डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

प्राचीन परंपरेतील प्रखर ज्ञानयोगी व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञानाचा साक्षेपी मीमांसाक अशी वरवर दुहेरी वाटणारी पण आतून एकात्म असलेली भूमिका लीलया पेलावणारे शास्त्रीजी अद्वितीयच होते. म्हणून परंपरेचे कालोचित पावित्र्य श्रद्धापूर्वक जपणारे महात्माजी व ‘समग्र क्रांतीचा युटोपीया’ आपल्या क्रांतिदर्शी प्रतिभेने रंगवणारे रॉय या दोहोंना शास्त्रीजी आपलेच वाटत. मानवेंद्रनाथ रॉय यांनी शास्त्रीजींचा उल्लेख, भारतीय प्रबोधनाचा सर्वोत्कृष्ठ प्रतिनिधी (The best product of Indian Renaissance) असा केला आहे.  

काही काही व्यक्तींबद्दल आपल्या मनात उगीचंच एक प्रकारचं कुतूहल असतं आणि तरीसुद्धा त्या व्यक्तीपाशी पोहोचायला आपल्याला उशीर लागतो म्हणा, अथवा आपण उशीर करतो म्हणा. लक्ष्मणशास्त्री जोशींबाबतही माझं असंच झालं. वैचारिक साहित्य वाचायला सुरुवात केल्याच्या आसपासच मी पहिल्यांदा या नावाच्या जवळ आलो, पण डोक्यातल्या ‘पुरोगामी’ वृत्तीला त्यातलं शास्त्रीत्व तेव्हा अवघडून टाके. पुढे जेव्हा मे.पुं.रेगे वाचत होतो तेव्हा मेपुंच्या लिखाणात अनेकदा शास्त्रीजींचे संदर्भ येत. तोपर्यंत पुरोगामीत्वाचा साजही उतराला होता, आणि मेपुंसारखा थोर तत्त्वचिंतकही ज्यांना मानतो अशा व्यक्तीचं साहित्य आपण वाचलेच पाहिजे हे ठरवलं. खरं तर यावेळेपर्यंत शास्त्रीजींची पार्श्वभूमी समजली होती, हे म्हणजे कोणी देवधर्मवादी पुराणिक पुरोहित नसून एक थोर मार्क्सवादी विचारवंत आहेत हे वरवर समजलं होतं. पुढे जेव्हा शास्त्रीजीचे लिखाण वाचत गेलो तसतसा अधिकच स्तिमित होत गेलो.

शास्त्रीजींचा बौद्धिक प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर या गावात २७ जानेवारी १९०१ सालचा. म्हणजे या आठवड्यात त्यांची ११६वी जयंती आहे. जातीपाती, जुन्या रूढी-परंपरा, सोवळे वगैरे मानणाऱ्या कुटुंबातला आणि समाजातला. वेदशास्त्र शिकण्याच्या इच्छेने चौदाव्या वर्षी त्यांनी केवलानंद सरस्वती यांच्या वाईच्या प्राज्ञपाठशाळेत प्रवेश घेतला. आणि मूळ संस्कृत व इतर भाषेतल्या ग्रंथांच्या आधारे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा १५ वर्षे सखोल अभ्यास केला. यादरम्यान कलकत्त्याच्या संस्कृत पाठशाळेची ‘तर्कतीर्थ’ ही पदवी त्यांनी संपादित केली. ते गांधीजींच्या आंदोलनामध्येही सहभागी झाले, अनेकदा कारावास भोगला. धुळ्याच्या तुरुंगात त्यांची विनोबांशी भेट झाली आणि त्यांच्या प्रोत्साहनाने इंग्रजी भाषा शिकले व पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.

याच काळात त्यांना मार्क्सबाबा भेटला. तर्कतीर्थांवर मार्क्सचा प्रभाव होता, हे निश्चित. मात्र ते कधीच कम्युनिस्ट झाले नाहीत, किंबहुना शास्त्रीजींच्या आयुष्याकडे आणि लेखनाकडे पाहताना आपल्याला सतत जाणवतं की त्यांनी कधीच स्वतःला कोणत्याही विचारप्रणालीशी बांधून घेतलं नाही. समाजवाद, मार्क्सवादाप्रत त्यांना आपुलकी होती, पण मानवी जीवनाचं हेच अंतिम स्वरूप असल्याचं त्यांना मान्य झालं नाही. मार्क्सवादाच्या प्रभावातूनच त्यांनी ‘हिंदू धर्म समीक्षा आणि सर्वधर्म समीक्षा’ हा थोर ग्रंथ लिहिला. मात्र त्यांच्या नंतरच्या साहित्यावर हा मार्क्सवादी प्रभाव तेवढा जाणवत नाही, याचा दाखला मेपुंनीसुद्धा दिला आहे.

वैचारिकदृष्ट्या लक्ष्मणशास्त्रींना, मानवेंद्रनाथ रॉय फार जवळचे वाटत. गांधीजी आणि एम.एन.रॉय या दोघांशीही त्यांचा फार जवळचा संबंध आला. आजच्या काळात विचार करता रॉय हे विस्मृतीला गेलेले आहेत, मात्र आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ विचारवंत व तत्त्वज्ञानांपैकी ते एक आहेत हे निश्चित. मानवेंद्रनाथांनी मूलगामी मानवतावाद (Radical Humanism) या विचारधारेची मांडणी केली. शास्त्रीजींच्या आयुष्यावर मानवेंद्रनाथांचा खूप प्रभाव पडला होता. रा.ग. जाधव यांच्यामते, रॉय यांच्या विचारसरणी मनःपूर्वक स्वीकार करणाऱ्या मोजक्या बुद्धिवंतांत शास्त्रीजींचे स्थान अनन्यसाधारण होते. १९३६ ते १९४८ या काळात ते रॉय यांच्या रॅडिकॅल डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्य होते. तर्कतीर्थांच्या विचारविश्वाचे आकलन करून घेण्यासाठी ज्येष्ठ समीक्षक रा.ग.जाधव यांनी मांडलेला पुढील अभिप्राय महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणतात-

प्राचीन परंपरेतील प्रखर ज्ञानयोगी व आधुनिक पश्चिमी ज्ञानविज्ञानाचा साक्षेपी मीमांसक अशी वरवर दुहेरी वाटणारी पण आतून एकात्म असलेली भूमिका लीलया पेलावणारे शास्त्रीजी अद्वितीयच होते. म्हणून परंपरेचे कालोचित पावित्र्य श्रद्धापूर्वक जपणारे महात्माजी व ‘समग्र क्रांतीचा युटोपीया’ आपल्या क्रांतिदर्शी प्रतिभेने रंगवणारे रॉय या दोहोंना शास्त्रीजी आपलेच वाटत. मानवेंद्रनाथ रॉय यांनी शास्त्रीजींचा उल्लेख, भारतीय प्रबोधनाचा सर्वोत्कृष्ठ प्रतिनिधी (The best product of Indian Renaissance) असा केला आहे.

गांधी आणि रॉय यांच्याबद्दल एका मुलाखतीत शास्त्रीजी म्हणतात, त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचे विलक्षण तेजस्वी पैलू पाहून मी वारंवार स्तिमित झालो आहे, परंतु मी माझे वैचारिक स्वातंत्र्य गमावून त्यांच्याशी पूर्ण ऐकमत्य झालो असल्याचे माझ्या अनुभवात कधीही नाही. याचे कारण माझे भारतीय तत्त्ववेत्यांचे दर्शन होय. या तत्त्वदर्शनात गौतम मुनीचे विचार कपिल मुनी खंडित करतो, कपिल मुनीचे विचार द्वैपादन व्यास मुनी खंडित करतो आणि या सर्वांचे विचार बौद्ध तत्त्वज्ञ नागार्जुन अमान्य करतो, अशी ही उच्च विचारांची मीमांसा माझ्या विचार पद्धतीचा अविभाज्य भाग बनली आहे.

आपल्या जडण-घडणीचे श्रेय भारतीय विचारपरंपरेला देणारे शास्त्रीजी, प्राचीन भारतीय हिंदू परंपरेचं मूल्यांकनही तेवढ्याच काटेकोरपणे आणि कोणतेही पूर्वग्रह न बाळगता करतात. हिंदू धर्माच्या साहिष्णुतेबद्दल आपण सर्वच बोलत असतो. धर्माभिमानी लोक हिंदू धर्म कसा सहिष्णुच होता हे सांगत असतात, तर स्वतःला सेक्युलर म्हणवणारे काही लोक हिंदू हाच कसा सर्वांत असहिष्णू धर्म आहे हे सांगतात. याच्या मधले समतोल भाष्य तर्कतीर्थ करतात. ‘हिंदू धर्मात जी सहिष्णुता आहे त्याचे तात्विक स्वरूप संदिग्ध आहे, तशी बौद्ध धर्माची गोष्ट नाही. हिंदू धर्मात सहिष्णुता आहे’ परंतु तो विश्वव्यापी  नव्हता. अत्यंत संकुचित, क्षुद्र, अनुदार आणि भिकार असे विविध धर्मसंप्रदाय जसेच्या तसे शतकानुशतके त्याने जपून ठेवले. म्हणून तो मनुष्यजातीच्या उद्धारास बौद्ध धर्माइतका समर्थ झाला नाही आणि त्याने हिंदुस्थानात इस्लामसारख्या असहिष्णू धर्मास वाढण्यास अनुकूल अशी सामाजिक  स्थिती निर्माण केली. मनुष्य जमातीच्या लहान-मोठ्या सांस्कृतिक भेदांना विरघळून टाकून एकजीव करण्याऐवजी ते भेद दृढमूल केले. यालाच आत्मनिरीक्षणाची न्यायनिष्ठुरता आणि धैर्य नसलेले आधुनिक हिंदू विद्वान सहिष्णुता असे गोंडस नाव देतात. हिंदू धर्माची तर्कतीर्थ जेवढ्या प्रखरपणे चिकित्सा करतात तेवढीच प्रखर आणि सत्य अशी चिकित्सा ते इस्लामचीही करतात. त्यामुळेच ते इस्लामला केवळ धार्मिकच नव्हे तर राजकीय अर्थसुद्धा होता, असे म्हणतात. कारण अरब राष्ट्रांची संघटना करून जेव्हा देवाची तलवार दिग्विजयासाठी बाहेर पडली, तेव्हा ती तलवार असे सांगू लागली की, एकतर इस्लामचा स्वीकार करा नाहीतर खंडणी द्या! हे मांडायला शास्त्रीजी कचरत नाहीत. आणि दुसरीकडे इस्लामच्या मुळाशी असणाऱ्या नैतिक प्रेरणांप्रति आदर दाखवायलाही कमी करत नाहीत.

अशाच चिकित्सक आणि प्रगाढ पांडित्यपूर्ण अधिकाराने त्यांनी १९५२मध्ये लिहिलेला, आधुनिक भारतीयांतील तत्त्वज्ञानाचे दारिद्य्र हा निबंध आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतो. प्राचीन ज्ञानविज्ञानचे प्रकांडपंडित असलेले आणि योगशास्त्राचे अवलंब करणारे तर्कतीर्थ या दारिद्य्राच्या कारणांची यादी करताना प्राचीन विचारांच्या कोषांतून बाहेर न पडण्याच्या आपल्या वृत्तीलाही त्यात मांडायला आढेवेढे घेत नाहीत. लक्ष्मणशास्त्रींना भारतीय विचारांची सखोलता, त्यातील बुद्धिवादाच्या प्रेरणा आणि त्याचे महत्त्व मान्य आहे, मात्र त्यांचे हे ज्ञान प्रचारकी स्वरूपाचे नाही. ‘एकम्‌ सद्‌ विप्रह:’...वर श्रद्धा असणाऱ्या त्यांच्यासाठी ते काही जीवनाच्या अंतिम सत्याचे एकमेव दर्शनही नाही. त्यांच्यामते आधुनिक भारतीयांपाशी प्रचिंतत्वज्ञानाचा साठा आहे व अंतिम सत्य सापडल्याची कृतार्थ वृत्ती आहे. व आधुनिक भारतातले तत्त्वज्ञानाचे दारिद्य्र हे त्या कृथार्ततेतून उत्पन्न झालेल्या जाड्याचे लक्षण आहे. कृतार्थतेने जिज्ञासा मरते आणि जिज्ञासा मेली म्हणजे विचार संपतो! अध्यात्म विचारांचे अभ्यासक आणि साधक असणारे अरविंद असोत अथवा मानवेंद्रनाथ रॉय किंवा गांधीजी असोत या सर्वांच्या विचारांचे व आधुनिक काळात प्रबळपणे रुजू होत चाललेला नवअध्यात्मवाद या प्रवाहातील एक महत्त्वाचे व्यवच्छेदक लक्षण लक्ष्मणशास्त्री मांडतात. मनुष्य आणि मानवी समाज बदलण्याची प्रक्रिया दर्शित करणारे तत्त्वज्ञान आपल्याला पाहिजे. आधुनिक भारतीयांमध्ये मान्यता पावलेला गूढ अध्यात्मवाद या दोन्ही आव्हानांस अपुरा आहे. (कारण) जाणूनबुजून बौद्धिक अशा विचारप्रक्रियेस तो पाठमोरा होतो आणि ज्वलंत व खडतर सामाजिक प्रश्नांना काल्पनिक, अव्यवहार्य व विसंगत उत्तरे देतो. खऱ्याखुऱ्या तत्त्वज्ञानाच्या दारिद्य्राचे ते मुख्य गमक आहे. शास्त्रीजींचे वरील मत वाचताना आपल्याला जाणवतं की, तात्विक पातळीवर अंत्यत उदार आणि श्रेष्ठ असणारं प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, वास्तवाच्या पातळीवर फोल का ठरतं. आणि गांधी अथवा रॉय यांनी ज्याप्रकारे अंतर्गत जग आणि बाह्य जग याचा मिलाफ साधून जे तत्त्वज्ञान मांडलं, त्याद्वारे समाज कशा प्रकारे मुक्तिमार्गावर जाऊ शकतो. मानवी जीवन हे नक्कीच एकसुरी अथवा एकजिनसी नाही, त्यामुळे सर्व व्यक्तींच्या उद्धारासाठी कोणताही एकच विचार योग्य ठरू शकत नाही, याची जाणीव आपल्याला तर्कतीर्थांच्या साहित्यात सापडते. मात्र याचा अर्थ त्यांच्या लिखाणात व विचारात तर्कदोष नाहीतच असाही होत नाही. कारण त्यांच्या लिखाणातून हलकी अशी अनेक विधाने काढून दाखवणे अगदीच शक्य आहे. (मात्र तो काही या लेखाचा हेतू नव्हे.) आजच्या काळात जिथे बुद्धिवंत लोक समोर येणाऱ्या प्रत्येकाला विचारधारांच्या  कप्प्यात टाकण्यास अधीर असतात, तिथे लक्ष्मणशास्त्री जोशींचे विचारधन वाचताना, आपण ज्या मुक्त विचारविश्वामध्ये वावरतोय त्या विचारांचा एक थोर पूर्वसूरी सापडल्याचं समाधान मिळतं. डी.डी. कोसंबी यांनी एकदा म्हटल्याप्रमाणे विचारधारा हा विचारांचा एक मार्ग आहे, विचारांना पर्याय नाही. त्यामुळे कोणत्याही एका विचारधारेशी स्वतःला जुंपून न घेणाऱ्या सर्वांसाठी तर्कतीर्थ हे प्रेरणेचा स्रोत राहतील एवढे निश्चित!

Tags: तर्कतीर्थ तत्त्वचिंतक लक्ष्मणशास्त्री जोशी मे.पुं.रेगे अथर्व देसाई तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री हिंदू धर्म समीक्षा आणि सर्वधर्म समीक्षा आधुनिक भारतीयांतील तत्त्वज्ञानाचे दारिद्य्र मार्क्स मानवेंद्रनाथ रॉय aani sarvdharm samiksha aadhunik bhartiyantil tatvdnyanache daridry Hindu dharm samiksha Marks Manvendra naath roy Lakshman Shastri Joshi The best product of Indian Renaissance Radical Humanism Me. Pu. Rege Athrav Desai Tark Tirth Lakshman Shastri abhivadan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके