डिजिटल अर्काईव्ह

'हॉपर्स' ही केवळ प्राण्यांची गोष्ट नाही...

चित्रपटाची कथा 'बीव्हरटन' नावाच्या एका काल्पनिक शहरात घडते. तिथे मेयर जेरी जनरेझो नावाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी, सत्ताधारी राजकारणी असतो. त्याला आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि प्रवासाचा केवळ चार मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी एका जुन्या तलावाचा, तिथल्या नैसर्गिक परिसंस्थेचा आणि बीव्हर प्राण्यांनी बांधलेल्या नैसर्गिक धरणाचा बळी देऊन एक मोठा महामार्ग बांधायचा असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गावर अमानुष कुरघोडी करणारे असे अनेक मेयर जेरी आपल्याला दिसतील; पण निसर्गाला अशा प्रकारे वेठीस धरण्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात, हे आता जगातील अनेक शहरे अनुभवत आहेत आणि 'निसर्गाकडे परत चला', अशी सद्बुद्धी त्यांना सुचताना दिसते.

एक निरागस मुलगी अनवधानाने उंच अशा अर्धवट बांधलेल्या इमारतीजवळ पोहोचते. तिथे असलेल्या एका मद्यधुंद तरुणाची वक्रदृष्टी तिच्यावर पडते. तो तिचा पाठलाग करू लागतो. भीतीची जाणीव होऊन ती मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी मिळेल त्या वाटेने पळू लागते. सर्वत्र पडलेल्या लोखंडी सळ्या, लाकडं, खिळे इत्यादींतून मार्ग काढत अर्धवट बांधलेल्या जिन्यावरून वरच्या मजल्यांवर जाऊ लागते. मद्यधुंद तरुणही वेगाने मागे येत असतो. दरम्यान, ती शेवटच्या मजल्यावर पोहोचते. इथून पुढे जायला कुठलाही मार्ग नसतो. काही मिनिटांच्या झटापटीनंतर अखेर तिचे प्रयत्न अपुरे ठरू लागतात. शेवटच्या क्षणांमध्ये तिचा तोल जातो आणि त्या उंच इमारतीवरून ती अगदी निराधारपणे जमिनीवर कोसळते आणि सगळं संपतं.

एकोणीसशे बासष्टच्या 'बिग सिटी ब्लूज' चित्रपटातील हा प्रसंग, अस्वस्थ करणारा... निःशब्द करणारा! चित्रपटातील ती अर्धवट बांधलेली इमारत प्रतीक आहे सदैव अंडर डेव्हलपमेंट असणाऱ्या आपल्या शहरांची. तो मद्यधुंद तरुण म्हणजे कुठल्याही थराला जाणारा विकृत-स्वार्थी लोभ, हव्यास ! आणि ती निरागस मुलगी म्हणजे शहरात दुर्मीळ होत जाणारी नैतिकता, समाजातील हरवत चाललेली निरागसता आणि निसर्गाशी आपली तुटत चाललेली नाळ यांचे अत्यंत सखोल आणि भावनिक रूपक आहे.

दैनंदिन शहरी जीवनात अशाच स्वार्थी लोभातून जन्माला आलेल्या अनेक समस्या सर्वांना जाणवतात. आणि त्यापुढे काहीसा हतबल झालेला सर्वसामान्य माणूस. हे सर्व अनुभवताना क्षणमात्र का होईना चीड निर्माण होते. ह्याच संतापावर आणि मानवी अस्तित्वावर भाष्य करणारा एक अत्यंत सखोल विचार पिक्सार स्टुडिओच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हॉपर्स' या अॅनिमेशन चित्रपटातून व्यक्त होतो. वरकरणी हा चित्रपट म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञान, मानवी विकास आणि प्राण्यांच्या सुंदर विश्वाची रंजक कथा वाटत असला, तरी त्याचा खरा आत्मा मेबेल तनाका या एकोणीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तिच्या आजीने दिलेल्या एका साध्या, पण सखोल विचारामध्ये दडलेला आहे.

