जनजागृती आणली आणि आपल्या कृतीतून कॉर्पोरेटचे विश्व महिलांसाठी अधिक सोपे व सुलभ केले. आज जगात कुठेही एखाद्या मोठ्या कंपनीत एखाद्या महिलेला उत्तम वागणूक दिली जात असेल, तर तिने मनातल्या मनात शेरीलचे आभार मानायला हरकत नाही.

शेरीलने स्थापन केलेले ‘लीन इन फाउंडेशन’ आजही वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहे. नुकतेच त्यांनी ‘मीटू’ या जगभरात गाजलेल्या सोशल मीडिया कँपेननंतर ऑफिसमध्ये एकत्र काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या एकमेकांसोबतच्या वागण्यात कसा फरक पडलेला आहे, याचा सविस्तर व अभ्यासपूर्ण अहवाल प्रकाशित केला आहे. परस्परलिंगी नातेसंबंधांत सोशल मीडिया व इतर माध्यमांमुळे होणारे बरे-वाईट बदल यातून अधोरेखित होतात. या अहवालाची दखल विशेषत्वाने घेतली पाहिजे ती यासाठी की, पुस्तक प्रकाशित होऊन 6 वर्षे होऊन गेली तरी तिने महिलांसाठीचे काम सोडलेले नाही. याउलट, सोशल मीडिया हा तिच्या व्यवसायाचा भाग असूनही, त्यामुळे झालेले बरे-वाईट परिणाम जगापुढे मांडण्यास ती कचरलेली नाही.

अशा व्यक्तींच्या खासगी आयुष्याबद्दलसुद्धा आपल्याला प्रचंड कुतूहल असते. शेरीलचा पहिला विवाह अवघे दोन वर्षे टिकला, पण त्याबद्दलसुद्धा ती मोकळेपणाने बोलते. तिच्या आयुष्यातला सर्वांत कठीण प्रसंग आला, तो म्हणजे जवळपास 15 वर्षे संसार केल्यानंतर 2017 मध्ये अचानक तिच्या दुसऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. त्या वेळी तिची दोन मुले अनुक्रमे 7 व 10 वर्षांची होती. अशा वेळी तिला हा प्रचंड मोठा धक्का बसला, ज्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली. या सर्व कालावधीत ती भावनांशी कशी लढली, त्यासाठी तिने सायकॉलॉजिस्टची कशी मदत घेतली, आपण भावनिक दृष्ट्या वाईट कालावधीत कसं वागलं पाहिजे यावर तिने नुकतेच ‘ऑप्शन बी’ नावाचं सुरेख पुस्तक लिहिले आहे.

आपल्याकडे एक गोड गैरसमज असा असतो की, यशस्वी माणसाचे कधी काही चुकतच नाही किंवा त्याला कधी वाईट दिवस येतच नाहीत. कारण आपण सतत लोकांच्या यशाच्या स्टोऱ्या, सक्सेस फॉर्म्युले ऐकत मोठे झालेले असतो. अशा वेळी कोणी तरी आपल्या कठीण काळाबद्दल प्रांजळपणे सांगते, हेच किती दिलासादायक आहे! त्यामुळे, आपल्या पिढीला सिनेमॅटिक सक्सेसपासून लांब येऊन खरंखुरं जग समजून घेता येईल. शिवाय, मानसिक स्वास्थ्याबद्दलचा जो स्टिग्मा आजही कित्येकांच्या मनात आहे (आपल्या मेंटल हेल्थबद्दल बोललं म्हणजे आपण कमकुवत.), तोही हे पुस्तक वाचल्यावर निघून जातो.

याच पुस्तकात शेरीलने या ‘इमोशनल लो’ असणाऱ्या कालावधीत मार्क झुकेरबर्गने तिला कसे प्रोत्साहन दिले, याचे अनेक हृद्य प्रसंग सांगितले आहेत. कित्येकदा शेरील जे काही बोलत आहे ते पूर्ण चुकीचे आहे, याची जाणीव असूनही मार्क तिचे कौतुक करायचा; कारण सध्या तिला त्याची गरज आहे, हे त्याला माहीत होते. मार्क झुकेरबर्ग फेसबुकला मोठं कसं करू शकला आणि लहान वयात स्वतःचं नेतृत्व कसे उभा करू शकला, हेही या सर्व उदाहरणांतून दिसून येते. कारण याच कालावधीत फेसबुकसुद्धा त्याच्या वाईट काळातून जात होते. केंब्रिज ॲनलिटिकाची केस चालू होती. अशा वेळी माणसं आणि कंपनी दोन्ही सांभाळण्याचे शिवधनुष्य मार्कने कसे पेलले असेल, त्यालाच माहीत. पण, त्याच्या नेतृत्वगुणांची झलक या पुस्तकातून नक्की दिसून येते.

आज शेरील जगाची आयकॉन आहे, सर्वार्थाने पॉवरफुल महिला आहे; पण तिच्याबद्दलचा आदर आणि आकर्षण हे फक्त तिच्याकडे सत्ता आहे म्हणून नाही, तर तिने चांगल्या अर्थाने व प्रामाणिकपणे जग बदललं म्हणून आहे. हेच तिचं प्रधान वैशिष्ट्य आहे! शेरील या शब्दाचा अर्थ ‘डार्लिंग’ असा आहे. तिचा अंतर्बाह्य खरेपणा, कम्पॅशन व व्यावसायिक क्षेत्रात जग बदलणारे फेसबुक व गुगल सांभाळणं यामुळे ती अख्ख्या डिजिटल विश्वाची आणि जगभरातल्या महिलांची डार्लिंग राहील, यात शंका नाही.

लेखन : विनायक पाचलग

vinayak@vedbiz.com

Share on Social Media

ABCD आणि बिझिनेस एथिक्स

सुनील देशमुख

आपण कोण आणि नक्की कुठले, हा संभ्रम त्यांच्या मनात क्षणभरही निर्माण झाला नव्हता. आपण 100 टक्के अमेरिकन आहोत (with Indian heritage), we belong here आणि इथेच राहणार व फुलणार आहोत हे स्पष्ट होते. आता तर त्यांच्यापैकी निम्म्याहून अधिक जणांनी अमेरिकन मुला-मुलींशी लग्ने करून मल्टिकल्चरल, मल्टिरिसिअल सुखी संसार थाटले आहेत. कुठल्याही सांस्कृतिक संघर्षात त्यांची कुतरओढ होत नाही, अमेरिकन समाजाने त्यांना इतके आपलेपणाने सामावून घेतले आहे की, ते पाहूनच त्यांच्या आई-वडिलांना आपण उगाचंच काळजी केली असे वाटावे. म्हणजे ते ABCD नक्कीच नाहीत.

American Born Confused Deshis म्हणजे ABCD. अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय मुलांसाठी हे खास उपरोधिक लेबल सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी चिकटवले गेले होते. म्हणजे, आपण नक्की कोण- अमेरिकन की भारतीय- हा गोंधळ वा आयडेंटिटी क्रायसिस त्यांच्यात आहे, हे त्यातून अधोरेखित होत होते. खरे म्हणजे आता पहिली NRI पिढी अमेरिकेत येऊन पंचेचाळीस वर्षे झाली. तीसेक वर्षांपूर्वी त्यांचे संसारवेल फुलत होते. त्यांच्या व्यवसायात त्यांची उत्तम प्रगती होतच होती आणि पाच-दहा वर्षांची चिमुकली फुले (मुले) त्या वेलीवर बहरत होती. मुळात NRI मंडळी हुशार, कामसू आणि महत्त्वाकांक्षी. सर्व अडचणींवर मात करून मध्यमवर्गातून इकडे येणे, येथील फास्ट मूव्हींग आणि तंत्रज्ञानात अग्रगण्य असलेल्या समाजात त्या त्या क्षेत्रांत सर्वांत पुढे राहणे सोपे नसते, पण त्यांनी ते करून दाखवले. त्याचे उत्तम रिवार्डही त्यांना मिळत गेले. गुणवत्तेचे चीज करणाऱ्या या समाजात ते समृद्ध झाले आणि त्या वेलाची पाळेमुळे किती खोलवर व घट्ट रूजत गेली, हे त्यांनाही कळले नाही. खरे म्हणजे जगाच्या इतिहासातील सर्वांत मोठे स्थित्यंतर या NRI पिढीने केले. कालपरवापर्यंत सामाजिक, तांत्रिक, शैक्षणिक, सांस्कृतिक असे सर्वच बदल हळूहळू व्हायचे, त्यामुळे लोकांना सामावून वा सावरून घ्यायला वेळ आणि संधीही असे. म्हणजे आपले आजोबा खेड्यातून तालुक्यात आले. सायकल बघितली, वडील तालुक्यातून शहरात आले- त्यांनी स्कूटर वा छोटी गाडी चालवली. म्हणजे आयुष्य तसे ‘संथ वाहते कृष्णामाई’च होते. पण सत्तरीच्या दशकात अचानक ही NRI पिढी IIT किंवा मेडिकल कॉलेजमधून (एखादी गाडी जशी बोगद्यात शिरली की, दुसऱ्या बाजूनेच बाहेर पडते, तशी) मुंबईत जाऊन अमेरिकेत अवतरली.

अचानक देश, वेष, भाषा, संस्कृती, अंतर, सामाजिक संकेत, पद्धती आणि मुख्यत: तंत्रज्ञान हे दिवसरात्रीसारखे क्षणार्धात बदलले. इतक्या टोकाचा आणि ओव्हरनाईट बदल खरोखरच जगाच्या इतिहासात कुठल्याही पिढीने केला नसेल. इतकेच नव्हे, पण अमेरिकेसारख्या तांत्रिक दृष्ट्या सर्वांत प्रगत देशाच्या महान वेगाने बदलणाऱ्या वैद्यकीय आणि तांत्रिक क्षेत्रांचे तज्ज्ञ किंवा Leading edge म्हणून नेतृत्व करण्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. म्हणूनच भारतीय माणूस रस्त्यावर भेटला तर सामान्य अमेरिकन आपोआपच त्यांना डॉक्टर, इंजिनियर किंवा कॉम्प्युटर एक्सपर्ट समजून आदराने वागवतो, म्हणजे हे सर्व स्थित्यंतर त्यांनी यशस्वीपणे पार पाडले, पण पचवले का?

ज्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि भावनिक पाया बावीसाव्या वर्षांपर्यंत भारतात घडला, त्यांचा मूळ गाभा भारतीयच असणार. अधूनमधून मायभूमीला जाणे, तिची सतत आठवण येणे, आप्तांच्या भेटीगाठीत आनंद आणि आई-वडिलांचे काय, या यक्षप्रश्नाने लागलेली रूखरूख ही त्या यश-आनंदाची दुसरी बाजू. तरीही करियरच्या शिखरावर असताना आणि तिथे टिकून राहायच्या धडपडीत या सर्वांचा खोलवर विचार करायला वेळ होता कोणाला? पण मुलांचे काय? दोन वर्षांत थोडे पैसे आणि अनुभव पदरी पाडून भारतात परत जायचे, ही दर दोन वर्षांनी केलेली प्रतिज्ञा करून आता पंचवीस वर्षे झाली. तरी आपल्या मुलांना ‘भारतीय संस्कृती’ शिकवायची हा पण ठरलेला!

मुलांसाठी अमेरिकन सुखांचा त्याग करायचा म्हणजे त्यांना तरी अधांतरी वाटायला नको- ‘ना घर का, ना घाट का’ असे व्हायला नको, यासाठी मराठी मंडळांत त्यांना Elephant God दाखवून आणि मुलींना सक्तीने भरतनाट्यम्‌ वगैरे शिकवून भारतीय संस्कृती जपण्याचा अपुरा प्रयत्नही करून झाला. मोडके-तोडके मराठी शिकवायचे, कधी ते घरात बोलायची सक्तीही करायची. शक्यतो भारतीय वेष, भाषा, अन्न आणि मित्रांच्या गोतावळ्यात राहून हा भारतीय संस्कृती शिकवायचा प्रयत्न किती यशस्वी झाला, यात शंकाच आहे. शिवाय, नक्की ‘भारतीय संस्कृती’ म्हणजे काय, याचा खोलवर विचार करायला करियरच्या स्पर्धेत आणि पैशाच्या पाठलागात त्यांनाही जमले नाही. मग default option म्हणजे थोडे कर्मकांड, थोडे भारतीय संगीत आणि अन्न, कधीमधी झब्बा आणि साडी. त्यातही अर्थात नटणे हाच मुख्य उद्देश, पण थोडा प्रयत्न केल्याचेही समाधान.

आता, अशा सर्व ‘प्रयोगांतून’ गेलेली ही लहान मुले तिशी-पस्तिशीची झालीत. बहुतेकांचे स्वत:चे संस्कार आणि चिमुकली बाळेही आहेत. म्हणजे जगाचे रहाटगाडगे आणखी थोडे पुढे सरकरले, पण त्यांची ‘धड ना इकडे, ना तिकडे’ अशी मानसिक अवस्था झाली का? आयडेंटिटी क्रायसिस आहे का? ते ‘स्वत:ला शोधत’ द्विधा मन:स्थितीत दु:खी, निराश फिरतात का? म्हणजे ते खरेच ABCD (American Born Confused Deshis) झाले का? की उगाचंच भारतीय लोकांनी त्यांना हे लेबल लावले होते?

‘ही मुले लहान असताना त्यांच्या रंगावरून किंवा वेगळेपणावरून चिडवली, छळली जातील आणि त्यांच्या मनात कायमचा न्यूनगंड निर्माण होईल. पुढे नोकरीतही त्यांच्या वेगळेपणामुळे Descrimination होईल, ते अमेरिकन मुख्य प्रवाहापासून वेगळे, एकटे आणि एकाकी पडतील, मग आपण नक्की कुठले (A Sense of Belonging) या गोंधळात ते आपण ABCD आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करतील’ अशी सर्वांना भीती होती.

पण आजची वस्तुस्थिती या सर्व भयाण चित्राच्या एकदम उलट आहे. शाळेत या हुशार विद्यार्थ्यांचे कौतुकच झाले. इतर अमेरिकन मुले त्यांची मित्रमंडळी झाली, आणि ती घट्ट मैत्री आजही छान टिकून आहे, शिक्षकांनी त्यांना विशेष उत्तेजन आणि शिकवण्या देऊन हार्वर्ड, येल, कोलंबिया यांसारख्या टॉपच्या विद्यापीठांची दारे खुली केली. पुढे जॉब मार्केट किंवा करियरमध्ये अमेरिकन कंपन्या आणि स्टार्टप्स्‌ हात धुवून आणि हात जोडून त्यांच्यामागे लागल्या. गुणवत्तेला रंग, रूप, वंश, धर्म नसतो हे अमेरिकन फेअरनेस आणि सेक्युलॅरिझमचे तत्त्व इथे प्रत्यक्ष राबवलेले दिसते. हे सर्व ठीक, पण वैयक्तिक जीवनाचे काय?

या मुलांना भाषा, उच्चार, संदर्भ, सांस्कृतिक संकेत इत्यादी कुठलेच अडथळे नसल्याने mainstream अमेरिकन जीवनाचे सरमिसळ आणि अस्सल घटक होण्यास त्यांना कुठलीच अडचण नसते. आपण कोण आणि नक्की कुठले, हा संभ्रम त्यांच्या मनात क्षणभरही निर्माण झाला नव्हता. आपण 100 टक्के अमेरिकन आहोत (WITH Indian Heritage), we belong here आणि इथेच राहणार व फुलणार आहोत हे स्पष्ट होते. आता तर त्यांच्यापैकी निम्म्याहून अधिक जणांनी अमेरिकन मुला-मुलींशी लग्ने करून हे मल्टिकल्चरल, मल्टिरिसिअल सुखी संसार थाटले आहेत. त्यांची चिमुकली तर आणखीनच हुशार, सुंदर आणि गुणी आहेत. सुखी संसार, व्यावसायिक यश, अमेरिकन मित्रमंडळी आणि कुठल्याही जुन्या संकेत वा रूढींची ओझी न बाळगणारी ही तरुण अमेरिकन-भारतीय पिढी कुठल्याही बाबतीत confused नाही हे नक्की.

कुठल्याही सांस्कृतिक संघर्षात त्यांची कुतरओढ होत नाही, अमेरिकन समाजाने त्यांना इतके आपलेपणाने सामावून घेतले आहे की, ते पाहूनच त्यांच्या आई- वडिलांना आपण उगाचंच काळजी केली असे वाटावे. म्हणजे ते ABCD नक्कीच नाहीत. पण थांबा, अमेरिकेत NRI मात्र खरोखरच ABCDs आहेत. Where do I really belong अशा प्रश्नाने ग्रासलेले लोक मोठ्या प्रमाणात आहेत. पण ती NRI पिढीची मुले नव्हे, तर पहिल्या पिढीतील NRI च आहेत. आत्तापर्यंत आपल्या मुलांची चिंता करणारी येथील First Generation Immigrants पिढीच ABCD म्हणजे America Based Confused Deshis आहेत! हे विधान तर धक्कादायक आहे, खरोखरच वस्तुस्थिती तशी आहे का?

आपल्याला तर वाटत होते की, ते एवढे यशस्वी, पैसेवाले, सुखवस्तू, सारे कसे छान छान. मग confusion, मानसिक गोंधळ, असमाधान आलेच कुठून? हे लोक भारतात मधूनमधून येतात, तेव्हा तरी ते असे काही म्हणत नाहीत, मग हे सारे काय गौडबंगाल आहे? बरेचसे अमेरिकास्थित First Generation NRIs सध्या दुभंगलेल्या मानसिक अवस्थेत आहेत. सारे सुखवस्तू, पण बरेचसे बेचैन, अस्वस्थ आणि थोडे गोंधळलेले. आता साठी-पासष्ठी ओलांडलेले हे NRIs सुखवस्तू असले तरी आपण सुखी आहोत असे छातीठोकपणे सांगू शकत नाहीत.

या सर्वांचे विश्लेषण त्यांच्या जीवनप्रवासात आहे. थोडे पैसे आणि अनुभव गाठीला बांधून परतण्याची, आई-वडिलांची उतारवयात काळजी घेण्याची आणि ‘आपल्या’ संस्कृतीत मुले वाढवण्याची आकांक्षा पहिली पंचवीस वर्षे तरी त्यांनी बाळगली होती. पण जशी वर्षे गेली तशा प्रतिज्ञा पुसट झाल्या, आणि शेवटी आपण इथेच कायमचे स्थायिक होणार हे त्यांना मनोमन उमगले. त्या दृष्टांताबरोबर येणारी separation anxiety - आपला देश, उत्तम संस्कृती यांच्याशी संबंध कायमचा तुटणार काय, या भीतीने मन कातर झाले. पैशाची मलमपट्टी यावर उपाय करू शकली नाही. शिवाय आई- वडिलांचे काय? हा तर न सुटणारा यक्षप्रश्न.

अचानक मर्सेडिस, मँन्शन, कपडे, दागिने, पाटर्या यात मन रमेनासे झाले. सभोवती होणारे सांस्कृतिक बदल तर मन अधिकच बेचैन आणि कातर करणारे वाटले. पूर्वी आजोबांची आणि नंतर वडिलांची अबाधित सत्ता होती. वयाला मान होता. पण इथे तर सारेच उलटे मुलांना त्यांचा उपदेश ऐकायला वेळ नव्हता आणि गरजच वाटत नव्हती. त्यांना लागणारे ज्ञान, साध्या CD-Rom वर होते.

बायकोने बंड जरी केले नसेल, तरी तिच्या आचार-विचारांचे स्वातंत्र्य त्याच्या भारतीय पिंडाला बोचू लागले. ‘मी हे करू का हो?’ असे प्रश्न ती विचारत नाही. बहुतेकजणी प्रोफेशनल असल्याने ‘मी जॉनबरोबर दोन दिवस कॉन्फरन्सला जाते आहे, तू स्वयंपाकाचे बघ.’ असेही ती म्हणते. तेव्हा त्याच्यातला अस्सल, कर्मठ भारतीय जागा होऊन आणखीच अस्वस्थ करू लागतो.

व्यवसायातही सारेच काही प्रेसिडेंट होऊ शकत नाहीत. बहुतेकजण मध्यमवयात middle management मध्ये comfortable and stuck in place अशा glass ceiling मध्ये अडकलेले असतात. मग अशा द्विधा आणि वैफल्यावस्थेत पैसेही मन:स्वास्थ्य देऊ शकत नाहीत. आपण नक्की कोण आणि कुठे असावे? असा आयडेंटिटी क्रायसिस त्यांना भेडसावू लागतो, आपण आधीच भारतात परत गेलो असतो तर? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतो. मग ‘लाख दुखोंकी एक दवा है’ असा रामबाण उपाय सापडून रातोरात तो कडवा धार्मिक बनतो. त्याचीही अमेरिकेत झकास सोय आहे. पन्नास हजार डॉलर्स देऊन देवळाच्या भिंतीवर नाव आणि वर्षातून एकदा फर्स्ट क्लासने भारतातून येणाऱ्या एखाद्या गुरु, माता, पंडित किंवा अमुक तमुकानंदांचे प्रवचन ठेवले की, एकदम त्याला सेन्स ऑफ बिलॉगिंग येतो आणि आपला आत्मा ड्रायक्लिन होऊन स्वर्गात जागा बुक केल्याचा आनंद मिळतो.

आतापर्यंत बहुतेकजण रिटायरही झालेत. त्यामुळे भरपूर वेळ आणि पैसा आहे. त्यांचा उपयोग ते आपल्या कर्मभूमीत- लोकल कम्युनिटीत गरिबांना मदत करणे, पर्यावरण वा कलेला उत्तेजन देणे, गरिबांच्या मुलांना शिकवणे अशा गोष्टीत करतात का? तर नाही! कारण त्यांची मानसिकता आता पक्की इंडिया फोकस्ड झालेली असते. मग देवळे, पूजाअर्चा, स्वभाषिक मंडळे आणि फक्त भारतीय मित्रमंडळी यांतच त्याला comfortable वाटू लागते आणि बहुतेक दिवस त्यातच रमतात. त्यांची ‘फक्त भारतीय’ आयडेंटिटी अधिकच घट्ट होते. अमेरिकेत राहून भारतातील व्हॉटस्‌ॲप ग्रुपमध्ये त्याचे तासन्‌तास जातात. मग तेथील मित्र, नातेवाईक आणि शाळा-कॉलेजच्या ग्रुप्समध्ये तर तो इतका रमतो की, आपल्या अमेरिकन शेजाऱ्याशी ओळखही नाही हेही सोईस्करपणे विसरतो. म्हणजे ‘पाण्यात राहून सुकी काष्ठी’ अशी परिस्थिती होते. बहुतेकांना अमेरिकन मित्र नसतातच, किंवा अगदी एक-दोन. अमेरिकन समाजाशी तर संबंध नाहीच. कुठेही गुंतवणूक, बांधिलकी, volunteering किंवा आपलेपणा नाही. सारे लक्ष भारतावरच.

म्हणजे शरीराने इकडे, पण मनाने तिकडे अशा दोलायमान अवस्थेत यातील कित्येकजण जगत असतात. मग सरळ भारतातच वानप्रस्थाश्रमासाठी का जात नाहीत? पण डॉलरचा मोह, कुटुंबाचे पाश आणि तेथील हेल्थकेअरच्या ऐकलेल्या किंवा अनुभवलेल्या भयकथा इत्यादींमुळे तेही करण्याची हिंमत होत नाही. मग ना धड इकडे, ना तिकडे अशा अधांतरी अवस्थेत ते किती समाधानी असतात हे त्यांना ठावे.

आता तर व्हॉटस्‌ॲप ट्रोल आर्मी आणि धार्मिक उन्मादाच्या जमान्यात हे NRIs भारतीय राजकारणात (आपल्या आलिशान घरात बसूनच) घुसले आहेत. भारतातून येणाऱ्या राजकारणावरील बातम्या एकमेकांना फॉरवर्ड करणे आणि आपला धर्म कसा धोक्यात आला आहे याची तावातावाने चर्चा आणि चिंता करणे यात मोकळा वेळ झक्क जातो. पण त्याचवेळी अमेरिकन समाजात आपल्या अवतीभवती काय चालले आहे, गरिबांची काय अवस्था आहे, इत्यादींची त्यांना फारशी चिंता नसते. सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवरही त्यांचे काही लक्ष वा म्हणणे नसते. एक इन्कम टॅक्स रेट सोडल्यास इतर काही अमेरिकन विषय त्यांच्या ध्यानीही नसतात. पण अमेरिकेत राहून फक्त भारतावर लक्ष अशा एका विचित्र quantum state मध्ये हे लोक वावरत असतात. म्हणजे वटवाघळासारखीच अवस्था- धड ना प्राणी, ना पक्षी आणि अधांतरी लोंबकळणारी मानसिकता.

यावर कळस म्हणजे त्यांचे जीवन इतक्या विरोधाभासांनी भरलेले आहे की, हसावे की कीव करावी कळत नाही. आरामात उंची दारू, चवदार पदार्थ सेवन करत आणि उत्तम घरात राहून वैराग्य, अध्यात्म आणि मोक्षाची चर्चा, स्वत: आणि कुटुंबीय हँबर्गर (गोमांस) भक्षण करत भारतात गोहत्या इत्यादींवर परकीयांना दोष देणे (म्हणजे फॉरिनच्या गोमातेच्या पोटी देव नसतात म्हणून?) अमेरिकेत कडक सेक्युलॅरिझम तर भारतात धार्मिक पुरस्कर्ते. भारतीय संस्कृतीचे गोडवे गातानाच आरक्षणाने ‘ते’ कसे माजले आहेत, जातीव्यवस्था कशी गुणवत्तेवरच आधारित होती इत्यादींचे तावातावाने समर्थन करणे, स्त्रियांनी कसे शालीन राहून संस्कृती सांभाळावी इत्यादी... अमेरिकेचे दोष तर पदोपदी काढणे, इथे म्हाताऱ्या लोकांचे किती हाल होतात, मुले विचारत नाहीत वगैरे... पण भारतात त्यांचे जर इतके लाड होतात, तर तिथेच का जात नाही, हे विचारायचे नाही.

आता तर यातील निम्म्याहून अधिकांच्या मुला- मुलींची लग्ने अमेरिकनांशी झाली आहेत. मग John किंवा Tom नावाच्या नातवंडाला मांडीवर खेळवत आणि अमेरिकन व्याह्यांबरोबर तसे बरे संबंध ठेवून, अन्य धर्मीय (उपरे, परदेशी इत्यादी) कसे वाईट असतात याची चर्चा करताना त्यातील विसंगतीही त्यांच्या लक्षात येत नाही! म्हणजे आपल्या कर्मभूमीसाठी काही करायचे नाही आणि जन्मभूमीत जाऊन राहायची इच्छा नाही असे अधांतरी लोकच खरे ABCD म्हणजे America Based Confused Deshis! अर्थात, सरसकट असे काहीच नसते. म्हणजे याला अपवादही अनेक आहेत. न्यूयॉर्कमध्ये ब्रॉडवेची नाटके आणि अमेरिकन संगीतात रस घेणारे होमलेस शेल्टर्समध्ये volunterring करणारे आणि अमेरिकेतील सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय विषयांमध्ये रस असणारे, भाग घेणारे NRIs आहेत. पण Exception proves the rule या संकेताप्रमाणे असे भारतीय फार कमी. असा healthy balance साधणारेच खरे सुखी, पण हे ABCDs त्यात नक्कीच नाहीत!

बिझिनेस एथिक्स

पण यापुढे जे घडले ते भारताच्या मानाने अद्‌भुत होते. दोन तासांच्या इंटरव्ह्यूनंतर मी ट्रेडिंग डेस्कवर परतलो आणि दिवस कसा गेला, कळले नाही. त्या दिवशी बराच तोटा झाला होता. वीस मिलियन हरलो, पण रक्ताच्या धारा निघत असतानाही पुढील खेळीचा विचार करण्याची मलाही सवय होतीच, त्यामुळे ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असे म्हणून मी दिवस आवरला. तेवढ्यात माझ्या बॉसची हाक आली. त्याला अर्थात आजचा तोटा माहीत होताच, पण त्याला बोलायचे होते त्याच्या मुलाच्या इंटरव्ह्यूबद्दल. ‘‘So, What do you think about him?’’ त्याने सहजपणे विचारले.

गोष्ट जवळजवळ 30 वर्षांपूर्वीची, पण माझ्या मनात कायमची ठसून राहिली आहे. त्या वेळी मी अमेरिकेतील जगप्रसिद्ध कमॉडिटी ट्रेडिंग फर्ममध्ये क्रूड ऑईल ट्रेडिंगचा म्हणजे त्याच्या ‘लीधो-दीधो’च्या व्यवसायाचा प्रमुख म्हणून काम करत होतो. खरे म्हणजे मराठी माणूस आणि कमॉडिटी ट्रेडिंग म्हणजे विळ्या-भोपळ्याचे नाते असणार, अशी समजूत. त्यातून जोखीम (रिस्क) आणि त्यात पडणाऱ्याच्या आयुष्याचे वाटोळेच होते, अशी खात्री. त्यात मी कसा पडलो, ही वेगळीच गोष्ट; पण कमॉडिटी ट्रेडिंगबद्दलचे बहुतेक समज खरेही आहेत.

आयुष्यात बहुतेक गोष्टींत विन-विनचा पर्याय असतो. थोडी तडजोड, तर थोडी समजूत होऊन. पण कमॉडिटी ट्रेडिंगचे तसे नाही. अगदी झिरो सम गेम असतो. Biilions of Dollars पणाला लावलेले असतात, त्यामुळे होणारा नफाही अवाढव्य असतो आणि तोही साहेबांना लगेच हवा असतो- पंचवार्षिक योजनेत वगैरे नव्हे! म्हणजे सारेच चक्र अफाट वेगाने फिरत असते. शिवाय, या नफ्यातोट्याचे परिणामही अगदी टोकाचे नफा मिळला तर मालक Miilions of Dollars बोनस म्हणून देतो, तर तोटा झाल्यास ताबडतोब बाहेरची वाट दाखवतो. तिथे सारे काही ब्लॅक ॲन्ड व्हाईट आणि दया- माया काही नाही. शिवाय खासगी कंपनीत किती बोनस द्यायचा, हेही मालकच ठरवतो आणि तुमचे सारे आयुष्य त्यावर अवलंबून असते.

तुम्ही ज्याच्याशी ट्रेडिंग करता, तेही अगदी हुशार हार्वर्ड एमबीए, दिवसाला सोळा तास काम करणारे आणि चतुर असतात. कामाशिवाय त्यांना दुसरे आयुष्य नसते. नफा हे एकमेव ध्येय. तुम्हाला जिंकायचे, तर त्याला हरवावे लागते. तेही दर वर्षी. म्हणजे तुमच्यातही काही वेगळेच टॅलेंट पाहिजे, नाही तर बाहेरची वाट. पण जिंकल्यास मिळणारा बोनस इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा दसपटीने मोठा. म्हणजे साऱ्या आयुष्याची कमाई दोन-चार वर्षांत होऊ शकते. हेच तर मला खरे आकर्षण होते आणि त्यावर मी सारे करिअर पणास लावले होते.

अनिश्चितता आणि जोखीम हा कमॉडिटी ट्रेडिंगचा स्थायिभाव. त्यामुळे सतत तणाव, आक्रमकता आणि भीती यांचे संमिश्र रसायन नसानसांत; म्हणजे यात नॉर्मल पर्सनॅलिटीची माणसे कमीच. त्यामुळे अगदी शेलक्या लोकांना ट्रेडर म्हणून घेतात. केवळ दहा जणांचे ट्रेडिंग डेस्क म्हणजे दहा माणसे कंपनीला Billions of Dollars मिळवून देणार- झिरो सम गेममधून, किंवा पूर्ण दिवाळे वाजवणार. अत्यंत टोकाचा, All or Nothing असा हा धंदा.

या धंद्याचे मुख्य भांडवल म्हणजे ट्रेडर्स. पैसा घालणाऱ्या कित्येक कंपन्या असतात. पण खरे टॅलेंट- ट्रेडर हा मध्यवर्ती. He can make or breakl the whole company. पण हे ट्रेडिंगचे नक्की काय कौशल्य आहे? माझे उत्तर Rational risk taking. जगातले 98 टक्के लोक जोखीम घ्यायला घाबरतात, तर उरलेले दोन टक्के लोक कुठलीही रिस्क बेदरकारपणे घेतात. All or nothing, red or black वर सारी आयुष्याची कमाई लावणारे असे ते लोक. म्हणजे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक Rational risk takers असतात. याला एका अमेरिकन गाण्यात पोकर या पत्त्याच्या ‘जुगारातील पाने’ (Know when to hold them and know when to fold them) असे म्हटले आहे. असे लोक निवडून त्यांना ट्रेडिंग डेस्कवर घेणे, हे तर त्याहीपेक्षा विरळा कौशल्य.

माझा बॉस आणि कंपनीचा मालक त्यापैकी एक. स्वत: बारा-बारा तास ट्रेडिंग डेस्कवर बसून तो सर्व ट्रेडिंग बघायचा. म्हणजे सारे महत्त्वाचे निर्णय आम्ही एकत्र घ्यायचो. अगदी निर्विकार चेहऱ्याने तो बसलेला असे, पण कॉम्प्युटरवर पै न्‌ पैचा हिशोब व सर्व कमॉडिटी पोझिशन्स त्याला तंतोतंत माहीत असायच्या. अगदी Hundreds of millions of dollars चा तोटा होत असतानाही तो शांतपणे Don’t get married to the position, where is the market going from here? असे प्रश्न विचारायचा. म्हणजे फक्त भविष्याकडे नजर. झाल्या- गेल्या चुकांची चर्चा नाही. शिवाय दर वर्षी मुख्य ट्रेडर्सचा बोनस तोच ठरवत असे. म्हणजे तुम्हाला दोन मिलियन डॉलर्स द्यायचे की दहा, ते फक्त तोच ठरवायचा. यालाच Discretionary bonus म्हणतात. अपील नाही. केवळ त्याचाच अंदाज आणि त्याच्या मनावर किंवा ॲसेसमेंटवर तुमच्या आयुष्याची कमाई अवलंबून. साऱ्या ट्रेडिंग डेस्कला त्याच्याविषयी भीतीयुक्त आदर होता. ट्रेडिंग डेस्कवर तसे भरपूर टॅलेंट आणि इगोवाले तरुण होते (यंग बक्स) पण बॉसचा वावर, व्यक्तिमत्त्व आणि प्रभाव काही वेगळाच होता. माझे आणि त्याचे संबंध तसे चांगले होते. मला त्याच्याविषयी आदर तर होताच, पण त्यालाही माझ्या विचारांचे वेगळेपण (Thinking out of the box) आणि ट्रेडिंग डेस्क मॅनेज करण्याचे कौतुक होते. पण अर्थात नफा सर्वांत महत्त्वाचा, हेही अधोरेखित.

अशा सर्व पार्श्वभूमीवर हा बॉस एके दिवशी सहज माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘सुनील, माझा मुलगा आता कॉलेजमधून ग्रॅज्युएट होत आहे. त्याला ट्रेडिंगमध्ये यायची फार इच्छा आहे- बापाच्या पावलावर पाऊल टाकायची. तू जरा त्याचा इंटरव्ह्यू घे आणि बघ तुला काय वाटते ते.’’

मी त्याच्या मुलाला कित्येकदा भेटलो होतो. ऑफिसमध्ये सहज यायचा तेव्हा, पण उत्तम ओळख अशी नव्हती. मी अर्थात ‘हो’ म्हणालो आणि त्याला पुढच्या आठवड्यात भेटायला बोलावले. बॉसचाच मुलगा म्हणजे हुशार वगैरे होताच अन्‌ बापाचीही त्याला ट्रेडिंगमध्ये आणायची इच्छा दिसली. आता माझी थोडी संमती मिळाली की झालेच. मुलगाही त्याच थाटात उगवला. ट्रेडिंग डेस्कपाशी बसूनच आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग जरा आतल्या ऑफिसमध्ये गेलो. एकदम ट्रेडिंगवर बोलण्याआधी कॉलेज, पुढे काय करायची इच्छा आहे, खरी आवड कशाची, त्यागाची तयारी इत्यादी गप्पाही झाल्या. मुख्यत: जोखीम आणि त्याची किंमत यावरचे त्याचे विचारही जाणून घेतले. जेवढ्या जास्त गोष्टी झाल्या, तसतसे मला जाणवत गेले की, मडके अजून जरा कच्चे आहे. म्हणजे पुढे कदाचित तयार होऊ शकेल, पण या क्षणी तरी ट्रेडिंग डेस्कवर बसायची त्याची तयारी किंवा लायकी नाही. ज्या धंद्यात ट्रेडर हेच मुख्य भांडवल, त्यात असला कच्चा दुवा घेणे म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे, असे मला वाटले.

पण यापुढे जे घडले ते भारताच्या मानाने अद्‌भुत होते. दोन तासांच्या इंटरव्ह्यूनंतर मी ट्रेडिंग डेस्कवर परतलो आणि दिवस कसा गेला, कळले नाही. त्या दिवशी बराच तोटा झाला होता. वीस मिलियन हरलो, पण रक्ताच्या धारा निघत असतानाही पुढील खेळीचा विचार करण्याची मलाही सवय होतीच, त्यामुळे ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ असे म्हणून मी दिवस आवरला. तेवढ्यात माझ्या बॉसची हाक आली. त्याला अर्थात आजचा तोटा माहीत होताच, पण त्याला बोलायचे होते त्याच्या मुलाच्या इंटरव्ह्यूबद्दल. ‘‘So, what do you think about him?’’ त्याने सहजपणे विचारले. ट्रेडिंगच्या धंद्यात beating around the bush ची पद्धतच नाही. सारे उघड, सरळ आणि रोखठोक.

आता मी भारतात असतो, तर हा खरोखरच यक्षप्रश्न होता. तिथे मालकाचा मुलगा म्हणजे ‘छोटे मालक’ म्हणून लहानपणापासूनच लोक ठरवून टाकतात आणि तसे वागतातही. आपले सारे आयुष्य ज्याच्या हाती आहे, त्याच्या पोराला नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही; आणि तशी हिंमत दाखवणाऱ्याला भिकेचे डोहाळे लागलेत, असेच लोक समजतील. माझ्या बाबतीत तर साऱ्या आयुष्याची कमाई दोनचार वर्षांत कमवायच्या कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये, एका खासगी कंपनीत ‘सारा बोनस अपनी मुठ्ठीमें’ अशा बॉसला आता काय सांगावे? अशा वेळी सेफ गेम खेळणे- हाच मार्ग बहुतेकांनी स्वीकारला असता. पण एका क्षणाचाही विलंब न लावता मी बॉसला सांगितले, ‘‘मुलगा हुशार आहे, पण अजून तयार नाही. कदाचित एमबीए आणि कुठे तरी इंटर्नशिप केल्यावर होईल, पण आत्ताच मी त्याला ट्रेंडिंग डेस्कवर घेऊ शकत नाही.’’ मी थांबलो, आणि क्षणभर तोही काही बोलला नाही.

तो क्षण लांबल्यासारखा वाटला. बॉस माझ्याकडे बघत होता- डोळ्याला डोळा लावून. अगदी हिंदी सिनेमातल्यासारखा हाय टेन्शन ड्रामाचा क्षण होता. अन्‌ तो सहजपणे म्हणाला, ’’ Thank you, Sunil. प्लीज, तू पुन्हा एकदा भेटून त्याला हे सांग, म्हणजे पुढील शिक्षणाची तो तयारी करू शकेल. जरा मार्गदर्शन कर त्याला.’’

या क्षणाला भारतीय सिनेमाप्रमाणे रिटेक करायचा असता, तर तिथे बॉस आला असताना मान लचकेपर्यंत जोरजोराने हलवून ‘‘यस्स सर, यस्स सर, यू आर ॲब्‌सोल्यूटली राईट सर’’ असे म्हणतात व तो केबिनमधून बाहेर पडताच, ‘‘साला क्या मा...’’ म्हणतात असे कानांवर आलेले आहे. अशा वेळी किमान त्यातला पूर्वार्धाचा तरी डायलॉग झाला असता आणि त्याच्या मुलावर आणखी काही गुणांची लेणी चढवून तिथेच त्याची प्राणप्रतिष्ठापना केली असती. पण इथे माझे पूर्ण भवितव्य ज्याच्या हाती आहे, त्या मालकाच्या मुलाला स्पष्टपणे नाकारताना क्षणभरही किंतु माझ्या मनात आला नाही की, हा माणूस त्याच्या मुलाला (भावी मालक?) नाकारल्यामुळे मनात डूख धरून माझे काही मिलियन काटेल किंवा पाय ओढेल. यातच अमेरिकन बिझिनेस एथिक्स आणि प्रोफेशनॅलिझमची प्रचिती येते.

माझ्या धाडसाचेही मला थोडे कौतुक वाटले. फारच कमी भारतीयांनी हे धाडस दाखवले असते. पण मुख्यत: या प्रसंगात बरेच काही सामावले आहे. अमेरिकेत फेअरनेसवर फार भर आहे. गुणवत्ता अग्रगण्य आहे. तिला रंग, रूप, धर्म, वंश इत्यादी वैशिष्ट्ये नसतात. म्हणून तर सुंदर पिचाई, सर्गेबिन, इंद्रा नूयी आणि असे हजारो परकीय लोक येथील मोठमोठ्या धंद्यांचे प्रमुख आहेत. कारण असा उदारमतवाद, सेक्युलॅरिझम व फेअरनेस हा धंद्याच्या आणि समाजाच्या उन्नतीला पोषक असतो, हे त्यांनी जाणले आहे. पण धंदा, नफा यांच्या पलीकडे फेअरनेस आणि सेक्युलॅरिझम ही अमेरिकेची Founding preinciples आहेत. म्हणूनच अमेरिका बहुतेक क्षेत्रांत टॉपला आहे. Fast Forward - पुढे मी आणखी काही वर्षे तिथे काम केले, पण मला आपल्यावर अन्याय झाला किंवा short change केले, असे एकदाही वाटले नाही. आता आम्ही दोघेही केव्हाच रिटायर होऊन फ्लोरिडामध्ये राहतो. बॉस अन्‌ मी अधून-मधून एकत्र येऊन छान सिंगल-माल्ट घेत गप्पाही मारतो. मुख्य म्हणजे, तो पोरगा अखेर काही वर्षांनी स्वत:च्या कर्तृत्वावर कमॉडिटी ट्रेडर झाला आणि आज स्वत:चा कमॉडिटी hedge funds ही चालवतो- बापाची मदत न घेता!

लेखन : सुनील देशमुख (अमेरिका)

sunild@aol.com

Share on Social Media

राजकारण आणि भूईमूग

लुई फिशर

गांधी हे जगण्यातील समस्यांना मुळापासून उचकटून टाकण्याचा प्रयत्न करणारे जहाल क्रांतिकारीच आहेत. शब्दांमधून व स्वतःच्या कृतीचा दाखला घालून देऊन करोडो लोकांचं जीवन उन्नत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ते करतात. अस्पृश्यांना सहन करावं लागणारं क्रौर्य नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून ते रोजच्या जगण्यात स्वतःला अस्पृश्य मानतात. हिंदू व मुस्लिम यांच्यातील ज्वालामुखी भडकतो, तेव्हा ते स्वतःचा तंबू तप्त शिलारसाच्या काठावर नेऊन उभा करतात. सदासर्वकाळ ते शेतकऱ्यांच्या निकट राहतात, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे.

मोहनदास करमचंद गांधी हे ‘हरिजन’ नावाचं एक लहानसं साप्ताहिक चालवतात. त्यात ते स्वतःच्या सहीने लेख लिहितात आणि प्रश्नोत्तर स्वरूपाचं एक सदरही चालवतात. मजूर पक्षाच्या ब्रिटिश सरकारने मार्च 1946 मध्ये तीन ज्येष्ठ मंत्र्यांचं कॅबिनेट मिशन स्वातंत्र्यासंदर्भात वाटाघाटी करण्यासाठी भारतात पाठवलं. गांधी, जवाहरलाल नेहरू व काँग्रेस पक्षाचे बाकीचे नेते, मुस्लिम लीगचे अध्यक्ष मोहम्मद अली जीना व इतर अनेकांच्या भेटीगाठी या ब्रिटिश मंत्र्यांनी घेतल्या. अखेरीस, 16 मे रोजी कॅबिनेट मिशनने भारतामध्ये राष्ट्रीय सरकार स्थापनेची व राज्यघटनानिर्मितीची योजना मांडली. ही योजना भारतीय लोक स्वीकारतील का, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालं नव्हतं. शिवाय, महात्मा गांधी या योजनेचा स्वीकार करतील का, हा प्रश्न त्याहून महत्त्वाचा होता. कारण भारतामध्ये गांधीजी हे सर्वांत मोठी ताकद आहेत.

गांधींनी ‘चार दिवस सखोल परीक्षण’ केलं आणि मग सव्वा पानाचा एक लेख लिहिला. या लेखात त्यांनी कॅबिनेट मिशनच्या योजनेची प्रशंसा केली. ‘ब्रिटिश सरकारने तयार केलेला हा दस्तावेज सद्य:स्थितीत सर्वोत्तम ठरणारा आहे’, असं त्यांनी जाहीर केलं. ‘ब्रिटिश सत्ता संपुष्टात आणण्याचा सर्वांत सोपा आणि सर्वांत जलद गतीने अमलात आणता येईल, असा मार्ग कॅबिनेट सदस्यांनी शोधला आहे’, असं मत गांधींनी व्यक्त केलं. ‘हरिजन’मधला गांधींचा हा लेख भारतातील प्रत्येक वर्तमानपत्राने पुनर्प्रकाशित केला. वॉशिंग्टनमधील उच्चपदस्थांना व राजनैतिक अधिकाऱ्यांना वाचता यावा म्हणून हा मजकूर तारेने तिकडे पाठवण्यात आला. शिवाय, ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही हा लेख संपूर्ण छापला. भारताच्या स्वातंत्र्यासंबंधी ब्रिटिशांनी मांडलेल्या ऐतिहासिक प्रस्तावाचं विश्लेषण गांधींनी या लेखाद्वारे हरिजनमध्ये केलं.

त्या मजकुराखालीच त्यांनी दुसराही एक लेख लिहिला होता. या दुसऱ्या लेखाचं शीर्षक ‘मँगो सीड कर्नेल’ (आंब्याच्या कोयीतला गर) असं होतं. ‘अन्नधान्यं व चारा यांना वाजवी पर्याय’ ठरेल इतकं पोषणमूल्य आंब्याच्या कोयीतील गरामध्ये असतं, अशी वाखाणणी त्यांनी केली. ‘प्रत्येक आंब्याची कोय बाजूला काढली आणि त्यातील गर शिजवला व अन्नधान्याऐवजी खाल्ला किंवा गरजूंना दिला, तर ते फारच हिताचं ठरेल,’ असं त्यांनी लिहिलं. हरिजनमधला त्यापुढचा लेखही ‘एम. के. गांधी’ या सहीने लिहिलेला होता. गांधींनी त्यांचा सध्याचा वेळ निसर्गोपचारांना समर्पित केला आहे आणि हा तिसरा लेख त्याच विषयावर होता.

‘निसर्गोपचाराचे दोन भाग आहेत. एक- देवाचं नाव घेऊन किंवा रामनामाद्वारे आजार बरा करणं. आणि दोन- योग्य व स्वच्छ जीवनमान अंगीकारून आजारांना आळा घालणं... अंत:स्थ व बाह्य अशा दोन्ही स्तरांवर संपूर्ण स्वच्छता पाळली, तर आजार आसपास फिरकतही नाहीत.’ मग दुधाचं मूल्य स्पष्ट करताना त्यांनी लिहिलं की, ‘गाईच्या दुधाची सर म्हशीच्या दुधाला नाही.’ हरिजनचा हा अंक गांधींच्या एकंदर आस्थाविषयांचा आणि वैशिष्ट्यांचा खास नमुना आहे. गांधींना व्यक्तीच्या जीवनामध्ये रस आहे आणि व्यक्तीचं जगणं बहुआयामी असतं, त्यामुळेच गांधीसुद्धा बहुआयामी माणूस आहेत.

हरिजनच्या अंकांमधून गांधींनी ‘भुईमुगा’च्या विविध वापरांकडे नागरिकांचं लक्ष वेळोवेळी वेधलं आहे. त्याच वेळी, ‘थुंकण्याच्या क्रियेचा निषेध गांधी का करत नाहीत,’ असा प्रश्न एका महिलेने विचारला असता, त्यावरही ते प्रतिसाद देतात. आपण थुंकण्याचा निषेध कायमच केला असून, आत्ताही करतो आहोत, असं गांधी लिहितात. एखाद्या लेखात गांधी भारतीय स्वातंत्र्याची व्याख्या देतात. दुसऱ्या एखाद्या लेखात, ‘कॅन्डी तयार करण्यासाठी होणारा साखरेचा शिधापुरवठा कमी करावा,’ अशी विनंती करतात. तिसऱ्या लेखात, गुन्हा व गुन्हेगार यांची समस्या ते हाताळतात. तर, स्वतंत्र भारताने सैन्य राखू नये, अशी अपेक्षा चौथ्या लेखात व्यक्त करतात. मग पाचव्या लेखात, खोटेपणा कधीच समर्थनीय नसतो, असा नियम अधोरेखित करताना लिहितात : सत्यकथनाला कोणताही अपवाद स्वीकारार्ह नाही.

राजकारण जास्त महत्त्वाचं आणि भुईमूग कमी महत्त्वाचा, असा भेद संत व महात्मा रूपातील गांधी करत नाहीत. गांधी दिवसाचे चोवीस तास सार्वजनिक जीवन जगतात; किंबहुना त्यातून त्यांना ऊर्जा मिळते, ही त्यांच्याबाबतची अत्यंत विस्मयकारक गोष्ट आहे. डॉ. दिनशा मेहतांच्या मुंबई येथील दवाखान्यातील ओट्यावरच्या दगडी फरशीवर एक फळी आहे, त्यावर गांधींची चटई ठेवलेली असते. हा ओट्याचा भाग खुला आहे आणि जमिनीला समांतर आहे. अनेक अनुयायी आपल्या या गुरूजवळ त्याच ओट्यावर झोपतात. पहाटे चार वाजता महात्मा गांधी व त्यांचे सहकारी प्रार्थना म्हणतात. मग गांधी संत्र्याचा किंवा आंब्याचा रस पितात आणि पत्रांना स्वतःच्या हाताने उत्तरं लिहितात. सध्या त्यांचं वय अठ्ठ्याहत्तर आहे. आपण सव्वाशे वर्षं जगू, अशी त्यांना आशा आहे. त्यांचं हस्ताक्षर स्पष्ट व ठाशीव आहे. त्यांची दृष्टी सुस्पष्ट आहे, त्यांना ऐकूही चांगलं येतं.

एका भारतीय राजघराण्यातील राजकुमारी अमृतकौर ही ख्रिस्ती महिला दिवसातून एकदा त्यांना बातम्या वाचून दाखवते. सर्वसंगपरित्याग करून त्या गांधींच्या प्रमुख इंग्रजी सचिव झाल्या आहेत. एका ब्रिटिश तारसंस्थेकडून मिमिऑग्राफ स्वरूपाची ही वार्तापत्रं त्यांच्यापर्यंत येतात. गांधी स्वतः वर्तमानपत्रं वाचत नाहीत, रेडिओ ऐकत नाहीत. मात्र, भारतभरातून त्यांना हजारो पत्रं येतात आणि शेकडो लोक त्यांना भेटायला येत असतात. निकेल धातूचं एक गोल घड्याळ गांधींच्या पंच्याला कमरेभोवती बांधलेलं असतं आणि त्यांची प्रत्येक कृती त्या घड्याळ्याच्या काट्यांनुसार घडते. ते अतिशय वक्तशीर आहेत. भेट घ्यायला आलेल्यांसोबतचा त्यांचा संवाद साधारण एखादा तास चालतो आणि बरोब्बर त्या क्षणी ते संवाद थांबवतात. तोवरचं जवळपास सगळं बोलणं गांधींनीच केलेलं असतं. बोलण्यातून त्यांना आनंद मिळतो.

खरं तर ते करत असलेली प्रत्येक कृती त्यांच्यासाठी आनंददायीच असते- विशेषतः बोलणं, चालणं, खाणं व झोपणं. या कृती त्यांच्यासाठी खास आनंदाच्या आहेत. 1942 मध्ये रणरणत्या उन्हाळ्यामध्ये सेवाग्राम येथे मी आठवडाभर गांधींसोबत राहिलो. नंतर, 1946 मध्ये मी त्यांच्यासोबत सहा दिवस मुंबई, दिल्ली व अन्यत्र प्रवासात घालवले. दुसऱ्या भेटीत पहाटे साडेपाच वाजता मी त्यांच्यासोबत चालायला जात असे. पहिल्याच सकाळी त्यांनी मला विचारलं,

‘‘काल झोप कशी लागली?’’

मला धड झोप लागली नव्हती, एक डास सतत माझ्या कानाजवळ भुणभुण करत होता- हे मी त्यांना सांगितलं.

‘‘पण तुम्ही कसे झोपलात?’’ मी विचारलं.

‘‘मला कायम चांगलीच झोप लागते.’’ ते म्हणाले.

दुसऱ्या दिवशी सकाळीही त्यांनी पुन्हा माझ्या झोपेविषयी चौकशी केली. मी म्हटलं,

‘‘बरी लागली. तुम्हाला?’’

‘‘विचारूच नका. मला कायम चांगलीच झोप लागते.’’ ते म्हणाले.

तिसऱ्या दिवशी मीच त्यांना झोपेबाबत विचारलं.

‘‘मला तो प्रश्नच विचारू नका, असं मी म्हटलं ना तुम्हाला?’’ ते गरजले.

‘‘मला वाटलं, तुम्ही विसरला असाल!’’ मी थट्टेच्या सुरात म्हटलं.

‘‘अंहं! माझी तब्येत खालावलेय, असं तुम्हाला वाटतंय की काय? बरं, तुम्हाला कशी झोप लागली?’’ त्यांनी विचारलं.

‘‘काही विचारू नका!’’ मी म्हटलं.

‘‘बरंय. बुडत्याला काडीचा आधार’’, असं म्हणून गांधी हसले. नंतर काही दिवस सकाळच्या वेळी पावसाची रिपरिप सुरू होती.

‘‘आता काय, पावसातही चालायला जाणार की काय?’’ मी जरा विरोधी पवित्रा घेत विचारलं.

‘‘मग काय! चला, चला. असं म्हाताऱ्यासारखं वागू नका.’’ ते म्हणाले.

चार वर्षांपूर्वी ते जितकं वेगाने चालायचे, ती गती आता नाही. पण त्यांच्या चालण्यातील तीव्रता कायम आहे आणि पंचेचाळीस मिनिटं सलग चालल्यावरही ते थकत नाहीत. चालून परत आल्यावर ते दुसऱ्यांदा नाश्ता खातात, करतात, पाहुण्यांना भेटतात, डॉ.मेहता यांच्याकडून बराच वेळ मालिश करून घेतात आणि मग झोपतात. गांधींच्या खोलीत दगडी फरशीवर एक बिछाना टाकलेला आहे, त्यावरच त्यांचा दिवस जातो आणि दिवसाची झोपही ते तिथेच काढतात. चिनी मातीच्या ताटलीतून किंवा तकाकी दिलेल्या धातूच्या भांड्यांमधून त्यांना अन्न दिलं जातं. कच्च्या व शिजवलेल्या भाज्या, फळं, दुधात शिजवलेला खजूर, दुधातील सांजा व पातळ चपात्या असा त्यांचा आहार असतो.

गांधी अनेकदा एखाद्या झोपडपट्टीतील कच्च्या बांधणीच्या झोपडीत राहतात. या झोपडपट्टीत अस्पृश्यांची वस्ती असते. अस्पृश्यांशी संपर्क आल्यास आपल्याला विटाळ होतो, या धारणेने धार्मिक हिंदू लोक सर्वसाधारणतः अस्पृश्यांपासून अंतर राखतात. सवर्णांची ही क्रूर वागणूक बदलावी, अशी गांधींची इच्छा आहे. त्यामुळे शक्य असेल तेव्हा ते अस्पृश्यांमध्ये जाऊन राहतात. याचा परिणाम म्हणून सवर्ण हिंदूंनी अस्पृश्यांना नोकर व आचारी म्हणून कामावर ठेवायला सुरुवात केली आहे. भारतात सर्वत्र- विशेषतः शहरांमध्ये अस्पृश्य व सवर्ण हिंदू यांच्यातील भिंत कोसळून पडते आहे, असं मला सांगण्यात आलं.

हजारो वर्षं अस्पृश्यांसाठी बंद असलेल्या पवित्र मंदिरांची दारं अस्पृश्यांसाठी खुली करायला गांधींनी भाग पाडलं. ‘‘मी अस्पृश्य आहे’’, ते मला म्हणाले. जन्माने ते अस्पृश्य नाहीत, तर सवर्ण हिंदू आहेत. पण इतर हिंदूंनीही आपलं अनुसरण करावं, यासाठी ते स्वतःला अस्पृश्य मानतात. नंतर ते म्हणाले, ‘‘मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिस्ती आहे, ज्यू आहे, बौद्ध आहे.’’ काही अपवाद वगळता बहुतांश भारतीय हे गांधींसमोर आले की, वाकून वंदन करतात आणि सर्वसाधारणतः त्यांच्या पायांना स्पर्श करतात. बहुतेकदा गांधी असं करणाऱ्यांच्या पाठीवर मुठीने प्रहार करून त्यांना थांबवतात. मग हे लोक खाली बसतात आणि संवाद सुरू होतो. घरातल्या कोणालाही तिथे येऊन बसायची मुभा असते. पण बहुतेकदा हे बोलणं गांधी व संबंधित मनुष्य यांच्यापुरतंच मर्यादित राहतं.

भारतातील विविध प्रांतांचा कारभार बघणारे काँग्रेसचे पंतप्रधान गांधींचा सल्ला घेण्यासाठी येतात. शिक्षणतज्ज्ञ आपल्या कल्पना गांधींसमोर मांडून पहिली चाचपणी करतात. नवी योजना सुचलेले किंवा अशी काही योजना नसलेलेही गांधींचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. काही जण वैयक्तिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मदत मागायला येतात. मी गांधींसोबत असताना, एकदा एक अस्पृश्य जोडपं त्यांना भेटायला आलं. वैवाहिक जीवनात सुखी नसलेल्या या दाम्पत्याने आपल्या दुःखी कहाण्या ऐकवल्या. गांधींनीही त्यांच्याशी संवाद साधण्यात काही तास घालवले.

आवश्यक त्या आर्थिक व सामाजिक सुधारणा घडवण्यासाठी शेतकरी व कामगार गांधींची मदत मागतात. 1946 च्या भेटीदरम्यान मी त्यांच्यासोबत पुण्याहून मुंबईला गेलो. साधारण साडेतीन तासांचा प्रवास होता. गांधींसोबत त्यांचे सुमारे दहा सचिव व अनुयायी आणि त्यांचा डॉक्टर असा चमू होता. तिसऱ्या वर्गाचा एक खास डबा त्यांनी व्यापला. ट्रेनमध्ये दणकट लाकडी बाकडं होतं. त्या दिवशी पाऊस कोसळत होता. थोड्याच वेळात ट्रेनच्या छतामधून पाणी गळायला लागलं. यादरम्यान गांधींनी ‘हरिजन’साठी एक लेख लिहिला. मग दुसऱ्या एका लेखाची मुद्रितं तपासली. त्यानंतर त्यांच्याशी बोलायला ट्रेनमध्ये चढलेल्या काही राजकीय नेत्यांशी चर्चा केली. प्रचंड पाऊस असतानाही प्रत्येक स्थानकावर गांधींना बघायला लोकांची गर्दी जमलेली असायची.

एका ठिकाणी साधारण चौदा वर्षांचे दोन मुलगे पूर्ण निथळत्या अवस्थेत गांधींच्या डब्याजवळ खिडकीपाशी उभे होते आणि ‘‘गांधीजीऽ गांधीजीऽऽ’’ असं ओरडत होते. ‘‘त्यांच्यासाठी तुम्ही कोण आहात?’’ मी गांधींना विचारलं. त्यांनी दोन बोटं स्वतःच्या टकलाच्या वरती धरली आणि म्हणाले, ‘‘ही शिंगं. मी प्रदर्शनात ठेवलेला शिंगवाला माणूस आहे.’’ (हे त्यांनी नेहमीप्रमाणे अचूक इंग्रजीत सांगितलं) त्यांच्यातील ऊर्जा पाहून मी थक्क झालो. रात्री दहा वाजायच्या आधी ते झोपत नाहीत. ते ओटीवर झोपेची तयारी करत असताना कधी कधी मी त्यांच्या जवळून जात असेन, तर ते माझी थट्टा करायचे किंवा ‘तुम्ही प्रार्थना केली तर झोप चांगली लागेल,’ असं म्हणायचे.

गांधी अत्यंत धार्मिक आहेत. देवावरील श्रद्धा, आपण देवाचं साधन आहोत ही धारणा, त्याचप्रमाणे स्वर्गातील देवापर्यंत पोचण्यासाठी आणि पृथ्वीवर शांतता व आनंद राखण्यासाठी अहिंसा हाच मार्ग आहे असा विश्वास- हा त्यांच्या धर्माचा गाभा आहे. त्यांच्या सर्व राजकीय कृती, विचार व विधानांची जडण-घडण अहिंसा या तत्त्वातून झालेली असते. गांधींनी दोन महायुद्धांचा अप्रत्यक्ष उल्लेख अनेकदा केला. ‘पाश्चात्त्यांना तुम्ही अहिंसेचा संदेश का दिला नाही,’ असं मी त्यांना विचारलं. ‘‘मी फक्त आशियाई आहे, निव्वळ आशियाई आहे. पण खरं म्हणजे येशूही आशियाई होता!’’ ते हसत म्हणाले. मग म्हणाले, ‘‘मी पाश्चात्त्यांना अहिंसेचा संदेश कसा देऊ? अजून भारतामध्येही सर्वांना हे तत्त्व पटवून देणं मला शक्य झालेलं नाही. माझे प्रयत्न व्यर्थच ठरले.’’

आपल्या देशातील तरुणाईची प्रवृत्ती हिंसक, अधीर व क्रांतिकारी आहे, हे त्यांना जाणवतं. गांधींनी त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आहे. पण हे उद्दिष्ट हिंसेद्वारे साध्य करण्याची त्यांची इच्छा नाही. समाजवाद्यांशी या मुद्यावरून त्यांचं भांडण होतं. भारतातील वाढत्या समाजवादी चळवळीचे नेते पंचेचाळीस वर्षीय जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल बोलताना गांधी म्हणाले, ‘‘त्याचा जन्मही झाला नव्हता, तेव्हा मी समाजवादी होतो.’’ जयप्रकाशांचं व्यक्तिमत्त्व लक्षणीय आहे. विस्कॉन्सन व ओहिओ इथल्या विद्यापीठांमध्ये ते शिकले, स्वच्छतागृहातील वस्तू घरोघरी जाऊन विकण्याचं काम त्यांनी शिकोगामध्ये केलं आणि भारतात त्यांनी वेळोवेळी तुरुंगवासही भोगलेला आहे. जगभरातील समाजवाद्यांप्रमाणे जयप्रकाशसुद्धा साम्यवादी व सोव्हिएत यांचे कट्टर विरोधक आहेत.

गांधींना जयप्रकाश आवडतात आणि तेही गांधींचे भक्त आहेत. पण 1942 मध्ये गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली भारतातील समाजवाद्यांनी हिंसक पद्धतींचा वापर केला. समाजवाद्यांनी त्यावेळी घातपाती कृत्यं केली, पोलिसांच्या नजरेस येणार नाही अशा रीतीने भूमिगत संघटना उभारली आणि बळाचा वापर करून प्रशासनाच्या कामकाजामध्ये अडथळे आणले. गांधींच्या अहिंसेच्या नियमांमध्ये अशा कृतींना स्थान नाही. वास्तविक, राष्ट्रीय स्वातंत्र्याबद्दल समाजवाद्यांना वाटणाऱ्या तीव्र इच्छेचे जनक गांधी आहेत आणि अंतिम समाजवादी उद्देशही गांधींना मान्य आहे; पण तरीही त्यांचं समाजवाद्यांशी पटत नाही.

दुसऱ्या महायुद्धावेळी गांधींनी जपान्यांना व नाझींना विरोध दर्शवला, पण त्यांची भूमिका युद्धविरोधीही होती. शस्त्रसामर्थ्याच्या आधारावर शांतता प्रस्थापित करणं विजयी सत्तांना शक्य होणार नाही, असं त्यांना वाटत होतं. गांधी तात्कालिक उद्दिष्टांच्या पलीकडे पाहतात. गांधीजी मानवतेकडे पाहत असतात. खुद्द त्यांचा भारतही सत्तेच्या स्वार्थी ध्यासाकडे कलताना दिसतो आहे आणि राज्यसंस्था व खासगी मालमत्तेचा प्रचंड संचय या गोष्टींनी व्यक्तीला अंकित केलं आहे. गांधींच्या मनातील आदर्श आर्थिक रचनेमध्ये, शेती व कुटिरोद्योगांवर आधारलेली स्वावलंबी गावं आणि मोजकी लहान शहरं असतील. आपण गरिबांचे व लहान माणसांचे कैवारी आहोत, असं ते मानतात. बहुतांश भारतीयांप्रमाणे गांधी भारतीय संस्कृतीला श्रेष्ठ मानतात. भारत आजारी आहे, त्याचं हृदयच आजारी आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही.

भारतीय लोक मुख्यत्वे स्वतःच्या समस्यांविषयी विचार करतात. पण गांधींशी बोलताना भारताच्या आरशामध्ये संपूर्ण जगाचं प्रतिबिंब पडल्याचं पाहायला मिळतं. आजूबाजूची अवस्था व वस्तुस्थिती यांच्याविषयी गांधींशी केलेली कोणतीही चर्चा नीरस पातळीवर राहत नाही. एखाद्या शब्दप्रयोगाने ते सगळी चर्चा उच्च प्रतलावर नेऊन ठेवतात, त्यामुळे चर्चेचा विषय पृथ्वीवर मानवाला भेडसावणाऱ्या समस्यांच्या व्यापक तात्त्विक चौकटीमध्ये जाऊन बसतो.

अमेरिकेतील दुष्काळासंबंधी काम करणारं प्रतिनिधी मंडळ एकदा गांधींना भेटायला गेलं. त्यांपैकी एकाने विचारलं की, भारत उपासमारीच्या उंबरठ्यावर असताना जपानसारख्या गतकालीन शत्रूला अमेरिकेने अन्नपुरवठा करणं योग्य आहे का? यावर गांधी म्हणाले, ‘‘अन्नाची गरज जपान्यांना भारतापेक्षा जास्त असेल, तर अमेरिकेने आधी जपानला अन्नपुरवठा करायला हवा, कारण अमेरिकेने जपानचा अंतरात्मा संपवण्याचा प्रयत्न केला होता.’’ मग त्यांनी अणुबॉम्बच्या वापराचा कठोरपणे धिक्कार केला. गांधी राष्ट्रवादी आहेत, पण मानवतावादामुळे ते आंतरराष्ट्रीयतावादीही होतात. मात्र त्यांचा पहिला आस्थाविषय भारत हा आहे.

सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्याशी झालेलं संभाषण आणि भुईमुगाची लागवड या दोन्ही गोष्टी गांधींच्या लेखी एकाच ध्येयाकडे जात असतात- चाळीस कोटी भारतीयांचं कल्याण साधणं, हे ते ध्येय असतं. गांधींनी या लोकांमध्ये स्वतःला मिसळून टाकलेलं आहे. त्यामुळे ते भारतातील सर्वांत प्रिय आणि सर्वांत प्रभावशाली व्यक्ती आहेत. हिंदू लोक एका देवाची आराधना करतात, पण अनेक दुय्यम देवांची व मूर्तींचीही आराधना करतात. काही हिंदू मंदिरांमध्ये तर गांधींच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. ‘स्वर्गाची दारं गांधींच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहत आहेत...’ मुंबईतला एक संतप्त भांडवलदार मला म्हणाला. ‘स्वर्गाच्या दारांना आणखी वाट पाहायला लावायची गांधींची इच्छा असावी. त्याउलट, पृथ्वीलाच अधिक स्वर्गमय करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.’

पूर्वेकडील भाग इतका भुकेला, विपन्न व दुःखी आहे की, तो पोटातून विचार करतो, उघड्या-वाघड्या स्थितीतून जगाकडे बघतो आणि स्वतःच्या दुर्दशेतून परिस्थितीचा अनुभव घेतो. इथल्या करोडो लोकांना बलाढ्य शक्तींचा दरारा वाटतो, पण वैयक्तिक लाभावर पाणी सोडून सर्वांच्या कल्याणाकरिता जीवन समर्पित केलेल्यांनाच इथले लोक मनापासून मानतात. गांधी हे आजीवन सर्वसंगपरित्याग व समर्पणभाव यांचं प्रतीक आहेत. ते भारतीयांसारखे जगतात आणि भारतासाठी जगतात. अनेकांचे त्यांच्यासोबत मतभेद आहेत. ब्रह्मचर्य, संपूर्ण शांततावाद व निसर्गोपचार अशा विषयांवरचे त्यांचे विचित्र विचार अनेकांनी नाकारले आहेत. पण त्यांची सचोटी, शहाणीव व सत्याबाबतची उत्कटता यांबद्दल सर्वांना आदर वाटतो. गांधी स्वतःचंच म्हणणं खोडणारं विधान करतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचं पाश्चात्त्य व्यक्तीला वाटतं. पण पौर्वात्य व्यक्तीच्या मते, गांधी स्वतःशी प्रामाणिक राहत असल्यामुळे हा विरोधाभास दिसतो.

आपला व्यापक प्रभाव असल्याचं गांधी नाकारतात. मी देवाचा सेवक आहे, असं ते म्हणतात. पण वस्तुतः गांधी माणसाचे सेवक आहेत, म्हणून अनेक अश्रद्ध व्यक्तीही स्वतःला त्यांचा अनुयायी म्हणवून घेतात. लोकशाहीचा व्यापक अर्थ केवळ शासनपद्धतीपुरता मर्यादित नाही... तर, ती माणसा-माणसामधील जवळपास प्रत्येक नात्यावर प्रभाव टाकणारी सामाजिक संघटनेची व्यवस्था आहे, हे वुड्रो विल्सन यांचं विधान गांधींना अंतःप्रेरणेने समजतं. अनेक लोकांच्या दृष्टीने, राजकारण म्हणजे शासन वा सरकार. गांधींच्या मते, राजकारण म्हणजे माणूस. नमुनेदार राजकीय नेता आणि हुकूमशहासुद्धा स्वतःला ‘लोकांचा मित्र’ म्हणवून घेतात. परंतु, गांधींना केवळ गर्दीच्या रूपातील लोकांमध्ये रस नाही, तर व्यक्तिरूपातील लोकांविषयी त्यांना आस्था वाटते. त्यांचा विचार विशिष्ट स्थितीपासून सुरू होतो आणि सार्वत्रिकतेपर्यंत जातो.

बंगालमध्ये 1946 मध्ये हिंदू व मुस्लिम यांच्यात क्रूर व रक्तरंजित दंगल झाली, त्यात हजारोंचा जीव गेला. दंगलीचा सर्वाधिक फटका बसलेल्या पूर्व बंगालातील एका मुस्लिम भागात महात्मा गांधी लगोलग गेले. जेमतेम एक वा दोन सहकारी घेऊन हा अशक्त वृद्ध माणूस गावोगाव चालत गेला. एखादी रात्र आपल्याला इथे राहू द्यावं, अशी विनवणी त्यांनी गरीब मुस्लिम शेतकऱ्यांपाशी केली. सुट्या व्यक्तींशी व गटांशीही त्यांनी चर्चा केली, आंतर-सामुदायिक मैत्री टिकवून ठेवण्यासाठी युक्तिवाद केले. त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आलेल्या सर्वांसमोर त्यांनी प्रार्थना केली. दुसऱ्यांना मारलेल्या व स्वतःचे नातलग गमावलेल्या सर्वसामान्य लोकांसोबत ते काही महिने राहिले. त्यांच्या झोपड्यांमध्ये ते राहिले, त्या लोकांकडे असलेलं अन्न त्यांनी खाल्लं आणि त्यांच्याप्रमाणे प्रवासही केला.

त्या लोकांना समजून घेण्यासाठी व त्यांच्यात सुधारणा घडवण्यासाठी गांधींनी स्वतःला त्यांच्यामध्ये मिसळून टाकलं. दुसरा कोणी सर्वसामान्य राजकीय नेता असता, तर सहिष्णुतेवर भाषण ठोकून घरी गेला असता. गांधींच्या पत्नीचं निधन झाल्यावर भारतीयांनी त्यांच्या सन्मानार्थ एक निधी स्थापन केला. निसर्गोपचाराचा प्रसार करण्यासाठी हा निधी वापरला जाणार होता. डॉ.दिनशा मेहता यांना आनंद झाला. कित्येक वर्षं त्यांनी अपुऱ्या, कालबाह्य उपकरणांसह, अत्यल्प पैशांसह आणि प्रशिक्षित सहकाऱ्यांचा तुटवडा असतानाही काम सुरू ठेवलं होतं. पण गांधींनी असा निधी उभारण्याला नकार दिला. मोजक्या संपन्न लोकांना स्वतःची प्रकृती सुधारण्यासाठी जाता येईल अशी एखादी आदर्श संस्था उभारण्यात त्यांना फारसा रस नव्हता. शेतकऱ्यांपर्यंत निसर्गोपचार न्यावा आणि त्यांच्या आर्थिक स्तरावर तो सहजी वापरता यावा, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी घरगुती व स्वस्त पद्धतींनी प्रयोग सुरू केले आहेत. मातीचा लेप, सूर्योपचार, पोषणाहार, पाण्याद्वारे उपचार, मालिश, व्यायाम, अशा पद्धतींचा वापर ते करून पाहतात.

गांधी हे जगण्यातील समस्यांना मुळापासून उचकटून टाकण्याचा प्रयत्न करणारे जहाल क्रांतिकारीच आहेत. शब्दांमधून व स्वतःच्या कृतीचा दाखला घालून देऊन करोडो लोकांचं जीवन उन्नत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ते करतात. अस्पृश्यांना सहन करावं लागणारं क्रौर्य नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून ते रोजच्या जगण्यात स्वतःला अस्पृश्य मानतात. हिंदू व मुस्लिम यांच्यातील ज्वालामुखी भडकतो, तेव्हा ते स्वतःचा तंबू तप्त शिलारसाच्या काठावर नेऊन उभा करतात. सदासर्वकाळ ते शेतकऱ्यांच्या निकट राहतात, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे. जमिनीतील कोळसा बाहेर काढण्यासाठी वायूने भरलेल्या खाणीत जाणाऱ्या कामगाराला खरं तर राहण्याकरिता महाल मिळायला हवा, पण तो झोपडीत राहतो. त्याची मजुरी वाढली, तर महालातल्या लोकांचा संताप होतो. अशा कारणावरून संतापणाऱ्यांनी खाणकामगाराचं जीवन महिनाभर जगण्याचा प्रयत्न करून बघावा. गतकालीन शत्रूला उपाशी ठेवू पाहणाऱ्या द्वेषपूर्ण लोकांनी दिवसाला बाराशे कॅलरींवर जगण्याचा प्रयत्न करून बघावा.

सत्ताधारी माणसं व सत्ताहीन माणसं यांच्यातील दरी हे जगातील समस्यांचं एक मध्यवर्ती कारण आहे. सत्ताधारी माणसांनी सर्वसामान्य नागरिकांच्या दर तासाच्या जगण्यामध्ये प्रवेश करून पाहायला हवं. सर्वसामान्य नागरिकांनी सत्ताधारी माणसाची सत्ता आपापसात वाटून घ्यायला हवी- पर्यायाने, सत्ताधाऱ्यांच्या सत्तेत घट व्हावी. सरकारं, राजकीय पक्ष, कंपन्या, कामगार संघटना- किंबहुना, सर्व मानवी संस्थांना हे लागू होतं. अवाजवी सत्ता सर्वांसाठीच हानिकारक ठरते- त्या सत्तेचे अत्याचार सहन करणाऱ्यांसोबतच अशा सत्तेचा वापर करणाऱ्यांवरही त्याचे विपरीत परिणाम होतात.

बळावर मक्तेदारी असल्यामुळे हुकूमशहाकडे सत्ता येते, पण गांधींकडे बळाविनाच सत्ता आहे. ते कोणाला बक्षीस देऊ शकत नाहीत वा शिक्षा देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे कोणतंही पद नाही. पंचा नेसलेला व झोपडीत राहणारा हा एक इसम आहे. माणसाविषयी वाटणाऱ्या आस्थेतून गांधींचा प्रभाव निपजलेला आहे. बळ व पैसा नसलेले गांधी व्यक्तिवादी आहेत. पण कायद्याच्या चौकटीत मिळेल ते सर्व काही घ्यायचा अधिकार त्यांच्या व्यक्तिवादात अभिप्रेत नाही. त्यांचा व्यक्तिवाद मालमत्तेवर आधारलेला नाही, तर व्यक्तिमत्त्वावर आधारलेला आहे. आपला मुद्दा न्याय्य आहे असं वाटत असेल, तर ते जगाविरोधात एकट्याने उभं ठाकायलाही तयार असतात- अशा अर्थी ते व्यक्तिवादी आहेत. बाह्य परिस्थितीपासून अधिकाधिक स्वातंत्र्य आणि अंतर्गत गुणांचा अधिकाधिक विकास, हा गांधींच्या व्यक्तिवादाचा अर्थ आहे. गांधी हा आतून-बाहेरून मुक्त झालेला माणूस आहे.

(‘गांधी अँड स्टालिन’ या 1947 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकातील ‘पॉलिटिक्स ॲन्ड पीनट्‌स’ या प्रकरणाचा हा अनुवाद आहे.)

मराठी अनुवाद : अवधूत डोंगरे

dongareavadhoot@gmail.com

Share on Social Media