अर्थशाळा
साधनाच्या पुढील वाटचालीसाठी काय करणे आवश्यक आहे या संदर्भात विविध स्तरांवर माहिती देताना वा चर्चा करताना , साधना रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याची गरज मागील दहा वर्षांत वारंवार अधोरेखित केली आहे. मात्र आता त्या संदर्भात बरेच नियोजन केले आहे, पूर्वतयारी झालेली आहे. साधनाचे हे सेंटर जानेवारी 2026 पासून सुरू केलेआहे, त्याला G.P. Pradhan Research & Training Center असे नाव दिले आहे, त्याला मराठीत “ग.प्र. प्रधान संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र” असे म्हणता येईल. रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर ही स्वतंत्र संस्था नसेल, साधना ट्रस्टच्या अंतर्गत एक विभाग असेल. साप्ताहिक, प्रकाशन आणि मीडिया सेंटर ( पुस्तक विक्री केंद्र ) हे तीन विभाग पूर्वीपासून आहेत. गेल्या पाच वर्षात साधना डिजिटल हा चौथा विभाग आकाराला आला आहे. आगामी पाच वर्षात ( 2026 ते 30 ) रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर हा पाचवा विभाग आकाराला यावा अशी ही कल्पना आहे. हा विभाग अन्य चार विभागांना या ना त्या प्रकारे उपयुक्त ठरणार आहे. त्यासंदर्भात काही तपशील इथे देत आहोत.
इथे रिसर्च म्हणताना साहजिकच applied research अपेक्षित असेल आणि ट्रेनिंग म्हणताना प्रसार माध्यमांना उपयुक्त ठरेल असे प्रशिक्षण अपेक्षित असेल. या रिसर्च आणि ट्रेनिंग चे स्वरूप अकादमीक नसेल, मात्र ते वृत्तपत्रीय स्वरूपाचेही नसेल. त्या दोन्हीच्या मधून जाणारे ते असेल. साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना यांचे स्वरूप तसेच आहे. आणि त्या तीन विभागांना उपयुक्त ठरावे यासाठीच हे सेंटर असेल. रिसर्च मध्ये छोट्या छोट्या अभ्यासवृत्ती असतील. प्रत्येकी दहा हजार रुपये , पंचवीस हजार, पन्नास हजार रुपये रक्कम देऊन अनुक्रमे एक महिना , तीन महिने, सहा महिने इतक्या कालावधीमध्ये ते अभ्यास संशोधन होईल. क्वचित काही अभ्यासवृत्ती एक लाख रुपयांच्या असतील, तो कालावधी सहा महिने ते एक वर्ष इतका मोठा असू असेल.
या अभ्यासवृत्तीमध्ये कोणत्या प्रकारचे विषय असतील , तर मागील तीन वर्षात, साधनाने 24 तरुण-तरुणींना अभ्यास वृत्ती दिल्या त्याप्रमाणे ! त्यामध्ये, प्रामुख्याने सामाजिक विषय, काही प्रमाणात राजकीय व सांस्कृतिक आणि थोड्या प्रमाणात साहित्य व विज्ञान हे विषय होते. यातील काही अभ्यासवृत्ती पूर्ण यशस्वी झाल्या, काहींचे यश संमिश्र आहे आणि काही पूर्णतः अयशस्वी ठरल्या. त्या 24 अभ्यासवृत्ती धारकांची यादी पाहिली तर, त्यातून विषयांच्या विविधतेचा, कासुसंगततेचा आणि सामाजिक उपयुक्ततेचा अंदाज येईल.
मागील तीन वर्षांत अभ्यासवृत्तीसाठीचे निवेदन वर्षातून एकदा प्रसिद्ध केले, अर्ज व प्रस्ताव मागवले, त्यातून उमेदवार शॉर्टलिस्ट केले आणि मग अंतिम निवड केली. आता हे सेंटर सुरू होईल तेव्हा, “अभ्यासवृत्तीसाठी प्रस्ताव पाठवा” असे आवाहन / निवेदन वेबसाईटवर कायम राहील. आलेल्या प्रस्तावांवर महिनाभरात निर्णय घ्यायचा, योग्य प्रस्तावाला संमती देऊन त्यांचे काम लगेच सुरू करायचे, असे अपेक्षित आहे. शिवाय, विशेष महत्त्वाचे वाटतील त्या विषयांसाठी योग्य माणसे शोधायची किंवा अभ्यासवृत्तीसाठी योग्य माणसे उपलब्ध असतील तर त्यांच्याशी बोलून एखाद्या विषयावर त्यांना अभ्यासवृत्ती प्रदान करायची, असेही नियोजित आहे.
अभ्यासवृत्तीतून आलेले काही लेखन साधना साप्ताहिकात, काही लेखन कर्तव्य साधना या डिजिटल पोर्टलवर, तर काही लेखन पुस्तक / पुस्तिका रूपाने साधना प्रकाशनाकडून प्रकाशित करायचे. काही वेळा ऑडिओ व्हिडिओ साठीही ऐवज मिळवता येईल. म्हणजे काही अभ्यासवृत्ती रिपोर्टाज साठी असतील, काही वेळा मुलाखत मालिका असतील, काही वेळा दीर्घ अनुवाद असतील . किंवा सर्व्हे करून दीर्घ लेख मिळवता येतील. वर्षभरात आठ ते दहा अभ्यासवृत्ती दिल्या जातील.
.ट्रेनिंग सेंटर मध्ये तीन ते पाच दिवसांच्या कार्यशाळा अपेक्षित आहेत. वर्षभरात सहा कार्यशाळा विचाराधीन आहेत. प्रत्येक कार्यशाळेत वीस ते पंचवीस लोक असतील. कार्यशाळा युवा वर्गाला समोर ठेवून घेतल्या जातील, काही कार्यशाळांना प्रवेशासाठी वयाची अट बरीच शिथिल केलेली असेल. पण कार्यशाळेत प्रवेश देताना दोन निकष लावले जातील : पहिला - विशिष्ट विषयावर चांगले काम करता येते त्यांना ते काम अधिक उपयुक्त व उत्तम दर्जाचे करता यावे. आणि दुसरा - विशिष्ट विषयावर चांगले आकलन आहे त्यांचे ते आकलन अधिक उन्नत व्हावे. उदाहरणार्थ : ज्यांना अनुवाद चांगला करता येतो, त्यांना उत्तम अनुवाद करता यावा यासाठी ही कार्यशाळा असेल; अनुवाद करायला शिकवण्यासाठी नव्हे ! किंवा अर्थकारण बऱ्यापैकी समजते त्यांना ते अधिक चांगले समजावे यासाठी अर्थसंकल्पावरील कार्यशाळा असेल, अर्थशास्त्र शिकवण्यासाठी नव्हे !
कार्यशाळा मध्ये कोणाला सहभागी करून घेतले जाईल ? पत्रकारिता, शिक्षण, प्रशासन, साहित्य, समाजकार्य किंवा तत्सम क्षेत्रात काम करणारे लोक कार्यशाळेत प्रवेश घेतील. काही लहान मोठ्या संस्थांचे चालक किंवा त्यांचे प्रमुख कार्यकर्ते, विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक, पॉलिसी मेकर्स या सर्वांची पूर्वतयारी बरीच असते, त्यांना या कार्यशाळेमुळे मोठा फायदा होईल. त्यांना आपापल्या क्षेत्रात काम करताना गुणात्मक वाढ झाल्याचे लक्षात येईल, कार्यक्षमतेत वाढ होईल.
या सर्व कार्यशाळा पुणे येथील एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या हॉलमध्ये होतील. तिथे गरजेनुसार माफक दरात निवासाची उत्तम सोय आहे. तिथले छोटे सभागृह चांगले आहे, चर्चा संवाद यासाठी पुरेशी मोकळी जागा आहे आणि PPT व ऑडिओ व्हिडिओ साठी स्क्रीनची व्यवस्था करता येते. जेवण व चहा पाणी यांची व्यवस्था सहज करता येते.
कार्यशाळेमध्ये रिसोर्स पर्सन चे भाषण, त्यानंतर प्रश्न उत्तरे व चर्चा , गरजेनुसार ऑडिओ व्हिडिओ दाखवणे आणि काही प्रात्यक्षिके दाखवणे किंवा करवून घेणे हे सर्व घडेल. उदाहरणार्थ : एका दिवसात पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोनच सेशन होतील, दोनच रिसोर्स पर्सन असतील, प्रत्येकाला तीन तास मिळतील. तीन दिवस कार्यशाळा ठेवली तर सहा रिसोर्स पर्सनची भाषणे होतील. काही कार्यशाळा मध्ये एक रिसोर्स पर्सन सोबत पूर्ण दिवस असेल, काही कार्यशाळेत एका दिवसात चार रिसोर्स पर्सन असतील. त्यांच्यासोबत चर्चा होतील. ऑडिओ, व्हिडिओ दाखवले जातील.
रिसर्च अंतर्गत वर्षभरात आठ ते दहा अभ्यास वृत्ती दिल्या जातील, त्यासाठी सात आठ लाख रुपये खर्च येईल. ट्रेनिंग अंतर्गत सहा कार्यशाळा वर्षभरात घेतल्या तर साधारणतः दहा लाख रुपये खर्च येईल. अन्य खर्च पाच सहा लाख रुपये होईल. असा एकूण 25 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील काही वाटा व्यक्तिगत देणग्यामधून मिळेल, काही CSR मधून मिळवता येईल. अशा कामासाठी देणग्या देण्यास लोक जास्त उत्सुक असतात, असा आमचा अनुभव आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की, मागील चार पाच वर्षांत दरवर्षी साप्ताहिक व प्रकाशन विभागातून 10 लाख रुपये तरी असा खर्च करत आलो आहोत. तो खर्च यापुढे रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर या विभागातून होईल. उदा . विशेषांक , काही लेखमाला, अनुवाद इत्यादी. म्हणजे आणखी साधारणतः 15 लाख रुपये वाढीव तरतूद करावी लागेल. ती करता येणे आपल्याला साधनाचे वाचक, हितचिंतक यांचा बळावर करता येणे अवघड जाणार नाही.
रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर साठी एक त्रिस्तरीय समिती असेल. अध्यक्ष म्हणून सुरेश गोरे तर निमंत्रक म्हणून साधनाचे संपादक विनोद शिरसाठ हे दोघे नियोजन आराखडा व अंतिम निर्णय प्रक्रिया हे काम पाहणार. मागील पाच-सहा वर्षे सुरेश गोरे यांनी साधनाच्या विविध उपक्रमात वेगवेगळ्या प्रकारे सहभाग घेतला. पण साप्ताहिक व प्रकाशन यांचा दर्जा वाढावा, नवे विषय अजेंड्यावर यावेत , सर्व आघाड्यांवर गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ व्हावी यासाठी त्यांची तळमळ आणि समज खूपच वरच्या दर्जाची आहे. त्यांचे काम जरी मुख्यतः रसायनशास्त्र क्षेत्रातील असले तरी, त्यांचे सामाजिक व राजकीय आकलन उत्तम आहे. मागील पाच सहा वर्षात आम्ही वारंवार भेटलो आहोत, एकत्रितपणे काही वेळा काम केले आहे. विशेषतः मागील दोन वर्षांतील अभ्यासवृत्तीसाठी. त्यांची आणि आमची विचारप्रक्रिया व ध्येय धोरणे यात कमालीचे साम्य आहे.
प्रत्यक्ष कार्यशाळा घडवणे, अभ्यासवृत्ती निवड प्रक्रियेचे व्यवस्थापन करणे, सर्व संबंधितांशी संवाद संपर्क करणे, पत्रव्यवहार करणे, तांत्रिक बाजू सांभाळणे, आर्थिक व्यवहार सुरळीत होतील याची दक्षता घेणे, प्रत्यक्ष हॉलवर भोजन व प्रवास निवास ही व्यवस्था पाहणे, सोशल मीडिया हाताळणे इत्यादी कामासाठी साधनाचे कार्यालयीन सहकारी लागणार आहेत. त्यासाठी सुदाम सानप व जयदीप कर्णिक हे दोघे सध्या अर्ध वेळ उपलब्ध करता येतील. सुदाम मागील सात वर्षांपासून साधनांशी जोडलेला आहे, अभ्यास वृत्तीच्या व अन्य कार्यक्रमांच्या संयोजनात तो आहे . शिवाय तो डिजिटल विभागाचा मुख्य मुख्य समन्वयक आहे. त्याचबरोबर जयदीप कर्णिक हे इंजिनियर साधनाशी मागील काही महिन्यापासून स्वयंसेवी पद्धतीने कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षे ते साधनाचे वाचक आहेत. त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलली आहे. त्यांना लेखनाचे अंग आहे, वाचन चांगले आहे. ते रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरला अर्ध्याहून अधिक वेळ देऊ शकतात. तिसरा एक सहकारी लवकरच जॉईन करून घेणार आहोत.
नियोजन व निर्णय यासाठी अध्यक्ष सुरेश गोरे आणि साधनाचे संपादक, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी साधनाचे तीन सहकारी असे चार-पाच लोक या सेंटरचे आधारस्तंभ असतील. मात्र या दोन स्तरांच्या मध्ये सल्लागारांच्या दोन टीम असतील. एक ज्येष्ठांचे सल्लागार मंडळ, त्यात विविध क्षेत्रांतील तीन चार तज्ञ असतील. तीन चार युवा सल्लागार (30 ते 40 या वयोगटातील ) असतील पुरेसा अभ्यास व अनुभव आणि निश्चित व निर्णयात्मक भूमिका असणारे हे लोक असतील. साधना साप्ताहिकाच्या संपादक मंडळातील सदस्यांची गरजेनुसार मदत घेतली जाईल. शिवाय, विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग वेळोवेळी घेतला जाईल
आगामी म्हणजे 2026 या वर्षात सहा कार्यशाळा साठी अनेक विषय मनात आहेत. पण "अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा?" या विषयावर 23 ते 25 जानेवारी हे तीन दिवस, आणि "वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित होतो ?" या विषयावर 26 ते 28 फेब्रुवारी हे तीन दिवस कार्यशाळा घेण्याचे ठरवले आहे, त्यासाठीचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर शब्दांकन , अनुवाद , मुलाखत या तीन विशेष महत्वाच्या कौशल्यांच्या संदर्भात कार्यशाळा विचाराधीन आहेत. त्या व्यतिरिक्त फेमिनिझम, भाषा , पर्यावरण, भारतातील प्रादेशिक पक्ष, भारताचे शेजारी,... असे अनेक विषय मनात आहेत.
आगामी वर्षात अभ्यासवृत्ती देताना कालावधी छोटा आणि रक्कमही छोटी असा विचार मनात आहे. पण रवींद्रनाथ टागोर यांनी 100 वर्षांपूर्वी केलेल्या चीन दौऱ्यातील भाषणांचे अनुवाद , आणि महाराष्ट्रातील दहा कुलगुरूंच्या मुलाखती या दोन अभ्यासवृत्तीसाठी दोन व्यक्ती याच महिन्यात निवडल्या आहेत. साप्ताहिकाला उपयुक्त ठरतील असे अभ्यासवृत्तीचे अनेक विषय त्या त्या महिन्यात पुढे येत जातात, त्यातून विशेष महत्वाचे टॉपिक निवडता येतील.
1 जानेवारी 2026 पासून ग. प..प्रधान संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे, त्याच्या उद्घाटन कार्यक्रम करण्याची आवश्यकता वाटली नाही, मात्र एक वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर 2026 मध्ये या केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिनाचा चांगला कार्यक्रम करता येईल. सध्या तरी साधना कार्यालयातूनच या केंद्राचे कामकाज पाहिले जाईल, या केंद्राविषयी चे तपशील साधना अंकातून , साधनाच्या वेबसाइट वरून वेळोवेळी दिले जातील. gpp.rtc हा या केंद्रासाठीचा स्वतंत्र e id तयार केला आहे, त्यावर आपण संपर्क करू शकता. आर्थिक व अन्य सहभाग देऊ इच्छिणाऱ्यांचे स्वागतच आहे.
ग. प्र. प्रधान यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले तेव्हा साधनाने काढलेल्या विशेष अंकाची PDF व सर्व लेख Unicode मध्ये वाचण्यासाठी खालील लिंक वापरता येतील. या अंकात पान क्रमांक 49 वर प्रधान सरांच्या सर्व प्रमुख 35 पुस्तकांची (मराठी व इंग्रजी) यादी दिली आहे.
ग. प्र. प्रधान यांचे निधन 29 मे 2010 रोजी झाले. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत प्रकाशित केलेला हा साधना साप्ताहिकाचा मिनी विशेषांक आहे.