आजीचा कानमंत्र :

मेबेल महाविद्यालयात प्राणिशास्त्राचे शिक्षण घेत असते. पण वर्गात आणि पुस्तकी अभ्यासात ती रमत नाही. मेबेलची खरी शाळा तिच्या आजीसोबत निसर्गाच्या सान्निध्यात भरायची. लहानपणापासूनच प्रयोगशाळेतील पिंजऱ्यांमध्ये जेरबंद केलेल्या प्राण्यांना मुक्त करण्याचा अयशस्वी का होईना, पण प्रयत्न करणारी ती एक संवेदनशील विद्यार्थिनी आहे. माणसांच्या स्वार्थी स्वभावामुळे निसर्गाची प्राण्यांची होणारी हानी तिला अस्वस्थ करते. मेबेल लहान असताना तिची आजी तिला त्यांच्या घराजवळील एका शांत आणि निसर्गरम्य तलावाच्या काठी घेऊन जात असे. तिथे वृक्षांच्या गर्द सावलीत, पक्ष्यांच्या किलबिलाटात आजीने तिला एक अत्यंत मोलाचा कानमंत्र दिलेला असतो. आजी म्हणते, 'यू डोन्ट गेट मॅड. इट्स हार्ड टू बी मॅड व्हेन यू फील लाइक यू आर पार्ट ऑफ समथिंग बिग!'. जेव्हा आपल्याला जाणीव होते की, आपण एका विशाल सृष्टीचा अविभाज्य, पण इवलासा भाग आहोत, तेव्हा सहजच असा संताप येत नाही !

अपरिहार्य निसर्गसाखळी :

चित्रपटाची कथा 'बीव्हरटन' नावाच्या एका काल्पनिक शहरात घडते. तिथे मेयर जेरी जनरेझो नावाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी, सत्ताधारी राजकारणी असतो. त्याला आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आणि प्रवासाचा केवळ चार मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी एका जुन्या तलावाचा, तिथल्या नैसर्गिक परिसंस्थेचा आणि बीव्हर प्राण्यांनी बांधलेल्या नैसर्गिक धरणाचा बळी देऊन एक मोठा महामार्ग बांधायचा असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गावर अमानुष कुरघोडी करणारे असे अनेक मेयर जेरी आपल्याला दिसतील; पण निसर्गाला अशा प्रकारे वेठीस धरण्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात, हे आता जगातील अनेक शहरे अनुभवत आहेत आणि 'निसर्गाकडे परत चला', अशी सद्बुद्धी त्यांना सुचताना दिसते. दक्षिण कोरियातील सिओल शहराचा 'चेऑग्येचेऑन' (Cheonggyecheon) नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हे याचे एक उत्तम आणि जिवंत उदाहरण आहे. विसाव्या शतकाच्या मध्यात या शहराने विकासाच्या हव्यासापोटी एका नैसर्गिक नदीच्या प्रवाहावर काँक्रीट ओतून एक मोठा महामार्ग बांधला होता. अनेक दशके तिथे वाहनांचा धूर आणि प्रदूषण होते. पण 2003 मध्ये, शहर प्रशासनाने तो अवाढव्य महामार्ग तोडून काढला आणि तो नैसर्गिक प्रवाह पुन्हा जिवंत केला. ह्याचे परिणाम लक्षणीय होते. परिसरातील तापमान काही अंशांनी कमी झाले, जैवविविधता वाढली आणि लोकांसाठी एक आकर्षक सार्वजनिक जागा निर्माण झाली. चित्रपटातील मेयर जेरीला हाच निसर्गाचा शाश्वत नियम ध्यानात येत नाही. त्याला निसर्ग ही एक अडचण वाटते आणि त्यावर सिमेंटचा थर चढवणे त्याला विकासाचे लक्षण वाटते. पण आजीच्या विचारांचा वारसा चालवणारी मेबेल या विनाशाच्या विरोधात उभी राहते. ती केवळ स्वतःच्या घरापुरता विचार करत नाही, तर ती त्या तलावातील मूक प्राण्यांच्या अस्तित्वासाठी व्यवस्थेशी दोन हात करायला तयार होते.

हॉपिंग - समानुभूतीची नवी कल्पना :

मेबेलची जीवशास्त्र विषयाची प्राध्यापिका, डॉ. सॅम फॅरफॅक्स ह्यांनी एक अचाट तंत्रज्ञान विकसित केलेले असते. या तंत्रज्ञानाद्वारे मानवी जाणीव एका रोबोटिक प्राण्याच्या शरीरात स्थलांतरित करता येते. या प्रक्रियेला तिने 'हॉपिंग' (Hopping) असे नाव दिले आहे. हॉपिंग म्हणजे खऱ्या अर्थाने दुसऱ्याच्या दृष्टीकोनातून जगाकडे बघण्याची प्रक्रिया. आपण नेहमी स्वतःच्याच चश्म्यातून जगाचा विचार करतो. पण जेव्हा मेबेल स्वतःची मानवी जाणीव बाजूला ठेवून एका बीव्हरच्या शरीरात प्रवेश करते, तेव्हा तिला प्राण्यांच्या वेदना, त्यांचे जगणे आणि त्यांची अगतिकता खऱ्या अर्थाने समजते. समाजातील कोणत्याही दोन भिन्न गटांमध्ये, मग ते मानव आणि निसर्ग असोत किंवा दोन भिन्न विचारसरणींचे लोक असोत, जोपर्यंत ते परस्परांच्या दृष्टीकोनातून विचार करत नाहीत, तोपर्यंत कोणताही मतभेद शमू शकत नाही.

दिग्दर्शक डॅनियल चोंग यांनी या कथेसाठी बीव्हर हाच प्राणी का निवडला, यामागे एक महत्त्वाचे पर्यावरणीय वास्तव दडलेले आहे. जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्रानुसार बीव्हर हा निसर्गातील एक 'कीस्टोन प्रजाती' (Keystone Species) मानली जाते. म्हणजेच अशी प्रजाती जिच्या अस्तित्वावर परिसंस्थेचा समतोल अवलंबून असतो. ते जंगलात पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडवून लाकडांची छोटी धरणे बांधतात, त्यामुळे तिथे नवीन पाणथळ प्रदेश निर्माण होतात, जमिनीतील पाण्याची पातळी वाढते आणि इतर अनेक पशू-पक्ष्यांना तिथे आश्रय मिळतो. त्यांची ही छोटी कृती संपूर्ण जंगलाची परिसंस्था जपण्यास मदत करते. बीव्हर हे एकार्थी निसर्गाच्या विद्यालयात शिकून निष्णात झालेले अभियंतेच आहेत !

अमेरिकेतील यलो स्टोन नॅशनल पार्कमधील लांडग्यांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प निसर्गाविषयी खूप काही शिकवून जातो. अनेक दशकांपूर्वी तिथून लांडगे नष्ट झाल्यावर हरणांची संख्या अमर्याद वाढली आणि त्यांनी तिथल्या नद्यांच्या काठची सर्व झाडे खाऊन टाकली. नद्यांचे काठ खचले आणि तिथली परिसंस्था कोलमडली. पण 1995 मध्ये जेव्हा तिथे पुन्हा लांडग्यांचं पुनर्वसन करण्यात आले, तेव्हा हरणांची संख्या नियंत्रणात आली, नद्यांच्या काठी पुन्हा झाडे उगवली आणि सर्वांत आश्चर्यकारक बाब म्हणजे, त्या झाडांमुळे तिथे बीव्हर प्राणी परतले. बीव्हरनी पुन्हा नैसर्गिक धरणे बांधली आणि नद्यांचा वेग शांत झाला. बीव्हरचा विकास हा सर्वांना सामावून घेणारा आहे. जेव्हा मेबेल बीव्हरचे रूप घेऊन प्राण्यांच्या जगात जाते, तेव्हा तिला या अथांग सहजीवनाची आणि आजीने सांगितलेल्या त्या विशाल सृष्टीची खऱ्या अर्थाने अनुभूती होते.

'पॉन्ड रूल्स' - सहजीवनाचे साधे-सोपे नियम :

या चित्रपटातील आणखी एक महत्त्वाचं वैचारिक शिखर म्हणजे किंग जॉर्ज या बीव्हर राजाने सांगितलेले 'तलावाचे नियम' किंवा 'पॉन्ड रूल्स' (Pond Rules). हे नियम तसे अगदी साधे-सोपे वाटावेत असे आहेत; पण त्यातून मानव समाज आणि पर्यावरणीय समतोल यांवर अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे. किंग जॉर्जचा पहिला नियम आहे, 'आपण सर्व जण यात एकत्र आहोत.' (We are all in this together). संकटाच्या वेळी इतरांना मदत करणे, समुदायाची भावना जपणे आणि संकटाचा एकत्रित सामना करणे, हा या साध्या वाक्याचा अर्थ आहे. निसर्गात कोणताही प्राणी एकटा जगू शकत नाही. किंग जॉर्जचा दुसरा नियम अधिक गुंतागुंतीचा आणि निसर्गाच्या मूळ प्रवृत्तीला भिडणारा आहे. तो नियम म्हणजे, 'जेव्हा तुम्हाला भूक लागते, तेव्हा तुम्ही खा.' (When you gott a eat, eat). निसर्गाच्या अन्नसाखळीत एका शिकारी प्राण्याने दुसऱ्याची शिकार करणे हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, त्यात कोणतीही गुन्हेगारी किंवा अपराधी भाव नाही. चित्रपटातील एका प्रसंगात, एलेन नावाच्या अस्वलाला लोफ नावाच्या बीव्हरची शिकार करायची असते. लोफ अत्यंत शांतपणे हे मान्य करतो की, एलेनला शिकार करण्याचा अधिकार आहे, कारण ती तिची नैसर्गिक भूक आहे आणि तलावाचे नियम तसे सांगतात. तो स्वतःहून तिला खाण्याची परवानगी देतो. मेबेल, जिच्यात मानवी जाणीव आहे, ती या दोन नियमांमधील विरोधाभास तत्काळ लक्षात आणून देते. जर आपण सर्व एकत्र आहोत, तर एकाने दुसऱ्याला मारून का खायचे? हा प्रश्न मानवी दृष्टीकोनातून बरोबर वाटतो. पण निसर्गाचा हाच तर खरा समतोल आहे. तिथे जगण्यासाठी शिकार केली जाते, हव्यासापोटी किंवा सुडापोटी नाही. तिथे भुकेपेक्षा, गरजेपेक्षा अधिक संचय करण्याची प्रवृत्ती नाही. याच नियमांच्या मालिकेत किंग जॉर्जचा आणखी एक अतिशय महत्त्वाचा आणि मानवी समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारा विचार दडलेला आहे. तो सांगतो की, 'प्रत्येक सजीवामध्ये काहीतरी चांगले असतेच'. (Everyone has goodness in them.) किंग जॉर्जच्या ह्या नियमानुसार संवादाचे आणि समन्वयाचे दार नेहमी खुले असायला हवे. दिग्दर्शकाने कथेमध्ये भाषिक अलंकारांचा सुंदर वापर केला आहे. जेव्हा सर्व प्राणी संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र पळत असतात, तेव्हा ते एका सुरात 'पॉन्ड रूल्स' अशी घोषणा देतात. पॉन्ड रूल्सचा पहिला सोपा अर्थ म्हणजे 'तलावाचे नियम'. पण त्याचाच आणखी एक अर्थ म्हणजे 'सर्वत्र तलावाचेच (निसर्ग) वर्चस्व आहे' असाही होतो. निसर्गाचे नियम हेच खऱ्या अर्थाने सर्वोच्च आहेत.

चित्रपटाच्या शेवटाकडे जाताना आपल्याला जाणीव होते की, मेबेलचा उद्देश जरी चांगला असला तरी तिचा मार्ग पूर्णपणे अचूक नव्हता. ती सुरुवातीला अत्यंत गोंधळलेली आणि बंडखोर असते. जेव्हा तिला प्राण्यांच्या जगातील अफाट ताकदीची जाणीव होते, तेव्हा ती केवळ तो रस्त्याचा प्रकल्प बंद पाडण्यासाठी नकळतपणे त्या प्राण्यांना मानवाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न करते. तिचा संताप तिला भावनांध बनवतो. त्या उत्तेजनेला पुढे नेत 'टायटस' नावाचा कीटकांचा राजा अत्यंत भयंकर योजना आखतो. मानवांना कायमचे संपवण्यासाठी तो मेयर जेरीच्या सभेवर एका भयंकर आवाजाचा (Sonic Blast) हल्ला करण्याचे षडयंत्र रचतो. हा निसर्गाचा संभाव्य आणि प्रलयंकारी संताप आहे. जर निसर्ग खरोखरच सूड घेण्यास उतरला, तर मानवी अस्तित्व खरंच टिकेल का?

पर्यावरणवाद हा मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधण्यात आहे. एकाच्या समस्येचे उत्तर दुसऱ्याची हिंसा असू शकत नाही. निसर्गाला समजून घेण्यासाठी आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज लागू शकते; पण त्या तंत्रज्ञानाला जोड हवी ती एका संवेदनशील मानवी हृदयाची. त्यामुळेच 'हॉपर्स' ही केवळ प्राण्यांची गोष्ट नाही, तर ती माणसाला निसर्गाशी पुन्हा जोडणारी एक संवेदनशील साद आहे.


 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

नीलेश मोडक,  पुणे ( 15 लेख )
neeleshmodak@gmail.com

लेखक सीनिअर डेटा सायंटिस्ट असून, AI मध्ये त्यांचे US Granted Patents आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी