Welcome to Weekly Sadhana

संपादकीय

गणेशविसर्जन, पर्यावरण व धर्मकारण

गणेशाची मूर्ती पार्थिवाची - म्हणजे पृथ्वीपासून - नैसर्गिक घटकापासून बनलेली असावी, असा धर्मशास्त्रीय नियम आहे. पण धर्मरक्षकांना तो आठवत नाही. त्यांचा एक हेका असतो की, नद्यांचे प्रदूषण इतक्या प्रकारे वर्षभर होते, त्याबद्दल तुम्ही का बोलत नाही? ते प्रदूषण चूकच; पण त्याबद्दल कायदा आहे. धार्मिक कर्मकांडांतून होणाऱ्या प्रदूषणाबाबत तो नाही. शिवाय हे प्रदूषण अवघ्या दोन-चार दिवसांतच पण महाप्रचंड प्रमाणात होते. गणेश ही मंगल घडवणारी बुद्धीची देवता. तिला स्वत:लाही बुद्धीला डावलून अमंगलकारी प्रदूषण घडवणारी ही प्रथा मान्य होणार नाही, असे मानण्यास काय हरकत आहे?

‘सनातन’वृत्तीने धर्मरक्षकाची भूमिका घेणाऱ्यांचे प्रतिपादन कसे असते पाहा- ‘गणेश चतुर्थीला ब्रह्मांडातून श्री गणेशलहरी सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात... गणेशाचे विसर्जनच हवे- तेही वाहत्या पाण्यातच विसर्जन हवे, कारण पूजा-अर्चा शास्त्रोक्तरीत्या न झाल्यास (त्यासाठी अर्थात पुरोहितच हवा) क्रोधित झालेला गणपती त्या घरात क्लेश उत्पन्न करतो. सध्याच्या कलियुगात असे होण्याची शक्यता खूपच जास्त आहे... पूजेमुळे मूर्तीत पवित्रके अधिक प्रमाणात येतात. वाहत्या पाण्यात विसर्जित केल्याने ती पाण्याबरोबर सर्वदूर पसरतात. पाण्याच्या बाष्पीभवनाने ती वातावरणात मिसळून सात्त्विकता दूरवर पोचते. म्हणून गणेशविसर्जन नदीच्या वा समुद्राच्या पाण्यातच करावे.’ या आशयाची लक्षावधी पत्रके दर वर्षी गणेशविसर्जनस्थळी वाटली जातात.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध ही उघड चिथावणी आहे. हा धार्मिक राजकारणाचाच भाग झाला. एका बाजूला सर्व प्रकारच्या धार्मिक सण-उत्सवांना प्रचंड उधाण आणले जात आहे. आता जानेवारीत गणेश जयंती उत्सवही धूमधडाक्यात साजरा होऊ लागला आहे. दहा वर्षांपूर्वी अस्तित्वात नसलेले वैभव महालक्ष्मीचे व्रत महानगरांपासून ते खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचले आहे. प्रतिवाद असा केला जातो की, ‘आज वाहते पाणी नको म्हणतात, उद्या घरीच विसर्जन करा म्हणतील- मग गणपतीच नको म्हणतील. वटसावित्रीला वडाची फांदी तोडली की पर्यावरण दुखवते, नागपंचमीला जिवंत नाग पूजला तर तो घेऊन येणाऱ्या गारुड्याला अटक होते. हा सगळा हिंदू धर्मावरचा हल्ला आहे. तेव्हा सावधान...’ हा कांगावा झाला.

भारतीय संविधानाने कलम 25 प्रमाणे व्यक्तीला उपासनेचे व धर्मपालनाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे, त्याला विरोध नाही; कोणी केलाच, तर न्यायालयात तो टिकत नाही. पण हे धार्मिक स्वातंत्र्य निरपवाद नाही. समाजहितासाठी, सार्वजनिक आरोग्यासाठी ते नियंत्रित करण्याचा अधिकारही याच कलमाने शासनाला दिला आहे. यामुळेच वडाच्या झाडाची पूजा ज्यांना करावयाची त्यांनी ती जरूर करावी, पण त्यासाठी झाडाच्या फांद्या तोडू नयेत. नागाची पूजा करावी, पण त्याच्या चित्राची वा मातीच्या प्रतिमेची. त्यासाठी त्याला पकडून आणण्याचा अधिकार कोणाला नाही. गणेशपूजन आनंदाने - भाविकतेने करावे, पण पाणीप्रदूषण करून सार्वजनिक आरोग्याला होणारी बाधा टाळावी. कृतिशील कालोचित धर्मचिकित्सा समाजाला पुढे नेणारी असते, हितकारक असते. महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारकांचा वारसा हेच सांगतो. धर्माच्या आधारे राजकारण करू इच्छिणाऱ्या स्वयंघोषित धर्मरक्षकांना ती नकोशी वाटणारच. पर्यावरणपूरक गणेशविसर्जनासाठीच्या न्यायालयाच्या निर्णयाने हे पुन्हा एकदा समोर आले आहे. पर्यावरणपूरक गणेशविसर्जन हे विवेकाचे आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना बुद्धिदात्या गजाननानेच सुबुद्धी द्यावी, एवढेच आपण म्हणू शकतो.

नरेंद्र दाभोलकर (26 फेब्रुवारी 2011 च्या साधनातून)

Share on Social Media

जवाहरलाल नहेरू । 24

नेहरूंनी केलेली देशाची उभारणी

सुरेश द्वादशीवार

नेहरूंना विज्ञानात रुची होती. भाभा ऑटोमिक कमिशनचे ते अध्यक्ष होते. वैज्ञानिक व तंत्रज्ञांना भेटायला आणि त्यांच्याशी नव्या संशोधनाविषयी बोलायला त्यांना आवडायचे. ‘बोर्ड ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’चेही ते अध्यक्ष होते. या दोन्ही कामांत ते समरसून भाग घेत. ‘भारताला औद्योगिक प्रगतीखेरीज दुसरा पर्याय नाही. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा त्यासाठी त्याला येथेच उभ्या केल्या पाहिजेत,’ असे ते म्हणत आणि तशा त्यांनी त्या उभारल्याही. देशभरात प्रयोगशाळांची उभारणी त्यांच्या हातून झाली. दिल्लीची नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, पुण्याची नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि जमशेदपूरची नॅशनल मेटॅलर्जिकल लेबोरेटरी त्यांच्याच हातची. याखेरीज कृषिक्षेत्र, औद्योगिक, संशोधन, रसायने, औषधी द्रव्ये (मलेरिया व कॅन्सरसारख्या आजारांवरील औषधांचे संशोधन), काच व चिनी मातीचे उद्योग एवढा त्यांच्या उभारणीचा आवाका होता. अणुशक्तीची आराधना व संशोधनही त्यांनीच देशात सुरू केले.

सारे आयुष्य समाज आणि देशासोबत राहूनही नेहरू मनाने एकटे व एकाकीच राहिले. हे एकटेपण त्यांना त्यांच्या आयुष्याएवढेच मनाने, ज्ञानाने, स्वतंत्र विचार करण्याच्या पद्धतीने, तो विचार परखडपणे सांगण्याच्या स्वभावाने आणि त्यांना लाभलेल्या उंचीने दिले. गांधीजींचा खून झाला, तेव्हा त्यांच्या एका इंग्रज मित्राने लिहिले, ‘नेहरू आज केवढे एकटे झाले असतील?’ त्याचा जिव्हाळा खरा असला, तरी त्याचा प्रश्न चुकीचा होता.

नेहरू आजन्म एकटे व एकाकी होते. त्यांना सहकारी होते, नातेवाईक होते, नेते आणि अनुयायी होते. चाहते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक होते. पण तेवढ्या साऱ्यांत राहूनही त्यांचे एकटे असणे कायम होते. माणसे सामान्यपणे एकटीच असतात. (ती तसे सांगत नसली तरी) पण नेहरूंचे एकटेपण परिस्थितीने लादलेले आणि त्यांनी नकळत स्वीकारलेले होते. अशा माणसांना मग त्यांचा विचार हाच अखेरचा व अंतिम असेही वाटू लागते. नेहरूंना सल्ला चालत असे मात्र कोणत्याही प्रश्नाबाबतचा निर्णय हा त्यांचा स्वतःचा असे.

‘हा अर्धे वाक्य भाऊ म्हणून बोलतो, पण त्या वाक्याचा पुढचा भाग भावाचा नसतो; तो देशाच्या पंतप्रधानाचा असतो.’ हे त्यांच्याविषयी त्यांच्या बहिणीनेच लिहिलेले वाक्य आहे. एकाच क्षणी अनेक भूमिका समरसून पार पाडण्याच्या प्रयत्नात असा दुभंग येतो. ऐकणाऱ्याला तो कळतो, बोलणाऱ्याला मात्र तसे वाटत नाही. सदैव स्वतःच्या विचारात, चिंतनात वा विवंचनेत गुंतलेली अनेक माणसे असतात. नेहरू त्यातले होते. पण त्या साऱ्यांहून वेगळे आणि उंच होते. त्यांच्या विवंचना व्यक्तिगत नव्हत्या, त्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयही होत्या. त्यांना राजकीय, सामाजिक, आर्थिक व गरिबांसंबंधीच्या आस्थांचे वलय होते. त्यांचे एकाकीपण दर वेळी काही तरी नवे जन्माला घालत होते आणि ते नेहमीच समाजोपयोगी ठरणारे होते.

आपल्या आत्मचरित्रात गांधीजींविषयी लिहिताना ते म्हणतात, ‘त्यांची मते पक्की आणि ठरलेली असतात. इतरांचे म्हणणे ते कमालीच्या शांतपणे ऐकतात. ते सांगणाऱ्यालाही तसेच वाटत असते. प्रत्यक्षात मात्र तो एका बंद दरवाज्याशी बोलत असतो. इतर सांगतात व गांधी ऐकतात. मात्र खरे गांधी त्यांना करायचे तेच करतात.’ (ही टीका नेहरूंनाही लागू व्हावी अशीच काहीशी आहे.) ॲरिस्टॉटलचे असमाधान कुणाच्याही समाधानाहून श्रेष्ठ असते, कारण ते तत्त्वज्ञान जन्माला घालते, असे म्हटले जाते. नेहरू त्यातले होते. वडिलांशी- मोतीलालजींशी त्यांचे फारसे जुळत नसे.

गांधीजींशी त्यांचे टोकाचे मतभेद होते. 1917 मध्ये गांधीजींशी झालेल्या पहिल्याच भेटीत गांधींनी त्यांना आपले ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक वाचायला दिले. ते थोड्याच अवधीत वाचून झाल्यावर गांधीजींनी त्यांना विचारले, ‘‘यातल्या आर्थिक विचारांबद्दल (ग्रामोद्योग, हस्तव्यवसाय, गृहोद्योग इ.) तुम्हाला काय वाटते?’’ नेहरूंचे उत्तर ‘‘हे विचार मला जराही पटणारे नाहीत’’ हे होते. पुढे 1941 मध्ये त्यांना आपला वारसदार नेमण्याआधी गांधीजींनी त्यांना नेमका तोच प्रश्न पुन्हा विचारला. ‘‘एवढ्या वर्षांत माझ्या आर्थिक विचारांबद्दलचे तुमचे मत काही बदलले की नाही?’’ नेहरू म्हणाले, ‘‘जराही नाही. उलट मला माझे आक्षेप आता अधिक महत्त्वाचे व खरे वाटू लागले आहेत.’’

नेहरू औद्योगिकीकरण, समाजवाद आदींचे पुरस्कर्ते होते. गांधीजींना लघुउद्योग व ग्रामोद्योगात अधिक रस होता. त्यानंतरही गांधींनी त्यांना आपला वारसदार म्हणून घोषित केले, हे गांधींचे मोठेपण आणि नेहरूंच्या द्रष्टेपणाची त्यांना होत गेलेली जाणीव सांगणारी बाब आहे.

सुभाषबाबू त्यांचे स्नेही होते. 1919 पासून 1939 पर्यंतची वीस वर्षे त्यांचा स्नेह टिकला. पण फॅसिझमसोबत जाण्याच्या सुभाषबाबूंच्या भूमिकेपासून ते वेगळे झाले. पटेल, राजेंद्रबाबू व मौलाना हे त्यांचे सहकारी होते. पण त्यांच्यात मैत्र असे फारसे कधी आढळले नाही.

नेहरू त्यांच्या कुटुंबातही एकटेच होते. बारावे वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पाठीवर कुणी भाऊ वा बहीण जन्माला आली नव्हती. विजयालक्ष्मींचा जन्म त्यांच्यानंतर बारा वर्षांनी झालेला. घरातल्या दाया, नोकर आणि वडिलांनी आणलेले पाश्चात्त्य शिक्षक यांच्यासोबत ते वाढले. मुबारक अली या नावाचा मेजर डोमो हा त्यांचा त्या काळातला जिव्हाळ्याचा मित्र बनला. तो त्यांना इतिहासातल्या कथा सांगायचा. नंतरची बारा वर्षे ते इंग्लंडमध्ये घर व देश यापासून दूर व तुटलेलेच होते.

इंग्लंडमध्ये शिकत असतानाही ते वर्गातील इतर सहाध्यायांपासून वेगळेच राहिले. ‘इथले सारे विद्यार्थी टेनिस आणि क्रिकेट याखेरीज काही बोलत नाहीत. त्यांना त्याहून वेगळे काही समजतही नाही.’ ही गोष्ट त्यांनी मोतीलालजींना पत्रातूनच कळवली. नेहरूंना राजकारण, तत्त्वज्ञान, लोकजीवन व समाजकारण यात रस होता. मुलींचा प्रश्न मनात यायचा. पण तो फार काळ राहायचा नाही. ‘कदाचित मला त्यात फारसा रस नसावाही.’ ही त्यांचीच नोंद.

तेथील संस्थेत विद्यार्थ्यांच्या झालेल्या एका वादविवादात नेहरूंनी इंग्लंडचे सारे राजकारण त्यातील तपशिलांसह व नेत्यांच्या नावानिशी सांगितले, तेव्हा विद्यार्थ्यांएवढेच तेथील प्राध्यापकही अवाक्‌ झाले होते. इंग्लंडहून परतताच ते सार्वजनिक जीवनात आले. खासगी आयुष्य त्यांना हवेसे होते, पण ते त्यांच्या वाट्याला कधी आले नाही. त्यांचा विवाह आई- वडिलांनी ठरविला. 1917 मध्ये ते कमला कौल हिच्याशी विवाहबद्ध झाले. 19 महिन्यांनी त्यांच्या कन्येचा- इंदिराचा जन्म झाला. त्याच वेळी कमला नेहरूंना क्षयाची बाधा असल्याचेही उघडकीला आले. परिणामी, त्यांच्या वाट्याला आलेला संसारधर्म अवघी दोन-अडीच वर्षेच टिकला. नंतरचा काळ कमला इस्पितळात किंवा घरी अंथरुणावर आणि नेहरू तुरुंगात किंवा आंदोलनात गुंतलेले..

‘‘पंतप्रधानपदाची जबाबदारी अंगावर घेतलेल्या माणसाला संवेदनशील राहता येत नाही.’’ हे नेहरूंनी एका अमेरिकन वार्ताहराला ऐकविलेले त्यांचे मत. हे खरे असले तरी माणूस हा संवेदनशील प्राणी आहे आणि संवेदना मागे सारायच्या व नुसतेच कोरडे राहायचे असे एखाद्याने ठरविले, तरी ते किती काळ? मोतीलालजी गेले. आई गेली. कमला गेली. अखेर गांधी गेले. त्यांच्या संवेदनांचा बांध फक्त गांधींच्या निधनाच्या वेळीच तुटलेला दिसला. सरदार समोर येताच ते त्यांच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडत असल्याचे जगाला दिसले. एरवी त्यांचा हसतमुख व प्रसन्न चेहराच देशाने सदैव पाहिला. त्यांना राग यायचा. ते संतापायचे. धाडसी असल्याने दंगलखोरांच्या गर्दीत घुसून त्यांच्या हातची हत्यारे हिसकावून घ्यायचे. मनाने खंबीर, पण दीर्घ खोलवर शांत.

काहींनी त्यांच्यावर ते आंग्लाळलेल्या भारतीयांवर जास्तीचा विश्वास ठेवत असल्याची टीका केली होती. त्यांच्या भोवतीच्या लोकांत तशी माणसे होतीही. पण ही टीका फारशी खरी नाही. त्यांच्या जवळच्या माणसांत आरंभी रणजित पंडित होते. पुढे गोपालस्वामी अय्यंगार, मौलाना आझाद, गोविंद वल्लभ पंत, रफी अहमद किडवई यांचाही समावेश होता. राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन्‌ यांचा सल्लाही ते प्रसंगी घेत. मात्र त्यांना देशी व साधी माणसेही जवळची वाटत. समाजमन हे ज्ञात्यांहूनही सत्याच्या अधिक जवळ असते, अशी त्यांची धारणा होती. मात्र माणसे आंग्लाळलेली असोत वा देशी- कोणत्याही प्रश्नाबाबतचा त्यांचा निर्णय ‘त्यांचा’च स्वतःचा असे. माणसांची त्यांना असलेली पारख अनेकदा चुकायची, असे म्हटले जाते. मेननबाबत ते खरेही ठरले. मेनन यांच्याशी त्यांची मैत्री स्वातंत्र्यपूर्व काळातली होती. स्पेनमध्ये फॅसिस्टांचा हैदोस सुरू असताना नेहरूंनी मेननसोबत त्या देशाला भेटही दिली होती. शिवाय मेनन हे अतिशय चांगले वक्ते व रचनाकारही होते. नेहरूंच्या विचारांना तात्त्विक बैठक देऊन ते परिणामकारकरीत्या मांडण्याची शैली त्यांना आत्मसात होती. शिवाय त्यांना जगातही मान होता. मात्र त्यांचा चीनविषयीचा दृष्टिकोन व लष्कराबाबतची बेपर्वाई नेहरूंना अडचणीत आणणारी ठरली. सरदार पटेलांना अधिक आयुष्य लाभले असते, तर ते नेहरूंना काही बजावू शकले असते आणि माणसांची खरी जाणही त्यांना देऊ शकले असते. मात्र सरदारांच्या पश्चात नेहरूंना अधिकारवाणीने सांगणारे दुसरे कोणी उरले नाही.

स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वात देशाचे राष्ट्रीय नेतृत्व करू शकणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये असले तरी त्यातील गांधीजी, नेहरू वा पटेल या तिघांनाच अखिल भारतीय पातळीवरची मान्यता होती. राजेंद्रबाबूंना बिहारचे, राजाजींना दक्षिणेचे, तर मौलानांना राष्ट्रीय मुस्लिमांचे पाठबळ होते. सुभाषबाबूंचा मृत्यू झाला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सहाच महिन्यांनी (30 जानेवारी 1948) गांधीजींचा खून झाला, तर दोनच वर्षांनी (15 डिसेंबर 1950) सरदारही हे जग सोडून गेले. त्यानंतर नेहरूंच्या बरोबरीचा वा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा दुसरा कोणताही नेता काँग्रेसमध्ये राहिला नाही. नंतरचे त्यांच्यावरचे नियंत्रण फक्त भारतीय जनतेचे राहिले. तोपर्यंत त्यांच्यातील पक्षनेत्याचे रूपांतर लोकनेत्यातही झाले होते.

साऱ्या राष्ट्रीय प्रश्नांची व त्यांच्या बऱ्या-वाईट उत्तरांची जबाबदारी 1948 पर्यंत गांधीजींवर येणारी होती. त्यासाठी कोणी पटेल व नेहरूंना दोष देत नव्हते. ही सारी जबाबदारी 1950 नंतर तिच्या बऱ्या-वाईट परिणामांसकट एकट्या नेहरूंवर आली. कौतुकाएवढेच ते मग जीवघेण्या टीकेचेही हक्कदार बनले. त्यांच्या टीकाकारांनीही इतरांच्या चुका मग त्यांच्या नावावर चढविल्या. इतरांचे चांगले निर्णयही मग त्यांच्या नावावर चढले. म्युरिएल लेस्टर ही गांधीजींची इंग्लंडमधली यजमान होती. त्यांच्या मृत्यूनंतर तिने नेहरूंना एकदा विचारले, ‘‘गांधीजींच्या पश्चात त्यांच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर येईल?’’ नेहरू म्हणाले, ‘‘कोणाही एकावर नाही... आम्हा साऱ्यांवर. या देशावरही.’’

एक गोष्ट मात्र तेव्हा आणि आताही खरी असलेली. त्यांच्या टीकाकारांपैकी हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा आणि त्यांच्या सेक्युलर भूमिकेचा सर्वाधिक राग केला. ‘गांधींऐवजी आम्ही नेहरूंनाच मारायला हवे होते,’ हे त्यांच्यातील एकाचे अलीकडचे उद्‌गार याची साक्ष देणारे. समाजवाद्यांनी नेहरूंचा रागाएवढाच द्वेषही केला. स्वतःला समाजवादी म्हणविणारे नेहरू समाजवादी नाहीतच. समाजवादाचा मुखवटा घेतलेला तो ढोंगी व सत्तेसोबत राहू इच्छिणारा इसम आहे, हे त्यांचे नेहरूंविषयीचे म्हणणे. ‘‘तुम्ही भांडवलदारांच्या मदतीने समाजवाद आणू इच्छिता आणि ती बाबच अशक्य कोटीतील आहे’’ हे खुद्द जयप्रकाशांनीच त्यांना तोंडावर ऐकविले. समाजवाद्यांनी नेहरूंचा रागच केला नाही तर त्यांचा द्वेष, तिरस्कार असे सारे केले. ‘या पहाडाला मी भेग पाडूनच दाखवेन.’ ही त्यांच्याबाबत केलेली लोहियांची प्रतिज्ञा. काँग्रेस वर्किंग कमिटीत फाळणीच्या बाजूने मत देणाऱ्या या लोहियांनी पुढे मात्र ‘फाळणीचे गुन्हेगार’ म्हणून नेहरू व पटेलांना दोष देणारे पुस्तक लिहिण्याचा विक्रमही केला.

काहींना नेहरूंविषयी अकारणच(?) एक राग होता. काही वर्षांपूर्वी देशातील एका इंग्रजी नियतकालिकाने विसाव्या शतकात भारतात झालेल्या शंभर श्रेष्ठ व्यक्तींची निवड करण्याची विनंती देशातील अनेक जाणकारांना केली. त्यातल्या एका पत्रकार महिलेने त्या यादीत नेहरूंचे नाव घालायला जो विरोध केला, त्याची नोंद या नियतकालिकानेच करून ठेवली आहे. त्यासाठी तिने पुढे केलेली कारणे जेवढी चमत्कारिक तेवढीच अनाकलनीयही आहेत. ‘पक्ष्यांच्या थव्यातील एकटा गरूड’ असे एका समाजवाद्याने त्यांचे केलेले वर्णन यथार्थ आहे. फार काळपर्यंत ते त्यांच्या प्रतिमेला चिकटूनही राहिले आहे. नेहरू स्वतःचे मन सहसा कुणाजवळ मोकळे करीत नसत. हव्या त्या प्रश्नावर हव्या त्या व्यक्तीचा वा व्यक्तिसमूहाचा ते सल्ला घेत. नंतर त्यावर चिंतन करून ते आपल्या निर्णयावर येत. कोणताही सल्लागार, सहकारी वा मंत्री त्यांना गृहीत धरू शकत नसे. भारतीय माणसांना सारे तयार, आयते व समोर हवे असते- ही त्यांची सवय ठाऊक असलेले नेहरू प्रत्येक गोष्ट तिच्या अखेरच्या तपशिलापर्यंत स्वतःच पूर्ण करीत. जी कामे सहकाऱ्यांवर सोपविता येतील, तीही बहुधा तेच करीत. मग तेच डॉक्टर, तेच शल्यविशारद, तेच नर्स आणि तेच त्यांचे शुश्रूषाकर्ते असे सारे होते.

परिणामी, अनेकदा लहानसहान कामातही त्यांचा फार वेळ जायचा. कोणत्याही ‘परफेक्शनिस्ट’ पूर्णप्रज्ञ माणसाला असावी तशी ही सवय आहे. नेहरू कमालीचे विनम्रही होते. आलेल्या माणसाचे म्हणणे ऐकून घेणारे व त्यांना आपले मत समजावून सांगणारे. हैदराबादच्या डॉ.न.गो. राजुरकरांनी त्यांच्यावर प्रबंध लिहिला. त्यासाठी त्यांनी त्यांच्या तीन मुलाखती तीनमूर्ती भवनात घेतल्या. प्रत्येक मुलाखतीनंतर राजुरकरांना दारापर्यंतच नव्हे, तर त्यांच्या वाहनापर्यंत पोहोचवायला स्वतः नेहरू येत. सामान्य माणसे, शेतकरी, कामगार, जुने सत्याग्रही व दूरदुरून येणारे शेकडो लोक यांना ते कधी कंटाळत नसत. सारख्याच जिव्हाळ्याने त्यांना भेटून ते त्यांची विचारपूस करीत.

सारे नेहरू कुटुंबच सौंदर्यशाली होते. त्यातून नेहरूंचे देखणेपण साऱ्यांना खिळवून ठेवणारे होते. नेहरूंच्या नेतृत्वाच्या अनेक गुणांपैकी त्यांचे देखणेपण हा एक गुण होता, असे त्यांच्या टीकारांनीही लिहून ठेवले आहे. ‘जगातील पहिल्या पाच देखण्या पुरुषांत मी नेहरूंची निवड करीन.’ हे मेरिलिन मन्रोचे त्यांच्याविषयीचे सुभाषित. काँग्रेसच्या एका अधिवेशनात नेहरूंभोवती तरुण मुलींनी मोठा घोळका केला व तेही त्यांच्याशी बोलण्यात गढून गेले. ते दृश्य दुरून पाहणाऱ्या सरोजिनी नायडू त्यांना ओरडून म्हणाल्या, ‘‘जवाहर, अरे ती डोक्यावरची टोपी जरा काढ. या मुलींना तू त्यांच्याचएवढा वाटतो!’’ एके काळी देविका राणी या सुस्वरूप नटीशीही त्यांचे नाव जुळले होते. पण त्यांच्या आईने त्यांना त्याविषयी खडसावून विचारले, तेव्हा ते खरे नसल्याची कबुली त्यांनी स्वरूपादेवींना दिली. चीनचे सर्वेसर्वा चँग कै शेक यांच्या सुस्वरूप पत्नी मादाम शेक यांच्याशीही अनेकांनी नेहरूंचे नाव जुळविले. लॉर्ड माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना व पुढे सरोजिनी नायडूंची कन्या पद्मजा यांच्याशीही त्यांचे नाव जुळविले गेले. त्यातले तथ्य त्या संबंधितांनाच ठाऊक. स्त्रियांनी प्रेम करावे, हा तसा अभिमानाचा व कौतुकाचा विषय. आपला समाजही दुटप्पी विचाराचा आहे. आपल्याला एक पत्नीव्रती रामही प्रिय आणि सोळा हजारांवर बायका असताना एक राधा जपणारा कृष्णही प्रिय. मात्र लेडी माऊंटबॅटनबाबतच्या त्यांच्या संबंधांना फार व नको तशी प्रसिद्धी दिली गेली.

नुकत्याच दिवंगत झालेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने नेहरू व एडविना या विषयावर त्याची लेखणी नको तेवढी झिजविली. एअर इंडियाचे एक विमान नेहरूंचे पत्र घेऊन ते तिला पोहोचवायचे आणि परतणारे विमान तिचे उत्तर नेहरूंना आणून द्यायचे, हे लिहिण्यापर्यंत त्या इसमाची मजल गेली. ‘एअर इंडिया ही कंपनी तेवढ्याचसाठी स्थापन झाली’ एवढेच लिहायचे त्याने बाकी ठेवले. पुढे एकदा या पत्रकारासोबत एका व्यासपीठावर भाषण करण्याचा प्रसंग आला. नंतरच्या जेवणाच्या वेळी प्रस्तुत लेखकाने त्यांना ‘तुमचा नेहरूद्वेष एवढा टोकाचा कसा?’ असा प्रश्न विचारला. मात्र त्याचे उत्तर येण्याआधीच तेथे असलेल्या त्यांच्या पत्नी भडकून म्हणाल्या, ‘‘भाईसाहाब, इस आदमी को नेहरू कभी समझेही नहीं। उन्हे गालियाँ देने बगैर इन्होने कुछ कियाही नहीं।’’ त्यावर सारा प्रश्नच मिटला.

नेहरूंविषयीचे असे समज अनेकांच्या मनात आहेत व काहींच्या मनात ते जाणीवपूर्वक पेरले गेलेही आहेत. सरदार पटेल आणि नेहरूंचे मतभेद आर्थिक मुद्यावर, नेहरूंच्या समाजवादाविषयीच्या आग्रहावर आणि मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम करण्याच्या त्यांच्या हक्कासंबंधीचे होते. शिवाय नेहरूंचा उतावीळपणाही त्या गंभीर प्रकृतीच्या नेत्याला फारसा आवडणारा नव्हता. मात्र त्यांच्यातल्या मतभेदांनी मनभेदांचे स्वरूप कधी घेतले नाही. दोघांचाही परस्परांच्या देशनिष्ठेवर व गांधीजींवरील श्रद्धेवर विश्वास होता. सरदारांची कन्या मणिबेन यांनी दुर्गादास या पत्रकाराने संपादित केलेल्या सरदारांच्या पत्रसंग्रहाला एक प्रस्तावना लिहिली आहे. तीत त्या म्हणतात, ‘खूपदा सरदार नेहरूंच्या तीनमूर्ती भवनावर रात्री उशिरापर्यंत त्यांच्याशी चर्चा करीत. मग नेहरू म्हणत, ‘‘चला आता उशीर झाला. मी तुम्हाला तुमच्या बंगल्यापर्यंत नेऊन सोडतो.’’ मग ते बोलतच आमच्या बंगल्यावर येत. तिथल्या व्हरांड्यात बसूनही त्यांची चर्चा चालूच राही. त्यांना काय हवे-नको ते मी बघे. मग आणखी उशीर झाला की सरदार नेहरूंना म्हणत, ‘‘रात्र फार झाली. आता मीच तुम्हाला सोडायला येतो.’’ मग ते दोघेही तीनमूर्ती भवनापर्यंत पायी जात आणि सरदार बहुधा मग रात्रीचे तिथेच थांबत. मोठ्यांचे मतभेद समजायलाही मोठे मन लागते. आपल्या मनाच्या मोजपट्‌ट्या घेऊन गांधी, नेहरू किंवा पटेलांची मने मोजण्याचा आचरटपणा कोणी करू नये, एवढेच येथे नोंदवायचे.

आणीबाणीत तुरुंगात असताना या नेत्यांची मने सांगणारा एक हृद्य प्रसंग अनंतराव भालेरावांनी सांगितला. हैदराबाद संस्थानाचा पाडाव झाल्यानंतर नेहरू, पटेल व मौलाना हे तीनही नेते औरंगाबादला आले. तोपर्यंत भारतीय सैन्याने केलेल्या अन्यायाच्या कहाण्या सर्वत्र चर्चिल्या जात होत्या. त्यांची शहानिशा करायला ते आले होते.

औरंगाबादहून बिदरला ते पोहोचले, तेव्हा तेथील मुस्लिम महिलांचा एक मोठा मोर्चा रडत-भेकत त्यांना भेटायला सर्किट हाऊसवर आला. मौलाना सरळ त्यांच्यात जाऊन त्यांच्यावरील अन्यायाच्या कथा ऐकू लागले. त्यातल्या कोणाचा नवरा तर कोणाचा मुलगा पोलिसांकरवी मारला गेला होता. काही स्त्रियांनी त्यांच्यावरील बलात्काराच्या कहाण्याही सांगितल्या. तेव्हा नेहरूही बाहेर आले होते. मौलाना त्यांच्यावर संतापून म्हणाले, ‘‘कशाचे सरकार आणि कशाचे स्वातंत्र्य? आपल्याच मुला-मुलींवर अत्याचार करणारे सैनिक आपले असतील, तर ते सारे बडतर्फ केले पाहिजेत.’’

नेहरू त्यांच्या जवळ जाऊन आणि त्यांना शांत करून म्हणाले, ‘‘मौलानासाहेब, ही सुरुवात आहे. आपल्याला पुढेही असे अनेक प्रसंग पाहायचे आहेत. एवढ्यावरच आपले मत आपण बनवू नये.’’ मग त्यांनीही मौलानांप्रमाणेच त्या स्त्रियांचे सांत्वन करीत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.. या वेळपर्यंत आत असलेले सरदार एकच मिनिट बाहेर आले आणि युद्ध म्हटले की असे होणारच, असा भाव चेहऱ्यावर प्रगट करून पुन्हा आत गेले. पुढच्या मुक्कामावर हिंदू स्त्रियांचा असाच मोठा जत्था त्यांना भेटायला आला आणि त्यांच्यावर रझाकारांनी केलेले अत्याचार त्या सांगू लागल्या. त्यांच्यापैकी काहींवर बलात्कार झाले होते, तर काहींची मुले दगडावर आपटून मारली गेली होती. मौलाना येथेही गहिवरले. त्यातल्या अनेकींना जवळ घेऊन ते म्हणाले, ‘‘कशाचा देश आणि कशाचा धर्म? कुराण हे सांगत नाही आणि वेदांचेही असे म्हणणे नाही. माणूस हाच सैतान व राक्षस होत असतो.’’ याही वेळी बाहेर आलेल्या नेहरूंना ‘‘सैन्यातील गुन्हेगारांना शासन करा’’ असे ते ओरडून म्हणाले. नेहरूंनी येथेही त्यांना शांत करीत त्या स्त्रियांचे सांत्वन केले... सरदार याही वेळी पूर्वीसारखेच काही क्षण बाहेर येऊन आत गेले. त्यांनी दोन्ही ठिकाणी कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. अशा वेळी या तिघांचे स्वभाव परस्परभिन्न मानायचे, की परस्परपूरक?

पटेल व अन्य नेत्यांच्या तुलनेत काहींनी नेहरूंना भाबडे ठरविले आहे. मात्र हा आरोप खरा नाही. ते कमालीचे सतर्क, सावध आणि एकाच वेळी अनेक प्रश्नांचा विचार करतानाही त्यातल्या प्रत्येकाबाबत ते कमालीचे जागरूक असत. त्यांची एक आठवण पाकिस्तानच्या एका माजी परराष्ट्रमंत्र्याने आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष श्रीनगरला चर्चेसाठी यायचे होते. तिच्या पूर्वतयारीला हा मंत्री अगोदरच तिथे आला होता. नेहरू स्वतःच भारताचे परराष्ट्रमंत्री असल्याने तेही मग श्रीनगरमध्ये दाखल झाले होते. सायंकाळच्या वेळी ते दोघेही खुल्या मोटारीतून श्रीनगरच्या परिसरात फिरायला निघाले. त्या वेळी स्वाभाविकच त्या मंत्र्याने नेहरूंजवळ काश्मीरचा विषय काढला. त्यावर त्यांना थांबवत नेहरू म्हणाले, ‘‘तुम्हाला काश्मीरचा इतिहास ठाऊक आहे?’’ मग ते कश्यपऋषीपासून काश्मीरचा इतिहास त्याला सांगू लागले. त्यांचे वीस मिनिटांचे भाषण पूर्ण होण्याआधीच वैतागलेला तो मंत्री म्हणाला, ‘‘पण मि.नेहरू, मला काश्मीरविषयी तुमच्याशी बोलायचे आहे.’’

‘‘तेच तर मी सांगतो. ते धरण बघा. केवढे सुंदर आहे. असे पाणी वाहताना मला जगात अन्यत्र कुठे दिसत नाही.’’

‘‘बट मि. नेहरू...’’ तो मंत्री म्हणाला.

‘‘आता ते गुलाबांचे ताटवे बघा. एवढे तांबडे गुलाब तुम्हाला कुठे पाहता येतील?’’

त्यावर त्या मंत्र्याने नेहरूंचे दोन्ही हात हाती घेऊन म्हटले, ‘‘मी म्हणतो, तुम्ही आम्हाला काश्मीर द्यायला तयार नाहीत. कारण तुमचे वडील आणि पूर्वज काश्मिरातून आले आहेत.’’

त्यावर जराही विलंब न लावता नेहरू म्हणाले, ‘‘पण मी तुम्हाला लाहोर मागत नाही. माझी आई लाहोरहून आली आहे.’’

पुढे त्या परराष्ट्रमंत्र्याने आपल्या आत्मचरित्रात लिहिले, ‘‘नेहरू हा हाती न लागणारा व काहीसा चावट माणूस आहे.’’

वयाची सत्तरी गाठेपर्यंत नेहरूंची प्रकृती उत्तम व ठणठणीत होती. त्यांचे शरीरस्वास्थ्य व मानसिक प्राबल्य कायम होते. दिवसाच्या चोवीस तासांपैकी अठरा तास त्यांच्या कामांनी व्यापले असायचे. पहाटे जरा उशिरा उठून ते प्रथम शीर्षासन व प्राणायाम करायचे. नंतर ऑफिसात आलेली पत्रे, तारा व फायली बघायचे. त्याच काळात ते मुलाखती द्यायचे. पत्रकारांना वेळ द्यायचे. कधी भाषणे द्यायचे, तर कधी काही कार्यक्रमांसाठीही वेळ काढायचे. संसदेच्या अधिवेशनाला ते सारा वेळ हजर असायचे. अधिकारी व विदेशी प्रतिनिधींच्या भेटी घ्यायचे. मंत्रिमंडळाच्या बैठकी असायच्या. शिवाय पंतप्रधान म्हणून येणाऱ्या इतरही जबाबदाऱ्या असायच्या. वेळ मिळाला की, ते काही काळ घोड्यावरून रपेट करायचे. तर कधी तीनमूर्ती भवनातील पोहण्याच्या तलावात वेळ काढायचे. रात्री एक वाजेपर्यंत काम करून व काही काळ वाचन करून मगच ते झोपायचे. त्यांच्या वाचनात विज्ञान, तत्त्वज्ञान, राजकारण व कविता अधिक असायच्या. त्यांना विज्ञानात रुची होती. भाभा ऑटोमिक कमिशनचे ते अध्यक्ष होते. वैज्ञानिक व तंत्रज्ञांना भेटायला व त्यांच्याशी नव्या संशोधनाविषयी बोलायला त्यांना आवडायचे. ‘बोर्ड ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’चेही ते अध्यक्ष होते. या दोन्ही कामांत ते समरसून भाग घेत. ‘भारताला औद्योगिक प्रगतीखेरीज दुसरा पर्याय नाही. अवजड उद्योग उभारणाऱ्या यंत्रणा त्यासाठी त्याला येथेच उभ्या केल्या पाहिजेत,’ असे ते म्हणत आणि तशा त्यांनी त्या उभारल्याही.

देशभरात प्रयोगशाळांची उभारणी त्यांच्या हातून झाली. दिल्लीची नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, पुण्याची नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि जमशेदपूरची नॅशनल मेटॅलर्जिकल लेबोरेटरी त्यांच्याच हातची. याखेरीज कृषिक्षेत्र, औद्योगिक, संशोधन, रसायने, औषधी द्रव्ये (मलेरिया व कॅन्सरसारख्या आजारांवरील औषधांचे संशोधन), काच व चिनी मातीचे उद्योग एवढा त्यांच्या उभारणीचा आवाका होता. अणुशक्तीची आराधना व संशोधनही त्यांनीच देशात सुरू केले. त्यासाठी मुंबई आणि कलकत्त्याला संशोधन संस्था उभारल्या. ट्रॉम्बे येथील युरेनियम प्रकल्पही त्यांचाच. त्रावणकोर व कोचीनमधील मोझनाईनचे उद्योगही त्यांनी उभारले. थुंबाचे क्षेपणास्त्र केंद्रही त्यांच्याच हातचे.

नेहरू स्वतःला सक्रिय आदर्श समजत. तशीच त्यांची दृष्टी व विचारांची बैठक होती. तिला भारताचा पाया होता. एका भेटीत शेजारी बसलेल्या पाश्चात्त्य इसमाने त्यांना विचारले, ‘‘या बदलत्या जगात काय करावे, हाच सर्वांत मोठा प्रश्न आहे.’’ नेहरूंनी उत्तर दिले, ‘‘आम्हा भारतीयांना तो प्रश्न पडत नाही. आमचा प्रश्न आम्हाला काय व्हायचे आहे, हा असतो. यापुढे कदाचित आम्हालाही काय करायचे, हा प्रश्न पडेल.’’ अनेकांना समजून घेणे, विरोधकांना दाद देणे व दुसऱ्या बाजूचा विचार करणे, यामुळे त्यांचा निर्णय बऱ्याचदा विलंबाने यायचा. पण तो येण्याआधी ते साऱ्या बाजूंचा सखोल विचार करूनच आपल्या निर्णयाप्रत यायचे. इंग्लंडचे एक पंतप्रधान चेंबरलेन यांना त्यांचे पूर्वसूरी लॉईड जॉर्ज म्हणाले होते, ‘‘कोणताही निर्णय घेण्याआधी पक्ष आपल्यासोबत राहील याची काळजी घेत चला.’’

नेहरूंना असा प्रश्न गांधीजी व सरदार असेपर्यंत कधी पडला नाही. पक्षाबाबत ते निश्चिंत असत. त्याची जबाबदारी गांधी व पटेलांवर असे. पटेलांच्या पश्चात मात्र त्यांना साराच भार स्वतःवर घ्यावा लागला. मात्र तोपर्यंत वातावरण एवढे बदलले की, त्यांनी पक्षावर अवलंबून राहण्याऐवजी पक्षच त्यांच्यावर विसंबून राहू लागला.. एकदाच राजेंद्रबाबूंशी झालेल्या मतभेदांच्या वेळी (हिंदू कोड बिलाबाबत) ते राजीनामा द्यायला निघाले होते. परंतु आपला प्रत्यक्ष अधिकार व राष्ट्रपतींची नामधारी जागा यांचा विचार मनात येताच त्यांनी तो निर्णय बदलला. पुढल्या साऱ्या निर्णयात मग ते ठाम व निश्चल राहिले. त्यावर कुणाची छाप नव्हती. ते ऐकायचे साऱ्यांचे, पण करायचे मनाचे. त्याही स्थितीत पक्ष व सरकारवर त्यांचे नियंत्रण कायम होते. ते अतिशय चांगले सूत कातायचे. त्यांचे कपडे व राहणी कमालीची टापटिपीची होती. टोकदार टोपी, शोभेशी अचकन व चुडीदार असा त्यांचा स्वच्छ व नेटका पोषाख असायचा. अचकनच्या एका बटणात ते गुलाबाचे फूल लावायचे. आपली छायाचित्रे व प्रतिमा यांची ते काळजी घेत. त्यांना संगीताची आवड होती, निसर्गाचे प्रेम होते. त्यांच्या बागेत पक्षी व काही चांगले पशू होते. तीत दोन पांडा ठेवले असायचे. नेहरू त्यांना रोज भेटायचे. मुलांना त्यांच्या बागेत त्यांच्या जन्मदिवशी प्रवेश मिळायचा. मग ते मुलांत मिसळायचे आणि रमायचे. काश्मिरातली फुले, नद्या, पर्वतराजी या गोष्टी त्यांना सुखवायच्या. गंगेविषयी त्यांना अपार प्रेम होते. शिवाय इतर ज्ञानाहून त्यांना असलेली तत्त्वज्ञान व इतिहास यांची जाण मोठी होती. डॉ.राधाकृष्णन हेही त्यांच्या सखोल ज्ञानाने भारावायचे. ‘त्याला सगळ्या विषयांतले सगळे चांगले समजते.’ - हा त्यांचा नेहरूंविषयीचा अभिप्राय.

नेहरू फारसे चांगले वक्ते नव्हते. त्यांच्या सभांना लाखोंच्या संख्येने लोक येत आणि त्यांचे बोलणे ऐकत. नेहरूंच्या वक्तृत्वाचे एक वैशिष्ट्य हे की, श्रोत्यांमध्ये बसलेल्या प्रत्येकाला ते केवळ आपल्याशी बोलत आहेत असे वाटायचे. तसे वाटणे हे जबर वक्तृत्वाहून जास्तीचे परिणामकारकही असायचे. त्यांना वर्तमानपत्रांचे आकर्षण होते. त्यातून ते कमालीचे आक्रमक व तेजस्वी लिखाण करायचे. ते वाचकांच्या मनाच्या तळापर्यंत जाणारे असायचे. ‘नॅशनल हेरॉल्ड’ या त्यांनी स्थापन केलेल्या वृत्तपत्राचा पहिला अग्रलेख त्यांनी सप्टेंबर 37 मध्ये प्रयाग येथे लिहिला. ‘भिऊन लिहू नका’ हे त्यांचे पत्रकार व लेखकांना सांगणे होते. आपण पत्रकार व्हावे, ही नेहरूंची इच्छा जुनीच होती. त्यांनी 1919 मध्येच त्यासाठी मोतीलालजींना ‘इन्डिपेन्डंट’ हे वृत्तपत्र अलाहाबादेतून काढायला लावले. तिथे पूर्वी प्रकाशित होणारे ‘लीडर’ हे मवाळांचे पत्र मोतीलालजींनाही आवडणारे नव्हते. त्याचा प्रतिकार म्हणून त्यांनीही नेहरूंच्या या इच्छेला मान्यता दिली. मात्र ते पत्र दोन वर्षे कसेबसे चालून बंद पडले. त्या तुलनेत गांधीजी हे स्वतःला पत्रकार म्हणायचे, ते अधिक रास्त होते. ते सातत्याने लिहायचे आणि त्यांनी जे लिहिले, ते त्यांच्या साप्ताहिकांसोबतच जगभरच्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध व्हायचे.

‘माझ्यावर दोन व्यक्तींचा प्रभाव फार मोठा होता. एक माझे वडील मोतीलालजी आणि दुसरे बापू. मी मात्र त्यातून मुक्त होण्याचा, ‘मी’ होण्याचा प्रयत्न आयुष्यभर करीत राहिलो.’ गांधींचा ग्रामस्वराज्याचा व लघुउद्योगाचा आग्रह, त्यांचा समाजवादाला असलेला विरोध आणि त्यांची विेशस्त-कल्पना नेहरूंच्या समाजवादी निष्ठांशी जुळणारी नव्हती. ते समाजवाद बोलायचे. पक्षात तसे ठराव करायचे. आपला विचार गांधीजींसह पक्षातील इतर कोणत्याही वरिष्ठाला मान्य होणारा नाही, हे ते जाणून होते. पण गांधीजींवरील श्रद्धा त्यांना संघटनेशी जोडून ठेवणारी होती. संघटनेत जुनी माणसे आहेत तोवर आपल्याला आपला विचार कधी पुढे रेटता येणार नाही, हे त्यांना कळत होते. शिवाय गांधी आणि समाजवाद यातील सांधाही त्यांना सापडत नव्हता. कामगार आणि उद्योगपती यांच्यातील समन्वयही त्यांना जमणारा नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी सरदार पटेलांनी घालून दिलेला एक निर्बंध त्यांनी त्याचमुळे मान्य केला होती. पाच वर्षांपर्यंत खासगी उद्योगांवर व उद्योगपतींवर निर्बंध आणायचे नाहीत आणि कामगारांच्या वर्गालाही त्यांच्या विरुद्ध प्रोत्साहन द्यायचे नाही, हा सरदारांचा आग्रह होता.

1955 मध्ये गांधी नव्हते, सरदारही नव्हते आणि नेहरूंना त्यांचा मार्ग मोकळा होता. त्याच वेळी त्यांना गांधी आणि मार्क्स यांच्या विचारधारांमधील सांधेजोडही सापडला. खासगी मालमत्ता काढून घेताना तिचा मोबदला (सरकार ठरवील तो) मालकांना द्यायचा, हा तो सांधा होता. मग तसे भूसुधार कायदे नेहरूंनी केले. उद्योगपतींवर जास्तीचे करभार लावून त्यांच्या संपत्तीचा वाटा कामगारांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. मालकांचा वर्ग विेशस्तांच्या भावनेने कामगार व समाजाकडे पाहील, ही बाब त्यांना मान्यच होणारी नव्हती. हे काम लोकशाही सरकारचे कायदेच करू शकतील, असे ते म्हणत. तसे कायदे 1955 पासून त्यांनी अनेकांचा रोष पत्करून अमलात आणले. राजेंद्रबाबू नाराज होते, राजाजी दूर गेले होते; पण नेहरूंनी शांत राहून एक मर्यादित व संयमित समाजवाद देशात आणला. त्यावर समाजवादीही प्रसन्न नव्हते. मात्र नेहरूंना विरोध करण्याएवढी ताकद त्यांच्यात वा आणखी कोणात नव्हती.

नेहरूंच्या नेतृत्वाचा काळ खऱ्या अर्थाने 1950 नंतर आला व त्यांनी तो सहजपणे स्वीकारला. पुढल्या काळात त्यांच्या वाट्याला यशाचे फार मोठे माप आले. मात्र अपयशांनीही त्यांची पाठ सोडली नाही. तरीही सारी राजकीय गोळाबेरीज मांडली की ध्यानात येते, नेहरूंची उपलब्धी त्यांच्या अपश्रेयांहून मोठी होती. आजचा भारत, त्याने सर्व क्षेत्रांत केलेली प्रगती व लोकशाही संस्थापन ही या देशाला नेहरूंची देणगी आहे. ‘भारताचे खरे भाग्यविधाते’ ही त्यांची जगानेही राखलेली ओळख आहे...

सुरेश द्वादशीवार, नागपूर

sdwadashiwar@gmail.com

Share on Social Media

साहित्य

मॅजिकल रिॲलिझम – आरपारावलोकिता

(वास्तव आणि कल्पनांच्या सरमिसळीतून डोकावणारा)

मनस्विनी ल. र.

नूतन, मधुबाला, शशिकलाच्या काळात सुरू होणारी ही कांदबरी आज संपते. वेगवेगळ्या प्रतलांवर झालेल्या बदलांबाबत ती बोलते. माझ्यासाठी ही कादंबरी काय आहे? मला यातून काय जाणवलं, कळलं, उमगलं? एका अशा स्त्रीची ही गोष्ट आहे- जिच्या जवळ बुद्धिमत्ता आहे, पण व्यवस्थेमुळे अनेकदा तिला पुरुषांसमोर लहान व्हावं लागलंय. शिकत राहावं लागलंय. पण हाच या स्त्रीचा गुणधर्म आहे. कारण ती विद्यार्थिनीच्या भूमिकेत असल्याने तिच्यात काळानुरूप बदल होत गेले. पण तिला शिकवण्याची प्रौढी मिरवणारे पुरुष मात्र कायम आपल्याला सगळं येतंच हे मानून शिकलेच नाहीत, त्यामुळे पुढे गेलेच नाहीत. प्रत्येक पुरुष काळाच्या एका चौकटीत बंदिस्त झालेला दिसतो. त्याच्यातली विसंगती त्याच्या बुद्धिमत्तेवर मात करते, कारण तो स्वत:ला एका मर्यादेपलीकडे बदलायला तयार नसतो... पण जानकी मात्र बदलते.

‘आरपारावलोकिता’ ही कादंबरी वाचायला घेतली, तेव्हा मला आधी दडपण आलं, कारण मला वाटलं की, थोडी बोजड असेल तर? सैद्धांतिक मांडणी असेल, वाचायला वेळ लागेल, थोडं अवघड जाईल किंवा चळवळीतून आलेल्या लेखकांचं जसं होतं फारच इश्यूबेस्ड किंवा खूप रोमँटिसिझम असलेलं- तसं असेल तर? मला कळलंच नाही तर? बरेच प्रश्न पडले होते, जोपर्यंत मी ते पुस्तक हातात घेतलं नव्हतं तोपर्यंत! हातात घेतलं आणि झटक्यात वाचून झालं.

ही कादंबरी वाचून झाली ती सहज, एका दमात... वाचून झाल्या-झाल्या माझ्या मनात पहिलं आलं ते हे की, ही कादंबरी धाडसी आहे. समाजातील हुद्दा किंवा स्थान-पत किंवा वय वाढलं की, ‘लोकांना काय वाटेल?’ हा विचार अधिक वाढत जाऊ लागतो. लिहिताना माणसं सांभाळून, कुणाला न दुखवता लिहिण्याकडे कल जातो. लिखाण किंवा कुठल्याही कलाकृतीत लोकाभिमुखतेकडे किंवा पोलिटिकली करेक्ट असण्याकडे आपण वळायची शक्यता असते. खूपदा अनुभवांमुळे कुणाला कशाला दुखवा किंवा रॅशनली बघण्यापेक्षा त्या गोष्टीकडे फार भावनिकतेने बघण्याचा कल असतो. पण विद्युत भागवत यांची ही कादंबरी त्या बाबतीत धाडसी आहे. तिची भाषा, आशय हे मुद्दे आहेतच; पण मुख्य म्हणजे त्यात घेतलेला स्टँड. मला ही कादंबरी खूप आवडली... खूप जवळची वाटली... आणि मुख्य म्हणजे, आजची वाटली.

आरपारावलोकिता आणि आकृतिबंध

मुक्ताचा तोच प्रश्न- अन्‌ लिहिलंच समजा स्वत:बद्दल, तर त्यात मी-मी-मीच का येतं? परिघावरचे लिहितात तेव्हा त्यांच्या स्वकथनात येते तशी समूहात्मकता सवर्णांच्या लिखाणात का नाही येत? – आरपारावलोकिता

सामाजिक प्रश्नांबद्दल बोलणाऱ्या लिखाणात बऱ्याचदा सरळ कथन असलेलं दिसतं. अनेकदा सामाजिक प्रश्न मांडायच्या नादात माणूस म्हणून असणाऱ्या गुंतागुंतीकडे दुर्लक्ष केलेलं दिसतं. त्यामुळे तसं लिखाण प्रचारकी होऊ शकतं. अनेकदा त्यातलं साहित्यमूल्य कमी होऊन, विचार-मांडणीकडे ते जास्त कलतं... याउलट आरपारावलोकिता ही कादंबरी रचनेमध्ये काही गमती करताना दिसते. पण स्वीकारलेला आकृतीबंध आशयाला मारक ठरत नाही. गोष्टीची गरज जितकी आहे तितकंच आकृतिबंधाशी खेळलं गेलं आहे. त्यात काळाची सरमिसळ आहे.

कादंबरीची सुरुवात आत्ताच्या काळात होते, नार्य: चिंतन केंद्रातल्या चर्चासत्राने. जानकी आजची आणि मग ती काळात मागेपुढे जात राहते, हे फ्लॅशबॅक पद्धतीने येत नाही; आपण एखाद्या प्रसंगाबद्दल वाचतो आणि मग थोडं पुढे जाऊन नेमकं तेव्हा काय घडलं होतं हे कळतं. नॉन लिनिअर कथन इथे चित्रपटाच्या स्ट्रक्चरसारखं भासतं... जे उत्कंठा वाढवतंच, शिवाय आपल्याला केवळ गोष्ट न सांगता त्याबद्दल विचार करायला भाग पाडतं. त्यात मुक्ता खोब्रागडे हे पात्र आपल्यासमोर प्रखरतेने येतं आणि मग ते या कादंबरीचा भाग बनतं. जानकीसोबत आपण तिच्या आयुष्यात मागे-पुढे जात राहतो. तिच्या लहानपणात, तिच्या तरुण होतानाच्या भावविश्वात, वेगवेगळ्या चळवळींचा भाग होताना आणि त्यातच मधे- मधे आपण परत मुक्ता खोब्रागडेकडे येतो. जानकीच्या लिखाणावर किंवा चिंतनावर तिचं मत ती मांडत राहते, कधी कधी जानकीचं आत्मकथन वाचून आपल्याला पडलेले प्रश्न ती उभे करते, तर कधी वेगळेच प्रश्न उभे करते... आणि कधी कधी तर प्रश्न पडतो की, खरंच मुक्ता खोब्रागडे आहे का? की, ती जानकीच्या मनात आहे. एक स्वत:लाच प्रश्न विचारणारी? त्यात गंमत म्हणजे- जर ती जानकीचा कॉन्शस आहे, तर सवर्ण उच्च जातीतल्या जानकीचा कॉन्शस हा दलित स्त्रीचा असणं, हे फार वेगळ्या पातळीवर घेऊन जाणारं वाटतं. मॅजिकल रिॲलिझम आणि व्यवस्थेला शिक्षा देण्याची असलेली संमती-

लहान असताना तिला सर्कशीत जावंसं वाटलं होतं. नंतर वाटलं होतं, शशिकलासारखं सुंदर दिसावं आणि नंतर माला सिन्हासारखं नटी व्हावं. मग प्रश्न पडला की जे-जे व्हावंसं वाटलं, ते-ते चुकीचं कसं ठरवलं गेलं आपल्या घरच्यांकडून? -

आरपारावलोकिता अँजेला कार्टर नावाच्या मॅजिकल रिॲलिझममध्ये लिहिणाऱ्या फेमिनिस्ट लेखिकेचं एक पुस्तक आहे-‘अ मॅजिकल टॉम शॉप’ नावाचं. त्या पुस्तकाची सुरुवातच अशी होते की, आई-वडील घरी नसताना एक लहान मुलगी त्यांच्या मोठ्या आलिशान घरातल्या खोलीत शिरते. ती नुकती मोठी होत असते. तेरा-चौदा वर्षांची... ती आपल्या आई-वडिलांच्या खोलीचं भव्य कपाट उघडते. घरात फक्त नोकर-चाकर आणि तिची दोन लहान भावंडं. सगळे झोपले असतील, असा विचार करून ती कपाटातून तिच्या आईचा वेडिंग ड्रेस काढते आणि तो तिच्या मापाहून मोठा असलेला ड्रेस घालून बघते. आपल्या आईच्या शरीराची कमनीयता, कर्व्हस, वळणं, घाट अनुभवायचा प्रयत्न करते. तो घालून खालच्या मोठ्या विस्तीर्ण गार्डनमध्ये जाते आणि मागे दार लागून जातं... घाबरून ती आपल्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीकडे बघते. आता तिथे जायचं कसं? समोरचं झाड हा एकमेव पर्याय उरतो. ती तो पांढरा शुभ्र, अंगापेक्षा मोठा झगा सांभाळत झाडावर चढते. तिला खरचटतं... शुभ्र ड्रेसला मातीचे डाग लागतात, त्याचा टवका उडतो आणि ती कशीबशी आपल्या खोलीच्या खिडकीतून आत जाते. तो ड्रेस आईच्या कपाटात परत लपवते. मग घाबरून तिला रात्रभर झोपच लागत नाही. सकाळी टेलिफोन वाजतो आणि कळतं की, तिचे आई-वडील एका अपघातात गेले आहेत. तिला वाटायला लागतं की, आपण जर तो ड्रेस घातला नसता, तर कदाचित त्यांचा अपघात झाला नसता.

हा प्रसंग वाचून मला जे काही झालं होतं, तेच मला ‘आरपारावलोकिता’मधील जानकीच्या लहानपणाचे प्रसंग वाचून झालं.

व्यवस्थेने शिक्षा द्यायची दिलेली मुभा आणि त्यामुळे आपलं काम चुकलं हे माहिती नसतानादेखील सतत काही तरी चुकेल या भीतीत वाढणारी स्त्री- हे विद्युत भागवत यांच्या कादंबरीत सतत येतं. लहान जानकीला पन्नासच्या दशकात वाढताना मुलगी म्हणून खूप सारे प्रश्न पडतात. ती अनेकदा तिच्या स्वभावानुसार एका स्वाभाविक उर्मीने वागत राहते आणि ते सगळं त्या मुलगीपणाच्या चौकटीत बसत नाही, हे तिला वारंवार आजूबाजूच्यांकडून सांगितलं जातं. जेव्हा ती ते ऐकत नाही, तेव्हा तिला शिक्षा देण्याचा हक्कदेखील ही व्यवस्था व्यवस्थितरीत्या बजावते. केवळ आपण ह्या व्यवस्थेने दिलेले नियम वरवर पाळतोय, यामुळे आपल्याकडे काही तरी सुपरपॉवर आहे किंवा कुणालाही गुन्हेगार ठरवायचा हक्क आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीला शिक्षा देण्याचादेखील हक्क आहे, फक्त आपल्या आणि समोरच्याच्या विचारात तफावत असल्याने हा उन्माद, ही लोकांमधली मानसिकता यावर ही कादंबरी खूप सहज भाष्य करते, टीका करते... पण ते अजिबात ढोबळ होत नाही. आज होत असलेले मॉब लिचिंग असो, की सरळ दाभोलकर, पानसरे, कुलबर्गी, गौरी लंकेश यांसारख्या लोकांना गोळ्या घातल्या जाणं असो, रोहित वेमुला किंवा पायल तडवी यासारख्यांना आत्महत्या करायला भाग पाडण्याइतकं भयंकर टॉर्चर असो; हे सगळं याच मानसिकतेतून येतं... आणि हे करणारे ‘आपण समोरच्याला शिक्षा देण्यास पात्र आहोत’ असं कायम समजत असतात. त्याची सुरुवात किती साध्या छोट्या लेव्हलला होते, हे या कादंबरीतून दिसतं.

भिंतीवर मुलांनी नाव लिहिल्यावर भावाला सोबत पाठवलं जाणं असो, की मॅच जिंकून आल्यावर आईने घराबाहेर ठेवणं- सतत ‘डोळे काढून हातात देईन’ किंवा ‘जीभ हासडीन’ असं बोलत राहणं... किंवा नंतर एका प्रसंगात एक मुलगा छेड काढतो म्हणून जानकीच्या विद्यार्थिनीने त्याला मारणं वेगळं आणि पोलिसांत दिल्यावर स्त्रीची छेड काढली म्हणून नाही, तर मारण्याची आणि शिक्षा देण्याची मुभा असल्याने पोलिसांनी त्याला बडवणं- यातला दाखवलेला सूक्ष्म फरक... घरात सर्कस करायची ठरवून लहान जानकी जेव्हा चड्डीत बॉडीफ्रॉक घुसवून खेळ करते, तेव्हा तिला ज्या प्रकारे मारलं जातं- अशा प्रकारच्या हिंसेबद्दल ही कादंबरी बोलतेच; पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे स्त्रीपुरुषांच्या नात्यातील दैनंदिन जीवनात होणाऱ्या हिंसेलाही (की जिला सहसा नैसर्गिक म्हणून पाहिले जाते किंवा पुरोगामी व्यवहारातही जी नव्या रूपात अस्तित्वात असते) ही कादंबरी अधोरेखित करते. समोर येणाऱ्या प्रसंगांना काहीशी गूढ अनाकलनीय वास्तवाची किनार आहे. एक वेगळंच जग समोर उभं राहतं.

जानकीच्या लहानपणाचा सगळाच भाग मला मॅजिकल रिॲलिझमसारखा भासतो. मग शशिकला आणि तिचे चित्रपटसृष्टीतले मित्र असोत, लाल बर्फाचे गोळे खाणं असो, जानकीनं तिचे रंगीत कपडे घालणं असो, की नंतर शशिकलाने जाळून घेतल्यावर लहान जानकीला पडणारी स्वप्न असोत, की खाली तुरुंग आणि वर क्वार्टर्स असलेल्या घरात राहताना गुन्हेगारांपासून मुलांनी लांब राहावं म्हणून चाललेला आईचा खटाटोप आणि वर खेळताना खाली गुन्हेगारांना मारण्याचे आवाज येणं... यातून जानकीला मिळालेली दृष्टी- की, गुन्हेगार पण माणसंच असतात. यात आणखी एक विचित्र साम्य मला जाणवलं. ते म्हणजे, गुन्हेगारांना पोलीस मारतात तेव्हाचं त्यांचं ओरडणं, विव्हळणं आणि गर्भार स्त्रियांचं मूल होतानाचं विव्हळणं, ओरडणं- दोन्हीकडे वेदना आहे तशी शिक्षाही आहे का?

वास्तव, कल्पना, सरमिसळ, शब्द

यात अनेक उल्लेख येतात जी नावं काल्पनिक असतात, पण तरी त्याच्या अनुषंगाने येणारे संदर्भ खरेखुरे असतात. कधी कधी काल्पनिक नावाच्या राज्याला खरा होऊन गेलेला मुख्यमंत्री असतो, तर कधी काल्पनिक लेखिकेच्या पुस्तकाचं खऱ्या वेगळ्याच लेखिकेच्या पुस्तकाचं नाव असतं. हे वाचताना फार गमतीशीर वाटतं आणि अत्यंत रोचक. त्यामुळे कधी आपण त्या काळाचा भाग असावं आणि कधी वास्तवापासून लांब जावं, हे लेखिका ठरवत जाते. शिवाय आणखी एक गंमत म्हणजे, या कादंबरीत येणारे शब्द. जे शब्द आता फार लिहिले जात नाहीत, तसे काही शब्द यात येतात- विशेषत: जे बायकांच्या बोलीभाषेत होते, त्यांच्या तोंडी असलेले... उदाहरणार्थ- चवढव, तरडली इत्यादी. या शब्दांची पेरणी पुस्तकाच्या आशयाला समांतर जाते, असं वाटतं... शिवाय वाचताना गंमत येते, हे वेगळंच...

आरपारावलोकिता आणि पुरुष व सामाजिक चळवळी

हे सगळे स्त्री-पुरुष नात्याच्या संदर्भात गोंधळलेले पुरुषच- म्हणजेच जातीतून आलेलं देवत्व आणि तसंच सोबतच्या बाईनेही सर्वस्व मानून इच्छापूर्तीचं झाड व्हावं, अशी त्यांची अपेक्षा... त्यामुळे अष्टनायिकांच्या शृंगारिक देहाची वर्णनं करणारा कालिदास, बाईच्या शरीराचं गूढ करणारे पु.शि. रेगे... तिचं उन्नयन केल्याचा आभास निर्माण करणारे, पण तिला बरोबरीने वागवायची हिंमत नसणारे हे सगळे भारतीय पुरुषच... -आरपारावलोकिता या कादंबरीत अनेक सामाजिक चळवळींचा उल्लेख येतोच, त्यासोबत त्या चळवळींचं आणि काळाचं प्रतिनिधित्व करणारे पुरुषही येतात. शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून मार्क्सवादी विचारवंतांपर्यंत, स्त्रीवादी चळवळीपासून ते फक्त सैद्धांतिक मांडणीवर लक्ष केंद्रित करणारे, जात-लिंग-धर्म यातील भेदभाव व सोसायटीतील स्तर नाकारून पर्यावरणाच्या इश्यूवर इश्यूबेस्ड अशा आंदोलनांपर्यंत... त्यातल्या पिढीजाततेपर्यंत...

या चळवळींचा भाग असलेले पुरुष जानकीचे स्नेही आहेत. ते हुशार आहेत. जानकीच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते तिच्या आयुष्याचा भाग होतात आणि दर वेळी भारावून नाही पण उत्सुकतेच्या आणि नवं काही तरी शिकायचं या स्वभावामुळे ती त्या पुरुषांना कायम कोरी पाटी घेऊन भेटते. ती त्यांच्याकडून सगळं शिकत जाते, सगळं आत शोषत जाते. पण सहवासासोबतच तिला त्यांच्यातली विसंगती दिसायला लागते आणि शिकवताना पुरुष म्हणून ते तिच्यावर जीव लावतात. पण जिथे ती एखादा प्रश्न उपस्थित करते, तिथे ते लांब जायला लागतात. ही पळून जाण्याची वृत्ती कादंबरीतल्या बऱ्याच पुरुषांमध्ये आढळते, जरी ते तथाकथित पुरुषी मानसिकतेचे पुरुष नसले तरी... विचार म्हणून व्यवस्थेने दिलेलं ते ओझं ते नाकारतात... पण वागताना मात्र टिपिकल होताना दिसतात. तरी लेखिका त्यांच्यावर आरोप करत नाही, ती खूप कनवाळू आणि प्रेमळ नजरेने त्यांच्याकडे बघते. त्यांच्यातल्या विसंगतीसकट ती त्यांना स्वीकारते.

नंदन कशाळकर- (फक्त विज्ञानवादी दृष्टिकोन असणारे- पण जात समूळ डावलणारे कार्यकर्ते)

वसंत पाटील- भारतीय समाजरचनेवरची अत्यंत महत्त्वाची सैद्धांतिक मांडणी करणारे विचारवंत (पण सवर्ण स्त्रियांबद्दल आकर्षण आणि भीती दोन्हीसै द्धांतिक मांडणी इतकी चांगली करूनदेखील आचारात विचार आणू न शकलेले, स्त्रीजात या प्रश्नाची खोल मीमांसा केल्यानंतर चुकून आपला स्त्रीला धक्का लागला म्हणून शेजारी उभ्या असलेल्या स्त्रीला ‘तू मला बहिणीसारखी आहेस’ असं स्पष्टीकरण त्यांना द्यावं वाटतं).

कर्षक चळवळीचा नेता म्हसवडे- शेतकरी आंदोलनातला महत्त्वाचा आघाडीचा नेता (पण शेतकरी म्हणतात की, टेरिकॉटचा शर्ट पटकन सुकतो म्हणून घातलेत आम्ही ते. पण त्यांचं काहीही न ऐकता टेरिकॉटचे शर्ट घातले म्हणून शेतकऱ्यांशी न बोलणारा) आजच्या काळात जेव्हा हँडलूम इतकं महाग झालंय, परवडेनासं झालंय; सामान्य माणसाकडून ते काढून घेतलं गेलंय. आज मी मीटिंगला जीन्स टॉप घालून गेले तर ही लेखिका वाटत नाही, असं मानलं जातं. पण मला फॅब इंडियाचे कपडे परवडत नाहीत, त्या प्रकारची लाईफस्टाईल माझी नसेल तर मला सिनेमा टेलिव्हिजनच्या माध्यमात अनेकदा लेखक मानलंच जात नाही- याची मला हे वाचून आठवण झाली... आणि हा आग्रह किती अनाठायी आहे, हेही परत एकदा जाणवलं.

विष्णू कानडे- (ट्रीटमेंट नाकारली म्हणून नागिणीने गेला) जोपर्यंत जानकी त्याच्याकडून शिकत होती तोपर्यंत त्यांचं नातं हेल्दी असतं. पण जेव्हा ती स्वतंत्र होते आहे, तिला तिचे अजून मित्र असू शकतात ह्याची त्याला जाणीव होते; तेव्हा तो इन्‌सिक्युअर होतो (नवरा मोकळीक देत होता आणि विष्णू कानडे मात्र इन्‌सिक्युअर नवरा झाला होता).

अभिराम फडके- ‘बायकांनी निर्भय होण्यासाठी अंधारातही एकटं फिरण्याचं धाडस दाखवलं पाहिजे’ असं जानकीला सांगणारा, पण स्वत:च्या बायकोचा प्रश्न आल्यावर सनातन भूमिका घेणारा...

संभाजी पवार- धडाडीचा कार्यकर्ता, समाज बदलला पाहिजे हे आतून वाटणारा. जानकीवर भरभरून प्रेम करतो असं वाटत असताना जानकी त्याला भेटायला जाताना स्वत:च्या नवऱ्याला सांगून जाते- पण तो मात्र बायकोपासून लपून, खोटं बोलून तिला भेटायला येतो. शिवाय त्याची बायकोची निवडही अशी आहे की, जी त्याला देव मानते. ज्याची आई गावातली राजकीय पॉवर असणारी आहे, जिला राजकारण कळतं; पण त्याबरोबरच तिच्याबद्दल लहानपणापासून त्यानं वाईटसाईटच ऐकलंय. तो एके ठिकाणी मान्यदेखील करतो- माझं चुकलंच आईला समजून घेण्यात. खरंच माझी पावित्र्य मानणारी बायको व मुलगा यांना मी वेगळं मानतो आणि आईला मात्र छिनाल (असे पुरुष प्रेम करताना मोकळ्या विचारांच्या स्त्रीवर करतात आणि लग्न करताना मात्र अशाच बाईची निवड कशी काय करतात, हा मला सतत पडणारा प्रश्न ही कादंबरी वाचून आणखीच प्रखर झाला).

अर्थात याला कादंबरीतले काही पुरुष अपवाद आहेत... उदाहरणार्थ-

विवेक- (जानकीचा नवरा, जो तर्ककठोर आहे, त्यामुळे त्याला जे पटतं, तसाच तो वागतो. त्याच्यातला रॅशनलिझम टोकाचा वाटला तरी त्यामुळेच तो जानकीसाठी, जानकीसोबत कायम असतो. तिचं वागणं तो स्वीकारतो, जज करत नाही. टीका करतो, पण ती तिच्या विचारांशी फारकत घेत असेल तर... तिच्या वागण्याला नैतिक दृष्ट्या तो कधीच जज करत नाही.)

उल्हास साने- (त्यातल्या त्यात जात-वर्ग याबद्दलची जाणीव फार तीव्र नसली तरी संवेदनशील पुरुष म्हणून त्या व्यक्तीकडे बघावं वाटलं... त्यांना जात आणि त्यामुळे निर्माण झालेले गुंते ही गोष्ट उतारवयात कळू लागते आणि ते तेव्हा प्रांजळपणे मान्यही करतात- त्यामुळे जास्त सुलझलेला असा पुरुष वाटतो). या सगळ्या काल्पनिक पुरुषांसोबत लेखिका खरी नावं घेऊन मराठी आणि भारतीय पुरुष लेखकांचं, कलाकारांचं स्त्रियांकडे बघण किती कोतं-अपूर्ण आहे, हेही निर्भीडपणे मांडते. उदा- मग सत्यजित रेंच्या चित्रपटातही तेच म्हणजे शहरात वाट काढत जाणं, वाट काढणं आणि आधुनिक होणं हे मुलाच्या बाबतीत होणार; पण मुलीच्या बाबतीत मात्र- ती अकाली मरून निसर्गाशी एकरूप होणार... आणि तरी ते फक्त विचार न वाटता तो त्या कादंबरीचा भाग वाटतो, हे विशेष.

इथे एक फार सरसकट विधान करतेय, त्याला खूप सारे अपवाद आहेत हे मान्य करून- बऱ्याचदा पुरुष लेखक लिहितात तेव्हा त्यांच्या लिखाणातल्या स्त्रिया या त्यांना आवडणाऱ्या स्त्रियांसारख्या असतात. त्यातही त्यांना जे भावलं आहे तितक्याच त्या दिसतात, पूर्ण दिसत नाहीत आणि न आवडणाऱ्या सरळ वाईट ठरतात, नाही तर त्यांना त्यांच्याकडून नाकारलंच जातं... पण असं स्त्रिया करत नाहीत. त्या लिहिताना पुरुषपात्रांकडे जास्त व्यामिश्रतेने बघतात असं वाटतं...

मृत्यूचं सततचं अस्तित्व-

विष्णू कानडेपासून ते नेहा कामतपर्यंत प्रत्येकाचे मृत्यू हे कुठल्या तरी आग्रही असण्यामुळे झालेले. ट्रीटमेंट नाकारल्यामुळे- याचं कारण काय? त्या पात्रांना खरंच मृत्यू जवळचा वाटत होता का? मृत्यूला कवटाळू बघणारी माणसं कधी कधी स्वार्थी होऊन जातात का? की, त्यांना आजूबाजूचं काहीच दिसतच नाही, की त्यांना काही तरी वेगळं खुणावत असतं? आणि ते गूढ-अगम्य असं काही तरी शशिकलाच्या मृत्यूनंतर तर बोचल्यासारखं वाटत राहतं. आईशी कधीच संवाद न करू शकलेली जानकी, आई गेल्यावर तिला पत्र लिहिते. जाळून घेतलेल्या स्त्रिया, नवरा गेल्यावर त्याच्या ओठात ओठ घालून रडणारी जानकीची मावशी... आदी. कादंबरीच्या प्रत्येक टप्प्यावर मृत्यूचं अस्तित्व जाणवत राहतं. ते आहे, ते असतंच. पेपरमधल्या बातम्यांपासून ते आपल्या अगदी जवळच्या- खूप जवळच्या लोकांपर्यंत सगळीकडे अदृश्य... वाऱ्यासारखं, दिसत नसलं तरी बोचत राहणारं...

कादंबरीतल्या स्त्रिया-स्त्रियांची स्त्रियांशी असलेली मैत्री

जेव्हा खऱ्या अर्थाने पाळी येण्याची वेळ आली तेव्हा धाकटा भाऊ म्हणाला, ‘ताईला आता बाळ होणार!’ तर हे असं बाईचं प्राण्यात रूपांतर होणं - आरपारावलोकिता नूतन, मधुबाला, शशिकलाच्या काळात सुरू होणारी ही कांदबरी आज संपते. वेगवेगळ्या प्रतलांवर झालेल्या बदलांबाबत ती बोलते.

माझ्यासाठी ही कादंबरी काय आहे? मला यातून काय जाणवलं, कळलं, उमगलं? एका अशा स्त्रीची ही गोष्ट आहे- जिच्या जवळ बुद्धिमत्ता आहे, पण व्यवस्थेमुळे अनेकदा तिला पुरुषांसमोर लहान व्हावं लागलंय. शिकत राहावं लागलंय. पण हाच या स्त्रीचा गुणधर्म आहे. कारण ती विद्यार्थिनीच्या भूमिकेत असल्याने तिच्यात काळानुरूप बदल होत गेले. पण तिला शिकवण्याची प्रौढी मिरवणारे पुरुष मात्र कायम आपल्याला सगळं येतंच हे मानून शिकलेच नाहीत, त्यामुळे पुढे गेलेच नाहीत. प्रत्येक पुरुष काळाच्या एका चौकटीत बंदिस्त झालेला दिसतो. त्याच्यातली विसंगती त्याच्या बुद्धिमत्तेवर मात करते, कारण तो स्वत:ला एका मर्यादेपलीकडे बदलायला तयार नसतो... पण जानकी मात्र बदलते. तिचा शोध सुरूच आहे. मोकळीक असलेल्या नात्याचा. जिथे पुरुष असो की स्त्री- तिच्याशी बरोबरीच्या नात्याने वागेल बोलेल. पण फारच कमी पुरुषांत तिला ते धागे सापडतात. किंवा ते सापडल्यासारखे वाटले आणि तिला मोकळं वाटतंय असं भासू लागलं, की त्या पुरुषातला व्यवस्थेने दिलेला प्रचंड गंड हळूहळू समोर येत जातो; तसेच त्यांचं नात्याची जबाबदारी घेता न येणंदेखील!

मग ती परत कामात आणि मुख्य म्हणजे थिअरीकडे वळते. आफ्रिकन-अमेरिकन स्त्रीवादी लेखिका Bell Hooks ने म्हटलंय तसं- I came to theory because I was hurting- the pain within me was so intense that I could not go on living. I came to theory desperate, wanting to comprehend-to grasp what was happening around and within me. Most importantly, I wanted to make the hurt go away. I saw in theory then a location for healing.

आणि या थिअरीसोबत तिला सापडतात त्या मैत्रिणी, ज्या तिच्याबाबत कमी जजमेंटल असतात. त्या तिला सैद्धांतिक पातळीवर प्रश्न विचारतात, पण त्या तिला अमुक एक ठरवत नाहीत. ती मोकळीक तिला मैत्रिणींमध्ये सापडते. अर्थात या व्यवस्थेचा भाग बनलेल्या आणि तिला सतत जज करणाऱ्या स्त्रियाही या कादंबरीत आहेतच- ज्या फक्त तिचं कोणाशी काम झालं वगैरे चर्चा करण्यात रमतात किंवा आपल्या नवऱ्यावर हक्क प्रस्थापित करण्यात त्यांचं इतिकर्तव्य असतं.

पण सुमन देशपांडे, कुमारी देशमुख, चित्रा साठे, शशिकला, मुक्ता खोब्रागडे आणि नेहा कामत... या सगळ्या स्त्रिया त्यांच्या-त्यांच्या परीने बंडखोर आहेत... मुद्दामहून नाही, स्वाभाविकपणे आहेत. त्यांच्यातल्या स्त्रीत्वासकट. जाती आणि स्त्री याकडे बघणारी मुक्ता खोब्रागडे आणि नेहा व जानकीचं एक स्ट्रक्चर वापरून युनिव्हर्सिटीच्या लेव्हलला वैचारिक बदल घडवून आणताना उभं केलेलं नार्य : चिंतन केंद्र आणि तरी विचाराने कितीही पटलं तरी सगळी माणसंच... नेहा कामतचं पुरुषाशी संबंधच नाकारणं... पुरुषी मानसिकतेला शह देण्यातला हा एक प्रकारचा अतिरेकीपणा. या कादंबरीत माणसांना माणसासारखं बघितलंय, उद्दात्त केलेलं नाही आणि त्यांच्या स्वभावातली विसंगती दाखवली, पण त्यांना नाकारलेलं नाही. लेखक म्हणून हा बॅलन्स सांभाळणं फार जोखमीचं वाटतं. आपले स्वत:चे राग, ग्रह मधे-मधे कडमडतात; पण त्याला थोडं लांब ठेवून फारच निरपेक्षपणे हे सगळं मांडलंय, असं वाटतं. त्यातही मराठी लेखिकांचं स्वत:ला स्त्रीपणात अडकवून घेणं आणि फारच कमी लेखिकांचं त्यातून मोकळं होऊन लिहू शकणं, हेही मांडलंय. म्हणजे परत जे पुरुषांच्या बाबतीत आहे ते स्त्रियांच्या बाबतीतदेखील आहेच. जाणीवपातळीवर वेगळं वाटत असलं तरी नेणिवेत स्त्रीपणानं दिलेलं जडत्व कायम पुरुष प्रतिमेशी स्वत:ला जोडून अथवा रिॲक्शन देत तोडून बघणंदेखील आहेच...

आजचा काळ आणि आरपारावलोकिता

आजचा काळ- खैरलांजी असो की वाढलेलं बलात्कारांचं प्रमाण असो- पुरुषी नजरा अजूनही तितक्याच बोचक भीतिदायक. दुसरीकडे आता ग्लोबलायझेशननंतरच्या काळात, सगळंच जिथे विकलं जातंय. आम्ही सॅनिटरी नॅपकीनबद्दल, पाळीबद्दल मोकळेपणे का बोलू? तर, त्याला अमुक एक स्पॉन्सरर आहे! तिथे ओळखीच्या पुरुषांनाही फक्त तुमचं शरीर दिसतं... आणि तुम्ही बारीक-फिट असाल, तर ते तुमच्याशी चांगलं बोलतात. तुम्ही सुंदर दिसत असाल, तर ते तुम्हाला भाव देतात. हे तर इतकं सर्रास झालंय... शिवाय पूर्वी जेव्हा जानकी लिपस्टिक लावायला जाते तेव्हा तिच्यासाठी ते बंड असतं. पण आज गावागावात हिमाचल वगैरेला तर सगळ्याच बायका सिंदूर, मंगळसूत्र, पैंजण, बांगड्यांसकट लिपस्टिक लावतात. व्यवस्था स्त्रियांच्या बंडालाही कशी बेमालूमपणे स्वत:त मिसळून घेते...!

ज्याविषयी स्त्रियांनी बोललं पाहिजे म्हणून स्त्रीवादी चळवळीने लढा दिला, त्याबद्दल आज बोललं जातंय; पण त्याचं श्रेय स्त्रीवादी चळवळीला नाहीच. शिवाय त्या बोलण्याला पण एक अट आहेच. आम्ही पाळीच्या सायकलबद्दल बोलू; पण ते केव्हा, जेव्हा आम्हाला सॅनिटरी नॅपकीनवाले स्पॉन्सरर असतील तेव्हाच! आम्ही डिप्रेशनबद्दल बोलू, कारण डिप्रेशनच्या गोळ्यांचा खप आता वाढवायचा आहे... मग ज्याला मार्केट नाही, त्याविषयी बोलताच येणार नाही. आणि बोलायचं असेल, तर बाजारपेठ तयार करावीच लागेल... या नव्या गुंतागुंतीचं काय करायचं?

गावातून किंवा निमशहरी भागातून शहरात आलेल्या- बऱ्याच जणांनी गावातल्या मुलींशी पाहून, ठरवून रीतसर लग्नं केली, ती शहरात येऊन सोबत शिकणाऱ्या स्त्रियांशी अफेअर-बिफेअर्स करून झाल्यावर! जातीत घरच्यांनी बघून दिलेला पर्याय त्यांनी निवडला. किंबहुना, त्यांना तो अव्हेलेबल होता... त्यांच्यासाठी गावातली स्त्री- जिला स्वातंत्र्य देण्याचं मोठेपण त्यांना घ्यायचंय, ती गावाकडची स्त्री- उपलब्ध असतेच!

याउलट शहरात गावातून शिकायला आलेल्या- विषेषत: सवर्ण नसलेल्या, स्वतंत्रपणे जगणाऱ्या- मुलींकडे गावातला मुलगा हा पर्याय आहे का? जरी असेल, तरी तो तिच्यासाठी शहरात येऊन राहील का? किंवा ती त्या गावात परत गेली तरी, ती जशी शहरात जगत होती तसं तिला परत जगता येणार आहे का? तर नाही. यापुढे जाऊन कधी तरी पुरुषाला स्वातंत्र्य दिलं, ही भावना तिला उपभोगता येणार आहे का? तर, खचितच नाही... पण याच गोष्टीकडे ही कादंबरी वेगळ्याच दृष्टीने बघते. तिला असं वाटत होतं की, लग्न ही बऱ्याच स्त्रियांसाठी मोक्षदायी घटना असू शकते. नाव, जात सगळं बदलता येतं. इतक्या सकारात्मकतेचं अप्रूप आणि कुतूहलही वाटून जातं...

आज शहरातली स्त्री तुलनेने कमी पाश असलेली, हे आपण सहजच मानतो. गाव, शहर या दोहोंमधे भिंत असतेच... ‘तुम्ही शहरातल्या बायका’ असे सतत, सहज उल्लेख होतातही. शहरातली जात आणि स्तर नाकारले जातातच, शिवाय मोकळीकतेला वर्गाशी सतत जोडलंही जातं. पण शहरातली तथाकथित स्वतंत्र स्त्री उच्चभ्रू किंवा सेटल्ड समाजातली- तिचं स्वातंत्र्य तरी खरंच किती पाण्यात आहे? लग्न, मूल सगळं यथासांग पार पडलं की, आम्ही कशा फ्री म्हणून या स्त्रिया आधीच्या काळात टेबलटेनिस खेळायच्या, मग योगा करायला लागल्या, मग एरोबिक्स आणि आता मॅरेथॉन धावतात. मॅरेथॉन धावून खरंच फ्री होतात का स्त्रिया? त्या स्वत:ला बळी जाण्याच्या चौकटीमधून बाहेर पडून पाहू शकतात का? आपण ट्रॅडिशनली पण सगळ्या बाबतीत सक्षम आहोत, हे दाखवायची उर्मी कमी का होत नाही? या पुरुषांसमोर का सतत स्वत:ला सिद्ध करत बसावं लागतं? (करिना कपूरपासून माधुरी दीक्षितपर्यंत सगळेच- ‘मूल होऊ देणं हा जगातला सगळ्यात मोठा अनुभव आहे’ असं सांगतात. त्या पार्श्वभूमीवर स्त्री ही मानववंशाला सातत्य देणारी मादीच कायम ठरणार का, असा प्रश्न महत्त्वाचा वाटतो).

मी आरपारावलोकिता कादंबरी वाचत होते, तेव्हा सिक्कीमला गेले होते. भारतातला नॉर्थ-ईस्ट प्रदेश. सिक्कीममध्ये मातृसत्ताक व्यवस्था नसली तरी आजूबाजूच्या नागालँड, मणिपूर येथे आहे. त्यामुळे तसा तिथे स्त्रियांच्या वागण्या-बोलण्यात महाराष्ट्रापेक्षा जास्त आत्मविश्वास जाणवतो. घरातल्या बिझनेसमध्ये त्यांचा सहभाग असतो. आर्थिक पॉवर्स तुलनेने जास्त असावी, असं वाटतं... अशा पार्श्वभूमीवर मी ही कादंबरी वाचत होते. आम्ही एका लोकल बसने जात होतो. सतरा-अठरा वर्षांची दोन कपल्स एका गावात बसमध्ये चढली... आणि त्या जोडप्याचं एकमेकांना छेडणं सुरू होतं. त्यात त्या मुली त्या मुलांना तितक्याच निडरपणे छेडत होत्या. मग त्यातला एक मुलगा त्या मैत्रिणीच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला आणि बसमधल्या प्रवाशांना हे बघताना काही खटकल्यासारखं वाटत नव्हतं... अर्थात हे प्रातिनिधिक उदाहरण असेलच असं नाही. पण तरी पुरुष स्त्रीच्या जवळ आले की, स्त्रिया आपसूक लाजतात... नाही म्हणतात किंवा सबमिसिव्ह असतात. हे आपल्याला नैसर्गिक वाटतं, ते नैसर्गिक नसावं. किंबहुना, नाहीच. ते कंडिशन्ड आहे, हे मला तिथे जाणवलं...

दुसरा एक प्रसंग- आम्ही सिक्कीमच्या एका छोट्या गावात पोहोचण्यासाठी रात्री उशिरा प्रायव्हेट गाडी केली. तो ड्रायव्हर आधी तयार नव्हता, ‘खूप सुनसान रस्ता आहे. मी एकटा परत कसा येणार? मी माझ्यासोबत माझ्या बायकोला घेऊ का?’ मला ते ऐकून आश्चर्यच वाटलं. महाराष्ट्रात रात्री बारा वाजता एखादा कॅब ड्रायव्हर भीती वाटते म्हणून बायकोला सोबत घेईल का?

म्हणजे फार नाही, पण अजून थोडी मोकळीक- ती पण जरा बरोबरीच्या नात्याकडे घेऊन जाऊ शकते का? आणि जाऊ शकत असेल, तर मधे हे काय येतंय? हे प्रश्न मला जानकीने स्वत:ला विचारायला भाग पाडले. आणि आता या सगळ्याकडे बघायचं कसं? खिन्न आणि म्लान वाटतंय हे पुस्तक वाचून... जानकीबद्दल एक प्रकारची ओळख असल्यासारखं. पण काहीच नाही बदलणार का? पुरुष त्यांचा गिल्ट आणि पळून जाण्याच्या वृत्तीतून बाहेर नाही पडणार का? अजून बायकांना अंगात आणून किंवा सायकिॲट्रिस्टच्या अपॉइन्टमेंट्‌स घेऊन त्याच चुकीच्या आहेत, असं मानून जगत राहावं लागणार का? जात आणि स्त्री यांचं समीकरण कसं सुटणार? तिला स्त्री म्हणून आणि जात म्हणून दोन्हीकडे सतत प्रत्येक पायरीवर म्हणजे घरच्या लेव्हलपासून बाहेर ऑफिस, सामाजिक- सामूहिक, ओळखीच्या अनोळखी- सगळ्याच पातळीवर झगडतच राहावं लागणार का? कुणाच्याही प्रश्नांना उत्तरं द्यायची, प्रत्येक वेळी स्वत:च्या वागण्याचं स्पष्टीकरण देत राहायचं- हेच करत राहावं लागणार का? विचार वेगळे असल्याची शिक्षा त्यांना सतत मिळणार का? हुशार असल्याचं दाखवलं म्हणून त्यांना धडा शिकवायचा हक्क कुणाही ऐऱ्या-गैऱ्याला असणार का? स्त्री कोणासोबत झोपते, हेच तिचं अस्तित्व ठरवणार का?

आणि शेवटी या सगळ्याकडे कसं बघायचं? जानकीत आणि माझ्यात वयाचं इतकं अंतर... मधुबालानंतरचा हा दीपिकाचा काळ. पण मग काय करायचं? तर याच पुस्तकातल्या एका वाक्यावर मला माझं लिहिणं संपवावं वाटतं. ‘तिला जाणवलं की, या सगळ्याचं आकलन करायला पुरुषप्रधानतेसारखा केवळ एक शब्द अपुरा आहे. म्हणजेच थोडी गुंतागुंत आणि व्यामिश्रता कवेत घ्यावी लागेल- सगळ्याच जात-धर्म-लिंगाच्या लोकांना बहुधा...’

मनस्विनी ल. र.

आरपारावलोकिता विद्युत भागवत प्रकाशक : हरिती पब्लिकेशन्स्‌ पृष्ठे : 272, किंमत : 300 रुपये. मोबाईल. 9067035653

Share on Social Media

संस्कृती

पुरोगामी ते विश्वगामी... सुखन

आनंद नाडकर्णी

हा कार्यक्रम ठाशीव असला, बांधीव असला तरी त्याची उत्स्फूर्तता जबरदस्त असते. स्टेजवरच्या सगळ्यांची ऊर्जा एकत्र येते; तिचा गुणाकार होतो... एक ‘संऊर्जा ’ तयार होते. ते रसायन अक्षरशः वेगळ्या जगात घेऊन जाणारे असते. उर्दू भाषेच्या घडणीचा काळ सहावे ते तेरावे शतक असा मानला जातो. लष्करी छावणीवर बोलली जाणारी ही भाषा, लोकांमध्ये पसरलेली ‘खडीबोली’... आणि त्यावर झालेले संस्कृत, प्राकृत, पर्शियन, अरेबिक अशा अनेक भाषांचे संस्कार. धार्मिक भेदावर उर्दूची चिरफाड सुरू झाली, ती दोन पद्धतीने. उर्दू लिहायची ‘नस्तलिक’ ही लेखनपद्धती आहे आणि देवनागरी लिपीतही ती लिहिता येते. दुसरा भाग उर्दूला एक तर संस्कृतप्रचुर करण्याचा किंवा पर्शियनप्रचुर करण्याचा... भाषेचा हेतू आहे संवाद. माणसांना जोडणं... आणि भाषा वापरली जाते ती संकुचित अस्मितेचे प्रतीक म्हणून.

आपल्या महाराष्ट्रातल्या, आपल्या पुण्यामधल्या तरुण-मंडळींच्या एखाद्या धमाल आयडियाची भरली- भारली वर्णने आपल्याला अमेरिका आणि दुबईमधल्या मैत्रिणींकडून ऐकायला मिळावीत, ही खूपच लाजिरवाणी गोष्ट... ‘सुखन म्हणजे काव्य, सुखन म्हणजे साहित्यातली अर्थपूर्ण भाषा... प्रतिभाशाली शब्द...’

अर्थात उर्दूचा गंध नसल्यामुळे मी अर्थ केला होता की, हे अर्थातच सुखद भावना आणि सुखद अनुभव असे काही असावे.... म्हणून तत्काळ गुगलमैय्याद्वारे चित्रफिती पाहिल्या. तेवढ्यात अमेरिकेतल्या मित्राने आगामी कार्यक्रमाचे पोस्टर पाठवलं... उर्दू भाषा, साहित्य, शायरी, गझल, कव्वाली यातील सौंदर्य आपल्यासमोर आस्वादक पद्धतीने मांडणारी मैफल.... तीन तास प्रेक्षक श्रोत्यांबरोबर केला एकत्र प्रवास- या साऱ्या कलाकारांनी केलेला.

दि.10 ऑगस्ट 2019 च्या रात्री दादरच्या शिवाजी मंदिरातल्या प्रयोगाच्या जागा त्याच क्षणी नक्की करून टाकल्या. जेमतेम पाऊस, पण पूर्ण कोलमडलेला ट्रॅफिक यातून नाट्यगृहाच्या दाराशी पोहोचलो; तर तरुणाईची तुफान गर्दी... त्यातून वाट काढत स्थानापन्न होतोय्‌ तर पडदा वर गेलाच... आणि नाट्यगृहातून टाळ्या, शिट्‌ट्या, आवाजाचा जोरदार धमाका. मी असे थिरकते वातावरण पाश्चात्त्य संगीताच्या मैफिलींमध्ये पाहिले आहे... पण शिवाजी मंदिरालाही अशी धमाल नवी असावी.

रंगमंचावर गायक, वादक आणि निवेदक असे सारे फनकार! फन म्हणजे उर्दूमध्ये फणा (नागाचा) आणि हुन्नर, कलाकौशल्य असा दुसरा अर्थ... हे ज्ञानही कार्यक्रमादरम्यानच मिळालेले. केस पुरेसे विस्कटलेला ओम (भुतकर) अस्खलित उर्दू जबानमध्ये कार्यक्रमाला सुरुवात करतो...

पुण्यातल्या वेगवेगळ्या पेठांमध्ये राहणारे हे सारे कलाकार सुमारे तीन वर्षांपूर्वी एकत्र आले. यंदाच्या 13 ऑक्टोबरला त्यांना भेटून तीन वर्षे होतील. साऱ्यांना जोडणारा धागा होता उर्दू भाषा... आपण सगळ्या भारतीय भाषांकडे जितक्या सहिष्णुतेने पाहतो, तितक्या उदार हृदयाने या भाषेकडे पाहत नाही. कारण आपण या भाषेवर ‘पाकिस्तानची भाषा’ असा शिक्का मारलेला असतो. सुखनमधल्या एका गाण्यात म्हटलेच आहे की पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये काय पानगळ वेगळ्या प्रकारे होते, की डोळ्यांतलं पाणी वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये येते...? पण नाही; आपण भाषेवर शिक्का मारून मोकळे होतो. पाकिस्तानचा शिक्का नसेल तर ‘मुसलमानांची’ भाषा असा शिक्का असतोच. कोकणातले किंवा देशावरचे मुसलमान चांगली मराठी सराईतपणे बोलतात. पण बहुसंख्य असे आपण उर्दू काय, हिंदीही जरा दूरच ठेवतो. महानगरांमध्ये आता सक्तीने वापरावी लागते म्हणून ‘हमको-तुमको’वाली भाषा वापरायची.

मुद्दा आहे भाषेच्या प्रेमाचा... सर्व भाषा सुंदर असतात. कारण माणसाच्या जगण्यातून, अनुभवातून आलेल्या ध्वनिचित्रप्रतीकांची अतिशय लयबद्ध रचना असते ती. उर्दूलाही अशी लय, असा डौल आहेच. माझी पत्नी सविता मला सांगते की, तिच्या लहानपणी टीव्हीवरच्या कार्यक्रमांच्या क्रेडिट्‌समधल्या उर्दू अक्षरांचं तिला आकर्षण वाटलं. कॉलेजमध्ये गेल्यावर तिला उर्दू माध्यमात शिकलेल्या मैत्रिणी भेटल्या. तिचे भाषा प्रेम वाढलं. मानसशास्त्रात एम.ए. करत असताना तिला कळलं की, मुंबई विद्यापीठाचा उर्दू विभाग सर्वांसाठी म्हणून प्रत्येक आठवडाअखेरीचे भाषा अभ्यासक्रम तयार करत आहे. तिने तीन वर्षे सलगपणे अभ्यास करून हा डिप्लोमा मिळवला. तेव्हा काही जवळच्यांनी तिची टिंगलही केली. हिला ‘त्या’ लोकांचं भारीच प्रेम- अशा नजरा आणि शब्द सहन केले. आम्हाला मुलगा झाला तर त्याचे नाव कबीर आणि मुलगी झाली तर समा ठेवायचं, असं आम्ही ठरवलं तेव्हासुद्धा... तुला कबीर नाव आवडणार, अशी तिची संभावना झाली. कबीरासारख्या महात्म्याला- जो कधीचाच गेला जाती-धर्मापल्याड- आमची दृष्टी त्याला कुठे आणून बसवते पाहा... सुदैवाने सविताच्या वडिलांनी (‘आपटे’ आडनाव त्यांचे) तिला पूर्ण पाठिंबा दिला, पण तिच्या आवडीमुळे आमच्या घरात उर्दू भाषेला प्रेमळ आश्रय मिळाला. घरात उर्दू पुस्तके यायला लागली. प्रेमचंद, मंटो, किशनचंदर, इस्मत चुगतई, गुलजार, राजेंद्रसिंग बेदी, जावेद अख्तर या मंडळींशी माझी ओळख झाली. त्यामुळे काही फॅक्ट्‌स माझ्या लक्षात आल्या.

एक तर ही भाषा आपल्या देशात जन्मलेली आहे. ती पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे, हे खरं; पण ती भारताचीही राजभाषा आहे. काश्मीरसोबतच उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, दिल्ली या राज्यांमध्येही ही अधिकृत राज्यभाषा आहे. उर्दू प्रथमभाषा असणाऱ्यांची संख्या सात कोटींच्या घरामध्ये फक्त भारतातच आहे, तर हिंदीसह उर्दू बोलणाऱ्यांची देशातली संख्याच तीस कोटींवर जाईल. चारशेहून जास्त वृत्तपत्रे या भाषेत प्रसिद्ध होतात. आणि गद्य व पद्य साहित्याची मोठी परंपरा आहेच या भाषेला. रंगमंचावरून ओम सांगत होता- तुम्हाला कदाचित आमच्या कार्यक्रमातले काही शब्द कळणार नाहीत... पण प्रत्येक भाषेचा स्वतःचा ‘आवाज’ असतो... तो तुमच्यापर्यंत पोहोचला, तर भाषा नाही कळली तरी समस्या नाही... भाषा ‘कळल्यासारखी वाटणं’ हे जास्त महत्त्वाचं असतं.

उर्दू जरी हिंदी भाषेला जवळची असली, तरी तिचे ‘अल्फाज’ पेश करण्याचा ढंग वेगळा आहे. शब्दांवरचं वजन, शब्दांचे उच्चार- सारं कसं ‘अदबसे ’ व्हायला हवं. सुखनमधले कलाकार अशा सफाईने हे उच्चार आपल्यापर्यंत पोहोचवतात की देवस्थळी, जोशी, वैद्य, बगाडे, पवार, भुतकर ही यांची आडनावे खरीच आहेत ना, असे वाटायला लागते... आता पाहा, हासुद्धा माझा पूर्वग्रहच नाही का...? यातले सगळे अस्खलित इंग्रजी बोलणारे असते, तर मी त्यांच्या आडनावांची ही यादी आड आणली असती का? असो.

संपूर्ण कार्यक्रमामध्ये ‘फुटकळ’ पद्धतीने वेळ घालवला जात नाही. गद्य आणि पद्य भाग आलटूनपालटून घेतले जातात. पद्यामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न असतो. शब्द, अर्थ तर वेगळे असतातच, पण स्वरमेळ म्हणजे Music Arrangement सुद्धा वेगवेगळी असते. सारंगीसारखे वाद्य वेगळेच वातावरण निर्माण करते. तोच कलाकार ढोलकही धमाल वाजवतो. हार्मोनियमवरचा कलाकार वेगवेगळी वाद्ये वाजवतो आणि तबलानवाझ गातोही खड्या सुरात.

ओम आणि नचिकेत सहज बोलतात. ओम हा उत्तम अभिनेता आहे. (‘मुळशी पॅटर्न’फेम). त्यामुळे तो स्वतःला उत्तम प्रोजेक्ट करतो. तो सहजपणे विनोद करतो... उर्दूमधून... खळखळून हसतो आपण... मातृभाषा म्हणजे जिच्यावर आपण आईसारखे प्रेम करतो ती... सुखन अनुभवताना मिळालेलं हे आणखी एक शहाणपण.

कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीमध्ये पूर्ण संच पूर्ण वेळ रंगमंचावर असतो आणि मुख्य म्हणजे, सादरीकरणाच्या अवकाशामध्ये पूर्ण वेळ एकरूप झालेला असतो. वाद्यवृंदांचे कार्यक्रम असतात ना- ज्यामध्ये नकलाकार स्टेजवर आला की वादक चहा प्यायला जातात- तसे इथे होत नाही. त्यामुळे बांधणी कशी एकसंध आणि सुबक असते. ध्वनीची व्यवस्था कणीदार आणि दाणेदार केलेली आहे. प्रकाशयोजनेमध्ये योग्य वेळी जे बदल होतात, त्यामध्ये श्रोते-प्रेक्षकांना ‘फोकस’ देण्याची दृष्टी असते. रंगमंचाच्या बाहेरून येणारे दोन फोको लाईट्‌स छताकडे पसरणारे होते.... त्या Reflected Light चा वापर करून प्रेक्षागृहातील प्रकाश कमी-अधिक केला जात होता. ओम आणि नचिकेतना जेव्हा सर्व प्रेक्षकांना रंगमंचाच्या स्पेसमध्ये ‘शरीक’ करून घ्यायचं असायचं, तेव्हा त्या दिव्यांची प्रभा तीव्र व्हायची... ओम त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी, त्याची नावे घेऊन संवाद साधत असतो. बहुधा मध्यंतरामध्ये त्याने पहिल्या रांगेत बसलेल्या ‘मान्यवरां’ची यादी बनवली असावी. कारण तो मलाही मधूनच- ‘तो अर्ज है, डॉक्टरसाब’ अशासारखी साद घालत होता.

हा कार्यक्रम ठाशीव असला, बांधीव असला तरी त्याची उत्स्फूर्तता जबरदस्त असते. स्टेजवरच्या सगळ्यांची ऊर्जा एकत्र येते; तिचा गुणाकार होतो... एक ‘संऊर्जा ’ तयार होते. ते रसायन अक्षरशः वेगळ्या जगात घेऊन जाणारे असते. उर्दू भाषेच्या घडणीचा काळ सहावे ते तेरावे शतक असा मानला जातो. लष्करी छावणीवर बोलली जाणारी ही भाषा, लोकांमध्ये पसरलेली ‘खडीबोली’... आणि त्यावर झालेले संस्कृत, प्राकृत, पर्शियन, अरेबिक अशा अनेक भाषांचे संस्कार. धार्मिक भेदावर उर्दूची चिरफाड सुरू झाली, ती दोन पद्धतीने. उर्दू लिहायची ‘नस्तलिक’ ही लेखनपद्धती आहे आणि देवनागरी लिपीतही ती लिहिता येते. दुसरा भाग उर्दूला एक तर संस्कृतप्रचुर करण्याचा किंवा पर्शियनप्रचुर करण्याचा... भाषेचा हेतू आहे संवाद. माणसांना जोडणं... आणि भाषा वापरली जाते ती संकुचित अस्मितेचे प्रतीक म्हणून.

आपल्या समाजामध्ये एका बाजूने जगव्यापकता येते आहे, तर दुसरीकडे आपण प्रादेशिक, धार्मिक, जातीय अस्मितांना नको तेवढे टोकदार करायला लागलो आहोत. खुद्द पाकिस्तानमध्येसुद्धा पंजाबी-सिंधी भाषेचे प्राबल्य असलेल्या मोठ्या भूभागामध्ये उर्दूला ‘मुजाहिरा’ची भाषा म्हणून हिणवले जाते. फाळणीच्या काळामध्ये भारतातून आलेल्या निर्वासितांची भाषा. म्हणजे तिथेही उर्दूचा संपूर्णपणे स्वीकार नाहीच. माणुसकीच्या व्यापक अस्मितेच्या आतमध्ये जेव्हा संकुचित अस्मिता नांदतात तेव्हा देवाण-घेवाण होते, अभिसरण होते आणि विकास होतो. सुखन्‌सारखे उपक्रम घडतात. कोणत्याही भाषेमध्ये माणसे वैश्विक भावनाच अनुभवतात. त्यांचे प्रेम, द्वेष, राग, लोभ सारं एकाच माणूस म्हणूनच्या पातळीवर असते... हे एकदा मान्य केलं की, तुम्ही प्रत्येक शेर जास्त enjoy करायला लागता. सुखन्‌चे वैशिष्ट्य हे आहे की, हा अनुभव आपल्याला सगळ्या कोंदट व्याख्यांमधून दूर काढतो. Nothing Really matters... तुमचं वय, भाषा, जात, स्तर... आस्वाद घ्या... आपलेपणाने आस्वाद घ्या... भाषेबरोबर येणारी संस्कृतीची समृद्धी अनुभवा... कव्वाली किंवा गझल गाताना प्राचीन भारतीय संगीतातली सरगम कशी पर्शियन घाटाच्या काठाशी लागतेय पाहा... सूफी संतांची आळवणी नामा-तुक्याच्या आर्ततेबरोबर कशी जुळतेय ते अनुभवा... गझलमधला विरह आणि विराणीमधली वेदना कशी एकाच नाळेची आहे पाहा.

तीन तासांच्या शेवटी आपल्या लक्षात येतं की- अरे, सगळेच आपले दोस्त आहेत... ज्यांना दुश्मन म्हणत होतो, त्यांना हमसफर करण्याची जादू मिळाली तर कळेल की- दोस्ती हा मुळातला स्वभाव आणि दुश्मनी म्हणजे त्यावर लटकणारं बांडगूळ... शब्द-सूर-ताल-लयीच्या एका चरमसीमेला ही मैफल जेव्हा पोहोचते, तेव्हा सारे नाट्यगृह एक झालेले असते... रंगमंच आणि प्रेक्षक एकत्वाच्या आनंदात डुंबत असतात... हात ताल धरत असतात, शरीर थिरकत असतं, विस्फारलेले डोळे अनुभव साठवत असतात... हळूहळू सारे शब्द मागे पडतात... उरते फक्त भावना... त्यानंतर उरते फक्त लय... त्यात एकरूप होणारे सर्व... आणि हे सारं जेव्हा अचानक शांत होतं तेव्हा जाणवतो... शांततेतला अनाहत नाद... प्रत्येक मनाला व्यापकतेचा विेश्वरूप अनुभव देणारा!

कार्यक्रमाचा सुगंध साठवत परतत होतो तर विचार आला- ‘पुरोगामी’ हा शब्द आता पुरेसा कलुषित झालाय आणि त्या शब्दाला ‘प्रतिगामी’ नावाचा विरोधी शब्द आहेच... त्यामुळे दोन्ही शब्द होतात Judgemental... सुखनसारख्या अनुभवांना आणि उपक्रमांना ‘विेश्वगामी’ का म्हणू नये? आपणच उभारलेल्या तट-बुरुजांच्या भिंती सपाट केल्याशिवाय व्यापक आकाश दिसणार कसं? वैचारिक विचारमंथनांमधून कधी काय परिवर्तन होईल तो वेगळा विषय... पण साहित्य, संगीत, कला यातला अनुभव मनस्वी, भावनिक आणि तरीही बुद्धीला तेज देणारा असेल तर कल्लोळातून जाणाऱ्या समाजासाठी किती ओशासक! घाईगर्दीने जगून घेण्याच्या नादामध्ये आपण अनुभवांच्या क्षणांना अंगावर घेतो, पण आतमध्ये भिजत नाही. ना त्या क्षणांचा आपलेपणाने स्वीकार करतो, ना त्यातलं सौंदर्य शोधतो.

अर्ज किया है. जल्दबाजीमें अब बस्‌, साँस ही ली जाती है जिंदगी कहाँ अब, फुरसतसे जी जाती है शुक्रिया, सुखन!... मनात उतरून शहाणं केलंत!

डॉ. आनंद नाडकर्णी

anandiph@gmail.com

Share on Social Media

दृष्टिक्षेप

भूतकाळात समकालीनत्व शोधणारा रंगकर्मी

शैलजा वाडीकर

कार्नाडांची नाटके वाचकाला जीवनाबाबत विचार करण्यासाठी अंतर्मुख करतात. आपल्या स्त्रीपात्रांमधून त्यांनी नव-स्त्री (new woman) ही संकल्पना मांडून समाजाला स्त्रीशक्तीची जाणीव करून दिलेली दिसून येते. त्यांच्या नाटकांच्या नायिका या अत्यंत पुरोगामी आणि प्रचलित अन्यायकारक परिस्थितीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आहेत. तथापि, स्वयंसिद्धा असलेल्या या स्त्रियादेखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या बळी ठरलेल्या दिसतात आणि त्यातून स्वस्वातंत्र्यासाठी स्त्रीला अजूनही कित्येक मैल प्रवास करावयाचा आहे, हे तर कार्नाड सुचवू इच्छित आहेत की काय- अशी जाणीव या कलाकृती वाचकांमध्ये जागृत करतात. ही नाटके जरी मिथक, इतिहास, लोककथा यांवर आधारित असली, तरी संदर्भ मात्र सतत वर्तमानकालीन आहे. विेशव्यापित्व हे सर्वच नाटकांचे वैशिष्ट्य असलेले आढळून येते. नाटकांचे विषय आणि त्यातील पात्रे ही स्थळ आणि काळ यांच्या परिसीमा ओलांडून जातात.

भारतीय रंगभूमीचा विचार आपणास दोन काळांच्या संदर्भाने करता येतो. स्वातंत्र्यपूर्व भारतीय रंगभूमी आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय रंगभूमी. स्वातंत्र्यपूर्व काळात रवीन्द्रनाथ टागोर, हरींद्रनाथ चटोपाध्याय, श्री.अरोबिंदो यांसारखे महान नाटककार असतानाही भारतीय रंगभूमीचा विशेष विकास होऊ शकला नाही. इंग्रजी भाषा हे त्यामागील सर्वांत महत्त्वाचे कारण होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात मात्र मराठीतील विजय तेंडुलकर, कन्नडमधील गिरीश कार्नाड, बंगालीतील बादल सरकार आणि हिंदीतील मोहन राकेश यांच्या इंग्रजीत भाषांतरित नाटकांमुळे भारतीय रंगभूमीला वैभवाचे दिवस प्राप्त झाले. कार्नाडांच्या नाटकांचा विचार आपणास मिथकावर आधारित नाटके, इतिहासावर आधारित नाटके, लोककथांवर आधारित नाटके आणि नवी नाटके या पद्धतीने करता येतो. ययाती, बळी, अग्निवर्षा ही मिथकावर; तुघलक, तलेदंड, टिपू सुलतानची स्वप्नं ही इतिहासावर; हयवदन, नागमंडल, फ्लॉवर्स ही लोककथांवर आधारित; तर वेडिंग अल्बम, भंगलेले बिंब, काटेसावरी आणि उणे पुरे शहर एक ही नवी नाटके होत.

कवी व्हायची इच्छा असणाऱ्या कार्नाडांनी लंडनला जात असताना ययाति हे नाटक लिहिले. यापूर्वीची खांडेकरांची ययाति ही कादंबरी, शिरवाडकरांचे ययाति आणि देवयानी हे नाटक यांपेक्षा कार्नाडांचे नाटक हे पूर्णतः वेगळे जाणवते. आपल्या एका भाषणात त्यांनी याबाबत उल्लेखही केलेला आहे. ते म्हणतात- खांडेकरांच्या कादंबरीत आणि शिरवाडकरांच्या नाटकात पात्रांपेक्षा घटनांना अधिक महत्त्व दिलेले दिसून येते. मी मात्र माझ्या कलाकृतीत पात्रांना अधिक महत्त्व दिलेले आहे. त्यातही माझे लक्ष पुरूची पत्नी चित्रलेखा हिच्यावर अधिक आहे. सर्वांनी पुरूचा विचार केला, ययातीचा विचार केला; पण चित्रलेखाचा विचार कुणीच नाही केला. ऐन तारुण्यात तिचा पती जख्ख म्हातारा झाला; आता तिचे पुढे काय? त्यामुळे हा विचार लक्षात घेऊन तिच्या दृष्टिकोनातून मी हे नाटक लिहिले आहे.

खांडेकरांचा ययाति- इच्छा ही तिच्या पूर्ततेने संपत नाही, हे लक्षात येऊन पुरूला त्याचे तारुण्य आणि राज्य परत करतो; तर कार्नाडांचा ययाति- चित्रलेखाने त्याला दिलेल्या ‘माझ्या नवऱ्याचे तारुण्य जर तुम्हाला मिळालेले आहे, तर भरतवंश पुढे चालविण्याची जबाबदारी आता तुमची आहे आणि त्यामुळे माझ्यासोबत आता कुठले नाते ठेवायचे याचा विचार करा’ या आव्हानाने जागृत होतो. नवजीवनाच्या भयानकतेने नखशिखांत विचलित होऊन तो पुरूला त्याचे तारुण्य आणि राज्य परत करतो. नव्या जीवनातील जबाबदारीची जाणीव त्याच्याकरता अंजन ठरून त्याचे डोळे खाड्‌कन उघडण्यास कारणीभूत ठरते.

तसेच कार्नाडांनीच सांगितल्याप्रमाणे या काळात नुकत्याच वाचलेल्या कामू आणि सार्त्र यांच्या अस्तित्ववादाच्या सिद्धांताचा (existence precedes essence) त्यांच्यावरील परिणाम इथे स्पष्टपणे दिसून येतो. जबाबदारीची जाणीव (To be is to live... to be live is to be responsible, and to be responsible is to be moral) माणसाला नीतिमत्तेकडे घेऊन जाते, असा संदेश वाचकांना सरतेशेवटी मिळतो.

देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्याद्वारे रंगवलेला वर्ग- जाणिवेचा अहंकार, तसेच स्त्री-विरुद्ध-स्त्री हा संघर्ष, त्या दोघींशी प्रेमाची बतावणी करून लग्न करण्यामागील ययातीचा राजकीय स्वार्थ, एका दगडात दोन पक्षी मारण्याची पुरुषी प्रवृत्ती, स्वर्णलता या मुलीवर तिच्या पतीने संशय घेतल्याने तिच्यावर झालेला अन्याय- या सर्व विषयांभोवती नाटकाचे कथानक फिरते. नाटकाच्या केंद्रस्थानी असलेली देवयानी, शर्मिष्ठा, चित्रलेखा, स्वर्णलता ही स्त्रीपात्रे पुरुषपात्रांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण, बलशाली असली- परिस्थितीला आव्हान देणारी असली, तरी पुरुषप्रधान संस्कृतीची ती बळी ठरलेली दिसून येतात. पुरू-ययाति नातेसंबंधांवरून वडिलधाऱ्या व्यक्ती कधी कधी तरुण पिढीचे भविष्य उद्‌ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरतात, हेही या नाटकातून लक्षात येते. नाटक लिहित असताना कार्नाडांची मन:स्थिती, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना लंडनला जाण्यासाठी केलेला विरोध आणि त्यांनी स्वतः इंडियन लिटरेचरमध्ये दिलेले मत लक्षात घेता, हे नाटक त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडले गेलेले आहे, हे स्पष्ट होते.

या सर्व बाबी विचारात घेता, पुरातन काळातील मिथकावर आधारित असलेल्या नाटकाचे समकालीनत्व अगदी स्पष्ट चित्रित होते. हे सर्व आयाम पाहता, ययाति हे पहिलेवाहिलेच नाटक नव-नाटककार म्हणून कार्नाडांची अतुलनीय ताकद आणि क्षमता सिद्ध करून जाते.

ययातीप्रमाणेच पुन्हा स्त्रीपात्रे केंद्रस्थानी ठेवून जैन मिथकावर आधारित असलेले बळी हे नाटक हिंसा आणि अहिंसा यातील द्वंद्व, स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्री विरुद्ध स्त्री, सासू-सून संबंधांत सासूला असलेला श्रेठत्व अहंकार, स्त्री-पुरुष संबंधांत मनाची पवित्रता या विषयांना स्पर्श करते. राणी अम्रितमती ज्या सहजतेने स्वतःचा माहुताशी आलेला संबंध राजाला सांगते, त्यावरून स्त्रीपुरुष संबंधांची एक वेगळीच मांडणी कार्नाड इथे करून जातात. राणीला शुद्ध करून घेण्यासाठी त्याच्या आईने सुचविलेला कणकीच्या कोंबड्याचा बळी देण्याचा पर्याय राजा स्वतः स्वीकारतो. आईच्या समाधानाकरिता आपल्या पत्नीनेही तो स्वीकारावा, अशी गळ घालतो. परंतु हिंसेसंबंधीचा विचार मनात येणे हे खऱ्या हिंसेपेक्षाही भयानक आहे (intended violence is more dangerous than actual violence), असा विचार अम्रितमती करते आणि आपल्या जैन धर्माच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी राजाच्या परोक्ष कणकीच्या कोंबड्याऐवजी स्वतःच्याच प्राणाचे बलिदान देते. जैन मिथकाचा आधार घेत नाटककार या कलाकृतीद्वारे व्यक्तीच्या कुठल्याही नातेसंबंधांत, वृत्ती आणि कृतीत ‘मनाची पवित्रता’ अधिक महत्त्वाची असते याचे भान वाचकांना करून देते.

मिथक-परंपरेतील कार्नाडांचे अग्निवर्षा हे नाटक महाभारतातील यावक्रीच्या मिथकाचा समकालीन अन्वयार्थ पुढे मांडत असतांना ज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने केलेला वापर जगाच्या विनाशाला कसा कारणीभूत ठरतो, हे स्पष्ट करते. यात अग्नी हे कर्मठ ब्राह्मण समाजाचे, तर वर्षा म्हणजेच पाऊस हे परोपकारी आदिवासी समाजाचे प्रतीक आहे, असे दिसून येते. बारा वर्षांनी पडलेला पाऊस हा अर्वसू याने आरंभिलेल्या यज्ञामुळे नव्हे तर पर्वसू आणि नित्तेलाई यांनी आपल्या प्रेमाच्या दिलेल्या बलिदानामुळे पडतो. महाभारताच्या प्राचीन काळापासून आजतागायतचा मानवसंस्कृतीचा इतिहास, सनातनी वृत्ती, कर्मठपणा, अहंकार, श्रेठत्ववाद या सर्व गोष्टी मानवी जीवनातील दु:खाला तर प्रेम आणि त्याग ह्या उद्धाराला प्रेरक ठरतात, या शाश्वत वास्तवाची जाणीव हे नाटक करून देते.

हयवदन आणि नागमंडल ही लोककथेवर आधारित दोन्ही नाटके स्त्री-पुरुष संबंध, स्त्रीचे समाजातील स्थान, पुरुषप्रधान संस्कृती याबाबतच्या समस्यांची चर्चा करतात. रंजक अशा लोककथांच्या माध्यमातून गिरीश कार्नाड पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीची सतत होणारी फरफट उघड करतात आणि कथानकाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या पद्मिनी व राणी या व्यक्तिरेखा वाचकांच्या मनात स्वत:चे कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात.

संपूर्ण पुरुषाच्या शोधात असलेली हयवदनमधील पद्मिनी देवीच्या आशीर्वादाने आपला ब्राह्मण नवरा देवदत्त आणि त्याचा लोहार मित्र कपिल यांचे धड व शिर यांची अदलाबदली करते. परंतु झालेले बदल हे कायमस्वरूपी न राहिल्याने आपली संपूर्ण पुरुष ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन ती सती जाते. तिची ही इच्छा नाटकाच्या शेवटी तिच्या मुलाद्वारे आणि हयवदनचे रूपांतर संपूर्ण घोड्यात होऊन मरणोत्तर पूर्ण होते.

नागमंडलमधील निष्पाप मुलगी ते चतुर स्त्री हा राणीचा प्रवास- पुरुषप्रधान समाजात स्त्रीला नकळत घडलेल्या व्यभिचारासाठीही अतिशय कठोर शिक्षा तर पुरुषाला उघड व्यभिचारासाठी संपूर्ण स्वातंत्र्य या सामाजिक धारणेवर कार्नाडांनी केलेली तीव्र टीका यातून त्यांची स्त्रीवादी भूमिका स्पष्ट करतो. अपन्ना आणि नागन्ना ही पात्रे पुरुषाची आपल्या पत्नीसाठी परस्परविरोधी असलेली दोन रूपे सादर करतात. आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी राणीने गाव-पंचायतीसमोर दिलेले नागदिव्य हे पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्रीवरील शतकानुशतकाच्या अन्यायाची जाणीव करून देते. आयुष्यातील कटू अनुभवाने अतिशय बुद्धिमान होऊन नागाला त्याचा अधिकार मिळवून देण्याकरिता त्याच्या मुलाकरवीच त्याचे अंतिम संस्कार करण्यास आपल्या नवऱ्यास राजी करणाऱ्या राणीचे पात्र वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडते.

धर्म आणि कामवासना याबाबत मानवी मनात कायम सुरू असणारे द्वंद्व आणि त्याबाबत निवडीचा निर्णय घेताना होणारी जीवघेणी वेदना या कथानकावर आधारित फ्लॉवर्स हे कार्नाडांचे पुरुष केंद्रस्थानी असलेले एकमेव नाटक होय. God must know because I simply cannot live on his terms आणि Because of the injustice I done to the two women I loved या भूमिकेतून विरन्नाने केलेल्या आत्महत्येतून एका संवेदनशील पुरुषाचे व्यक्तिचित्र अधोरेखित होते. नाटक जरी कर्नाटकातील चित्रदुर्गच्या लोककथेवर आधारित असले तरी विरन्नाचे पात्र मात्र स्थळ-काळाच्या मर्यादा पार करून आपले समकालीनत्व सिद्ध करते.

इतिहासावर आधारित असलेल्या तुघलक आणि तलेदंड या नाटकांमधून कार्नाडांनी वर्तमानातील समस्यांचे चित्रण केलेले दिसून येते. राजा तुघलकच्या माध्यमातून त्यांनी जवाहरलाल नेहरू यांचा आदर्शवाद हा फोल कसा होता, यावर प्रकाश टाकला आहे; तर तलेदंड या नाटकाद्वारे आदर्शवाद वास्तवात येऊ शकत नाही, या कटू सत्याची प्रचीती प्रत्ययास आणून दिलेली आहे. आठशे वर्षांत कुठल्याही समस्या सुटलेल्या नाहीत. असे वाटते की, आपण जिथून सुरुवात केली होती, तिथेच आज परत आलो आहोत (It seems 800 years have solved no problems. We are back exactly where we started) हे कार्नाडांनी या नाटकानंतर केलेले विधान त्यांनी हे नाटक जेव्हा लिहिले, त्या तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात अत्यंत मार्मिक वाटते. टिपू सुलतानची स्वप्ने ही कलाकृती भारतात राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार प्रथमतः करणाऱ्या राजा टिपूची प्रतिमा वाचकांना देऊन जाते.

भूतकाळाचा आधार न घेता लिहिलेले अलीकडच्या काळातील वेडिंग अल्बम हे नाटक आधुनिक भारतीय समाजातील टेक्नोक्रेझी पिढी, सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील मुली व स्त्रिया, कुटुंबातील अत्यंत गुंतागुंतीचे स्त्री-पुरुष संबंध, अभारतीयांचे भारतीय संस्कृतीबाबतचे मत, विवाह-संस्था याबाबतचे चित्रण येते. नाटक पाहत असताना आपण अल्बममधील भारतीय संस्कृतीचे फोटो एकामागून एक उलटत जात आहोत की काय, असा भास हे नाटक करून देते. ‘पवित्र’ संस्कृतीच्या नावाखाली आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चाललेली आहे याचे भान येऊन वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही आणि कार्नाड हे ‘ॲव्हागार्द’ नाटककार आहेत, हे पुन्हा एकवार सिद्ध होते.

कौटुंबिक संबंधांतील कमालीची गुंतागुंत मांडणाऱ्या वेडिंग अल्बम या कलाकृतीनंतर कार्नाड भंगलेले बिंब या नाटकात लेखनक्षेत्रातील साहित्यचौर्य, सर्जनात्मक लेखनाबाबत असलेली देशीवादाची भूमिका, स्त्री-विरुद्ध स्त्री, कादंबरी फॉर्मचे साहित्यक्षेत्रातील श्रेठत्व इत्यादी समस्यांची मांडणी करतात. सर्जनात्मक लेखनासाठी मातृभाषेचा पुरस्कार करणाऱ्या देशीवादाला इथे त्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलेले दिसते. व्यक्तीच्या मनात लेखन करत असताना ज्या भाषेत विचार अगदी सहजरीत्या येतात त्या भाषेत लिहावे, असा संकेत हे नाटक वाचकास देते.

मिथक, इतिहास, लोककथा याद्वारे आकृष्ट करून प्रेक्षकांना वर्तमानाचे भान देणारे काटेसावरी या नाटकात अभारतीय भूमीचे दर्शन कार्नाड घडवतात. लंडन घटनास्थळ असलेले हे त्यांचे एकमेव नाटक बहीण- भावाच्या अनैतिक संबंधांवर चर्चा करून वाचकांच्या संवेदनशीलतेला जबरदस्त धक्का देते. त्याचबरोबर लंडनमधील वर्गवाद, भारतातील जातीयवाद, स्त्री-पुरुष संबंधांत स्त्रीची असलेली भावनिक गुंतवणूक आणि पुरुषाचा बेपर्वा स्वभाव याबाबतची कार्नाडांची परखड भूमिका नाटकात स्पष्ट होत जाते. यामिनी-सतीश या बहीण-भावाचे नाते विचारांसाठी अनेक शक्यता देऊन वाचकांना अत्यंत अस्वस्थ अवस्थेत सोडते. तर, उणे पुरे शहर एक हे अगदीच अलीकडील नाटक मेट्रोशहरातील भयानक समस्यांचे जिवंत चित्र वाचकांना सुपूर्द करते. कार्नाडांची नाटके वाचकाला जीवनाबाबत विचार करण्यासाठी अंतर्मुख करतात. आपल्या स्त्रीपात्रांमधून त्यांनी नव-स्त्री (new woman) ही संकल्पना मांडून समाजाला स्त्रीशक्तीची जाणीव करून दिलेली दिसून येते. त्यांच्या नाटकांच्या नायिका या अत्यंत पुरोगामी आणि प्रचलित अन्यायकारक परिस्थितीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आहेत. तथापि, स्वयंसिद्धा असलेल्या या स्त्रियादेखील पुरुषप्रधान संस्कृतीच्या बळी ठरलेल्या दिसतात आणि त्यातून स्वस्वातंत्र्यासाठी स्त्रीला अजूनही कित्येक मैल प्रवास करावयाचा आहे, हे तर कार्नाड सुचवू इच्छित आहेत की काय- अशी जाणीव या कलाकृती वाचकांमध्ये जागृत करतात.

ही नाटके जरी मिथक, इतिहास, लोककथा यांवर आधारित असली, तरी संदर्भ मात्र सतत वर्तमानकालीन आहे. विेशव्यापित्व हे सर्वच नाटकांचे वैशिष्ट्य असलेले आढळून येते. नाटकांचे विषय आणि त्यातील पात्रे ही स्थळ आणि काळ यांच्या परिसीमा ओलांडून जातात. समकालीन असलेल्या या नाटकांची नाळ ही अभिजात (classical) आणि लोक रंगभूमीशी पक्की जोडलेली दिसून येते. टी.एस. इलिएटप्रणीत- परंपरेची जाण (sense of tradition) आणि (presence of the past) इतिहासाचे (भूतकाळाचे) समकालीनत्व (वर्तमानता) या तत्त्वांची प्रचिती वारंवार आल्याशिवाय राहत नाही. नोबेल पुरस्कारविजेते रवीन्द्रनाथ टागोर, व्ही.एस. नायपॉल यांच्या कलाकृतींबाबतची कार्नाडांची परखड भूमिका, प्रचलित सरकारच्या कार्यप्रणालीवरील त्यांची मते वास्तविकतेला भिडण्याच्या त्यांच्या निर्भीड प्रवृत्तीचे यथार्थ दर्शन देतात. जीवनाशी अत्यंत प्रामाणिक असलेला माणूस त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून आपल्याही वाट्याला आला, हे आपले भाग्य!

लौकिक दृष्ट्या गिरीश कार्नाड आज आपल्यासोबत नाहीत; परंतु जीवनाच्या योग्य वाटचालीसाठी त्यांचे विचार पथदर्शकाचे कार्य कायम करत राहणार आहेत. त्यांच्या कोणत्याही नाटकाचे वाचन दर वेळी वाचकाला एक नवी दृष्टी देऊन जाणारे आहे. रंगभूमी, दिग्दर्शन, सिने- अभिनेता, सामाजिक-राजकीय कार्यकर्ता या सर्वच भूमिकांमधून त्यांनी दिलेल्या अद्वितीय योगदानाची शिदोरी ही आपणास पुरून उरणारी आहे. त्यामुळे ते सतत आपल्यासोबतच आहेत. माणसातील माणुसकीला जागृत करणाऱ्या त्या महान रंगकर्मीस विनम्र अभिवादन!

डॉ. शैलजा भुजंगराव वाडीकर
प्राध्यापक, इंग्रजी विभाग, भाषा, वाङ्‌मय, आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड.

Share on Social Media

नवे पुस्तक

चळवळीतील प्रत्येकासाठी पुस्तक : सामाजिक समतेचा प्रवाह

दत्तप्रसाद दाभोळकर

आम्ही आंबेडकरांचा ‘ॲनिहिलेशन्‌ ऑफ कास्ट’ हा ग्रंथ समजून घेतला नाही ही ऐतिहासिक चूक आहे, असे मधु लिमये म्हणालेत. असेच काही भारतरत्न आंबेडकर आणि पंडित नेहरू या महामानवांबाबत झालंय का? त्यांनी विवेकानंद समजावून घ्यावयास हवे होते. विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेच्या एक वर्ष आधी म्हणजे 20 सप्टेंबर 1892 रोजी आणि सर्वधर्म परिषदेनंतर एक वर्षाने नोव्हेंबर 1894 अशी दोन पत्रे लिहिलीत. त्यांनी या पत्रांत या देशात समतेची लढाई लढणाऱ्यांना एक गोष्ट सांगितली आहे.

‘या देशातील धर्मांतरे मुसलमान आणि ख्रिश्चन यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत. ते आपले वंचित, पददलित भाऊ आहेत. दलितांबद्दलची कणव आपल्या मनात आहे, त्यांच्याबद्दल जी जबाबदारी आपल्या मनात आहे; तीच या धर्मांतरित मुसलमान व ख्रिश्चन यांच्याबद्दल आहे. ते सारे अधिक नेमके आणि भेदत,’ असे त्यांनी 29 मार्च 1894 रोजी केरळचे धर्मगुरू सर रेव्हरंड आर ह्यूम यांना पत्र पाठवून कळवले त्यांनी लिहिले, ‘तू हिंदूंना कॅथॉलिक केले नाहीस, त्यांना आपापल्या जातीत कॅथॉलिक केलयंस.’ हे लक्षात घेतले असते, तर दलितांना दिलेले आरक्षण धर्मांतरित मुसलमान आणि ख्रिश्चन यांनाही देण्यात आले असते.

मात्र नेहरूंना फाळणीनंतर या देशात राहिलेल्या मुसलमानांच्या मनातील असुरक्षिततेची भावना समजलेली होती. दि.7 ऑगस्ट 1947 रोजी राजेंद्रप्रसादांनी नेहरूंना पत्र पाठवून ‘गोहत्याबंदी करावयास हवी, बापूंचे मत असेच आहे’ असे कळवले. नेहरूंनी त्यांना लगेच पत्र पाठवून स्पष्टपणे सांगितले, ‘बापूंना गाईचे रक्षण व्हावे असे वाटते; त्यांना तसा कायदा नकोय. आज ही मागणी करणाऱ्या लोकांना हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करून पुढे हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय. त्यांना भारताला पाकिस्तानच्या मार्गाने न्यायचे आहे.’ नेहरू याबाबत फार सजग होते. दि.2 एप्रिल 1955 रोजी शेठ गोविंददास यांनी गोहत्याबंदीचा कायदा व्हावा म्हणून लोकसभेत विधेयक आणले. अनेकांचा त्याला छुपा वा उघड पाठिंबा होता. नेहरूंनी त्याला फार प्रभावीपणे विरोध केला, पण नेहरू तिथेच थांबले नाहीत. भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले, ‘असा काही कायदा या देशात होणार असेल, तर मी या देशाचा पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळू शकणार नाही.’ पुढे सत्यसाईबाबांचे पाय जाहीरपणे धुणारे आणि त्यांनी विज्ञानाचे सारे नियम झुगारून, शून्यातून निर्माण केलेले क्रमांक असलेले स्विसमेड घड्याळ हातात घालणारे काँग्रेसचे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात गोहत्याबंदीचा कायदा झाला!

त्यानंतर चंद्रास्वामींचे शिष्य वा मित्र असलेले नरसिंह राव या देशाचे पंतप्रधान असताना बाबरी मशीद उद्‌ध्वस्त झाली, केंद्र सरकार अगदी शांत बसले. त्या उद्‌ध्वस्त मशिदीच्या परिसरात बसवलेल्या रामलल्लाची पूजा गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केली. अस्वस्थ करून, रस्त्यावर आणून दलित आणि ओबीसी मुसलमानांना चिरडण्यात आले, त्यानंतर मुंबईत अमानुष कत्तल झाली. काँग्रेसचे सरकार असताना श्रीकृष्ण कमिशनचा अहवालही बाहेर येऊ दिला नाही. या व अशा अनेक घटनांमधून तुम्ही असहाय आहात, अगतिक आहात; या देशातील दुय्यम नागरिक आहात, हे मुसलमानांच्या मनावर बिंबवण्यात आले. आजची ही भयावह परिस्थिती प्रा.बेन्नूर यांनी ‘इस्लामी तत्त्वज्ञान आणि मुस्लिम’ या ग्रंथात मांडली.

अत्यंत उद्विग्न होऊन त्यांनी या देशातील मुसलमानांची सद्य:स्थिती एका वाक्यात स्पष्ट केली आहे. ‘इतिहासाच्या या टप्प्यावर या देशात मुसलमान असणे हा गुन्हा होऊ पाहत आहे. या देशातील संवेदनशील मनाच्या मुसलमानांसमोर आता दोनच पर्याय आहेत. एक- त्यांनी इस्लामचा त्याग करणे किंवा दुसरा- इस्लामच्या मानवतावादी व उदारमतादी प्रेरणांचा पाठपुरावा करणे. माणुसकीची भूमिका घेऊन जगणाऱ्या मुसलमानांना एकाच वेळी दोन पातळ्यांवर लढावे लागेल. पहिली पातळी ही कट्टरवादी, अतिरेकी, मूलतत्त्ववादी मुस्लिमांची आहे. त्यांना उदारमतवादी सहिष्णु इस्लाम नको आहे. इस्लामची तशी व्याख्या करणे त्यांच्या दृष्टीने इस्लामशी विद्रोह करणे आहे-’ प्रा.बेन्नूर आणखी एक गोष्ट या ग्रंथातून मुसलमानांच्या लक्षात आणून देतात.

कुरआनचा अर्थ वेगवेगळ्या देशांतील वेगवेगळ्या विचारांच्या, पंथांच्या मुस्लिम धर्मपंडितांनी वेगवेगळ्या पद्धतीने कसा लावला आहे, हे त्यांच्याच ग्रंथांतील अनेक संदर्भ देऊन ते स्पष्ट करतात. त्यापुढे जाऊन असे वेगवेगळे अर्थ प्रत्येक धर्मातील आद्यग्रंथाचे लावण्यात आलेत, हे लक्षात आणून देतात. उदा.- श्रीमद्‌भगवद्‌गीतेची शंभरहून अधिक भाष्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वेदांचा अर्थ आर्यसमाजी, सनातनी आणि तुकाराम वेगळ्या पद्धतीने लावतात. त्यापैकी जो अर्थ वर्तमानातील समाजासाठी गरजेचा असतो, त्याचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे असते. पण होते उलटेच. प्रा.बेन्नूरांनी विवकानंद अभ्यासले आहेत, असे त्यांचे साहित्य अभ्यासल्यावर वाटत नाही. पण त्यांची मांडणी बरीचशी विवेकानंदांसारखी आहे. विवेकानंदांनी दोन गोष्टी सांगितल्या.

पहिली अट- ‘धर्माचा आधार घेऊन धर्माच्या अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल, कारण माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे असतात. बहुसंख्य माणसांना ते त्यामुळे हवे असतात. तुम्ही त्यावर आघात केलात, तर लोक तुमच्यापासून दूर जातील.’

दुसरी गोष्ट म्हणजे- ‘ग्रंथ हे धर्माचे आधार नाहीत, तर धर्म हे ग्रंथाचे आधार आहेत, हे समजावून द्यावे लागेल. काळाच्या एका विशिष्ट चौकटीत धर्मातील शाश्वत सत्य सांगण्यासाठी ग्रंथ निर्माण झाले. काळाची चौकट बदलल्यावर त्या चौकटीत ती शाश्वत सत्ये जनसामान्यांना समजावून सांगण्यासाठी धर्मग्रंथांनी बदलले पाहिजे.’ परिवर्तनवादी चळवळीने प्रा.फकरुद्दीन बेन्नूर यांना समजावून घेण्याचा प्रयत्न केला नाही, ही एक ऐतिहासिक चूक आहे, असे मला वाटते. हे जे आपण केले, त्याला एक कारण आहे.

हमीद दलवार्इंच्या विचारांना आणि चळवळींना छेद देत बेन्नूर उभे आहेत. दलवार्इंचा मुस्लिम धर्मसुधारणांचा विचार हा प्रामाणिक आहे, तळमळीतून आणि अंत:करणापासून आलेला आहे, हे प्रा.बेन्नूरांना पूर्णपणे मान्य होते. मात्र भारतासारख्या विविधतापूर्ण समाजव्यवस्थेत शोषणाचे विविध स्तर उपस्थित असताना असुरक्षित भावनेने ग्रासलेल्या धार्मिक अल्पसंख्य समुदायाशी संवाद साधताना वेगळी रणनीती शोधणे गरजेचे आहे. असुरक्षितेच्या परिस्थितीत तो परत धर्मात आपली सुरक्षितता शोधतो आणि धार्मिक कट्टरतेच्या जाळ्यात ओढला जातो. या वादावर मला कोणतेही भाष्य करावयाचे नाही. माझा तेवढा अभ्यास नाही. पण तरीही माझ्या मनात आज दोन-तीन प्रश्न येतात. अनेक परिवर्तनवादी व्यक्तींच्या मनातही ते असतील-

 1. हिंदूंमधील धर्मसुधारणेची जी चळवळ लोकहितवादी, आगरकर- अगदी महात्मा फुले यांनीसुद्धा काही प्रमाणात- जी चालवली, ती उच्चवर्णीयांच्या कालबाह्य रूढी-परंपरांना आव्हान देत उभी होती. बहुजन समाजाच्या धार्मिक आधारांवर ते कालबाह्य असले तरी आघात झाले नाहीत. जत्रेत हजारोंच्या संख्येने मारल्या जाणाऱ्या मेंढरांवर लोकहितवादी, आगरकर अजिबात काही बोलले नाहीत.

 2. मुस्लिम धर्मातील कालबाह्य अघोरी प्रथांवर आपण आघात करतो, तो दलित-ओबीसी मुसलमानांच्या भावनिक आधारावर करतो. ते कट्टरपंथीयांच्या जवळ जातात, त्यांच्या जाळ्यात अडकतात- असे काही असेल का?

 3. दलवार्इंनी प्रश्नाची मांडणी केली, त्यानंतरची परिस्थिती फार बदलली आहे. शंकरराव चव्हाणांचा गोहत्याबंदीचा कायदा, बाबरी मशिदीचा विध्वंस, त्यानंतर उत्तर प्रदेश, मुंबई, गुजरात येथे झालेल्या अमानुष अशा दंगली, दडपला जाणारा श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल... यामुळे असहाय, अगतिक, भयग्रस्त असा मुसलमान समाज भारतात आहे. आज हमीद दलवार्इंना आपली मांडणी नव्याने करावी, असे वाटले असते का? हे व अशा स्वरूपाचे प्रश्न आपणा सर्वांच्याच मनात आहेत. अंधारात चाचपडत आपण रचना शोधतोय. अशा वेळी आपणाला फार थोडे पटणारे किंवा थोडेफार न पटणारे, अस्वस्थ करणारे विचारही अभ्यासले पाहिजेत. प्रा.फकरुद्दीन बेन्नूर स्मृतिग्रंथ हा असा ऐवज आहे.

दि.17 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले. तसे ते थोडेफार माहीत होते ते त्यांना कोल्हापूरचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार मिळाला म्हणून. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेने 2010 मध्ये पुरस्कार देऊन गौरवलेला ‘हिंदुत्व, मुस्लिम आणि वास्तव’ हा ग्रंथही आपण वाचलेला असतो. पण मला वाटते, आपण त्याच्या पलीकडे गेलो नाही. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळी दुभंगलेल्या अवस्थेत आहेत का? बेन्नूरसरांचे बहुतेक सर्व लिखाण ‘परिवर्तनाचा वाटसरू’मध्ये प्रसिद्ध झाले. हे दोन्ही अंक वाचणारे परिवर्तनवादी कमीच! थोडा वेगळा असलेला परिवर्तनवादी उपहासाने नव्हे, पण उपेक्षेने संपवण्याचा प्रकार असे काही होतंय का?

असो. पुस्तक 332 पानी आहे. प्रत्येक पान वाचनीय आणि अस्वस्थ होऊन नवा विचार करावयास भाग पाडणारे आहे. एकूण 29 लेखांचे हे पुस्तक तीन विभागांत विभागण्यात आले आहे.

पहिल्या विभागात महाराष्ट्रातील मुसलमान जीवनाचा, येथील सूफी परंपरेचा शोध घेतलेला आहे. दुसऱ्या विभागात वैचारिक परिघ आणखी मोठा करून भारताच्या संदर्भात मुस्लिम जीवनाचा वेध घेतला आहे. तिसरा विभाग प्रा.बेन्नूर यांच्या जीवनाचा सर्वांगाने आढावा घेतो. यात त्यांच्यावरील निवडक लेख आणि त्यांचेही निवडक साहित्य आहे. पहिल्या विभागात राम पुनियानी, राणा सफबी, रणसुंभे, अब्दुल कादर मुकादम, फिरोज अश्रफ, असगरअली इंजिनिअर यांचे अभ्यासपूर्ण, अस्वस्थ करणारे लेख आहेत. दुसऱ्या विभागातील लेख मला अधिक माहितीपूर्ण व विचारांना चालना देणारे वाटले. त्यातील सर्वांत महत्त्वाचा आहे स्मृतिशेष यशवंत सुमंत यांचा लेख. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत-

 1. अस्मितेच्या राजकारणात अडकून पडायला नको असल्यास त्याची बौद्धिक बाजूही अधोरेखित होणे आवश्यक आहे. तशी ती न झाल्यास फुले-आंबेडकरांचे विचारसंचित नवब्राह्मणवादात बंदिस्त होण्याचा धोका आहे. तो धोका टाळण्यासाठी बहुजनलक्ष्यी राष्ट्रवादाची सूत्ररूपाने मांडणी करणे आवश्यक आहे.

 2. म.फुले यांनी हिंदुत्वप्रधान राष्ट्रवादाप्रमाणेच काँग्रेसप्रणित राष्ट्रवादाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. या दोन्हींमधील वर्मावर बोट ठेवून त्यांनी ‘स्त्री-शूद्रातिशूद्र’ घटकांच्या एकजुटीवर आधारित व ‘एकमय राष्ट्रा’ची संकल्पना पुढे मांडली.

 3. म.फुलेंच्या पश्चात त्यांच्या बहुजनलक्ष्यी राष्ट्रवादाचे मर्म महर्षी वि.रा.शिंदे यांनी जाणले आणि राष्ट्रीय चळवळीच्या ब्राह्मणी व उच्चवर्गीय नेतृत्वाची परखड समीक्षा करत असतानाच तिच्याशी बहुजन समाजाने फटकून राहू नये, उलट त्याचे धुरिणत्व आपल्याकडे घ्यावे आणि वसाहतवाद व ब्राह्मणशाहीचा मुकाबला करावा, ही भूमिका मांडली. पण शिंदेंनाच ‘ब्राह्मणी’ ठरवून त्यांच्या बहुजनवादाची वासलात लावली आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या आर्यत्वाचा, क्षत्रियत्वाचा, उच्चकुलीनत्वाचा दावा आग्रहाने मांडत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपले हिंदुत्वभान जपले.

 4. काँग्रेस आणि हिंदू राष्ट्रवाद्यांना सारख्याच अंतरावर ठेवून फुलेप्रणीत व्यापक बहुजनलक्ष्यी राष्ट्रवादाची दलित-मुक्तीच्या संदर्भात आंबेडकरांनी केलेली पुनर्मांडणी आपण समजावून घेतली नाही, ही फार मोठी चूक आहे.

 5. वास्तवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय किंवा हिंदू महासभा काय- या संघटना सर्वसामान्य हिंदूंचे प्रतिनिधित्व करतच नव्हत्या, पण त्यांनी त्यांना गृहीत धरले होते. अगदी हीच गोष्ट मुस्लिम लीगच्या बाबतीतही खरी आहे. हे दोन्ही जमातवाद परस्परसापेक्ष असल्याने परस्परांना संपवण्याची भाषा बोलत असताना परस्परांना पूरकही होते. त्यामुळे भारताची फाळणी झाली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाकिस्तानच्या निर्मितीमुळे हिंदुत्वाचे राजकीय प्रयोजन भारतात अप्रस्तुत ठरले.

 6. हिंदुत्ववादाच्या विरोधात पिछड्या जातींना उभे करून- म्हणजेच जमातवादाच्या विरोधात जातवाद उभा करून हिंदुत्वाचा राजकीय सामना करता येईल, अशी आशा बरीच पुरोगामी बुद्धिजीवी मंडळी बाळगून होती. या गृहीतातील चुका मी यापुढे सांगणार आहे.

 7. आधुनिकता ही एक मूल्यदृष्टी आहे. ती एक निव्वळ भौतिक अवस्था नाही; पण नकळत तशी ती बनते, तेव्हा ती विविक्षित हितसंबंधांची प्रवृत्ती व पुरस्कर्ती बनते. तशी ती बनताच तिचे ‘आधुनिकतावादा’त रूपांतर होते. हा ‘आधुनिकतावादी धर्मनिरपेक्षवाद’ माणसाला आधुनिक दृष्टी देण्यापेक्षा त्याला आधुनिक दृष्टीच्या विरोधात उभा करतो. म्हणूनच अशा धर्मनिरपेक्षवादाचा प्रतिवाद म्हणून धर्मवाद व धर्मांधता उभी राहते... म्हणून रूढ धर्मनिरपेक्ष आधुनिक दृष्टिकोन इस्लामी धर्मवाद वा हिंदुत्ववादी धर्मवाद व राष्ट्रवाद रोखण्याऐवजी वाढवतो, बळकट करतो; असे काही आहे का?

 8. महात्मा गांधींच्या हत्येमुळे हिंदू राष्ट्राची, हिंदू राष्ट्रवादाची अधिमान्यता रसातळाला गेली. स्वतंत्र भारताने धर्मनिरपेक्ष राज्याचा पुरस्कार केला. नेहरूंनी फार कल्पकतेने व कणखरपणे या धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे संगोपन केले. या नेहरूयुगीन धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाला पहिला छेद गेला तो 1967 ते 1977 या दशकात. या दशकात बिगरकाँग्रेसवादाचे नवे पर्व सुरू झाले. डॉ.लोहियांनी सांगितलेली बिगरकाँग्रेसवादाची निर्वाचन नीती संसदीय गणिताचा भाग म्हणून बरोबर होती, पण त्याचे सामाजिक परिणाम भयंकर आहेत. (यशवंत सुमंत यांचा हा मुद्दा मला पटतो आणि पूर्णपणे बरोबर वाटतो. मी संघ-जनसंघाचे चाणक्य असलेले आदरणीय नानाजी देशमुखांच्या विस्तृत मुलाखती घेतल्या होत्या. त्यात नानाजींनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय, ‘‘जनसंघाला भारतीय जनमानस ‘गांधींचा हत्यारा’ समजत होते आणि गांधीजींच्या हत्याराला ते जवळ उभे करणार नाहीत, हे माझ्या लक्षात आले होते. फार कल्पकतेने मी लोहिया आणि जयप्रकाश यांच्या जवळ गेलो. त्यांनी जनसंघाला स्वीकारले आणि मग ‘भारतीय जनमानसानेपण-’’ म्हणजे संघ, जनसंघ, भाजप यांना सत्तेत केंद्रस्थानी आणले ते लोहिया, जयप्रकाश, शंकरराव चव्हाण, नरसिंह राव आणि शरद पवार यांनी- असे काही आहे का? जनसंघ ही संघाची एक शाखा आहे, हे जनसंघाचे अध्यक्ष बलराज मधोकांनी सांगितलं. संघाचा फक्त एकलक्ष्यी कार्यक्रम आहे- ‘हिंदूंचाच हिंदुस्थान’ हे सरसंघचालक देवरसांनी सांगितलंय. भारतातील मुसलमानांच्या आजच्या अगतिक अवस्थेला आपण परिवर्तनवादी जबाबदार आहोत का?) असो.

विषयांतर बाजूला ठेवू या. सारेच लेख वेगवेगळ्या कारणाने महत्त्वाचे आहेत. त्यापैकी काही लेखांमधील काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत-

 1. महाराष्ट्रातील मुसलमान हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे; पण हे वास्तव अजूनही मोकळेपणाने मान्य झालेले नाही आणि याला हिंदू व मुसलमान दोघेही जबाबदार आहेत.

 2. दूरदर्शनवरून 1986 मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ ही मालिका प्रसारित झाली. त्या मालिकेत मराठी मुसलमानांचे जीवनदर्शन घडविणारा एकही भाग नव्हता. आजही ‘होम मिनिस्टर’मध्ये मुसलमान कुटुंब दिसत नाही.

 3. उभ्या भारताला अभिमान वाटावा असा एक मराठी मुसलमान होऊन गेला. आपल्याला त्याची काहीही माहिती नाही. त्याचे नाव गुलाम अहमद कुरेशी. त्याची आई जपानी, वडील कोकणी मुसलमान. जपानच्या लष्करी ॲकॅडमीत त्याचे लष्करी शिक्षण झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानच्या लष्करातील मोठ्या हुद्याची व पगाराची नोकरी नाकारून ते आझाद हिंद फौजेत दाखल झाले. ते नेताजींचे निकटचे सहकारी होते. महायुद्ध संपल्यावर त्यांना फाशीची शिक्षा झाली होती, पण ती अमलात आली नाही.

 4. हिंदू-मुस्लिम या दोन धर्मीयांत समन्वय घडवून आणण्याचा यशस्वी प्रयत्न दोन्हीकडील सर्वभाषिक संतांनी केले. कबीर, जायसी, मलिक महंमद, मलूकदास, तुकोबा, एकनाथ अशी ही परंपरा आहे. दरबनीचे संपूर्ण काव्य मुळी हिंदू-मुसलमान एकतेसंबंधी आहे. संतसाहित्याचे अभ्यासक हे मांडत नाहीत. सूफी संतांच्या हिंदू-मुस्लिम सहिष्णु वृत्तीबद्दलही काही लिहिले गेलेले नाही.

 5. नरहर कुरुंदकर, वसंत पळशीकर हे समाजवादी आणि स.ह.देशपांडे, श्रीपाद जोशी व शेषराव मोरे हे हिंदुत्ववादी यांच्या लेखांमधील मुद्दे परस्परपूरक आहेत. आपल्या विषयात या व्यक्तींनी फार मोठे काम केले आहे, त्यांचा अनादर करावयाचा नाही. मात्र महाराष्ट्रातील मुसलमानांची मानसिकता व जगणे केंद्रस्थानी ठेवण्याऐवजी त्यांनी इस्लाम केंद्रस्थानी ठेवला. कुरआनचे जे भाष्य कट्टर मुल्ला-मौलवींनी व वसाहत चालविणाऱ्या इंग्रजांनी केले तेवढेच लक्षात घेतले- कुरआनची जी प्रगतिशील भाष्ये आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले.

 6. मुसलमान प्रश्नाबाबत आणखी काही मुद्दे घेतले पाहिजेत. भारतातील फक्त 35 टक्के मुसलमान उर्दूभाषक आहेत. बाकी सर्व मुसलमानांची मातृभाषा ही त्या-त्या प्रांतातील प्रादेशिक भाषा आहे. केरळमध्ये 25 टक्के मुसलमान आहेत. ते मल्याळम बोलतात. त्यांच्यापैकी फारसे कोणी फाळणीनंतर पाकिस्तानात गेले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची जात सुटलेली नाही. तांबोळी-बागवान लग्नानंतर तांबोळी जातीने कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची घटना पुण्यात 35-40 वर्षांपूर्वी घडली आहे. पुण्यात तांबोळी, बागवान यांच्या वेगळ्या मशिदी आहेत. खाटिकांच्या दोन मशिदी आहेत. नमाजासाठी तुम्ही कोणत्याही मशिदीत जाऊ शकता, मात्र मंगलप्रसंगी व मयतीच्या प्रसंगी आपापल्या मशिदीत जाण्याची प्रथा आहे. मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, त्या वेळी त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स अहमदाबाद, बडोदा येथे लावण्यात आले. आमच्या जातीचा माणूस पंतप्रधान झाला याचा आनंद त्यात होता. खाली सही करणारे सर्व मुसलमान होते. ते तेली समाजाचे होते- धर्मांतरित तेली; पण त्यांचा जातवाला पंतप्रधान झाला याचा आनंद!

 7. भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत, समान जबाबदाऱ्याही दिल्या आहेत; त्यात मुस्लिमही येतात. त्याप्रमाणे सत्तर वर्षे भारत घडला आहे. त्यामुळे सरकारने आमच्यासाठी काय केले, ही तक्रार मुसलमानांची थांबवली पाहिजे. मुस्लिमांना संधी लाथाडणे ही दोन्ही गटांची राजकीय गरज आहे. मुस्लिमच काय तर सर्व शोषित आणि पीडित गटांना समान संधीपासून वंचित ठेवणे, ही सर्व राजकीय पक्षांची गरज आहे. घटनेच्या कक्षेत शांततामय मार्गांनी आपण मार्ग शोधू शकतो. असो. असे अस्वस्थ करणारे विचार या ग्रंथातील सर्व लेखांत जागोजागी पसरलेले आहेत. हे असे लेख वाचताना, वेगळी आल्हाददायक माहिती देणारे तीन लेख या ग्रंथात आहेत.

 8. मोगलकालीन दिवाणी (राणा सफवी),

 9. अशोक, अकबर व नेहरू आणि त्यांची सौहार्दविषयक धारणा (डॉ.अक्रम पठाण)

 10. अजिंठ्याचा सांस्कृतिक वारसा जपणारे निजाम (सय्यद दाऊद अशरफ).

आज असहाय, अगतिक, भयग्रस्त परिस्थितीत या देशातील मुस्लिम समाज उभा आहे. फाळणीच्या वेळी तो भांबावलेला-घाबरलेला होता, पण त्यांना आधार देत गांधीजी आणि नेहरू उभे होते. आज त्यांना अगतिक, भयग्रस्त स्थितीत आणणारे केंद्रस्थानी आहेत. आपली पुढची खेळी त्यांनी ठरवलेली आहे. आजवर आपण प्रा.बेन्नूर आणि त्यांचे विचार दूर ठेवले. मात्र सामाजिक सद्‌भाव हवा, समता हवी, धर्मातील कालबाह्य रूढीपरंपरा संपवल्या पाहिजेत यासाठी तळमळीने काम करणारा हा गट आहे. आज थोडा वेगळा मार्ग घेण्याची गरज आहे, असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. टिळक- आगरकरवादापेक्षा हा वाद थोडा वेगळा आणि तरल आहे का? यांच्यात समन्वय शक्य आहे का? मग त्यासाठी आपण हे पुस्तक अभ्यासले पाहिजे. त्यावर चर्चासत्रे झाली पाहिजेत. प्रश्न सोडविण्याचा एक मार्ग असा आहेपरस्परि वरोधी वाटणाऱ्या दोन प्रामाणिक बाजू समजावून घेतल्या, तर या दोन विचारधारांच्या समन्वयाचा तिसरा मार्ग आपल्या समोर येतो.

दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा सामाजिक समतेचा प्रवाह

प्रा. फकरुद्दीन बेन्नूर स्मृतिग्रंथ द युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन, पुणे. फोन : 020-25511330 पृष्ठे : 332, मूल्य 300 रुपये

Share on Social Media

ते स्वप्न आणखी एक जुमलेबाजी?

दि. 27 जुलैच्या अंकातील ‘तपशीलाकडे डोळेझाक करण्याचा पवित्रा! हे अभय टिळक यांनी लिहिलेले संपादकीय वाचले. त्यात मोदी 2.0 सरकारमधील देशाच्या पहिल्या महिला (पूर्णवेळ) अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे यथोचित विच्छेदन केले आहे. संसदेत सादर केलेल्या आपल्या पहिल्या-वहिल्या अर्थसंकल्पाचे वर्णन अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ‘बहीखाते’ असे केले आहे. बहीखाते म्हणजे (गुजराती भाषेत) जमा-खर्च वही. पण या अर्थसंकल्पात रुपया येणार कसा? आणि तो खर्च होणार कसा याचा कोणताही ठोकताळा मांडायचे औचित्य त्यांनी दाखवलेले नाही. त्यातल्या त्यात हा एक इतिहासच म्हणायला हवा. लाल, तपकिरी रंगाची सूटकेस जाऊन लाल रंगाची बाड यासाठी निवडली गेली. ‘गुलामगिरीतून मुक्तता’ म्हणून प्रतिकात्मक वापरलेले लाल रंगाचे बाड, हे वेगळेपणातील समीकरण देशवासीयांच्या गळी उतरवण्यास मात्र त्या विसरल्या नाहीत.

या अर्थसंकल्पाची सारी मदार देशाला पुढील पाच वर्षांत पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न जनतेला दाखवण्यावर दिसली. सामान्य जनतेला बुलेट ट्रेन, जागतिक महासत्ता, पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था इत्यादी मोठ्या घोषणांचे नेहमीच आकर्षण आणि कुतूहल असते. मोदी सरकार या आकर्षणातून नवभारत संकल्पनेची बांधणी करत आहे आणि यात काही गैर नसले तरी, मोठी स्वप्ने उराशी बाळगताना वास्तवाचे भान ठेवणे व स्वप्नांना कृतीची जोड देणेदेखील तेवढेच गरजेचे असते. ते भान आणि जाण या सरकारला आहे असे एकूणच कार्यपद्धतीवरून तूर्तास तरी दिसून येत नाही. कारण हे सरकार आजही फसलेल्या नोटाबंदी, जीएसटी यांसारख्या धोरणांच्या (आर्थिक सुधारणा संबोधत असते) फुशारक्या मारण्याचे काम करताना दिसून येते. नोटाबंदीच्या एककल्ली निर्णयाचे आणि जीएसटीच्या घिसाडघाईतील अंमलबजावणीचे दुष्परिणाम अनेक आर्थिक अवहाल, अर्थतज्ज्ञ यांच्या माध्यमातून एव्हाना सप्रमाण सिद्ध झाले आहेत. तरीही भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात पाच लाख कोटी डॉलर्सची असेल असे स्वप्न या सरकारने भारतीय जनतेला दाखवले आहे. पण हे स्वप्न सर्वसामान्य देशवासीयांसाठी ‘दिवास्वप्न’ ठरू नये असे वाटते.

भारत विकसनशील देशाचा कोष भेदून विकसित देशाच्या रांगेत जाऊन बसणार, तसेच भारत जागतिक अर्थ महासत्ता बनणार असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. यासाठी काही देशांच्या आर्थिक प्रगतीचे दाखलेदेखील दिले जात आहेत. पण आपल्या बाळाने ‘बाळसे’ धरावयाचे असे वाटत असेल तर शेजारच्यांच्या ताटात डोकावणे उपयोगाचे नसते, हे सरकारने ध्यानात घेणे गरजेचे आहे. कारण पाच लाख कोटी डॉलर्सची ध्येय साध्य करायचे असेल तर पुढील आठ-दहा वर्षे देशाचा जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन) आठ टक्क्यांच्या गतीने वाढणे गरजेचे आहे. या सरकारला हे पाच लाख कोटी डॉलर्सचे लक्ष्य पाच वर्षांतच गाठायचे असेल तर पुढील पाच वर्षे देशाचा जीडीपी सरासरी 12 टक्के इतक्या गतीने वाढणे अत्यावश्यक आहे. ते होणार कसे यावर हे सरकार आपल्या अर्थसंकल्पात भाष्य करताना दिसले नाही. रिझर्व्ह बँकेनेदेखील यंदाच्या वर्षी विकासदर हा 7 ते 7.3 दरम्यान राहील असेच मत नोंदवले आहे.

नायजेरियासारख्या आपल्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या अनेक देशांचे दरडोई उत्पन्न तसेच मानवी विकास निर्देशांक आपल्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे पाच लाख कोटी डॉलर्सचे लक्ष्य असाध्य नसले तरी ते साध्य करण्यासाठी देशातील गुंतवणूक वाढीस पोषक वातावरण तयार करावे लागेल. उद्योगक्षेत्रात, कृषिक्षेत्रात वाढीसाठी धोरण राबवावे लागेल. आर्थिक सुधारणा हिरहिरीने रेटाव्या लागतील. जेणेकरून देशात प्रत्येक हाताला काम मिळेल. अर्थसंकल्पात तर कृषीक्षेत्राची दुरावस्था दूर करण्यासाठी कुठल्याच योजना नाहीत. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी अर्थ संकल्पाच्या पूर्वसंध्येला गुंतवणूक माहात्म्य गायले ते असे की, ‘आर्थिक विकासाची मुख्य ऊर्जा ही गुंतवणूकच आहे. गुंतवणुकीतून क्षमता निर्माण केली जाईल. मागणीत वाढ झालेली दिसून येईल. श्रम उत्पादकतेत वाढ दिसून येईल. सर्जनशील उलथापालथ तीच घडवून आणील आणि नवीन रोजगार निर्मितीचा प्रवाह ती वहाता ठेवेल.’ पण गुंतवणूक वाढीसाठी देशात उद्योगपूरक आणि उद्योगस्नेही वातावरण निर्माण करावे लागेल. आणि वर्तमान मॉब लिंचिंग, जय श्रीराम घोषणेची सक्ती आणि यातून निर्माण झालेले झुंडगिरीचे विखारी वातावरण, यात ते साधणार कसे? याबाबत देशातील आघाडीचे उद्योगसमूह जसे की इन्फोसिसचे नारायणमूर्ती, बजाजचे राहुल बजाज, गोदरेजचे आदी गोदरेज इत्यादींनी रास्त चिंता व्यक्त केली आहे. पाच लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न सामान्यजनांना कितीही रंजक वाटत असले तरी ते आणखी एक ‘जुमलेबाजी’ ठरू नये.

बाळकृष्ण शिंदे, पुणे

असा पितृतुल्य माणूस दुजा होणे नाही

दि. 3 ऑगस्टच्या साधनातील यदुनाथ थत्ते यांच्यावरील सुरेश द्वादशीवार यांचा लेख वाचला. यदुनाथजी हे आमचे श्रद्धास्थान! यदुनाथजी हे आमचे प्रेरणास्थान! 1985 मध्ये औरंगाबादच्या विद्यापीठात पहिल्यांदा त्यांचे भाषण ऐकले आणि आम्ही त्यांच्या प्रेमातच पडलो. त्यांचा स्नेह अखेरपर्यंत लाभला. माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, 1987 साली! मी साहित्य संजीवन या नावाने दिवाळी अंक काढत असे. त्या अंकाला दरवर्षी यदुनाथजींचा लेख असे. पाठकोऱ्या कागदावर लिहिलेला लेख. मानधन देऊ केले, तरी घेत नसत. नांदेडला आले की, स.दि. महाजन यांच्याकडे उतरत. मी त्यांना विचारत असे, ‘त्यांचे कोणाशी जुळत नाही, तुमचे कसे जुळते?’ ते म्हणायचे, ‘आपल्याला दुर्गुणांशी काय देणे- घेणे? चांगले गुण पाहायचे.’ आम्ही निरुत्तर!

माझ्या शाळेत त्यांचे भाषण ठेवले होते. तेव्हा पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेवर ते बोलले. बोलले म्हणजे मुक्त संवाद साधला. मुले खूष! शे-दोनशे मुलांनी यदुनाथजींना पत्रे लिहिली, अभिप्रायाची. त्या सगळ्यांना वैयक्तिक पत्र लिहून यदुनाथजींनी आपल्या भावना कळविल्या. नांदेडला आले म्हणजे माझ्या घरी येणारच. काय लिहितोस? चौकशी करणार! नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी मी त्यांची ‘प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील’ या विषयावर व्याख्याने आयोजित केली. न कंटाळता. जिल्हाभर फिरायचे. आवडीने संवाद साधायचे. त्यानंतर त्यांचे प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील हे पुस्तक छापून आले. त्याच्या अनेक प्रती आम्ही जिल्ह्यात विकल्या. यदुनाथजींनी आम्हाला झपाटले होते. त्यांच्यात आम्ही साने गुरुजी पाहायचो. ते फारच जीव लावायचे. असा पितृतुल्य माणूस दुजा होणे नाही! द्वादशीवारांच्या लेखामुळे त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आपले मनापासून, अगदी मनापासून अभिनंदन आणि आभार!

सुरेश सावंत, नांदेड

देशाच्या उभारणीचे कार्य

दि. 22 जूनच्या अंकातील सुधा बोडा यांचे अण्णांना (साने गुरुजी) 70 वर्षांनी लिहिलेले पत्र वाचले. त्यांना पाठवलेल्या ‘सुंदर पत्रां’बद्दलच्या भावना वाचताना डोळे सारखे भरून येत होते. ‘आपला अण्णा देशासाठी तुरुंगात गेला आहे...’ अशा सांगण्यानेच सुधातार्इंची गुरुजींशी ओळख झाली. पंढरपुरात उपोषणाला बसलेल्या अण्णांना भेटावयास गेलेल्या त्यांना त्यांच्या कृश देहाकडे पाहून काही बोध होईना.

परंतु खूप काही येथे घडत आहे, हे जाणवत होते आणि अनिष्टांच्या वाळवीने देशाला जणू पोखरलेले बघून ‘आज तुम्ही असतात, तर किती वेळा मृत्यूला कवाटळलं असतं!’ असा आक्रोशही त्या करतात! आपल्या मोठ्या बंधूंच्या आजारपणात मल-मूत्र साफ करून त्यांची सेवा करणारे, ‘सुंदर पत्रांतून’ साऱ्या महाराष्ट्रातील मुलांशी संवाद साधून त्यांना आनंद देण्याचा, हसत-खेळत गोष्टी सांगत भरभरून ज्ञान देणारे आणि सत्तेकडे जाणारी माणसे सेवेकडे दुर्लक्ष करून भ्रष्ट मार्गांचा मागोवा घेताना बघून, ‘असं वाटतं, कुठे दूर निघून जावं’ असे हताशपणे लिहिणारेही साने गुरुजी येथे आपणास भेटतात! एकूणच सुधातार्इंनी आपल्या अण्णांविषयीच्या आठवणी उत्कट व सडेतोडपणे व्यक्त केल्या आहेत.

तसेच, दोघांधला भावनिक नातेसंबंधही वेळेवेळी उलगडून दाखवला आहे! जाता-जाता, साने गुरुजींनी साप्ताहिक ‘साधना’ची सुरुवात 15 ऑगस्ट 1950 रोजी मुंबईच्या आर्थर रोड जेलच्या शेजारील दुकानांच्या एका गाळ्यात केली. जेलच्या अर्ध्या-एक कि.मी. अंतरावर असलेल्या मजुरांच्या बीडीडी चाळीत माझा जन्म झाला. मी तेव्हा सात-आठ वर्षांचा असेन. आम्ही मुले त्या दुकानांच्या मागे असलेल्या मैदानात खेळावयास जात असे. त्यावेळी त्या गाळ्यात लिहीत बसलेले किंवा समोरच असलेल्या बसस्टॉपवर बसची वाट बघत, विचारात गढलेले साने गुरुजी अनेक वेळा पाहिल्याचे स्मरते.

गोविंद काजरोळकर, पुणे

अणुऊर्जेवर चर्चा घडवावी

दि. 10 ऑगस्टच्या अंकात सुधीर जोगळेकर यांनी अणुबाँबची संहारकता व त्याच्या वापराबद्दल अमेरिकी शासनाला व जनतेला खंत व अपराधी न वाटणे या गोष्टी ठळक केल्या आहेत. नंतरच्या राजकारण्यांनी, विशेषत: क्युबन मिसाइल क्रायसिसवेळी, जास्त शहाणपणा वापरला. आता ट्रंपच्या कारकिर्दीत धोका वाढला आहे. याच अंकात समीर शिपूरकर म्हणतात त्याप्रमाणे, आता अणुभट्ट्या जास्त सुरक्षित झाल्या आहेत. आता निवड करावयाची आहे ती अणुभट्ट्या व कोळसा यांपैकी एकाची. दुसऱ्या शब्दांत, अणुभट्ट्याचे अपघात व निर्माण होणारा किरणोत्सर्गी कचरा जास्त संभवनीय व धोकादायक व पृथ्वीव्यापी का पृथ्वी तापण्याचा- वातावरण बदलाचा धोका अधिक तीव्र, व्यापक आणि चिरस्थायी व संभवनीय? विजेची, ऊर्जेची गरज/मागणी एकदम कमी करणे हुकूमशाहीलाही शक्य नाही. जागतिक स्तरावर तरी अशक्यच. तिसऱ्या जगात तर विजेचा दरडोई पुरवठा वाढवणेच आवश्यक. सौर व पवन वीज 24 तास खात्रीचा पुरवठा (बेसलोड) करू शकत नाही. जलऊर्जेचे जवळपास सर्व स्रोत वापरून झाले आहेत. अशा वेळी अणुऊर्जेला योग्य पर्याय दिसत नाही. या महत्त्वाच्या विषयावर साधनेत जरूर विचारांची देवघेव व्हावी.

सुभाष आठले, कोल्हापूर.

Share on Social Media

नवे पुस्तक

जीवनाचे लालित्यपूर्ण दर्शन घडविणारा कथासंग्रह

चैतन्य सदाशिव डुम्बरे

जपान या देशातील तीन अग्रगण्य सायन्स फिक्शन लेखकांमधील एक नाव म्हणजे शिन्‌इची होशी. जपानमध्ये त्यांची लघु- लघुकथेचा बादशहा अशी ओळख वादातीत आहे. सुलभ भाषा, आकृतीबंधाने लहान आणि फारशी गुंतागुंत नसलेल्या त्यांच्या लघुलघुक था वाचकांचे पुरेपूर मनोरंजन तर करतातच पण त्याचबरोबरीने जीवनविषयक काही गंभीर पैलूंचं दर्शनसुद्धा घडवतात. या लेखकाचे लेखन जगातील तब्बल वीसपेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे..

शिन्‌इची होशी यांचा जन्म 6 सप्टेंबर 1926 रोजी टोकियोत झाला. या लेखकाने 1957 साली आपल्या लेखन कारकिर्दीस प्रारंभ केला. अशा या लेखकाचा इथे खास संदर्भ देण्याचे कारण म्हणजे अलीकडेच त्यांचा मराठीत दुसरा अनुवादित कथासंग्रह ‘रोहन प्रकाशना’तर्फे प्रकाशित झाला आहे. (याआधी डिसेंबर 2007 मध्येही त्यांचा बोक्कोचान आणि इतर जपानी कथा हा कथासंग्रह मनोविकास प्रकाशनाने प्रसिध्द केला होता. या दोन्ही कथासंग्रहांचा अनुवाद निसीम बेडेकर यांनीच केला आहे. ते जपानी भाषेचे पदवीधर असून जपानी भाषेचे प्राध्यापक म्हणून हैद्राबाद येथील इंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठात कार्यरत आहेत. असो.

सेकिसुतोरा ही होशींची पहिलीच कथा. यानंतर त्यांनी लघु-लघुकथा हा एक नवीनच रूपबंध जपानी साहित्यात प्रचलित केला. प्रारंभी रे ब्रॅडबरी, फ्रेड्रिक ब्राऊन अशा काही अमेरिकी विज्ञानकथा-लेखकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता परंतु नंतर मात्र होशींनी आपली स्वतःची अशी खास शैली सिद्ध केली. वाचन करताना आपल्याला ही गोष्ट पदोपदी जाणवत राहते. शिन्झेन किस असे वैशिष्ट्यपूर्ण नाव असलेल्या या पुस्तकात होशींच्या एकूण 21 कथांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये 18 लघु-लघुकथा असून उर्वरित तीन कथांचा दीर्घकथा या प्रकारात समावेश करावा लागेल. काय बरं आहे या कथासंग्रहाचे स्वरूप अन्‌ वेगळेपण?

शिन्‌इची होशी हे जरी विसाव्या शतकातील जपानी लेखक असले तरी त्यांच्या कथांना स्थळ-काळाचे बंधन नाही. त्यांच्या कथांमधील पात्रे-व्यक्तिरेखांशी कोणत्याही देशातील वा कोणत्याही भाषेचा नागरिक आपले नाते जोडून त्यात आपले प्रतिबिंब पाहू शकतो. कारण त्यांच्या कथांमधून माणसाचा मूलभूत संघर्ष, त्याची स्वप्ने, सुख-दुःखे, गुणदोष या सर्व स्वभावपैलूंचे मार्मिक दर्शन घडते. तसेच धक्कातंत्राच्या कलाटणी देणाऱ्या शेवटामुळे कथेला एक वेगळे वाचनीय मूल्य प्राप्त होते ते वेगळेच.

होशींची ‘रागीट काका’ ही कथा यासंदर्भात अगदी खास अशीच म्हणावी लागेल. यामध्ये मध्यमवर्गीय सर्वसामान्य दांपत्याची जीवनशैली, मानसिकता, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अपत्यांबद्दल त्यांना असलेली काळजी इतकी अस्सल चित्रीत केली गेलीय की, ती पात्रे न वाटता खऱ्याखुऱ्या व्यक्तींची चित्रफीतच वाटू लागते. कथेतील डिलक्स तिजोरी या कथेत माणसाच्या आणि समाजाच्या दृष्टिकोनाचं वेगळं दर्शन लेखक घडवितो. बऱ्याच वेळा समाज काही वेगळी कृती करणाऱ्या, चाकोरीबाह्य विचार करणाऱ्या व्यक्तीला मूर्खात काढत असतो, पण कधीकधी तीच गोष्ट धोरणात्मक व शहाणपणाची ठरू शकते. सारांश शिन्‌इची होशींच्या कथांमुळे मानवची कुठल्याही काळातील वा देशातील असो, त्याची मूलभूत स्वभाववैशिष्ट्ये इथून- तिथून सारखीच हे तत्त्व अतिशय जोरकसपणे अधोरेखित होत राहते.

याच पुस्तकात ‘साक्षीदारीचा धंदा’ व ‘अफलातून औषध’ या दोन कथांचा समावेश केलेला आहे. अर्थात या कथा वेगळ्या असल्या तरी या दोन्ही कथांचे आशयसूत्र मात्र समान आहे. ‘अफलातून औषध’ या कथेचा नायक वैद्यकशास्त्र व औषधनिर्मिती यामध्ये अगदी निपुण आहे. पण तो आपलं ज्ञान प्रारंभी जनहिताऐवजी खोटेपणा करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी वापरतो, विचित्र औषधनिर्मिती करून बेबनाव करतो. पण नंतर अशा काही घटना घडतात की, हा स्वभाव त्यालाच नडतो आणि मग तो अशा फसवणुकीच्या कामापासून स्वतःलाच परावृत्त करतो. या दोन कथांतून लेखकाला काय म्हणायचे आहे?

एखादी कृती करताना त्यामागे स्वार्थी विचार असेल, त्या कृतीला खोटेपणाचे अस्तर असेल तर नंतर तो खोटेपणा तुमच्याच अंगलट येऊ शकतो. अशी काही जीवनाची मूलभूत तत्त्वेही सांकेतिकपणे शिन्‌इची होशी वाचकांच्या मनावर प्रभावीपणे ठसवतात. पण यात प्रचारकी थाट नसतो. होशी आपल्या कथेची संरचनाच अशी करतात की, कोणताही संदेश वा उपदेश असा वेगळा करावा लागत नाही. वेगवेगळे आयुष्यविषयक संदेश व काही वैश्विक सत्ये त्यांच्या कथानकात नैसर्गिकपणे पाझरलेली आहेत. या गुणधर्मामुळे या पुस्तकाचे वाङ्‌मयीन व वाचनमूल्य कैक पटीने वाढले आहे. शिन्‌इची होशी यांच्या लेखणीची आणखी एक ताकद म्हणजे, त्यांची लेखणी फक्त सुसंस्कृत मध्यमवर्गीय माणसाचे चित्रण करण्यात अडकून राहिलेली नाही. तर ती खून-मारामारी आणि गुन्हेगारीच्या जगताचेही खात्रीलायकरीत्या पटण्याजोगे दर्शन घडवते. उदा. ‘ब्लॅकमेल’ ही कथा वाचली तर त्यांच्या लेखणीचा आवाका किती मोठा आहे याची कल्पना येऊ शकेल. या पुस्तकात ‘कंपनीचं रहस्य’ हीसुध्दा एक उत्कृष्ट अशी कथा समाविष्ट केली गेली आहे. लेखकाने या कथेतून औद्योगिक जगत, त्या विश्वामधील माणसं, त्यांचे आपापसातील नातेसंबंध, त्यांची मानसिकता, स्वभाव इत्यादी गोष्टींचे अतिशय कसदारपणे चित्रण केले आहे. मराठी कथासाहित्यात सहसा उद्योगजगताचे दर्शन घडविणाऱ्या कथा आढळत नाहीत. ‘कंपनीचं रहस्य’ ही कथा त्यामुळेच मराठी साहित्यासाठी पर्वणी ठरावी.

अर्थात शिन्‌इची होशींची ओळख विज्ञानकथा लेखक अशीसुद्धा आहे. या कथासंग्रहात शैक्षणिक उशी, शिन्झेन किस, सजा-ए-मौत, परग्रहावरचे शर्विलक इत्यादी विज्ञानकथांचादेखील समावेश आहे. त्यांची ‘भेटवस्तू’ ही कथा विशेष लक्षवेधक वाटते. या कथेच्या शेवटाला होशींच्या प्रतिभावंत कल्पक असण्याबरोबरच संवेदनशील असण्याचीही पुरेपूर जाणीव होते. या कथेत त्यांनी विज्ञानकथा, रहस्यकथा व रूपककथा या तिन्ही प्रकारांचा उत्तम संयोग साधला आहे.

मानवाने अणुऊर्जेची निर्मिती केल्यानंतर अवघे जग सुखी न होता अशांतता व दुःखाच्या खाईतच लोटले गेले, हे सांकेतिकपणे या कथेतून मांडले आहे. बाकी चटपटीत भाषाशैली, मानवी स्वभावातील बहुविध कंगोऱ्यांचे सूक्ष्म चित्रण, कथानकाची आकर्षक व प्रभावी मांडणी आणि मानवी जीवनाशी संबंधित अनेक विषयांची उत्कृष्ट हाताळणी, कथानकातील व्यक्तिरेखांचे सामान्यीकरण (जनरलायझेशन) आणि निसीम बेडेकरांच्या रसाळ ओघवत्या अनुवादाची त्याला मिळालेली जोड यामुळे हा कथासंग्रह वाचनीय व अनुवादित साहित्यात मोलाची भर टाकणारा झाला आहे.

चैतन्य सदाशिव डुम्बरे, पुणे

Share on Social Media